“स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी”
तुम्हा -आम्हाला हवाहवासा वाटणारा एक जीवनावश्यक झरा म्हणजेच ‘मिळून साऱ्याजणी ‘ हे मासिक. कथा, कविता, विचारप्रवर्तक आणि ललित लेख आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जीवनाचा अर्थ शोधताना आलेल्या आणि घेतलेल्या अनुभवांची आत्मकथनं – हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवणारा एक जिवंत झरा तुम्हाला या मासिकात भेटेल याचा विश्वास वाटतो.
‘मिळून साऱ्याजणी ‘ चा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला. हे मासिक मुख्यतः स्त्रियांसाठी हे तर खरंच तरीपण हे ‘त्या’ अर्थानं बायकी नाही. सुजाण आणि संवेदनशील पुरुषांनाही हे वाचायला नक्की आवडेल याची खात्री आहे.
या ‘साऱ्याजणी’ कोण माहित आहे? वयानुसार होणाऱ्या नैसर्गिक वाढीबरोबरच स्वतःच्या विकासासाठी जाणीवपूर्वक जगणाऱ्या साऱ्याजणी. बाईपण स्वीकारून त्यात अडकून न पडता, त्याचा बाऊ न करता, बाईपणाला सहज ओलांडू बघणाऱ्या, पुरुषांनाही बरोबर घेऊन जाणाऱ्या साऱ्याजणी. तसंच हे नवेपण आपलंसं करू इच्छिणारी सारी तरुण मनं.
या साऱ्यांशी संवाद करणारं, त्यांना बोलकं करणारं, काळोखात चाचपडताना खंबीर हात देणारं असं हे एक अगदी वेगळंच मासिक.
या मासिकाच्या पाठीशी कुण्या एका व्यक्तीची किंवा संस्थेची एकरकमी ताकद उभी नाही. आपण सर्वानी मिळून ती उभी करायची आहे, वाचक, लेखक, संपादक यांच्यात एक नवं नातं निर्माण व्हावं, या नात्यातून आपुलकीचं, अधिकाराचं, जबाबदारीचं भान निर्माण व्हावं आणि त्यातूनच ‘मिळून साऱ्याजणी’ हे नाव सार्थ व्हावं! पाण्यावरचा वर्तुळाकार तरंग पसरत मोठा होत होत एवढा मोठा होतो की शेवटी त्या पाण्याचाच एक भाग बनतो. तुम्ही, तुमचं वर्तुळ, त्या वर्तुळातल्यांचं वर्तुळ असं करत करत मूळ धरीत जाणारं हे मासिक. म्हणून तर यासाठी जाहिरात/ वर्गणी/ देणगी स्वतः देऊन आणि मिळून देऊन तुम्ही आपला हातभार लावू शकाल. तो लावावा हि विनंती करण्यासाठीच ही माहिती.
संपादक
विद्या बाळ
डॉ. गीताली वि. मं.