40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

मार्ग हिंसेचा?

१९६७चा सुमार होता. मी साऊथ हॉलमध्ये पंजाबमधून लंडनमध्ये आलेल्या आलेल्या आणि साऊथ हॉलमध्ये स्थायी व्हायला लागलेल्या मुलींना (१९६३ ते ६५) शिकवीत होते. त्यातल्या आता सर्व जणी निरनिराळ्या वर्गात होत्या. मी पण इतर वर्गाना शिकवू लागले होते; पण त्या ओढाळ गुरांप्रमाणे किंवा नुकत्याच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीने जसे कारण नसताना माहेरी डोकवावं तसे मला भेटायला येत. खूपच लळा लागला होता मला त्यांचा. त्या पहिल्या दोन वर्षात मी त्यांना भराभर इंग्लिश शिकवले एवढेच नव्हे तर ह्या परक्या देशात स्थित होतानाच्या त्यांच्या अनेक बारीकसारीक समस्या सोडवल्या. ढगळ पंजाबी पोषाखाऐवजी शाळेतला युनिफॉर्म घालायचा, येताजाता ‘गुड मॉर्निंग’, ‘थॅक्यू”, ‘सॉरी’ व ‘एक्सक्यूज’ म्हणायची सवय करायची. जेवणातल्या चीजसारख्या शाकाहारी पदार्थाची व इथल्या वेगळ्या भाज्यांची चव घ्यायला लावायची. ओढणीशिवाय बेचैन होणाऱ्या मुली आता खेळताना शॉर्ट घालायला लागल्या. पोहायला जाताना पोहायचा पोशाख वापरायला सरावल्या. सुरुवातीचे दिवस कठीण होते. गोऱ्या मुली छेड़छाड काढीत, आता त्यांनाच शाळेच्या पटांगणात ही लगोरी खेळायला शिकवू लागल्या.

तरीही खूप बारीकसारीक तक्रारी व समस्या घेऊन यायच्याच. आजही त्या अशाच आल्या होत्या आणि त्यातली दरशन जरा लाजतच लांब उभी राहिली ‘का गं? म्हणून विचारते, तोच सुरिंदरने बातमी फोडलीच, ‘मिसेस दामले, दरशन तुम्हांला लग्नपत्रिका द्यायला आली आहे.’ ‘मग मी अभिनंदन करते की तिचं. अशी भेदरलेली का गं? नंदाचीच बातमी आहे ना? मुलगा पंजाबीच आहे ना? गोरा, काळा किवा इतर भारतीय तर नाही ना? असला तरी आवडीचा आहे ना तुझ्या?’ माझी प्रश्नांची सरबत्ती आणि हा आपली गपगार. मग इतरही सांगू की नको असं जरा घुटमळत राहिल्या. मा पुन्हा म्हटलं, ‘अगं, बर्मिंगहॅम, कॉव्हेट्री की मँचेस्टर अगर युरोपला जायचं आहे का लग्न करून?’ ‘नाही नाही, सगळं ठीक आहे. लग्नाला या हं, रविवारी गुरुद्वारामध्ये.’ म्हणत पत्रिका माझ्या हातात कोंबत दरशन आणि तिची बहीण निघून गेली. शाळा सुटलेली होती. इतरांना म्हटलं, ‘चला, बसा गाडीत. आपण जवळच्या पार्कमध्ये जाऊ या. दिवस छान आहे.’ त्या तिघी लगेच चढल्या गाडीत, अन् मग त्या संध्याकाळी त्यांनी मनमोकळेपणे आपल्या लग्नाच्या समस्या सांगितल्या.

‘दरशनसारखं आम्हा तरुण मुलींची लग्नं आमचे आईवडील होशियारपुर किंवा लुधियानाच्याच मुलांशी लावून देतात. तो मुलगा आम्ही तर नाहीच पण आमच्या आईवडिलांनी पण पाहिलेला नसतो. हे सगळं त्याला इथे आणण्याकरता असतं.’ ‘पण, तमची काय हरकत? आपल्या भारतीयांची तर अशी मुलाला पाहिल्याशिवाय कितीतरी लग्नं होतात. शिवाय तोही तुम्ही काही वर्षापूर्वी इथे आलात अन् रुळलात तसा रुळेल की!’ ‘तसं होत नाही, तो येतो तो विसाव्या वर्षी. येतो तो सरळ नोकरीला लागतो, तो आमच्यासारखा शाळेत जात नाही आणि तुमच्यासारखं त्याला कुणी शिकवत नाही.’ सतनामने सुरिंदरच्या आवाजात आपला आवाज मिसळला. ‘खरं तर त्याला शिकायचंच असतं. इथे आल्यावर नोकरी करून सगळा पैसा घरी तरी पाठवायचा, नाहीतर भावाबहिणींना इथे आणायचं. आमच्या मुलीनं इथे नोकरी करायची व संसार चालवायचा. नोकरी करायला आमची हरकत नाही; पण त्याने नको का हातभार लावायला?’ सतनामने आणखी एक मुद्दा पुढे आणला. ‘आम्हांला आता इथले इंग्लिश सिनेमे पहावेसे वाटतात. पार्कमध्ये फिरायला आवडतं. इथली मासिकं, पुस्तकं, कथा वाचायला आवडतात. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहायला आवडतात आणि हे नवरे आमच्या मुलींना पाच-सहा वर्षं पार मागे खेचून नेतात. पुन्हा तीच हिंदी पिक्चर्स, तेच घरगुती समारंभ आणि भेटीगाठी.’

त्या दोघीतिघी अगदी भरभरून तक्रारी करत होत्या. मला म्हणत होत्या की, ‘तुम्ही चला आमच्या घरी आणि द्या पटवून आमच्या आयांना. मागे इंग्लिश शिकवायला येत होतात ना तसं.’ माझा त्या वेळचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता. आम्ही दोघी शिक्षिका ह्यांच्यापैकी एकीच्या घरी जायचो व इतर काही जणी तिथे जमाव्या ही अपेक्षा; पण ह्या आपल्या कामात इतक्या गुंतलेल्या असायच्या की त्यांना वेळच व्हायचा नाही बसून शिकायला. पुढे अनुभव असा आला, की त्या आपल्या मुलामुलीकडून, कामाच्या ठिकाणी व बाजारात तोडकं मोडकं बोलायला शिकल्या. त्यांच्या दृष्टीने तेवढं पुरेसं होतं. मी संभाषणाची दिशा जरा बदलली. ‘तुमच्या भावाच तरी काय गं मग? त्यांना इथल्या मुली हव्या असतात की भारतातल्या?’ सतनामला आता खरा जोर चढला. ‘ते पण हसलेच. म्हणे इथल्या मुली म्हणजे इंग्लिश मुलीची नक्कल. त्यापेक्षा अस्सल गोरी मुलगी परवडली. त्यांना हवी मान खाली घालून दिवसभर राबणारी. आम्ही म्हणे सारखे वाद घालतो.’

सुरिंदर म्हणाली, ‘पण इथला एखादा छानसा मुलगा मिळावा म्हणून आमची धडपड. दोघांनी नोकरी करावी. छानसं घर थाटावं. दोघांच्या आईवडिलांकडे येणं जाणं ठेवावं. आपले रोजचे व्यवहार, बाहेर जाणं. घरात वागणं, आमचं आपलं दोघांत असावं.’ मला पण वाटलं असंच व्हावं ना, इथे स्वतंत्र घर ताबडतोब मिळतं. नोकऱ्याही मिळतात. इंग्लिश पोशाख केला, भाषा बोलल्या, तरी तशी ही मुलमुली स्वतःचं भारतीयत्व पण टिकवतात. दोन संस्कृतींचा सुंदर मिलाफ असतो. गोऱ्या, काळ्या मिश्र विवाहाची जोडपीपण ह्यांच्यात मिसळून जातात.

दुर्दैवाने हे फार दिवस टिकलं नाही. १९७० नंतर ईस्ट आफ्रिकेतून, युगांडा, केनियामधून भारतीय वंशाचे खूप लोक आले. नोकऱ्यांवर ताण पडला. बेकारीचे आवकडे वाढू लागले. मग साहजिकच नोकऱ्यांत भेदभाव होऊ लागले. इथे राहून इथे शिकून नोकऱ्या मिळत नाहीत म्हटलं की भारतीय व इतर काळ्या तरुणांत कटुता वाढू लागली. परत फिरायचे दोर तर ह्यांच्या आई वडिलांच्या वेळेपासूनच कापून टाकले होते.

त्यात मुस्लिम धर्मीयांचा धर्मनिष्ठ आग्रहापणा वाढत चालला होता. हे मुल्ला दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेपाशी जमत आणि शाळेत मिळणारे मांसाहारी पदार्थ हलाल नसतात, तर मुलांनी ते खायचे नाहीत म्हणून सांगताना त्यांना तंबी देत. शुक्रवारी फिशशिवाय इतर मांस न खाणारे कॅथलिक, गोमांस न खाणारे शीख आणि हिंदू होतेच. ज्यू आणि मुसलमान मुलं डुकराच्या मांसाला शिवत नसत. त्यांच्या अटी ते मुकाट्याने पाळीत. शाळेतले स्वयंपाकी पण त्यांना सवलतीने दुसरं काही देत. घरून सँडविच आणण्याचीही परवानगी त्यांना होती; पण रोज हलाल मांसाहाराची सोय करायची म्हणजे भलतंच. सलमा पण तक्रार करायची. ‘चांगलं सबसिडाईज्ड भरपेट जेवण अहमदला आणि मेहेरून्निसाला इथे मिळतं. मग मला रात्री फारसं करायला लागत नाही तर काय हा मुल्लांचा त्रास! पण तिचं कोण ऐकतं? डोक्याला रुमाल बांधा. पायघोळ स्कर्ट घाला. वाढतच चालले हे प्रकार. मग आमचे शीख पण त्याच वळणावर जायला लागले. आपली संस्कृती, आपली अस्मिता, आपला धर्म, आपल्या रीतीभाती, सगळंच जपायचं. एवढंच नव्हे, तर इंग्रजांना सारखी नावं ठेवायची.

खरं तर पहिल्यापासूनच काही शिक्षणाधिकारी भारतीय व इतर कॅरिबियनांना पाश्चात्त्य समाजात पूर्णपणे एकरूप करून घेतलं पाहिजे असा आग्रह धरीत; पण एकंदर उदार धोरणाकडेच कल होता. माझी अगदी सुरुवातीची एक मुख्याध्यापिका म्हणायची, इतक्या लांबून आली आहेत ही मुलं इथं तर त्यांच्यावर एकदम कशाचीच सक्ती करू नका. बघा ती मैदानात इतर मुलांशी खेळताना खूप काही शिकतील. मग आपणहून त्यांना ‘विध इट’ व्हावंसं वाटेल. आपला वेगळेपणा टिकवण्यापेक्षा नैसर्गिकपणे ते कसं सहज होईल ते पाहाच तुम्ही. अगदी खरं होतं ते. हे मूलतत्त्ववादी लोक आपली प्रचारशस्र घेऊन यायच्या आधी वैशिष्ट्य टिकवूनही समाजात एकजिनसीपणा यायला लागला होता. जवळजवळ दीड दशकाच्या काळात आपले भारतीय किती छान रुळले होते.

१९८९ च्या त्या दिवशी सकाळच्या पहिल्या बातम्यातच किरणजीत नवऱ्याला जाळून स्वत: पोलिसांच्या हवाली झाल्याची ही बातमी आली, तेव्हा साऊथहॉलचा तो सगळा माहोल माझ्या डोळ्यांपुढून सरकत होता. पुन्हा पुन्हा मनात येत होतं, कोण असेल ही किरणजीत? इथे राहून ही एकदम इतकी धीट झाली? ही तर इथल्या शाळा-कॉलेजात जाऊन स्वतंत्र वृत्तीची बनलेली नव्हती. दहा वर्षापूर्वी लग्न होऊन इथे आलेली होती म्हणे. दहा वर्षांचा काळ इथल्या वातावरणात रुळायला काही कमी नव्हता. स्वातंत्र्याच्या कल्पना नक्की तिच्यात भिनलेल्या असणार. अन्यायाला प्रतिकार करण्याची ही वृत्ती इथल्याच मातीतली. पण…तरी पण…असा कायदा हातात घ्यायचा म्हणजे भलतंच धारिष्ट! कल्पना असेल का तिला ह्याचे काय परिणाम होतील ते? असेलही, मीडिया सांगत होतं की मनजीत तिला रोज दारू पिऊन मारहाण करीत असे. मग तिला वाटलं की आपण ह्यांच्या हातून मरणारच तर त्याला मारून मग मरावं. विचार ठीक पण तो अर्धवट जळला असता तर? त्याला जाळताना हीच पोळली असती तर? नशीब तिचं. तो झोपेत असताना हिने हीटरकरता आणलेल्या रॉकेलची त्याच्या भोवती रांगोळी घातली. अन् काडी लावून ती पटकन घराबाहेर पडली. ती बाहेर येते तोपर्यंत घराने चांगलाच पेट घेतला. पोलीस आलेच आणि ती त्यांच्या स्वाधीन झाली.

खरं तर मी १९८३ मध्ये रिटायर झाले होते. त्यापूर्वीही पाच वर्षं मी साऊथ हॉलची शाळा सोडून स्टेनसमधल्या मॅग्ना कार्टा शाळेत शिकवत होते; पण तिथल्या मुलींशी मी अजून संपर्कात होते. कुणी भेटायच्या, घरी चहाला यायला आग्रह करायच्या, नाहीतर तिथल्याच हॉटेलात बसून आम्ही भेळपुरी खात गप्पा मारायचो. आज मी फोन फिरवला तर दोघी भेटल्याच नाहीत; पण मग परमजीतने फोन उचलला. दुपारी भेटायचं ठरवलं. ती आणखी दोघीचौघींना गोळा करणार होती.

जमल्यानंतर साहजिकच माझा पहिला प्रश्न होता की, ‘कोण ही किरणजीत? तुमच्यापैकी कोण ओळखत होतं तिला?’ सगळ्यांनी कानांवर हात ठेवले. मी जरा दरडावूनच म्हटलं, ‘काही सांगितलं तर तुम्ही पण अडकाल अशी भीती वाटते आहे की काय तुम्हांला?’ ‘नाही. खरंच नाही.’ ‘आम्ही तिला कधी पाहिलेलं नाही.’ ‘काय सांगता? सगळे तुम्ही होशियारपूर आणि लुधियानातले. कुठेतरी जवळच्या नाहीतर लांबच्या नात्याने बांधलेले. एक मुलगी होशियारपूरहून लग्न करून इथे येते. तुमच्या वयाची आणि तुम्ही तिला ओळखत नाही? की ब्रिटिश झालात पुरत्या. ओळख करून देण्याची वाट बघत बसायला?’ ‘नाही. मॅडम. खरंच आम्ही तिला कधी कुठेही पाहिलेलं नाही.’ मग इथे आम्ही सगळ्यांनी कान टवकारले. ती सांगत होती, ‘मनजीत माझ्या भावाच्याबरोबर शाळेत होता. पुढे कॉलेजात गेला नाही. आमच्याकडे यायचा; पण एकदम खलिस्तानी बनला होता तो. केस, दाढी वाढवली आणि आला की जोराजोरात भाषणबाजी करायचा. माझे वडील एक दिवस चिडले आणि त्याला म्हणाले, आम्हांला राहायचं आहे इथे. भलत्या राजकारणात ओढू नको आम्हांला. मग तो येईनासा झाला.

त्यानतर दोन वर्षांनी भेटला होता. तेव्हा सांगत होता की मी लग्न करून आलोय म्हणून. मी म्हटलं, ‘अरे वा, मग भाभीशी ओळख करून दे ना! जरा पार्टी तर देशील की नाही?’ नुसतं हसला त्यावर तो. मग एकदा त्याची आई बरोबर होती. मी त्यांना म्हटलं, ‘आम्हांला पार्टी पाहिजे ना. तर म्हणतात, ‘काय सांगू तुम्हांला? लग्न करून आणली पण अशी आळशी आणि बुद्दू आणि निरुत्साही असेल असं वाटलं नव्हतं. तिला कुठेही जायला यायला नको, सदा आईची आठवण काढत रडत बसते. दोघांचं तर जेवण करायचं असतं; पण दिवसभर त्याच्यातच जातो तिचा. त्या दोघांना वेगळी जागा घेऊन दिली आहे. माझ्या चार माणसांच्या घरात तर हिनं काय गोंधळ असता कुणास ठाऊक?’

त्या दिवशी मग आम्ही असं काठाकाठावरच बोलत राहिलो. पण हळूहळू ह्या मुलींनी त्या लग्नाची पार्श्वभूमी माहिती मिळवून कळवली. किरणजीतची सासू आपल्या मुलाचं लग्न करायला म्हणून होशियारपूरमध्ये मुलगी शोधायला गेली. तीनचार स्थळं आली सांगून त्यातली ही होशियारपूरजवळच्या एका खेड्यात वाढलेली तिने पसंत केली. मग बोलवायला गेली तेव्हा किरणचे आई वडील आले होते.

आई म्हणत होती, ‘एकुलती एक मुलगी आहे माझी, इतक्या दूर पाठवायला मन नाही घेत. तुम्ही म्हणता आपले बरेच लोक आहेत तिथे, पण आमच्या ओळखीतलं कुणी नाही. आम्ही शाकाहारी आहोत. मुलीला मांसाहार आवडत नाही. तिला इंग्रजी येत नाही. तिथल्या आपल्या मुलीही इंग्रजी बोलतात ना? आणि सगळ्या नोकरी करतात. आमच्या घरी बायकांनी नोकरी करायची पद्धत नाही. एक भीती अजून वाटते. मुलगा तिथे वाढलेला. त्याच्या काही भानगडी नाहीत ना? कुणी गोऱ्या, काळ्या?’

मनजीतच्या आईला अगदी हवी तशी मुलगी होती ही. त्यांनी आश्वासनाची खैरात केली.

‘अहो, फोन करत जा वाटेल तेव्हा. आम्ही तर शाकाहारीच आहोत. भाषा काय, शिकेल हळूहळू! ती काही नोकरी करणार नाही त्यामुळे तिला जरूरही पडणार नाही. मनजीत म्हणाल तर धुतल्या तांदळासारखा. केस ठेवतो, गुरुद्वारात जातो. केस ठेवणाऱ्याशी कुठल्या गोऱ्या अन् काळ्या मुली मैत्री करणार? त्याला तर तिथल्या आपल्याही मुली नकोत. भारी इंग्लिश लोकांची नक्कल करतात.’ सोयरीक झाली. लग्न करून वऱ्हाडी साऊथहॉलला परतली.

इथे आल्याबरोबर मनजीत किरणजीतला सासूबाईने स्वतंत्र संसार मांडून दिला. घरात जरुरीचे सामान आणि धान्य पण भरून ठेवलं. मग त्या म्हणाल्या, दर मंगळवारी मी शाकभाजी व इतर किराणा आणून देईन. तुला इतक्यात नाही जमायचं ते. मग त्या दिवशी त्या सामान आणायच्या आणि काय हवं ते विचारायच्या. आपल्या घरच्यांकरता किरणने बनवलेल्या रोट्या आणि शाक घेऊन जायच्या. दोन आठवड्यांनी त्या एक शिवणाचं यंत्र व शिलाईचे सामान घेऊन आल्या. पाठोपाठ एक माणूस कपड्यांचं गाठाड घेऊन आला. ‘तुला कंटाळा येत असेल ना दिवसभर रिकामं बसून?’ मग त्यांनी तिला सगळं नीट समजावून सांगितलं. ह्या कपड्यांवर नुसती शिलाई मारायची. त्या गाठोड्यात वर एका कागदावर काय करायचं ते पंजाबीत लिहिलेलं आहे. तसं करायचं. उद्या तो हे घेऊन जाईल, पैसे देईल व दुसरं गाठोडं देईल. तुला शिकायला मिळेल, बाहर जायला नको, भाषेचा प्रश्न नाही.

क्रम सुरू झाला. किरणजीत दिवसभर मान मोडून कपड्यांवर शिलाई करत राहिली. सासू आठवड्याच्या बाजाराकरता शिलाईच्या पैशातून पैसे उचलू लागली. उरलेले पैसे मनजीत आपल्या खिशात टाकू लागला. किरणजीत बाहेर जात नाही तर तिला पैसे कशाला? वेळ तरी कुठे होता शिलाई व घरकामाव्यतिरिक्त काही करायला? कोणी आलं गेलं नाही. नाही काळं, नाही गोरं, नाही पंजाबीही. तीन तोंडं दिसायची. सासूचं आठवड्यातून एकदा, नवऱ्याच रोज रात्री आणि कपडे आणून टाकणाऱ्याचं तिसरं. सासूची फक्त बडबड ऐकून घ्यायची. मर्यादशील किरण एक अक्षर तोंडातून काढू शकत नव्हती. नवरा दमून आलेला, जेवताना भराभर जेवणारा आणि मग पुढे पुढे दारू ढोसून आलेला. कापडाचे गाठोडं टाकून, पैसे फेकून तो शिवण आणून देणारा केव्हा पाठ वळवायचा ते कळायचं नाही. आईला फोन करायला घरी कधी फोन आलाच नाही.

सून म्हणून सासूने व बायको म्हणून नवऱ्याने भारतातून आणली होती एक बटीक, एक दुभती गाय. किरणजीत कधी इंग्रजी शिकलीच नाही. तिच्या कानांवर इंग्रजी शब्द कधी पडलाच नाही. इंग्रजीच काय; पण पंजाबीही ती विसरली. तोंड उघडून बोलणंच तो विसरली. सुरुवातीच्या काळात एकदा ती दमून आडवी पडली होती, तर मनजीतने तिला पाणी आणून दिले. ती म्हणाली, ‘थँक्यू’. चार शब्द, ती लंडनला निघायची तयारी करत असताना तिला तिच्या काकाने शिकवले होते. थँक्यू, सॉरी, प्लीज, एक्स्क्यूज मी. त्यापैकी पहिला शब्द तिने वापरला. नवरा खुशीत आहे हे पाहून पाणी आणून दिल्याबद्दल; पण मनजीत भडकला, ‘परक्यांची भाषा वापरायची नाही. आपण इथे आहोत ते त्यांचे पैसे लुटायला.’ त्याने प्रत्युत्तर म्हणून आठवण राहील असा जोरात फटका मारला. वर म्हणाला, ‘सॉरी म्हणालीस की दोन फटके, प्लीजला तीन, एक्स्क्यूज मी ला चार. लक्षात ठेव.’ भाषणबाजी करण्यात तो पटाईत होता.

काम वाढत होते. एकाकीपणाचा कळस होत होता. घुसमट पिळून काढत होतो आणि रात्रीचा विवाहांतर्गत बलात्कार, दारू पिऊन आल्यानंतरची मारझोड, कुठे दिलासा तर नव्हताच; पण छळाची चढती भाजणी होत होती. त्या दिवशी अशीच दारूची मस्ती. तिची गालफडं फुटली होती. कंबर मोडली होती. जेवावंसं वाटत नव्हतं. दिवसभराच्या श्रमाचा थकवा होता. मनजीत जाऊन ढाराढूर झोपला होता. कशी व्हायची ह्यातून सुटका? मरण! मरण कुणाचं? आत्महत्या केली तर माझी सुटका होईल; पण तो? अन्याय करणारा तो? तो मेला तर त्यांच्यावर सूड घेतल्याचं समाधान मला मिळेल. पण मीही अडकेनच. हरकत नाही. होऊ दे, होऊ दे शेवट सगळ्याचाच. नाहीतर जगायचं कशाला? आणि त्या क्षणी तिला सुचलं.

समोर हीटरकरता आणलेल्या रॉकेलचा डबा होता. ती निर्धाराने उठली. त्याच्या ओंगळ देहाभोवती तिने रॉकेलची रांगोळी काढली आणि तिला काडी लावली. पेट घ्यायला वेळ लागला नाही. इथल्या आयुष्यात पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडून ती रस्त्यावर येऊन उभी राहिली. घराने पेट घेतला. पोलीस आले. अग्निशमन दल आले.
त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. तिला व्हॅनमध्ये घालून पोलीसचौकीत घेऊन गेले.

सगळे सोपस्कार झाले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. हा तुरुंग, हा दुसरारा नरक? आजूबाजूच्या अशीच शिक्षा झालेल्या बायका गलका करत होत्या. भांडत होत्या. ही कोपऱ्यात मुकाट्याने मान गुडघ्याखाली घालून बसली होती, तिचे डोळे कोरडे होते. पण त्यात निर्ढावलेपणा नव्हता. तुरुंगाधिकारी चौकशीला आले. हिच्या पुढ्यात अत्राची थाळी तशीच पडलेली होती. अन्न शाकाहारी होतं ह्याची त्यांनी खात्री केली. तुला जेवायला पाहिजे. इथे जन्म काढायचा आहे, ते म्हणाले; पण तिने लक्ष दिले नाही. त्यांनी आणि काही प्रश्न विचारले. तिचे उत्तर नाही. हिला इंग्रजी समजत नसावं. त्याने दुभाष्याला बोलावून घेतले, पण तिला आवाज फुटेना, काहीतरी ताण आहे मनावर. त्यांनी मानसशास्त्रज्ञाला बोलावले; चाचण्या झाल्या; पण तिला आवाज फुटेना. चार दिवसांनी तिने काहीतरी मागितले ते पंजाबीत होते. खाणाखुणांनी वेळ भागवून नेली.

सुदैवाने तो तुरुंगाधिकारी कनवाळू होता. तिला बोलता येत आहे हे कळल्यावर त्याने तिच्या इंग्रजी शिकवण्याची सोय केली. कारण हिच्या डिफेन्सच्या वकिलाची सोय करायची, मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यायची तर तिला आपलं म्हणणं सांगता आलं पाहिजे. भाषा ही प्राथमिक गरजांपैकी एक आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि भाषा. भाषा संवादाचे साधन, समाजाशी संवाद करण्याचे साधन. गेली दहा वर्षे तेच तिला देण्यात आलं नव्हतं हा सर्वात मोठा बंदिवास होता. अन्याय होत होता; पण त्याला वाचा फोडण्याचे साधनच तिला उपलब्ध नव्हते. हे त्या तुरुंगाधिकाऱ्याने ओळखलं. तिच्याकरता आता अलिबाबाची गुहा उघडली गेली.

हळूहळू तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. तिची हृदयस्पर्शी कथा उलगडत गेली. मानसशास्त्रज्ञाची मदत, वकिलाची मदत. ब्लॅक सिस्टर्स ह्या सेवाभावी संस्थेची मदत. तिची केस उभी राहिली. ती सगळ्यांशी इंग्रजीत आपलं मन मोकळं करू लागली. तुरुंगातल्या इतर स्त्रियांविषयीही ती बोलू लागली. त्यात काही अट्टल सरावलेल्या गुन्हेगार होत्या. काही अगतिक होत्या. ती त्यांच्याशी नाते जोडू शकली, तिच्या एकाकीपणाचा बुरखा टराटर फाटत होता.

सगळ्यांच्या मदतीने तिचा खटला फेरतपासणीसाठी उभा राहिला. ती निर्दोष सुटली.

बाहेर आल्यावर पत्रकारांकरिता तिचं पहिलं वाक्य होतं, ‘आता मी असा छळ सहन करणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी लढणार आहे.’ त्या सर्वांसाठी आता ती आशेचा किरण बनणार होती. वाचा बंद झालेली किरण आता सर्वाच्या छळाचं मुखपत्र बनणार होती. भाषेमुळे ती मुक्त झाली हे तर खरंच!

 

आशा दामले

(मिळून साऱ्याजणी, ऑगस्ट २००७)