40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

कोरोना काळ : अस्तित्वाचा खरा अर्थ शोधण्याची संधी

कोविड १९ मुळे आपण सगळेच अनेक वेगळ्या अनुभवांना सामोरे गेलो आणि अजून पुढील काही महिने जाणार आहोत. आपण कधीच करणार नाही अशा अनेक गोष्टी आपण या काळात केल्या आणि जे आपण कायम करत राहू असं आपल्याला वाटलं अशा अनेक गोष्टींपासून आपल्याला बराच काळ वंचित राहावे लागले. कोरोना आणि लॉकडाऊन दोन्हीचे वेगळे मानसिक परिणाम आपण सगळ्यांनी अनुभवले. संसर्ग होण्याच्या भीतीपासून भविष्यात काय मांडून ठेवलंय अशा चिंतेपर्यंत संपूर्ण भावनांचा पट अनुभवायला मिळाला. कित्येकांसाठी कोविडपेक्षाही टाळेबंदीमुळे निर्माण झालले प्रश्न जास्त जटिल होते. याचं कारण प्रत्येक माणसाच्या मनात भविष्याबद्दलची काळजी असते आणि ही काळजी कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ‘नियंत्रण’ हा मार्ग स्वीकारला जातो. कोविडने काळजी वाढवली पण अनेक गोष्टींवरील नियंत्रण मात्र काढून घेतलं. त्यामुळे सगळ्यांचीच अस्वस्थता वाढलेली दिसली. माणसाला भविष्याबद्दल एवढी चिंता का वाटते हे समजून घ्यायचे असेल तर माणसाचा इतिहास आणि मेंदूची रचना समजून घेणं गरजेचं आहे.

माणसाच्या अस्तित्वाचा इतिहास मोठा आहे. यात मेंदूचा विकास अनेक वर्षांमध्ये घडला आहे. या प्रक्रियेत माणसाचा जसा फायदा झाला तसे गोंधळही झाले. अनेक वर्ष जंगलात वास्तव्य असल्याने मानवी मेंदूचा विकास त्या अनुभवांवर आधारित झाला आहे. टोळ्यांमध्ये राहिल्याने जगण्याची शाश्वती वाढते हे समजल्याने टोळी ही माणसाची गरज बनली आणि त्यातून दोन मानसिक गरजा निर्माण झाल्या. पहिली म्हणजे आपण कोणत्यातरी गटाचा भाग आहोत अस वाटणं, आणि दुसरी म्हणजे त्या गटात महत्वाचं स्थान असणं. टोळीशिवाय एकटं राहणं म्हणजे मरण स्वीकारणंच होतं. टोळीमध्येही सहज सहज स्थान मिळायचं नाही. तिथे उपयोगी पडतील असे गुण असणं आवशयक होतं. त्यामुळे अपूर्णत्व असणं परवडणारं नसायचं. कदाचित तिथूनच सुरु झाला असावा पूर्णत्वाचा (परफेक्शन) अट्टाहास. शक्य तितक्या सगळ्या गोष्टींचं नियोजन, नियंत्रणही तिथूनच सुरू झालं असावं.

या दोन गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सगळ्यांनी विविध प्रकारे प्रयत्न केले आहेत आणि करत आहोत. पण मानवी मनाच्या गरजा फक्त एवढ्याच नाहीत. मेंदूच्या विशिष्ट रचनेमुळे आपल्या आयुष्याचा अर्थ शोधणं आणि आयुष्याला अर्थ देणं हे कामही माणसाच्या बाबतीत वाढलेलं आहे. मेंदूचा एक भाग सुरक्षिततेला महत्त्व देतो तर दुसरा भाग अर्थ शोधण्याला. ‘भावनिक मेंदू’ माणसाबरोबर अनेक वर्षं आहे. त्याचं काम आपल्याला जिवंत ठेवणं. भावनांचा उद्देशही माणसाला जिवंत ठेवणं हाच आहे. त्यानंतर खूप वर्षांनी तयार झाला ‘वैचारिक मेंदू’ ज्याला ‘प्रमस्तिष्क’ असंही म्हणतात. माणसाच्या कोर्टेक्स (मस्तिष्क) आणि  निओ कोर्टेक्स (प्रमस्तिष्क) यामुळे आयुष्याला काहीतरी उद्देश लागतो आणि माणूस तो अनेक गोष्टीत शोधत राहतो. माणसाचा भावनिक मेंदू आणि प्रमस्तिष्क यांच्यात जणू चढाओढच लागते. प्रमस्तिष्काची वाट अर्थ शोधण्याची तर भावनिक मेंदूची वाट सुरक्षित राहण्याची. माणसाची दोन्हीतून सुटका नाही. मनातून सुरक्षित वाटल्याशिवाय जगण्याला अर्थ देणं अवघड जातं. ३

त्यामुळे सुरक्षितता आणि स्वातंत्र्य हा मोठा झगडा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चालतो. प्रत्येक क्षणी आपल्याला निवड करावी लागते. आपण स्वातंत्र्य निवडलं तर सुरक्षित राहणार नाही ही सर्वात मोठी भीती आहे. काही माणसं प्रश्न सोडवून पुढे जातात तर काही खूप काळ तिथेच रेंगाळतात. भावनिक मेंदूमुळे माणसाला अस्तित्वविषयक चिंता सतावतात. या ज्या चिंता असतात त्यांना ‘existential anxieties’ असं म्हणतात.  या चिंता कमी केल्याशिवाय अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रवास शक्य होत नाही. अनेक माणसांचं आयुष्य या चिंतांभोवतीच फिरतं.

मानसशास्त्रात या सगळ्या प्रवासाचा अभ्यास करणारी Existential Psychology अशी एक वेगळी शाखाच आहे. या अभ्यास शाखेतील काही प्रमुख नावं म्हणजे रोलो मे, आयर्विन येलोम, एरिक फ्रॉम इ.

या चिंता नेमक्या कोणत्या आणि त्या आपल्या आयुष्याला कसा आकार देतात ते आता पाहूया.

स्वातंत्र्य: स्वातंत्र्याभोवती माणसाच्या अनेक चिंता फिरतात. माणसाचं नागरीकरण झाल्यानंतर अनेक बाबतीत माणूस स्वतंत्र झाला किंवा इतरांवरचं अवलंबित्व कमी व्हावं या इच्छेनेच माणसाने जगण्याच्या अनेक पद्धती अवलंबवून पहिल्या. शिकारीपासून आत्तापर्यंतचा प्रवास पाहता आता केवळ एकाच गटावर किंवा टोळीवर आपलं अवलंबित्व नाही. आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेऊ शकतो. पण आपण स्वतंत्र आहोत हा विचारच माणसाला सगळ्यात जास्त त्रासदायक वाटतो. स्वातंत्र्य मान्य केलं की आयुष्यातील प्रत्येक निर्णय आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी घ्यावी लागते. वर मांडलं आहे तसं स्वातंत्र्य ही आपल्या मनाची गरजही आहे. पण स्वातंत्र्याची कल्पना सुरक्षिततेबद्दल चिंताही निर्माण करते. मग स्वातंत्र्याची जबाबदारी टाळण्यासाठी स्वातंत्र्याचे अनेक भास तयार केले जातात आणि आपण स्वतंत्र आहोत हे मनाला सांगितलं जातं. उदा. मॉलमध्ये गेल्यावर जेव्हा साबणाचे अनेक प्रकार दिसतात तेव्हा निवडीच्या स्वातंत्र्याचा आपल्याला भास होतो किंवा मंडईमध्ये जेव्हा अनेक भाज्या मिळतात तेव्हाही असं वाटतं की आपण स्वतंत्र आहोत. पण त्यावेळी विशिष्ट प्रकारची जीवनशैली स्वीकारलीच पाहिजे हा विचार आपला नाही, आपण तो स्वीकारला आहे हे आपण विसरूनच जातो. भांडवलशाही आणि जागतिकीकरण असे भास निर्माण करण्यात खूप यशस्वी झाले आहेत. प्रत्येक सणाला जेव्हा बाजारात खरेदीचे खूप सारे पर्याय आपण पाहतो तेव्हाही तो स्वातंत्र्याचा भासच असतो. त्यामागची सुप्त भीती ही इतरांनी आपल्याला स्वीकारावं किंवा इतरांच्या नजरेत आपली किंमत वाढावी हा असतो. या भीतीतून आपल्याला मुक्त होता येत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य खूपच लांब राहतं. कोरोनाने स्वातंत्र्याचे भासही काही काळासाठी काढून घेतले. टाळेबंदीने आपल्याकडील पर्याय काढून घेतल्यानंतर अनेकांची अस्वस्थता वाढलेली दिसली. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे जाता येणं हे स्वातंत्र्य आहेच पण आलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया कशी द्यायची हेही ‘स्वातंत्र्य’च आहे. प्रत्येक प्रसंगात योग्य काय ते ठरवता येणं आणि त्यानुसार बदलाची जबाबदारी घेणं महत्वाचं आहे. कोविडच्या काळात जिथे शारीरिक अंतर राखण्याची गरज आहे तिथे करावा लागणारा बदलच जाच वाटू लागला तर कसं चालेल? तो जाच तेव्हा वाटतो जेव्हा तो इतरांनी सांगितलेला असतो. व्यक्तीची स्वत:च्या वागण्याची विवेकी निवड ही जाच वाटत नाही.

अनेकदा निर्णय घेण्याची जबाबदारी प्रशासनाला देऊन आपण स्वातंत्र्यामधून स्वत:ची सुटका करून घ्यायला बघतो. म्हणजे दोन माणसांमध्ये किती अंतर असलं तर कोरोनाचा संसर्ग होतो किंवा होत नाही हे समजल्यावर आपण खरं  तर स्वत:पुरते सुरक्षेचे, प्रवासाचे निर्णय घेऊ शकतो. पण या आणि अशा अनेक नियम आणि कायद्यांची जबाबदारी प्रशासनावर टाकली की आपण त्यावर बोट ठेवायला मोकळे राहू शकतो. हे सगळे स्वातंत्र्याचे भास कोरोनाच्या काळात खूप ठळक दिसू लागले आणि अस्वस्थता वाढलेली दिसली.

एकटेपण: लेखात आधी मांडल्याप्रमाणे इतरांवर अवलंबित्व असण्याचा इतिहास मोठा आहे. आपलं जिवंत राहणं विशिष्ट व्यक्ती किंवा गटांवर अवलंबून होतं. आताही हे परस्परावलंबित्व आपण अनुभवत असतोच, पण तरीही आता विविध पर्याय आपल्याला मिळाले आहेत. एकमेकांची कितीही मदत केली तरी प्रत्येकाच्या मनात एकटेपण आणि एकटेपणाची भीती असतेच. हे एकटेपण घालवण्यासाठी माणसाने अनेक पर्याय शोधले आहेत. लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था, कायदे ही त्याचीच उदाहरणं. काहींना ही चिंता जास्त वाटते तर काहींना कमी पण प्रत्येक माणसाच्या मनात ती असतेच. कोरोनाच्या काळात हे एकटेपण जास्त वाढलेले दिसलं.

आपण इतरांपासून एकटं पडू नये यासाठी सगळ आयुष्य इतरांनी आखून दिलंय त्याप्रमाणे जगणं, आपलं अस्तित्वच मिटवून टाकणं, लोक काय म्हणतील याचा सतत विचार करत राहणं, गर्दीचा भाग होऊन जाणं किंवा सतत स्वत:ला कामात व्यस्त ठेऊन एक रूटीन जगत राहाणं असे अनेक पर्याय एरवी आपण स्वीकारत असतो. टाळेबंदीने हे पर्याय सीमित केले. कधी इतर लोकांवर परावलंबित्व इतकं वाढतं की स्वत:चं अस्तित्व इतरांमध्ये मिसळून टाकण्याचा प्रयत्न होतो. इतर लोकांबरोबर नाही झालं तर जोडीदाराबरोबर हा प्रयत्न हमखास होतो. या सगळ्याकडे ‘एकटेपणा घालवण्याची माध्यमं’ म्हणून पाहिलं जातं. दुसरी व्यक्ती आपला एकटेपणा घालवेल हा मोठा गैरसमज बहुतेक लोकांमध्ये दिसतो. इतरांना आपण भेटतो तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि म्हणून एकमेकांना नक्कीच भेटावं, पण इतरांच्या अस्तित्वाने आपला एकटेपणा कायमस्वरूपी जात नाही हेही माहीत असावं. एकटेपणा घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ देण्याचा किंवा अर्थ शोधण्याचा प्रवास. खरं तर जी व्यक्ती एकटेपणाचा स्वीकार अधिक चांगल्या पद्धतीने करते ती इतरांशी चांगलं नातं प्रस्थापित करते. एकटेपणाचा स्वीकार केल्याने आत्मपीडन आणि परपीडनाची गरज वाटत नाही.

जेव्हा कुटुंबातून हा एकटेपणा जात नाही असं वाटतं तेव्हा विविध पर्याय निवडले जातात. हे सगळे पर्याय टाळेबंदीने काढून घेतले. त्यामुळे एकटेपणाच्या भावनेत वाढ झालेली जाणवली. स्क्रीनचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला.

अर्थशून्यता : माणसाच्या आयुष्याला खरच काही अर्थ असतो का? याचं  उत्तर माणसं तीन प्रकारे देताना दिसतात. १. अर्थ वगैरे काही नसतो, आजचा दिवस सुखात घालवणं हेच महत्त्वाचं. २. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा मुळातला काहीतरी उद्देश असतो आणि प्रत्येक माणसाला तो शोधावा लागतो. ३. माणसाच्या आयुष्याला तसा काही अर्थ नसतो, प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याला अर्थ द्यावा लागतो.

अनेकदा माणूस पहिलं कारण देऊन स्वत:ची सुटका करून घेऊ पाहतो, पण ते शक्य होत नाही. माणूस स्वत:ला समजेल असा जगण्याचा अर्थ शोधत राहतो. कधी अमुक इतकी संपत्ती निर्माण करून ठेव, कधी खूप सोनं खरेदी कर, कधी मोठमोठ्या देणग्या दे, तर  कधी स्वत:च्या मुलांबाबत स्वप्न बघ. हे करत असताना एक गोंधळ होतो, माणूस हे फक्त स्वत:च्या आनंदासाठी करण्याऐवजी त्यातही इतरांचं लक्ष वेधणं, इतरांपेक्षा वरचढ ठरणं हे उद्देश त्यामध्ये मिसळून जातात आणि पुन्हा एकदा निर्थकतेच्या प्रवासाला सुरुवात होते. ‘टू हॅव ऑर टू बी?’ याचा झगडा आयुष्यभर चालणार आहे. आपल्याला सुरक्षित वाटण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा संचय करून ठेवतो, अनेक पदं मिळण्यासाठी धडपडतो, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रयत्न करतो. या सगळ्याचा प्रवास म्हणजे ‘टू हॅव’चा प्रवास. पण ज्याक्षणी माणूस प्रत्येक अनुभवांशी प्रामाणिक राहायचं, अभ्यास स्वत:च्या आनंदासाठी करायचा किंवा कोणतीही खरेदी ही इतरांना दाखवण्यापेक्षा स्वत:ची इच्छा म्हणून करायची असं ठरवतो तेव्हा स्वातंत्र्य आणि अर्थपूर्णता याचा अनुभव येऊ लागतो. तो असतो ‘टू बी’ चा प्रवास. माणूस कोणतंही वाद्य वाजवायला शिकतो आणि त्यातून आनंद घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो ‘टू बी’ चा प्रवास असतो. पण आपली कला इतरांना लगेच कळावी आणि त्यातून आपल्याला पैसा, प्रसिद्धी मिळावी यासाठी जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तो ‘टू हॅव’ चा प्रवास होतो. ‘टू हॅव’ आपल्या मेंदूत आदिम काळापासून आहे. त्याचा उगम चिंतेमधून होतो. ‘टू बी’ म्हणजे स्वत:चा, इतरांचा व परिस्थितीचा विनाअट स्वीकार आणि अस्तित्वाच्या अर्थाचा शोध. जेव्हा शांतीचा काळ असतो त्यावेळी यातील फरक समजणं, त्याचा सराव करणं सोपं जातं. पण संकटाच्या काळात भीती आणि चिंता दोन्हीही खूप वाढते. टाळेबंदीमुळे माणसांनी अर्थ शोधण्याचा जो काही मार्ग निवडला होता त्याबद्दलच प्रश्न निर्माण होऊ लागले. काही व्यक्तींची कामं गेली, काहींना भविष्याबद्दल काळजी निर्माण झाली. आपल्या जगण्याचा नेमका अर्थ कशात आहे  याचं उत्तर शोधता आलं तर अशा घटना कमी त्रासदायक होतात. कसा शोधायचा असा अर्थ? जे करताना याबद्दल इतरजण काय विचार करतील अशी चिंता वाटत नाही, जे जबाबदार आनंदाच्या दिशेने नेतं आणि जे स्वत: व इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी पडतं ते करत राहणं. (अर्थात हे झाले काही निष्कर्ष. प्रत्येकासाठी अर्थपूर्ण वाटेल अशी स्वतंत्र गोष्ट असू शकते.)

मृत्यू: मृत्य हे अटळ सत्य. त्याच्यामुळे जगण्याचं नियोजन करता येतं, पण बहुतेकदा मृत्यूचा सकारात्मक स्वीकार होत नाही. आनंदाने, समाधानाने मृत्य होऊ शकतो हा विचार रूजत नाही. त्यामुळे आयुष्यभर मृत्य टाळण्याचीच धडपड होते. अनेक प्रकारच्या चिंता आणि भयगंडांचा उगम हा मृत्यूचा स्वीकार न झाल्याने होतो. अनेक माणसं बंद जागा, उंच जागा टाळतात कारण त्यांना भीती वाटते. अनेकांना कोणत्याही प्रकारचा बदल हा मृत्युसमान वाटतो. अनेक जण अंधश्रद्धांचे बळी होतात तर काहीजण मंत्रचळासारख्या (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर) आजाराने ग्रस्त होतात.  कोरोनासारखी महामारी ही भीती कितीतरी पटीने वाढवते. या काळात मला समुपदेशक म्हणून दोन प्रकारची माणसं दिसली. पहिल्या प्रकारात टोकाची बेफिकिरी दिसली आणि दुसऱ्या प्रकारात टोकाची चिंता वाढलेली दिसली. दोन्ही प्रकारच्या माणसांनी मृत्यूचा नीट विचार आणि स्वीकार केलेला नाही असं वाटलं आणि दोन्हीकडे आयुष्याबद्दलचा आदरही नव्हता. काही लोकांच्या आत्महत्येच्या बातम्याही आल्या. पण आत्महत्या हा मृत्यूचा सकारात्मक स्वीकार नाही असं मला वाटतं. तो टोकाच्या भावनेच्या भरात घेतलेला निर्णय असतो. बरेचदा सामाजिक उतरंडीमधून आलेली हतबलता किंवा बऱ्याच काळापासूनची निराशा याला कारणीभूत असू शकते. परंतु बहुतेकदा आयुष्यात झालेल्या बदलांचं भयंकरीकरण हे अनेक आत्महत्यांमागील कारण असतं.

कोरोनाच्या काळात काही व्यक्तींची भीती इतकी टोकाला गेली की त्यांनी दैनंदिन कामं करणंही सोडून दिलं होतं. माणसांच्या मनात वर नमूद केलेल्या चिंता एरवीही असतात. महामारी त्याची तीव्रता कितीतरी पटीने वाढवते. बहुतेक सर्व मानसिक आजारांचे मूळ हे वर नमूद केलेल्या चिंता न हाताळता येण्यामध्ये आहे. माणसांच्या चिंता जेवढ्या वाढतात तेवढे ते आयुष्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त आक्रमक होतात. आपल्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे सत्ता, ताकद कमी आहे त्यांच्यावर सगळा राग काढणं सोपं असतं. म्हणूनच की काय सगळ्या जगभर घरगुती हिंसाचाराचं प्रमाण खूप वाढलं. स्पेनमध्ये १८%, फ्रांसमध्ये ३३% तर आपल्याकडे पहिल्या आठवड्यातच २४% टक्क्यांनी वाढ झाली होती. याचप्रमाणे लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारातही वाढ झालेली दिसली. लेखात वर मांडलेल्या चिंता प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात आणि त्याची किंमतही माणसांना मोजावी लागते, पण माणसाची सामाजिक स्थितीही या सगळ्या परिणामांची तीव्रता वाढवते. मागील एक आठवड्यात झालेल्या आत्म्हत्यांचं विश्लेषण केलं तर त्यात निम्न किंवा मध्यम आर्थिक गटातील पुरूरषांचं प्रमाण जास्त आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणची दोन दिवसातील संख्या १८ एवढी आहे आणि त्यात बहुतांशी २० ते ३० वयोगटातील पुरुष आहेत.

मात्र चिंता आणि नैराश्याचं प्रमाण सहसा स्त्रियांमध्ये अधिक दिसतं.1 कोरोनाच्या काळात सर्व सामाजिक आणि आर्थिक गटातील पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये ताणाचं प्रमाण अधिक जाणवलं.2 अचानक बदललेलं रूटीन, घरातलं जास्तीचं वाढलेलं काम, सहन करावी लागलेली हिंसा ही त्यामागची प्रमुख कारणं असावीत. ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’च्या अभ्यासानुसार ४७ लाख महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागलेला असू शकतो, तर साधारण सात लाख महिलांना नको असलेल्या गर्भधारणेला सामोरं जावं लागू शकतं. या सगळ्याचेच पुढील काळातही मानसिक परिणाम असणार आहेत.

कोविड १९ ने आपण स्वीकारलेल्या आयुष्याबद्दल विचार करण्याची व प्रश्न विचारण्याची संधी दिली आहे. जेव्हा आपण सगळे यातून बाहेर पडू तेव्हा आपल्या अस्तित्वाला ‘लादलेल्या प्रयोजाना’पेक्षा वेगळा अर्थ द्यायला आपल्याला आवडेल का याचा नक्की विचार करूया. त्याशिवाय स्वातंत्र्याचा अनुभव घेता येणं अवघड आहे.

 

गौरी जानवेकर 

gjanvekar@gmail.com 

 

संदर्भ –

1 https://www.theweek.in/news/health/2019/12/23/anxiety-and-depression-more-prevalent-among-women-than-men-in-india-study.html

2 https://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/love-sex/why-women-are-more-stressed-than-men-during-the-lockdown/articleshow/75185397.cms

Image credit: <a href=”http://www.freepik.com”>Designed by gstudioimagen / Freepik</a>