40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

कोरोना, भूक आणि विकृती यांचा सामना करताना…

भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती. भूक लागलेली नसतानाही खाणे म्हणजे विकृती आणि भूक लागलेली असतानाही आपल्या अन्नातील वाटा भुकेल्या माणसाला देणे म्हणजे संस्कृती! आचार्य विनोबा भावे यांचं हे वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. कोरोनाशी सामना करताना या तिन्ही प्रवृत्तींचं दर्शन होतंय. जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान चीन मध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं. भारतीय बाजारावर त्याचा परिणाम होत होता. त्याच्या बातम्या पाहात होतो. भारताला कोरोनाचा लवकरच सामना करावा लागेल हे लक्षात आलं होतं. आता बऱ्याच गोष्टी उलगडल्याने नीट समजत आहेत. ३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोरोनासंदर्भात इशारा दिला होता. तरीही परिस्थिती गंभीर होईपर्यंत आपले प्रधानसेवक आपला अजेंडा रेटत राहिले. ट्रंप यांचं स्वागत याच पार्श्वभूमीवर झालं. केरळला पहिला रूग्ण सापडल्यावर नरेंद्र मोदींना जाग आली. जनता कर्फ्यू , राज्यसरकारचं लॉकडाऊन आणि अखेर केंद्र सरकारनेही लॉकडाऊनचा निर्णय घेतला. पहिला आठवडा ह्या नव्या बदलाशी जुळवून घेणारा ठरला. वाचन, टीव्ही, सोशल मीडिया असा माझा दिवसभराचा कार्यक्रम बनला. ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ हे सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेलं पुस्तक वाचून काढलं. घरात आवराआवर सुरू केली. दरम्यान काही मित्र आणि संस्था मदतकार्य करत होत्या. आपणही असं काम  करावं, असं वाटत होतं.

गांधी भवनला युक्रांदच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. काही कार्यकर्त्यांनी अडचणीत असलेल्या माणसांना आणि पोलिसांना तयार जेवण दिलं होतं. त्यांनी त्या कामाचे अनुभव सांगितले. तयार जेवणाच्या पार्सल्सचं वाटप करायचं अशी कल्पना पुढे आली. तयार जेवणापेक्षा किराणा सामानाची मदत करावी असं एका कार्यकर्त्याने सुचवलं. कोरडा शिधा देणं अधिक सोपं आणि अधिक उपयुक्त आहे, असं लक्षात आलं. तयार जेवण वेळेत संपवावं लागतं. त्याचं फार दूरवर वाटप करणं अवघड आहे, हे समजलं आणि चर्चेअंती किराणा सामान वाटपाचा निर्णय ठरला.

एका व्यक्तीला एक आठवडा पुरेल, एवढं किराणा सामान द्यायचं ठरलं. एका आठवड्याच्या किराणा सामानाची यादी केली गेली. मार्केट यार्ड मध्ये जाऊन किराणा खरेदी, त्याचे किट्स तयार करण्याची जबाबदारी मुख्तार मणियार यांनी घेतली. मी आणि जांबुवंत मनोहरने वाटपाची आणि सचिन चौहानने कार्यालयीन कामाची जबाबदारी घेतली. १ एप्रिलपासून हे मदतकार्य सुरू झाले आणि आज, म्हणजे २३ जुनपर्यंत ४५९७ किट्सचं वाटप झालं आहे. या कामासाठी लोकवर्गणी जमा करायला सुरूवात झाली. एक किट तयार करायला तीनशे रूपये लागतात. ऑनलाइन वा रोख किमान तीनशे रूपये पाठवण्याचं जाहीर आवाहन केलं गेलं आणि आजअखेर (२३ जून) १५ लाख २४ हजार १६० रूपयांचा निधी गोळा झाला आहे. लॉकडाऊन पूर्णपणे हटेपर्यंत हे मदतकार्य चालू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.

याअगोदर विविध प्रश्नांवर केलेलं काम आणि आत्ताचं मदतकार्य यात बराच फरक आहे. कोरोनासारखी आपत्ती यापूर्वी कधी आलेली नाही. शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम पहिल्यांदाच पाळावा लागतोय.  स्वाईन फ्ल्यूच्या साथीच्या वेळी मास्क वापरणं आणि शारीरिक अंतर ठेवण्याचे नियम होते. मात्र तेव्हा काही दिवसातच त्या साथीवर मात करण्यात आली होती. कोरोनाने मात्र सर्व संदर्भ बदलून टाकले. परप्रांतीय श्रमिकांचे याकाळात आतोनात हाल झाले. पुण्यातल्या काही श्रमिकांना आम्हाला मदत करता आली. त्यांची जबाबदारी कामावरच्या व्यवस्थापकाने, मालकाने झटकली. भूक, नोकरी, जागा असा तिहेरी संघर्ष काही श्रमिकांना करावा लागला.

कोरोनाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. पहिल्यांदाच एखाद्या विषयावर मानवी समाज म्हणून सर्व अस्मिता बाजूला ठेवून एकत्र येण्याची संधी निर्माण झाली आहे. चीन, अमेरिकेसारख्या महासत्ता या संकटाशी सामना करताना कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. पर्यावरण संवर्धन, मानवतावाद, सामाजिक कल्याण, वंचितांना प्राधान्य या विषयांना ‘ आदर्शवादी ‘ म्हणून हिणवलं जात होतं. या विषयांवर गांभीर्याने विचारमंथन होतंय. काही माणसांमधली अमर्याद हाव, अतिरेकी-विकृत हिंसा उघडी पडलीय. त्यावर टीका होतेय. दिल्लीमध्ये तबलीग जमातीची बातमी पसरली आणि हिंदुत्ववादी शक्तींनी सर्व शक्ती पणाला लावून  इस्लामोफोबिया पसरवायला सुरूवात केली. कोरोनाकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिसऱ्या आवृत्ती’तला इस्लामोफोबिया पसरवला. ‘ सर्व मुसलमान कोरोना पसरवत नाहीत, पण भारतातील कोरोनाप्रसार मुसलमानांनीच केला’, ही इस्लामोफोबियाची तिसरी आवृत्ती आहे. ‘सर्व मुसलमान अतिरेकी नसतात, पण सर्व अतिरेकी मुसलमान असतात’ आणि ‘सर्व मुसलमान घुसखोर नसतात, पण सर्व घुसखोर मुसलमान असतात’ या पहिल्या दोन आवृत्त्या होत्या. संघाची सर्व यंत्रणा त्यासाठी कामाला लागली. महाराष्ट्रात प्रयत्न झाले, पण दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातइतकं यश संघाला मिळाले नाही. सत्ता असल्याशिवाय संघाला आपलं काम रेटता येत नाही, हे यातून सिद्ध झालं. गायिका कनिका कपूरने दाखवलेला निष्काळजीपणा, योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाऊन असतानाही अयोध्येत घेतलेला कार्यक्रम यासारखे प्रकार घडत असूनही फक्त मुसलमानांना लक्ष्य करून ध्रुवीकरण करण्याचा संघाचा अजेंडा कोरोनाकाळातही थांबला नाही. ह्याला विकृतीच म्हणावं लागेल.

कोरोनाशी सामना अवघं  जग करतंय. मानवी समाजाची बुद्धिमत्ता, विज्ञान, तंत्रज्ञानाची क्षमता कोरोनापासून बचाव करण्यात सध्या तरी अपयशी ठरत आहे. मानवी समाजाला स्वत:च्या मर्यादा कळू लागल्या आहेत. त्यातून माणूस अधिक नम्र होण्याची शक्यता आहे. कोरोनाशी लढाई आज तरी मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे. अशा वेळी सर्व तत्कालिक गोष्टी बाजूला ठेवून चिरंतन, शाश्वत म्हणता येतील अशा गोष्टींकडे सर्वांनी वळायला हवं होतं. मात्र कोरोनाने समाजव्यवस्था, सरकार, प्रशासन म्हणून आपण नेमके कुठे आहोत, हे दाखवून दिलं. अशा वेळी अधिक प्रगल्भतेने ही परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार कमी पडलं. नरेंद्र मोदी आपला जुनाच अजेंडा राबवत राहिले. शब्दबंबाळ भाषणे, कवीकल्पना, फुटकळ इव्हेंट यात रमलेले मोदी कोरोनानेही भानावर यायला तयार नाहीत. अर्थात हा संघाच्या प्रशिक्षणाचा दोष आहे. अटलबिहारी वाजपेयी सोडले, तर भारतातील ताणेबाणे लक्षात घेऊन नेतृत्व करू शकणारा नेता संघ निर्माण करू शकला नाही. संघाचे ट्रोल्स, मोदीभक्त, स्वयंसेवक आणि समर्थक असलेली माणसं एवढाच देश आहे, असं मानून मोदीही इतर संघनेत्यांप्रमाणेच वागत आहेत.

 ‘शिस्त’ हा शब्द संघ स्वयंसेवकांच्या मेंदूत ठासून भरलेला असतो. मोदींनी धाडकन लॉकडाऊन करून देशाला शिस्त लावण्याचा उद्योग केला. चार तासांचा वेळ देऊन अख्खा देश बंद केला. पहिले दोन लॉकडाऊन या निर्णयाची चिकित्सा न करता नियमांचे पालन केले गेले. दुसरा लॉकडाऊन संपल्यावर चिकित्सा सुरू झाली. अगदी लॉकडाऊनमध्येही अमित शहांनी मध्य प्रदेशचं राज्य सरकार पाडलं. महाराष्ट्र सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न केले. आता भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केलाय.

सर्व शहरांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय श्रमिकांचे लॉकडाऊनमुळे अतोनात हाल झाले. छोटे उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. तो पूर्णपणे रोख रकमेवर चालतो. रोज कमवून जगणारे श्रमिक या देशात बहुसंख्य आहेत. या सर्वांना लॉकडाऊनने सर्व बाजूंनी घेरलं. ज्या व्यक्तीकडे शारीरिक अंतर ठेवण्याजोगी घरात जागा आहे आणि काही दिवस पुरेल इतका बँक बॅलन्स आहे, तीच व्यक्ती या लॉकडाऊनमध्ये टिकू शकते. गरिबाला या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. या काळात भारतीय मध्यमवर्गातल्या संकुचित माणसांनी नेहमीप्रमाणे कान, नाक, डोळे बंद ठेवले. भारतीय राजकारणातले मोदीपर्व हे या संकुचित मानसिकतेचंच अपत्य आहे. लॉकडाऊन मध्येही ‘यूझ अँड थ्रो’ प्रवृत्तीचं विराट दर्शन झालं.

१ एप्रिलपासून गांधी भवन – युक्रांदने सुरू केलेल्या मदतकार्याच्या निमित्ताने श्रमिकांच्या समस्या आम्हाला थेट अनुभवता आल्या. पायी, सायकलने आपल्या गावी जाण्याला ‘पलायन’ हा शब्द वापरला जातो, तेव्हा ही संकुचित वृत्ती दिसते. या श्रमिकांची जबाबदारी सरकार, त्यांचे व्यवस्थापक, मालक यांनी निभावली नाही. अनेक दिवस वाट बघून अखेर नाईलाजाने ही मंडळी शेवटचा पर्याय म्हणून घराकडे निघाली. त्याला पलायन कसं म्हणता येईल? ज्या समस्या सरकारमूळे, समाजव्यवस्थेमुळे निर्माण झाल्या त्यांची जबाबदारी त्यांना घ्यावीच लागेल.

यासंदर्भात एक उदाहरण देता येईल. मिश्राजी हे मूळ उत्तर प्रदेशचे प्रवासी श्रमिक पुण्यात एका हॉटेलमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हॉटेलमालकाने आपलं खरं रूप दाखवलं. सुरूवातीला घरी न जाता पुण्यातच थांबण्याचा मिश्राजींचा संकल्प होता. मात्र हॉटेल मालकाने फेब्रुवारीपासूनचा पगार दिला नाही आणि अचानक राहती जागा सोडण्यास सांगितलं. मिश्राजी आज राहण्याची जागा आणि नोकरी दोन्हीच्या शोधात आहेत. दुसऱ्या बाजूला ते घरी जाण्यासाठीही प्रयत्न करीत आहेत.

इतक्या वाईट आणि विकृत गोष्टी असल्या तरी सामाजिक भान जपून मदत करणाऱ्या आणि वंचितांच्या सुखदु:खात सहभागी होणाऱ्या अनेक माणसांची या मदतकार्याच्या निमित्ताने भेट झाली. १५ लाखांहून अधिक आर्थिक मदत याच माणसांनी केली. कामाच्या नोंदी ठेवणं, स्वत: वर्गणी देऊन संपर्कातील माणसांना आवाहन करणं, गरज पडेल तेव्हा धावून जाणं अशा स्वरूपाची कामे करून अनेक माणसांनी या मदतकार्याला बळ दिलं. त्यामुळेच आम्ही ४७०० किट्स वाटपाचा टप्पा गाठू शकलो. अनेक संस्था – संघटनांनी प्रभावी सेवाकार्यातून समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला. शीख धर्मीय नागरीकांचे गट अशा मदतकार्यात नेहमी आघाडीवर असल्याचं आपण पाहतो. त्या कार्याचं व्हावं तसं कौतुक होत नाही. तयार जेवण पुरवण्याचं काम या गटांनी प्रभावीपणे केलं. चंदननगरच्या नीळकंठ सोसायटीच्या सर्व सभासदांनी वर्गणी जमवून आपल्या भागातील श्रमिकांना मदत केली. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणाऱ्या ‘अन्नपूर्णा परिवार’ ने आपल्या सर्व सभासदांना आर्थिक मदत केली, किराणा सामान दिलं. छोटी कर्जेही उपलब्ध करून दिली.

गांधी भवन आणि युक्रांदतर्फे सुरू असलेल्या या मदत कार्यात गांधी भवनशी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संबंध असलेल्या श्रमिकांना मदत पोचवली गेली. परवा पाच तरूण मित्र – मैत्रिणींनी वर्गणी जमवून ११० व्यक्तींना मदत केली. संस्था, गट, संघटना, मंडळ अशा पातळीवर असे अनेक सामाजिक भान जपणारे अनेक प्रयोग झाले. मध्यमवर्गातील काही संवेदनशील माणसांनी आपल्या घरात काम करणाऱ्या घरेलू कामगार आणि इतर श्रमिकांना मदत केली. या प्रवृत्तीचं सार्वत्रिकीकरण झालं असतं तर कदाचित आजच्यासारखी विदारक स्थिती निर्माण झाली नसती.

साधारणपणे सप्टेंबर २०२० पर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल असं वाटत होतं. आता किमान एक वर्ष कोरोनाशी संघर्षाची जातील, असा अंदाज आहे. परिणामकारक औषध निश्चित होणं, त्याचं  मोठ्या संख्येने उत्पादन आणि लसीकरण या प्रक्रियेला बराच वेळ जाईल. ही दीर्घ लढाई आहे, असं समजून सक्रीय राहावं लागणार आहे. राजकारण, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटीजना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या मुलाखतीही गाजल्या. त्यातून कोरोनापासून बचावाच्या अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.

जून महिन्यापासून लॉकडाऊनमधील अनेक बंधनं कमी झाली आहेत. प्रश्न अजून सुटलेला नाही. ‘कोरोनापासून बचाव’ हा एकमेव मुद्दा प्राधान्याचा असताना जग इतर घडामोडींमध्येही व्यस्त होऊ लागलं आहे. कोरोनापासून मुक्ती हा  फोकस दीर्घकाळ राहणं अवघड आहे. भारत-चीन सीमेवर तणाव आहे. जवान शहीद झाले आहेत. हे कोरोनाच्या धोक्यातही घडतं आहे.  या परिस्थितीत विविध विधायक उपक्रमांमधून सक्रीय असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. त्याला प्राधान्य देऊन सतत सकारात्मक, आशावादी राहण्याचं मी आणि युक्रांदच्या साथींनी मनाशी पक्कं ठरवलं आहे.

संदीप बर्वे

कार्यवाह – युवक क्रांती दल, महाराष्ट्र

Image credit : <a href=”http://www.freepik.com”>Designed by pikisuperstar / Freepik</a>