40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

लग्नाआधी शरीरसंबंध : काय काळजी घ्याल?

आजच्या तरुण पिढीमध्ये लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं हे जास्त प्रमाणात दिसून येतं. असे शरीरसंबंध केवळ लग्नं ठरलेल्या व्यक्तीशी होतात असं नाही तर इतरांशी सुद्धा होतात. तरुणाईच्या या वागण्याला समाजाच्या बहुतेक घटकांची मान्यता नसते. प्रश्न पडल्यास आई-वडील-शिक्षक यांच्याकडून सल्ला, मदत मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे वयानी मोठ्या आणि म्हणून ‘अनुभवी’ मित्रमैत्रिणींची मदत घेणे किंवा इंटरनेटसारख्या गोष्टींचा वापर करणे असे उपाय वापरले जातात. सध्याच्या काळात संस्कृतिसंरक्षकांचं महत्त्व वाढलेलं आहे. ते जसं ‘लव्ह-जिहाद’ च्या संदर्भात त्रासदायक वाटतं तसंच या संदर्भातही वाटू शकतं. संस्कृतिसंरक्षक काय उपाय योजतात? ते लग्नाच्या चौकटीबाहेर घडलेल्या शरीरसंबंधांचा निषेध करतात. असं करायचं स्वातंत्र्य तरुण मुलामुलींना मिळू नये म्हणून ते कुटुंबातली बंधनं वाढवतात. टीव्ही आणि इंटरनेटवर कितीही माहिती उपलब्ध असली आणि घरातच इंटरनेट उपलब्ध असलं तरी शाळेत लैंगिक शिक्षण देण्यावर बंदी घालतात. म्हणजेच लैंगिकतेचं ज्ञान कुणाच्यातरी मार्गदर्शनातून मिळण्याचे मार्ग बंद केले जातात. याउलट तरुण-तरुणींचे लग्नाआधीचे लैंगिक संबंध ही सध्याच्या जगात अपरिहार्यपणे दिसणारी गोष्ट आहे हे लक्षात घेणारी माणसंही कुठेकुठे दिसतात. अशी माणसं किंवा काही संस्था योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतात. अशा संबंधांमध्ये पुरेशी सुरक्षितता कशी आणता येईल? नको असतांना गर्भ राहू नये यासाठी माहिती कुठे मिळेल? त्यासाठी काही साधनं वापरता येतात का? ती कुठे मिळतील? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं तरुणाईला मिळणं आवश्यक आहे.

याबरोबरच असे लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुण-तरुणीही जास्त प्रमाणात का आढळतात याची समाजशास्त्रीय आणि शारीरिक कारणे पाहणे गरजेचे आहे. गेल्या ५०-६० वर्षात भारतात मुलींची मासिक पाळी सुरु होण्याचं वय खाली आलं आहे. एकेकाळी १३-१४ वर्षं असणारे हे वय आता ११ वर्षापर्यंत येऊन पोचलं आहे. त्यामुळे मुली १०-१२ वर्षांच्या असल्यापासूनच ‘मोठ्या’ होतात. पुरुषाच्या शरीराचं आकर्षण त्या वयापासूनच जाणवू लागतं. टीव्ही, इंटरनेटमुळे काही प्रमाणात अश्लील चित्रफीती (विडिओ) पाहिल्या जातात आणि शरीरसंबंधाची उर्मि वाढते. मुलांमधलं तारुण्य एका पाळी सुरू होण्यासारख्या घटनेशी बांधलेलं नसतं. पण मुलांमधली लैंगिक संबंधाविषयीची जिज्ञासा जागी व्हायला आणि वाढायला टीव्ही, इंटरनेट, आजूबाजूचे वातावरण ही कारणं पुरेशी असतातच. त्यामुळे संधी मिळाल्यास थोड्या शारीरिक जवळिकीपासून गर्भधारणा घडवू शकतील इथपर्यंतचे लैंगिक संबंध हे सहज घडतं. ही शारीरिक/ मानसिक गरज भागवण्याचा समाजमान्य उपाय म्हणजे लग्न. पण मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय घरात आजकाल तरुण-तरुणींची लग्न उशीरा होतात. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्याखेरीज लग्न न करण्याकडे कल असल्यामुळे लग्नाचं सर्वसाधारण वय वाढत चाललं आहे. म्हणजे लैंगिक गरजांची जाणीव होण्यापासून ते लग्नापर्यंतचा काळ आजच्या शहरी तरुण-तरुणींमध्ये १२-१५ वर्षांचाही असू शकतो. त्यामुळे साहजिकच संधी मिळाल्यास लैंगिक संबंधांचे प्रयोग करून बघणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. योग्य प्रकाराने आणि पुरेसं लैंगिक शिक्षण न मिळाल्यामुळे लैंगिक संबंधामधले धोके वाटणीला येणारी तरुणाई हताश होऊन इंटरनेटच्या आधाराला धावते.

वापर ईसी, मिटव अडचण!

ईसी म्हणजे ईमरजंसी कॉन्ट्रासेप्टिव — आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या.

‘दोन दिवसांपूर्वी मी एका मित्राबरोबर झोपले. आम्ही काहीच काळजी घेतली नव्हती. म्हणून मी आय-पिल घेतली होती. आज दुसऱ्या मित्राबरोबर झोपले. अगदी शेवटपर्यंत गेलो नाही आम्ही, पण मला परत गोळ्या घ्यायला पाहिजेत का?’

यासारखे प्रश्न इंटरनेटवरच्या सल्ला देणाऱ्या साईट्सवर विचारलेले दिसतात. प्रश्न विचारणारी मुलगी १७-१८ वर्षाची होती. कॉलेजातल्या मित्रांसोबत मित्रमैत्रिणी ट्रीपला गेल्या असतांना हे घडले. मुलीला काळजी घ्यायला पाहिजे हे माहीत होतं. आय-पिल ही ईसीची गोळी घेतली तर दिवस जाणार नाहीत एवढं माहीत होतं पण तरी ते पुरेसं नव्हतं. केवळ ट्रीपच्या वेळीच अशा घटना घडतात असं नाही. नवरात्रीच्या काळात गरबा खेळायला तरुण मुलंमुली जमतात तेव्हा अशी जवळीकीची संधी मिळते. तीन-चार दिवसांचे लग्नसमारंभ तरुण मुलामुलींना एकत्र आणतात तिथेही हे घडते. अनेक गायनॅकॉलॉजिच्या डॉक्टरांचा हा अनुभव असतो. अनेकदा तर २-३ महिन्यानंतर दिवस गेल्याचं लक्षात येतं आणि त्यावेळी गर्भपाताखेरीज उपाय नसतो.

‘मी आय-पिल घेऊन ८ दिवस झाले. माझी पाळी चार दिवसापूर्वीच यायला हवी होती, अजून आली नाही. मी आणखी एकदा गोळ्या घेऊ? का दिवस गेल्याची तपासणी करू? लवकर सांगा.’

हा दुसऱ्या प्रकारचा अनुभव. आय-पिल घेऊनही प्रश्न संपत नाहीत. या मुलीची पाळी येण्यापूर्वी चारच दिवस तिचे संबंध आले होते असं तिच्या विधानावरून दिसतं. ते खरं असेल तर केवळ दिवस जाऊ नयेत म्हणून तिनी गोळी घेण्याची गरज नव्हती. तिचा पाळीच्या चक्रातला ‘सुरक्षित’ काळ चालू होता. पण अज्ञानामुळे गोळी घेऊन तिनी पाळीचं चक्र तर बिघडवलंच पण दिवस गेल्याची भीतीही तिच्या डोक्यात निर्माण झाली.

‘महिन्यातून किती वेळा अनवॉन्टेड ७२ किंवा आय-पिल घेऊन चालेल? एकदा अनवॉन्टेड ७२ आणि एकदा आय-पिल असं केलं तर जास्त बरं का? माझा मित्र परगावी असल्यामुळे मला रोजच्या गोळ्या नाही घ्यायच्या. त्यापासून त्रास होतो म्हणतात म्हणून मी या गोळ्या घेते गरज पडेल तेव्हा. मी बरोबर करते आहे नं?’

अनवॉन्टेड ७२ ही आय-पिलसारखी आणखी एक गोळी. ही तरुण मुलगीही अर्धवट ज्ञानाची बळी आहे. तिलाही योग्य मार्गदर्शन मिळायची गरज आहे.

ईसीच्या गोळ्या — केव्हा आणि कशा वापराव्यात?

भारतात सुमारे १५ वर्षांपूर्वी ईसीच्या गोळ्या उपलब्ध झाल्या. आज किमान ७-८ निरनिराळ्या नावांनी या बाजारात मिळतात. आय-पिल या गोळया सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. अनवॉन्टेड ७२ या गोळ्याही वापरल्या जातात. काही गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचा (हॉर्मोनचा) वापर केलेला असतो तर काहीत फक्त प्रोजेस्टेरॉनचा. पण दोन्ही प्रकारच्या गोळ्या संभोगानंतर गर्भधारणा होऊ नये या एकाच उद्देशाने वापरल्या जातात. संभोगानंतर लवकरात लवकर गोळ्या घ्याव्यात अशी सूचना गोळ्यांच्या पाकिटाबरोबर दिलेली असते. बहात्तर तासांनंतर गोळ्या घेतल्या किंवा गोळ्या उलटून पडल्या तर त्यांचा उपयोग होत नाही. औषधकंपन्या या गोळ्यांचा वापर केवळ अपवादात्मक परिस्थितीत किंवा आणीबाणीतच करावा अशा सूचना देतात. नेहमीचे गर्भप्रतिबंधक उपाय, उदाहरणार्थ कंडोम, काही कारणाने वापरला नाही किंवा फाटला तरच ईसीकडे वळावं असा स्पष्ट सल्ला असतो. असा अत्यंत जपून वापर केला तर या गोळ्यांचे फार दुष्परिणाम होत नाहीत अशीही माहिती उपलब्द्ध असते. तरुणाईच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या दुकानात सहज मिळू शकतात आणि त्याची किंमतही फार नसते. एका वेळी एक पाकीट वापरायचं असतं आणि कुठल्या कंपनीचं औषध आहे यानुसार त्याची किंमत ५० ते २०० रुपयांपर्यंत असते.

पुण्याजवळच्या तालुक्याच्या गावात काम करणारा एक कार्यकर्ता आपला अनुभव सांगत होता. एका मध्यरात्री त्या गावातल्या तरुणाचा या कार्यकर्त्याला फोन आला. तो तरुण गावातल्याच एका तरुणीबरोबर ‘मजा’ करायला रात्री एका हॉटेलात गेला होता. त्या रात्री त्याचा कंडोम फाटला आणि तरुणी रडू लागली. ‘आता काय करू’ असं विचारायला तो फोन होता. या कार्यकर्त्या मित्रानं ईसीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला. पण पंचाईत अशी की इतक्या रात्री या गोळ्या कुठे मिळतील हा प्रश्न आला आणि मुख्य म्हणजे त्यांना घाईनं आपापल्या घरी परतणं भाग होतं. घरी पोचल्यावर सकाळी दुकान उघडल्यावर औषध आणणं शक्य होतंच. तेव्हा औषध घेऊन दिवस राहणार नाहीत हेही खरं होतं पण आणीबाणीच्या परिस्थितीत कोणाला मदत मागायची हा प्रश्न या संदर्भात महत्त्वाचा.

या गोळ्या सहज उपलब्ध होण्याचा फायदा असा की बाई-पुरुषाच्या जवळिकीचे पर्यवसान अचानक पूर्ण लैंगिक संबंधात झालं तरी या गोळ्यांच्या मदतीनं गर्भधारणा थांबवता येते. दुसरा फायदा (!) असा की लैंगिक संबंधांसाठी आधी काही काळजी घ्यावी लागत नाही, उदाहरणार्थ बाईनी पुरुषाला कंडोम आणण्याची किंवा घालण्याची आठवण करणे! या फायद्यात दडलेला तोटा असा की दर महिन्यात, दर आठवड्यात अनेकदा अशा गोळ्यांचा वापर तरुणी/ बाई करू शकते. या गोळ्या वारंवार घेतल्यास वाटणीला येऊ शकणारे दुष्परिणाम पुष्कळ. पाळीची अनियमितता, मुरुमे-पुटकुळ्याच्या प्रमाणात वाढ, जास्त वापरामुळे अंडं नियमानं विकसित होण्याच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम, त्यातून पुढे वंध्यत्व येणे वगैरे. दुसरा तोटा असा की गोळ्या कुणीही विकत घेऊ शकत असल्याने त्यांच्या वापरासंबंधी आढावा घेणं अवघड होतं. ईसीच्या वापराविषयी भारतामधून एकही व्यापक आढावा प्रसिद्ध न होण्याचं हेही एक कारण आहे. पुरेसा डेटा उपलब्ध नसेल तर सामाजिक हिताच्या दृष्टीनं आणि वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं काय योग्य, काय अयोग्य असा धोरणात्मक सल्ला देणं शक्य होत नाही.

ईसी : उपाय सोपा पण अपाय मोठा?

पुरेशी घनिष्ठ मैत्री नसतांना, लग्न करूच ही खात्री नसतांना शरीरसंबंध ठेवणारे तरुण-तरुणी आसपास दिसतात. एकूणच तरुण वयातल्या या उरमीवर नियंत्रण ठेवणं अवघड. संबंधांचा अनुभव हवा असला, त्या उपभोगातून मिळणारा आनंद हवासा वाटला तरी तरूणींना गर्भधारणेची भीती नक्कीच वाटते. इंटरनेटवर ‘सेफ पिरियड’ (दोन पाळीच्या दरम्यानचे असे ‘सुरक्षित’ दिवस की जेव्हा गर्भधारणेची शक्यता फारच कमी असते) याविषयी माहिती असली तरी पुरुष-बाईच्या नात्यात पुरेसा विश्वास नसेल तर बाईच्या ‘असुरक्षित’ काळात पुरुषांनी कंडोम वापरण्याचा आग्रह धरणे बाईला जमेलच असं नाही. त्याहीपलीकडे जाऊन ‘माझी मी काळजी घ्यायला समर्थ आहे’ असा नको त्या जागी स्त्रीवादी अट्टाहास हाही कंडोम न वापरण्याचं कारण असू शकतं. सारांश, आय-पिल सारख्या ईसीला उदार आश्रय देणं हा एक सरळ, साधा, फारसा खर्चिक न वाटणारा, आई-वडील, डॉक्टर, अथवा या शरीरसंबंधातला साथी पुरुष यातल्या कुणालाही न सांगता वापरता येणार उपाय असू शकतो.

या सोप्या उपायात अपाय कुठे दडला आहे? दोन-तीन निरनिराळ्या गोष्टींचा या संदर्भात विचार करायला हवा. एक म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या रोगांना कंडोमच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर आळा बसतो. या रोगात निरनिराळ्या विषाणूंमुळे होणारे आजार आणि इतरही जीवाणूंमुळे होणारे आजार यांचा समावेश होतो. अशा अनियोजितपणे घडणाऱ्या शरीरसंबंधात अनेकदा पुरुषाला या जंतूचा संसर्ग झाला असेल किंवा नसेल याची खात्री देता येत नाही. बाईला संसर्ग झाला असेल तर तीही पुरुषाला धोका पोचवू शकते. जाणूनबुजून किंवा अजाणता असा जंतूंचा प्रसार होणं हे दोघा भिडूंच्या दृष्टीनी हानिकारकच असतं कारण अनेकदा आजार बळावेपर्यंत संसर्ग झालेला लक्षातही येत नाही. एच. आय. वी. विषाणूंच्या संसर्गामुळे एड्स होतो हे जसं सगळ्यांना माहीत असतं, तसंच विशिष्ट एच. पी. वी. विषाणूंमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कँसर) बाईलाही होऊ शकतो. सहजी आलेल्या शरीरसंबंधातून येणार संसर्गजन्य रोगांचा धोका टाळणं केव्हाही हितावहच आहे. त्यामुळे गर्भधारणेपासून संरक्षण मिळालं तरी ईसी संसर्गजन्य रोगापासून संरक्षण देऊ शकत नाही हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एक महत्वाची माहिती म्हणजे बायकांचे कंडोम सुद्धा बाजारात मिळतात. ते पुरुषांच्या कंडोमपेक्षा महाग असतात पण त्यांच्या वापरामुळेही संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळतं.

दुसरी बाब म्हणजे ईसीच्या गोळ्यांमध्ये तीच संप्रेरकं असतात जी बाईच्या शरीरातलं अंड्याच्या परिपक्वतेच्या चक्राचं नियमन करत असतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनच्या रक्तातल्या पातळ्या आणि अंडाशयातून बाहेर टाकलं जाणारं अंडं यांचा एकमेकांशी संबंध असतो. गर्भधारणा होऊ नये म्हणून ईसीच्या गोळ्या घेतल्या की या चक्राची नियमितता बिनसते. गोळ्या घेतल्या की काही बायकांची पाळी ठराविक तारखेच्या पुढे जाते किंवा अगोदर येते. या अनियमित चक्राचा परिणाम पाळीच्या पुढल्या तारखेवरही होऊ शकतो. थोडक्यात, गर्भधारणेपासून सुरक्षित असा काळ कोणता याविषयी काहीच अंदाज बांधता येत नाही. दरम्यान पुनः लैंगिक संबंधांची वेळ आली तर पुनः ईसीच्या गोळ्या घेऊनच बंदोबस्त करावा लागतो असं दुष्टचक्र तयार होतं. ज्या पुरुष-बायकांचं एकमेकांशी चांगलं आणि दृढ नातं आहे अशा अनेक बाया नियमाने गर्भप्रतिबंधनासाठी संप्रेरकांच्या गोळ्या घेतात. डॉक्टरी सल्ल्याने या गोळ्या ३ ते ५ वर्ष वापरता येतात. या गोळ्यांनीही बाईची अंडकोषातून अंड्याची परिपूर्ण वाढ होण्याची प्रक्रिया थांबवली जाते. पण त्या गोळ्या नियमितपणे घ्याव्यात अशी अपेक्षा असते. ईसीच्या गोळ्यांमुळे संप्रेरकांच्या पातळ्या अकस्मात वर जाणे आणि २-३ दिवसांनी पूर्ण खाली येणे हे घडतं. शरीरांतर्गत चालू असणारे मासिक पाळीचं नेहमीचं चक्र आणि इसीमुळे अचानक बदलणाऱ्या संप्रेरकांच्या पातळ्या या संघर्षाचा शरीरावर वाईट परिणाम होतो. अनियमित लैंगिक संबंधापासून गर्भधारणा होऊ नये म्हणून ज्या बायका केवळ ईसीच्या गोळ्या वापरण्यावरच भर देतात त्यांच्यात पीसीओएस (पॉली सिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) होण्याची शक्यता वाढते. आधुनिक जगात वावरणाऱ्या बायकांमध्ये पीसीओएसचं प्रमाण जास्त आढळतं. पण दुर्दैवाने हे प्रमाण का वाढलं आहे याविषयी पुरेशी शास्त्रीय माहिती नाही. पीसीओएसमध्ये पाळी अनियमित असणं, पाळीच्या वेळी रक्तस्राव खूप कमी किंवा खूप जास्त होणं, पाळी वेदनायुक्त असणं, अंडकोषातून दर चक्रामध्ये पूर्णपणे विकसित अंडं तयार न होणं, वजन वाढणं, चेहऱ्यावर केस वाढणं अशी लक्षणं दिसतात. पीसीओएसचा आणि वंध्यत्वाचाही संबंध जोडला जातो. याचा अर्थ तरुण वयात गर्भधारणा होऊ नये म्हणून केलेल्या उपायांमुळे पीसीओएस होण्याची शक्यता वाढते आणि नंतर मूल व्हावं अशी इच्छा असेल तेव्हा दिवस जाणं अवघड होऊन बसतं!

अशा प्रकारे आज सोप्या वाटलेल्या उपायांनी तात्कालिक प्रश्न उभे राहतात ते एका प्रकारच्या अज्ञानातून उद्भवतात. पण हेच अज्ञान दूरच्या भविष्यातही प्रश्न निर्माण करू शकतं याची जाणीव तरुणाईला नसते. अनेकदा औषधांनी होणाऱ्या दुष्परिणामांची पुरेशी माहिती औषधकंपन्या पुरवत नाही असा आरोप आपण करतो. बरेच वेळा तो न्याय्य असतोही. पण ईसीचा वारंवार आणि पुष्कळ काळपर्यंत वापर केला तर त्याचे तोटे काय हे सांगण्याची जबाबदारी आपण औषधकंपन्यांवर टाकू शकत नाही कारण असा वापर करण्याची शिफारस त्यांनी केलेली नसते.

थोडक्यात सांगायचं तर कधी व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे, कधी सामाजिक/ आर्थिक अपरिहार्यतेमुळे ईसीचा वारंवार वापर करून आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतो. आजच्या तरुणाईला या धोक्यांची पुरेशी जाणीव नसल्याचे नारी समता मंचाच्या सहकाऱ्यांबरोबरच्या चर्चेतही लक्षात आले. त्यामुळे या लेखाचं प्रयोजन ही धोक्याची घंटा वाजवणे हे तर आहेच पण ही माहिती तरुणाईला कशी पुरवता येईल याचेही धोरण आखायला हवे, हा आहे.

 

विनीता बाळ

(मिळून साऱ्याजणी, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक २०१९)