40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

कथा : ऋणानुबंध

आपलं काय चुकतंय, हे सावित्रीला कळायचंच नाही. जेवण कितीही चांगलं केलं, तरी तो त्याच्यात खुसपट काढायचा. आईच्या हातची सर नाही म्हणायचा. घरात कितीक आवरसावर करावी, तर कानाकोपऱ्यात बोटं घालून साचलेली धूळ दाखवायचा. सतत दुसऱ्या बायकांशी तुलना करायचा.

“ती साठ्यांची सून बघ! घर लख्ख ठेवती. बरं, डोक्यावरला पदर पण ढळू देत नाही.”

सावित्री किवंड्यासारखं सगळं ऐकून घ्यायची. तिला पर्याय नव्हता. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे माहेर तुटलं होतं आणि नवरा चक्रम डोक्याचा म्हणून सासू-सासऱ्यांनी त्याला हाकलून दिलेलं, त्यामुळं खरं तर त्यांचा संसार राजा राणीचा. संसारात तो सर्वाथाने राजा होता; पण ती राणी नव्हती. ती होती एक गुलाम, स्वयंपाक-पाणी करणारी आणि नवऱ्याची बिछान्यातली भूक भागवणारी.

खरं तर तिला घरातून पळून जावसं वाटायचं; पण जायचं कुठं? आणि दुसरी गोष्ट ती पूर्णपणे कैदेत होती. शेजार पाजाऱ्यांशी संबंध ठेवायचा नाही, अशी सक्त ताकीद. बाजारहाट सारं तो करायचा. वाचनालयातून पुस्तकही तोच आणून द्यायचा. सकाळी त्याने कामाला जाताना बंद केलेलं घराचं दार संध्याकाळी तो आल्यानंतरच उघडायचा. अशा जाचानं अखंड बडबड करणारी सावित्री मुकी-मुकी झाली होती. ती बोलायची ती फक्त पोटातल्या बाळाशी. तेवढी एकच जिवंतपणाची खूण घरात होती. तिला घोर लागून राहिला होता, आपलं बाळंतपण कोण करणार? या विक्षिप्त माणसाने तिचे सगळे मानवी संबंध तोडून या अरण्यात आणून टाकलं होतं.

तरी कुठून तरी पत्ता शोधून आत्याबाईंना पत्र पाठवलं होतं. पत्र अगदी करुणेने ओथंबलेलं होतं.

‘पोरी लय उडी घेतलीस. जातीच्या बाहेर लग्न केलंस, पर सुखानं रहा. उभ्या-उभी तुला भेटून जावं वाटतंय. तू असं लगीन केल्याचं दादानं, म्हंजी तुझ्या बापानं धसका घेतलाय. मला म्हणाला, ‘पोरीचं तोंड बघणार नाही; पण तू जाऊन भेटून ये, मेली का जिती हाय ते कळव.’ पत्र वाचून सावित्री पोटभर रडली. आत्याला भेटायला जीव नुसता उसासून आला होता. जवळपास वर्षभराने तिच्या माहेरच्या माणसांकडून संपर्क झाला होता. आत्येला कधी एकदा बघते, भेटते, असं तिला झालं होतं; पण या खविसापुढं विषय काढायची हिंमत नव्हती; पण आज तिने ठरवलं होतं. काही करून आज बोलायचं नवऱ्याशी. बोलावून घ्यायची आत्याला. दिवसभर ती थेंब-थेंब करून धाडस साचवत होती.

“आत्याचं पत्र आलंय!”

“मग?”

“नाही, तिला भेटायचं आहे मला.”

“काय जरूर पडलीय? इथं काय वनवासात आहेस? आणि आता आठवण झाली तुझ्या माणसांना? तुला मागणी घालायला आलो, तेव्हा हाकलून काढलं घरातनं मला. आमची मराठ्याची अवलाद इज्जतीला लय जपती.”

होता-होता वाद वाढत गेला. प्रकरण हमरीतुमरीवर आलं. सावित्रीचा आवाज चढला. वर्षभराचं मौन ढासळलं होतं. त्याने मारण्यासाठी उगारलेला हात वरच्यावर पकडला. त्याच्या डोक्यातला नवरा चवताळला. त्याने तिला बडवायला सुरुवात केली. सात महिन्यांची पोटशी सावित्री होलपडून भिंतीवर आपटली.

तिला तिरमिरल्यासारखं झालं. साडी आवरून ती उभी राहिली. आणि तिला कुठून बळ आलं कुणास ठाऊक, तिने खच्चून त्याच्या कानफाडीत मारली. वर्षभर मुक्या गायीसारख्या वावरणाऱ्या सावित्रीचा अवतार पाहून तो बेभान झाला आणि तिरमिरीत त्याने दार उघडलं. सावित्रीच्या हाताला धरून दाराबाहेर ढकललं.

‘जा घराच्या बाहेर. चार रस्ते मोकळे आहेत. पुन्हा तोंड दाखवू नकोस मला.’

सावित्री पुन्हा एकदा दाराबाहेरच्या पायऱ्यांवर कोलमडली. पुन्हा उठून उभी राहिली. तोवर दार बंद झालं होतं. एकदा वाटलं दार वाजवून त्याला घरात घ्यायला सांगावं; पण काय झालं कुणास ठाऊक? सावित्री सात महिन्यांचं पोट आणि नवऱ्याच्या मारानं चिंबलेलं अंग घेऊन बधीरपणे चालत सुटली.

आजूबाजूचे तुरळक अंतरावरचे छोटे-छोटे बंगले, कौलारू घरं मागे पडली. आता ती थेट हमरस्त्यावर पोहोचली होती. कुठे जायचं कळत नव्हतं. किती चालायचं, हेही ठरलेलं नव्हतं. हमरस्त्यावरून एखाद-दुसरा दिसेनासा झाला. रस्ता सुनसान. लांबून एक वडाचं गर्द झाड दिसलं. त्या झाडाखाली थांबावं, असं ठरवून ती पाय ओढत राहिली. तिथे पोहोचेपर्यंत तिचे पाय पेकाळून गेले होते. घशाला कोरड पडली होती. बहुधा तो एखादा बसस्टॉप असावा, कारण प्रवाशांसाठी असावं तसं एक लाकडी बाकडं तिथं होतं. सावित्री बाकड्यावर टेकली, थकून गळून गेलेली. ती बऱ्यापैकी गावाच्या बाहेर आली होती. इथून कुठची बस जाते? कुठे जाते? कशाचाच पत्ता नव्हता. तुरुंगातून सुटलेल्या कैद्याप्रमाणे ती आज प्रथमच मोकळा श्वास घेत होती.

संध्याकाळ दाटून आली होती. मावळतीचा धूसर प्रकाशही वितळला होता. लांबवरच्या दिव्यांची अंधुक तिरीप जेमतेम त्या बडखाली पोचत होती. तिच्यासारखा एकही प्रवासी तिथं बसची वाट पाहायला आला नव्हता. भीती, चिंता या कुठल्या भावनेचं काहूर तिच्या डोक्यात नव्हतं. ती बधीर झाली होती. सुन्न झाली होती. तिला ग्लानी आल्यासारखं वाटत होतं.

तेवढ्यात त्या अंधुकशा प्रकाशात एक स्थूल आकृती तिच्याकडे येताना दिसली. उंच-धिप्पाड बांधा, नऊवारी साडीचा काचा आणि डोक्यावर पदर. कपाळावर लालभडक कुंकवाचा चांदवा. गळ्यात पोत, भरदार शरीरयष्टी. ती आकृती आता अगदी जवळ आली. तिने डोक्यावरचा जर्मन स्टीलच्या भांड्यांचा हारा आणि त्यावर असलेलं कपड्याचं गाठोडं खाली उतरवलं आणि हाशहुश करत तिने बाकड्याजवळ जमिनीवर फतकल मांडलं.

“सापट्याची बसं गेली जनू! दिसली का वं जाताना?”

सावित्रीकडून काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा तिने चिकाटीने दुसरा प्रश्न विचारला,

“तुमास्नी कुठं जायचं म्हणायचं?”

भोवतालच्या अंधाराबरोबरच गाठोडंवालीच्या या प्रश्नाने अवघ्या भविष्याचा अंधार सावित्रीच्या अंगावर कोसळला. आणि इतका वेळ बधीर झालेल्या सावित्रीच्या गळ्यातून हुंदका फुटला.

त्या आवाजासरशी गाठोडंवालीनं चमकून मागं बघितलं आणि कमरेखालचा भरभक्कम पसारा नेटानं उचलत उभी राहिली अन् सावित्रीजवळ आली.

“का वं रडताय ?”

तिच्या केवळ एवढ्याच वाक्यानं सावित्रीचा बांध फुटला आणि ओंजळीत तोंड धरून ती रडू लागली.

“आता गं बया! रडा या काय झालं? सांगशीला का न्हाय!”

आता गाठोड्यावाली बाकड्यावर तिच्या बाजूला टेकली. तिने सावित्रीच्या चेहऱ्यावरील ओंजळ बाजूला केली.

“तुमाला कुटं जायचं तेवढं सांगा, मी न्हेऊन घालते घरला.”

आता गाठोडंवालीनं नीट निरखून पाहिलं सावित्रीला.

“आगं बया बया. पोटुशी भी हायसा वाटतं. आन् मंग कुटं निगाल्या व्हता एवढ्या रातीला.”

सावित्रीला शब्द फुटत नव्हते. कुठेही जायचं तर अंगावरच्या कपड्यानिशी घरातून ढकललं होतं त्यानं. एक नवा पैसा सोबतीला नव्हता. कुठं जायचं हे तिला तरी कुठं ठाऊक होत.

सावित्रीने आवेगानं तिचा हात हातात घट्ट धरला आणि तिच्या खांद्यावर डोके टेकून स्फुंदून-स्फुंदून रडू लागली.

गाठोडंवाली आतून पाझरली.

“गप ऱ्हावा, नगा रडू, पोटात दुसरा बी जीव हाय तुमच्या! त्येला बी तरास व्हईल. कुटं जायचं तेवढं सांगा म्हंजी तुमाला घालवता येती.”

“मला माझ्या आईकडे जायचं आहे.”

“कुटं असती तुमची आय?”

“मुंबईला.’

“आता गं बया! ती काय जवळ हाय तवा! इथली एस.टी. सापट्याला जाती. मुंबईला नाय जात. आता असं करू आजच्या रातीला चला माज्या संगं. दोन घास खावा. रात काडा आमच्या घरात. आन् सकाळच्या जावा मुंबईच्या आयकडं.”

तेवढ्यात खडखडाट करत एस.टी.चं धूड त्यांच्याजवळ येऊन थांबलं. धुळीत भरलेल्या एस.टी.च्या पाटीवर धुरकट अक्षरं दिसत होती. कोल्हापूर-सापटणे बुद्रुक, गाठोडंवालीनं लगबगीनं हारा डोक्यावर चढवला. कापडाचं गटुळं वर टाकलं आणि सावित्रीचा हात धरून एस.टी.त घुसल्या. आत पाय टाकता टाकताच कंडक्टरने हाळी दिली.

“काय तानाबाय, उशीर केलासा आज!”

“काय करतू दादा, एकेका वक्ताला न्हाय व्हत धंदा. दिसभर बोळातून हिंडाव लागतं. तवा दोन-चार घावत्याती।”

“बरं! दे पैसे काड लवकर. माज बी पाय ताटल्यात!”

” देबाबा, सापट्याची दोन तिकीट.”

“आँ! दोन? पावनीबाय हाय वाटतं संगं!”

“व्हय व्हय दे, दोन दे.”

एस.टी.तून उतरल्यानंतरही बरंच अंतर चालून झालं तेव्हा कुठं माणसांची वस्ती दिसू लागली. वस्ती म्हणजे माळरानावरची छोटी-छोटी सपरं. काही-काही झोपड्या प्लास्टिकच्या पेपरने तर काही गोणपाटाने आच्छादलेल्या. एक दोन ठिकाणी बाहेर चुली पेटल्या होत्या. त्यातला लाल-पिवळा जाळ रात्रीच्या घट्ट अंधाराला चिरून काढत होता. काही झोपड्यांमधून रॉकेलच्या चिमण्या धूर ओकत होत्या. एकंदर वस्तीला मरगळ आलेली. सारेच कष्टकरी दिवसभराच्या श्रमाने दमलेले. रात्रीची भाकरी खाऊन जमिनीला पाठ टेकायला आसुसलेले.

एका खोपटाच्या दाराशी दोघी थांबल्या. दार म्हणजे जुन्या चादरीचा पडदा छपरावरून खाली सोडलेला. गाठोडवालीने हारा खाली ठेवला. चादरीचा पडदा बाजूला केला आणि दोघी आत शिरल्या.

आत तिची दोन मुलं बसलेली. काळी-सावळी पण गुटगुटीत. आईला बघून दोघंही तिला बिलगली. सावित्री आतमध्येच अवघडून उभी.

“ये चंद्या, ते पटकूर दे पावनीबायला बसायला. आन् पाणी बी दे प्यायला.”

टुणकन उडी मारून चंद्या उठला. मातीच्या मडक्यात ग्लास बुडवून सावित्रीसमोर धरला. तिने उभ्या उभ्याच घटाघटा ग्लास संपवला आणि पटकुरावर बसली. तिला जाणवलं, खूप थकवा आलाय. अंगात थोडी कणकण पण भरलीय.

तेव्हढ्यात गाठोडवालीच्या नवऱ्याची चाहूल लागली. सपराबाहेर त्याने काहीतरी आपटलं होतं. घरात शिरल्याबरोबर नव्या पाहुणीला बघून तो अवाक् झाला; पण काही बोलला नाही.

“ताने, मी भंगारातलं सामान वायलं करतू. तवर घे भाकऱ्या करून.”

गठुडंवालीनं जर्मनच्या परातीत भाकरीचं पीठ मळायला घेतलं. पीठ मळताना परातीच्या काठावर आपटणाऱ्या तिच्या बांगड्यांची किणकिण त्या खोपट्याचं वैभव द्विगुणित करत होती. सावित्री ते बघून घरच्या आठवणीने कळवळली. सुन्नपणे बसून राहिली. चुलीच्या जाळावरच्या भाकऱ्यांचा खरपूस वास खोपट्यात भरून राहिला. गरम तव्यातच तिने १०-१२ हिरव्या मिरच्या टाकल्या. त्याच्यावर दोन-चार थेंब तेल सोडलं. चरचर मिरच्या तडतडल्या. त्याच्यावर मीठ टाकून गडव्याच्या बुडान तव्यातल्यातच खरवडल्या. जेवण तयार होतं तोवर गोणीतल्या भंगाराची वर्गवारी करून गाठोडवालीचा नवरा आत आला.

“पावनीबाय कुटनं आला म्हणायचं?”

“ते व्हावू द्या. जिवून घेवू आपण समदी. आन् आसलं जेवान जेवत्याल का? पावनीबाई? लय मोट्या घरचा दिसतीया बाय.” तोवर हातातले चार तोळ्याचे बिलवर, दोन तोळ्याचं मंगळसूत्र आणि हातातली अंगठी असा सहा-सात तोळ्याचं ऐवज घेऊन आलेली सावित्री चपापली. तिच्या मनात भलत्याच शंकेची पाल डोकावून गेली आणि तिला घाम फुटायला लागला. आपण भलत्याच संकटात सापडलो की काय! या विचाराने ती गाठून गेली. तेवढ्यात गाठोडं वालीचा नवरा म्हणाला,

“ताने, दारात आलेला पावणा देवासारका असतो. त्येचा मान ठेवायला पाहिजे. मी असं करतो, बजाच्या खानावळीतून जेवणाचा डबा घेऊन येतो. आपून खाऊ भाकरी. पावनीबायला खानावळीचं जेवण खाऊ दी. त्यांनी कंदी आसलं आन बघितल्यालंबी नसंल.”

“बरं, जावा तुमी.”

“ताने, दोन-चार रुपयं आसत्याल तर दी. भंगाराचं काय नाय आलं जास्तीचं.धा-बारा रुपये असत्याल.”

गाठोडीवालीनं एका जर्मनच्या डब्यात हात घालून चिल्लर काढली आणि नवऱ्याच्या हातात ठेवली.

सावित्रीच्या गळ्यात उभ्या जिण्याची कणव दाटून आली. भरल्या आवाजात ती म्हणाली, “नको दादा, कशाला एवढा त्रास घेताय. फार भूक नाही मला. खाईन थोडी भाकरी.” हे ऐकायला तो थांबला नव्हता. चादरीचे पडदे बाजूला करून तो घराबाहेर पडला.

सकाळ फटफटली. तेव्हा खोपटं जागं झालं होतं. चुलीवर आंघोळीचं पाणी तापत होतं.

“बाय, आंगूळ तेवढी करून घ्या. भायीर तिकडं आडूसा हाय.”

बिनदुधाचा चहा पिऊन सावित्रीला हशारी आली. गाठोडंवालीचा नवरा बिनकानाच्या फुटक्या कपातून चहा फुरकता-फुरकता म्हणाला, “आता आपुन आसं करू, मी तुम्हाला तालुक्याला न्हेतो आन् यष्टीत बसून देतो.”

पण पैशाचं काय करायचं, हा गहन प्रश्न होता. कालची त्याची १२ रुपयांची कमाई खाणावळीचा डबा आणण्यात संपली होती.

“दादा, ही माझ्या हातात अंगठी आहे, ती मोडून आणा म्हणजे पैशांची सोय होईल आणि मी पुढे मुंबईला जाईन.”

हात जोडत गाठोडं वाली नवरा म्हणाला, “बाय, ही जोखीम नका सांगू गरिबाला. आमी भंगार गोळा करणारी माणसं. हा सोन्याचा दाग घेऊन दकानात गेलो तर चोरीचा माल हाय म्हणून आम्हाला पकडत्याल आन देत्याल पोलिसाकडं. आमच्या गरीबाकडं इज्जतीबिगर काय हाय?” सावित्री थिजून-थिजून गेली.

“आसं करू, आपण तिगं बी जाऊ तालुक्याला. तुमी तुमच्या हातानं आंगटी मोडा. पैसं करा आन् जावा आपल्या घरला.”

गाडीभाड्याची तरतूद करेपर्यंत दुपार झाली होती. एस.टी. स्टँडवर कोल्हापूर-मुंबई गाडीची अनाउंसमेंट चालू होती. गाठोडंवाली तानी आणि तिचा नवरा बस सुटेपर्यंत स्टँडवर उभे होते. ओरडून-ओरडून सांगत होते, ‘नीट जावा, सांभाळून ऱ्हावा.’ सावित्रीने हात करून गाठोडंवालीला बसच्या दाराजवळ बोलावलं. प्रवासापुरते पैसे स्वत:कडे ठेवून उरलेले सर्व पैसे तिच्या हातात कोंबले, ‘टण टण’ करत कंडक्टरने बेल मारली. गाडी सुटली आणि सावित्रीच्या डोळ्यांचा बांधही.

आज सावित्री साठीची झाली. त्या वेळी तिच्या पोटात असणारा गर्भ आज ४० वर्षांचा बाप्या आहे. सावित्री आलिशान फ्लॅटमध्ये राहते आणि जेव्हा केव्हा ‘भांडियोऽS-कपड्यांवर भांडियाऽऽ’ असा आवाज ऐकते, तेव्हा धावत गॅलरीत येते आणि डोळे फाडून-फाडून गाठोडंवालीला शोधते.

 

छाया कोरेगावकर

(मिळून साऱ्याजणी, एप्रिल २०१७)