40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

द होल वुमन

डॉ. जर्मेन ग्रीअर यांचा जन्म १९३९ चा. मूळच्या ऑस्ट्रेलियन असलेल्या ग्रीअर पुढे शिक्षणानिमित्त इंग्लंडला गेल्या आणि नंतर तिथेच स्थायिक झाल्या. इंग्रजी साहित्यामध्ये (शेक्सपिअर) त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि प्राध्यापकी पेशा स्वीकारला. स्त्रियांबद्दल सखोल अभ्यास अणि नवा विचार देणारं, झोडपून काढणारं, आक्रमक लिखाण हे त्यांचं वैशिष्ट्य. १९७० साली त्यांचं ‘The Female Eunuch’ नावाचं पहिलं पुस्तक आलं. त्यानंतर तीस वर्षांनंतर आलेलं त्यांचं पुस्तक आहे The whole woman’..

स्त्रीने पुरुषाच्या बरोबरीने सर्व गोष्टी करण्याऐवजी तिने मुक्त होणं त्यांना योग्य वाटतं. एका मुलाखतीत त्यांनी ‘मुक्त स्त्री’ बद्दलची त्यांची संकल्पना स्पष्ट केली होती. शिकलेली, मिळवती, सधन स्त्री; जिला संसारात किंवा कामाच्या ठिकाणी काहीही प्रश्न नाहीत, अशी सुखी स्त्री मोलकरणीशी भाव करून कमीतकमी पैशात जास्तीतजास्त श्रम वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती स्त्री मुक्त नाही. स्त्रियांच्या पारंपरिक कामांना, श्रमांना तुच्छ लेखणारी, शोषणकर्त्या गटाचा भाग होऊन पुरुष व्यवस्था अमलात आणणारी स्त्री ‘मुक्त स्त्री’ नसते. म्हणूनच पुरुषांची बरोबरी करत एक प्रकारे स्वत:चा पुरुष करू बघणारा (काही मंडळींचा) ‘स्त्री-पुरुष समान’ धाटणीचा स्त्रीवाद त्यांना मान्य नाही. ‘आपण पुरुषांसारखं व्हावं’ अशा आत्मविन्मुख ध्येयाचा त्या स्पष्टपणे निषेध करतात.

The Whole Woman हे पुस्तक म्हणजे स्त्रीसंबंधीच्या वेगवेगळ्या निबंधांचा संग्रह आहे. कधी उपहास, कधी विनोद, कधी खोचक प्रश्न तर कधी निरुत्तर करणारी आकडेवारी देऊन हे निबंध थक्क करून सोडतात. यातच मधूनअधून चौकटीत इतर लखकांची विषयाशी संबंधित अवतरणं दिलेली आहेत. एकूण ३२ निबंधांची शरीर, मन, प्रेम आणि सत्ता अशा चार विभागांमध्ये विभागणी करून यात स्त्रीजीवनाच्या विविध अंगांवर  भाष्य केलेलं आहे. पुस्तक मुख्यत: आजच्या पाश्चिमात्य स्त्रीबद्दल असलं तरी त्यातले काही मुद्दे भारतीय परिस्थितीलाही लागू पडतात. (उदा. समान कामाला समान वेतनाचा अभाव). त्याखेरीज आपण ज्या गतीने पाश्चिमात्य समाजाचं (सोयीस्कर तेवढ्या बाबतीत) अनुकरण करत आहोत, ते बघता हे पुस्तक आपले भविष्यातले प्रश्न दाखवतं अस म्हटलं तरी चालेल. जर्मेन ग्रीअर यांचं पुस्तक वाचून पूर्ण करणं, समजणं, पचणं आणि त्यावर काही लिहिणं यातला एकेक टप्पासुद्धा अवघड आहे. हे चारही टप्पे पूर्ण  करण्याची माझ्या परीने मी शब्दश: कसरत केली आहे. मला जेवढं समजलं ते सांगण्याचा हा प्रयत्न. लेखिका आणि पुस्तकाची ओळख करून देणं, इतका मर्यादित हेतू इथे आहे.

‘प्रेम’ या विभागातल्या एकेका निबंधात प्रेमाच्या धाग्याने बांधलेल्या एकेका नात्यावर भाष्य केलेलं आहे. ‘आई’ निबंधात पाश्चिमात्य जगात मातृत्वाचा पुरेसा आदर केला जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आईपण म्हणजे बाळावर जिवापाड प्रेम करणाऱ्या सुंदर भावनेऐवजी करिअरमधला प्रश्न, सुडौल बांध्याला पारखं करणारी घटना असं चित्र झालं आहे. मुलं मोठी झाल्यावर आईबरोबर राहणं तर दुरापास्तच, वर दर आठवड्याला आईकडे जेवायला जाणाऱ्या मुलांची पण टवाळी होते. आईपण हे दिवसेंदिवस निष्काळजीपणातून येणारं, दमछाक करणारं, आर्थिक जबाबदारीचं, प्रेमाची कुठलीही परतफेड न होणारं दुःखद ठरत चाललं आहे. बाईला घरी बसून (करिअर समजून) मूल सांभाळण्याचा पर्याय खुला करण्यासाठी, अमेरिकेसारख्या देशाने गरीब देशांवर हल्ले करण्याऐवजी आयांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असा सला त्या देतात.

‘वडील’ या निबंधात वडीलपणाच्या जबाबदाऱ्या स्वीकारून पार पाडण्याऐवजी त्यापासून दूर पळणाऱ्या ‘बापां’चं वर्णन आणि आकडेवारी वाचता येते. ‘स्पर्म बँक मध्ये ‘स्पर्म दान करून कित्येक पुरुष बाप होतात आणि आपल्या वंशाची कोण, कुठं मुलं पैदा झाली आहेत याबद्दल पूर्णपणे उदासीन असतात. अशा ठिकाणी दात्याला आपलं नाव देणं सक्तीचं नसल्याने कित्येक मुलांना आपला जीवशास्त्रीय बाप माहीतच होत नाही. प्रत्यक्ष संबंधांतून मुलं निर्माण करणारे आणि त्यांची कोणतीही जबाबदारी न स्वीकारणारे बापही पुष्कळ. मुक्त लैगिक व्यवहार असणाऱ्या पाश्चात्त्य जगात कुटुंबनियोजन आणि मूल झालं तर त्याचं संगोपन ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी असते. पुरुषाला मात्र पालकत्व स्वीकारायचं की नाही, याचा पर्याय उपलब्ध असतो.

‘पत्नी’ या निबंधात विवाहावर भाष्य आहे. ‘विवाह’ ही स्त्रीची गरज आणि पुरुषाने मनाविरुद्ध स्वीकारलेलं बंधन आहे. असे संस्कार पाश्चात्य समाजात होतात. पत्नी असलेल्या स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळते. खरं तर मानसिक संतुलनाच्या अभ्यासावरून पुरुषाला संतुलन राखण्यासाठी विवाहाची जास्त गरज असल्याच सिद्ध झालं आहे. लैंगिक आकर्षण(च) लग्न करण्याचाच नव्हे, तर एकमेकांशी विवाहित राहण्याचाही पाया ठरत चालला आहे. त्यामुळे लग्न, कुटुंबव्यवस्था मोडली नाही तरच नवल. स्त्री मात्र मुलांसाठी लग्न वाचवण्याचा प्रयत्न करते आणि तरीही मोडणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचा दोष तिलाच दिला जातो. पुरुषाने बाहेर संबंध ठेवले, तरी स्त्रीला (कमतरतेचा) दोष दिला जातो.

‘कन्या’ या निबंधात सावत्र आणि कधी सख्ख्या बापाकडून लहान मुलीवर हाणारे अत्याचार (incest), त्यांची भयानक आकडेवारी, कारणमीमांसा याबद्दल लिहिलं आहे. लैगिक भुकेला प्रेमाचं नाव देण्याच्या मानसिकतेवर लेखिकेने कडक शब्दांत टीका केली आहे. ‘भगिनी’ या निबंधात सस्तन प्राण्यांमध्ये असलेला भगिनीभाव नैसर्गिक असूनही सामाजिक व्यवस्थेने कसं बाईला बाईपासून दूर ठेवलं आहे, ते लेखिका वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देते. त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांमध्ये भगिनीभाव निर्माण होण्यात आलेल्या अडचणी, माध्यमांनी त्यांना एकमेकांच्या टीकाकार म्हणून उभं करण्यात मिळवलेलं यश आणि भविष्यातील आशा यांचं विस्ताराने वर्णन केलं आहे. शोषक गटाशी सामना करणं अवघड असतं, तेव्हा एक शोषित गट दुसऱ्या शोषित गटाशीच लढून स्वत:चं अस्तित्व अधोरेखित करत राहतो.

‘एकट्या राहणाऱ्या स्त्रिया’ या निबंधात अविवाहित आणि बॉयफ्रेंड नसलेल्या स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे. मुक्त लैगिक व्यवस्थेमुळे पूर्वीच्या प्रौढ कुमारिकांना (कौमार्यामुळे) मिळणारा आदर आता एकट्या स्त्रियांना मिळत नाही. स्त्रियांचं एकटेपण हे कधीच ‘स्वत:चा निर्णय’ म्हणून स्वीकारलं गेलं नव्हतं, तर ‘यांना कुणी पसंत केलं नाही’ अशाच दृष्टीने ते बघितलं जायचं. आताच्या मुक्त व्यवस्थेतही त्याकडे ‘योग्य संधीचा अभाव’ अशा दृष्टीने बघण्याऐवजी ‘जोडी जमवण्यातली असमर्थता’ म्हणून बघितलं जातं. एकटेपणाच्या भीतीने बऱ्याच स्त्रिया आणि तरुण मुली चुकीच्या, अयोग्य पुरुषाला चिकटून राहतात. जर्मेन ग्रीअर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. ‘No sex is better than bad sex!’ लैंगिक संबंध शोधत, दुकटेपणाच्या मागे लागून निराशा, अवहेलना, धोका पदरी येऊ शकतो. त्याऐवजी एकटेपणामधल्या स्वातंत्र्याचा आनंद का उपभोगू नये?

‘स्त्रियांचं प्रेम’ या निबंधात समलिंगी लैगिकता आणि भिन्नलिंगी लैगिकता या जन्मजात (मेंदूची रचना) असतात की सामाजिक याबद्दलच्या वेगवेगळ्या अभ्यासांची माहिती दिली आहे. स्त्रीचं पुरुषावरचं असो किंवा स्त्रीचं स्त्रीवरचं असो – प्रेमाची व्याख्या दिवसेंदिवस लैंगिक आकर्षण अशी होत चालली आहे. लैंगिक संबंधांची व्याख्यासुद्धा जवळीक, सुरक्षित भावना, समाधान याऐवजी thrill अशी होते आहे. या अशा व्याख्याच पुरुषी वर्चस्वाचं द्योतक आहेत, असं लेखिकेला वाटतं.

‘शरीर’ या विभागात शारीरिक प्रश्नासंबंधी चर्चा आहे. ‘सौंदर्य’ निबंधात बाईला तिच्या नैसर्गिक रूपाबद्दल न्यूनगंड देऊन प्रसाधनाचे उत्पादक तिच्या हातातले पैसे कसे काढून घेतात, याचं वर्णन केलं आहे. पुरुषांसाठी तयार केलेल्या अश्लील खेळण्यांतून निर्माण झालेली बार्बी बाहुली लहानपणापासूनच स्त्रीच्या मनात स्त्री-शरीराबद्दल भ्रामक, फसव्या कल्पना निर्माण करते. जे नैसर्गिक स्त्रीसारखं नाही ते जास्त सुंदर, ते जास्त स्त्रीसुलभ मानलं जाण्याचा हा काळ आहे. आजीने आई आणि आईने बहीण दिसलं पाहिजे. तुम्ही कितीही कर्तबगार असलात, तरी रूप नसेल तर तुमची किंमत शून्य आहे; असं मानणाऱ्या समाजात वाढणारी स्त्री स्वत:च्या रूपावर आयुष्यभर पैसा, श्रम आणि वळ खर्च करत राहते. तरीपण कुठल्याही स्त्रीला आपल्या रूपाबद्दल आत्मविश्वास वाटत नाही आणि तसा तो वाटू नये याची व्यवस्था केली जाते. म्हणूनच एकटया ब्रिटनमध्ये स्त्रिया वर्षाला ८.९ बिलियन पौंड (८९,००० लाख पौंड) किमतीची प्रसाधनं घेतात. बायकांना वाटतं, आपण सुंदर दिसलं म्हणजे लग्न टिकेल, नवरा फसवणार नाही. हॉलिवूडची रूपसंपन्न प्रसिद्ध अभिनेत्री डेमी मूरचं उदाहरण लेखिकेने दिलं आहे. रोज चार तास व्यायाम करून, मोजका शाकाहार घेऊन स्वत:ला ‘परिपूर्ण ठेवूनही तिचं लग्न टिकू शकलं नाही.

‘पुरुषनिर्मित स्त्री’ या निबंधातून समजतं की, एकट्या ब्रिटनमध्ये वर्षाला ६५,००० कॉस्मेटिक सर्जरीज होतात. ज्या संस्कृतीत दिसायला साध्या असणाऱ्या स्त्रियांना अपमानास्पद वागणूक मिळते, तिथं या आकड्याचं नवल कसलं? पूर्वी नुसता जबड़ा किवा नाकासाठी सुरू झालेल्या या शस्त्रक्रिया आता अख्खं शरीर हवं तसं बनवून देतात. कारण नैसर्गिक गोष्टी आता सुंदर वाटत नाहीत. याच अनुषंगाने ब्रेस्ट इम्प्लान्टस् (आकार वाढविण्यासाठी), त्याचे दुष्परिणाम, आईच्या दुधावर होणारे परिणाम यांची शास्त्रीय चर्चा व आकडेवारी वाचायला मिळते. जवळजवळ सर्व कॉस्मेटिक शस्त्रक्रिया स्त्रियांवर केल्या जातात. पुरुष प्रत्येक स्त्रीच्या रूपाचं मोजमाप करतात, सुंदर बाईला झुकतं माप देतात, सामान्य रूपाच्या बाईला अवमानित करतात. बायकांनी पुरुषांच्या मतांची पर्वा करण आणि त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःला मापणं थांबवलं पाहिजे. जर बाईमध्ये पुरेसा आत्मविश्वास निर्माण झाला, तरच तिला स्वत:चं नैसर्गिक, वास्तव, एकमेवाद्वितीय रूप आवडू लागेल.

‘ब्रेस्ट्स’ या निबंधात ब्रेस्ट कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि उपचारपद्धतीची चर्चा आहे. अमेरिका वर्षाला ५५०० लाख डॉलर्स आणि ब्रिटन वर्षाला ३० लाख पौड खर्च करत असूनही ब्रेस्ट कॅन्सर आटोक्यात येत नाही. कारण त्याचं पुरेसं गांभीर्य वाटत नसल्याची टीका लेखिका करते. दुसऱ्या एका निबंधात स्रियांच्या साठीच्या चाचण्या, त्यांचा दर्जा, वैधता आणि निष्कर्ष याबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. अमेरिकन शासन वर्षाला या चाचण्यांवर ४५० कोटी डॉलर्स खर्च करतं. हा खर्च स्त्रियांसाठी की वैद्यकीय व्यावसायिकांसाठी असा धाडसी प्रश्न यात विचारला आहे…

‘आहार’ या निबंधामध्ये खाद्यपदार्थाचे अनिर्बंध व्यावसायिकीकरण, आईच्या स्वयंपाकाची घटलेली प्रतिष्ठा आणि तरीही मुलांच्या आहारविषयक वाईट सवयींचं आईच्याच माथी फोडण्यात येणार खापर, असे विषय हाताळले आहेत.

“गर्भपात’ या निबंधामध्ये गर्भपात करण्याचे निर्णयस्वातंत्र्य स्त्रीला असणं योग्यच आहे, असं लेखिका म्हणते. पण किती वेळा गर्भपात करायचा म्हणून ती तो निर्णय घेते आणि किती वेळा परिस्थितीचा रेटा हा निर्णय घेणं भाग पाडतो यावद्दल शंका उपस्थित केली आहे. श्रीमंत देशामच्ये जननदर घटत असूनही शासन गर्भवती स्त्रियांना आर्थिक मदत देत नाही. तसे झाल्यास गर्भपात हा खऱ्या अर्थान स्त्रियांचा निर्णय बनेल. ब्रिटनमध्ये ५०% गर्भधारणा नको असताना होतात, तर २०% वेळा गर्भपात केला जातो. पुरुष गमावण्याच्या भीतीने स्त्रिया पुरुषाकडून कुठल्याही नियंत्रणाची अपेक्षा करत नाहीत.

‘मनुष्यनिर्मित आई’ या निबंधात अपत्यप्राप्तीसाठी ४०-६० अशा कितीही वयात, कितीही जोखमीचे केले जाणारे उपचार वाचायला मिळतात. अतिशय महागड्या उपचारांमुळे वैद्यकीय व्यवसायाची भरभराट होते आहे. बऱ्याच बायका वेदनामय उपचार घेत राहण्याचं अग्रिदिव्य करतात, तेव्हा कुठे काहींना मातृत्वाचा आनंद मिळतो. शास्त्रज्ञांना गर्भाशयाशिवाय अपत्यनिर्मिती करण्याची स्वप्नं पडू लागली आहेत आणि पुरुषी जगात बाईपेक्षा तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढू लागलं आहे. ‘तोतया स्त्री’ या निबंधात लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून स्वत:ला स्त्री मानणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. ‘बाईपणात काही पण खास, विशेष नाही; कुणीही स्वयंघोषित बाई होऊ शकतं’ असं मानण्याला जर्मेन ग्रीअर यांचा आक्षेप आहे.

‘मन’ या विभागात काम, घरकाम, खरेदी, दुःख, सैनिक अशा विषयांवर निबंध आहेत. काम आणि घरकामाबद्दल लेखिका म्हणते की, पुरुषापेक्षा स्त्री जास्त कष्ट करते आणि तिचे बरेचसे कष्ट ‘काम’ म्हणून धरलेही जात नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा १९९५ चा अहवाल सांगतो, की जगात मोबदला न मिळणारं काम स्त्रिया वर्षाला ११ ट्रिलियन (११,००० बिलियन डॉलर) किमतीचं करतात, तर पुरुष ५ ट्रिलियन डॉलर किमतीचं. यात घरकाम, बालसंगोपन, आजारी माणसाची सेवा अशा कामांचा अंतर्भाव आहे. स्वयंपाक आणि साफ-सफाईची कामं प्रगत देशांतही ७५% वेळा महिलाच करतात. शनिवार-रविवार हे नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आठवड्याची कामं संपवण्याचे. कामाचं योग्य वेतन न मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ६२% स्त्रिया तर ३७% पुरुष आहेत. सर्वात कमी मिळकत असणाऱ्या गटात ७०% स्त्रिया आहेत, तर सर्वात जास्त मिळकतीच्या गटात फक्त १०%. एकाच प्रकारच्या नोकरीत बाईची आयुष्यभराची कमाई पुरुषापेक्षा कमी असते. उदा. इंग्लंडमध्ये स्त्री-नर्सला तिच्या आयुष्यात पुरुष-नर्सपेक्षा ५०,००० पौंड कमी मिळतात. बाईच्या मानलं गेलेल्या कामाची ही कथा, तर इतर कामाचे काय सांगावं? या फरकाचं कारण जसं समान कामाला मिळणारं कमी वेतन आहे, तसंच डावलली जाणारी बढती आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे शक्य नसलेला ओव्हरटाइम पण आहे. बायका सतत कामात असतात. नोकरीत, घरात, मुलांसाठी. काही नाही तर स्वत:च्या शरीराची निगराणी राखण्यात. तर पाश्चात्त्य पुरुष मात्र आठवड्याला सरासरी २१ तास खेळांचे सामने बघण्यात किवा प्रत्यक्ष खेळण्यात घालवतात. नुसतं कामच काम आणि खेळाच्या अभावामुळे बायका कुटुंबात ‘बावळट’ ठरत असल्या, तरी बिनकामाचे खेळ एके खेळ करणारे पुरुष कुटुंबात ‘अनावश्यक ठरत जाण्याचा खणखणीत इशारा लेखिकेने दिला आहे.

‘खरेदी’ या निबंधात आनंद, मनोरंजन या नावाखाली लहानपणापासूनच खरेदी करणं स्त्रियांच्या कसं माथी मारण्यात येतं त्याचं विश्लेषण आहे. ८०% माल स्त्रिया खरेंदी करतात. कंटाळवाणं, थकवणारं शॉपिंग दर आठवड्याला ३-४ तास सहज खातं. संगणक, सीडी, पेट्रोल अशा वस्तु पुरुष ‘विकत’ घेतात. बायका मात्र गरजेच्या वस्तूंसाठी योग्य भाव, कुठे चांगलं मिळेल याचा शोध घेणारी वेळखाऊ, दमवणारी ‘खरेदी’ करतात. घरकाम जसं हातातला सगळा वेळ गिळून टाकतं, तशाच या रोजच्या गरजेच्या खरेद्या हातातला सगळा पैसा गिळून टाकतात. घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठीच्या याद्या संपतच नाहीत.

लैंगिक संबंधांवरच्या निबंधात पुरुषांचा शृंगाराच्या काल्पनिक दुनियेतील वावर आणि त्याची साधनं यांची माहिती दिली आहे. अश्लील इंटरनेट साइटस्, व्हिडिओ कॅसेट्स, मासिकं आणि त्यांच्या खपांचे आकडे भयानक आहेत. बायका किंवा गर्लफ्रेंड्सनी एकतर पुरुषांच्या लैंगिक कल्पनांना तोंड देऊन पुरे पडायचं किंवा स्वत:ची ओळख हरवून त्या कल्पनेतल्या मुलीचं रूप स्वीकारायचं एवढेच पर्याय उरतात. या संबंधांचं स्वरूप हे आनंदाऐवजी सादरीकरण (performance) असं होत चाललं आहे.

‘दु:ख’ या निबंधात दु:खाची खालावलेली प्रतिष्ठा वाचता येते. दु:खी असणं म्हणजे पराभूत, निरुपयोगी असणं असा समज पसरत चालला आहे. ‘नैराश्य’ (depression) या नावाखाली दुःखीपणावर उपचार करण्याचे व्यवसाय थाटले जातात, अशी टीका लेखिका करते. स्त्रियांनी आपल्या दुःखाची प्रतिष्ठा राखली तर दु:खातून मिळणाऱ्या शक्तीने गगनाला गवसणी घालता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.’सैनिक’ निबंधात सैन्यातील स्त्रियांचे प्रश्न मांडले आहेत. दुय्यम नागरिकत्व नको असेल तर देशाचं रक्षण करण्याची तयारी हवी, या अर्थाने स्त्रियांचं सैनिक असणं योग्यच वाटतं. परंतु सैन्यातील स्त्रियांवर पुरुष सहकाऱ्यांकडून होणारे लैंगिक अत्याचार, छळ यांची माहिती अंगावर शहारे उभे करते. स्त्रिया स्वेच्छेने सैन्यात जातात असं वरकरणी दिसत असलं, तरी निम्नवर्गातल्या स्त्रियांपुढे नोकऱ्यांचे असलेले पर्याय, बेकारी आणि सैन्यातील चांगला पगार या सगळ्याचा तो परिपाक आहे.

‘सत्ता’ या विभागात भय, स्त्रीशक्ती, समता, मुक्ती यांसारखे विषय हाताळले आहेत: ‘भय’ निबंधात खियांवरचे अत्याचार, त्यांचे खून यांची वेगवेगळ्या देशातली आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी सांगते, की खियांना सगळ्यात जास्त धोका हा अनोळखी परुषांकडून नाही, तर माहितीतल्या पुरुषांकडून असतो. लैगिक अत्याचार हा स्त्रीचा अपमान, अवहेलना करण्याच्या उद्देशाने केलेला असतो; म्हणून त्यातून अपमान किवा अवहेलना होते अअसं नाही. अत्याचार करणाऱ्याचा दृष्टिकोन अत्याचारित व्यक्तीने का बरं स्वीकारावा? आपण जर स्वत:ची ‘नैसर्गिक बळी’ (natural born victim) अशी प्रतिमा नाकारली, तर अत्याचारी पुरुषाचीसुद्धा स्वत:च्या अवयवांकडे शस्त्र म्हणून बघण्याची भूमिका मोडीत निघणार आहे!

‘पुरुषीकरण’ या निबंधात पौरुषत्वाचं खूळ जोपासण्यासाठी आणि वाढवण्यासाठी येणारी पुरुषांची औषधं आणि नवनव्या शस्त्रक्रियांची माहिती दिली आहे. पुरुषीपणाच्या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडण्यासाठी मुक्तीच्या दिशेने पुरुषांनी पहिले पाऊलही अजून टाकलेलं नाही, याबद्दल लेखिकेने खेद व्यक्त केला आह. तर ‘पुरुषपण’ या निबंधात पुरुष लिंगभाव (gender) माणज काय, तो कसा शिकवला जातो याबद्दल वाचायला मिळतं. पुरुष लिंगभाव हा सांस्कृतिक असून ती एक क्लिष्ट व्यवस्था आहे असं लेखिका सांगते. आई तान्ह्या बाळाचा मुलगा करते, परंतु मुलाचा पुरुष घडविण्याचं काम मात्र आजूबाजूचे पुरुष करत असतात.

‘स्त्रीशक्ती’ या निबंधात pre-teen (१३ हून लहान) आणि teen वयाच्या मुलींसाठी निघणारी मासिकं आणि टीव्ही कार्यक्रम याबद्दल धक्कादायक माहिती वाचायला मिळते. ‘कला, क्रीडा, संगीत, शिक्षण हे सगळं निरर्थक आहे; कारण त्यातून तुम्हाला पुरुष होणे साध्य होत नाही,’ अशा प्रकारची शिकवण ही मासिकं देतात. कपडे, मेकअप आणि मुलगे याखेरीज मुलींना वेगळं काही जग नसल्याचं चित्र अशा उत्तान, हीन दर्जाच्या मासिका-कार्यक्रमांतून निर्माण केलं जातं. बाईची लैगिकता नाकारणं जसं गैर आहे, तितकंच गैर तिला लैगिक वस्तू मानणं नाही का? अशा साहित्यातून लहान वयातच तिला सांगितलं जातं की, अवहेलना पत्करावी लागली तरी चालेल, पण कुणीतरी (आणि कुणीही!) पुरुष मिळवत राहिलं पाहिजे. ‘द्वेष’ नावाच्या निबंधात लेखिका सांगते, की घरातली मारहाण, बॉयफ्रेंड्सकडून होणारे अत्याचार, छळ यांचं मुख्य कारण म्हणजे पुरुष हे सगळं द्वेषापोटी नाही तर प्रेमापोटी करतो आहे असा भ्रम. जोपर्यंत स्त्रिया या भ्रमातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत पोलीस आणि कायदे अपुरेच पडत राहणार आहेत.

‘समता’ या लेखात समता आणि समानता यातली सीमारेषा ठरवणं अवघडच नाही तर अशक्य असल्याचं मत जर्मेन ग्रीअर मांडतात. ‘स्त्री-पुरुष समता’ या मार्गाला आक्षेप घेताना त्या म्हणतात, “हा मार्ग म्हणजे पुरुषसत्ताक पद्धतीने निर्माण केलेलं पुरुषी जग ‘जैसे थे’ ठेवायचं आणि अशा जगात स्वत:ला पुरुषाच्या साच्यात बसवण्याची स्वप्नं बाईला बहाल करायची.” पारंपरिकदृष्ट्या पुरुषांच्या ठरलेल्या व्यवसायात बाईला रोज झगडावं लागतं. यशस्वी व्हायचं असेल तर पुरुषांहूनही जास्त पुरुषी वागावं लागतं. म्हणूनच मागरिट थॅचरच्या मंत्रिमंडळात ‘त्या’ एकट्याच पुरुष आहेत, असं म्हटलं जायचं. स्त्रियांनी झगडून झगडून पुरुषसत्ताक पद्धतीत दाखल होण्याचं ध्येय ठेवलं, तर भविष्य भयानक असेल. म्हणूनच मुक्त होणं आवश्यक आहे.

“मुक्ती’ हा या पुस्तकातला शेवटचा निबंध. लेखिका सांगते, ‘स्वातंत्र्य म्हणजे स्त्रीत्वातून मुक्ती, बाईपण हरवून टाकणं नाही. स्त्री-शरीर ही आपली अडचण नसून सामर्थ्य आणि सामर्थ्याचं उगमस्थान आहे. आपलं स्त्रीपण ही आपली मर्यादा नसून, इतरांची स्त्रीपणाकडे बघण्याची दृष्टी ही आपली मर्यादा आहे.’ बाई म्हणून होणारा अन्याय दूर करणं आणि बाईपणच दूर करणं यातला फरक जेव्हा कळत नाही, तेव्हा खरा गोधळ निर्माण होतो. स्त्री-चळवळीचा पुढचा टप्पा अजून खूप दूर आहे. स्त्रीवादी कार्यकर्त्यांमधले तात्त्विक संघर्ष म्हणूनच स्त्रीशक्तीचं आवश्यक, पण प्राथमिक रूप आहे. खरी खीशक्ती अशा शोषित, पीडित स्त्रियांमधून उदयाला येईल, की ज्यांच्याकडे गमावण्यासारख काही शिल्लक उरलेलं नाही – nothing to lose.

 

प्राजक्ता महाजन

(मिळून साऱ्याजणी, मार्च २००४)