40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

इंटरनेटवरील आर्थिक व्यवहार – ओळख व चर्चा

गेल्या दशकात तंत्रज्ञानातील बदल अतिशय वेगाने घडत गेले आहेत. या काही वर्षांत सामान्य माणसांचे बँकेचे आणि बँकेबरोबरचे व्यवहार संपूर्णपणे बदलले आहेत. आता बँकेच्या पायऱ्या चढण्याची वेळ फार कमी येते. पैसे काढण्यासाठी रांगेत वेळ घालवावा लागत नाही. एवढंच नाही तर आता भाजी, फळे, किराणा खरेदीपासून संगणक , कपडे, चपलांपर्यंत खरेदीचे असंख्य व्यवहार इंटरनेट आणि पर्यायाने संगणक आधारित माध्यमातून पार पाडता येतात. एखादी कोरोनाची साथ तर अशा प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांना आपल्या जीवनाची साथीदार बनवते.

आणि मग विशेषतः पन्नाशी ओलांडलेल्या स्त्री/पुरुषांना हा जणू एक भूलभुलैय्या वाटू लागतो. आत शिरावं लागतं ते अनिवार्यच आहे, मात्र आत शिरल्यावर चक्रव्यूहात अडकल्याची भावना येते. गोंधळ उडतो. भांबावायला होतं. कोणीतरी आपल्याला फसवतंय, आपला फायदा घेतंय असं वाटतं. छोटे छोटे व्यवहार अवघड वाटू लागतात. थोडंसं तंत्रज्ञानाचं भय आणि जोडीला अपरिचित व्यवहार पद्धतीचं भय अशी दुहेरी कोंडी होते.

परंतु कितीही गहन किंवा क्लिष्ट वाटले तरी आता इंटरनेट आणि संगणक अवलंबित आर्थिक व्यवहारांना पर्याय नाही, हे निश्चित. याची मुख्य कारणं अशी आहेत –

१) सोय हा प्रथम आणि प्रमुख फायदा

२) आपल्या खात्याचा वापर कुठूनही आणि केंव्हाही करता येतो. त्याला स्थळ-काळाचे बंधन नाही

३) तुमची बँक तुमच्या हाताशी २४ तास ३६५ दिवस असते

४) सर्व व्यवहारात उत्तम आणि समान कार्यक्षमता राहते

५) ग्राहकाला आपल्या बँक खात्याचे अथवा कुठल्याही ऑनलाइन व्यवहाराच्या खात्याचे सतत निरीक्षण करता येते

६) कुठलीही लबाडी किंवा फसवेगिरी लगेच उघडकीला येऊ शकते आणि त्यावर ताबडतोब उपाययोजना करता येते

७) व्यवहार सुरक्षिततेची हमी

आणि महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाइन आर्थिक व्यवहार हे आता एक त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याचं वास्तव्य आपल्या आयुष्यात कायमचं असणार हे सत्य आहे. तंत्रज्ञानातून येणारी नावीन्यपूर्णता आता सर्वव्यापी झाली आहे. आपले रोजचे नित्यक्रम त्याने बदलले आहेत. हातातले फोन बदलले, पाहायचे टीव्ही बदलले, चालवायच्या गाड्या बदलल्या, अगदी खाद्यसंस्कृती सुद्धा बदलली.

नेमक्या याच उद्देशाने, संगणक आधारित आर्थिक व्यवहार सुलभतेने पार पाडता यावेत आणि दैनंदिन व्यवहार करताना उगीच भीती वाटू नये यासाठी ही लेखमालिका सुरु केली आहे. या मालिकेचा मुख्य हेतू असा आहे की, आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार; मग ते बँकेचे असोत अथवा संगणकावर आधारित इतर प्रकारचे असोत, सामान्य व्यक्तींना ते सारे अडथळा विरहीत करता यावेत. त्याचबरोबर त्यातील धोक्यांची कल्पना असावी आणि या धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काय करावं, हे जाणून घेता यावं.

सध्या सामान्यतः ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत –

  • एटीम – आपल्या बचत खात्यातून पैसे काढणे व त्यात भरणा करणे
  • कार्ड्सचा वापर

– डेबिट (खर्च) व क्रेडिट (जमा) कार्डचा वापर

– इतर कार्ड्स, उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. व त्यांचा आर्थिक व्यवहारातला उपयोग

  • संगणक आधारित आर्थिक व्यवहार

– बँकेचे व्यवहार

– ऑनलाइन (अर्थात संगणकाद्वारे) खरेदी/विक्री, वर्गणी भरणे, बस/गाडीची तिकिटे, बिल भरणा

  • मोबाल फोनद्वारे आर्थिक व्यवहार

– पेटीएम/ गूगल पेच्या आधारे खरेदी, तिकिटे देवघेव, मोबाईलच्या आधारे बँकेचे व्यवहार

  • इतर व्यक्तीनिरपेक्ष आर्थिक व्यवहार

– विमा पॉलिसी, पैसे हस्तांतरण, अभौतिक समभाग खाते (डिमॅट अकाउंट), स्थिर ठेव (फिक्स्ड डिपॉझिट), कर्ज

यासोबत लेखमालिकेत खालील गोष्टीही समाविष्ट केल्या जातील –

  • संगणकीय आर्थिक व्यवहारातील संरक्षणाची मूलभूत माहिती
  • ऑनलाइन आर्थिक व्यवहारातील धोक्याच्या घंटा
  • संगणक आधारित आर्थिक व्यवहारात घ्यायच्या विशेष काळज्या
  • संगणकीकृत व्यवहारातील काही तोटे

वरील सर्व विषय एकेक करून पुढील भागांमध्ये हाताळले जातील. सविस्तर टप्पे अधोरेखित केले जातील. एकूण या मालिकेची रचना अशी असेल की सर्व आर्थिक व्यवहारांची प्रक्रिया इथे परिभाषित केली जाईल. त्यावर येणाऱ्या व्यावहारिक अडचणींची संक्षिप्त माहिती अधोरेखित केली जाईल.

या मालिकेचा हेतू सामान्यांपर्यंत पोचणे असा आहे. त्यामुळे जड सिद्धांत, अवघड संकल्पना किंवा किचकट व्याख्या यांचा शक्यतो वापर केला जाणार नाही. केवळ व्यावहारिक परिभाषा आणि सविस्तर प्रक्रिया समजावून संकल्पना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला जाईल. अर्थात आपल्या शंकांचे निरसनही होईलच. ग्राहक या नात्याने तुम्हां सर्वांना वेगवेगळे अनुभव आले असतील. ते इथे जरूर मांडावेत. त्यावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून चर्चा करता येईल. तेव्हा मनात आलेले प्रश्न व शंका जरूर नमूद कराव्यात. त्यांचं योग्य निरसन केलं जाईल आणि त्यातून हा विषय समजून घ्यायला इतरांनाही मदत होईल. तुमच्या आमच्या मनातील भय कमी होईल आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांशी मैत्री निर्माण होईल. चला तर मग, सहनाववतु सह नौ भुनक्तु….

 

कौमुदी अमीन 

kaumudi.amin@gmail.com

कौमुदी अमीन या फायनान्शिअल मॅनेजमेंटमधील डॉक्टरेट असून त्यांना कॅपिटल मार्केट्स, कॉर्पोरेट फायनान्स, कमर्शिअल लेंडिंग या क्षेत्रांमध्ये ८ वर्षांचा तर फायनान्शिअल अ‍ॅप्लिकेशन्सच्या सॉफ्टवेअर विकसनामधील १९ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी या क्षेत्रात अध्यापनही केलं आहे. तुमचे प्रश्न त्यांना वरील इमेल आयडीवर पाठवता येतील.  

(Image credit : <a href=”http://www.freepik.com”>Designed by macrovector / Freepik</a>)