प्यार पे चर्चा!
नमस्कार!‘नेमेची येतो’ या धर्तीवर १४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे – येतो आणि ‘प्रेम’ या विषयावरील चर्चेला धुमारे फुटण्याचं एक वार्षिक निमित्त मिळतं. खूप जुना असला तरी कधीच जुना न होणारा विषय म्हणजे प्रेम – अर्थातच ‘रोमँटिक प्रेम’. कारण प्रेमाच्या इतरही अनेक छटा असल्या तरी रोमँटिक प्रेमाला माणसाच्या भावविश्वात, एकूणच मानवी संस्कृतीत एक खास जागा आहे. या प्रेमाचे आविष्कार, त्यातून निर्माण होणारे संघर्ष हे सगळं एका बाजूने स्त्री-पुरुषांमधील आदिम नात्याचं एक अविरतपणे प्रकट होणारं रूप आहे आणि दुसऱ्या बाजूने हा एक मानसशास्त्रीय, शरीरशास्त्रीय अभ्यासाचा विषयही आहे.
तर येत्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाविषयी, सहजीवनाविषयी, त्यातील मानसिक व शारिरीक गुंतवणुकीविषयी आणि मुख्य म्हणजे आजच्या गतिमान जगण्यात प्रेमात बदलत्या संदर्भांविषयी आपल्याला काही महत्त्वाचं गवसतंय का याचा शोध घेऊया ‘मिळून आऱ्याजणी’च्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात. यासंदर्भात खाली काही दिशादर्शक प्रश्न दिले आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने किंवा स्वतंत्रपणे तुमच्या मनातील विचारांच्या अनुषंगाने सुमारे ४०० ते ५०० शब्दांतलं टिपण ५ जानेवारीपर्यंत saryajani@gmail.com या आमच्या इमेल आयडीवर पाठवा. निवडक टिपणांना फेब्रुवारी २०२० च्या अंकात स्थान दिलं जाईल.
- प्रेमभावनेचं विश्लेषण तुम्ही कसं करता?
- रोमँटिक प्रेम या भावनेचं नियमन करण्यापेक्षा दमन करण्याकडे समाजाचा, संस्कृतीच्या कल राहिला आहे असं वाटतं का?
- दुसऱ्या बाजूने पाहता या भावनेचं अवाजवी उदात्तीकरण केलं जातं असं वाटतं का? थोडक्यात ‘प्रत्यक्षात दमन, पुस्तकात उदात्तीकरण’ असं काही चित्र दिसतं का?
- प्रेम या भावनेची अनुभूती आणि प्रेमाचं प्रकटीकरण याबाबत काही ठळक निरीक्षणं / कालसापेक्ष फरक अधोरेखित करावेसे वाटतात का?
- पारंपरिक दृष्टीने पाहता विवाह ही प्रेमाची सुखद परिणती आहे. या चित्रात आज काही बदल झाला आहे असं वाटतं का? विवाहाची अपरिहार्यता कमी झाली आहे असं वाटतं का?
- प्रेमाची पूर्तता होण्यासाठी सहजीवनाची कुठली मॉडेल्स यापुढे प्रभावी ठरतील असं वाटतं?
- प्रेम या जाणिवेबाबतचं आकलन अधिक प्रगल्भ व्हायची गरज आहे का? त्यासाठी काय करावं लागेल?
- सध्या चर्चेत असणाऱ्या ‘लव्ह जिहाद’बाबत तुम्हांला काही मांडावंसं वाटतं का?
धन्यवाद,
संपादक