40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

प्रोफेसर जयंत नारळीकर, आयुका आणि आठवणी

मराठी मनाला अभिमान वाटेल अशी जी नावं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ विज्ञानकथा लेखक आणि विज्ञानप्रसाराला आपलं आयुष्य वाहून घेणारे डॉ. नारळीकर यांचा १९ जुलै हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वीय सहायक म्हणून काम केलेल्या कल्याणी गाडगीळ यांचा डॉक्टर नारळीकर, आयुका आणि त्यांचं वास्तव्य असलेली’ आकाशगंगा’ सोसायटी यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.


आयुका (Inter University Centre for Astronomy and Astrophysics), पुणे यांच्या जाहिरातीला उत्तर दिल्यावर माझा रीतसर इंटरव्ह्यू होऊन मला एक्झेक्युटिव्ह सेक्रेटरी टू द डिरेक्टर अँड पब्लिक रिलेशन्स ऑफिसर’ अशी नोकरी मिळाली. ही गोष्ट डिसेंबर १९८९ मधली. आयुकाचे डिरेक्टर होते प्रोफेसर जयंत नारळीकर. त्यांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून काम करणं ही फारच मोठी संधी होती आणि तेवढीच मोठी जबाबदारीसुद्धा.

आम्ही प्रोफेसर नारळीकरांचा उल्लेख नेहमी ‘सर’ म्हणूनच करत असू. या लेखातही त्यांचा उल्लेख ‘सर’ असाच केला जाईल. मला त्यांच्याबरोबर काम करण्याचं प्रचंड दडपण आलं होतं. त्यांचं नावच इतकं मोठं होतं की त्यांच्याशी बोलायचीसुद्धा भीती वाटे. पण सरांच्या अत्यंत साध्या वागण्याने ती भीती लगेचच दूर झाली. मात्र त्यांच्या शिस्तीच्या बारकाव्यांनी कायम सतर्क व दक्ष राहण्याची सवय जडवून घ्यावी लागली.

ते ऑफिसला वेळेच्या आधी दहा मिनिटे पोचणार म्हणजे पोचणारच. घरचं, मुलीचं सगळं आवरून निघणं, मग मित्रमंडळ कॉलनी ते पुणे विद्यापीठातील आयुकाचं ऑफिस दुचाकीवरून, पुण्यातल्या गर्दीचा सामना करत गाठणं, यात माझी चांगलीच धावपळ होई. पण थोड्याच दिवसात त्याचीही सवय झाली. आलेली मेल, पत्रं उघडून त्यांच्या कचेरीत गेलं गेले की ते भराभर त्यावरून नजर टाकीत. मग पत्रांच्या उत्तरांचं डिक्टेशन सुरू होई. उगाच घाई गडबडीने किंवा भराभर डिक्टेशन देण्याची त्यांना सवय नव्हती. शिवाय डिक्टेशन देताना महत्त्वाच्या आणि इतर बारीकसारीक, आनुषंगिक  गोष्टीही ते न विसरता सांगत. उदा. ‘या पत्रातील ‘जोशी’ त्यांच्या नांवाचं स्पेलिंग Joshi असं न करता Joshee असं करतात. किंवा एकदा प्रोफेसर पार्टरिज यांना पत्र लिहिताना Partridge म्हणजे तीतर पक्षी ही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शक्यतो चुका न होण्याची खबरदारी मीही घ्यायला शिकले. इंग्रजी, मराठी व संस्कृत या भाषांवर त्यांचं चांगलंच प्रभुत्व होतं. त्यांना संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे हे ऐकून मला भलतंच आश्चर्य वाटलं होतं. एखाद्या विषयावर – मग तो कितीही मोठा, शास्त्रीय अभ्यासासंबंधी असो, ते जेव्हा बोलत तेव्हा ते व्याख्यान मराठीत असेल तर संपूर्ण मराठीत असे. एखादाच इंग्रजी शब्द किंवा संज्ञा ते वापरत. केवळ लोकांना समजावून देण्यासाठी.

डिक्टेशन झालं की त्यांना त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम सांगितला जाई. म्हणजे कुठे, कसली मीटिंग आहे, कोण किती वाजता भेटायला येणार आहे, त्यांचं लेक्चर कुठे व किती वाजता आहे, इ. यातील प्रत्येक गोष्ट अगदी वेळेबरहुकूम होण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. नंतर त्यांचे काम ते करीत व मला माझं काम करायला वेळ मिळे. त्यातून फोन येत असत, भेटायला लोक येत असत, वेगवेगळ्या मीटिंग्ज असत. दिवस कसा संपे त्याचा पत्ताच लागत नसे. त्यावेळी आयुकाची स्वतःची इमारत बांधून व्हायची होती. तेही एक मोठंच काम चालू होतं. पण या सगळ्या भरगच्च दैनंदिनीत सर अक्षरश: एक सेकंदही वाया घालवत नसत. त्यांनी कधी चुकूनही ‘ओव्हरटाइम’ केलेला मी पहिला नाही.

वेळेच्या नियोजनासंबंधीचा त्यांचा  एक किस्सा मला अजून आठवतो. सरांकडे दुसऱ्या विद्यापीठातले एक प्रोफेसर भेटायला आले होते. सरांना त्यांच्याशी बोलताना एका पुस्तकाचा संदर्भ द्यायचा होता म्हणून त्यांनी एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) या शेजारीच असलेल्या इमारतीतील आमच्या ग्रंथपालांना ते पुस्तक पाठवायला सांगितलं. बराच वेळ झाला तरी कोणीच येईना. शेवटी सर त्यांच्या कचेरीबाहेर येऊन उभे राहिले. लायब्ररीतील कुमार नांवाचा मुलगा धावत धावत पुस्तक घेऊन आला. “काय रे, पुस्तक आणायला एवढयाशा अंतराला इतका वेळ लागतो? हे पुस्तक घेऊन जा. ग्रंथपालांना त्यांच्या जागेवरून इथे यायला किती वेळ लागतो ते मी मोजणार आहे.” ते घड्याळ हातात धरून वेळ मोजू लागले. थोड्याच वेळात ग्रंथपाल प्रमिला मालेगावकर ते पुस्तक हातात घेऊन आल्या. “येण्याचा वेळ फक्त तीन मिनिटे होता. मग मला हे पुस्तक मिळायला पंधराच्यावर मिनिटं कां थांबावं लागलं? ”  त्यांनी प्रमिला मॅडमला प्रश्न केला. त्यांनी जरी कुमारला ते पुस्तक कुठे आहे हे सांगितलं होतं तरी त्याला ते पटकन सापडतच नव्हतं ही खरी गोम होती. त्यामुळे सरांनीच नव्हे तर कोणीही पुस्तक मागितलं तर ते तातडीने देण्याची सवय सगळ्याच मंडळींना लागली. हा वेळेचा नियम ते स्वतःलाही तितक्याच कडकपणे लावत असत. एकदा एका खेडेगावातल्या चौथीत शिकणाऱ्या मुलाला सरांनी  दुपारी चार वाजताची भेटीची वेळ दिली होती. त्याआधी सर एका लेक्चरला गेले होते. तेही चार पावलांवर असलेल्या इमारतीतच. पण लेक्चर संपायला पाच मिनिटं उशीर झाला. तर सर त्यांच्या कचेरीत पोचण्याच्या पायऱ्या भराभर एकेक पायरी गाळून चढत होते. खरं तर त्या आधीच्या आठवड्यात सरांना बरं नसल्याने ते दोन- तीन दिवस दवाखान्यात होते. पण त्यांच्या हातून पाच मिनिटांचा झालेला उशीर त्यांच्यासाठी अक्षम्य होता. वेळेचा नियम सर्वांनाच लागू असायचा – मग ते विद्यार्थी असोत, अधिकारी असोत किंवा ड्रायव्हर असोत.

एके वर्षी आयुकाच्या गव्हर्निंग बॉडीची मीटिंग होती. त्यानंतर आयुकाच्या फाउंडेशन डे  निमित्त एका पाहुण्या परदेशी प्रोफेसरांचे लेक्चर होतं. त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता फाउंडेशन डे निमित्त आयुकातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यातर्फे करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जाणार होते. दिवसाचा शेवट रात्री आठ वाजताच्या जेवणाने होणार होता. या सर्व गोष्टींमध्ये माझाही सहभाग असल्याने मीही दिवसभर प्रचंड कामात होते. शिवाय कल्चरल कमिटीची मी सेक्रेटरी असल्याने तिथेही मी बरोबर साडेपाच वाजता हजर होते. सहा वाजता मुख्य पडद्यातून डोकावून पाहिलं तर प्रेक्षागृहात फक्त चार लोक हजर होते. त्यात सर व मंगलाताई, आलेले पाहुणे परदेशी प्रोफेसर आणि आयुकाच्या भेटीला आलेले एक भारतीय प्रोफेसर! प्रेक्षकच नाहीत म्हंटल्यावर कार्यक्रम सुरू करून काय उपयोग? म्हणून मी थोडेफार पालक जमल्यावर वीस एक मिनिटांनी कार्यक्रम सुरू केला. तो संपला वेळेवर. पण रात्री जेवणासाठी गेले असता सरांनी मला बोलावून कार्यक्रम उशीरा का सुरू केला असा जाब विचारला. मी कारण सांगितल्यावर त्यांनी बजावलं, “कोणी येवो न येवो, तुम्ही तुमच्या वेळेवर कार्यक्रम सुरू केलाच पाहिजे.” त्यानंतर आम्हा कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या घरातील मंडळींना, कार्यक्रमामधे सहभागी होणाऱ्या लहान मुलांनासुद्धा वेळेवर कार्यक्रम सुरू करण्याची सवय लागली. कायमची!

वेळेसंदर्भात त्यांचा जसा कटाक्ष होता तसाच सरकारी मालमत्तेबाबतही. जेव्हा आयुकामध्ये इ-मेल पाठवता  येऊ लागली तेव्हा एका डिपार्टमेंटकडून दुसरीकडे मेमो टाइप करण्याऐवजी बहुतेक सर्व अंतर्गत पत्रव्यवहार इ-मेल व संगणकावरच सुरू झाला. त्यामुळे काम भराभर होई. महत्त्वाची  कागदपत्रं जपून ठेवणं सोयीचं होई आणि विनाकारण कागदावर छपाई करणं कमी झालं. त्यातही काही कागदांवर छपाई करावी लागलीच तर कालांतराने ते पाठकोरे कागद बारीक-सारीक नोंदी करण्यासाठी वापरले जाऊ लागले. एकदा सर लायब्ररीत गेले असताना त्यांना काही नोंदींसाठी कागद हवा होता. तिथल्या कर्मचाऱ्याने सरळ एक बॉण्ड पेपर सरांना दिला. “हे बघ, हे बॉण्ड पेपर फार महाग असतात. त्यात आपल्या सरकारचा पैसा वापरला जातो. त्यामुळे या महागड्या  कागदांचा उपयोग लहान-सहान नोंदींसाठी कधीही करायचा नाही.” त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बजावलं.

सरांचं विज्ञानाविषयी किंवा खगोलशास्त्राविषयी जे भाषण असे – मग ते त्यांच्या विद्यार्थ्यांपुढे असो, सर्वसामान्य लोकांपुढे असो किंवा शालेय विद्यार्थ्यांपुढे असो – त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते भाषण अत्यंत काटेकोर असे. त्यासाठी ते कोणत्याही नोंदींचा अथवा पुस्तकाचा वापर करत नसत. भाषण अत्यंत बांधेसूद आणि मुद्द्याला धरून असे. ते ठराविक वेळेतच पूर्ण होई – कोणतीही घाईगडबड न करता. त्यांच्या वैज्ञानिक लिखाणातदेखील हेच गुण दिसून येतात. विषय संथ गतीने सुरू होतो, अत्यंत काटेकोर भाषेत, कोणतीही घाई न करता विस्तारला जातो आणि बरोबर वेळेत संपतो. पण त्या तेवढ्याच वेळात त्यांनी इतकं प्रचंड ज्ञान दिलेलं असतं की सरांनी कमावलेली ही एक कलाच आहे असं म्हणावंसं वाटतं.

सरांना विज्ञान व त्यासंबंधीचे प्रयोग, भाषणं यामध्ये अर्थातच खूप रस होता. २० वर्षं केंब्रिजमध्ये शिकवल्यानंतर त्यांनी काही वर्षं ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च’मध्ये काम केलं आणि नंतर ते आयुकामध्ये आले. विज्ञानाचा प्रसार होणे ही त्यांना फार महत्त्वाची गोष्ट वाटे. म्हणून त्यांनी मराठीमध्ये विज्ञानकथा, गोष्टी, लेख लिहिणं, भाषणं देणं सुरू केलं. त्यांनी कोणालाही लेख देण्याचे कबूल केलं की दिलेल्या तारखेच्या आधी पंधरा दिवस त्यांचा लेख लिहून तयार असे. तोसुद्धा अत्यंत सुरेख हस्ताक्षरात. त्यात एकाही शब्दाची खाडाखोड नसे. खरं तर त्यांचं हस्ताक्षर इतकं सुंदर की त्यांच्या मूळ हस्ताक्षरातच तो छापावा! एकदा इएमआरसी (Educational Media Research Center) मध्ये काम करणारे एक कर्मचारी आयुकावर एक फिल्म तयार करण्याचं काम करत होते. त्यासंबंधीचे महत्त्वाचे तपशील त्यांना देण्याचं सरांनी कबूल केलं होतं. त्यासंबंधी सांगितलेल्या तारखेच्या आधीच त्याचे तपशील मागण्यासंबंधी त्या कर्मचाऱ्याचा फोन आल्यावर सर जाम  चिडले. “मी सांगितलेल्या वेळेच्या आधीच माझं काम पाठवून देत असतो. मला त्याविषयी आठवण करून दिलेली आवडत नाही.” सरांनी त्याला बजावलं!

सरांचं भारतात एवढं नांव झालेलं होतं की अनेक लोक त्यांची स्वाक्षरी मागत. सरांचं त्यावर त्यांना सांगणं असे की तुम्ही कोणताही वैज्ञानिक प्रश्न विचारा व मला पत्र टाका. मी उत्तर देईन आणि त्यावर सही करेन. सरांच्या बॅगेत पोस्टकार्ड्स, देशांतर्गत पत्रं, पाकिटं यांचा साठा असे. कधी बस, रेल्वे किंवा विमानाला उशीर झाला तर ते वाट पाहताना मिळालेल्या वेळाचा या पत्रांची उत्तरे देण्यासाठी उपयोग करीत. पाकिटं, त्याला लागणारी तिकिटं स्वखर्चाने आणून ठेवणं, बरोबर घेऊन जाणं हे ते न विसरता करीत. सरांच्या विज्ञानप्रचाराचं, लेखांचं, भाषणांचं सर्वांनाच कौतुक वाटे. पुढे बिनय पट्टनायक यांनी इंग्रजीत लिहिलेल्या ‘Jewels in the sky’ या शाळेतील मुलांना विश्वाची कल्पना देणाऱ्या पुस्तकाचा सुचेता चांदकरबरोबर मराठीत ‘आकाशातील रत्ने’ या नावाने अनुवाद करण्याचं काम माझ्या हातून घडलं. तेच माझं पहिलंवहिलं पुस्तक.

सरांना विनोदाची चांगली जाण व आवड होती. आयुकाच्या फाउंडेशन डे निमित्त झालेल्या व्यंगचित्रस्पर्धेत मी सरांचंच एक व्यंगचित्र तयार करवून घेतलं होतं. सरांच्या ऑफिसमध्ये एका काचेच्या दरवाजावर खूप कावळे येऊन नेहमी चोचीने टक टक करीत. खरं तर सरांच्या कामामध्ये त्याचा चांगलाच व्यत्यय होई. त्यामुळे सर कामाच्या गडबडीत उठून त्या कावळ्यांना हाकलण्याचं काम नियमितपणे करीत.  मी काढून घेतलेल्या व्यंगचित्रात सर पंचा नेसलेले असून ते कावळ्यांना हाकलत होते आणि खाली शीर्षक होतं – ‘उड उड रे काऊ, तुझे सोन्याने मढवीन पाऊ’! सरांना हे व्यंगचित्र आवडल्याचं त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं.

आयुका सुरू झाल्यावर काही वर्षातच तिथे ‘आकाशगंगा” नावाची आयुकातील कर्मचाऱ्यांसाठीची हाउसिंग कॉलनी तयार झाली. त्यात मलाही एक फ्लॅट मिळाला. तोही नेमका सरांच्या घरासमोरच. मग नारळीकर कुटुंबीय व आम्ही ‘सख्खे शेजारी’ झालो. त्यामुळे सरांचे आई-वडील, सरांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर, त्यांच्या मुली, त्यांनी पाळलेली ‘हिरा’ नांवाची कुत्री सर्वांशीच ओळख झाली. वारंवार भेटीही होत. आयुका सुरू झाल्यावर काही वर्षातच तिथे ‘आकाशगंगा” नावाची आयुकातील कर्मचाऱ्यांसाठीची हाउसिंग कॉलनी तयार झाली. त्यात मलाही एक फ्लॅट मिळाला. तोही नेमका सरांच्या घरासमोरच. मग नारळीकर कुटुंबीय व आम्ही ‘सख्खे शेजारी’ झालो. त्यामुळे सरांचे आई-वडील, सरांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर, त्यांच्या मुली, त्यांनी पाळलेली ‘हिरा’ नांवाची कुत्री सर्वांशीच ओळख झाली. वारंवार भेटीही होत. मी आयुकामधे राहायला आले तेव्हा घराच्या गॅसचं कनेक्शन मिळवण्यासाठी मी जवळच्या गॅस एजन्सीमध्ये गेले होते. तिथे भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे एजन्सीचे मालक प्रत्येकाला काय हवं, काय नको त्याची चोकशी करत माझ्यापर्यंत पोचले. मी आयुकात राहायला आल्यामुळे माझं गॅस कनेक्शन आता इकडे हलवून मिळावं हे मी त्यांना सांगताच त्यांनी मला रांग सोडून सरळ त्यांच्या ऑफिसात बोलावून माझं काम पाच मिनिटात करून दिलं. त्यांनी सांगितलं की जेव्हा प्रोफेसर नारळीकर पुण्यात (आयुकात) राहायला आले तेव्हा तेही साधे कपडे घालून रांगेत उभे राहिले होते. गॅसच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी ही  मोठी व्यक्ती आहे आणि तिला त्याने टीव्हीवर पाहिल्याचं  मालकांना सांगितल्यावर सरांना असं उन्हात उभं राहायला लागल्याबद्दल मालकांना लाज वाटली. तेव्हापासून आयुकातील कोणीही आल्यास त्यांचं काम लगेच करून द्यायची पद्धत त्यांनी सुरू केली. सरांच्या साधेपणाचा आम्हा कित्येक आकाशगंगावासीयांना केवढा फायदा झाला!

आपल्या नावाचा स्वतःसाठी फायदा घ्यायचा नाही ही सरांची मात्र कायमची वृत्ती आहे. अलीकडे सरांना पार्किन्सन या आजाराचा त्रास होतो. ते त्यासाठी दवाखान्यात गेलेले असताना एका पेशंटच्या नातेवाईकांनी सरांना ओळखलं आणि त्यांना आधी जाऊ देण्याविषयी विनंती केली. पण सरांनी त्यांना सांगितलं, “माझा नंबर येईल तेव्हा मी जाईन!”

एकदा त्यांच्या घरी गेले असता ताईसाहेबांनी (म्हणजे सरांच्या आईंनी) सुरी मागितली . मी तिथेच ओट्यावर असलेली सुरी त्यांना दिली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, “कुणी सुरी मागितली तर सुरीची धारदार बाजू व टोक घेणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने द्यायचं नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला जखम होण्याची शक्यता असते. नेहमी सुरीच्या मुठीची बाजू घेणाऱ्या व्यक्तीकडे करायची.” हा धडा तसा  लहानसाच होता, पण महत्त्वाचा होता. तो माझ्या मनावर आता कायमचा बिंबला आहे.

माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या आयुकातील घरी मी प्रसिद्ध गायक व अभिनेते कै. श्री. शरद गोखले यांचं गाणं ठेवलं होतं आणि सरांनाही त्याचं निमंत्रण दिलं होतं. सर व मंगलाताई गाण्याला आले आणि सतरंजीवर सर्वांसमवेत खाली बसले. जमलेल्या पाहुण्यांपैकी काहींनी सरांना इतके जवळून कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्या साधेपणाने ती मंडळी चकित झाली. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये कामाला गेल्यावर सरांनी कार्यक्रम छान झाल्याचं तर मला सांगितलंच, पण एका भिंतीवर मी आठ वारली पेंटिंग्ज काढली होती ती छान आली आहेत हेही आठवणीने सांगितलं. माझ्याकडे आलेल्या थोड्याशा  वेळात त्यांच्या नजरेने हे बारकावे टिपलेले होते.

आयुकात हाउसिंग कॉलनीचं दिवाळीचं जेवण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होई. आयुकातील कॅन्टीनमधून जेवण मिळे. पण तिथले कर्मचारी त्या निमित्ताने त्यांची दिवाळी भेट घेण्यासाठी मालकांकडे जात. त्यामुळे ज्याने त्याने आपापली ताट-वाटी-चमचा-भांडे घेऊन यावे असं सर्व रहिवाशांना कळवलं जाई. आठ वाजताची वेळ दिली असेल तर सरही हातात त्यांची ताट-वाटी-चमचा-भांडे घेऊन वेळेआधी पाच मिनिटे रांगेत उभे राहात. होळीच्या दिवशी तिथे रंगही खेळला जाई. सर साधा शर्ट घालून उभे राहून सर्वांना कपाळावर चिमूटभर रंग लावीत व लावूनही घेत. आयुकाच्या परिसरात पूर्वी मोकळी जागा व शेती होती. त्यामुळे घरासमोरील मोकळ्या मैदानात नाग-साप अनेकदा निघत. एकदा सरांच्या घरासमोरील फरशीने झाकलेल्या एका गटारातून एक भला मोठा नाग रस्त्यावर आला होता. त्याला पकडायला योग्य ती व्यक्ती येईपर्यंत सर तिथे जातीने, शांतपणे  पहारा देत उभे होते.

हाउसिंग कॉलनीतली मुलं सरांच्या घरी बिनधास्त जात. भृगू साहनी नावाचा एक मुलगा त्यांच्याकडे जाऊन सरळ त्यांचा रेफ्रिजरेटर उघडून आत काही खाऊ आहे का हे पाहून तो मागत असे. एकदा मंगलाताईंनी  त्याला सांगितलं, “हे बघ भृगु, असं कोणाच्याही घरात शिरून त्यांचा फ्रीज उघडणं बरोबर नाही. तुला काही हवं असेल तर मला विचारत जा”. दुसऱ्या दिवशी भृगु त्यांच्याकडे गेला. फ्रीजसमोरच्या स्टुलावर जाऊन बसला आणि मंगलाताईंना जोरात हाक मारू लागला. “Mangala come here. Open the fridge.” तिला अशी ऑर्डर देऊन भृगुमहाशय हाताची घडी घालून शांत बसले आणि फ्रीजमधला काही खाऊ मिळतोय का याची वाट पाहत राहिले. हा किस्सा मंगलाताईंच्या  तोंडून ऐकताना भृगूची आई रोहिणी आणि मी जाम हसलो.

एकदा रंजन गुप्ता या ‘आकाशगंगा’मध्ये राहणाऱ्या एका शास्त्रज्ञाचा मुलगा बॉबी हरवला. जवळपासच्या सर्व ठिकाणी शोधूनही तो सापडेना. त्यावेळी सर स्वतः, प्रोफेसर नरेश दधिच बॉबीला शोधायला बाहेर पडले. सुदैवाने तो शेजारच्या एनसीआरएच्या कॉलनीत सापडला. मंगलाताईंनी त्यांच्या घरात बाग लावली होती. तिथे एक दिवस  छान हिरवीगार करडईची भाजी दिसली. मी सहज  म्हणून गेले, “मला करडईची भाजी फार आवडते.” तीन चार दिवसांनंतर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास माझ्या घराची बेल वाजली. उघडून पहाते तो मंगलाताई करडईच्या भाजीचा बोल घेऊन आल्या होत्या. एकदा माझी शेजारीण डॉ. रोहिणी साहनी पडशाने जबरदस्त आडवी झाली होती. मंगलाताईंनी घरगुती औषधं आणि तुळस ,गवती चहा, आलं घालून केलेला उत्तम वाफ़ाळता काढा तिला नेऊन दिला आणि घेण्यासंबंधीची माहितीही दिली. दोन दिवसात रोहिणी पुन्हा कामाला जाऊ लागली.  थोडक्यात काय, ती कॉलनी म्हणजे सर्वांचं एक मोठं कुटुंब असल्याची भावना सर्वांनाच होती.

सरांच्या आकाशगंगेतील घरी त्यांनी क्रॉके (Croquet) नावाच्या एका खेळाचं मैदान करवून घेतलं होतं. सर आणि त्यांच्या मुली व त्यांच्या आई म्हणजे ताईसाहेब हा खेळ घरी खेळत. त्यात दोन टीम्स असतात. सर केंब्रिजला असताना हा खेळ शिकले होते. आयुकाच्या भेटीला आलेले परदेशी प्रोफेसरही त्यांच्याकडे हा खेळ खेळायला येत.

आयुकाच्या भेटीला येणाऱ्या विविध देशी-परदेशी नामवंत व्यक्तींच्या हस्ते तिथल्या परिसरात वृक्षारोपण केलं जाई. नारळीकर आकाशगंगेतील ज्या घरात राहत असत तिथे मात्र त्यांनी एकही वृक्ष लावला नाही. आपण हे घर नोकरीत असेपर्यंतच वापरणार. आपल्यामुळे पुढे येणाऱ्या व्यक्तीला त्याची अडचण व्हायला नको असा विचार कदाचित त्यामागे असावा. नाही म्हणायला तेथील तुळशी वृंदावनात त्यांनी वरदानंद भारती म्हणजेच श्रीयुत अनंतराव आठवले यांच्या हस्ते तुळशीची रोपं मात्र लावली होती. अनंतराव आठवले हे मंगलाताईंच्या आईंना म्हणजे निर्मला सदाशिव राजवाडे यांना गुरुतुल्य होते. अनंतरावांचं संस्कृत तसंच आयुर्वेदावर प्रभुत्व होतं. निर्मलाताईही स्वतः डॉक्टर असून आयुर्वेद महाविद्यालयात मॅटर्निटी होमच्या प्रमुख, तसेच तिथल्या लेडिज वॉर्डन म्हणून काम करीत. कोणत्यातरी वृत्तपत्राला वरदानंद भारतींच्या सरांच्या घरी येण्याची व त्यांनी तेथे तुळस लावल्याची बातमी लागली आणि ती बातमी पेपरमध्ये छापून आली. त्याचबरोबर सरांवरील टीकेलाही वाट फुटली. “हे कसले वैज्ञानिक! स्वतःला वैज्ञानिक म्हणवतात आणि कुणा गुरूंच्या हस्ते घरी तुळशीवृंदावनात तुळशीची रोपं लावून घेतात!” अर्थात अशा टीकेकडे दुर्लक्ष करण्याचीही सरांना सवय होतीच!

सरांनी आयुकाची  डिरेक्टरशिप त्यांच्या ५० व्या वाढदिवशी स्वीकारली आणि त्या पदाचा राजीनामा त्यांनी त्यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे १८ जुलै २००३ दिला. त्याआधी दोन दिवस त्यांनी ‘आकाशगंगे’तील त्यांच्या घरातले सर्व सामान हलवून ते आता राहतात त्या खगोल सोसायटीतील घरात हलवलं होतं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका वर्षासाठी ‘कॉलेज द फ्रांस’ या फ्रांसमधील विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम स्वीकारलं होतं. वर्षभर ते पॅरिसमध्येच राहिले. वास्तविक पाहता आयुकाचे फाउंडर डिरेक्टर असल्याने त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर आणखी काही तिथे निवास केला असता. पण सरांची शिस्त (आणि अलीकडे फार दुर्मीळ होत चाललेला प्रामाणिकपणा) पाहता सरांनी ते घर दोन दिवस आधीच रिकामं करून संस्थेकडे सुपूर्द केलं होतं!

हजारो गुणांनी चमकणारे हे आपले मराठी खगोलशास्त्रज्ञ कुणाच्याही मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. शब्दमर्यादेचं बंधन पाळणं आवश्यक असल्याने आता थांबणं भाग आहे. पण ‘सांगायचे राहिले खूप अजून’ ही भावना मनात आहेच!

 

कल्याणी गाडगीळ

kalyani1804@gmail.com