40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

विद्याताईंचे लेखन : प्रबोधनयुगाच्या मूल्यांची बैठक

विद्या बाळ यांची ओळख आज मुख्यत: एक पत्रकार, संपादक आणि स्त्रीवादी कार्यकर्ती या रूपांमध्येच उरली आहे. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची पुरेशी ओळख यात झाकोळून गेली आहे. त्यांच्या वाङ्मयसेवेकडे लक्ष वेधण्यासाठी या लेखाचा प्रपंच आहे. विद्याताईंच्या लेखणीने साहित्यक्षेत्रातले कोणकोणते प्रांत निवडले, त्यामागे त्यांची कलादृष्टी आणि जीवनदृष्टी कशाप्रकारे कार्यरत होती, याची ओळख येथे एका लेखाच्या मर्यादेत करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.

१) कादंबरी लेखन 

विद्याताईंमध्ये साहित्य लेखनाची ऊर्मी होती. त्यांना त्यांच्या लेखणीने सातत्याने साथ दिली आहे. मात्र स्वत: ‘मिळून सार्‍याजणी’च्या संपादक असूनही आपल्या साहित्याविषयी अंकात लेख छापून आणण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळलेले दिसते. त्यामुळे त्यांच्या समग्र वाङ्मय सेवेचा धांडोळा घेणे, हा संशोधनाचा विषय झाला आहे. विद्याताईंच्या नावावर ‘तेजस्विनी’ (मनोहर ग्रंथमाला, १९६६) या कांदबरीची नोंद सापडते. मात्र त्यांनी लिहिलेली ही कादंबरी आज पाहायला मिळाली नाही.

‘वाळवंटातील वाट’ (संजय प्रकाशन, १९७०) ही कादंबरी विद्याताईंच्या नावावर आढळते. प्रत्यक्षात ही चक्री कादंबरी आहे. ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या पद्मा गोळे यांच्या पुढकाराने नऊ सदस्यांनी मिळून लिहिलेली ही दहा प्रकरणांची कादंबरी आहे. विद्याताईंनी त्यातील एक प्रकरण लिहिले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांनी या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाचा वृत्तांत सांगितला. त्या समारंभाला दुर्गा भागवत अध्यक्षस्थानी होत्या. श्री. ज. जोशी निमंत्रित वक्ते होते. लेखिकांनी ‘विवाहबाह्य प्रेम’ या विषयावर कादंबरी लिहावी, यावर श्री. ज. जोशी यांनी भाषणात टीका केली होती! तेव्हा दुर्गाबाईंनी भाषणात हे ठासून सांगितले की, यात स्त्रीच्या वेदनेचे चित्रण आहे. एकंदरीत स्त्रीलिखित साहित्य विषयीचे समाजमनात असलेले निकष या निमित्ताने लक्षात येतात.

विद्याताईंच्या आणखी दोन कादंबर्‍या अनुवादित स्वरूपाच्या आहेत. या दोन्ही कांदबर्‍या मूळ पंजाबी भाषेत आहेत, आणि त्यात पंजाबमधील माळवा प्रांतातील ग्रामीण समाज केंद्रस्थानी आहे. एका कादंबरीचे नाव आहे- ‘हे जीवन असे आहे’ (नॅशनल बुक ट्रस्ट) मूळ शीर्षक – ‘एक हमारा जीवन’. ही कादंबरी दिलीप कौर तिवाना यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे. त्यात सामाजिक वास्तवाचे प्रत्ययकारी चित्रण असून ग्रामीण समाजात स्त्रीकडे कसे तुच्छतेने पाहिले जाते याचे दर्शन घडवलेले आहे. दुसरी अनुवादित कादंबरी आहे- ‘रात्र अर्ध्या चंद्राची’ (नॅशनल बुक ट्रस्ट, १९९४) मूळ शीर्षक आहे- ‘अध चन्नी रात’. गुरुदयाल सिंह हे पंजाबी भाषेतील ज्ञानपीठपुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांच्या या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. कादंबरीत रंगवलेली ग्रामीण पात्रे जे जीवन जगतात, ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत मावणारे नाही. या दोन्ही अनुवादित कादंबर्‍यांची निवड करण्यामागची विद्याताईंची वाङ्मयीन अभिरुची आणि वास्तववादी जीवनदृष्टी लक्ष वेधून घेते.

२) चरित्र : ‘कमलाकी’

विद्याताईंनी लिहिलेले कमलाबाई देशपांडे यांचे ‘कमलाकी’ हे चरित्र मौज प्रकाशनाने १९७२ मध्ये प्रकाशित केलेले आहे. कमलाबाई या न. चिं. केळकर यांच्या कन्या, विद्याताईंच्या आत्या होत्या. त्यांनी वैधव्यानंतरही लोकांशी समतोलपणे वागत उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल केली होती. स्त्री शिक्षणाच्या कामात पुढाकार घेणार्‍या कमलाकींविषयी विद्याताईंनी विशेष आत्मीयता होती. कमलाकींच्या निधनानंतर त्यांची पुस्तके वाचून, त्यांच्या परिचितांना मोठ्या प्रमाणावर पत्रे लिहून त्यांच्या आठवणी गोळा करण्याची विद्याताईंची मूळ कल्पना होती. प्रत्यक्षात आक्कांच्या स्मृतिसंग‘ह करण्याऐवजी त्यांनी चरित्रग्रंथ सिद्ध केला. ‘स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल’, ‘स्मरणसाखळी’ यासारखी महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिणार्‍या कमलाबाईंचे मन विद्याताईंना वाचता आले होते; याची प्रचिती हे चरित्र वाचताना येते. याचे एक उदाहरण म्हणजे ‘स्मरणसाखळी’ या आत्मचरित्रात कमलाबाईंनी ज्या आपल्या दुखण्याचा ‘मुदतीचा ताप’ इतकाच मोघम उल्लेख केला होता, त्या त्यांच्या आजाराबद्दल विद्याताईंनी चरित्रात ‘मर्माघात’ हे संपूर्ण प्रकरण लिहिले आहे! कमलाकींना झालेला मानसिक आजार, त्याची कारणे, त्यातून बाहेर पडतानाचा प्रवास हे सारे विद्याताईंनी हळूवारपणे रेखाटले आहे. तसेच या पुस्तकाच्या शेवटीची ही वाक्येही फार महत्त्वाची अहेत. ती अशी : ‘शास्त्रोक्त आचारविचार ही रूढींपुढे बळी दिला जाऊ नये म्हणून आक्कांनी आयुष्यभर आटापिटा केला. पण त्याच आक्कांचा मृतदेह मात्र रूढीलाच बळी गेला! आक्कांच्या मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी सकेशा विधवा म्हणून त्यांची देहाची शांत करून मग त्यांना अग्नी देण्यात आला!’ हे वाचताना विद्याताईंच्या मनातील वेदना आणि अन्यायाची जाणीव नेमकेपणाने जाणवते. संशोधन, आस्था आणि चिकाटी यामुळे यातील लेखनाला विशेष परिमाण प्राप्त झाले आहे. मुख्य म्हणजे ‘कमलाकीचं लेखन माझ्या विकासाला एका सुप्त पातळीवर हातभार लावून गेलं.’ ही त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या लेखनाच्या संदर्भात महत्त्वाची ठरते.

३) स्फुट लेखसंग्रह

विद्याताईंनी स्फुटलेखन मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यात आत्मपर लेखन, स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन अशा स्वरूपाचे लेखन समाविष्ट आहे. यातील काही लेखन तत्कालीन संदर्भाशी निगडित आहे. तरीही त्या विशिष्ट निमित्ताने स्त्री प्रश्नाच्या एखाद्या पैलूचे भान जागे करण्याचे काम विद्याताईंच्या लेखणीने सातत्याने केले आहे. त्यांची ‘शोध स्वत:चा’ (श्रीविद्या प्रकाशन, १९८४), ‘संवाद’ (रोहन प्रकाशन, १९९२) , ‘तुमच्यामाझ्यासाठी’ (दिलीपराज प्रकाशन, १९९६) आणि ‘साकव’ (उन्मेष प्रकाशन, २००२) ही चार पुस्तके या दृष्टीने लक्षात घ्यायला हवी. त्यातून विद्याताईंचे सामाजिक प्रबोधनपर विचार लख्खपणे समोर येतात.

  • शोध स्वत:चा

या पुस्तकाच्या सुरुवातीला ‘त्या आधी’ या शीर्षकाच्या प्रास्ताविकात विद्याताईंनी आपली लेखनामागील भूमिका व लेखनासाठी स्वीकारलेला घाट याविषयी विवेचन केले आहे. खरे तर या प्रास्ताविकतेतून विद्याताईंचा ‘शोध स्वत:चा’ सुरू झाला आहे! स्वत:च्या कथालेखनाविषयी त्यांनी त्या असमाधान व्यक्त केले आहे. ‘आत्मचरित्रपर लेखन तू चांगलं करू शकशील’, या एका मैत्रिणीच्या सल्ल्यानंतर त्यांनी केलेले स्तंभलेखन यात आहे. ‘स्त्री’ मासिकातून त्यांनी आत्मशोधाासाठी एक निमित्त आणि माणसं या स्तंभांमधून लिहिलेले हे लेखन म्हणजे त्यांनी लेखनासाठी शोधलेली नवी वाट आणि त्यांना सापडलेला लेखनाचा नवा घाट आहे. एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने ‘क्ष-किरण परीक्षा’ करावी त्याप्रमाणे छेद घेत स्वत:त आणि समाजमनात एकाच वेळी डोकावण्याचा हा प्रयत्न आहे. यातले स्फूट लेख काही वेळा टिपणवजा आहेत. मात्र त्यात सभोवतालचे बदल पारखण्याची दृष्टी आहे. त्यामुळे एखाद्या लेखाचे शीर्षक ‘सार्‍या सुजाण पुरुषांना’ असेही आहे. ‘वृद्धाश्रम’ हा वैयक्तिक प्रश्नांना सामाजिक परिस्थितीचं परिमाण द्यायचा प्रयत्न आहे. हे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. यातला ‘मथुरा – एक बेबस मजूर’ हा लेख तत्कालीन घटनेकडे लक्ष वेधणारा आहे. असे अनेक लेख यात आहेत.

यातले दोन दीर्घ लेख विद्याताईंच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींचा आणि त्यामागील वैचारिक-भावनिक संघर्षाचा ठाव घेणारे म्हणून महत्त्वाचे ठरतात. (हे लेख स्तंभलेखन या गटातले नाहीत.) पारदर्शक आत्मसंवादातून आत्मभानापर्यंतचा टप्पा गाठण्याचा त्यांचा प्रवास या लेखांमधून उलगडत जातो. ‘दिसायला लागल्यानंतर’ आणि ‘बदलता-बदलता’ हे दोन लेख म्हणजे विद्याताईंच्या आयुष्यातल्या एका स्थित्यंतराच्या कालखंडातले अर्करूप आत्मचरित्र आहे. मध्यमवर्गीय वर्तुळात बुद्धी आणि कलागुणांनी चमकणारी सुधा केळकर ही मुलगी, तरुण वयात तिने केलेला प्रेमविवाह, सांसारिक वाटचाल करताना एका वळणाशी घराबाहेर पडण्याचा तिने घेतलेला निर्णय आणि त्यानंतरची तिची पत्रकारितेतील दमदार वाटचाल- हा आलेख त्यातल्या सूक्ष्म भावस्पंदनांसकट या लेखांमध्ये उमटला आहे. मित्र-मैत्रिणी, पुस्तके यांच्यामुळे घडलेले नवजाणिवांचे संस्कार आणि त्यातून पारंपरिक गृहिणीपणाची कात टाकून समोर आलेली संघर्षशील, परिवर्तनवादी कार्यकर्ती असा तो बदल आह. मध्यमवर्गीय वृत्ति-प्रवृत्तींची कुंपणे ओलांडताना मनाला झालेल्या जखमाही त्यात आहेत. एकाच वेळी स्वत:शी, कुटुंबाशी अणि सामाजाशी झगडा करण्याचा हा प्रांजळ अनुभव आहे. ‘स्त्री’ मासिकाचे संपादन करत असताना १९७५ हे वर्ष त्यांच्यासाठी जाणीवजागृतीपर्व ठरले. आंतरराष्ट्रीय स्त्री वर्षाच्या निमित्ताने ‘सेकंड सेक्स’, ‘फेमिनिन मिस्टिक’ अशा पुस्तकांचे त्यांनी वाचन केले होते. त्यातले विचार संस्काररूपात तयंच्या रक्ताच्या प्रत्येक पेशीपर्यंत जणू पोहोचले होते. त्या लिहितात : ‘पेन्स ऑफ ग्रोथ असतात, मला माहीत आहे. शारीरिक पातळीवर वाढताना एकदा मी त्या अनुभवल्या होत्या. विचारानं वाढताना मी त्या पुन्हा अनुभवल्या. ‘मनाला शंभर डोळे फुटले. त्याचा टीपकागद झाला.’ त्या पुढे म्हणतात : ‘सर्वसामान्य माणसाचं कुतूहल जागं करणं, अनुभवाला हात घालून त्याला विचार करण्याला उद्युक्त करणं, ही जर जाणीव जागी करण्याची पहिली पायरी असेल, तर मी तिथंच काम करीन. जमीन नांगरून ढेकळं फोडणं, ती मोकळी करणं, हे काम मी करीन.’ आणि तेच त्यांचे पथदर्शी काम ठरले!

  • संवाद

‘स्त्री’च्या संपादक असताना विद्याताई एखाद्या वाचकाचे पत्र निवडून त्याला उत्तर देण्याच्या निमित्ताने सर्वांशी संवाद साधत असत. त्यातले काही निवडक लेख यात आहेत. त्या व्यतिरिक्त ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘स्त्री उवाच’ यातलेही लेख या पुस्तकात आहेत. विद्याताईंवर त्या काळात ‘स्त्री मासिक घरफोडी करते’ असा आरोप होत असे. यातला ‘संवाद : २’ हा लेख या संदर्भात महत्त्वाचा आहे. इब्सेनच्या ‘डॉल्स हाऊस’ या नाटकातल्या नोराची भूमिका करणार्‍या लिव्ह उलमचे ‘चेंजिंग’ हे आत्मचरित्र त्यात आधाराला घेतले आहे. स्वत:वरच्या आक्षेपाचे खंडन करताना विद्याताई लिव्ह उलमनचं मनोगत पुढे करतात. त्या लिहितात : ‘नोरा बाहेर पडते तेव्हा तिला असा विश्वास वाटतो की बदल केवळ तिच्यातच होणार नाही, त्याच्यातही होईल!’ विद्याताईंचा सामाजिक परिवर्तनावरचा विश्वास आणि त्यासाठी लहान लहान पावले टाकण्याचा निर्धार यातल्या अनके लेखांमधून दिसतो. ‘हळदी-कुंकवाला रामराम!’ ‘सौंदर्य संकल्पनांची सक्ती कशासाठी’, ‘आदिम नि:शब्दता झुगारताना!’ (ब्रेकिंग द सायलेन्स या चित्रपटाविषयी लेख) ‘जपून ठेवलेला आठ मार्च’ (ब्राायटनमधील ससेक्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पातळीवरची मैत्री अनुभवताना) हे लेख आपल्या वाचकांच्या मनाची क्षितिजे व्यापक करण्याचे काम करतात. ‘महिला मंडळ : नव्या जाणिवांचे केंद्र’, ‘कुटुंबात स्त्री उमलायला मागते आहे’ हेही असेच महत्त्वाच्या विषयांवरचे लेख आहेत. ‘स्त्रियांची चळवळ हे आता खूळ राहिलेलं नाही. ती एक अभ्यासनीय विचारधारा बनली आहे.’ ‘परिवर्तन ही एक गतिमान संकल्पना आहे’, ‘समविचारी मंडळींचा थवा, त्या जुन्या कथेतल्यासारखा पारध्याच्या जाळ्यासकट झेप घेऊन उडाला, तर नवल नाही’, ‘अक्रोडाच्या झाडाला एक ना एक दिवस फळ येणारच’ अशी त्यांची विधाने म्हणजे केवळ अलंकरण नसून त्यांच्यातल्या दुर्दम्य आशावादी वृत्तीची प्रस्फुरणे आहेत. विद्याताईंनी काही काळ आकाशवाणीवर काम केले होते. त्याचा प्रभाव म्हणून असेल कदाचित त्यांची शैली वाचकाशी हितगुज केल्यासारखी वाटते. ही शैली त्यांच्या लेखनाची परिणामकारकता अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरलेली दिसते. ही शैली पुस्तकाच्या शीर्षकालाही न्याय देते.

  • तुमच्यामाझ्यासाठी

विद्याताईंनी ‘आपलं महानगर’ या सांजदैनिकात जुलै १९९३ ते ऑक्टोबर १९९५ या दरम्यान लिहिलेले ४७  लेख यात समाविष्ट आहेत. प्रवास, परिषदा, वाचन, भेटीगाठी, पत्रव्यवहार यातून लेखांसाठी विषय सुचत गेले आहेत. त्यांनी हे पुस्तक ‘सुधारककर्त्या आगरकरांना आठवत, विवेकवादाच्या आधारानं जगू पाहणार्‍या सार्‍यांना’ अर्पण केलं आहे. विद्याताईंच्या यातील अनेक लेखांमधून त्यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांविषयीची कृतिशील आस्था प्रकट झाली आहे. प्रबोधन युगातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर, पंडिता रमाबाई आदिंच्या विचारांचे संस्कार त्यांनी आत्मसात केले आहेत. विद्याताईंना ‘संवाद’ या शब्दात ‘वाद’ आहे, याची कल्पना आहेच! पहिले भांडण स्वत:शी असे त्या म्हणतात. नात्यामधल्या उतरंडी, इच्छामरण, राखीव जागांतील राजकारण, देवाची भक्ती की धाक, स्त्री स्वातंत्र्याच्या कक्षा, ओळख स्वत:शी, आपली स्वयंकेंद्रित वृत्ती, ‘त्या’ गप्प का बसल्या? (जळगावचं वासनाकांड), ‘त्या’ही माणूस आहेत (वेश्यांविषयीचा दृष्टिकोन) अशा अनेक विषयांना या पुस्तकात स्थान मिळाले आहे. स्वत:पासून सुरुवात करत, कुटुंब, समाज आणि वंचित/परिघाबाहेरचे स्त्रीविश्व सारेच यात जाणिवेच्या धाग्यात ओवले आहेत. यातला ‘गर्भनिरोधक लसीचं आक्रमण’ हा लेख विद्याताईंच्या लेखणीतील आक्रमकता पुरेपूर दाखवून देतो. पुरुषप्रधानतेची सूक्ष्म रूपे जागतिक पातळीवर कशी पाहायला मिळतात, याचे भान त्या देतात. लोकसंख्या नियंत्रणाचे साधन म्हणून शास्त्रज्ञांनी स्त्रियांना टोचण्यासाठी गर्भनिरोधक लस शोधून काढली. त्या वेळचा हा लेख चढत्या क्रमाने प्रश्न विचारत राहतो. ते असे : ‘गर्भधारणा हा काय आजार आहे, म्हणून गर्भनिरोधक लस टोचायची? लोकसंख्या वाढ एकट्या स्त्रिया करतात? स्त्रिया ‘अबला’ आणि ‘अबोल’ असल्यामुळे त्यांच्यावर काहीही अत्याचार किंवा सक्तीचे उपाय केले तरी चालतील’.. तेव्हा स्त्रीच्या स्वायत्ततेवर आणि आत्मसन्मानावरचे हे आक्रमण विद्याताईंनी धारदारपणे अडवलेले दिसते. पत्रकार या रूपात विद्याताई प्रसंगी ‘जागल्या’ची भूमिका निभावतात आणि काही वेळा ‘लोकशिक्षक’ ही भूमिकाही कसोशीने पेलतात. त्यांच्या अशा व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू यातील लेखांमधून प्रकट झाले आहेत.

  • साकव

साकव म्हणजे कोकणातले ओढे पार करण्यासाठी बांधलेले छोटे पूल! विद्याताईंनी वाचकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी योजलेले हे शीर्षक म्हणजे संवादासाठीची एक अर्थपूर्ण प्रतिमा आहे. यात ६४ लेख आहे. त्यातून स्त्रीमुक्ती ते मानवमुक्ती या विद्याताईंच्या वैचरिक प्रवासाची कल्पना येते. त्यांच्या जीवनभरच्या संघर्षाचा स्पर्श यातील लेखनाला लाभला आहे. मिलिंद बोकील यांची प्रस्तावना या पुस्तकाचे मर्म लक्षात आणून देणारी आहे.

‘मिळून सार्‍याजणी’तील काही निवडक लेखांचा समावेश या पुस्तकात आहे. विद्याताईंच्या सामाजिक कार्याचा वाढलेला व्याप त्यांना स्त्रीकेंद्री विषयांपलीकडचे विषम सामाजिक वास्तवही टिपण्यासाठी प्रेरित करत होता. अंधश्रद्धाविरोधी परिषदा, नर्मदा आंदोलन, भटक्या-विमुक्त जातीच्या स्त्रियांची परिषद, लिंगभाव समतेचा आग‘ह, कार्यकर्त्यांसाठी आत्मशोध असे व्यापक समाजमान त्यातील लेखांमधून येते. अर्थातच विद्याताईंची स्त्रीप्रश्नाविषयीची आस्थाही काही लेखांमधून व्यक्त होते. ‘मुखपृष्ठावरही शिवी?’ हा लेख स्त्रीवरून देण्यात येणार्‍या शिव्या हा भाषेच्या माध्यमातून केला जाणारा हिंसाचार असल्याचे लक्षात आणून देतो. ‘रिंकू पाटील आणि आपण’, ‘मुलींच्या मुंजी कशासाठी?’ हे प्रासंगिक विषयही वाचकांना विचारमंथन करायला लावतात. समाजातील धर्मांधता, स्त्रीच्या मनावर कर्मकांडांची असणारी मोहिनी या बाबी विद्याताईंना अस्वस्थ करतात. ‘धर्माला रस्त्यावर ‘बसवू’ नका’, ‘शनिशिंगणापूरचा सत्याग्रह’, ‘जोतिबांना काय वाटेल?’, ‘धर्माचं राजकारण’ हे त्यांचे लेख विद्याताईंची धर्मनिरपेक्षेविषयीची भूमिका स्पष्ट करणारे आहेत. वाद विषय ठरणार्‍या प्रश्नांबाबत विदयाताई सर्वांशी संवाद साधायला तयार असतात. ‘बा मध्यमवर्गीय माणसा’, ‘काठावर बसणं आता सोडू या’ असे आवाहन त्या मध्यमवर्गीय वाचकांना करत राहतात. वैचारिक उत्क्रांतीवर त्यांचा विश्वास दिसतो. त्यामुळे त्या मध्यमवर्गीयांना कमी लेखत नाहीत. ‘विचारांच्या देवघेवीची साखळी, हे माणसाच्या वाढीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे साधन आहे. ज्ञान, माहिती, आणि त्यातून जन्माला येणारा आत्मविश्वास’ हे खरं सबलत्वाचं मूलभूत भांडवल आहे, ही विद्याताईंची निकोप वैचारिक भूमिका आहे. त्यांच्या या पुस्तकातून वास्तववातील विवाद्य जागा जशा अधोरेखित होतात, तसेच बदलत्या विधायक वास्तवाचे आश्वासनही अधूनमधून मिळते. ‘मेळाव्यातली कमाई’, ‘स्त्रिया धीटपणे बोलू लागताहेत’ हे लेख अशा गटातले आहेत. या पुस्तकाच्या ‘ब्लर्ब’वर मिलिंद बोकील यांचे जे प्रस्तावनेतील अवतरण दिल आहे, त्यातले पुढील शब्द मला अर्थपूर्ण वाटतात. ते शब्द असे आहेत : ‘साकव टाकण्याचे काम विदयाताईंनी केले आहे, हे पुस्तक वाचणारे तरुण वाचक तो पूल उभारण्याचे काम करतील अशी मला आशा आहे, विश्वाससुद्धा.’ अशा प्रकारे केवळ विचारांचीच नव्हे, तर जीवनविषयक नव्या संवेदनशीलतेची रुजवण करण्याचा विद्याताईंचा प्रयत्न या पुस्तकाच्या पानोपानी आढळतो. त्यातील भावनिक ओलाव्यामुळे लेखन हृद्य ठरते.

४) संपादित पुस्तके

आपल्या सामाजातील स्त्रीप्रश्नाचा अवकाश आणि खोली जाणून घेताना अनेक जणींच्या तलस्पर्शी ‘मनोगतांचे भिंग’ समोर ठेवण्याची धडपड विद्याताईंनी केलेली दिसते. त्यामागे त्यांची प्रश्नाचा वेध घेण्याची दृष्टी, विविध आणि संस्थात्मक कार्य संघटन कौशल्य यांचे बळ उभे आहे. त्यांची संपादित पुस्तके याचा प्रत्यय देतात.

  • अपराजितांचे नि:श्वास (संपा. विद्या बाळ, दिलीपराज प्रकाशन, १९९४)

सामाजिक वास्तवाचा एक वेगळा छेद या पुस्तकात घेतला गेला आहे. ७ आणि ८ जानेवारी १९८९ ला पुण्यात विविध कारणांमुळे एकट्या राहणार्‍या स्त्रियांची परिषद घेतली होती. नारी समता मंचातर्फे घेतलेली विधवा, प्रौढ कुमारिका, घटस्फोटिता अशा (पतिविना राहणार्‍या) एकट्या स्त्रियांची ही परिषद होती. साहित्य संमेलनाचे त्या वेळचे अध्यध्य विश्राम बेडेकर यांचे एक विधान यामागे कारणीभूत ठरले होते. ते विधान असे होते : ‘जगभरात मान्यता पावलेलं पातिव्रत्याचं मूल्य घटस्फोटाच्या आणि पुनर्विवाहाच्या कायद्यांमुळे शबल झालं आहे.’ या विधानामुळे विद्याताईंना स्त्री अणि पुरुष यांच्यासाठीच्या मूल्यव्यवस्थेतील दुटप्पीपणा उघड करावासा वाटला. त्यासाठी निवेदनाद्वारे अशा स्त्रियांची मनोगते आणि कमल पाध्ये, सुमित्रा भावे, विद्युत भागवत तसेच विद्या बाळ यांचे त्या संदर्भातील लेख यात समाविष्ट आहेत. स्त्रियांच्या मनोगतांचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केले की त्यातील अनुभवांमधून स्फटिकरूप झालेले चिंतन वेचता येते. त्यातून ज्ञानाच्या क्षेत्रात भर पडू शकते. याचा प्रत्यय या पुस्तकामुळे येतो. विशेषत: ‘स्पर्शभावनेकडे बघण्याची समाजाची विकृत नजर बदलेल, तेव्हा लैंगिक, सांपत्तिक, व्यावसायिक, वांशिक समानतेच्या पायावर उभ्या राहिलेल्या समाजात ही एकटेपणाची कृत्रिम स्थिती राहण्याचे कारण नाही.’ हे सुमित्रा भावे यांचे विधान महत्त्वाचे आहे.

  • कथा गौरीची (संपा. विद्या बाळ, गीतााली वि. मं., वंदना भागवत, मौज, २००८)

‘मिळून सार्‍याजणी’चा ऑगस्ट २००३ चा गौरी देशपांडे विशेषांक वैशिष्ट्यपूर्ण होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातूनच हे पुस्तक सिद्ध झाले. त्यात गौरी देशपांडे यांचे लेखन, तिची सर्जनशीलता, तिचा व्यासंग याविषयी अनेक लेख आहेत. तिची मुलाखत, तिच्या साहित्याची सूची यामुळे त्या अंकाला अकादमिक मूल्य लाभले आहे. जाई निंबकर, अंबिका सरकार, मीनाक्षी मुखर्जी अशांचे यातले लेख लक्ष वेधून घेतात. गौरी देशपांडे या वेगळ्या वळणावरच्या महत्त्वाच्या लेखिका ‘मिळून सार्‍याजणी’च्या हितचिंतक आणि विद्याताईंची मैत्रीण अशा अनेक रूपाने विद्याताईंना जवळच्या होत्या. त्यांचे अंकातील लेखनाच्या स्वरूपाबाबत (नवोदितांना स्थान देण्याबाबत) काही मतभेद असले, तरी नात्यातील ओलावा टिकून होता. इतका की विद्याताई लिहितात : ‘माणूस उठून गेल्यावर हलत राहणार्‍या खुर्चीसारखी गौरीची आठवण मनात राहील!’ यातील एक विभाग आहे – ‘प्रिय श्री. पु.’ श्री. पु. भागवत यांनी गौरी देशपांडे यांच्या स्वत:ला आलेल्या खासगी पत्रांच्या दोन फायली विश्वासाने विद्याताईंकडे सुपूर्द केल्या. त्यातील निवडक पत्रे यात समाविष्ट झाल्यामुळे गौरीच्या आंतरिक विश्वावर कवडसे पडणे शक्य झाले आहे.

  • मिळवतीची पोतडी (संपा. विद्या बाळ, मेधा राजहंस, उन्मेष, २००५ )

‘मिळून सार्‍याजणी’ मधले हे एक सदर होते. अशा सदरासाठी लिहिणे म्हणजे एकेक प्रश्नासरशी एकेक पायरी उतरत स्वत:च्या मनाच्या काळोख्या तळघरात पोहोचणेच असते. कारण स्वत:शी संवाद करणे सर्वांत कठीण असते! त्यातली निवडक मनोगते या संपादित पुस्तकात समाविष्ट आहेत. स्त्री शिक्षणानंतर स्त्रीच्या विकासवाटेवरचा दुसरा टप्पा म्हणजे स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य होय. त्यामुळे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचे स्त्रीला फुटलेले पंख लक्ष वेधून घेतात. यात विविध वयोगटाच्या, विविध आर्थिक सामाजिक स्तरातल्या आणि शहरी – ग्रामीण स्तरातल्या स्त्रियांची मनोगते वाचायला मिळतात. ‘घरकाम हेही ‘अर्थ’पूर्ण आहे’, ‘मिळवतीचा मुकूट काटेरी आहे’, ‘प्रश्न तेरा कोटींचा आहे’ असे यातले अनेक लेख वाचताना मिळवती असूनही कधी ‘लोपामुद्रा’ राहिलेली तर कधी विस्तारणार्‍या अनुभवांनी श्रीमंत झालेली अशी स्त्रीची प्रतिमा समोर येते! मात्र स्त्रियांच्या अर्थस्वातंत्र्याची पातळी आणि त्यातून मिळणारी भावनिक सुरक्षितता दरवेळी एकसारखी असल्याचे चित्र त्यात आढळत नाही. या पुस्तकातून स्त्रीविकासाच्या वाटेवरची नवनवी आव्हाने समोर येतात. यातील रोहिणी भट-सहानी, श्यामला वनारसे, सरिता आवाड, मेघा राजहंस, शोभा भागवत आदींचे लेख महत्त्वाचे आहेत. काहींनी आपल्या लेखातून कष्टकरी स्त्रियांच्या अनुभवांनाही शब्दरूप दिले आहे. अशा प्रकारचे सदर चालवून स्त्रियांना स्वत: डोकवायला प्रवृत्त करण्याच्या विद्याताईंचा प्रयत्न म्हणजे संपादक म्हणून वैचारिक सुईणपण पत्करण्याचेच कार्य आहे.

  • डॉटर्स ऑफ महाराष्ट्र  (१९९७)

यात विद्याताईंनी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख करून दिली आहे. मुलाखती व छायाचित्रे यांना या संपादित ग्रंथात स्थान मिळाले आहे. विद्याताईंमधील स्त्रीविषयक आस्था यामागे आहे.

५) संपादकीय कारकीर्दीचे वाङ्मयीन श्रेय :

विद्याताई यांचा पिंड पत्रकाराचा होता. त्यांनी ‘स्त्री’ या मासिकापासून आपली लेखणी सातत्याने समाजहितासाठी उपयोगात आणली. १९६४ पासून त्यांनी ‘स्त्री’मध्ये काम केले. १९८३ ते १९८६ दरम्यान त्या ‘स्त्री’च्या मुख्य संपादक होत्या. स्त्रीचा वाचकवर्ग मुख्यतः मध्यमवर्गीय त्यातही अधिक प्रमाणात संसारी स्त्रिया! तरीही त्यांना आतून जागे करण्याचा प्रयत्न विद्याताईंनी केला. (मला आठवतंय, ‘शिक्षणाने मला काय दिले?’ या विषयासाठी ‘स्त्री’मधल्या विद्याताईंनी केलेल्या आवाहनाला मी त्या काळी प्रतिसाद दिला होता!) विद्याताईंनी ‘स्त्री’ची चौकट मोडून न टाकता ती हळूहळू वाकवत सैल केली. ‘पर्सनल इज पॉलिटिकल’चा खरा अर्थ सर्वदूर पोहोचवायचा प्रयत्न त्यांनी ‘स्त्री’च्या माध्यमातून केला. त्यांचे हे श्रेय नोंदवायला हवे. नंतर त्या ‘स्त्री उवाच’ या वार्षिकाच्या एक वर्ष संपादक होत्या.

‘मिळून सार्‍याजणी’च्या (स्थापना ऑगस्ट १९८९) त्या संस्थापक संपादक होत्या. ‘मिळून सार्‍याजणी’तील संपादकीय दृष्टीतून विद्याताईंची वाङ्मयीन मूर्तीच जणू प्रकट होते. बाईपणाला सहज ओलांडू बघणार्‍या बाया, त्यांच्या ओठांच्या उंबर्‍यात अडखळून थांबलेले शब्द, ते व्यक्त करण्यासाठीची कल्पक सदरे, विचारदूत ठरावी अशी विश्वभान देणारी माहितीपूर्ण भाष्ये, लेखमाला भारतीय भाषांमधल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींचे अनुवाद, वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक, बोलकी मुखपृष्ठे, सुजाण पुरुषांनाही बरोबर घेत कालानुरूप बदललेली घोषवाक्ये… अशी कितीतरी वैशिष्ट्ये या अंकांनी, मानंदड ठरतील अशा उंचीची निर्माण केली आहेत. १९९५ मध्ये या अंकात ‘सरोगेट मदरहूड’ हा विषय आला होता. जणू तो ‘फ्यूचर शॉक’ होता! मार्जोरी अ‍ॅग्रोसिन, ज्यो रोमन अशा अपरिचित लेखिकांची वैचारिक झेप विद्याताईंनी वाचकांच्या आवाक्यात आणून ठेवली होती. त्याच वेळी सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, आणि ‘मैतरिणी’ अशी साद घालत ग्रामीण स्त्रीविश्वही मासिकात सामील करून घेतले होते. त्यांनी इंग्लंडमध्ये केलेल्या ‘विमेन, मेन अँड डेव्हलपमेंट’ या अभ्यासक्रमातून मिळवलेले पैलूदार शिक्षण या मासिकाच्या भक्कम वैचारिक पायासाठी उपयोगी पडले होते आणि त्यांच्या अभिरुचीपूर्ण कलादृष्टीला व्यापक समाजभानाची जोड मिळाली होती. (‘मिळून सार्‍याजणी’तील वीस वर्षांमधील निवडक लेखांचे संपादन मी ‘स्त्रीमिती’ (मौज, २०१०) मध्ये केले होते. विद्याताईंनी माझ्यावर ती जबाबदारी टाकली याची कृतज्ञ जाणीव येथे व्यक्त करावीशी वाटते.) विद्याताईंना या मासिकासाठी अनेक सहकारी व लेखक यांचे सहकार्य लाभले. (डॉ. गीताली वि. मं. अनेक वर्षे विद्याताईंबरोबर काम करीत होत्या. आणि आता तो वारसा पुढे चालवत आहेत.) या मासिकातून विद्याताईंनी नव्या जाणिवांचे उद्गार नोंदवले, नव्या विचारांची रुजुवात केली आणि नवी परिभाषाही रुळवली. विशेषत: स्त्री-पुरुष ‘समता’ असा शब्दप्रयोग त्यांनी रूढ केला. मराठीत ‘सेक्स आणि जेंडर’ असे दोन वेगळ्या अर्थच्छटांचे शब्द नाहीत. ही उणीव भरून काढण्यासाठी ‘सेक्स’ – ‘लिंग’ आणि ‘जेंडर’ – ‘लिंगभाव’ अशी परिभाषिक संज्ञा त्यांनी रुळवली. तसेच स्त्री-पुरुष समानता असे म्हणणे अचूक अर्थवाही नाही. कारण समानता म्हणजे एकसारखेपणा! त्यामुळे विद्याताईंनी ‘समता’ ही मानवी मूल्यवाचक संज्ञाच वापरली. म्हणजे स्त्री आणि पुरुष एकसारखे नाहीत; तरीही व्यक्ती या नात्याने त्यांना समान पातळीवर वागवले पाहिजे, हे सामाजिक मूल्य त्यातून अधोरेखित झाले.

संशोधन प्रकल्पांची आवश्यकता :

विद्याताईंचे बरेच लेखन अजूनही प्रकाशात आणायचे आव्हान आहे. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींविषयी आणि पुस्तकांविषयी अनेक मासिकांतून लिहिलं आहे. त्यांनी ‘वाङ्मय शोभा’ मासिकातून इंग‘जी कथा-कादंबर्‍यांचा परिचय करून देणार्‍या ‘वाहते वारे’ या सदरामध्ये लेखन केल्याची नोंद वाचायला मिळते. त्यांनी कथा-लेखन केले असल्याचा उल्लेख स्वत:च आपल्या ‘शोध स्वत:चा’ या पुस्तकाच्या सुरुवातीला केला आहे. इतके नव्हे, तर ‘तुमच्यामाझ्यासाठी’ या पुस्तकात त्यांनी ‘इच्छा शेवटच्या इच्छेची’ हा लेख लिहिला आहे. तो लक्षात घेण्यासारखा आहे. त्या विद्याताई लिहितात, ‘खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी एकदा कथासुद्धा लिहीत होते, तेव्हा माझ्या कथेतील नायिका मृत्यूच्या जवळ जात असताना म्हणत होती; माझी एकच विनंती आहे. जन्मभर मी सगळ्यांसाठी जगले! जगले नाही केवळ माझ्यासाठी! म्हणून मेल्यावर माझ्या देहावर कोणी फुलं वाहू नका! मी मला आवडेल अशी जगलेलीच नाही!’

तेव्हा विद्याताईंच्या नावाने सुरू होणार्‍या अध्यासनातर्फे विद्याताईंच्या समग्र लेखनाची संशोधनपर सूची करण्याचा प्रकल्प राबवता येईल. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये ‘स्त्री साहित्य’ हा विषय अभ्यासक्रमांमध्ये आहे का? एम. फिल., पीएच. डी. या पदव्यांसाठीच्या संशोधनासाठी किती लेखिका आजवर सामविष्ट केल्या गेल्या आहेत याचे संशोधन करणारा सर्वेक्षणावर आधारित प्रकल्पही राबवण्याची गरज अहे. विद्याताईंच्या साहित्याचा अभ्यास अशा अकादमिक चौकटीतून झाला आहे का? याचाही त्यातून उलगडा होईल! शेवटी स्त्रीवर होणारा अन्याय दोन प्रकारचा असतो. हे विसरता येत नाही. एक ढळढळीत स्वरूपाचा अन्याय आणि दुसरा उपेक्षित ठेवून केलेला अन्याय! तेव्हा अशा संशोधन प्रकल्पातून विद्याताईंच्या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचे प्रवाहीपण गतिमान राखायला मदतच होईल; असे मला वाटते.

डॉ. नीलिमा गुंडी

nmgundi@gmail.com

(पूर्वप्रसिद्धी : मिळून साऱ्याजणी, जानेवारी २०२१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *