40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

एका गावाची टाळेबंदी

आमच्या घरासमोरच दूध वितरण केंद्र आहे – म्हणजे दूधवाला आहे, म्हणजे दुधाच्या पिशव्या त्याही प्लास्टिकच्या मिळतात .दूधवाला म्हणजे गणपूसेठ. त्याला मधुमेह ,रक्तदाब सगळं काही आहे,, गेल्या तीस वर्षांपासून हाच व्यवसाय करतो आहे, माझा मित्र आहे .तरी धंदा म्हटलं की तो वेगळाच वागतो. लॉकडाऊन झालं तरी दूधवाल्याला मात्र परवानगी होती. सकाळी तीन-चार तास आणि संध्याकाळी चार तास. लोक मस्तपैकी त्याच्या दुकानात जाऊन दुधाच्या पिशव्या विकत घ्यायचे. हातात पैसे द्यायचे. गर्दी एवढी होती की त्याचा इंजिनियर मुलगा, त्याची बायको आणि नोकर-चाकर सगळेच त्याच्या मदतीला.

हे सगळं आधीपासून होतं, पण जाणवायचं नाही. एवढ्याश्या त्या दुकानात एवढी सगळी गर्दी. मग कुठलं आलंय सोशल डिस्टन्स (सामाजिक अंतर)! मग एक दिवस काही दिवसानंतर गणपूची पूर्ण चप्पी दिसली. सगळे केस काढले होते. मला जरा आश्चर्यच वाटलं .गच्चीतून बराच काळ त्याच्याकडे पहात राहिलो तर बरेच चमन गोटे दिसले. काही रस्त्याने चाललेले , काही गणपूकडे आलेले .काही मोटारसायकलवर. मला राहवेना. मी गणपूला फोन केला.
“बंद आहे की नाही?”
“आहे की दादा ”
“मग कुणी वारलं का?”
‘नाही दादा”
“मग केस का काढले?”
“सहज…”
“अरे पण बंद आहे की नाही?”
“आहे की”
“मग वस्तरा काय पोराने फिरवला की काय?'”
” बबन न्हाव्याला घरी बोलवलं आणि केस काढून टाकले.”
“फारच चमन गोटे दिसायला लागलेत”
“सगळ्यांनी हेच केलं. लॉकडाऊनची फ्याशन.”
मला बारा बलुतेदारांची आठवण झाली. त्याला म्हटलं, “तुला रक्तदाब आहे, साखर आहे. जपून काम कर” माझ्यातला डॉक्टर जागा झाला.
“म्हणजे काय करू?”
” दुकानाबाहेर चौकोन मार्किंग कर. सामाजिक अंतर मार्क कर.”
“हो उद्याच करतो” तो म्हणाला.
“पैसे घ्यायला एक ट्रे. दुधाची पिशवी द्यायला एक ट्रे कर. हाताला हात लागू देऊ नको. हाताला हात लागल्यानेच कोरोना पसरतो. ”
“हो करतो दादा.”
“मास्क बांध की.”
“रुमाल बांधतो ”
“तो तर तुझ्या गळ्यात लटकतो आहे.”
गणपू मला दिसत होता कारण मी समोरच गच्चीत उभा होतो. त्याने तो कसाबसा नाकावर ओढला आणि पायजमा ढेरीवर.
“काळजी घे गणपू ”
“हाव दादा”
सकाळी बघितलं तर खरंच रात्रीतून त्याने चौकोन टाकले होते आणि दारासमोर एक बाक टाकलं होतं. म्हणजे दुकानात प्रवेश नाही .

दोन-तीन दिवसांनी बघितलं तर पहिले पाढे पंचावन्न. गणपूचा रूमाल गळ्यात आणि पैसे हातात घेणं चालू. बायको मात्र साडीचा पदर पूर्ण बांधून घ्यायची. मुलाचा मास्क, नाक तोंड उघडं. लोक ऐकत नव्हते. एकदम चार पाच जण उभे राहायचे. त्याला परत फोन केला.
“कमीत कमी मास्क तरी बांध आणि पैशाला हात लावू नकोस.”
“हो दादा… हो नक्की. पण दादा लोकही गावातले, ओळखीचे. कुणाला नाही म्हणणार? लोक रागावत्या.”
लोकांना समजत नव्हतं की त्यांना समजून घायच नव्हतं की ‘हं, काय होतं?’ अशी उर्मट भावना होती? लोक तिथे येत होते दुधाची पिशवी घ्यायला. त्यातल्या पन्नास टक्के लोकांना मास्क नव्हता कानीकपाळी सरकार टीव्हीवरून ओरडत होतं. गावात रिक्षा फिरत होत्या .सांगितलं जात होतं. नगरपालिका सांगत होती .ग्रामपंचायत सांगत होती ‘मास्क लावा .हात धुवा. स्वच्छता ठेवा’ आणि 50 टक्के लोक तसेच दूध घ्यायला येत होते.

ही दूधवाल्याची परिस्थिती. आताशी तर त्याची दोन वर्षाची लहान नातही दुधाच्या दुकानात खेळू लागली आणि आमचा मेडिकलवाला राकेश तिच्याशी मस्त खेळू लागला. तिच्याशी खेळताना राकेशचा मास्क गायब. कारण मास्कमुळे ती त्याला ओळखत नव्हती. मी ओरडलो फोनवर तर तो म्हणाला “हे गाबडं एवढं लहान, वेळ जात नाही. त्यात माझी मुलगी, जावई आणि नात कालच पुण्याला गेले.”
“आं? कसे गेले?”
“पहाटे चार वाजता निघाले. साडेसातला पोचले.”
“कुणी अडवलं नाही का?”
“नगर जिल्ह्याच्या सीमेवर अडवलं. पण यांनी गयावया केली तर त्यांनी सोडून दिलं.”
” पण ते का गेले?”
“त्यांना इथे बोर होत होतं”
“पुण्यात जाऊन तरी काय करणार? ”
“माहीत नाही, पण लहान मुलगी तिच्या खेळण्यांसाठी तरसली होती.”
मी कपाळालवर हात मारून घेतला.
त्या राकेश मेडिकलवाल्याला म्हटलं, “अरे तुझ्यापासून त्या मुलीला खूप धोका आहे कारण तुझ्याकडे औषध घ्यायला येणारे रुग्ण.”
“सर तुमच्याकडे ही रुग्ण येतात .”
“आपण सगळी काळजी घेतो.”
“जे व्हायचं ते होईल. त्यात आपला धंदा असा पडला.”
”म्हणून तर आपण ज्यास्त काळजी घेतली पाहिजे. तू तर मास्कपण लावत नाहीस.”
“फारच कसंतरी वाटतं. जीव गुदमरतो” म्हणून त्याने फोन ठेवला.
आमचं हॉस्पिटल आणि घर एकाच ठिकाणी आहे. गावात म्हणजे गावठाणात. वाडा होता तो पाडून आम्ही घर बांधलं. त्यामुळे वरच्या मजल्यावर फार खिडक्या ठेवल्या. कारण गावठाणात घरं एकमेकांना चिटकून असतात. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हांला एक बाजू मोकळी मिळाली. तिथला मठ पडला होता, त्यामुळे तिथे मोकळी जागा होती. त्या बाजूच्या खिडकीतून बघितलं तर ‘स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र’ दिसतं. त्या सेवा केंद्रात लोक पैसे घेण्यासाठी रांगेत उभे असायचे. ते बहुतेक खेड्यावरचे. त्यातल्या बऱ्याच लोकांनी रूमाल बांधलेले असायचे किंवा उपरणे. काहीजणांना मात्र हे शक्य नव्हतं. ते तोंड उघडे ठेवूनच असायचे. रांगेत उभे, पण अंतर नसायचं. चिटकून उभे. त्याचं कारण मानवी स्वभाव हेच असू शकतं. कारण तशी त्या गल्लीत जागा होती. ३ फूट अंतर ठेवून उभं राहता येईल इतकी जागा होती. रांगेत एका वेळेला दहा-पंधरा लोक असायचे, पण प्रत्येकाला घाई! तिथे भांडणंही व्हायची.

दुसऱ्या खिडकीतून बघितलं तर समोर एक किराणा व्यापारी राहतो. त्याची गच्ची आमच्या घरासमोर. त्या व्यापारी घरात व्यापारीच विचार. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. लॉकडाऊनच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी मला मेधाने (बायको) दाखवलं.
“बघ रे समोर, धुणं भांडी करणारी बाई.”
“तिच्या तोंडाला फडकं पण नाही.” मी बघून म्हणालो.
“बाल्कनीत काम करतेय.”
“आपण मात्र घरात स्वतः सगळं काम करतोय.”
“त्या व्यापाराने हा विचार केला असावा की या बाईला फुकट पैसे कशाला द्यायचे?”
“त्याला विचारलं तर ‘ती आमच्याकडे येते आणि सरळ घरी जाते’ असं कदाचित तो सांगू शकेल.”

राजरोसपणे ती बाई तिथे काम करत होती. त्या व्यापाऱ्याला कदाचित पैश्यापुढे कोरोनाची भीती वाटत नव्हती. मी मेधाला म्हटलं, “बघ ही एक प्रकारची पिळवणूकच आहे. सरकार म्हणतं आहे की कर्मचार्‍यांना तसाच पगार द्या. घरात कोणाला प्रवेश नको. कारखाने बंद ठेवा. घर बंद ठेवा .स्वतः काम करा .हा व्यापारी काय हे ऐकत नाही.”
ही झाली एक खिडकी. समोर दूधवाला आणि उजव्या बाजूला स्टेट बँक आणि व्यापारी. डाव्या बाजूला बघितलं तर ओट्या ओट्यावरून तरुण मुलं टाळेबंदी लागू झाल्याबद्दल मस्त घोळके करून बसतात आणि जोरात गप्पा मारतात. दिवसभर आणि कदाचित रात्रभर. सरकारची रिक्षा आली किंवा पोलिसांची गाडी आली की मुलं पटकन बोळीतून पळून जायची. त्यांनी टोप्या घातलेल्या पण तोंडाला पट्टी, मास्क नाही. टोपी घालू शकतो तर तोंडाला पट्टी का लावू शकत नाही? त्याच बाजूच्या खिडकीतून अजून एक कुटुंब दिसतं. त्या कुटुंबात जे वयस्कर नवरा-बायको आहेत त्या दोघांना सकाळी फिरण्याची सवय. बाईला रक्तदाब, साखर. नवरा सायकल घेऊन सायकलवर मागे छोटीशी पाण्याची कळशी लावून गणपतीला अंघोळ घालायला जायचा. ते त्याने टाळेबंदीमध्येही चालू ठेवलं. बाई फिरायला जायची. तिने फिरणं चालू ठेवलं होतं. टाळेबंदी यालाच म्हणायचं काय? मी मात्र माझी सायकल बंद केली होती. ते त्याने पाहिलं होतं, तरी ते दोघे त्यांचं रूटीन चालूच ठेवत होते. त्या पलीकडे एक जैन कुटुंब राहतं. तोंडाला फडकं बांधून दोन चार स्त्रिया रोज दिवसातून तीन वेळा त्यांच्या मंदिरात म्हणजेच स्थानकात जातात. पायात चप्पल नसते. त्या स्त्रियांनी टाळेबंदीत ते चालूच ठेवलं होतं. सगळी मंदिरं, धर्मस्थळं बंद होती. मग स्थानक कसं चालू? जेवढे मुस्लिम कट्टर, जेवढे ख्रिश्चन कट्टर, तेवढेच जैनधर्मीय पण कट्टर का? या स्त्रिया मला माझ्या खिडकीतून नेहमी जाताना दिसतात. दिवसातून चार ते पाच वेळा आजही त्या जातात. तिथे हाताला हात लागणार. सामाजिक अंतर नसणार. मशीद मात्र बंद होती आणि डोंगरावरचं महादेवाचं मंदिरही बंद होतं.

आमच्या घरात उंदीर घुसला आणि नुकसान करू लागला. आमचे दहा टक्के कर्मचारी कामावर होते. त्यातल्या मनोहरला मी विचारलं, “तुझ्या घरी उंदराचं काही विष आहे का?”
तो म्हणाला “सर, विकत मिळेल ना.”
“दुकानं बंद आहेत की”
“दुकानदार बंद दुकानासमोर बसलेले असतात. आपण जायचं. सांगायचं. ते हळूच माल काढून देतात.”
“पोलीस नसतात का?”
“ते पोलिसांचा अंदाज घेतात. आजूबाजूचा अंदाज घेतात आणि त्यांचा व्यापार गुपचूप चालू राहतो.”

सगळंच मिळत होतं आमच्या लहानशा गावात. सुरेश नावाचा एक मित्र. त्याचा बार आहे. त्याला मी फोन केला.
“लेखक मित्र आले आहेत. खादी दारूची बाटली मिळेल का?”
तो म्हणाला, “तुम्ही म्हणताय म्हणून मी आणून देतो. मित्रांसाठी मी घरी बाटल्या आणून ठेवल्या आहेत.” आणि जोरात हसला. “दादा तुम्हाला प्यायची म्हणून सांगा ना. लेखक मित्र लॉकडाऊनमध्ये कसे येतील?”
मी म्हटलं, “मला नकोय पण मी तुझी परीक्षा घेत होतो.”
याचा अर्थ त्याने घरात शंभर-दोनशे बाटल्या तरी आणून ठेवल्या असतील आणि तो छानपैकी धंदा करत असेल. देशी दारू मिळत असेल. गावठी तर नक्कीच.
एक दिवस दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. त्याचं नाव शेखर. व्यापारी मनुष्य. तो म्हणाला, “डॉक्टर, उद्या आमरस जेवायला या.”
“काय विशेष?”
तो म्हणाला, “दरवर्षीप्रमाणे मुली माहेरी आल्या आहेत.”
माझ्या लक्षात आलं की दरवर्षी सगळ्या लग्न झालेल्या मुली आमरस खायला त्याच्या घरी येतात. माहेरवाशिणी. त्याचं एकत्र कुटुंब आहे. चार-पाच मुली येतात.
मी त्याला म्हटलं, “हो. अरे पण राणी तर नगर जिल्ह्यात दिली आहे. कविता वाशिममध्ये आहे. मग जिल्हाबंदी असताना त्या कशा काय आल्या?”
तो म्हणाला “आल्या.”
मला वाटलं पोलिसाची परवानगी घेतली असेल. सरकारने तोपर्यंत नोडल ऑफिसर नेमले होते .
“परवानगी घेतली होती का?” मी.
तो म्हणाला, “डॉक्टर, आपल्याला काय… काम करून घ्यायचं. म्हणजे कसं? पोलिसही माणूस असतो ना! कधी सोडतात तर कधी शंभर रूपये लावायचे.”
मी त्याला म्हणालो, “जेवायला तर काही येणार नाही. कारण मी घराच्या बाहेर पडत नाही.”
तो म्हणाला, “मी डबा पाठवून देतो.”
मी त्याला म्हणालो, “घराबाहेर ठेव. मला फोन कर.”
तो चिडला आणि म्हणाला, “म्हणजे आम्हाला कोरोना आहे का?”
“तसं नाही रे. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही हे आपण पाळलं पाहिजे.” त्याला कळलं की नाही माहीत नाही पण त्याने डबा बाहेर आणून ठेवला.
दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला आणि म्हटलं, “चांगलं होतं जेवण, पण एवढी माणसं घरात आहेत तर वहिनींना त्रास होत असेल भांडी घासण्याचा वगैरे.”
तो म्हणाला, “डॉक्टर, बाई येते की. सगळे कर्मचारी येतात. आम्ही त्यांना फुकट पगार देणार आहोत का?”
“त्यांनी जर कोरोना घरात आणला तर?”
“त्या कशा कोरोना घरात आणतील? त्यांचं घर शेजारीच आहे. रोजच्या बघण्यातल्या आहेत. गरीब आहेत. भरू द्या पोट त्यांना.”
“रोजच्या जगण्यातल्या लोकांना कोरोना होणार नाही का?” मी त्याला विचारलं आणि कपाळाला हात लावला.

सचिनशेठला फोन केला. त्याला म्हटलं, “काय म्हणतोस? धंदापाणी कसं काय?” त्याचं सोन्याचं दुकान आहे.
तो म्हणाला, “कालच ३०००० चं सोनं विकलं. म्हणजे दागिने विकले. लग्न आहे. मी सोनं घरी आणून ठेवत असतो. तुम्हांला तर माहीत आहे. त्यांना घरी येऊन गेलो आणि त्यांनी दागिने विकत घेतले. डॉक्टर हेच नाही तर लग्नाचे बस्तेसुद्धा चालू आहेत. हळूच मागच्या दाराने गिऱ्हाईक मध्ये घेतात आणि लग्नाचे बस्ते बांधले जातात.” आणि झालं असंच. पंधरा दिवस – महिन्याने माझ्याकडे एक रूग्ण आला. कपाळाला लग्नातलं कुंकू लावलेलं. कडक टोपी.

मी म्हटलं, “काय रे पोपट, कुठल्या देवाला जाऊन आलास?”
तर तो म्हणाला, “नाही दादा. मळ्यात लग्न होतं.”
“किती माणसं जमली होती?”
“होती शंभर एक. पटपट लग्न लावलं. माणसं जेवली. पटकन निघून गेली.”
“खेड्याची माणसं आली कशी काय?”
“त्याला काय झालं? काही जीपडयातून आली, काही मोटरसायकलवर.”
आठ दिवसानंतर बातमी आली की त्या खेड्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले. ते दोघंही लग्नासाठी ठाण्याहून हिवरखेडयाला आले होते. वास्तविक सगळी मंगल कार्यालयं बंद ठेवलेली होती. लॉन्स बंद. यांनी मळ्यात लग्न केलं. बस्ताही झाला. दागिने झाले. जेवण झालं आणि कोरोनाही लग्नाला आला. त्या खेड्याला सरकारने सील केलं. ही अशी बेजबाबदार लोकांची टाळेबंदी!
एकदा सुखदेव आला शेतावरून. आमचं गाव हायवेला. त्याच शेत आणि घरही हायवेला.
“दादा लई लोक पायी चाले वो. लई हाल. पानी मागत्या, खायला मागत्या, चहा मागत्या. आता सांगा आपली मानुसकी काय सांगते? जर जमलं तर द्यावं. पन भीती वाटते वो जवळ जायची. मग आपलं ठेवावं लांब. करोना का फरोना, समदी मानुसकी संपवून टाकली.” त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आमच्या गावात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगालचे मजूर आहेत. पण खेड्यातल्या लोकांनी आणि त्यांच्या मालकांनी त्यांना सांभाळलं. बरीच कामं चालू होती. लहान गल्लीबोळात कोण बघतंय? त्यामुळे बाहेरच्या लोकांचे हाल झाले नाहीत. नसावेत. आमच्या घरासमोर पीओपी करणारे लोक राहत होते ते दोन वेळ जेवायचे आणि मोबाइल वर सिनेमे पहायचे. त्यांच्या मालकाने त्यांची सोय केली असावी. परवा रेल्वे सुरू झाली आणि ते चांगले कपडे घालून निघून गेले.

दवाखान्यात रूग्ण कसा बघायचा हे कुणीच कुणाला सांगितलं नाही. आमच्या संघटनेने सांगितलं नाही आणि सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे दिली नाहीत. कुणी म्हणतं फक्त तोंडाला फडकं लावून बघा. कुणी म्हणतं पीपीइ किट घालून बघा. पहिल्या दिवशी आम्ही पेशंट बघायला गेलो तर बराच गोंधळ होता. आम्ही सांगितलं की फक्त पेशंटने मध्ये यायचं. नातेवाईक रागावू लागले, “तो एवढा पडला आणि आम्ही त्याच्याबराबर यायचं नाही म्हणजे काय?” त्यावर “त्याला ड्रेसिंगची गरज आहे. तुम्ही येऊन काय करणार?” असं जोरात बोलल्यानंतर ते नातेवाईक रागावून निघून गेले. हे बदललेले नवीन नियम त्यांना माणुसकीच्या विरोधात वाटत होते. त्यामुळे बरेच लोक नाराज झाले. बर्‍याच लोकांनी रुमाल किंवा उपरणं बांधलं होतं. त्यातले काहीच मला ओळखू आले. रामराव ओळखू आले नाहीत म्हणून ते रागावले. स्त्री रूग्णांनी तोंडाला मोठं फडकं बांधल्यामुळे त्या ओळखू आल्या नाहीत. एकूण बराच गोंधळ उडाला. आधी मी सगळ्या रुग्णांना नावानिशी ओळखत होतो कारण चाळीस वर्षांपासून दवाखान्यात काम करतोय.

आज माझं वय ६५. मग मी ६५ व्या वर्षी रूग्ण बघावेत की नाही हाही एक प्रश्नच होता. नाही बघितले तर ते माझ्या मनाला पटत नव्हतं आणि बघितले तर मलाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका होता. कारण वय. मधुमेह झालेला. अँजिओप्लास्टी, रक्तदाब हे सगळं बरोबर घेऊन जगतो. मग मी दवाखाना चालवावा की नाही? खेड्यात मी वरच्या मजल्यावर बसून ‘मी इथे नाही’ असं लोकांना सांगू शकत नाही. लोकांना माझी गाडी दिसणार. वर दिवे दिसणार. माझी हालचाल दिसणार. समोरचा दूधवाला सांगणार की दादा वर आहेत. शिवाय माझ्याच मनाला पटत नाहीये ही महत्त्वाची गोष्ट आहेच.

हे मात्र खरं की दवाखान्यात जाऊ नका असं सारखं सांगितल्यामुळे आणि कोरोनाची भीती लोकांच्या मनात बसल्यामुळे दवाखान्यात फार कमी रूग्ण येत आहेत.

रमेश आला.
“बोला”. मी म्हटलं.
“काही नाही. तुम्ही कसे आहात हे बघायला आलतो.”
“मी बरा आहे.”
“तुम्हाला जास्त धोका आहे. जपून राहा दादा.” असं म्हणून तो निघून गेला.
माझ्या डोळ्यांत पाणी आणि डॉक्टर झाल्याचं समाधान.
शंकरराव आले.
“हे काय ध्यान? तो पाटील डॉक्टर तर तसंच पाहून राहिला पेशंट. तुमी तर लई घाबरून राहिले.”
मी अवाक बघत राहिलो.

साळवे आले.
“दादा तुमी कुठं जाऊ नका. तुमच्याशिवाय मला गुण येत नाही. द्या एक टोचून.”

हिरे गुरूजी आले.
“खूप धडधड होते. झोप येत नाही.”
“कोरोनाची भीती वाटते का?”
“हो.”
“शांत रहा. व्यायाम करा. हात धूत रहा. चेहऱ्याला हात लावू नका. ह्या गोळ्या घ्या. बरं वाटेल.”
“तुम्हांला बघितलं आणि बरं वाटलं बघा. ”
मला परत भरून आलं.

एक डॉक्टर मित्राचा फोन.
“काय दवाखाना सुरू आहे का?
“हो.”
“अरे बाबा रुग्णाला न तपासता गोळ्या लिहून दे.”
“समोरचा रूग्ण अपेंडिक्क्सचा आहे. त्याच्या पोटाला हात न लावता मी निदान कसं करू?” माझा प्रश्न.
“तुला होणार कोरोना. तुझं काही खरं नाही.” त्याने फोन ठेवला.

वरवर दिसायला टाळेबंदी आहे. आतून सगळे कारभार चालू आहेत. कुणीही कुणाला घाबरत नाही याचं मला फार विशेष वाटतं. आपलं कुणी ऐकत नाही याचं दुःखही होतं. मध्यमवर्ग थोडासा घाबरला असेल. तो घरात बसून असेल. पण व्यापारी, रिकामे तरूण – हे काही घाबरलेले नाहीत. आपण फार अर्धवट नागरिक तयार केलेत हेच खरं.

 

डॉ. राजेंद्र मलोसे
चांदवड, जि. नाशिक

maloserajendra@gmail.com