40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

एक ‘न्यूड’ मुलाखत

‘न्यूड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना बहुस्तरीय अनुभव दिला. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट मराठी पॅनोरमातून काढण्यात आला होता. मात्र पुढे कोणत्याही कटशिवाय तो प्रदर्शित झाला आणि मराठीतील एक ‘पाथ-ब्रेकिंग’ चित्रपट म्हणून त्याची नोंद घेतली गेली. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी त्यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत.

मी जेजे स्कूल ऑफ आर्टच्या तिसऱ्या वर्षाला असताना ‘नग्नता’ हा विषय माझ्या मनाला भिडला. माझा विषय अप्लाइड आर्टस् होता. न्यूड मॉडेल्स फाईन आर्टस्मध्ये वापरली जायची. जेव्हा आम्ही त्या इमारतीत जायचो तेव्हा काही वेळा तिथे ‘प्रवेश निषिद्ध’ अशी पाटी लिहिलेली असायची. पेंटिंग हा विषय घेतलेल्या सीनियर विद्यार्थ्यांनाच फक्त तिथे प्रवेश होता. त्यामुळे उत्सुकता चाळवली जायची की इथे नक्की काय होतं? एकदा आमच्या उपाहारगृहात मी काही स्त्रिया, पुरुष बसलेले पाहिले. ते जेजेचे विद्यार्थी वाटत नव्हते. मी कुतूहलानं फाईन आर्टस्च्या एका विद्यार्थ्याला त्यांच्याबद्दल विचारलं. तेव्हा मला समजलं की ते न्यूड मॉडेल्स आहेत. तिथे बसून गप्पा मारणाऱ्या त्या लोकांकडे बघून वाटलंही नसतं की हे लोक न्यूड मॉडेल्स आहेत. कुठल्याही दृष्टीने ते मॉडेल्स वाटत नव्हते. दुसरा विचार मनात आला की या लोकांनी घरी आपला व्यवसाय काय सांगितला असेल? लहान असताना कुठेही गेलं तरी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे — तुझे आईवडील काय करतात? या प्रश्नाच्या उत्तरावर बऱ्याच अंशी तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन ठरवला जायचा. खरा व्यवसाय सांगितला असेल तर या मॉडेल्सच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल? मग मी या लोकांशी खूप गप्पा मारल्या. त्यांच्या वर्गांना हजेरी लावली. त्या वर्गांमध्ये मला जाणवलं की आपल्याला वाटत होतं किंवा आपण कल्पना करत होतो तसं इथे काही होत नाही. कुठल्याही दबावाशिवाय अत्यंत सरळपणे काम चालायचं. हा अनुभव माझ्या मनात रुतून राहिला होता.

मी जाहिरात क्षेत्रात काम केलं, त्यानंतर चित्रपट केले. ‘बालगंधर्व’नंतर या विषयाने परत उसळी घेतली. पण सिनेमासाठी हा विषय कुणाला सुचवणंही अवघड होतं. गेल्या ४-५ वर्षांमध्ये सिनेमा खूप बदलत गेला आहे. सोशल मीडियामुळे किंवा इतर उपलब्ध असणाऱ्या व्यासपीठांमुळे लोक मोकळेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत. ‘न्यूड’ असं नाव ऐकल्यावर जे काही प्रश्न आले त्यातला एक होता की वेब सीरिज करतो आहेस का? कारण वेब सीरिजना सेन्सॉर नाही किंवा इतरही बंधनं नाहीत. पण मला मुख्य प्रवाहातला व्यावसायिक सिनेमाच करायचा होता. त्यामुळे पूर्वतयारी व्हायला तीन-चार वर्षं लागली. पूर्वतयारी म्हणून मी खूप वाचलं, काही शॉर्ट फिल्म्स बघितल्या. काही आंतरराष्ट्रीय मॉडेल्सच्या मुलाखती वाचल्या आणि मग कथा लिहायला घेतली. मला कथा व्यावसायिक अंगानं जायला नको होती. एखादा सीन लिहिल्यावर वाटायचं की हे बरोबर घडत नाहीये. हे निराळ्या पद्धतीनं घडायला हवंय. या सर्व प्रक्रियेला वेळ लागायला लागला. मग सचिन कुंडलकरचा लेखक म्हणून प्रवेश झाला.

दिग्दर्शक रवी जाधव

आपण जेव्हा नग्नतेबद्दल बोलतो तेव्हा सहसा लोकांच्या डोळ्यांसमोर स्त्रीच येते. पण माझ्या डोक्यातली मूळ कथा कल्पना होती ती एक स्त्री न्यूड मॉडेल आणि एक पुरुष न्यूड मॉडेल यांच्याभोवती फिरणारी होती. या कल्पनेवर कामसुद्धा सुरु केलं होतं. मुळात आता फार कमी न्यूड मॉडेल्स उरले आहेत. लपून छपून प्रायव्हेट सिटिंगला बरेच जण येतात, पण अधिकृतपणे न्यूड मॉडेलिंग करणारे भारतात फार कमी लोक उरले आहेत. मी या सिनेमाच्या कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या माहितीत हे काम करणाऱ्या तिघीजणी होत्या. आता दोघीच उरल्या आहेत. या दोघी माझ्या कॉलेजच्या काळापासून न्यूड मॉडेल आहेत. त्या एकमेकींच्या नातेवाईक आहेत. मी त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या कॅमेऱ्यासमोर आल्या, पण त्यांची अट होती की ती मुलाखत मी कुठेही दाखवू नये किंवा त्यांचं नाव घेऊ नये. मुलाखत फक्त माझ्या सिनेमाच्या अभ्यासासाठी वापरावी. त्या याआधी कधीही उघडपणे कॅमेऱ्यासमोर आल्या नव्हत्या. सुरूवातीला मी त्यांना विचारलेले प्रश्न असेच होते की तुमच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया काय आहेत? तुमचे कुटुंबीय काय करतात? त्यावेळी मला पुसटशी कल्पना आली की त्यांच्या घरच्यांना त्यांच्या या व्यवसायाची अजूनही कल्पना नव्हती. त्यांनी ते नंतर मान्यही केलं. या सगळ्या मुलाखती सचिन कुंडलकरने पाहिल्या. मी त्याला कॉलेजलाही घेऊन गेलो. तिथला परिसर आणि परिस्थिती दाखवली. त्याला त्यात एका आई आणि मुलाची गोष्ट दिसली. आम्ही मुलाखत घेतलेल्या मॉडेल्सपैकी एकीचा मुलगा छोटीशी खासगी नोकरी करतो आणि त्याला अजूनही असंच वाटतं की आपली आई कॉलेजमध्ये शिपाई आहे. जसजशा या घटना पुढे येत गेल्या तसतसं आम्हाला वाटलं की आई आणि मुलाची गोष्ट जास्त प्रभावी होईल. एका आईचा प्रवास जास्त चांगला उतरू शकेल. थोडक्यात सांगायचं तर आमचा सिनेमा सत्यकथेवर आधारित आहे!

आपल्याकडे वास्तविक खूप कमी लोकांनी न्यूड मॉडेल्ससोबत काम केलेलं आहे. पण साधारपणे लोकांना वाटतं की न्यूड मॉडेलिंग म्हणजे वेश्याव्यवसाय! हा एक मोठा गैरसमज आहे. पैसे मिळतात म्हणून हे काम खरं तर सुरू केलं जातं. काम करत राहिल्यानंतर त्यांना समजतं की ही प्रक्रिया शिक्षणाचा एक भाग आहे आणि मग तुलनेने कमी पैसे मिळत असूनही हे काम ते करत राहतात. आजकालच्या महागाईत तीनचारशे रुपयात कोण काम करत राहील? या तीनचारशे रुपयांसाठी त्यांना किमान ५ तास निश्चल बसावं लागतं. एक पेंटिंग पूर्ण व्हायला सुमारे तीन दिवस लागतात. म्हणजे या तीन दिवसांचे त्यांना फक्त हजार-बाराशे रुपये मिळतात. हा सरकारी दर आहे. पुण्यात अभिनवमध्ये न्यूड मॉडेल्स वापरायचे. ते आता बंद झालं आहे. हीच परिस्थिती भारतातील बऱ्याच आर्ट स्कूल्सची आहे. आता संदर्भावरून शरीररचना शिकायला सांगतात, चित्र काढायला सांगतात.

ही सगळी परिस्थिती माझ्या मनात रुजत होतीच. आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ते सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त झालं. न्यूड मॉडेल्सकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे. एक वेळ रस्त्यावरून जाणाऱ्या, पूर्ण कपडे घातलेल्या एखाद्या व्यक्तीबाबत तुमच्या मनात काही वेगळे विचार येऊ शकतील, पण वर्गात पूर्ण न्यूड बसलेल्या अगदी वीस वर्षाच्या मुलीबद्दलही तुमच्या मनात काहीही अश्लील विचार येणार नाहीत. तिथे फक्त अभ्यासच होतो. त्यामुळे सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी आमचा सिनेमॅटोग्राफर — अमलेंदू चौधरी — याच्यापुढे हे एक आव्हानच होतं की एखादी व्यक्ती पूर्ण न्यूड दाखवताना ते अश्लील वाटता कामा नये. याचा विचार करूनच एकूण रंगसंगती, बाजूची शिल्पं, त्यावेळी असणारा सूर्यप्रकाश, मुद्दाम वापरलेला ऑलिव्ह ग्रीन रंग यांचा उपयोग करून ती न्यूड सिटिंग्स शूट केली गेली.

अभिनेत्रींची निवड

माझ्या कामाची पद्धत अशी आहे — मी एखादी कल्पना / कथा सुचली की प्रथम त्या सिनेमाचं पोस्टर तयार करतो. हे एक पोस्टर तयार व्हायला १०-१२ दिवससुद्धा लागू शकतात. पोस्टर तयार होईपर्यंत माझ्या डोक्यात त्या सिनेमाबद्दल बरंच काम झालेलं असतं — सिनेमात रंगसंगती कशी असेल ? सिनेमा हलकाफुलका असेल की गंभीर ? चित्रण कशा प्रकारे होऊ शकेल? सिनेमाचं नाव कशा प्रकारे लिहिलं जाईल? बालगंधर्व किंवा बालक-पालक या सिनेमांचं पोस्टर तयार होण्यात आणि सिनेमा रिलीज होण्यात १-२ वर्षांचं अंतर होतं. माझ्या पोस्टरमध्ये कोणीही कलाकार नसतात. फक्त सिनेमाचं नाव आणि सिनेमाविषयी थोडंसं — एवढंच असतं. पोस्टर तयार होताना तो सिनेमा कोणत्या अंगानं मांडायचा आहे हे ठरत जातं. फेसबुकवर २०१५ मध्ये जेव्हा मी प्रथम न्यूडचं पोस्टर पोस्ट केलं तेव्हा मला बऱ्याच नामांकित कलाकारांचे फोन आले होते की आम्हाला या सिनेमात काम करायचं आहे. आम्ही न्यूड सीन्स करायला तयार आहोत. तुम्हाला जेव्हा इतका पाठिंबा मिळतो तेव्हा फारच छान वाटतं. या कलाकारांमुळे माझा उत्साह वाढला. त्याकाळी या सिनेमाच्या संबंधात इतक्या अडचणी येत होत्या — न्यूड हे नाव मिळत नव्हतं, काही आवश्यक त्या परवानग्या मिळत नव्हत्या. अशा वेळी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतून मला जो पाठिंबा मिळाला त्यानं मला अडचणींवर मात करून पुढे जाण्याचं बळ दिलं. पण मला या चित्रपटासाठी प्रस्थापित कलाकारांपेक्षा नवीन चेहरे हवे होते.

२०१५ मध्ये मी कल्याणीचं (कल्याणी मुळे) ‘अनसीन’ नावाचं नाटक पाहिलं होतं. तिचे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मधले काही व्हिडीओजही पहिले होते. मला जाणवलं की ही अत्यंत धाडसी अभिनेत्री आहे. आमचा विषय सोपा नव्हता. (बाय द वे, या सिनेमाची आम्ही दोन व्हर्जन्स शूट केली आहेत. एक भारतीय प्रेक्षकांसाठी आणि एक आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी. आंतरराष्ट्रीय व्हर्जनमध्ये कल्याणी आणि छाया दोघींचे न्यूड शॉट्स आहेत.) सरावाने आपण कॅमेऱ्यासमोर वावरू शकतो, पण शूटच्या वेळी शंभर-दीडशे अनोळखी माणसांसमोर न्यूड सीन देणं अवघड असतं. ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्यासमोर न्यूड अवस्थेत अभिनय करायचा हे अवघडच होतं. मला असं वाटत होतं की जर नवीन चेहऱ्याची अभिनेत्री असेल तर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्येच ही कथा घडते आहे हे जास्त प्रभावीपणे दाखवता येईल. प्रस्थापित अभिनेत्रींना आपण कुठे ना कुठे पाहिलेलं असतं. मुलाखतीच्या, त्यांच्या भूमिकेच्या निमित्ताने त्या लोकांसमोर आलेल्या असतात. मला या भूमिकांसाठी शक्यतो लोकांनी न पाहिलेला चेहरा हवा होता. कल्याणीचं काम मला आवडलेलं होतं. छायाच्या कामाचा तर मी फँड्रीपासून प्रशंसक आहे.

पूर्वतयारी

कल्याणीच्या न्यूड सिटिंग्ज हे आमच्यापुढे मोठं आव्हान होतं. ही सिटिंग्ज अत्यंत नैसर्गिक वाटायला हवी होती. त्यामुळे असं ठरलं की चित्रपटात जे विद्यार्थी दाखवले जाणार आहेत त्यांच्यासाठी जुनिअर आर्टिस्ट न वापरता खरोखरीचे विद्यार्थी असावेत. खरं तर एक चित्र पूर्ण व्हायला साधारणपणे तीन दिवस लागतात. पण आम्हांला शूटिंगच्या काळातच म्हणजे सुमारे पाच तासात चित्र पूर्ण व्हायला हवं होतं. त्यामुळे आम्ही मास्टर्स करणारे विद्यार्थी इथे वापरले. तुम्हाला दिसताना असं दिसत असेल की कल्याणी एखादा मिनिटच बसली आहे, पण वास्तवात ती पाच तास बसायची. सिनेमातल्या एका शॉटमध्ये चित्र पेन्सिल स्केचपासून शेवटपर्यंत तयार झालेलं तुम्हाला दिसतं. त्यामुळे फक्त विद्यार्थीच नव्हेत तर चित्रीकरणात भाग घेतलेल्या इतर लोकांची नजरदेखील तयार हवी, मानसिक तयारी झालेली हवी. कल्याणीलासुद्धा या लोकांमध्ये वावरताना सहजपणा वाटला पाहिजे. इतक्या लोकांमध्ये नग्नावस्थेत सहजपणे वावरणं फारच अवघड आहे. अमलेंदू, आमचे साऊंड इंजिनिअर अनमोल, सिनेमाचं कॉश्च्यूम डिझाईन करणारी मेघना — माझी बायको, संतोष फुटाणे असे आठ वेगवेगळे विभागप्रमुख प्रत्येक सिटिंगच्या वेळी उपस्थित असणार होते. या सगळ्यांना मी आधी जेजेत घेऊन गेलो होतो. त्यांनी वर्गात चालणारं काम अनुभवलं होतं. या सगळ्यांसोबत जेजेमध्ये कल्याणीने सिटिंग केलं होतं. विद्यार्थ्यांनी तिचं चित्र काढलं होतं. शूटिंग सुरु होण्याआधी आम्ही दोन कार्यशाळा घेतल्या. दोन नामवंत चित्रकार त्यासाठी आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन चित्रं काढली होती. ती अजूनही माझ्याकडे आहेत. सीटिंगमध्ये सहजता आणण्यासाठी या कार्यशाळांचा उपयोग झाला. तुम्ही विचार करा की आपण नग्नावस्थेत बसलेलो आहोत आणि लेन्सवाला लेन्स बदलतोय, साऊंडवाला कट म्हणतोय, लाईटवाला मधेच येऊन लाईट बदलतोय…! अशा परिस्थितीत काम केल्याबद्दल कल्याणी आणि छाया यांचं कौतुकच केलं पाहिजे. अत्यंत संयतपणे, शांतपणे, सहजपणे जेजेत चित्रीकरण झालं.

इंटरनेट — बदलाच्या शक्यता

इंटरनेटच्या माध्यमावर काही करावंसं वाटतं का याचं सध्या तरी ‘हो’ असं उत्तर आहे. न्यूड सिनेमाचा अनुभव ही एक मोठीच गंमत होती. इफ्फीने तर सिनेमा नाकारायचं कारणसुद्धा दिलं नाही. काहीजण म्हणाले की नाव न्यूड आहे त्यामुळे सेन्सॉरचा प्रश्न येतोय. काही म्हणाले की नाव आधीच रजिस्टर केलं गेलं होतं. काहीजण म्हणाले की इफ्फीला सेन्सॉर लागत नाही, काही म्हणाले लागतो. काही म्हणाले की तुम्ही अपूर्ण सिनेमा पाठवू शकत नाही. मला वाटतं की नावामुळे त्यांचा गैरसमज झाला असावा. असाच गैरसमज परवानगी देताना पोलिसांचा झाला होता. जेजेमध्ये चित्रीकरणाची परवानगी मागताना सिनेमाचं नाव ‘न्यूड’ सांगितल्यावर ‘हे काय करतो आहेस?’ असा प्रश्न विचारला गेला होता. पण नंतर हे सारे गैरसमज दूर झाले आणि कोणत्याही काटछाटीशिवाय भारतीय आवृत्तीला मान्यता मिळाली. मध्य प्रदेशातील एक लेखिका म्हणाल्या की ही माझी कथा आहे. ती केस आम्ही जिंकलो. शेवटच्या क्षणापर्यंत अडचणी समोर उभ्या राहात होत्या. या सगळ्यातून गेल्यावर असं वाटतं की वेब सीरिज बऱ्या आहेत. तिकडे कोणीच तुम्हाला काही विचारात नाही. तिथे विविध वयोगटातले प्रेक्षक आहेत. एकदा तुम्ही अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असल्याचं मान्य केलंत की काय बघायचं यासाठी तुमचे तुम्ही जबाबदार असता. यूट्यूबसारख्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहात का? तुमचं इमेल अकाउंट तिथे नोंदवावं लागतं आणि त्या अकाउंटमध्ये तुमची जन्मतारीख नोंदवलेली असते. इंटरनेटवर माझ्यासारख्यांना जास्त स्वातंत्र्य आहे हे नक्की. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्यावर झालेल्या संस्कारांचा एक सेन्सॉर असतोच. त्यामुळे कलेवर कोणत्याही प्रकारची इतर बंधनं नसावीत. चर्चा जरूर व्हावी, पण बंधनं नसावीत. हे चूक, हे बरोबर असा आसूड कोणी ओढू नये. कुठपर्यंत आणि किती दाखवायचं हे तुमच्या कथेवर, मांडणीवर अवलंबून आहे. एखादा विषय एक माणूस अत्यंत तरल पद्धतीनं दाखवेल तर दुसरा अत्यंत उग्रपणे मांडू शकेल. ते शेवटी तुमच्यावर अवलंबून असतं.

नग्नता आणि आपलं शिक्षण

‘नग्न म्हणजे स्त्री’ ही गोष्ट प्रथम आपण आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तुम्हाला बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतात. परवानगी मिळवण्यासाठीच्या फॉर्मवर ‘न्यूड’ हा शब्द वाचल्यावर मला बऱ्याच ठिकाणी परवानग्या नाकारल्या गेल्या होत्या. लोकांचे प्रश्न होते की न्यूड मुली नाचणार आहेत का? काय दाखवणार आहात तुम्ही? आम्हाला आधी पटकथा दाखवा. मला वाटायचं की रस्त्यावर एक साधा सीन शूट करायचा आहे तर मी यांना पूर्ण पटकथा का दाखवू? आज अगदी तरुण मुलांसमोरसुद्दा ‘न्यूड’ म्हटल्यावर ज्या प्रतिमा येतात, त्या कुठून येतात ? सोशल मीडिया, विविध मासिकं, पुस्तकं — पिवळी पुस्तकं किंवा अगदी आजकालचे सिनेमे या सर्वांमधून ‘न्यूड’ची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर येतीय. नग्नतेमधलं नैसर्गिक सौंदर्य हरवूनच गेलं आहे. माध्यमांमधून मेकअप केलेली नग्नताच सतत डोळ्यांसमोर येत राहते. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही रस्त्यावरून नग्नावस्थेत नग्न जा, पण नग्नतेकडे कसं पाहायचं हे शिकणं गरजेचं आहे. नग्नतेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वाईट असेल तर तुम्हाला आयुष्यभर यात वाईटच दिसत राहील.

नग्नतेकडे बघायचा आपला प्रमुख आणि प्रबळ दृष्टिकोन लैंगिकतेकडे झुकलेला आहे. तो बाजूला सारून यातलं सौंदर्य कसं बघता किंवा दाखवता येईल हे मुख्य आव्हान आहे. आपल्याकडच्या मंदिरांमध्ये नग्नतेचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला दिसतो. काही प्रगत देशांमध्ये मोजक्या ठिकाणी न्यूड योगवर्ग सुरु झाले आहेत असं माझ्या वाचनात आलं आहे. ही एक सकारात्मक गोष्टच म्हणायला हवी. आपण स्वतःच्या शरीराकडे तसंच दुसऱ्यांच्या शरीराकडे निर्मळपणे बघण्याच्या दृष्टीबद्दल बोलतो आहोत. हा दृष्टिकोन हाच एक मोठा प्रश्न आहे. माझ्या सिनेमाच्या शेवटी एक काहीही न कळणारा माणूस एका कलाकाराच्या कानाखाली मारतो. दक्षिण भारतात अलीकडेच कोणाच्यातरी कादंबरीवर बंदी घालण्यात आली आहे. हुसेनजींना भारतातून बाहेर जावं लागलं कारण त्यांनी एक न्यूड चित्र काढलं. त्यावेळी ते चित्र बरंच वादग्रस्त ठरलं होतं. ज्या लोकांनी या चित्रावर बंदी घातली, त्यांना खरंच चित्रांमधलं काही कळत होतं का? आजही नवीन चित्रकाराला याच समस्यांना सामोरं जावं लागतं. असं म्हणतात की जगात सर्वात जास्त पोर्नोग्राफी भारतात बघितली जाते. पण कलेच्या स्वरूपातील नग्नता मात्र आपल्याला चालत नाही.

मला असं वाटतं की आर्ट आणि न्यूड आर्ट यांच्यामध्ये एक भिंत आहे. न्यूड या शब्दाचा अर्थ भिंतीच्या अलीकडे एक प्रकारे लावला जातो तर पलीकडे अगदी वेगळा लावला जातो. जेजेची भिंत मला त्याअर्थी खूप प्रतीकात्मक वाटते. त्या भिंतीच्या पलीकडे गेलात की सगळे अर्थ बदलून जातात. आवारात काही वेगवेगळी न्यूड शिल्पं आहेत, पण त्यांच्याकडे कोणी वेगळ्या नजरेनं बघत नाही. म्हणून कलेचा थोडासा जरी स्पर्श प्रत्येकाला झाला तरी कलेकडे बघायची दृष्टी बदलेल. कलेबद्दल आदर, आस्था वाटेल आणि कलेचा निर्मळ आनंद घेता येऊ शकेल.

मुलाखत : उत्पल व. बा., शब्दांकन : तनुजा

( मिळून साऱ्याजणी, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक २०१८ )