40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

नियतकालिक पत्रकारितेचे विद्याताई मॉडेल

एक विद्याशाखा म्हणून पत्रकारितेचा अभ्यास करताना राजा राममोहन रॉय, टिळक, आगरकर, गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा सखोल विचार केला जातो. ते सगळे समाजसुधारक, राजकीय नेते म्हणून जसे सर्वपरिचित होते, तसेच ते पत्रकार म्हणूनही ओळखले जायचे. पण आज पत्रकार म्हणल्यावर जी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते तसे ते अर्थातच नव्हते. ते सगळे पत्र-कार म्हणजे एक मुद्रित पत्र-प्रकाशन-तयार करणारे, त्याला दिशा देणारे होते. अनेक जुन्या लेखांत, पुस्तकांत अशा प्रकाशनांचा उल्लेख ‘वर्तमानपत्रे’ असा न करता, केवळ ‘पत्रे’ असा केलेला आढळतो. संपादक, लेखक या भूमिकांतून या सामाजिक-राजकीय नेत्यांनी त्या पत्रांना आकार, दिशा दिली होती. त्या सर्वांनी आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर अनेकांनी मुद्रित प्रकाशने हे एक प्रभावी साधन म्हणून वापरले. आज जरी आपण ‘दर्पण’, ‘काळ’, ‘सुधारक’, ‘केसरी’ अशा जुन्या मराठी प्रकाशनांचा उल्लेख वर्तमानपत्र- न्यूजपेपर- म्हणजे बातमी देणारे प्रकाशन या अर्थाने करत असलो असलो तरी ती जेव्हा सुरू झाली तेव्हा ती प्रामुख्याने विचारपत्रे, मतपत्रे – व्ह्यूजपेपर होती. महात्मा गांधींनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ या पत्रात १९२५ साली त्यांच्या पत्रकारितेचा उद्देश स्पष्ट केला होता. ‘पत्रकारिता करण्यासाठी म्हणून मी हे पत्र सुरू केलेले नाही, तर सत्याग्रहाची संकल्पना सर्वदूर पोचवण्यासाठीचे उत्तम साधन म्हणून मी ते वापरणार आहे’. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या दोन पत्रांची स्थापना जातीभेदाकडे लक्ष वळवणे, राजकीय भूमिका स्पष्ट करणे यांसाठी केली होती. अशा प्रकारच्या पत्रांत बातम्या नसत असे नाही, परंतु मुख्य भर तेव्हाच्या चालू घडामोडी किंवा प्रथा-परंपरा यांच्या अनुषंगाने काही विचार मांडणे आणि समाजाच्या धारणा व वर्तन यांत बदल घडवून आणणे यावर असे.

आज ज्या प्रकारच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांत पाहतो तेवढ्या, त्या प्रकारच्या आणि त्या स्वरूपातील बातम्या तेव्हाच्या वर्तमानपत्रांत नसत, कारण वार्तासंकलनाची, त्या प्रकाशनापर्यंत पोचवण्याची साधने मर्यादित होती. सर्व मजकूर जुळवून वर्तमानपत्र छापून ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी बराच काळ लागायचा. त्या त्या शहरात ते लगेच मिळाले, तरी लांबच्या ठिकाणांपर्यंत पोचायला आणखी काळ लागायचा. तरीही जेव्हा ते वर्तमानपत्र हाती पडेल, तेव्हा ते वाचनीय ठरायचे ते त्यांतील लेखांमुळे, विविध विषयांच्या चर्चा, चिकित्सांमुळे. परंतु साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण आणि पत्रांचे सार्वजनिक वाचन, किंवा एक-दुसर्‍याकडून प्रत घेऊन ते वाचणे हा मुख्य प्रघात होता. ‘केसरी’तील अग्रलेखांचे असे सार्वजनिक वाचन व्हायचे असे ऐकिवात आहे. त्यामुळे पत्र विकत घेऊन वाचणार्‍यांची संख्या अगदी कमी होती.

मुळात या पत्रकर्त्यांना कायमस्वरूपी आर्थिक पाठबळाची शाश्वती नसे, त्यातून वर्गणी किंवा, पत्राच्या विक्रीद्वारे अगदी तुटपुंजे उत्पन्न मिळत असे आणि जाहिराती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होण्याचा तो जमाना नव्हता. त्यामुळे पत्र दररोज, म्हणजे दैनिक म्हणून प्रसिद्ध करणे अनेकांना शक्य नव्हते. त्यामुळे अनेक पत्रे आठवड्यातून एकदा, किंवा दोनदाच प्रकाशित होत असत. ‘ज्ञानप्रकाश’, ‘केसरी’ यांच्यासारखी काही मोजकीच पत्रे नंतर दैनिकांत परिवर्तित झाली. आर्थिक गणिते न जुळल्याने अनेक प्रकाशने बंद पडली.

१९३२ साली स्थापन झालेल्या ‘सकाळ’ वृत्तपत्राने प्रामुख्याने बातम्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. अमेरिकेतून पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेऊन आलेल्या ना. भि. परूळेकरांना सर्वसामान्य वाचकाला वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावायची होती. त्या पद्धतीने बातम्या दिल्या जाऊ लागल्या. बाजारभावांसारख्या सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या बातम्या हे ‘सकाळ’चे वैशिष्ट्य बनले, असा उल्लेख हमखास सकाळच्या यशाची चर्चा होते तेव्हा केला जातो. इतर अनेक वर्तमानपत्रांचे स्वरूपही त्यानंतर बदलत गेले.

स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत बदल देशातील इतर भाषांतील पत्रकारितेप्रमाणेच मराठीतील पत्रकारितेनेदेखील पाहिले. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक स्थित्यंतराचा परिणाम या क्षेत्रावरदेखील होणे अपरिहार्य होते.

सध्या पत्रकारितेचा मुख्य संबंध बातमीदारीशी जोडला गेला आहे. घटना झाल्या झाल्या, घटना घडत असताना, घटना घडलेली नसतानासुद्धा बातमी देणारी, जीवघेणी स्पर्धा असलेली पत्रकारिता. टीव्ही आणि डिजिटल माध्यमांसारख्या घडीघडी बातम्या देणार्‍या माध्यमांशी स्पर्धा करताना वर्तमानपत्रांना वेगवेगळे मार्ग हाताळावे लागत आहेत. बातमी तर आधी कळलेली आहेच, मग नवीन काय द्यायचे? तर बातम्यांचे विश्लेषण, पुढे काय होऊ शकते त्याचा वेध. पण हे सगळे ताबडतोब, तात्कालिक व वरवरचे असते. संपादकीय पानांवरील अग्रलेख, मुख्य लेख, सदरे इ. माहितीपूर्ण, विश्लेषक, वितारप्रवर्तक असली तरी रोजच्या रगाड्यात वर्तमानपत्रांच्या वाचकांना ती वाचण्यात रस असतो का, आणि असला तरी ती वाचायला सवड मिळते का या प्रश्नाचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नाही. आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी होते, त्यामुळे असे लेखन लगेच विस्मृतीत जाते.

त्यातून वर्तमानपत्रे खर्‍या अर्थाने जनसंचार माध्यमे असतात. म्हणजे त्यांचा वाचकवर्ग संमिश्र, बहुविध, भिन्न कारणांसाठी वर्तमानपत्र वाचणारा असतो. नेमक्या कोणत्या वाचकाला समोर ठेवून विचारप्रवर्तक आशय सादर करायचा हे ठरवणे अवघड असते. एका गटावर लक्ष केंद्रित करावे तर दुसरा गट दुरावेल या भीतीने घरातील प्रत्येकासाठी काहीतरी असे धोरण ठेवून आशयाचे नियोजन करावे लागते, आणि ते ताज्या घटनांशी निगडीतच असावे लागते. किंवा जाहिरातदारांना ज्या ग्रााहक वर्गापर्यंत पोचायचे आहे त्याच ग्रााहकवर्गाला आकर्षित करणारा आशय द्यावा लागतो. कारण सध्याच्या काळात वर्तमानपत्रे वाचकांना त्यांचे उत्पादन विकत नाहीत तर जाहिरातदारांना वाचक (ग्राहक) विकतात हे सिद्ध झालेले आहे. तसे न करणारी वर्तमानपत्रे फार काळ टिकू शकत नाहीत किंवा ज्यांच्यामागे अन्य व्यवसायांतून मिळणारे भरभक्कम आर्थिक पाठबळ आहे तीच टिकू शकतात. हे एक सार्वत्रिक चित्र आहे. त्यात कधीकधी, कुठेकुठे थोडीफार वेगळी चमक दाखवणारी वर्तमानपत्रे आहेत नाही असे नाही. परंतु मोठ्या खपाच्या आणि त्यामुळे सर्वाधिक लोकांपर्यंत पोचू शकणार्‍या वर्तमानपत्रांची स्थिती कमीअधिक प्रमाणात अशीच आहे.

अशा परिस्थितीत नियतकालिक पत्रकारिता अधिक दीर्घकालीन परिणाम घडवणारी ठरू शकते, आणि मराठीतील अनेक नियतकालिकांनी ते करून दाखवले आहे. त्या दृष्टीने वर उल्लेखलेल्या समाजधुरीणांनी ज्या प्रकारे मुद्रितमाध्यमांचा वापर करून घेतला त्या प्रकारचे काम काही मराठी नियतकालिके आजही करत आहेत.

साधना, माणूस, सोबत, किर्लोस्कर, मनोहर, स्त्री, लोकप्रभा, सत्याग्रही विचारधारा, सुगावा, परिवर्तनाचा वाटसरू, बायजा, अनुभव, आंदोलन आणि मिळून सार्‍याजणी अशा नियतकालिकांची त्यात नावे घ्यावी लागतील. या नियतकालिकांचे संपादक यदुनाथ थत्ते, नरेंद्र दाभोळकर, श्री. ग. माजगावकर, ग. वा. बेहेरे, मुकुंदराव किर्लोस्कर, कुमार सप्तर्षी, शांताबाई किर्लोस्कर, आणि अर्थातच विद्या बाळ यांना पत्रकारितेच्या क्षेत्रात मानाचे स्थान होते, अजूनही आहे.

नियतकालिकांचा खप किंवा पोहोच वर्तमानपत्रंपेक्षा कमी असली तरी नियतकालिके सवडीने वाचली जातात, त्यामुळे वाचकांची ग्रहणक्षमता अधिक चांगली असते असे सिद्ध झाले आहे. नियतकालिकांमधील लेखन अधिक साक्षेपी, सखोल अभ्यासातून करण्याला वाव असतो, वर्तमानपत्रांप्रमाणे सर्वसमावेशक आशय देण्याचे बंधन त्यांच्यावर असत नाही. विशिष्ट विषयावर किंवा विशिष्ट ग्रााहकवर्गावर लक्ष केंद्रित करणे नियतकालिकांना शक्य असते, किंबहुना त्यांच्याकडून वाचकांची तीच अपेक्षा असते. वाचक ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी नियतकालिके वाचत नाहीत, तर बातम्यांतून मिळणार्‍या माहितीच्या पलीकडे जाणार्‍या, जीवनाचा पैस विस्तारणार्‍या आशयाच्या ओढीने वाचक अशा नियतकालिकांकडे वळतात.

पण असे, जाणीवपूर्वक वैचारिक खाद्याकडे वळणारे वाचक मोजकेच असतात. एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण नगण्य म्हणावे असे आहे. त्यांच्या पाठबळावर नियतकालिके चालवणे मोठे आव्हान आहे. मर्यादित वाचकसंख्या म्हणजे मर्यादित जाहिराती हे तर ओघानेच आले. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्याच अडचणींचा सामना आजची नियतकालिके करत आहेत. त्यामुळे ‘माणूस’सारखे दर्जेदार नियतकालिकदेखील बंद करावे लागले. अशा परिस्थितीत विद्या बाळ यांचे मोठेपण प्रकर्षाने अधोरेखित होते.

कोणतेही पाठबळ नसताना, आता ‘क्राउड फंडिंग’ म्हणून जी पद्धत बरीच रूढ झाली आहे, तिचा अवलंब १९८९ साली करून त्यांनी ‘मिळून सार्‍याजणी’ या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली, आणि तीस वर्षे ते यशस्वीपणे चालवले. या यशस्वितेचे मापदंड कोणते? एकतर ते तीस वर्षे अव्याहत चालू आहे, स्त्रीपुरूष समानतेचा विचार रूजवण्याच्या हेतूने जी जी कामे चालू असतील त्यांचा उल्लेख करताना ‘मिसा’चा उल्लेख नक्की होतो, आणि नियतकालिकाने दिलेल्या विचारांमुळे आमच्यात बदल झाला असे म्हणणारे वाचक भेटतात. त्याचे श्रेय संपादक म्हणून विद्याताईंनी ‘मिसा’ला जी दिशा दिली त्याला जाते.

विद्याताई स्वतःला लेखक कमी आणि संपादक जास्त मानत असत. स्वतः लिहितानासुद्धा त्या संपादकाच्या भूमिकेतून लिहीत असत. त्यामुळेच ‘स्त्री’ मासिकात काम करत असतानाच त्यांना आपल्या कथालेखनाला मर्यादा आहेत, याची जाणीव झाली. ती प्रांजळपणे स्वीकारून मग त्या अवतीभवतीचे जग आपल्या लेखनातून टिपायला लागल्या. ती त्यांच्या पत्रकारी लेखनाची सुरुवात होती, असे म्हणायला हरकत नाही. पत्रकारितेत ‘फीचर रायटिंग’ हा महत्त्वाचा भाग असतो. मुलाखती घेणे हा त्यांच्या कामाचा एक भाग होता. पण त्या मुलाखती रूक्ष प्रश्न-उत्तर अशा स्वरूपात लिहायला त्यांना आवडत नसे. निवेदनात्मक लेख असे रूप त्या मुलाखतींना मिळत असे.

आपल्याला जे समजते, जाणवते किंवा प्रश्नांकित करते ते इतरांशी बोलावे या आंतरिक ऊर्मीतून त्यांचे लेखन होते असे. बहुधा त्यामुळेच वाचकांना ते जवळचे वाटत असे. नाहीतर संपादक म्हणजे इतरांपेक्षा चार अंगुळे वर असलेला, त्यांच्यापेक्षा जास्त कळत असलेला असतो असे काही संपादकांना किंवा वाचकांनाही वाटते. पण आपण तशा नाही, आणि वाचकांना खूप जास्त कळते ही विद्याताईंना कळलेली, त्यांनी आचरणात आणलेली आणि आजच्या सर्व तरुण पत्रकारांनी लक्षात ठेवावी, अशी गोष्ट आहे. विद्याताई एखाद्या वाचकाच्या पत्राला प्रतिसाद म्हणून त्यांचा संवाद नावाचा स्तंभ लिहायच्या. त्यातून इतर वाचकांशी संवाद साधला जायचा. डिजिटल माध्यमांच्या जमान्यात आपण संवादी- इंटरअ‍ॅक्टिव्ह- शैलीचा उदोउदो करतो, पण मुद्रित माध्यम एकतर्फी असूनही त्यांना त्यातून संवाद साधणे जमले होते.
‘पोटासाठी म्हणून पत्रकारितेत आले; पण त्या उद्योगाने मला आयुष्यभराची बांधीलकी दिली’ असे ज्या व्यक्तीला वाटत असे त्या व्यक्तीची पत्रकारिता कोणत्या उंचीवर जाऊ शकते हे आपण समजू शकतो. ‘स्त्री’ मासिकात नोकर म्हणून काम करणे आणि ‘मिसा’मध्ये विश्वस्त आणि संपादक म्हणून काम करणे या दोन्हींतील फरक त्यांना नेमका समजला होता. ‘स्त्री’बरोबर आपण वाढलो, ती संधी इतरांनाही मिळाली पाहिजे, कार्यकर्ता आणि पत्रकार या दोन भूमिकांची सांगड घालण्याचा उत्तम मार्ग विद्याताईंना दिसला आणि त्यांनी तो शक्य करून दाखवला हे महत्त्वाचे.
पत्रकारांनी बातम्या आणि लेख लिहावेत, संस्थेच्या आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाबी इतरांनी सांभाळाव्यात असे पूर्वी मानले जायचे. पण आता मात्र पत्रकारांना व्यवस्थापनदेखील कळले पाहिजे असे म्हटले जाते. विद्याताईंनी ती भूमिकाही समर्थपणे सांभाळली. नियतकालिकाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी असंख्य नवनवीन योजना त्यांनी आखल्या. वाचकांच्या, हितचिंतकांच्या सहकार्याचे वेगळे भांडवल त्यांनी उभारले. पण त्याच वेळी मिळालेला पैसा काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे वापरण्याचे आव्हानही त्यांनी समर्थपणे सांभाळले.

म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला ज्या महामानवांच्या पत्रकारितेचा मी उल्लेख केला त्यांच्याच पंक्तीत विद्याताईंनाही बसवताना मला अजिबात संकोच वाटत नाही. किंबहुना अशा एका पत्रकाराची कारकीर्द मी प्रत्यक्ष अनुभवली, हे मी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अभिमानाने सांगू शकते.

उज्ज्वला बर्वे
ujjwalabarve@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी : मिळून साऱ्याजणी, जानेवारी २०२१)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *