40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचे संशोधन

प्रख्यात अभ्यासक, समाजशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज – सिमला, हैदराबाद विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ अशा अनेक ठिकाणी अध्यापन केलेल्या सुजाता पटेल यांचा हा लेख ६ फेब्रुवारी २०२१ च्या ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’मध्ये प्रकाशित झाला होता. विद्या कुलकर्णी यांनी  त्याचा  मिसा  Online साठी मराठीत अनुवाद केला आहे.


स्त्रियांविषयीच्या गांधींच्या कल्पना वा धारणा या विषयावर मी १९८८ मध्ये एक अभ्यासलेख लिहिला होता. स्त्रियांसाठी “स्वतंत्र क्षेत्रा”ची (separate sphere) कल्पना त्यावेळी भारतात, व जगभरातही, प्रचलित होती, तिचा पुरस्कार गांधींनीही केलेला. गांधी हे स्त्रीवादी होते हे तत्कालिन स्त्री अभ्यासकांचे मत खोडून काढणारी मांडणी मी त्या लेखात केली होती. याच मुद्द्याची अधिक सखोल चर्चा मी या अभ्यासलेखामध्ये केली आहे.

‘१९१८-३९ या काळातील अहमदाबादमधील कापड उद्योगातील कामगारांच्या संघर्षात गांधींची भूमिका’ या माझ्या पीएचडी प्रबंधाचे काम पूर्ण केल्यानंतर मी हा अभ्यासलेख लिहिला. हा प्रबंध मी १९८३ मध्ये सादर केला व नंतर त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांबद्दलचा माझा दृष्टीकोन या प्रबंधातील तर्क/युक्तिवादांतून आलेला आहे. या प्रबंधासाठी मी Collected Works of Mahatma Gandhi मधील संबंधित भाग अभ्यासले. सरकारी दस्तऐवज वाचले. तसेच कामगार नेते, गिरण्यांचे मालक आणि व्यवस्थापक, राजकीय नेते आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित पहिल्या व दुसऱ्या पिढीतील महिला आणि पुरुष कामगार यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतींतून मला स्त्रियांच्या रोजगारातील घटत्या प्रमाणाचा अधिक अभ्यास करण्याची गरज जाणवली. कापड उद्योगात साधारण १९३५ पासून स्त्री कामगारांच्या गळतीला सुरुवात झाली, मात्र १९३५ मध्ये कामगार नेता म्हणून गांधींनी गिरणी मालकांसोबत जो करार केला त्यानंतर ती अधिक प्रमाणात झाली.

संदर्भ स्थापित करणे

त्यावेळची परिस्थिती अधिक अभ्यासल्यानंतर मला गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कामगार चळवळीत कशा प्रकारे नकारात्मक भूमिका बजावली हे समजले. स्त्रियांनी रोजगार करू नये, घरातच राहावे आणि घराची देखभाल करण्यावर सर्व लक्ष केंद्रित करावे, ही त्यांची भूमिका होती. माझी आई लीलाबेन पटेल आणि स्वातंत्र्यचळवळीत व कॉंग्रेस पक्षात सक्रीय असलेल्या तिच्या मुंबईतील (त्यावेळचे बॉम्बे) मैत्रिणींशी बोलल्यानंतर तर माझी समज अधिक व्यापक झाली. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचे जे विविध उपक्रम होते त्यात स्त्रिया म्हणून ज्या विशिष्ट उपक्रमांमध्ये त्या सहभागी होत्या त्याविषयीचे त्यांचे विचार ऐकून मला माझे तर्क/युक्तिवाद सुधारायला मदत झाली. तसेच या निषेध कार्यक्रमांच्या नियोजन आणि आखणीमध्ये लिंगभेदांविषयीच्या कल्पनांचा कसा प्रभाव पडला हे समजण्यासही मदत केली.

गांधींविषयी मी आधीच्या लेखात जी भूमिका मांडली आहे ती आजच्या संदर्भात पुन्हा पडताळून पाहण्याचा प्रयत्नही मी सदर लेखात घेतलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत मुख्यत्वे मध्यवर्गीय आणि उच्चवर्गीय स्त्रियांचा सहभाग राहिला ह्याविषयी  आजच्या स्त्री अभ्यास तज्ज्ञांचे तसेच इतिहासकारांचे एकमत आहे. ह्या  वर्गातील महिलांचे चळवळीवर नेतृत्व राहिल्याने त्यांची समज व अनुभव यांचेच पडसाद स्वातंत्र्य आंदोलनात दिसून येतात (सरकार २०१७). त्यामुळे तत्कालीन चर्चाविश्व हे संकुचित राहिले, ज्यात स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी असलेल्या वंचित वा परिघावरच्या समुहातील स्त्रियांच्या अनुभवांचे प्रतिबिंब पडले नाही, असे आजच्या स्त्रीवादी अभ्यासकांचे मत आहे.

त्यामुळेच, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून संघटित होत असलेल्या या वंचित, दलित व आदिवासी स्त्रियांच्या अनुभवांचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे असेही या अभ्यासकांचे मत आहे. नव्या रूपात पितृसत्ताक वर्चस्व कसे प्रस्थापित होते हे समजून घेण्याचा ‘पुरुषत्वाचा अभ्यास’ हा नवा दृष्टीकोन आहे. या लेखामध्ये मी ‘अधिसत्तात्मक पुरुषत्वाचा दृष्टीकोन’ हा गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचा कसा आधार होता, हे स्पष्ट केले आहे.

माझे असे मत आहे की गांधींना आधुनिक संवेदनशीलता असलेला नवा भारतीय समुदाय घडवायचा होता, तशी राजकीय योजना ते आखत होते. वसाहतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी तयार झालेले स्वातंत्र्य आंदोलन हे त्यांनी कालांतराने वर्ग, जात आणि लिंग आधारित विषमतेमुळे असमान असलेल्या गटांमध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयोग म्हणून पाहिले. नवे राष्ट्र घडवण्याच्या या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग म्हणजे नव्या भारतीय स्त्रीची परिकल्पना घडवणे. या कल्पनेची घडण तीन प्रकारच्या प्रक्रियांशी निगडित असल्याचे गांधींना जाणवले. पहिली प्रक्रिया – वसाहतवादामुळे सुरू झालेल्या नव्या धर्मनिरपेक्ष प्रक्रियांची, ज्यामध्ये औद्योगिकरण व शहरीकरणाला समावेश होतो, ज्यामुळे कारागीरांचे लघुउद्योग लयाला गेले तरी कामगारांना कारखान्यात काम करायला मिळाले. या प्रक्रियेमुळे काही उच्च जातीच्या व इंग्रजी शिकलेल्या समुहांची गतिशीलता वाढली, मध्यमवर्गाची घडण झाली आणि पुरुषत्वाच्या नव्या कल्पनाही रचल्या गेल्या (हेन्स २०१२). याचाच परिणाम म्हणून तोवर घरापुरते विश्व सीमित असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रिया राजकीय सार्वजनिक कामात सक्रीय झाल्या, ज्याला गांधींचेही प्रोत्साहन दिले.

दुसरी प्रक्रिया – १९ व्या शतकाच्या अखेरीस झालेल्या सुधारणावादी चळवळीमुळे मध्यमवर्गीयांनी कुटुंबातील लिंगभेदभाव आधारित श्रमविभागणीत बदलाचे समर्थन केले आणि स्त्री व पुरुष यांच्या जवळीकीला/सहजीवनाला प्रोत्साहन दिले. गांधी स्वत: मध्यमवर्गातील असल्याने त्यांना या बदलांची जाणीव होती (सरकार २०१७). तिसरी प्रक्रिया – भारतीय पुरुषांचे पुरुषत्व कमजोर असल्याची जी धारणा वसाहती अधिकाऱ्यांनी निर्माण केली त्याचा सामना गांधींनी स्त्रीविषयक धारणांतून केला. याकरिता घरात माता व पत्नी या भूमिका निभावत असूनही स्वातंत्र्य चळवळीत आणि नव्या आधुनिक राष्ट्रात सार्वजनिक स्वरूपात भूमिका निभावणाऱ्या स्त्रीला वैधता देण्यासाठी स्वत:चा “देशी” सिद्धांत निर्माण करणे जरूरीचे होते. याकरिता त्यांनी त्यांच्या घरातील पद्धती व व्यवहार आणि व्हिक्टोरियन कल्पनांचा मेळ घातला, असे मला वाटते. हाही त्या काळात अस्तित्त्वात असलेल्या मध्यमवर्गीय/जातीय पितृसत्ताक समजुतीचा भाग होता. गांधींचा स्त्रीविषयक धारणा हे विसाव्या शतकात भारतात विकसित होणाऱ्या अधिसत्तात्मक पुरुषत्वाच्या दृष्टीकोनाचेच एक रूप  होते, असे मला वाटते.

संशोधन सूत्र

अहमदाबाद कापड उद्योगातील भांडवल-श्रम संबंध या विषयावरील पीएचडी मी १९८५ मध्ये प्राप्त केली. त्यानंतर चंदीगढ येथे १९८६ मध्ये होणाऱ्या स्त्री अभ्यास परिषदेसाठी (इंडियन असोसिएशन ऑफ विमेन्स स्टडीज (IAWS)) ‘गांधी आणि अहमदाबाद कापड उद्योगातील कामगार वर्गातील स्त्रियांना संघटित करण्यात त्यांची भूमिका’ या विषयावर अभ्यासलेख लिहण्याची विचारणा मला झाली. IAWS ची स्थापना १९८२ मध्ये झाली असून भारतीय स्त्रियांविषयी ज्ञाननिर्मितीचे विविध कार्यक्रम ही संस्था राबवते. त्रिवेंद्रममध्ये १९८४ मध्ये आयोजित दुसऱ्या परिषदेत स्त्री शक्ती संघटनेने त्यांच्या तेलंगण चळवळीचे काम सादर केले, ज्यावरून स्त्रिया व राजकीय सहभाग या विषयावर बराच उहापोह झाला.

त्यानंतर राजकीय लढे आणि संघर्षांमध्ये स्त्रिया कोणकोणत्या प्रकारे सहभागी झाल्या याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी IAWS ने एक कार्यगट तयार केला. त्याआधारे पुढील चंदिगढच्या परिषदेत वर्तमान व गतकालीन आंदोलनातील स्त्रियांच्या सहभागावर सखोल चर्चा करायची असेही ठरले. स्वातंत्र्यचळवळीतील स्त्रियांवर एक विशेष सत्र या परिषदेत आयोजित केले होते. त्यामध्ये मी जेव्हा माझा अभ्यासलेख मांडला तेव्हा श्रोत्यांमध्ये फारच थोडी चर्चा झाली आणि सत्राच्या अध्यक्ष वीणा मुजुमदार यांच्यासह सहभागींकडून अगदी अल्प प्रतिसाद मिळाला. माझे कोणते तर्क लोकांना पटले नसावेत हा प्रश्न मला पडला. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी ज्या तर्कावर हा अभ्यासलेख आधारित होता ते प्रथम थोडक्यात स्पष्ट करते.

अहमदाबाद कापड उद्योगातील भांडवल-श्रम संबंध या प्रबंधातील, विशेषत: गांधींच्या भूमिकेबाबत (ज्यांनी १९१८ मध्ये कामगारांची टेक्स्टाईल लेबर असोसिएशन (TLA) ही संघटना स्थापन केली), माझे जे तर्क आहे ते मी मांडते. राष्ट्रहिताचे व्यापक ध्येय नजरेसमोर ठेवून गिरणी मालक आणि कामगारांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे अशी चळवळीच्या सुरुवातीपासून गांधींची भूमिका राहिली होती. आपले हक्क प्राप्त करण्यासाठी कामगारांनी संपाचे अस्त्र वापरू नये हे त्यांच्या संघटनेने कामगारांना पटवून दिले आणि गिरणी मालकांनीही टाळेबंदी घोषित करू नये यासाठी त्यांच्याशी समन्वय साधला. १९१८-१९२३ याच दरम्यान गांधींनी विश्वस्तता (ट्रस्टीशीप) म्हणजे काय, कामगारांचे तसेच गिरणी मालकांचे हक्क व कर्तव्ये काय याबाबतचे तर्क व भूमिका स्पष्ट केली.

कामगार व मालक यांच्यातील विवाद हे लवाद यंत्रणेद्वारे दोन्ही पक्षांच्या वाटाघाटीतून सोडवले जावेत, ही गांधींची भूमिका होती. अशा प्रकारची विवाद निवारणाची यंत्रणा अहमदाबादमध्ये वसाहतपूर्व काळापासूनच अस्तित्वात आहे, अशी भूमिका घेऊन गांधींनी परस्परविरोधी हितसंबंध असणाऱ्या दोन गटांमध्ये विश्वास निर्माण केला. लवादाची ही संस्थात्मक यंत्रणा कशा प्रकारे निर्माण केली हे मी माझ्या प्रबंधात सविस्तर दिले आहे. (पटेल १९८७, २०२२).

अहमदाबादमधील तत्कालीन स्वातंत्र्य चळवळ ही या दोन गटात सामंजस्य व परस्पर विश्वास निर्माण करण्याचे माध्यम ठरली, कारण गिरणी मालक आणि कामगार दोघेही या आंदोलनाचा भाग होते. याप्रकारच्या यंत्रणेला ‘कॉर्पोरेटिझम’ म्हणता येईल, जी संकल्पना प्रथम राजकीय शास्त्रज्ञ फिलिप स्मिटर यांनी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर अँड कॉंग्रेस ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन) (AFL-CIO) आणि अमेरिकेतील व्यापारी गट यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी वापरली. तसेच स्वीडन आणि नॉर्वे यांनी त्यांच्या सामाजिक लोकशाही कल्याणकारी शासनाचा एक भाग म्हणून या संकल्पनेला संस्थात्मक स्वरूपात स्वीकारले. AFL-CIO ने संपाचा मार्ग टाळला आणि वाटाघाटीद्वारे विवादांचे निवारण केले. कॉर्पोरेटिझमचे हे उदारवादी स्वरूप इटलीने स्वीकारलेल्या त्याच्या मूळ रूपापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनी यांच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट शासनाने भांडवलदारांचे कामगारांवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कॉर्पोरेटिझमचा वापर केला.

स्मिटर यांनी सामाजिक (अथवा नव-कॉर्पोरेटिझम) आणि राज्यसंस्थेचा कॉर्पोरेटिझम यात फरक केला आहे. वसाहतवादाविरूद्ध सामूहिकपणे लढता यावे या राजकीय विचाराने आधारे गांधींनी दोन प्रतिरोधी गटांमध्ये (या स्त्रिया व पुरुष दोन्ही आहेत) सामंजस्य व सहकार्य निर्माण केले, असे त्यांच्या अहमदाबादमधील प्रयोगावरून दिसते, असे माझे मत आहे (पटेल १९८७). परंतु, अहमदाबादच्या संदर्भात विचार केला असता, तिथे जी यंत्रणा अस्तित्वात आली त्यामुळे कामगार संघटनांतील स्पर्धात्मकता लोप पावली. त्यामुळे १९२० व १९३० च्या दशकांमध्ये कामगारांना संघटित करणाऱ्या डाव्या विचारांच्या कामगार संघटना जवळपास संपल्या आणि रूढीवादी विचाराच्या संघटनांना वाव मिळाला. गुजरात राज्यात राजकीयदृष्ट्या उजव्या विचारांचा पगडा मजबूत होण्याची ही पार्श्वभूमी आहे  (पटेल १९८७, २००२).

कामगारांना चांगले वेतन, राहायला घरे आणि सामाजिक सुरक्षा सहाय्य हे लाभ तोवरच मिळतील जोवर कापड उद्योग भरभराटीत होता, उद्योग आर्थिक संकटात गेल्यावर हे लाभ मिळाले नाहीत. १९३५ च्या सुमारास अहमदाबादमधील कापड उद्योगासमोर जपानच्या स्पर्धेचे आव्हान ठाकले. यावेळी गिरणी मालकांच्या दबावापोटी, आणि १९३५ च्या भारत सरकार अधिनियमातून मर्यादित स्वरूपात प्रांतीय स्वायत्तता प्राप्त करण्यासाठी गिरणी मालकांच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याने, गांधींनी गिरण्यांच्या आधुनिकीकरणाला सहमती देणारा करार मान्य केला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कामगार विस्थापित झाले. गांधींनी असे सुचवले जर पुरुष कामगारांना कौटुंबिक वेतन (आजचा महागाई भत्ता) दिले तर त्या पुरुषांच्या पत्नींचा ऐच्छिक राजीनामा मिळवून देण्यात कामगार संघटना मदत करेल, ज्यामुळे गिरणी मालकांवरील पगाराचा बोजा कमी होईल.

स्त्री कामगारांवर झालेले परिणाम

या निर्णयाच्या परिणामी १९४० पर्यंत गिरणी कामगार स्त्रियांची संख्या कमी झाली. या कामगार कपातीमागे एक जातवास्तव देखील आहे. बहुसंख्य कामगार स्त्रिया या विणकर समुदायातील होत्या. कापड गिरण्या येण्यापूर्वी हातमागावर कापड तयार करणारा विणकर समाज हा दलित समुदायाचा भाग आहे. कापड उद्योग सुरू झाला तसे विणकरांचे काम कमी झाले. १९ व्या शतकाच्या मध्यास जेव्हा जास्त संख्येने कापड गिरण्या उभ्या राहू लागल्या तेव्हा कापूस कातण्याच्या विभागात त्यांना काम देण्यात आले. गांधींनी केलेल्या करारानंतर या स्त्री कामगारांचे दुसऱ्यांदा विस्थापन झाले. कमावत्या स्त्रियांबाबतचे गांधींचे बरेच पूर्वग्रह होते, ज्याचे दाखले मी माझ्या प्रबंधात व पुस्तकात दिलेले आहेत. स्त्रियांनी घरकाम करावे, बालकांचे म्हणजेच समाजातील भविष्यकालीन पिढीचे संगोपन व देखभाली करावी, असे त्यांना वाटे. अहमदाबादमधील कामगारांना उद्देशून १९२० मध्ये त्यांनी केलेल्या भाषणातील मतेच या करारानिमित्ताने पुन्हा स्पष्ट होतात. या भाषणात गांधी म्हणतात:

जर आज आपली पत्नी व मुले यांना कारखान्यात काम करण्यासाठी पाठविणे कामगारांना भाग पडत असेल तर त्यांची ही गरज कशी कमी करता येईल हे पाहणे आपले कर्तव्य आहे. केवळ तीनचार रुपयांच्या जास्तीच्या कमाईसाठी स्त्रिया, मुलांना त्यांच्या शिक्षणाची किंमत मोजून कामाला जावे लागता कामा नये. मुलांनी काम करू नये. स्त्रियांनाही कारखान्यांमध्ये काम करावे लागू नये. स्वत:च्या घरातच त्यांना भरपूर काम आहे. त्यांनी मुलांच्या देखभालीवर लक्ष द्यावे. कामावरून दमून आलेल्या पतीला घरात शांतता लाभेल याची काळजी घ्यावी, त्याला मदत करावी, तो त्रस्त असल्यास त्याला शांत करावे, आणि घरात राहून करता येईल असे अन्य कोणतेही काम करावे. आपल्या स्त्रियांना पुरुषांप्रमाणे बाहेर जाऊन काम करू देता कामा नये. जर आपण त्यांना कारखान्यांत कामाला पाठविले तर घरचे काम कोण करणार, कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या कोण सांभाळणार? (पटेल १९८८: ३८१)

 नंतर १९८५ मध्ये मी अहमदाबादमधील कापड उद्योगातील कंत्राटी कामगारांचा अभ्यास केला (पटेल १९८६). या अभ्यासात मी ज्या स्त्री कामगारांच्या मुलाखती घेतल्या त्या १९३५ मध्ये विस्थापित झालेल्या स्त्री कामगारांच्या मुली होत्या असा स्पष्ट पुरावा जरी मला या संभाषणातून मिळाला नाही, तरी या स्त्रिया, त्यांची आई, पूर्वीच्या काळी कापड गिरण्यात काम केलेल्या कामगार स्त्रिया अशा विविध जणींच्या मुलाखातीतून सतत विस्थापित होण्याचा त्रास त्यांना कसा सहन करावा लागला हे स्पष्ट होते. स्त्रियांना प्रथम हातमागाच्या कामातून आणि नंतर कापड गिरण्यातील कामांतून विस्थापित व्हावे लागले, घरातच राहावे लागले, ज्यामुळे चार-पाच पिढ्यांनंतर त्यांचे विणकर कामगार म्हणून कौशल्यच संपुष्टात आले. या स्त्रिया १९३० साली व त्यानंतरच्या काळातही स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होत्या हेही या मुलाखतीतून लक्षात आले.

या स्त्रियांच्या मनात गांधींना आदरणीय स्थान आहे, स्वातंत्र्य आंदोलनात आणि स्त्रियांना राजकीय कामाच्या प्रवाहात आणण्यात गांधींनी महत्त्वाची कामगिरी निभावली असे त्यांना वाटते. त्यांना खोदून खोदून विचारले तरीही गांधीच्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम झालाय असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या परिस्थितीला TLA जबाबदार आहे असेही त्यांना वाटत नाही. तरीही, तत्कालिन औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे स्त्रिया रोजगार क्षेत्राच्या बाहेर कशा फेकल्या गेल्या हे मला या दीर्घ मुलाखतींतून समजले. आधुनिकतेचा अर्थ व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, गतीशीलता वाढली पाहिजे व अधिक पर्याय व संधी मिळाल्या पाहिजेत. पण या घटनेत मात्र सगळ्यांच्या – गिरणी मालक, गांधी आणि कामगार संघटना (TLA) – निर्णयाने स्त्री कामगारांचे खच्चीकरणच झाले आहे. या अनुभवाच्या आधारेच गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणा समजून घेतल्या पाहिजेत.

संशोधन सूत्र

मी याआधी म्हटल्याप्रमाणे चंदिगढच्या परिषदेत मी माझा अभ्यास मांडला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मी मांडलेल्या तथ्यांबाबत कोणीच शंका घेतली नाही, पण त्याआधारे काढलेले माझे निष्कर्ष त्यांनी स्वीकारले नाहीत. असे का झाले, माझे काही चुकले का, असल्यास कुठे चुकले, हे प्रश्न माझ्या मनात घोळत राहिले. १९८६ मध्ये योगायोगाने याच विषयावर माझे माझ्या आईशी बोलणे झाले. ती एकेकाळी बॉम्बे प्रदेश कॉंग्रेस समितीची उपप्रमुख होती. कॉंग्रेस पक्ष विसर्जित केला पाहिजे या गांधींच्या सूचनेला मान देऊन तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला. आम्ही भेटलो त्याच सुमारास जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे बिपन चंद्रा यांच्यासह काही इतिहासकारांनी तिची ‘स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांना संघटित करण्यामध्ये गांधींची भूमिका’ या विषयासाठी मुलाखत घेतली होती.

मुलाखतकारांनी तिला विचारलेले प्रश्न तिने मला सांगितले – गांधींची कधी व कुठे भेट झाली, त्यांच्या कोणत्या विचारांनी तुम्हाला प्रभावित केले, कोणत्या बैठकांमध्ये तुम्ही सहभागी झालात, गांधीनी बॉम्बेत आयोजित केलेल्या कोणत्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होतात – हे जाणून घेण्यात त्यांना रस होता, असे ती म्हणाली. पण स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाच्या तिच्या आठवणी यापेक्षा वेगळ्याच होत्या. ती गांधींमुळे किंवा त्यांच्या विशिष्ट विचारांमुळे प्रभावित होऊन स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेली नव्हती. मग मी तिला म्हटले की ‘तुझी गोष्ट तुला हव्या त्या रितीने तू मला सांग,’  जी तिने सांगितली. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळ्या मार्गांनी तरूण मुली आणि वयस्कर स्त्रिया सहभागी होत होत्या हे माझ्या लक्षात आले.

आईच्या बाबतीत जे घडले ते असे: ती आठ वर्षांची होती तेव्हा तिची आई, मोठा भाऊ यांच्यासह सगळे कुटुंब बॉम्बे चौपाटीवर गांधी व अन्य नेत्यांची भाषणे ऐकायला गेले होते. नंतर तिच्या भावाने तिला काही पत्रके देऊन ती घराच्या आसपासच्या लोकांना वाटायला सांगितले. त्यानंतर काही महिन्यांनी सकाळच्या वेळी रस्त्यावरून भजने गात चाललेला जथ्था तिने पाहिला. विशेष म्हणजे तिला जी भजने आवडायची तीच गाईली जात होती. तेव्हापासून ती तिच्या घराजवळच्या प्रभात फेऱ्यांना जाऊ लागली. त्यानंतर कालांतराने ती आणखी उपक्रमात सहभागी होऊ लागली, एका मुलींच्या गटात सामील झाली ज्या कार्यकर्त्यांसाठी (बहुतेक सर्व पुरुष) पोळ्या लाटण्याचे काम करायच्या. या सगळ्यात गांधी कुठे आहेत, असे तिने मला विचारले.

या प्रश्नातून माझ्या लक्षात आले की १९७० च्या अखेरीस आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात काही स्त्री अभ्यासक आणि काही स्वातंत्र्य आंदोलनाचे इतिहासकार यांनी एक प्रभावी विचारप्रवाह आणला. भारतातील उच्चभ्रूंनी गांधींचा पुनर्शोध घेतला, त्यांना नवीन समकालीन प्रशंसक लाभले. निषेध आणि आंदोलनातील स्त्रियांचा सहभाग हे त्यांच्या सक्षमीकरणाचा पुरावा मानला गेला. या विचारप्रवाहानुसार, स्त्रियांनी आंदोलनात येण्यामागे गांधींची महत्त्वाची भूमिका आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबरीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय स्त्री चळवळीचा विकास झाला. काही अभ्यासकांनी असेही म्हटले की १९व्या शतकात सुरू झालेली सुधारक विचारांची परंपरा गांधींच्या विचारांनी पुढे नेली आणि नव्या पद्धतीने या सुधारणा पुढे नेल्या गेल्या.

त्यांच्या मते गांधींनी बालविवाह, हुंडा, सती, गोषा पद्धतींना विरोध केला आणि स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. स्त्रियांना सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याचे आवाहन केले, प्रोत्साहन दिले व याप्रकारे स्त्री स्वातंत्र्याची वाट मोकळी केली. कोणत्याही आंदोलनात केवळ सहभागी होणे ही सक्षमीकरणाची पहिली पायरी आहे असे मानून या अभ्यासकांनी आपली भूमिका मांडली. या भूमिकेला एस श्रीदेवी (१९६९), वीणा मुजुमदार (१९७६), जेराल्डीन फोर्बस् (१९७९), करूणा अहमद (१९८४), देवकी जैन (१९८९) आणि मधु किश्वर (१९८५) या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे अनुमोदन दिले. गांधींच्या लेखनात स्त्रीवादी मूल्यतत्वे सापडतात असे मत मांडून देवकी जैन यांनी गांधी स्त्रीवादी असल्याचे म्हटले.

गांधींच्या “स्त्रियांविषयीच्या क्रांतीकारी भूमिकेमुळे” त्यांनी स्त्रियांचे स्थान उंचावण्यामध्ये महत्त्वाचे योगदान निभावले असे वीणा मुजुमदार यांनी म्हटले आहे (१९७६: ५८). “माता व पत्नी म्हणून स्त्रीच्या भूमिकेला कमी न लेखता” गांधींनी स्त्रियांची “वैयक्तिक प्रतिष्ठा” उंचावली आणि स्त्री-पुरुष दोघांवरही “स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समान कामे सोपवली.” गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणा या “जगभरात स्त्रीमुक्ती आंदोलनाने ज्या कल्पनांचा पुरस्कार केला त्याच्याशी मिळत्याजुळत्या आहेत,” असे त्यांनी म्हटले. या दोहोंनीही कुटुंबात व समाजात समानता व सन्मानाचा विचार उचलून धरला, स्वत:च्या विकासाच्या अनेकविध संधी त्यांच्यासमोर खुल्या केल्या आणि “पुरुषाला रिझवणारी वस्तू ही प्रतिमा नाकारली.”

कल्पना आणि प्रत्यक्ष सहभाग

“गांधी व स्त्रिया” या विषयावर विवेचन करणाऱ्या वर नमूद केलेल्या अभ्यासकांवर पुढील ऐतिहासिक तथ्याचा पगडा जाणवतो: स्वातंत्र्य आंदोलनात राष्ट्रीय स्तरावर जेव्हा गांधींचा प्रवेश झाला त्यातून स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला. मुजुमदार यांनी म्हटल्याप्रमाणे “गांधींनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांच्या प्रश्नांप्रती स्वीकारार्हता तयार केली” (पटेल १९८८: ३७७). या गृहितकातून गांधींच्या योगदानाचे विवेचन केले गेले असल्याने त्यांच्या विचारसरणीतील उदारमतवादी बाजूच केवळ पाहिल्या गेल्या आहेत. चंदिगढच्या परिषदेतील अभ्यासलेखातून मी वेगळा तर्क मांडला – स्त्रियांचे स्थान सार्वजनिक क्षेत्रापेक्षाही घराच्या आत आहे या धारणेतून गांधींनी स्त्रीप्रश्नाची मांडणी केली आणि अशा प्रकारे पितृसत्तेची फेररचना केली, असे मी म्हटले होते.

याखेरीज, माझ्या आईच्या अनुभवावरून मला असेही लक्षात आले की गांधीच्या स्त्रियांविषयीच्या धारणा आणि स्त्रियांनी त्या धारणा आपल्याशा केल्या (वा केल्या नाहीत) याकडे वेगवेगळे पाहिले पाहिजे. माझ्या आईने जेंव्हा हा लेख वाचला तेंव्हा तिने मला सांगितले की ती माझ्या निष्कर्षाशी सहमत नाही उलट निराश झाली कारण तिच्या मते मी गांधीना आणि गांधींच्या व्यक्तीमत्वाला कमी लेखलेले आहे. आणि मी केलेली चिकित्सा ही तिच्याशी माझ्या आधी झालेल्या चर्चेतून आली आहे हेच तिला पटत नव्हते. एखाद्या राजकीय उपक्रमात लोक का व कसे सहभागी होतात हे केवळ एका प्रभावी व लोकप्रिय नेत्याच्या विधानांतून किंवा कल्पनांवरून समजून घेता येत नाही. कारण सहभाग हा प्रत्यक्ष कृतीशी निगडित असतो, त्यामुळे लोक कोणत्या संदर्भात कृतीला प्रवृत्त होतात हा संदर्भ समजून घेणेही गरजेचे आहे. मध्यमवर्गीय स्त्रिया आणि स्वातंत्र्य चळवळीचा विचार करताना जात संघटना, कुटुंब, शाळा, महाविद्यालये, स्नेहीसाथी, वडीलधारी मंडळी (विशेषत: आई) या सर्वांना समान महत्त्व देणे जरूरीचे आहे.  अशा रितीने स्त्रियांच्या सहभाग सर्वंकषपणे अभ्यासण्यासाठी वर्ग, जात, प्रदेश यांचा आंदोलनातील सामीलकीवरील पडणारा प्रभाव आणि सहभाग वाढावा याकरिता स्थानिक व प्रादेशिक राजकीय नेत्यांनी पार पाडलेली मध्यस्थाची भूमिका या बाबीही तपासाव्या लागतील.

कृती व्हावी यासाठीचे वातावरण कल्पना निर्माण करू शकतात. प्रत्यक्ष कृती ही केवळ कल्पनांवर नव्हे तर इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रियांचा सहभाग हा केवळ गांधीवादी तत्वज्ञानाचा परिणाम होता असे म्हणणे इतिहासाला धरून होणार नाही. कारण गांधींच्या कल्पना या हळूहळू विकसित होत गेल्या आहेत. तसेच गांधींच्या व्यक्तित्वामुळे, कल्पनांमुळे स्त्रिया सहभागी झाल्या असे म्हटल्याने लोकांना कृतीला प्रवृत्त करणारे तत्कालिन संदर्भ, कारणे पाहिलेच जात नाहीत वा क्षुल्लक ठरवले जातात. राष्ट्र निर्मिती कशी झाली पाहिजे याविषयी गांधींच्या विशिष्ट धारणा होत्या, त्या धारणा आणि स्त्रियांचा सहभाग यांचा स्वतंत्र विचार केला पाहिजे, असे माझे मत आहे.

आईशी झालेल्या माझ्या संभाषणातून आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे पुढे आले. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांची लिंगभावात्मक आधारित आखणी. स्त्रियांना पत्रके वाटायला, चपात्या लाटायला सांगण्यात आले, ती त्यांची कामे असल्याचे मानले गेले. म्हणजेच आंदोलनांतर्गत कामांची लिंगाधारित विभागणी अस्तित्वात होती. पक्षाच्या महिला सदस्यांसाठी पांढरी खादीची साडी हा स्त्रीची पवित्रता दर्शवणारा खास गणवेश ठरवला होता. त्याबद्दलचा नापसंतीदर्शक सूर अनेकींच्या बोलण्यात आला. “सुतकात असताना घालतात तो पांढरा रंग आम्हाला का घालायला सांगितले गेले? मी लाल रंगाची साडी का नेसू शकत नाही? देशाचे स्वातंत्र्य अन् माझे स्वातंत्र्य यांचा परस्पर संबंध आहे की नाही? माझे स्वातंत्र्य का हिरावून घेतले गेले?”

स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला जाताना माझ्या आईची एक मैत्रीण नेहमी झगझगीत लाल साड्या घालत असे. हे समजल्यावर मला प्रश्न पडले की स्त्रियांसाठी पांढरा रंग का ठरवला गेला असेल? उच्चजातीमध्ये विधवा स्त्रिया पांढरे वस्त्र परिधान करतात, त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? गांधींनी पांढरा रंग ठरवताना असा विचार केला का की सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होणाऱ्या स्त्रिया पुरुषी नजरेला बळी पडू नयेत, त्यांच्या सुरक्षेसाठी लैंगिक भावना नसलेली ‘सेक्सलेस’ अशी त्यांची प्रतिमा त्यांना उभी करायची होती का? या प्रश्नांच्या आधारे मी माझा पुढचा १९८८ मध्ये प्रकाशित झालेला अभ्यासलेख लिहिला.

गांधी आणि अधिसत्तात्मक पुरुषत्व

पुरुष आणि पुरुषत्वाचा अभ्यास अलिकडच्या काळातच सुरू झालेला आहे. पुरुषत्वाचा संबंध लिंगाभावाच्या धारणा व त्यांचा व्यवहार निरंतर होत राहील अशी सामाजिक रचना असण्याशी आहे. या विषयाच्या अभ्यासक आर. कॉनेल म्हणतात पुरुषत्व म्हणजे पुरुषांचे स्त्रियांवरील वर्चस्व अबाधित राहतील अशा व्यवहारांचा ढाचा (म्हणजे, केवळ अपेक्षा नव्हे तर प्रत्यक्षा केल्या जाणाऱ्या गोष्टी). अधिसत्तात्मक पुरुषत्व म्हणजे केवळ स्त्रियांना हिंसेचा बडगा दाखवणे नव्हे, तर संस्कृती, सामाजिक संस्था, लिंगभाव परिभाषा यावरील प्रभुत्व राखणे, ज्यामध्ये दुय्यम पुरुषत्वाचाही समावेश होतो. भारतात गांधींच्या विचारांनी नव्या राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भात अधिसत्तात्मक पुरुषत्वाच्या घडणीत योगदान दिले, असे माझे मत आहे.

आधुनिकतेच्या सुरुवातीच्या काळात फ्रान्स आणि इंग्लंड यासारख्या देशात पुरुषाचे शरीर, त्याचे कपडे, आचरण इत्यादी, ज्याला आजच्या परिभाषेत पुरुषत्व संबोधले जाते, याबाबत खुलेपणाने चर्चा होत असे. भारतामध्ये मात्र २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अशा चर्चांचे संदर्भ दुर्मिळपणेच सापडतात. शरीर/लैंगिक विज्ञानाबाबत झालेल्या चर्चा हा एक अपवाद वगळता. गांधींनीही पुरुषत्वाची कधी थेट वा खुली चर्चा केली नाही. पण वसाहतवादी अधिकाऱ्यांनी भारतीय पुरुषांना कमजोर समजणे त्यांना फारसे रूचलेले नव्हते, असे माझे मत आहे. तत्कालिन समाजात पुरुषांचे सामर्थ्यशाली अस्तित्व दाखवण्याची त्यांना गरज वाटली, हे गांधींच्या अन्य मांडणीवरून दिसते. जसे की, स्त्रियांच्या सार्वजनिक क्षेत्रातील सहभागाची चर्चा करताना ते स्त्रियांच्या समस्यांच्या व असुरक्षिततेच्या संदर्भाने आणि त्यांची पुरुषाला भुरळ पडू शकते याबद्दल बोलतात. अथवा शारीरिक संबंध हे केवळ संतति प्राप्तीसाठी असून विवाहित दांपत्यांनी एरवी संयम/ब्रम्हचर्य पाळावा याचा ते पुरस्कार करतात.

या चर्चेत लैंगिकतेबद्दलच्या त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि भविष्यातील भारत राष्ट्राचे राजकीय आकलन यांची सरमिसळ होताना दिसते. गांधींच्या लेखनात पुरुषत्वाबद्दलच्या खुल्या चर्चेचा अभाव आहे, मात्र त्यांनी पतीने पत्नीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भाने “भारतीय स्त्री” बद्दल बरेच विवेचन केले आहे. गांधींची पुरुषत्वाची धारणा भिन्नलिंगी कुटुंबव्यवस्थेभोवती गुंफलेली आहे, हे मला दर्शवायचे आहे. भारतीय पुरुषांच्या लैंगिक गरजां ते ज्याप्रमाणे सांगतात, त्याचप्रमाणे कुटुंबाचा कर्ता या नात्याने पुरुषांनी स्त्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे हेही ते सांगतात. म्हणजेच पती सामर्थ्यशाली असून त्याला स्वत:चे व पत्नीच्या वतीने ब्रम्हचर्य पाळायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे हे ते सूचित करतात. जसे गांधींनी ३८व्या वर्षापासून पाळले. स्त्रीने कसे असले पाहिजे हे गांधी सांगतात, पत्नी व माता म्हणून भूमिका कशी निभावली पाहिजे हे ते सांगतात. याप्रकारे राष्ट्रवादाच्या संदर्भाने अधिसत्तात्मक पुरुषत्वाचे प्रतिमान घडवण्याच्या त्यांच्या प्रयोगात ते भिन्नलिंगी पुरुषत्व हेच नैसर्गिक असल्याचे अधोरेखित करतात.

गांधींनी १९१० पासून  ते १९४५ पर्यंतच्या काळात केलेल्या लेखनातून स्त्रियांबद्दल जे लिहिले आहे त्याचे विश्लेषण मी केले आहे. या लेखनात विविध विषय आहेत, जसे स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे ज्ञान ग्रहण केले पाहिजे, त्यांनी कसे वागले पाहिजे, खाजगी व सार्वजनिक विश्वातील त्यांचा सहभाग कसा असला पाहिजे इत्यादी. या विश्लेषणातून त्यांच्या कल्पनेतील राष्ट्राच्या सामाजिक रचनेत नागरिक या नात्याने स्त्रिया व पुरुषांचा अवकाश स्वतंत्र होता. त्यांनी स्त्रियांना जे दुय्यम स्थान दिले ते तमाम स्त्रियांनी नाकारले पाहिजे, असे मला वाटते. स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रियांच्या सहभागाला धरून त्यांच्या मनातील चिंतांना उद्देशून गांधींनी अधिसत्तात्मक पुरुषत्वाचे प्रतिमान तयार केले, असे माझे मत आहे.

स्त्रियांच्या पंखातील बळ वाढेल आणि त्या पुरुषांच्या अंकुशाखाली राहणार नाहीत या भयापोटी आलेले अधिसत्तात्मक पुरुषत्व स्त्रियांचे दुय्यमत्व अबाधित ठेवण्याचे काम करते. गांधींच्या मते पुरुष हा कुटुंबप्रमुख व कमावणारा तर स्त्री ही घर सांभाळणारी आणि राष्ट्राच्या भावी नागरिकांचे संगोपन करणारी. वर म्हटल्याप्रमाणे गांधींच्या या अधिसत्तात्मक पुरुषत्वाच्या प्रतिमानाचे घटक विशिष्ट संदर्भातून आलेले आहेत. स्त्री कशी असावी यामागची समज शहरी, मध्यमवर्गीय, उच्चजातीय पुरुषी दृष्टीकोनातून आलेली आहे. १९व्या शतकातील सुधारणावाद्यांनी मांडलेल्या कल्पना पुढे नेण्याचे काम गांधींनी केले. मध्यमवर्गीय सुधारणावाद्यांनी मांडलेल्या स्त्रीविषयक धारणांचे परिवर्तन न करता गांधींनी त्यांच्या कल्पनांना राजकारणाची जोड देत स्त्रियांची सामाजिक भूमिका मान्य केली.

घर हेच स्त्रियांचे क्षेत्र

गांधींनी राजकारणाची परिभाषा व्यापक करून “घर” राजकारणाच्या कक्षेत आणले. १९व्या शतकातील सुधारकांनी स्त्री व पुरुषांच्या जीवशास्त्रीय फरकांच्या आधारे दोघांची क्षेत्रे स्वतंत्र असल्याची भूमिका मांडली. जन्मजात फरक हे नैसर्गिक असल्याने त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक भूमिकाही वेगवेगळ्या असल्याचे मानले गेले. त्याआधारे त्यांच्या वर्तनाच्या आणि परस्परसंबंधाच्या नैतिकतेचे नियम बनवले गेले. स्त्री व पुरुष यांची भिन्न क्षेत्रे जोडण्याचे काम विवाहसंस्थेने केले. पुरुष हा “कुटुंबप्रमुख,” “कमावता,” आणि “सुरक्षा करणारा” म्हणून तो “श्रेष्ठ;” तर स्त्री ही “माता,”  “संगोपन करणारी,” “देणारी,” म्हणून ती “कनिष्ठ.” या विचारसरणीच्या मांडणीत आणखी काही वेगळ्या गोष्टी आल्या: जसे की, पुरुष “स्वार्थी,” किंवा “स्वतंत्र,” किंवा “अधिकारवादी,” असूनही त्याच्याकडे “अंतर्ज्ञान” आणि “सामर्थ्य” नसू शकते; तर स्त्री ही “निस्वार्थ,” “सहनशील,” “परावलंबी,” आणि “धैर्य व नम्रतेची मूर्ती” असू शकते.

आधुनिक भारतीय पुरुषाला आधुनिक जगाबद्दल एकाचवेळी धास्ती व आकर्षण होते. त्याने १९ व्या शतकातील “घर” या संकल्पनेला नवा मुलामा देत आपल्या अधिपत्याखालील घरामध्ये त्याला आदर्शवत वाटणारी स्त्री निर्माण केली, अशी स्त्री जिने समाजाच्या पारंपारिक विभागणीचे जतन केले आणि नव्या जगासाठी भावी पिढी घडवण्याचे कामही केले. ज्या विविध स्वरूपात पितृसत्तेचे पुनर्निर्मिती होत असते त्यातील एक म्हणजे “नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ स्त्री” हे रचित. म्हणजे माणसाच्या व जगाच्या चांगुलपणाचे प्रतीक असलेली आणि पुरुषाची व समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवणारी अशी स्त्री. गांधींनी ही गृहितके केवळ स्वीकारलीच नाहीत तर स्त्रियांच्या राजकीय सहभागाबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाला साजेशा रितीने त्यांचा विस्तारही केला.

हाताने चरख्यावर सूतकताई करणे हे राजकीय सहभागाचे प्रतीक मानले गेले. अशा रितीने घरात राहूनही राजकीय कार्यात सहभागी झाल्याची भावना स्त्रियांना दिली गेली.  १९ व्या शतकांतील सुधारकांनी नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरवलेल्या गृहिणीमध्ये चरख्याने आणखी एक विशेष गुण जोडला. गांधींनी चरखा हा राजकीय संदेश म्हणून वापरला, जो नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरवलेल्या गृहिणीच्या हातात दिला, जेणे करून ती नवराष्ट्रनिर्मितीच्या कामात सदसद्‍विवेक राखणारी प्रतीक बनली.  “माता” या नात्याने “जन्मजात,” “नैसर्गिकपणे”च “शहाणपण,” “ताकद,” “धैर्य,” “सहनशीलता,” आणि “अंतर्ज्ञाना”ची ताकद असलेली स्त्री नव्या राजकीय संदेशाची व अहिंसेची प्रतीक बनली. तिचा सहभाग असेल तरच वासाहतिक पकडीतून देशाची सुटका करणे शक्य होणार होते.

घराची देखभाल करणाऱ्या स्त्रिया या नैतिक व आत्मिक दृष्ट्या चांगुलपणाचे संचित जपणाऱ्या आहेत असे सांगणाऱ्या गांधींनी त्यांच्या राजकीय तत्वज्ञानात “घरा”तील स्त्रीला जागा करून दिली. भारतीय संदर्भात नव्या स्त्रीचे निर्माण करताना त्यांनी शहरी मध्यमवर्गीय स्त्रीची प्रतिमा विस्तारली तसेच तिचे क्षेत्र घर आहे हे रचितही पक्के केले. घरातील स्त्रीला अधिक ताकदवान मानत त्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या संघर्षात आपल्या पतीच्या बरोबरीने तिलाही जागा आहे याला वैधता दिली. गांधी विचाराने स्त्रीला जीवशास्त्रीय वा नैसर्गिक फरकांच्या जोखडातून मुक्त केले नसले तरी “माता” हेच तिचे महत्त्वाचे कर्तव्य असले तरीही एकमात्र आद्य कर्तव्य आहे असे त्यांनी मानले नाही.

परंतु, गांधींनी स्त्रीच्या कार्याचे जे विस्तारीकरण केले, “घर” हे तिचे क्षेत्र आहे असे मानले तरीही तिला राजकीय कार्यात सामावून घेतले, यातून गांधी विचारात तणाव निर्माण झाला. १९२० च्या दशकात चरखा हे स्त्रीसहभागाचे प्रतीक बनले. पण १९३० च्या दशकात स्त्रिया मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून रस्त्यांवरील सत्याग्रहात सामील झाल्या. घराचे पावित्र्य प्रश्नांकित झाले. पण असे झाले तरीही गांधींनी त्यांचे “स्वतंत्र क्षेत्रा”चे गृहितक बदलले वा अमान्य केले नाही.

आदर्श स्त्रीत्वाबद्दलचे गांधी विचार

याउलट गांधींनी स्त्रीचे नवे प्रतिमान तयार केले जे परिघावर फेकल्या गेलेल्या हिंदू विधवा स्त्रीवर आधारित होते. त्याला दयाळूपणाची व समाजकल्याणाची जोड देत त्यांनी राष्ट्रहिताला वाहून घेतलेल्या स्त्रीचे नवे प्रतिमान तयार केले. परंतु, ही भूमिका निभावायची असेल तर मात्र तिने लैंगिक संबंधांकडे पाठ फिरवली पाहिजे, कामवासना नाकारली पाहिजे, पुनरुत्पादन क्षमता आणि कौटुंबिक जीवनाला तिलांजली दिली पाहिजे. अशा प्रकारे गांधींनीही विवाहाचे श्रेष्ठत्वही मानले, की स्त्री व पुरुष संबंधातील लैंगिक, संततिविषयक व सामाजिक गोष्टी केवळ विवाहाच्या आधीन असतील, आणि जी स्त्री आपले स्त्रीत्व, कामभावना नाकारून सार्वजनिक कार्यात सामील होईल तिच्यासाठी जागाही तयार केली. या स्त्रीप्रतिमेत ती एकीकडे नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असलेली घरातील गृहिणी म्हणून प्रेमळ पत्नी व आदर्श माता आहे, चरखा चालवून राष्ट्रनिर्माणात सहभागी होत आहे, घरातील जबाबदाऱ्या सांभाळते आहे, तर दुसरीकडे कामभावना, स्त्रीत्व नाकारून, पुनरूत्पादन क्षमता व कुटुंब जीवनाचा त्याग करून समर्पित राष्ट्रकार्याचे राजकीय काम करीत आहे.

स्त्रियांविषयीची पुढील गृहितके मानून गांधीवादी तत्वज्ञानाने अधिसत्तात्मक पुरुषत्वाचे प्रतिमान निर्माण केले असे माझे मत आहे: (i) जीवशास्त्रीय कारणांमुळे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगळे गुण आहेत. या दोघांचे समाजात स्वतंत्र क्षेत्र आहे आणि राष्ट्र निर्मितीच्या कार्यात प्रत्येकाची विशिष्ट भूमिका आहेत, कारण दोघेही मूलत: परस्परपूरक असेच आहेत. (ii) स्त्रिया ना “खेळणे” आहेत ना “बाहुले”, त्या सर्जनशील व्यक्ती असून त्यांच्या अभिव्यक्तीसाठी विशिष्ट जागा अस्तित्वात आहे. ही जागा म्हणजे घर. माता व पत्नी म्हणून त्या महत्त्वाची भूमिका निभावतात. (iii) घरामध्ये माता व पत्नी म्हणून जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या स्त्रियांच्या अंगी अलभ्य स्वरूपाचे स्त्रीसुलभ गुण आहेत, जे काही बाबतीत पुरुषांमधील गुणांपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे गुण म्हणजे आत्मनिर्भरता, धैर्य, संयम, पवित्रता आणि सहनशीलता. (iv) चांगली माता होण्याच्या दृष्टीने स्त्रियांना वेगळे शिक्षण दिले गेले पाहिजे, ज्यामध्ये तिच्या घरगुती जबाबदाऱ्यांना अनुशंगून शिक्षण, घराचे अर्थकारण, तिच्या विश्वाची मूलभूत माहिती यांचा समावेश असावा. (v) हिंदूंच्या प्रचलित चालीरिती स्त्रियांसाठी बंधनकारक असल्याने नवी भूमिका स्वीकारण्याच्या दृष्टीने स्त्रियांची वाढ होत नाही. बाल विवाह, सती, हुंडा आदी स्त्रियांचे शोषण करणाऱ्या व त्यांच्या प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या प्रथा आहेत. अशा सामाजिक कुप्रथा दूर करण्यासाठी स्त्रियांनी संघटित झाले पाहिजे, तसेच स्वातंत्र्यचळवळीत सामील होण्याच्या त्यांच्या नव्या भूमिकेविषयीही संघटनेने स्त्रियांना जागृत केले पाहिजे. स्त्रियांनाच त्यांच्यातील वैशिष्ट्यांची चांगल्या प्रकारे जाणीव असल्या कारणाने या संघटना केवळ स्त्रियांनीच चालवल्या पाहिजेत. (vi) स्त्रीचे पावित्र्य हा तिच्यातील वैशिष्ट्यपूर्ण व मौल्यवान गुण आहे. हे पावित्र्य जपण्यासाठी स्त्रियांनी आर्थिक कामात येऊ नये. आर्थिक काम केल्याने स्त्रियांचे पावित्र्य व प्रतिष्ठा भंग पावते. (vii) पुरुष व स्त्री दोघांना राजकीय हक्क आहेत, मतदानाचा हक्क हा त्यातील एक आहे. स्त्रिया राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात – एक माता या नात्याने त्यांनी मुलांमध्ये राष्ट्रीय चेतना रूजवावी आणि विविध कार्यक्रमात सामील व्हावे. परंतु, स्त्रियांना सहभागी करणारे स्वतंत्र व वेगळे कार्यक्रम आखावेत. असहकार आंदोलनाच्या वेळी सुरू झालेले सूतकताई, दारू दुकानांवर पिकेटींग, परदेशी मालाची होळी हे खास स्त्रियांचे कार्यक्रम बनले. (viii) स्त्रीला जर सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश करण्यास भाग पाडले गेले आणि जिथे तिचा “सन्मान” किंवा “आदर” राखला गेला नाही वा तिच्या शुद्धतेचे उल्लंघन केले गेले तर तिने आत्म-इच्छाशक्तीच्या बळाने स्वत:ला मारून घ्यावे. (ix) पुनरुत्पादन हेच विवाहसंबंधाचे प्रमुख कार्य आहे. पुनरुत्पादनाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अस्वाभाविक आहे. (x) स्त्रीला उन्नत नैतिक व आत्मिक पातळी गाठणे व त्या मार्गाने राजकीय कार्य करून लोककल्याण साधणे शक्य आहे. मात्र त्यासाठी तिने आपली लैंगिकता, कामभावना, पुनरुत्पादन क्षमता व कौटुंबिक जीवनाचा त्याग केला पाहिजे.

याच कल्पनांचे पडसाद पुरुषत्वाच्या विषयावर दक्षिण आशियात झालेल्या समकालीन संशोधनात दिसून येतात. पुरुषी वर्चस्वाचे प्रातिनिधिक रूप म्हणजे असा भिन्नलिंगी पुरुष जो कमावता आहे, पिता आणि पती आहे. घरामध्ये त्याची व त्याच्या पत्नीची विशिष्ट भूमिका निश्चित आहे, त्यांच्यातील लैंगिकतेला विवाहाचे अधिष्ठान आहे. याचाच परिणाम म्हणून पुरुषाची प्रतिष्ठा स्त्रीच्या पावित्र्याशी निगडित आहे. अवलंबून असतो. गांधीवादी विचारसरणीतील कल्पना या समकालीन पुरुषत्वाचे रचित निर्माण करण्यासाठी पूरक ठरतात.

सारांश

गांधी बनिया जातीत जन्मले, २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सौराष्ट्र भागात ते वाढले, वैष्णव व जैन धर्मांचा त्यांच्यावर प्रभाव होता. वाढत्या वयातील या सामाजिकीकरणाचा प्रभाव त्यांच्या धारणा व मानसिकतेवर पडलेला होता. याच आराखड्यानुसार त्यांनी देश समजून घेतला आणि आधुनिक भारताच्या घडवण्याच्या हेतूने नव्या पद्धतींचा अवलंब केला. बालपणात आत्मसात केलेल्या गोष्टीतून मुक्त होण्याचे विविध प्रयत्न त्यांनी केले पण या विचारांचा पगडा पुरता गेला नाही. पुरुषत्व व स्त्रीत्व याविषयीच्या त्यांच्या धारणा आणि स्त्रियांचे समाजातील स्थान ह्याविषयीच्या त्यांच्या समजेतून ते स्पष्ट होते. याबद्दलची त्यांची समज त्या काळातल्या अनेक पुरूष समाजसुधारकांशी मिळतीजुळती होती.

सामाजिक सिद्धांताच्या अभ्यासामुळे गांधींना चिकित्सकपणे जाणून घेण्याची माझी समज वाढली. या अभ्यासातून मला संशोधनाची साधने व कार्यपद्धती आणि अभ्यासाची आखणी करण्यास आधार मिळाला. स्त्रीवाद आणि स्त्री अभ्यासातून निर्माण झालेल्या ज्ञानाचा वारसा लाभला. बनावटी बातम्यांचा सुकाळ असलेल्या आणि सार्वजनिक चर्चांचा अवकाश सीमित झालेल्या सध्याच्या या काळात आपण सर्वांनी महनीय व्यक्तिमत्वांच्या कल्पनांची चिकित्सक दृष्टीने पुनर्तपासणी व अभ्यास केला पाहिजे. माझ्या लेखामुळे अशा प्रकारच्या चर्चेला चालना मिळेल अशी मला आशा आहे.

सुजाता पटेल

patel.sujata09@gmail.com

अनुवाद : विद्या कुलकर्णी

vidyakulkarni.in@gmail.com

संदर्भ :

  • Ahmed, Karuna (1984): “Gandhi, Women’s Roles and the Freedom Movement,” Nehru Memorial Museum and Library (NMML) Occasional Paper, NMML, New Delhi.
  • Forbes, G (1979): “Women’s Movement in India: Traditional Symbols and New Roles,” Social Movements in India, M S A Rao (ed), New Delhi: Manohar, Vol 2, pp 149–68.
  • Haynes, D (2012): “Masculinities, Advertising and Re-production of Middle-class Family in Western India, 1918–1940,” Being Middle Class in India: A Way of Life, H Donner (ed), London: Routledge, pp 23–46.
  • Kishwar, M (1985): “Gandhi on Women,” Economic & Political Weekly, Vol 20, No 40–41, pp 1753–58
  • Mazumdar, Veena (1976): “The Social Reform Movement in India: From Ranade to Nehru,” Indian Women: From Purdah to Modernity, B L Nanda (ed), New Delhi: Vikas, pp 41–66
  • Patel, S (1986): “Contract Workers in Ahmedabad Textile Industry,” Economic & Political Weekly, Vol 21, No 41, pp 1813–20.

— (1987): The Making of Industrial Relations Ahmedabad Textile Industry, 1918–1939, New    Delhi: Oxford.

— (1988): “The Construction and Reconstruction of Women in Gandhi,” Economic & Political Weekly, Vol 23, No 8, pp 377–87.

— (2002): “Corporatist Patronage in Ahmedabad Textile Industry,” Development and Deprivation in Gujarat, G Shah, M Rutten and H Streefkerk (eds), New Delhi: Sage, pp 96–114

  • Sarkar, Tanika (2017): “Designing Selves: Masculine and Feminine Frames in Late Colonial Times,” Unsettling the Archetypes: Feminities and Masculinities in Indian Politics, Manuela Ciotti (ed), Delhi: Women Unlimited, pp 364–90
  • Shridevi, S (1969): Gandhi and the Emancipation of Women, Hyderabad: Gandhi Sahithya Prachuranalayam.
  • Jain, D (1989): “Gandhian Contributions towards a Theory of Feminist Ethic,” Speaking of Faith: Cross-cultural Perspectives in Women, Religion and Social Change, D Jain and D Eck (eds), Delhi: Kali for Women.

 

One thought on “गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचे संशोधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *