40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

संवाद

प्रिय वाचक,

सस्नेह नमस्कार!

जागतिक महिला दिन साजरा करणं आणि स्त्री-प्रश्नांबद्दलची आपली बांधिलकी बळकट करणं, लिंगभाव समतेचा विचार प्रगल्भ करत नेणं या दोन गोष्टी एकमेकींशी समांतरपणे चालायला हव्यात. परंतु गेली काही वर्षं तसं न होता, नेमक्या ज्या गोष्टींना आव्हान देण्यासाठी जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली त्याच गोष्टी उत्सवाचा भाग म्हणून या दिवशी साजऱ्या होऊ लागल्याचं दिसून येतं. इथे आपल्या असं लक्षात येईल की भांडवली बाजारपेठ ही खरोखरच एक लिंगनिरपेक्ष आणि मूल्यनिरपेक्ष अशी संस्था आहे आणि आपली इच्छा असली वा नसली तरी आपण सगळेच या संस्थेचे सदस्य होत जातो. प्रश्न एवढाच आहे की आपण मूक सदस्य बनून राहणं पसंत करणार की या संस्थेच्या कारभाराविषयी आपलं म्हणणं स्पष्टपणे नोंदवत राहणार.

विविध हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक चळवळींचं एनजीओकरण हा जसा सामाजिक चळवळींच्या एका टप्प्यावर महत्त्वाचा प्रश्न बनला त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनाचं आणि एकूणच स्त्री-प्रश्नाच्या संदर्भाने होणाऱ्या मांडणीचं ‘कॉर्पोरेटायझेशन’ हा एक गंभीर प्रश्न आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडूनही वेळोवेळी ‘स्त्री शक्तीचा जागर’ सुरु असला तरी त्यातून स्त्री प्रश्नांच्या गाभ्याला कितपत भिडलं जातं, समाजामध्ये मूल्यात्मक परिवर्तन होण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होतो हे प्रश्न उरतातच. टेलिव्हिजनसारख्या माध्यमांमधून एकीकडे ‘स्त्रीच्या बाजूने’ बऱ्याच मालिका सुरु असल्या तरी तिथेही सद्गुणी, कर्तृत्ववान स्त्री आणि घर फोडणारी खल प्रवृत्तीची स्त्री असं स्पष्ट विभाजन वारंवार दिसून येतं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे टेलिव्हिजनला डोळे लावून बसलेल्या एका मोठ्या समूहापर्यंत स्त्री-पुरुष संबंधातली असेल किंवा एकूणच आपल्या सामाजिक रचनेतली असेल – कुठल्याही प्रकारची गुंतागुंत कधीच पोचत नाही. जे दिसतं ते काळं किंवा पांढरं अशा दोनच स्पष्ट रंगांमध्ये दिसतं.

समाजाचा घटक म्हणून आपण जेव्हा आपल्यासमोर येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या चित्रणाकडे, ‘प्रदर्शना’कडे बघतो तेव्हा हे चित्रण मला सामाजिक गुंतागुंतीचं आकलन करून घ्यायला मदत करतंय की मला केवळ बायनरीमध्ये विचार करायला भाग पाडतंय हा प्रश्न आपण सुबुद्धपणे विचारण्याची गरज आहे. स्त्रीच्या कर्तृत्वाची भलामण करत त्या कर्तृत्वाचीही एक चौकटच तयार केली जात आहे का, या चौकटीसकट तिला मूळच्या ‘घरकेंद्री’ चौकटीत पुन्हा बसवलं जातंय का हे प्रश्न विचारणं आवश्यक आहे.

सामाजिक संदर्भातले प्रश्न एकरेषीय, एकदिश असे नसतात तर ते नेहमीच विविध दिशांना जाणारे आणि त्यामुळेच भिन्न भिन्न प्रकारे समजून घेण्याची गरज असलेले असतात. समाजातील जो वर्ग आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे, ज्या गटासाठी ज्ञानाची अनेक दारं खुली आहेत त्या वर्गाने तरी स्त्री-प्रश्नाच्या संदर्भात बाजारपेठीय भूमिका न घेता स्त्री चळवळीने मांडलेली, पुरोगामी भूमिका घेतली तर त्यातून एक मोठा संदेश जाऊ शकेल. बायनरीतून नॉन-बायनरीकडे जाणारा प्रवास सुरू होऊ शकेल.

जागतिक महिला दिनाचं स्वागत करताना या दिवसाचं औचित्य सांभाळलं जाईल आणि मुळात या दिवसाचं औचित्य काय आहे हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवलं जाईल अशी आशा बाळगूया.

सस्नेह,

उत्पल व. बा.

मिसा Online च्या या अंकात –

विचार आणि कृतींचे नवे आयाम : मिलिंद बोकील

गांधीजींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचं संशोधन : सुजाता पटेल (अनुवाद : विद्या कुलकर्णी)

दलित बहुजन स्त्रिया : भारतातील #मीटू च्या प्रणेत्या : निकिता सोनावणे, दिशा वाडेकर (अनुवाद : अनघा लेले)

विझलेल्या मेणबत्त्या : मंगला सामंत

स्त्रीवादी पुरुष म्हणजे कोण? : छाया दातार

बालक-पालक : मंदार काळे

हा ‘पैसा’ नावाचा इतिहास आहे – भाग २ : आनंद मोरे

एकविसाव्या शतकात तगण्यासाठी – भाग ६ : प्रियदर्शिनी कर्वे

भारतातील आरोग्य क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या राजकुमारी अमृत कौर : सुनीता भागवत

Power & Reign of the Mughal Matriarchs – Part 2 : Sanika Devdikar

Little big things – 8 : Anagha Kawley

संपादक : गीताली वि. मं.,  उत्पल व. बा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *