40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

ताराबाई शिंदे

“आजपर्यंत बटकीप्रमाणे ताबेदारीत राहून सदासर्वदा नवऱ्याची मर्जी अति नाजूक, ताजव्याचे काट्यासारखी तोलून, घरातील सर्व मनुष्याचे जे नाही ते सर्व बोलणे व कष्ट सोसून, सदोदित भाड्याचे बैलासारिखे राबून हरिणसस्यासारखी रात्रंदिवस जनांची, घरच्यांची भीती बाळगून वागत असताही स्त्रियांना एक शब्द बोलण्याची अगर चिमटीभर दाण्याची सत्ता नसावी काय रे?”

स्त्रियांना परावलंबित्वाचे नेमके दर्शन घडविणारा हा प्रश्न ताराबाई शिंदे ह्यांनी १८८२ साली विचारला. विजयालक्ष्मी नावाच्या गुजराथी ब्राह्मण बाईने केलेल्या भ्रूणहत्येनिमित्त जे उलटसुलट चर्चेचे मोहोळ उठले त्याचा प्रतिवाद करण्यासाठी हा निबंध लिहिला. लग्न नावाच्या व्यवहारात शेवटी बाईच्या वाट्याला बटकीपण येते, निमूट सोसणे येते,राबणे येते आणि सत्ताहीनता येते ह्याची रोखठोक मांडणी शंभर वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाली होती; हे फार महत्त्वाचे ऐतिहासिक सत्य काळाच्या उदरात गडप झाले होते. महात्मा फुले ह्यांच्या ‘सत्सार’ अंकातील लेखनात ताराबाई शिंदे ह्यांचे कौतुक नोंदले गेले नसते, प्रा० स० गं० मालशे ह्यांच्यासारख्या साक्षेपी अभ्यासकाने रद्दीत पडलेल्या ह्या पुस्तकाचे दुर्मिळत्व ओळखले नसते, तर ताराबाई शिंदे नावाची महत्त्वाची स्त्री मूकपणे सोसत मरणाऱ्या इतर अनेक स्त्रियांप्रमाणे इतिहासात हरवून गेली असती.
“स्त्री-पुरुष तुलना अथवा स्त्रिया व पुरुष यांत साहसी कोण हे स्पष्ट करून दाखविण्याकरिता हा निबंध ताराबाई शिंदे यांनी रचिला” अशा शीर्षकाचा निबंध वऱ्हाड प्रांती बुलढाणा येथे १८८२ साली लिहिला गेला आणि पुण्यात छापला गेला. निबंध एका बाई न हिरीरीने बायकांच्या जातीची कड घेऊन पुरुषांविरुद्ध लिहिला म्हणुनच कवळ महत्त्वाचा आहे असे मुळीच नाही. खरे तर ताराबाईनी तत्कालीन स्त्रीजातीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांवर फवत ताशेरे झोडले असते, किंवा स्त्रीजातीविषयी तत्कालीन समजांना फक्त सरुंग लावण्याचा बेत केला असता तरी त्या काळी ते धाडसाचेच कृत्य झाले असते. पण ताराबाईंचा प्रकल्प यापेक्षा व्यापक आहे. बाईचे आयुष्य जगताना, एक व्यक्ती म्हणून तत्कालीन स्त्री-पुरूषांच्या आयुष्याचे सखोल चिंतन आणि निरीक्षण करून, जुन्या- नव्या साहित्याचा अभ्यास करून एक खणखणीत प्रतिकार किंवा निषेध (झुंज देण्याची तयारी) नोंदविण्याचे मोठे काम ह्या निबंधाने केले आहे आणि हे त्याचे मोठे श्रेय आहे.

एकोणिसाव्या शतकाबद्दल आपण जे वाचतो त्यातून त्या काळातील स्त्रिया म्हणजे निमूट सती जाणाऱ्या, अंधारात विधवेचे दिवाभीत आयुष्य जगणाऱ्या, निराधार, अडाणी, अंधश्रद्ध, सहजी फशी पडणाऱ्या, लहान वयात लग्न झाल्याने लहानपण-तारुण्य सारे हरवून बसलेल्या, थोडक्यात फक्त मारच खाणाऱ्या स्त्री-जीवनाचे करुण चित्र डोळ्यासमोर येते. १८५४ च्या सुमारास लिहिलेल्या बाबा पदमनजींच्या ‘यमुनापर्यटन ह्या मराठीतल्या पहिल्या वहिल्या कादंबरीचा विषयही ‘विधवा दुःखवर्णन’ हाच आहे. त्यानंतर केवळ पंचवीस वर्षांत ताराबाईसारख्या उच्चकुलीन मराठा घरातील बाईने ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध लिहिला ह्याचा अर्थ नीटपणे समजावून घेतला पाहिजे. एक तर निश्चित की, त्याही काळात बायका म्हणजे एक चेतनाहीन, फक्त सोशीक, त्याग करणारे असे एक निर्जीव अस्तित्व जगत होत्या अशी परिस्थिती नसणारच. जर असे अंधारयुग पूर्वी होते आणि मग ब्रिटिशांचा विज्ञानाचा आणि विवेकाचा प्रकाश पडला, सर्व सावरू लागले असा एकेरो प्रगतीचा आलेख कोणी मांडला तर ते खरे नव्हे एवढे तर निश्चित जाणावे. ‘स्त्री-पुरुष तुलना’ ह्या आपल्या लहानशा ३७ पानी निबंधात ताराबाईंनी बायकांच्या जिण्याबद्दल लिहिताना फक्त घरगुती, खाजगी जगाच्या वर्णनावर समाधान मानले नाही. तसेच त्या फक्त स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल लिहितात असेही नाही. धर्म आणि स्त्रियांची अंधश्रद्धा एवढ्या चौकटीवर बोट ठेवून गप्प बसतात असेही नाही. हे सर्व विषय जोरकसपणे धसाला लावताना ताराबाईंनी राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ज्या पुरुषांनी परकीय रीतिरिवाज, परदेशातून आलेली उपभोगाची साधने, परकीय शिक्षण, व्यवसाय व संधी मिळेल तेव्हा परदेशप्रवासही केला, त्यांना आता स्वतःच्या धार्मिक परंपरेबद्दल बोलायला अधिकार काय? असा मार्मिक प्रश्न ताराबाई विचारतात. ताराबाईंना त्यांच्याभोवती वाढत जाणारे आर्थिक आणि सांस्कृतिक दारिद्र्य जाणवले होते. ‘पहिली सुदशा जाऊन आपल्या देशास अवदसा येऊ लागली’ हे लक्षात घेऊन त्या म्हणतात, “पाचपाचशे रुपयांचे शालू, पैठण्या गेल्या. धनवड, नागपूर, बऱ्हाणपूर, सोलापूर, अहमदनगर ह्या पेठा लपल्या; आणि त्यांच्याऐवजी घरोघर ही पातळाचे सोळा हात तुकड्याची निशाणे लागली.” म्हणजे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील कंगालीकरण होते आहे हे ताराबाईना जाणवले. त्या पुरुषांना बजावतात, “या तुमच्या भिकार चाळ्यांनी सर्व प्रकारचे आपले स्वदेशी रोजगार बुडून, हर एक प्रकारचे व्यापारी व कसबी कारागीर लोक उपाशी मरू लागले, तर तुम्हांला विधवा स्त्रियांचा व या गरीब कारागीर लोकांच्या मुलामुलांचा कळवळा येऊन तुम्ही आपल्या देशाकडे पुनः पहिल्यासारखी नजर फिरवून आपापले धर्म, चाली, देशरिवाज न सोडता स्वदेशाभिमानी व्हावे व सर्व प्रकारे स्त्रियांस दोषपात्र करून रसातळी न घालावे म्हणून हा एक लहानसा निबंध तुम्हापुढे सादर केला आहे.” ‘स्त्रीजात्याभिमानाने मन अगदी खळबळून तळतळून’ गेल्याने निर्भीड होऊन ताराबाईंनी सुधारक पुरुषांना सुनावले की, “मोठया मोठ्या सभा भरविता, काय काय चाळे करता, व्याख्याने देता, दुसऱ्याला सांगता, पण स्वत: तेच पढतमूर्ख. बायका संकटात सापडल्या तर त्यांची कोंडी होते कारण ‘त्या’ सदा गृहवासात चुलीपासून तो दाराचे उंबऱ्यापर्यत काय ते ज्ञान. शिवाय तुमच्यासारखे लाकडाचे खुंट नाहीत. त्यांचे मागे देवाने सारे लोढणे बांधल्यामुळे त्या लवकर फसतात. आता दुर्गुणी कोण?”

ताराबाई शिंदे बुलढाण्याच्या. अंदाजे १८५० ते १९१० ह्या काळात त्यांचे आयुष्य गेले असावे. चार भावांमध्ये वाढलेली, वडिलांची लाडकी ताराबाई, सुस्थित घरात जन्मली-वाढली. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषा शिकली. मुख्य म्हणजे महात्मा फुले यांच्या तालमीत, सत्यशोधक समाजाच्या वातावरणात वाढली. ब्राह्मणी वर्चस्वव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणारी, ही ब्राह्मणेतर चळवळ त्या काळात फार महत्त्वाचा इतिहास घडवीत होती. विशेषत: जोतिराव फुल्यांची दलित बहुजनसमाजातील मुलींच्या शिक्षणासाठी केलेली धडपड फार महत्त्वाची होती. त्यामुळेच ताराबाईचे बालपण फार चांगल्या वातावरणात, नवेनवे शिकण्याला उत्तेजन देणाऱ्या माणसात गेले असावे असे दिसते. म्हणून नंतरच्या आयुष्यात अनेक विष पचविण्याची ताकद त्यांच्या अंगात आली असावी. ताराबाईंना एवढे शिकविले, धीट केले, पण लग्न लावताना मात्र तिचा विचार न घेता एका गरीब मुलाशी लग्न लावून दिले असे दिसते. “कित्येक श्रीमंत गृहस्थ आपल्या लाडक्या लेकीचे फक्त लाडाकरिता व आवडीकरिता एखादे गरीबाचे मुलीबरोबर लग्न करून ते जोडपे जवळच बाळगितात.” अशा तऱ्हेचा स्वत:चा अनुभव सांगणारे वाक्य ‘स्त्री-पुरुष तुलनेत’ येते. आवडत्या वडिलांनी न आवडणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिले ह्याने ताराबाई व्यथित झाल्या असाव्यात. त्यातच मूलही झाले नाही. नवरा गेल्यावर विधवेचे आयुष्यही बरेच काळ त्या जगल्या. प्रा० स० गं० मालशे ह्यांनी पुनर्मुद्रित केलेल्या
आवत्तीच्या प्रस्तावनेत त्यांच्याबाबतच्या काही खाजगी आठवणी आहेत. त्यातून उत्तरायुष्यात ताराबाई एकाकी आयुष्य जगत होत्या आणि आसपासची मंडळी त्यांना वचकून असत, असे चित्र समोर येते. हा प्रस्तावनेत श्री० गदाधर गोविंद पाठक ह्यांच्या पत्रातील मजकुरात ताराबाईंविषयी त्यांनी लिहिले आहे, “तिचा चेहरा क्रूर भासत असे. स्वभावाने ती तामसी होती. लहान मुले दिसताच ती काठी मारायला धावायची. आम्ही मुले तिला फार भीत असू.” ताराबाईंनी स्त्री-पुरुष तुलना’ हे एकच पुस्तक कसे लिहिले? त्यांचे आणखी काही लिखाण उपलब्ध नाही त्या अर्थी कदाचित फुल्यांनीच ताराबाईंच्या नावे हे पुस्तक लिहिले असावे असा संशय खुद्द प्रा० मालशे ह्यांनाही आला होता. ज्या काळात ताराबाईंनी लिहिले त्या काळात जर भालेकरांसारख्या जाणत्या सत्यशोधक कार्यकर्त्याने त्यांना धारेवर धरले तर ‘पुणे वैभव’ सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी काय केले असेल? १८८२ सालचे हे पुस्तक १९७५ साली प्रा० मालशे ह्यांनी उजेडात आणले, पण तोपर्यंत ते दडपलेच गेले होते. त्या काळात ताराबाई स्वतःची शेती पाहत होत्या. घोड्यावर बसून इथे तिथे जात होत्या. ह्या सर्व जगण्यातून त्यांचे जिणे एकाकी आणि बहिष्कृत झाल्यास नवल नाही. आजही मुलांच्या बरोबरीने वाढवलेली मुलगी आगाऊ ठरते तर त्या काळात सासरी न गेलेल्या, मुलं न झालेल्या ताराबाईंना काय सोसावे लागले असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अशा वेळी हीनदीन होऊन तुडविले जाण्यापेक्षा ताराबाईंच्या चेहऱ्यावर क्रूर संरक्षक भाव वावरत असेल तर नवल नाही.

१८१८ साली पेशवाईचा अस्त झाला आणि महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. त्यापूर्वीच १८१७ साली नाशिकच्या व्यंकटशास्त्री तेलंग ब्राह्मणाने बालविधवांच्या पुनर्विवाहाचा विचार मांडण्याचे धाडस केले होते असे ‘विधवाविवाह-चळवळ (१८०० — १९००) ह्या पुस्तकात प्रा० मालशे ह्यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात सतीच्या चालीपेक्षा विधवांचे चारित्र्य, भ्रूणहत्या, विधवा पुनर्विवाह, संमती वय, स्त्री प्रशिक्षण इत्यादी प्रश्नांच्या निमित्ताने स्त्रियांबद्दल बोलले जाऊ लागले. परंतु ह्या चर्चांमध्ये त्या काळात बायकांनी स्वतःचे विचार मांडण्याची शक्यता नव्हतीच. पण बायका ह्या ‘कर्त्या माणूस’ आहेत असेही पाहिले गेले नाही. बायका नावाचे असहाय प्राणी आणि त्यांना वाचविण्याचे विविध मार्गांनी केले गेलेले प्रयत्न, असे चित्र दिसते.

आतापर्यंत आपण सर्वच जण ब्रिटिशांच्या राजवटीकडे स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी नवी मूल्ये प्रत्यक्षात आणणारी, विज्ञाननिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढविणारी ‘दैवी वरदान’ सारखी असणारी राजवट अशाच दृष्टीने पाहत होतो. आता ह्या साऱ्याची दुसरी बाजू लक्षात येऊ लागली आहे. ब्रिटिशांनी आपल्याला स्वत:पासूनच परके केले हे पक्के ध्यानात येऊ लागले आहे. म्हणूनच उदारमतवादी, व्यक्तिवादी, केवळ अनुभवांनाच प्राधान्य देणारी समाजव्यवस्था आणि विचारपद्धती संशयास्पद वाटू लागली आहे. स्त्रियांच्या संदर्भात तर हे फारच कटाक्षाने जाणवते. उदा. ब्रिटिश राजवटीने आणलेला वासाहतिक पितृप्रधान हिंदू कायदा एकीकडून स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवतो असे भासले तरी ह्या कायद्यातून प्रत्यक्षात तरुणांच्या सत्तेचे क्षेत्र वाढले असेही दिसते. पुनर्विवाहित स्त्रियांचा पहिल्या पतीच्या संपत्तीवरचा हक्क संपत होता हे वास्तव लक्षात घेतले तर पतिनिधनानंतर संपत्तीचा हक्क असलेली विधवा आणि पुनर्विवाहाच्या सुधारणेच्या साह्याने पुन: नव्या विवाहबंधनात अडकलेली सौभाग्यवती ह्यात खरे स्वतंत्र कोण होता, असाही प्रश्न मनात येतोच.

ब्रिटिश राजवट येथे स्थिरस्थावर होऊ लागली तेव्हा भारतात बायकांना जाळले जाते, मारले जाते, त्यांच्यावर विवाहांतर्गत बलात्कार होतात, हे वास्तव प्रकाशात आले. त्यातून ज्यांना आपल्या बायकांना नीट वागवता येत नाही ते राज्य तरी काय नीट करणार असा तर्क लढविला गेला. कुटुंब, जात, धर्म ही क्षेत्रे खासगी आहेत त्यात शासन ढवळाढवळ करणार नाही असे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जाहीर केले. हामुळे राजकीय प्रश्रांपासून सामाजिक प्रश्न अलग केले गेले आणि ब्रिटिशांच्या राजवटीला अधिक अधिमान्यता लाभली. गोऱ्या साहेबांना भारतीय स्त्रिया कशा दिसल्या? अतिरिक्त धार्मिकतेपुढे, पुरुषांच्या लैंगिक आक्रमणापुढे आणि उपेक्षेमुळे बळी जाणाऱ्या अशा स्त्रिया त्यांना दिसल्या आणि अशाच स्त्रिया त्यांनी पाहिल्या — असे का झाले, हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो.

कधी कधी मनात येते एकोणिसाव्या शतकात एवढी चर्चा झाली, त्यात स्त्रियांविषयीचा खरा खरा कळवळा कोणाला होता? एकीकडे ब्रिटिशांना आपल्या अधिमान्यतेची अधिक काळजी होती, तर त्याविरुद्ध उभ्या ठाकलेल्या सनातनी मंडळींना हिंदुधर्माची, वासाहतिक प्रशासक, मिशनरी मंडळी, उदारमतवादी आणि सुधारणावादी तसेच सनातनी व पुढे राष्ट्रवादी हिंदू असे सर्व तऱ्हेचे पुरुष वादात उतरले होते. बायका रपरंपरेचे प्रतिनिधित्व करतात हे गृहीत तत्त्व होते. अशा रीतीने ‘बायका’ नावाच्या भूमीवर परंपरेबद्दलचा वाद खेळला गेला. अनेकदा वाटते की कळीचा प्रश्न भारतीय परंपरा हा होता, बायका फक्त त्याचे निमित्त झाल्या; ज्याप्रमाणे एखादे चिन्ह वा वस्तू दुसऱ्या चिन्हाशी विनिमय, देवाणघेवाण करू शकत नाही तसेच बायकांचे झाले. त्यांचा परस्परसंवाद तुटला. त्यांच्याबद्दल त्यांच्यावतीने बोलायला विविध पुरुष पुढे सरसावले. कोणाला बायका दैववादी, नैतिकदृष्ट्या दुबळ्या, स्थितिशील आणि परावलंबी दिसल्या, तर कोणाला शुद्ध, पवित्र, त्यागी, स्वार्थनिरपेक्ष दिसल्या. कोणाला त्यांमधे हिंदू सामाजिक संघटनेचा अर्क दिसला. थोडक्यात ह्या वादामधन असे दिसते की, बायका म्हणजे एक पूर्ण निराशय पोकळी होती असे मानले गेले. तीमध्ये वेगवेगळे अर्थ भरण्याचे प्रयत्न झाले. परंपरचे प्रतीक असलेली हिंदू स्त्री ह्या प्रतिमेतृून स्त्रियांच्या अस्तित्वाला सामाजिक अर्थ प्राप्त झाला.

ज्या विजयालक्ष्मीच्या निमित्ताने ताराबाई शिंदे ‘स्त्री-पुरुष तुलना’ लिहिण्यास सरसावल्या त्या विजयालक्ष्मीला भ्रूणहत्येच्या आरोपाखाली देहान्ताची शिक्षा झाला होती. व्यभिचार कर्म करून गरोदर राहिलेल्या विजयालक्ष्मीला नैतिकदृष्ट्या विकृत मानले गेले. सामाजिकदृष्ट्या हा प्रश्न ‘प्रश्न ‘ म्हणून मांडलाच गेला नाही. विजयालक्ष्मीला फशी पडणाऱ्या पुरुषाची चर्चा कोणीच केली नाही. उलट बायका ह्या मूलतः पवित्र, शुद्ध असतात असा दावा केला गेला. बायकांच्या जातीने परंपरेचा तोल सांभाळायला हवा तो येथे सांभाळला गेला नाही ह्यावर भर दिला गेला. अशा दृष्टिकोनामुळे भारतीय परंपरा नावाच्या अमूर्त संकल्पनेला शुद्धता, नैतिक बाळाचे परिमाण लाभले तरी प्रत्यक्षात बायकांच्या पदरी मात्र अतीव जबाबदारी; ‘बंदिस्तपणा’ आणि दुबळेपणा आला.

स्त्री-पुरुष तुलना लिहून ताराबाई शिंदे ह्यांनी आपण फक्त विनिमयासाठी वापरलें जाणारे चिन्ह वा प्रतीक नाही असे जाहीर केले. धगधगत्या शैलीतल्या ह्या निबंधात ताराबाईंनी काय लिहिले आहे, कसे लिहिले आहे हे पाहणे फार उद्बोधक आहे. त्यांच्या लिखाणातल्या विसंगती, दऱ्या आणि काही ठिकाणी त्यांनी स्वीकारलेले मौनही अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, ताराबाई ‘पतिव्रता’ ह्या शब्दाशी तशा भांडतच नाहीत. पण एवढे मात्र ठासून मांडतात की, “जर बायकोला नवराच देव तर वागणूकदेखील देवाप्रमाणेच पाहिजे”. ताराबाई म्हणतात, “स्त्रियांस अमर्याद मन मानेल तशी मोकळीक असावी असे अगदीच म्हणणे नाही” पण मोठ्या कुशलतेने नवराबायकोंच्या नात्यामध्ये आलेले खोटेपण उघडकीस आणतात. त्यात बायकाही कशा स्वयंकेंद्रित तयार झाल्याने ताराबाईंनी मोठ्या मिस्कील पद्धतीने जुनी पुराणे, महाकाव्यातील व्यक्तिमत्त्वे ह्यातील विसंगती कल्पकतेने टोमणे देत मांडली. मध्येच एखादा धारदार प्रश्नही उभा केला. त्या विचारतात, “या स्त्री जातीत सावित्री तरी आपले पतींचा प्राण परत आणण्याकरिता यमदरबारात जाऊन आली. पण पुरुषांमध्ये कोणीतरी आपले बायकोचे प्राणाकरिता यमराजाचे दरबारात तर नाहीच; पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे का?”
ताराबाईंच्या निबंधात त्यांनी जनमानसात रूढ असलेल्या स्त्री प्रतिमांचा समाचार घेतला आहे. हे करताना भर्तृहरीच्या श्लोकाचा आणि संत साहित्यातील स्त्रीनिंदेच्या एका ओवीचा त्या आधार घेतात. स्त्रिया म्हणजे जारण मारण यंत्र, संशय परिभ्रमाचा भोवरा, उद्धटपणाचे माहेरघर, अविचार कर्माचे नगर, सकलदोषांचे निधान, कापट्याची
(कपटीपणाची) खाण, दुर्गुणांचे उत्पत्तिस्थान, मोक्ष मार्गातील धोंड, ह्या प्रत्येक आरोपाचे खंडण करून हे सर्व दोष पुरुषांनाच कसे लागू आहेत हे ताराबाई दाखवून देतात. पण हे करताना स्त्रीपाशी देहपातळीवर एक वेगळी आमंत्रक शक्ती आहे ह्याची त्यांना जाण आहे. म्हणूनच “य:कश्चित अबलेच्या नेत्रकटाक्षानेच तुमचे सर्व शौर्य, तेज, वीरश्री गळून जाऊन लागलेच तिचे पुढे कुत्र्यासारखे पाय चाटावयास धावता?” असा झणझणीत
टोलाही त्या हाणतात.

बायका-बायकांमध्ये वेश्या-गर्ती, पवित्र-उठवळ, मायाबहिणी आणि इतर रांडा असा भेद करणाऱ्यांना ताराबाई विचारतात, “आता रांडा कोण? यांची काही सृष्टीविरहित उत्पत्ती झाली का? का ह्या कोणी दुसऱ्या देवाने केल्या? रांडा ह्या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात. स्त्रियांना तुम्ही प्रथम गोड गोड बोलून,
नादी लावून, एकदा घराबाहेर घराचा उंबरा पारखा करून काढले, म्हणजे जोवर तारुण्याचा भर असतो तोवर कसे तरी ढकलून नेता, नि मग तिचे नशीब तिचे बरोबर देऊन तिला सर्वस्वी नागवून सोडिताः तेव्हा ती हा निंद्य व्यापार अगदी उघडपणे हवा तसा करून आपलेसारखी दुसरीस करू पहाते.”

ताराबाईंच्या वाचनात त्या काळातल्या लोकप्रिय रोमँटिक कादंबऱ्याही आल्या. ‘मुक्तामाला’, ‘मंजुघोषा’, ‘मनोरमा’ नाटक आणि ‘स्त्रीचरित्र’ अशा पुस्तकांचा समाचार घेताना प्रत्येक गोष्टीत, पुस्तकात शृंगार, विनोद, शोक हे तीन गुण असल्यावाचून रस भरत नाही, हे खरे, पण ग्रंथकर्त्यांनी आपण जे काही लिहितो हे छापण्यासारखे किंवा काही काळी असे असे घडून आले होते किंवा नाही याचा आधी विचार करून मग पुढे ग्रंथ लिहावा असा शेरा मारला आहे. खरोखरीच त्या काळातील सुरुवातीच्या अद्भुतरम्य कादंबऱ्या म्हणजे त्या काळात नव्याने श्रीमंत झालेल्यांच्या चैनीसाठी, मनोरंजनासाठी लिहिलेली भारुडेच आहेत हे ताराबाईंनी कसे हेरले ह्याचे आश्चर्य वाटते.

‘स्त्री-पुरुष तुलना’ निबंधात दोनतीन गोष्टी खटकतात. एक तर “अरे, तुमचा मोठेपणा व शौर्य घरातच; जशी एखादी आंधळी म्हातारी मध्ये बसते व तिच्याभोवती पांच सहा लहान मुले खेळता खेळता एक म्हणतो, आई मी राजा झालो गं, दुसरा म्हणतो मी प्रधान, तिसरा म्हणतो मी सेनापती… आता असे राज्य करू! ही सेवा! हे दरबार! याप्रमाणे हे तर सारे मृगजळाचे लोट आहेत.” अशा कुत्सित उपेक्षेने भारतीय पुरुषांना हिणविणाऱ्या ताराबाई “तरी इंग्रज सरकारचे, ईश्वर असे सदोदित चिरकाल राज्य कायम ठेवो” अशी प्रार्थना करतात. देश बुडित अवस्थेत आला त्याचे कारण इंग्रज सरकारच आहे हे ताराबाईंना का दिसले नाही? इंग्रजांनी भारतीय पुरुषांना जी काही सोयीसवडीने सत्तास्थाने दिली ती खोटी आहेत हे जाणणाऱ्या ताराबाईंना आपल्या समाजातले पुरुषही नाडले गेले आहेत हे वास्तव का दिसू नये? दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे ताराबाईंना विधवेच्या आयुष्याची लक्तरे दिसली; पण त्यावर उपाय म्हणून वारसाहक्काचा मुद्दा मांडावासा वाटला नाही. स्वत: सुस्थित घरात जन्मल्यामुळे बायकांचे भौतिक पातळीवरचे परावलंबन त्यांना तितके टोचले नसेल, असे असण्याची शक्यता वाटते.
आणखी एक मुद्दा ह्या पुस्तकात निसटूनच गेला आहे. सर्व स्त्रियांची बाईपणाची दुखणी असतात, असे मांडताना ताराबाईंनी वेगवेगळ्या जातीत. वर्गात विशेषत: गरीब घरात बायकांचे आणखीनच होणारे कंगालीकरण विचारात घेतले नाही.

एवढे मात्र खरे की ताराबाईंचा धीट, टिपेचा सूर आजही धीर देतो. चुका करण्याचे तरी स्वातंत्र्य स्त्रियांनी घ्यावे असे जण त्या सुचवीत आहेत. आपल्या प्रस्तावनेच्या अंती त्या म्हणतात, “तेव्हा या माझ्या निबंधास लक्ष लावून वाचा किंवा याकडे अलक्ष करू नका किंवा याला काही आश्रय द्या, अशीसद्धा मी तुम्हांला विनंती वगैरे काही करणार नाही. फक्त इतकेच विचारते की, माझे म्हणणे बरोबर आहे किंवा नाही हे तुम्ही जर खरे नि:पक्षपाती असाल तर पुर्ता विचार करून यात जे काही कमीजास्त असते ते निवडा. पण येऱ्हवी आपलीच वाणी राखण्याकरिता जर पुढे घोडे ढकलाल तर नाईलाज आहे.”

विद्युत भागवत
मिळून साऱ्याजणी, ऑगस्ट १९८९