40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

श्रमाची चोरी म्हणजे… निमित्त : सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर

जगभर १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं श्रमाला प्रतिष्ठा हे मूल्य अधोरेखित करण्यासाठी मिसा Online च्या मे २०२० च्या अंकात आपण घरकामगारांच्या श्रमाला मूल्य आणि प्रतिष्ठा यासंदर्भात श्री. सतीश भिंगारे यांचा लेख प्रसिद्ध केला होता. या लेखाचं नाव होतं – ‘सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर’. या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सविस्तर ऊहापोह करण्यापूर्वी ‘श्रमाची चोरी’ या संकल्पनेकडे थोडं विस्तारानं बघू या.

मालमत्ता, पैसे, दागिने, वस्तू यांची चोरी याविषयी आपण खूप संवेदनशीलपणे बोलत असतो. चोरी करणार्‍यांना ‘वाईट वागणारे’ असं म्हणत शिक्षाही करतो. त्यासंदर्भात कडक कायदेही आहेत. हे सगळं उचितच आहे. तसंच वाङ्मयचौर्याविषयीसुद्धा आपण जागरूक असतो, त्यासंदर्भातही कॉपीराइटचे कायदे आहेत. ते न पाळणार्‍यांना शिक्षा असते. हे सर्व तथाकथित बुद्धीजीवी तसंच श्रीमंत लोकांच्या हिताचं रक्षण करणारं आहे. अर्थात त्याविषयी तक्रार असण्याचं काही कारणच नाही. पण अमुक व्यक्तीनं श्रमाची चोरी केली म्हणून त्याला शिक्षा झाली, असं कधी ऐकलंय? याचं उत्तर बहुधा ‘नाही’ असंच आहे. याचं मुख्य कारण ‘श्रमाची चोरी’ होते हे आपल्या गावीच नसतं. कारण समाजात हजारो वर्षांपासून बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशी उभी विभागणी जवळजवळ जगभर झाली आहे. यात बुद्धीजीवी श्रेष्ठ आणि श्रमजीवी कनिष्ठ असं मानलं गेलं आहे. भारतात त्याला चातुर्वण्याचा इतिहास आहे. तो सगळ्यांना माहीत आहे. आता आधुनिक काळात शूद्र आणि स्त्रियांना असणारी ज्ञानबंदी उठली आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन स्त्रिया आणि शूद्र शिकून आत्मसन्मान जपू लागले. त्यांचा आत्मविश्‍वास वाढून आत्मनिर्भर होण्याचा त्यांचा प्रवास थोडाफार सुकर झाला आहे. मात्र भारतात माणसं एकाच वेळी वेगळ्यावेगळ्या युगात जगत असतात. त्यामुळे सरसकट स्त्रियांची आणि शूद्रांची परिस्थिती सुधारली आहे असं म्हणता येत नाही. तरी सुधारणेच्या दिशेला काटा झुकतो आहे, हे दिलासा देणारं आहे.

सार्वजनिक ठिकाणी रस्ता, नाले सफाई करणारे सफाई कामगार शारीरिक श्रमाचं काम करतात. त्यांनी सफाई केली नाही तर? तसंच ड्रेनेज सफाई, मैला सफाईचं काम तर इतक्या वाईट परिस्थितीत करावं लागतं, की त्याचा या कामगारांच्या तब्येतीवर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतो. या कामाबद्दल त्यांना किती वेतन मिळतं? शिवाय ही कामं जी खरं तर जीवनावश्यक कामं आहेत, ती अतिशय हीन दर्जाची समजली जातात ते वेगळंच! यामध्ये काहीएक प्रकारचं कौशल्यही लागतं. पण या सफाई कामगारांकडे कसं बघितलं जातं, त्यांची परिस्थिती कशी असते, ते कोणत्या परिस्थितीत काम करतात याचं विदारक कथन ‘कचरा कोंडी’ या अतुल पेठेंच्या एका डॉक्युमेंटरीमध्ये केलेलं आहे. ती बहुतेकांनी बघितली असेल. नसेल त्यांनी अवश्य बघावी. यूट्यूबवर उपलब्ध आहे. सफाई कामगारांच्या कामाविषयी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञभाव आणि आदर आपल्या मनात असतो का? तो आपण कसा व्यक्त करतो? कितीदा व्यक्त करतो? याची प्रामाणिक उत्तरं आपल्या मनाशीच देऊ या. हल्ली त्यांना ‘सफाईदूत’ म्हटलं जातं. पण हा आदर फक्त शब्दरूपातच राहतो का? याचाही शोध घेऊ या. सफाईकामासाठी आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी सवर्णांनी कधी केल्याचं ऐकीवात आहे?

तिकडे जीवनदायी हॉस्पिटल्समध्येदेखील सफाई कामगार – आया यांचं वेतन किती? सुविधा कोणत्या? कामाचे तास किती? नर्सेसचे कामाचे तास आणि वेतन, सुखसोयी आणि डॉक्टरांच्या कामाचे तास, त्यांना मिळणार्‍या सुखसोयी -सुविधा आणि वेतन किती? या सगळ्यांमध्ये असणारी प्रचंड दरी आपल्याला माहीत असते, पण आपल्याला ती न्याय्य वाटते अथवा हे असंच असतं, असंच असणार असं म्हणून आपण त्याकडे काणाडोळा करतो. कारण आपल्या मनात खोलवर पुस्तकी शिक्षणाचं महात्म्य कोरलं गेलं आहे. ज्ञानाचं महत्त्व वादातीत आहेच! पण म्हणून ज्ञान कशाला म्हणायचं, हा प्रश्‍न बाजूला सारून चालत नाही. शेतकरी, कुंभार, लोहार, सुतार, माथाडी कामगार, कागद-पत्रा वेचक, बांधकाम मजूर, गवंडी, घरकामगार, सफाईकामगार हे भले निरक्षर अथवा अल्पशिक्षित असतील. पण म्हणून त्यांना कसलंच ज्ञान नाही असं म्हणायचं का? त्यांनी आत्मसात केलेली कौशल्य आणि त्यांचं काम यातून काहीएक ज्ञाननिर्मिती होते, असं आपण मानतो की नाही हा कळीचा मुद्दा आहे. त्यांच्या श्रमजीवी अनुभवजन्य ज्ञानाला गौण लेखण्यातूनच विषमतेची दरी रुंदावत गेली आहे, यात तरतमभाव असणार यात शंका नाही, पण…

मुख्य प्रश्‍न आहे तो आपण मूल्य म्हणून शारीरिक कष्टाकडे, श्रमाकडे कसं बघतो हा. माणूस सुखासीन आहे म्हणून त्याला कष्टाचा कंटाळा आहे आणि कष्ट करणं कमीपणाचं वाटतं. कमी बुद्धी असणारी माणसं कष्ट करतात असं काहीसं आपल्या मनात रुजलं आहे. त्याला आपली शिक्षण व्यवस्थाही जबाबदार आहे. सामाजिक न्यायाचा मुद्दा बाजूला सारत श्रीमंतांसाठी व गरिबांसाठी अशा दोन शिक्षणपद्धती तयार झाल्या आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेला ज्ञान कामगार (नॉलेज वर्कर्स) आणि सेवा कामगार (सर्व्हिस वर्कर्स) असे दोन समाजविभाग अभिप्रेत आहेत. ज्ञान कामगार संख्येने कमी आणि ठराविक स्तरातले! त्यांना उच्च असं ज्ञान व कसब दिलं जातं, त्यामुळे त्यांचं उत्पन्न जागतिक दर्जाचं! उलट सेवा कामगारांना त्यांच्या सेवेपुरतंच शिक्षण दिलं जातं. त्यामुळे त्यांना मर्यादित संधी मिळतात आणि उत्पन्नही कमी!! अतिशय महागड्या खासगी शिक्षणामुळे गरिबांसाठी पुन्हा एकदा ज्ञानबंदीच आहे, पण अघोषित!

खरं तर शिक्षण हे समाजाच्या नैतिक व बौद्धिक उन्नतीचं व लोकांच्या जीवनामध्ये गुणात्मक सुधारणा करण्याचं, सामाजिक एकता, समता व सौहार्द वाढवणार्‍या मूल्यप्रचाराचं साधन असायला हवं. तसंच राष्ट्राच्या उभारणीसाठी लागणारी तंत्रकौशल्यं सर्व समाजाला शिकवत, मानव संसाधन विकासाचं शिक्षण हे साधन असायला हवं. मात्र शैक्षणिक भेदभावाचं राजकारण व अर्थकारण ही आजची आपली सामाजिक शोकांतिका आहे. शिक्षण हा विषय जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या काळात तर फारच गुंतागुंतीचा आाणि गहन झाला आहे. त्याची चर्चा करण्याची ही जागा नाही, पण शिक्षणामुळे माणूस अधिक उन्नत आणि विवेकी व्हायला हवा हे गृहीत आहे. ते वास्तवात मात्र घडताना दिसत नाही, हे नोंदवून पुढं जाऊ.

पूर्वी आणि आजही बुद्धिजीवी विरुद्ध श्रमजीवी असं समीकरण आपल्या मनात पक्कं बसलेलं आहे. आपली समाजव्यवस्थाच तशी लावली गेली आहे. यात बुद्धिजीवी श्रेष्ठ आणि श्रमजीवी कनिष्ठ अशी उतरंड आहे. कारण बुद्धीचं (?) काम करणार्‍यांच्या तासाचं मोल जास्त आहे, श्रमाचं काम करणार्‍यांच्या तासांपेक्षा! हे न्याय्यच आहे असा युक्तिवाद असतो, कारण शिक्षणावर कितीतरी पैसा, वेळ खर्ची पडलेला असतो. आपला जन्म सुस्थित, शिक्षित घरात होतो की गरीब वस्तीत, अशिक्षित घरात होतो हे आपल्या हातात नसतं. मात्र जन्म कुठल्या प्रकारच्या घरात होतो, यावर ह्या व्यक्तीला शिक्षण किती मिळणार, समाजात त्याचं काय स्थान असणार हे अवलंबून असतं. तसंच ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष की इतर यावरही ते अवलंबून असतं. जात, वर्ग आणि लिंग या स्तरांवर आजही समाजात मोठ्या प्रमाणावर विषमता आहे. त्यामुळे तथाकथित कनिष्ठ जातीचे तसंच गरीब आणि स्त्रिया व इतर लैंगिक ओळख असणार्‍या व्यक्तींचं मोठ्या प्रमाणात प्रस्थापित व्यवस्थेकडून शोषण होतं, हे शोषण ‘श्रमाच्या चोरी’च्या अंगानं होतं. स्त्रिया व इतर लैंगिक ओळख असणार्‍या व्यक्तींचं लैंगिक शोषणही होऊ शकतं आणि त्याला श्रमाच्या चोरीचं अस्तर असतं. या सर्व विषमतेविषयी आणि शोषणाविषयी बोलणं आणि त्याच्या कारणाच्या मुळाशी जाणं सहसा आपल्याला नको वाटतं, कारण ते क्लेशदायक असतं. त्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या-आपल्या कुटुंबात-सग्यासोयर्‍यांबरोबर सुखासमाधानात राहणं पसंत करतो. आपल्या संपर्कात येणार्‍या घरकामगार, माळी, वॉचमन, धोबी इत्यादींशी सहानुभूतीने आणि कणवेनं वागतो हे चांगलं आहे, पण पुरेसं नाही. ‘जगात एवढी विषमता, शोषण, अन्याय, अत्याचार आहेत त्याविरुद्ध मी एकटी लढून काय होणार? ते सर्व बघून- ऐकूनही मन इतकं विषण्ण होतं की, न बघणंच उत्तम’ असाही एक सूर असतो. आपल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये सुखा-समाधानात राहणं ही एका परीनं माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पण समाजातलं शोषण, अन्याय्य विषमता दूर करायची असेल तर सगळ्यांनी आपापल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये बसून चालणार नाही. हे लक्षात घेऊनच डॉ. बाबा आढाव, मेधा पाटकर, मंदा व प्रकाश आमटे, उल्का महाजन, मेधा थत्ते, मुक्ता मनोहरसारखे कार्यकर्ते झोकून देऊन काम करत असतात. त्यांना इतर लोक आपापल्या परीनं हातभार लावत असतात. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातला या सर्व कार्यकर्त्यांचा संघर्ष अक्षरश: जीवघेणा असतो. त्या संघर्षाचा आदर करत त्याला हातभार लावणं ही आपली सजग नागरिक म्हणून जबाबदारी आहे. सगळेच जण घर-संसार, नोकरी-व्यवसाय सोडून झोकून देऊन काम करू शकत नाहीत, हे खरंच. पण निदान प्रस्थापित व्यवस्थेतल्या हितसंबंधांचं राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारणही आपण चिकित्सकपणे समजून घ्यायला हवं. त्या सर्वाला असणारं अर्थकारणाचं अस्तर लक्षणीय असतं. आपण चांगलं वागतो, अन्याय – शोषण करत नाही असं म्हणत कायद्याची गरज काय? प्रेम आणि सामंजस्यानं वागणं चांगलं, त्यातून माणुसकी जपली जाते हे वाटणं भाबडेपणाचं, राजकीय जाण नसणारं आहे. कारण समाजात चुकीचं वागणारे, अन्याय अत्याचार करणारेही अनेक जण असतात आणि त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारणं गरजेचं असतं. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे सुभाषित म्हणून चांगलं आहे. परंतु जसं आकाशातली वीज आधी दिसते आणि काही वेळानं ढगांच्या गडगडाटाचा आवाज ऐकू येतो, तसंच वास्तवात विचार करणं आणि तो कृतीत उतरवणं याच्या वेगात बहुतांश लोकांमध्ये अंतर असतं. प्रकाशलहरी आणि ध्वनीलहरीत असतं तसंच. त्यामुळे विचार-आचारात अंतर पडतं म्हणून दांभिक म्हणतील या भयगंडानं घाबरून जाऊन काळानुरूप नवा, योग्य विचारच न करण्यापेक्षा निदान नवा विचार तरी करायला हवा. त्यातून मग आपल्या-आपल्या वेगानं कृतीही केली जाऊ शकते. पण विचारच केला नाही, तर कृतीची शक्यता क्षीण-क्षीण होते. तात्पर्य काय तर ‘श्रमाची चोरी’ जात, वर्ग, लिंग या तीन अक्षांवर कशी कशी आणि किती किती होते आणि मुख्य म्हणजे या प्रस्थापित व्यवस्थेत ती का होते याचा चिकित्सक अभ्यास करण्याला पर्याय नाही. असो.

आता आपण सतीश भिंगारे यांच्या ‘सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर’ या लेखाकडे वळू या. कोव्हिड -१९ च्या काळातल्या लॉकडाऊनच्या लादल्या गेलेल्या एकांतवासामुळे झालेले मूल्यव्यवस्थेचे वस्त्रहरण हा या लेखाचा विषय आहे. उपहास, अतिशयोक्ती याचा वापर करत घरकामगार महिलांच्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा याविषयीची कळकळ त्यांच्या लेखातून स्पष्ट दिसते. मात्र त्याच वेळी त्यांनी सुखवस्तू गृहिणींना काढलेले चिमटे थोडे जास्तच बोचरे आहेत. मुख्य म्हणजे ते स्वत: या पितृसत्ताक – पुरुषप्रधान व्यवस्थेतले कुटुंब प्रमुख असणारे पुरुष आहेत. त्यांच्या घरात घरकामाचं व्यवस्थापन त्यांना करावं लागत नाही, म्हणून गृहिणींची अशी खिल्ली ते सहज उडवू शकतात असा समस्त गृहिणी परिवाराचा आक्षेप आहे. याची नोंद घेणं गरजेचं आहे. अर्थात गृहिणींची खिल्ली उडवतानाच त्यांनी निवृत्त सरकारी अधिकार्‍याची-स्वत:सारखी होणारी गोची निस्पृहपणे तशाच शैलीत सांगितली आहे. ते लिहितात, ‘सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला अधिकारी निवृत्ती पश्‍चात काही काळ एका विशिष्ट गंडाने पछाडलेला असतो. या गंडाचं मूळ आदेश घ्यायला कुणी नाही व परिणामी अधीक्षणाला (म्हणजे मुकादमगिरीला) वाव नाही या कोंडीजनक परिस्थितीत असते. याशिवाय (मुकादमगिरीशिवाय) कशाची सवय नसल्यामुळे ही मंडळी काही काळ सरबरीत होऊन जातात. सध्याच्या काळात या गंडानं पछाडलेल्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. असो.’ मुकादमगिरी हा श्रमाची चोरी या संदर्भात कळीचा मुद्दा आहे, आपण सर्वच जण कुठे ना कुठे मुकादमगिरी करतच असतो, नाही का? कुठे आणि कशी याचा शोध घेणं म्हणजेच आपण ‘श्रमाची चोरी’ करतो का याचा वेध घेणं आहे. श्रम शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक असे अनेक प्रकारचे असतात. सध्या ‘शारीरिक श्रमाच्या चोरी’वरच चर्चा केंद्रित करू या.

सफाई कामगारांवर देखरेख करणारा, बांधकाम मजुरांवर देखरेख करणारा, रस्त्यांच्या कामावर देखरेख करणारा इ. मुकादम आपल्याला माहीत असतात. पण इतरही क्षेत्रात जसं मॅनेजर, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक – प्राध्यापक, विश्‍वस्त, घरमालकीण वगैरे उच्चपदांवरची माणसांनाही मुकादमगिरी चुकलेली नाही. समाजात सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन, कामसू-कामचुकार अशा नानाविध प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी काही प्रकारची व्यवस्था असणं गरजेचं असतं. ह्यात असणारी सत्तेची, अधिकाराची उतरंडही आवश्यक आहे, असं अनेकांचं मत असतं. आपले अधिकार – हक्क यांविषयी जागरूक असणार्‍या व्यक्तींना आपल्या जबाबदारी व कर्तव्याची तितकीच प्रखर जाणीव आणि त्यानुसार कृती करणं जोपर्यंत जमत नाही, तोपर्यंत काम चांगलं आणि वेळेत करून हवं असेल तर या उतरंडीला पर्यायही नाही. पण या उतरंडीमुळे होणार्‍या शोषणाचं काय? म्हणजे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत, आणि म्हणून हे दुष्टचक्र चालूच राहतं. ते दुष्टचक्र भेदायला आंदोलनं – चळवळी करून व्यवस्था परिवर्तन झालं नाही, तरी निदान शोषणाला आळा तरी घालता येतो. व्यवस्था उत्क्रांत होत जाऊ शकते. त्याच्या छोट्या छोट्या खुणा आपल्याला दिसताहेत, हेही नसे थोडके.

या लेखावर पहिली प्रतिक्रिया ‘सार्‍याजणी’ची जवळची मैत्रीण प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका अश्‍विनी धोंगडे यांची आली. त्या लिहितात, ‘मला तर लेख अतिशयोक्त वाटला. एक तर पहिल्या भागाची गरज नव्हती. या निमित्तानं घरेलू कामगारांची संघटना व्हावी एवढाच मुद्दा आहे. आताच्या काळात कोणी उरलेले अन्न वा जुने कपडे देत नाही. त्यांची आर्थिक स्थिती इतकी वाईट नाही. पगार चांगले आहेत. त्या लेखकाच्या भाषेत ‘द्विज’पण आहेत. त्या नोकरीप्रमाणे काम करतात. माझ्याकडील तीन बायका स्कूटरवर येतात. आम्ही त्यांना कधीच एकेरी नावाने बोलवत नाही. सध्याचा पगार त्या ऑनलाईन घेत आहेत.’ त्यांची ही प्रतिक्रिया वाचून मला जरा आश्‍चर्य वाटलं. कारण त्यांच्या घरात आणि आजूबाजूलाही अनेक घरकामगार महिला त्या म्हणतात तशा सुस्थितीत असतीलही; पण त्या वर्तुळाबाहेर खरंच सर्व आबादीआबाद आहे का? त्याचं नकारात्मक उत्तर लगेच दुसर्‍या प्रतिक्रियेत मिळालं. मोलकरीण संघटनेचं काम गेली अनेक वर्षं करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा थत्ते यांनी लिहिलंय, ‘गीताली, सतीश भिंगारे यांचा लेख हेलावून टाकणारा आणि खूप छान आहे. तुला माहितीच आहे की, एप्रिलचा पगार द्यायला मालकिणी खळखळ करताहेत. हा लेख मी त्यांना पाठवेन. पण त्या वाचतील का?’

या दोन टोकांच्या प्रतिक्रियांमध्ये आमच्या ‘सखी सार्‍याजणी’ मंडळातल्या सख्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक पुरस्कृत ‘सखी सार्‍याजणी’ मंडळं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही आहेत. त्या सर्व मंडळांचा मिळून एक द्वैवार्षिक मेळावा वेगवेगळ्या गावात भरतो. २०२० चा मेळावा ४-५ जानेवारीला भुसावळ येथे दिमाखदारपणे साजरा झाला. या मंडळांना सतीश भिंगारेंचा लेख वाचून प्रतिक्रिया द्या, असं आवाहन केलं होतं. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला. बेंगळूरूच्या उषा सबनीस, भुसावळच्या सुनंदा औंधकर, सारिका फालक, उज्ज्वला मुंढे आणि प्रगती ओक तसंच मुंबईच्या प्रभा आमडेकर, अलकनंदा पाध्ये आणि रंजना आचवल यांनी आवर्जून प्रतिक्रिया पाठवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! पुण्याच्या ‘सखी सार्‍याजणी’नं तर जूनची बैठक त्याच विषयावर घ्यायची ठरवली. त्यामुळे प्रतिसाद जोरात होता. नंदिनी सातारकर, सरिता धनेश्‍वर, शशी भाटे, नलिनी नानल, नीना भेडसगावकर, मृणालिनी भणगे आणि अश्‍विनी धोंगडे या सर्व पुण्याच्या सख्यांनाही मन:पूर्वक धन्यवाद!

या सर्व सख्यांच्या प्रतिक्रिया घरकामात मदत करणार्‍या ताई, मावशी अथवा काकू यांच्याविषयी सहानुभूती, जिव्हाळा व्यक्त करणार्‍या आहेत. विरहानं प्रेम जसं उत्कट होतं, तसं आता लॉकडाऊनमुळे या सहकार्‍यांच्या विरहातून त्यांच्याविषयी भावपूर्ण आविष्कार त्या प्रतिक्रियांमधून ध्वनित होत आहेत.

सगळ्यांनाच त्यांच्या कष्टाची जाणीव प्रकर्षानं झाली आहे. अनेकींच्या मनात त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे. एकूणच या लेखावर चांगल्या-वाईट, उलट-सुलट प्रतिक्रिया आहेत. एक मात्र खरं की, या लेखानं सगळ्यांनाच अंतर्मुख केलं आहे. घरकामगारांची समस्या बहुपेडी आहे हे अनेकींच्या लक्षात आलं आहे. भुसावळच्या सुनंदा औंधकरांनी लिहिलंय, “अतिशय व्यापक विचार मंथनानं समृद्ध व सामाजिक भान असलेला हा लेख वाचला आणि मी आतून ढवळून निघाले. मला विचार करायला भाग पाडले की, मी सहावा वर्ण मानते का? मी किती जागरूक आहे? कृतीशील आहे का? मी आत्मचिंतन केलं आणि खूप गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या. पूर्ण मध्यम वर्गाला वरदान ठरलेली ही कामवाली आपण तिला किती सुविधा देतो? तिच्या सुरक्षिततेसाठी तिच्या उत्पन्नाएवढी रक्कम तुम्ही बाजूला बँकेत ठेवली पाहिजे. जेवढा पगार तेवढी रक्कम मी गेली पाच वर्ष बँकेत ठेवतेय. तिच्या वाढदिवसाला सुंदर साडी देत चला.  तिच्यापेक्षा आपल्या मनाला अतिशय आनंद होतो! आपण जी वाक्ये वापरतो – ‘त्या माजल्यात, किंमतच नाही आपली’ – ती बाजूला ठेवून त्या निश्‍चितच नम्र आणि प्रामाणिक राहतात, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. माझी कामवाली गेली वीस वर्षे टिकण्याचे हेच रहस्य आहे. दोघींचे हितसंबंध याच्यातच आहेत, असे मला वाटते. कामवाली ही आशा, आकांक्षा, भीती, प्रेम, पोकळ गर्व या सर्व बाबतीत एकाकी असते. आपली कामवाली स्त्री म्हणून जर आपणास कळली नाही, तर तिच्याशी परिपूर्ण संबंध कसे प्रस्थापित होणार? आपण सामाजिक भान ठेवू या, एकमेकांचा सन्मान करू या.”

भुसावळच्या प्रगती ओक यांनी विस्तारानं प्रतिक्रिया दिली आहे. एकूण स्त्रीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर त्या लिहितात, “मी स्त्रीची बाजू थोडी विरोधी पद्धतीने मांडतेय, पण मला असं वाटतं आपण स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. स्वत:चं अस्तित्व टिकवताना स्त्रीने कर्तव्य आणि जबाबदारी विसरता कामा नये. ते कुटुंब आणि समाजासाठी घातक आहे… पूर्वीपासून बघता बाईच बाईची शत्रू असते हे जाणवते.”  इथे प्रगती ओक यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की, बाईच बाईची शत्रू होण्यास पितृसत्ताक पुरूषप्रधान व्यवस्था जबाबदार आहे. कुटुंबाचा पाया हा विवाहावर आधारलेला आहे आणि विवाह संस्था पिता ठरवण्यासाठी केलेली पुरुषप्रधान व्यवस्था आहे. यात नात्याची उतरंड आहे. यातले सत्तासंंबंध मुख्यत: पुरूषाचे हितसंबंध जपणारे आहेत. त्यातून मग मुलाच्या आईला त्याच्या लग्नानंतर सत्ता मिळते. घरकाम, बालसंगोपन, घराचं व्यवस्थापन बाईनंच करायचं (त्याला पैसा आणि प्रतिष्ठा नाही) पण घर मात्र पुरूषाच्या नावावर! सासू-सुनांचं पटत नाही, म्हणून बाईच बाईची शत्रू म्हणायचं, पण ज्या पुरूषामुळे हे नातं निर्माण होतं, तो पुरूष आईकडून आणि बायकोकडून आपल्याला हवं तेव्हा, हवं तसं करून घेतो, हे लक्षात न घेता सासू-सूना एकमेकींचा राग करत राहतात. स्त्री चळवळीनं व्यवहारात स्त्रीच स्त्रीची शत्रू दिसत असली, तरी त्याची कारणं पितृसत्ताक पुरूषप्रधान व्यवस्थेत कशी दडली आहेत, हे खूप विस्तारानं, चिकित्सकपणे मांडलं आहे. पण अजूनही स्त्रियांना त्याविषयी खोलात शिरून समजून घेऊन व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करावासा वाटत नाही, याचा उद्वेगजनक अनुभव पुन:पुन्हा स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांना येतो. पुरूष पुरूषांचे फार मित्र असतात का? मारामार्‍या, खुना-खुनी पुरूषच करतात ना? भाऊबंदकी हा शब्दच बोलका आहे. राजकारणात तर ते एकमेकांवर किती वाईट पद्धतीनं कुरघोडी करतात. पण बघा ना, पुरूषच पुरूषांचे शत्रू आहेत  असं वाक्य आपण कधी ऐकलंय का? याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. याचं कारण पितृसत्ताक पुरूषप्रधान व्यवस्थेचं हे पुरूषधार्जिणं राजकारण आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. याचा अर्थ स्त्री विरुद्ध पुरुष असं मात्र नाही हेही सतत अधोरेखित करायला हवं. या व्यवस्थेत पुरूषांचीही गोची होतेय, कोंडी होतेय. त्यांना घराबाहेरच्या जगात स्पर्धेला सतत तोंड द्यावं लागतं. संरक्षकाच्या भूमिकेचं दडपण असतं, उघडपणे रडता येत नाही. भीती वाटते म्हटलं, तर त्यांची मर्दानगीच धोक्यात येते इ.इ. म्हणजे या व्यवस्थेत पुरूषपणा आणि बाईपणाचे घट्ट साचे बनलेले आहेत. यातला बाईपणाचा साचा मोडायला स्त्री चळवळीमुळे मदत झाली आहे, पण पुरूषपणाच्या साच्याला आत्ता कुठे थोडे थोडे तडे जायला लागलेत. या दोन्ही साच्यांच्या जाचामुळे संवेदनशील माणूसपणाची वाटचाल स्त्री-पुरुष दोघांसाठीही अवघड आहे. स्त्री मुक्तीचा खरा अर्थ मानवमुक्ती आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष आणि इतर लैंगिक ओळख असणार्‍या सर्वांनी चांगलं माणूस होणं हे स्त्री मुक्ती चळवळीला अभिप्रेत आहे. त्यामुळे सर्वांनीच कर्तव्य आणि जबाबदारी विसरता कामा नये. तसंच त्याग, सोशिकता, समजूतदारपणा, सेवाभाव ही मानवी मूल्यं आहेत, ती फक्त स्त्रीलाच सांगत बसू नये, पुरूषांमध्येही ती रुजवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आपण मात्र एकतर्फी स्त्रीलाच कर्तव्य जबाबदार्‍या, त्याग इ. सांगून तिचा तेजोभंग करतो का, याचा विचार आधीच्या पिढीतल्या स्त्रियांनी पण करायला हवा ना?

पूर्वीपासून घर-संसार-कुटुंब टिकवण्याची जबाबदारी स्त्रीवरच टाकली गेली आहे. आमच्यासारख्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा स्त्रियांना घरात अन्याय, अत्याचार सहन करू नका, आत्मसन्मान जपा असं आवाहन केलं, तेव्हा या कार्यकर्त्यांना ‘घरफोड्या बायका’ अशी दूषणं दिली गेली. कार्यकर्त्यांचं ऐकून सुखी-समाधानी घर-संसार सोडायला, मोडायला स्त्रिया काय मूर्ख होत्या का? आताच्या मुली परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि समन्वयाची अपेक्षा करतात. एकतर्फी सोशिकता, त्याग, नमतं घेणं त्यांना मान्य नाही. लगेच याचा अर्थ त्या ‘आगाऊ’ झाल्यात, मनमानी करतात असा लावू नये. त्यांना दोष देताना नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, तरूण पुरूष बदलले आहेत का याचाही तपास करावा, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं.

भुसावळच्या उज्ज्वला मुंढे म्हणतात, “समाजात घरकाम हे स्त्रीनेच केले पाहिजे, असा जणू नियमच आहे. घराबाहेर पडलेल्या या स्त्रियांना घरी संशयित वागणूक व बाहेर तर त्या असुरक्षित! एकूण तिचा मानसिक व शारीरिक छळ होतो. या गोष्टी कायद्यानं बदलणार नाहीत, तर स्त्री व पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्री व पुरुष दोघांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे समाजाला कळलं पाहिजे. आपले घर – गाव सोडलेल्या मजुरांचे लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी गावी परत जात असलेले लोंढे – त्यांची ती उन्हातान्हातली ससेहोलपट, अगतिकता पाहून मन विदीर्ण होत होते. हातातला घास तोंडापर्यंत जात नव्हता. स्त्री शक्तीचं प्रतीक तर पुरूष पराक्रमाचं अधिष्ठान आहे. स्त्री व पुरूष दोन्ही एकमेकांना समजून घेऊन वागले, तर वेळ लागेल पण आपण खरंच ‘आत्मनिर्भर’ होऊ. आपला देश ‘सुजलाम सुफलाम’ होईल. यासाठी आपण सार्‍यांनी मिळून प्रयत्न करू या. नवं मन्वंतर व सहावा वर्ण हा सुवर्ण वर्ण होवो, अशी आशा बाळगू या.”

सारिका फालक यांनी भुसावळहून लिहिलंय, ” मूळ गावी परतण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करूनही सगळे मजूर घरी परतले असतील का? नाही. काही रस्त्यात भुकेने, तहानेने, कोरोनाने मेले आहेत. काही चालून दमल्यामुळे. बिकट परिस्थितीत आपल्यातली मानवता जागरूक होते आणि आपण पैसे, औषधं, अन्न-पाणी, कपडे आदी देऊन मदत करतो. या सगळ्याबरोबरच भारतात सध्या क्रांती घडत आहे ती एकजुटीची! आरोग्याच्या बाबतीत सगळे जागरूक होत आहेत. एक वेळ जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण आरोग्य टिकवण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा. आरोग्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच झटताहेत. देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य संघटना, हॉस्पिटलला आर्थिक सहाय्य करू. भारतीय जीवनशैलीचा अवलंब करू. ‘मेड इन इंडिया’ वस्तू घेऊ. छोटे उद्योग निर्माण करू, परदेशी कंपनीच्या उत्पादनांचा वापर थांबवू. भारतातच राहून चांगले सुशिक्षित, सुरक्षित नागरिक बनू.”

बेंगळूरूच्या उषा सबनीस लिहितात, “लॉकडाऊनमध्ये मी गृहिणीचं मॅनेजमेंट टेक्निक वापरलं आणि मुलं, नवरा यांच्याकडून कामं करून घेतली. प्रत्येक जण जबाबदारीनं काम करू लागले. स्वावलंबी झाले. घरात परस्परांबद्दल अधिक काळजी, आपुलकी दिसू लागली. एकमेकांचा संवाद, सहवास वाढला. नवर्‍यानं सहकार्य केलं. मुलं किती तरी गोष्टी शिकली. मीही हॉटेल बंद म्हणून नवे चांगलेचुंगले पदार्थ बनवले. लेखकानं सहाव्या वर्णाविषयी जे म्हटलंय ते नक्कीच अधिक विचार करायला लावणारं आहे. त्यांची संघटना व ब्यूरो यांमधले संबंध चांगले असावेत. आपण फार परावलंबी राहू नये. कामवालीशी नेहमीच चांगलं वागावं, तिला खुश ठेवावं. हे आपल्या हिताचे आहे. तिच्यामुळे आपले छंद जोपासता येतात. न मागता तिचा पगार वाढवून द्यावा. खूप कंटाळा आला की, माझ्या सरूची खूप आठवण आली. तिला फोन केला. तीपण कामाला यायला खूप अधीर झाली होती.”

मुंबईच्या प्रभा आमडेकर यांनी लेखाच्या सुरूवातीला असलेल्या चित्राला दाद दिली आहे. त्या लिहितात, ‘अष्टभुजेच्या पायापाशी नतमस्तक होऊन बसलेले मालक आणि मालकीण दिसत आहेत. किंमत कळून चुकल्याचा शब्देविण संवाद आहे. खूप छान! मोलकरणींनी आपली किंमत ओळखून ती वसूल करायला शिकलं पाहिजे. कामवाल्यांना अष्टभुजा समजून आपण सर्वच कामाची अवाजवी अपेक्षा करतो का? अशी अपराधी भावना बघणार्‍याच्या मनात उत्पन्न करणरं हे चित्र बोलकं आहे. आपली किंमत ओळखायला आणि ती वसूल करायला शिकलं पाहिजे हे लेखकाचं म्हणणं बरोबर आहे. यासाठी त्यांचीच काय, आपलीही मानसिकता तयार झाली पाहिजे. मात्र लेखकानं जुन्या सुस्थितीतल्या वस्तू मदतनिसांनी घेऊ नये म्हटलंय ते पटलं नाही. कारण कोणतीही वस्तू निरूपयोगी होईपर्यंत वापरणं यात कमीपणा वाटण्याचं कारण नाही. आता स्वावलंबनाची सवय झालीच आहे, तर आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यावी, मात्र तो दिवस एकमेकींच्या सोयीनं ठरवावा. शिवाय महिन्यात एक रजा, वर्षातून आठवडाभर सुट्टी इ. महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत.”

मुंबईच्या अलकनंदा पाध्ये लिहितात, “सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर नेमका प्रकाश टाकला आणि विचारार्ह उपाय सुचवले, त्याबद्दल अभिनंदन. आजवर घरकामगारांसाठी अनेक आंदोलनं छेडली गेली, परिणामी अनेक योजना जाहीर झाल्या. काही लाभार्थी आहेत. तरीही लेखात म्हटल्याप्रमाणे कष्टकरी वर्गाच्या परिस्थितीत फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. ब्यूरोची संकल्पना अतिशय योग्य; पण घरगुती सेवेसाठी तात्पुरता सेवा काळ दोघांनाही सोयीचा नाही. घरकामगार-मालक नाते परस्परावलंबित्वाचं आहे, हे मान्य करायला हवं. जास्तीच्या कामाची अपेक्षा चूक, निषेधार्ह ठरते. सरसकट सर्व घरमालक शोषक किंवा पिळवणूक करणारे आहेत, असं लेखकाला अभिप्रेत आहे का? लेखकाने आंतरजाल आणि इतर समाजमाध्यमांचे संदर्भ घेतले आहेत. प्रत्यक्ष भोवतालच्या जगातले नाहीत, तसे घेतले असते तर निरीक्षण कदाचित थोडं वेगळं झालं असतं. शीर्षकातला सहावा वर्ण ही संकल्पना पटण्यासारखी नाही. एकदा स्त्रियांना (यच्चयावत्) गौण, हीन समजून त्यांचं वर्गीकरण पाचव्या वर्णात जर केलेलंच आहे तर त्यात जात-पोटजातीप्रमाणे घरकामगार स्त्रियांना सहाव्या वर्णात टाकण्याचं प्रयोजन समजलं नाही. मग कचरावेचक महिला, देहविक्रय करणार्‍यांचा वेगळा वर्ण असेल ना? स्त्रियांचं शोषण, भेदभाव फक्त भारतीय उपखंडातच नसून जगभरातील मुस्लिम आणि अत्यंत प्रगत अशा ख्रिस्ती बहुसंख्य देशातही हीच परिस्थिती आहे. अर्थात कनिष्ठ वर्गातल्या स्त्रियांना शारीरिक-मानसिक हिंसेचा फटका अधिक बसतो हे जळजळीत वास्तव आहे.” र. धों. कर्वे, महर्षी वि. रा. शिंदे आणि विशेषत: रँड यांचा उल्लेख अलकनंदाताईंना चुकीच्या पद्धतीनं आला आहे असं वाटलं आहे. त्यामुळे शेवट त्यांनी म्हटलं आहे, “थोडक्यात एक चांगला विषय नेमकेपणानं मांडण्याऐवजी त्यातील अनेक पैलूंचा सखोल विचार करण्याऐवजी लेखकाने त्यानिमित्ताने त्यांना खटकणार्‍या अनेक विषयावर टीका-टिप्पणी करत, फटकारत विनाकारण लेख विस्तारित केल्यासारखा वाटतो.”

मुंबईच्या कुर्ला-चेंबूर सखी मंडळ सदस्य रंजना आचवल लिहितात, “लेख खूप अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा आहे.७०-८० वर्षांपूर्वी मोलकरणींना घरात प्रवेश नव्हता. पण गरजेनुसार बदल होत गेले. मी शहरातच वाढलेली असल्यामुळे शहरातल्या स्मार्ट मदतनीसच बघितल्यात. नोकरी करणार्‍या नवरा-बायकोसाठी आत्यंतिक गरज म्हणून मदतनीस हे मदतीसाठी पायाचा दगड ठरतात, असं लेखक म्हणतात हे खरंच आहे. अनेक वर्षं काम करणार्‍यांबरोबर नातंही तयार होतं. त्या थोड्याफार शिकलेल्या, अनुभवांनी तल्लख असतात. स्मार्ट फोनही सहज वापरतात. पगार, काम यासंदर्भात दोघी जागरूक असतात. गरजेनुसार त्यांना उचलही मिळते. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे काही ठिकाणी कामवाल्यांकडून वेठबिगारासारखे काम करून घेणे, पगार द्यायला उशीर करणे, त्यांचा शारीरिक – मानसिक छळ करणे इ. प्रकार होतात. तसेच काम करणारेही घरात सेवा घेणारे वृद्ध असतील तर त्यांचे पैसे हडप करणे, चोर्‍या करणे, छोटी बाळं सांभाळायची असतील तर त्यांच्याकडे लक्ष न देणे, घरावर डल्ला मारण्याच्या उद्देशानं अगदी खूनही पाडणे असे प्रकार करतात. समाजाच्या मागणीनुसार बदल घडत गेले आणि सुधारणा झाल्या तर नव्याने काही समस्या उभ्या राहिल्या. या दोन्हीतून समतोल साधण्यासाठी ब्यूरो असावेत, हा लेखकाचा विचार चांगला आहे. मदतनीसांची वेलफेअरची जबाबदारी काही अंशाने ब्यूरो स्वीकारेल? मदतनीसांच्या निरोगीपणाची जबाबदारी ब्यूरो घेईल? असे व इतर अनेक प्रश्‍न आहेत. ब्यूरो हे सेवा देणारे व घेणारे यांच्यातील ‘दुवा’ असतील, तर मदतनीसांच्या सर्व प्रश्‍नांचा सांगोपांग विचार होऊन सेवा घेणार्‍यांचेही अनेक मुद्दे, अपेक्षांचा खोलात विचार होणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंच्या प्रश्‍नांचे निराकरण होण्यावर व ब्यूरोत काम किती पारदर्शकपणे व नि:पक्षपातीपणे होते यावर अशा ब्यूरोचे स्वागत होईल, अन्यथा ‘कालचा गोंधळ बरा होता’ अशी परिस्थिती होईल.”

वर चर्चिलेले काही मुद्दे पुण्याच्या ‘सखी सार्‍याजणी’च्या सदस्यांनीही मांडले आहेत. त्यातून त्यांचं महत्त्व ठळक होतं. त्यांचा पुन्हा उल्लेख न करता नवीन मुद्दे फक्त पुढे ठेवते. नलिनी नानल म्हणतात, “सतीश भिंगारेंच्या लेखाने समाज वास्तवाचं झणझणीत अंजन डोळ्यांत घातलंय. वर्षातून एकदा त्यांना व छत्री व चप्पलजोडी द्यावी. आपण जे वाण, वसा करतो ते त्यांना द्यावे. महिन्यातून दोघींच्या सोयींनी दोन रजा  द्याव्यात.’ शशी भाटे म्हणतात, “लेख वाचून आणि प्रत्यक्ष काम करून त्यांच्या कष्टाची जाणीव ताजी झाली. खरंच त्यांना कामातून मोकळीक मिळाली, असं वाटत असतानाच तिचा फोन. “ताई, तुम्हाला किती त्रास होत असेल ना? मी येऊ का लपून लपून?” नको म्हटलं कारण कोरोनाची भीती! पण आता दोन दिवस झाले ती येऊ लागली आहे.”

८० वर्षांच्या सरिता धनेश्‍वर लिहितात, ‘मोलकरणीच्या कमतरतेमुळे रोजच्या जीवनात अनेक समस्या एकदमच उभ्या राहिल्या. एखाद्या वेळेस २-४ दिवस रजा घेणाऱ्या या सहाव्या वर्णीय कामगारावर त्या परत आल्यानंतर ‘त्या का आल्या नसतील, काय समस्या असतील’, ह्याचा विचारच मनाला शिवला नाही. उलट तू माजली आहेत, तुला आमच्या पैशांची किंमत नाही, आयतं मिळतं आहे ना सगळं…’ असे ताशेरे मारणार्‍या आम्हांला ह्या लॉकडाऊनमध्ये चांगलाच धडा मिळाला. त्यांच्या कामाचं मोल लक्षात आलं. ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ हे पटलं. मन आत्मपरीक्षण करायला लागलं आणि या वर्णासाठी काही केलं पाहिजे ही जाणीव निर्माण झाली. प्रथम त्यांना या तीन महिन्यांचा पगार कोणतीही सबब न सांगता देणे, पुढे त्यांची विचारपूस करून आपल्या रेशन कार्डवरील धान्य त्यांना उपलब्ध करून देणे. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, वह्या, पुस्तके, युनिफॉर्मसाठी शक्य ती मदत करणे हे करायला हवं. सणावारांना त्यांची खणा-नारळाने ओटी भरावी, जेणेकरून त्यांच्याशी आणखी जवळचे नाते निर्माण होईल.” सरिताताईंची मुख्याध्यापक मुलगी शाळेतल्या ३५-४० मावश्यांसाठी अष्टमीला स्वत: केलेले उपवासाचे पदार्थ आणि एकीला नवी साडी व बाकीच्यांना चांगल्या पण वापरलेल्या साड्या देते. त्या साड्या त्यांना सरिताताई व त्यांची सून देतात. “बचतगटात सहभागी व्हायला मदत करावी. निवृत्त शिक्षकांनी त्यांच्या मुलांना मोफत शिकवावं” असंही त्यांनी सुचवलं आहे. त्या म्हणतात, “माझ्या मते समोरच्या माणसाच्या भावनांची कदर करून एक ‘माणूस’ म्हणून त्यांना वागणूक देणं हेच खरं अध्यात्म! थोडक्यात त्यांच्यातला आत्मविश्‍वास वाढवणं, त्यांना आत्मनिर्भर बनवणं यासाठी निर्धारानं वागू या. तुम्ही पण असंच वागणार ना?”

नितळ, प्रांजळ कबुली देणारं आणि चांगुलपणानं ओतप्रोत असं हे निवेदन मनाला उभारी देणारं आणि मदतनीसांची परिस्थिती सुधारायला मदत करणारं आहे, नाही का?

पुण्याच्या ‘सखी सार्‍याजणी’चं काम गेली अनेक वर्षं निष्ठेनं करणारी ‘सार्‍याजणी’ची मैत्रीण नीना भेडसगावकर म्हणते, “लॉकडाऊनमध्ये सर्वांनीच घरकाम निभावले. काहींनी नाइलाजाने, काहींनी नीट प्लॅनिंग करून नवरा-मुलं यांना मदतीला घेऊन कामाची घडी बसवली. या काळात सगळेच घरात असल्यामुळे न संपणार्‍या घरकामांची त्यांना प्रथमच जाणीव झाली आणि घरोघरी ऑनलाईन काम सांभाळून पुरूषांनी घरकामात थोडीफार मदत केली. ही ‘जाणीव’ हा लॉकडाऊनचा एक बहुमोल फायदा! लेखक म्हणतात त्याप्रमाणे आदर्श गृहव्यवस्थापनाच्या काही मूल्य कल्पनाही या काळात बदलल्या. कामवाल्या बायकांचे मोल तीव्रतेने जाणवले. एका यशस्वी कुटुंबाच्या मागे एक किंवा अधिक कामाच्या बायका उभ्या असतात, हे शहरातल्या कुटुंबांनी आणि विशेषत: करिअर करणार्‍या स्त्रियांनी मान्य केले आहे. त्यामुळे त्यांना सर्वतोपरी अधिक मदत खुशीनं करतात. पाच जूनपासून माझ्या स्वयंपाकाच्या बाई येऊ लागल्या. त्या साधारण चाळिशीच्या, सातवीपर्यंत शिकलेल्या. साधारण लिहिता-वाचता येणार्‍या. दोघींचा चहा झाल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘मामी, नेहमीप्रमाणे स्वयंपाक उरकून घ्या, पण आज पोळ्या मात्र मी करणार आणि आजच नव्हे, तर अधूनमधून मला वेळ असेल तेव्हा करणार. पण त्या वेळेत तुम्ही मला वाचून दाखवायचं. त्या थोड्या गांगरल्या, पण मग अडखळत का होईना वाचू लागल्या. आमचा हा ‘पोळ्या-वाचन प्रकल्प’ सुनेला व नातीला खूप भावला. नातीनं मामींना वहीत कात्रणं चिकटवण्याचं काम शिकवलं. त्या हे काम करताना सूनबाई मस्त रस्साभाजी करते. सामिलकीची ही नवी दैनंदिनी यशस्वी होईल असं वाटतं.” नीनाताईंचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय आहे, नाही का?

“कामवाल्या मैत्रिणींना कष्टाचे मूल्य, सोयी-सुविधा हे सर्व मिळायला पाहिजे, तसंच आत्मसन्मानाची, कामाला प्रतिष्ठा मिळण्याची आणि प्रेमाचीही त्यांना जरूरी आहे. मुळात घरकाम हे कायद्याच्या कठोर चौकटीत बसणारं कामच नाही. कायद्याच्या पलीकडे दोन्ही बाजूंनी परस्परांना समजून घेऊन प्रेमाच्या नात्याची अपेक्षा करणारे हे काम आहे. सुप्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांच्या ‘गप्पा ग्वाड’ या लेखाची आठवण करून देत नीनाताई म्हणतात, “कामवाल्या बाई कामाला आल्यावर दोघींमध्ये चहाच्या निमित्ताने १५-२० मिनिटं एकमेकींचं दुखलं-खुपलं (मनाला) सांगत-ऐकत, एकमेकींना त्यावर काही सुचवत होणार्‍या या मोकळ्या गप्पा दोघींनाही किती आश्‍वासक, प्रोत्साहक वाटतात हा तिचा एक अनुभव नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांना आपला वाटेल.” समारोपात नीनाताई म्हणतात, ‘श्री. भिंगारे यांचा लेख मनू संस्कृतीपासून आजही असणार्‍या सरंजामशाही मानसिकतेला धक्के देणारा आहे. (ते योग्यच आहे.) पण यातील सुस्थित गृहिणींची ‘आता कशी जिरली’ हा टोन खटकणारा आहे.” मृणालिनी भणगे आणि इतर मैत्रिणींनीही याला दुजोरा दिला आहे.

मृणालिनीताई सांगतात, ‘आमच्याकडे एक मावशी वीस वर्षे येत होत्या. घरातल्याच झाल्या होत्या. कधी घराची किल्लीही त्यांच्या हवाली केली जायची. मुलीबरोबर त्यांचं चांगलं जमायचं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला आम्ही २-३ कुटुंबानी मदत केली. नंतर फ्लॅट घ्यायलाही मदत केली. आता त्या मुला-सुनेबरोबर रिटायर्ड आयुष्य आनंदात जगत आहेत. लॉकडाऊनमुळे आताच्या बाईंबरोबरचं बॉंडिंग जास्त घट्ट, जवळचं झालं. त्यांचा फोन होता, “वहिनी तुम्हाला त्रास होत असेल. आता महिना झालाय. मी कामाला येते.” मीपण त्यांना लॉकडाऊन सुरू होणार म्हणून आठवणीने दोन महिन्यांचा पगार आधीच दिला होता. एकमेकांना जाणून घेऊन जे काम होतं, ते कायद्याने होणार नाही. ते प्रेमाने सहज होतं.”

नंदिनी सातारकर यांनी सर्व मुद्दे एकत्रितपणे मांडलेला लेख ऑगस्ट अथवा सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध करणार आहोत. लेखाचा विषय ‘सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर’ हा होता. त्यामुळे वरचे सर्व सकारात्मक अनुभव म्हणजे ‘दरिया में खसखस’ याची आम्हाला नम्र जाणीव आहे. शिवाय हे सर्व गोड-गोड वाचत असताना लॉकडाऊनच्या काळात घरकामगारच काय पण मालकिणीवरच्यासुद्धा कौटुंबिक हिंसा जगभरात वाढल्या आहेत ही चिंताजनक बाब समोर आली आहे याची नोंद घेऊ या.

‘सखी सार्‍याजणी’च्या सदस्यांना घरकामगारांच्या प्रश्‍नाविषयी राजकारणाचं आणि अर्थकारणाचं जेवढं भान असायला हवं तेवढं ते नाही याची खंत आहे. पण या लेखाच्या निमित्तानं त्यांच्या मनात कष्टकरी वर्गाविषयी निर्माण झालेली स्पंदनं त्यांनी मोकळेपणानं टिपली आहेत. याला आमच्या लेखी खूप महत्त्व आहे. ‘श्रमाची चोरी’ या संकल्पनेचा वाचकांनी या निमित्तानं स्वत:च्या संदर्भात विचार करावा, असं आवाहन आम्ही करत आहोत. आपल्या प्रतिक्रियांचा पुढील अंकात ऊहापोह करायला आम्हाला नक्की आवडेल. प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आमेन!

 

गीताली वि. मं.

संपादक, मिळून साऱ्याजणी 

saryajani@gmail.com

Image credit : <a href=”http://www.freepik.com”>Designed by macrovector / Freepik</a>