40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

अभिव्यक्तीच्या साऱ्या जोखमींच्या चौरस्त्यावर

आपल्या मुलाच्या मेसेजमधून रोमन लिपीतले मिंग्लिश शब्द आणि इमोटिकॉन्सच्या चित्रलिपीत होणारा संवाद पाहून त्याचा मध्यमवयीन बाप आपलं व्हॉट्सॲप चाळता चाळता हळहळतो, ‘संपली आता आपली माय मराठी! माय गॉड, मराठीच काय, या पिढीने तर लॅन्गवेजच बायपास केलीय…’ वर्तमानपत्र वाचणारे आजोबा वर पाहून हळूच हसतात. खरंतर या हळहळणार्‍या बापाच्या पिढीनेच इंग्रजीच्या भांडवलावर पहिल्यांदा पांढरपेशी नोकरी मिळवलेली असते. रात्री जेवताना त्याला टीव्ही सांगतो की ‘मी मराठी’ असणं म्हणजे काय ते. मग उखाणे आणि पोवाड्याच्या रोमॅन्टिक आठवणींमध्ये संपूर्ण दोन मिनीटं तो बाप उसासे टाकत राहतो. त्यातल्या मराठीच्या प्रारूपाशी तुलना करत हा बाप दिवसरात्र तरूणाईला ‘जज’ करत राहतो.

किमान तीन पिढ्या शिकून ‘शाहणी’ असलेली अशी कुटुंबंच केवळ ‘भाषेच्या पडझडी’बद्दल दीर्घ संवाद करत असली तरीही ‘आजकालच्या पोरांचं काय खरं आहे! सगळा उथळ कारभार! भाषाच बिघडवून टाकलीय सगळी!’ अशी तक्रार मात्र पिढ्यानपिढ्या तरूणपण ओलांडून ‘ज्येष्ठपणा’ गाठलेली प्रत्येकच पिढी करत असते. भाषा संपत जाण्याविषयी आजच्या मध्यमवयीन बापाला जी काळजी वाटत असते तशीच काळजी कदाचित तीसेक वर्षांपूर्वी त्याच्या आईबापांना वाटलेली असते. बोलण्याची पद्धत बदलत राहते पण आशय तोच. भाषा वाहत राहते आणि पिढ्या बदलत राहतात. मात्र आजच्या तरूणाईची भाषा या नियमापलिकडेही काही वेगळी आहे का? इमोटिकॉन्सच्या चिन्हलिपीकडे जाणारी तरुणाईची ‘भाषा’ एक नवं युग घेऊन आली आहे का?

माणसांबरोबर भाषा नद्यांसारख्या वाहत आल्या आहेत. कधी एकमेकींमध्ये मिसळत त्या प्रवाह वाढवत नेतात, कधी वाहता वाहता बदलत्या प्रदेशाप्रमाणे आपलं रुपडं बदलत वाहतात. माणसाने नद्यांवर जसे बंधारे बांधले तसं भाषांनाही अडवलं, त्यांचे प्रवाह बदलले. गेल्या दोन शतकांत मात्र नद्यांवरचे बंधारे जसे आकाराने वाढत गेले आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या मजबुतीने नद्यांना हवं तसं वळवू वाकवू लागले, तसे मुक्तपणे वाहणार्‍या भाषांचे प्रवाहसुद्धा आपल्या हातात आले. ज्यांच्या हाती सत्ता असते, त्यांच्या भाषासुद्धा जनतेवर राज्य करतात. या नियमाप्रमाणे गेल्या शतकात आपल्या महाराष्ट्रात ‘पेशव्यांच्या मराठी’ची जागा ‘साहेबाच्या इंग्लिश’ने घेतली. ज्या भाषा बोलणार्‍यांचे आवाज उंच नव्हते, त्या भाषा ‘बोली’ झाल्या आणि शांतपणे जमिनीखालून वाहत राहिल्या. आजच्या तरूणाईची भाषा पाहताना वरवर ती इंग्रजीच्या आवरणात गुंडाळलेली दिसत असली तरी तिला कितीतरी स्तर आहेत. जमिनीवर आणि जमिनीखालून वाहणारे शेकडो प्रवाह आहेत.
सोशल मिडिया आणि टीव्ही सिनेमात दिसणार्‍या आंग्लाळलेल्या मिश्र भाषेला आज आपण ‘तरूणाईची भाषा’ म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर इंग्रजीच्या चमचमत्या दुनियेकडे ओढलं जाऊन माय मराठीचा हात सोडणार्‍या ‘जनरेशन वाय’ तरूणांचं चित्र येतं. पश्चिमेकडून आयात झालेली, हॉलिवुड आणि नेटफ्लिक्सच्या दुनियेतून उसनवारी घेतलेली आंग्लाळलेली भाषा ही बहुतेक वेळा तरूणाईची ‘आजची भाषा’ समजली जाते. मात्र आंग्लाळलेल्या देशी भाषेचीही हजार रूपं आहेत. इंग्लंड अमेरिकेच्या ‘ॲक्सेंट’ची हुबेहूब नक्कल करत बोलली गेलेली ‘शुद्ध फिरंगी’ ही काही ‘भारतीय तरूणाई’ची भाषा नाही. इंग्रजी माध्यमात, त्यातही पैसेवाल्या खाजगी शाळेत शिकलेल्या तरूणांची भाषा ही केविलवाणी दिसते, कारण ती एका अभिजन अल्पसंख्य समाजाचं प्रतिनिधित्व करताना सतत विस्थापित जगणं सोबत घेऊन आलेली असते. ती जिथे बोलली जाते, तिथे ती उपरी असते. उच्चभ्रूपणाच्या तिच्या अरुंद कोपर्‍यातून सार्‍या जगाकडे तुच्छतेनं पाहताना ती कमालीची एकटी होत जाते.

आपल्या गावच्या जमिनीत अडकलेली, पण ‘मम्मी पप्पा’च्या मायबोलीला मागे टाकायचा असोशीने प्रयत्न करणारी इंग्रजीची जराशी मीठमिरची टेम्परवारी घेऊन वाढणारी आंग्लाळलेली देशी बोली ही खरी आजच्या भारतीय तरूणाईची भाषा आहे. जगभर पसरलेल्या खुल्या बाजाराच्या संधींचा अवकाश तिला दिसतो, पण तिथवर हात पोचत नाही. आपल्या गावाच्या जंजाळातून शहराकडे आणि तिथून दिसणार्‍या उंचावरच्या जागतिक बाजारापर्यंत उडी मारायची तिची आस मात्र ती घट्ट धरून आहे. वर्षानुवर्षं ‘मराठी नाटक’, ‘मराठी सिनेमा’ नावाच्या सांस्कृतिक जगात बोलली जाणारी भाषा तिला परकी होती. मात्र मराठी दृकश्राव्य जग कूस बदलून ‘झिंगाट’ व्हायची चाहूल लागताच निमशहरी आणि उपनगरी थिएटर-मल्टिप्लेक्सकडे ती जनतेला ओढून आणते. उत्साहाच्या भरात आपल्या ‘आयटम’चं कौतुक करताना हाताशी इंग्रजी हवी आहे, पण ब्रेकअप झाल्यावर तोंडात येणारी अनाहूत शिवी मात्र पक्की गावरान आहे. दोन्ही टोकांवर या भाषेला अस्सल प्रामाणिक राहता येत नाही. मुळात आशयानेच भाषेशी काडीमोड घेतल्यावर या दोन टोकांच्या मध्ये लोंबकळत राहताना ती कधी खोलवरच्या न्यूनगंडाने आणि कधी पोकळ अहंगडाने स्वतःलाच खात राहते.

लिहिणं, प्रकाशित होणं, वाचलं जाणं या भाषेच्या तीन मूलभूत प्रस्थापित पैलूंनी कागदावरून इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर बस्तान हलवायला सुरूवात केली, तेव्हा त्यामागचं राजकारणही रस्ता बदलू लागलं. त्याच्या व्यवहाराचं काही प्रमाणात लोकशाहीकरण झालं. मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या वेगात या व्यवहाराचा आणि त्या बरोबरीने त्याच्या भाषेचा पसारा वाढत गेला. लिहिल्या गेलेल्या शब्दांच्या पलिकडे तिने वेगाने झेप घेतली. या घुसळणीची एक बाजू समृद्धीच्या मोठ्या शक्यता घेऊन पुढे आली आहे. इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी, सोशल मिडियावर आपापल्या भागातल्या भाषेच्या अस्सल अभिव्यक्तीचे अवकाश उभे राहिले आहेत. वेगवेगळ्या समाजगटांच्या भाषेला इथे मुक्त आणि सुरक्षित जागा मिळाली आहे. एका मोठ्या भाषिक इतिहासाची, अनेक पिढ्यांच्या वारशाची जपणूक या माध्यमांवर होते आहे. कितीतरी फेसबुक पेज, ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल्स गावपातळीवरून तरूण चालवत आहेत. लोकांमधून आलेले हे आवाज लोकांपर्यंत, विशेषतः तरूणांपर्यंत सहजपणे पोचतायत. भाषेच्या आपलेपणाच्या बळावर ते हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवत आहेत. मुंबईच्या धारावीपाठोपाठ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या परिघावरच्या तरूणाला ‘हिपहॉप’ आणि ‘रॅप’ची भाषा सापडली आहे. रोजच्या जगण्यातली दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेली दुःखं, जगण्याला भिडतानाचे अनेक कठिण प्रश्न, या सगळ्याविरोधातला बंडखोर आवाज आणि उद्यासाठीची स्वप्नं असं सारं या रॅपच्या भाषेत समाजाच्या सार्‍या थरांपर्यंत हळूहळू पोचतं आहे. शहरा-गावांच्या एकांड्या कोनाड्यांमध्ये मान खाली घालून बसलेल्या तरूण विद्यार्थ्यांना ही गाणी उठून उभं राहण्याचं बळ देतात, तसंच सगळ्या मुबलकतेसकट निवांत बसलेल्या अभिजन नेटिझनच्या न्यूजफीडमध्ये शिरत त्याला अस्वस्थ करतात. पश्चिमेतल्या ब्लॅक चळवळीशी थेट नातं सांगणारी ही गाणी एका अर्थाने जगभरातल्या जनसामान्यांच्या, सीमांतिक समूहांच्या देवाणघेवाणीचं रूपक होऊन जातात. या रॅपप्रमाणेच पॉप संगीताचं रुपडं असणारी देशी गाणी, आपल्या लोकगीतांचं नव्या रूपातलं मिश्रण, हलका नर्मविनोद ते तिखट तिरकस विनोद असं मोठंच वैविध्यपूर्ण शैलीतलं साहित्य नव्या माध्यमांवर तयार होतंय. मोठ्या वेगात ते इथल्या मातीत आपले पाय रोवू पाहतंय.

मात्र या सगळ्या बदलत्या भाषेचा दुसरा चेहरा मात्र खरोखरीच चिंताजनक आहे. व्हॉट्सॲप फेसबुकसारखी माध्यमं वापरणार्‍याचं प्रमाण अजूनही देशाच्या एकूण जनतेच्या मानाने फार थोडं आहे. मात्र ही संख्या अतिशय वेगाने वाढते आहे. ती तशी वाढावी म्हणून बाजारव्यवस्थाच नाही, सरकारसुद्धा प्रयत्न करतंय. या डिजिटल नागरिकत्वाला जणू तरूणपणाचा लायसन्स म्हणून वापरलं जातंय. तिथे भाषेतून जगभरासोबतचा संवाद वाढतो आहे तसा मूकपणा आणि विसंवाद वेगाने वाढतो आहे. एकीकडे मुक्त अभिव्यक्तीवर घातलेल्या जीवघेण्या बंधनांमधून अबोलपणाच्या भाषेचंच वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिसते. दुसरीकडे अत्यंत विखारी ‘ट्रोल’-भाषा ‘संवाद’ हे भाषेचं मूलभूत उद्दिष्टच निकामी करून बोलणंच काय, श्वास घेण्याचीही भीती वाटावी इतकी हवा प्रदूषित करते आहे. अशा वेळी खरोखरच भाषा संपून जाण्याची भीती वाटते. आजच्या तरूणाईच्या भाषेचं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे तिचं दिवसेंदिवस आणखी लहान होत जाणार्‍या बुडबुड्यांमध्ये कैद होत जाणं. ती नुसती उखीरवाखीर पसरलेली नाही. चिवट भिंतींच्या शेकडो एकसंध बुडबुड्यांमध्ये ती वाटली गेली आहे. बुडबुड्यातल्या माणसाला आपलाच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतो. अशा प्रतिध्वनीच्या नादात अडकलेली ती दुसर्‍या आवाजांमध्ये मिसळून वाढण्याचे अवकाश हरवत जाते. उलट आपल्या प्रतिध्वनीशिवाय ऐकू येणारा प्रत्येक वेगळा आवाज संशय, भीती आणि द्वेष घेऊन येतो. पुढे पुढे तर बाहेरून दुसरा आवाजही यावा लागत नाही. एका दीर्घ शांततेत उगाचच कसली तरी चाहूल लागते. भावनावेगात भाषा घशातच अडकून राहते आणि प्रत्येक नव्या दिवसाला बोटं सवयीने झटपट अंगठा किंवा स्माईली टाइपतात.

आमच्या भाषेची कहाणी मिक्स मिडियम आहे. ती ऐकून समृद्धीच्या शक्यताही वाढतात आणि त्याचवेळी र्‍हासाची तीव्र चाहूल लागते. काळ्या पांढर्‍याचं सर्वसमावेशक एकच एक वाक्य संपवण्याच्या दिशेने ती निघाली आहे. तिथवर पोचल्यावर काय दिसेल, माहीत नाही. रस्ता अनिश्चित अंधारात बुडाला आहे. मात्र प्रस्थापित एकवाक्यतेचे सगळे मठ तिला आता असह्य होतात. मुक्तिबोधांच्या कवितेतल्या ओळीप्रमाणे ती बेधडक निघाली आहे.

‘अब अभिव्यक्ति के सारे खतरे उठाने ही होंगे
तोडने होंगे गढ और मठ सब’

या खतर्‍यापल्याड काय आहे ते ठाऊक नाही, पण त्याला भिडण्याची पूर्ण तयारी करून ती चालत निघाली तर आहे. नेमेचि येणारी ही नुसती उखीरवाखीर पडझड नाही, अंधारात हरवलेल्या एका अनोळखी युगाची ही सुरुवात आहे.

राही श्रु. ग. ( मिळून साऱ्याजणी, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक २०१९ )