40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

संवाद / EDITORIAL

प्रिय वाचक,

सस्नेह नमस्कार!

‘मिसा Online’ चा हा सहावा अंक तुमच्यासमोर ठेवताना आमच्या मनात समाधानाची भावना आहे. मुद्रित माध्यमात आपला ठसा उमटवल्यानंतर डिजिटल व्यासपीठावर – जे आज माहिती, चर्चा, विश्लेषण व देवाणघेवाण यासाठीचं एक महत्त्वाचं आणि काहीसं अपरिहार्य व्यासपीठ बनलं आहे – आपलं अस्तित्व असावं आणि या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोचावं या उद्देशाने मिसा Online या मासिक अंकाची सुरूवात झाली. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या साथीमुळे मुद्रित अंक प्रकाशित होऊ न शकल्याने वाचकांशी जोडलं जाण्याच्या दृष्टीने डिजिटल अंकाची मोठीच मदत झाली. अंकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेकजणांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. ‘वाचक चर्चा’ हे मिळून साऱ्याजणीचं एक वैशिष्ट्य आहे. गेल्या एकतीस वर्षांमध्ये ‘मिळून साऱ्याजणी’कडून वाचकांना विविध विषयांवर बोलतं करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आला आहे. डिजिटल माध्यमावरही आमचा हा प्रयत्न कायम आहे. आणि त्याला वाचकही उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. माध्यम बदललं तरी ‘मिळून साऱ्याजणी’ची मूळची ‘संवादी बैठक’ नेहमीच कायम राहील. याचं श्रेय अर्थातच आमच्या ‘मुद्रित आणि डिजिटल वाचकां’चं आहे.

२५ मे रोजी अमेरिकेतील मिनियापॉलिस शहरात जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलिसाच्या ताब्यात असताना मृत्यू झाला आणि त्याविरूद्ध जगभर संतापाची लाट उसळली. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या आंदोलनाने पेट घेतला. कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांना यानिमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळाला. जगाच्या इतिहासात वांशिक आणि जातीय भेदभावामुळे आजवर भरडल्या गेलेल्या आणि आजही भरडल्या जाणाऱ्या कृष्णवर्णीय, दलित व इतर समूहांचा आक्रोश आणि त्यांच्या व्यथा मानवी संस्कृतीवर, सभ्यतेवर फार मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात. आज त्यावर काही प्रमाणात कायद्याने नियंत्रण आणलं असलं तरी केवळ त्यामुळे समाज म्हणून त्यातून आपली सुटका होणार नाही. आपण सगळेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या सामाजिक अन्यायाला जबाबदार आहोत. याबाबत आमच्या मनात अपराधभाव आहे आणि या सर्व समाजघटकांची आम्ही जाहीर माफी मागतो आहोत. वाचकांनीही या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि अशी ‘सामाजिक माफी’ मागावी असं आम्ही आवाहन करतो.

मे महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या सतीश भिंगारे यांच्या ‘सहावा वर्ण आणि भारतीय मन्वंतर’ या लेखाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेचा मागोवा घेणारा संपादक गीताली वि. मं. यांचा लेख या अंकात प्रकाशित होत आहे. २६ जून हा राजर्षी शाहू यांचा जन्मदिवस. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्रस्तुत लेखाला या दिवसाचंही औचित्य आहे. सामाजिक न्यायाशी जोडलेला संबंधित विषय केवळ ‘घरकामगार आणि आपण’ एवढ्यापुरता मर्यादित नसून ‘समाज म्हणून आपण श्रमाला मूल्य देणार की नाही?’ या व्यापक मुद्द्याशी जोडलेला आहे. इथे ‘मूल्य’ याचा अर्थ ‘आर्थिक मूल्य’ आणि ‘मूल्यात्मक महत्त्व’ असा दुहेरी आहे. हा दीर्घ लेख जरूर वाचा आणि लेखात मांडलेल्या ‘श्रमाची चोरी’ या संकल्पनेविषयी तुम्हांला काय वाटतं हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा.

जून अंकामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या परिसंवादानंतर या अंकापासून याच विषयाच्या अनुषंगाने प्रियदर्शिनी कर्वे यांची ‘एकविसाव्या शतकात तगताना’ ही लेखमाला सुरू होत आहे. पर्यावरणीय संतुलन हा आजचा अत्यंत कळीचा विषय केंद्रस्थानी ठेवून मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये (अन्नधान्य निर्मिती, पाणी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन इ.) आपल्याला नेमके काय बदल करावे लागतील. कसे करावे लागतील याचा मागोवा या लेखमालेतून घेतला जाणार आहे. यातही तुम्हां सर्वांचा चर्चात्मक सहभाग अपेक्षित आहे.

इंटरनेटवरील आर्थिक व्यवहार ही आता आपल्यापैकी अनेकांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. यात सोयीचा मोठा भाग तर आहेच, पण काहीजणांसाठी अद्यापही ही एक ‘भीतीदायक’ गोष्ट आहे. जे लोक इंटरनेटवरून नियमित व्यवहार करतात त्यांनाही यातील सर्व जोखमीच्या बाजू लक्षात आलेल्या असतातच असंही नाही. या पार्श्वभूमीवर ‘इंटरनेटवरील आर्थिक व्यवहार : ओळख व चर्चा’ ही कौमुदी अमीन यांची विशेष लेखमाला या अंकापासून सुरू होत आहे. कौमुदी अमीन वित्त भांडवल आणि फायनान्शिअल अ‍ॅप्लिकेशन्ससाठीचं सॉफ्टवेअर विकसन या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या वाचकांच्या प्रश्नांना, शंकांना उत्तरही देणार आहेत. तुम्ही त्यांना त्यांच्या इमेलवर आपले प्रश्न पाठवू शकता. शिवाय हे लेख फेसबुकवर शेअर केले जातील तिथेही कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.

सध्याचा कोरोना काळ, त्यातून उपस्थित होणारे प्रश्न याच्याशी आपण सगळेच झगडतो आहोत. या प्रश्नाला अर्थातच विविध आयाम आहेत आणि त्यावर माध्यमांमधून सातत्याने चर्चाही चालू आहे. व्यक्तिगत पातळीवर विचार करताना हा काळ म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ शोधण्याची संधी आहे असं प्रतिपादन करणारा गौरी जानवेकर या ‘मिळून साऱ्याजणी’च्या मैत्रिणीचा विश्लेषक लेख जरूर वाचा. एका अनोख्या फिल्म मेकिंगमध्ये रमलेल्या दोघींची शबाना दिलेर यांनी घेतलेली मुलाखत, प्रख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त (१९ जुलै) त्यांच्या स्वीय सहकारी कल्याणी गाडगीळ यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी, ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत व समाजशास्त्रज्ञ सुजाता पटेल यांचा एकटं राहण्याबद्दलचा, लग्नसंस्थेची चिकित्सा करणारा लेख यातूनही तुम्हांला काही नवं गवसेल, वैचारिक खाद्य मिळेल.

अंकातील इतर सर्व लेखही तुम्हांला आवडतील अशी आमची खात्री आहे. आपल्यातलं मूल्यभान सतत जागं ठेवत, प्रश्न विचारत, समकालीन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवत, आपल्याकडून होईल तितका प्रयत्न करत आपल्यातला सजग वाचक (आजच्या विशेष संदर्भात ‘माहितीचा उपभोक्ता’देखील)आणि क्रियाशील माणूस नेहमी जागा राहील याची काळजी घेणं ही आपल्या सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ आणि आता ‘मिसा Online’ यात आपला खारीचा वाटा उचलत आहे. वाचकांच्या पाठबळावर हा प्रवास असाच सुरू राहील असा आमचा विश्वास आहे.

तुमच्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत,

 

सस्नेह,

गीताली वि. मं.

उत्पल व. बा.

(संपादक)

 


Dear Readers,

We feel elated as we present the sixth issue of Misa Online. Today, digital platform is almost unavoidable for information sharing, discussion and analysis. Having left its mark in the print media, Miloon Saryajani made its foray into digital media with an objective to reach out to the discerning online readers. Due to Coronavirus pandemic, we could not publish the print issue since April 2020. Digital edition has helped us stay connected to our readers during this time. We have received overwhelming response to the digital edition. Miloon Saryajani has always encouraged readers’ participation in discussing various topics. It has remained as a unique aspect of the magazine. During last 31 years, a number of topical discussions by readers have been published. This effort continues on the digital platform. Although there is a change in the medium, Miloon Saryajani’s communicative approach has remained the same and it will remain so. The credit of course goes to our ‘print and digital readers.’

Following the death of George Floyd in Minneapolis on 25th May, the world witnessed a surge of protests. The clear call of ‘black lives matter’ was heard across the world. In the history of human civilization, racial and caste-based oppression has always posed a big question mark. It has been controlled to certain extent by legal measures, but that does not absolve us as a society from the crimes that we have committed. We all are responsible for the prevailing discriminatory situation that surrounds us and we sincerely apologize to all such human groups who have faced severe oppression from the privileged humans. We appeal to our readers to consider the gravity of this problem and seek a ‘social apology’.

Editor Geetali V. M.’s article in this issue elaborates the idea of ‘stolen labour’ with reference to an article by Satish Bhingare in the May issue and the ensuing discussion. The article deals with the key question of valuing human labour, both in monetary terms and as a social value. Do read this article and let us know your comments.

Following the discussions about climate change and Coronavirus in the June issue, Priyadarshini Karve is going to write a series from this issue with a focus on environmental balance and the things that we need to change in various spheres of public life. We look forward to have your feedback on the series. Kaumudi Amin is writing a series about internet-based transactions and the concerns associated with them. She has been working in the field of corporate finance and software development for financial applications. You can send her your queries on her email id. The articles will be shared on Facebook. Queries are welcome there too. Gauri Janvekar has written about how COVID-19 has given us an opportunity to find the true meaning of our being. In her article she discusses various concerns related to ‘to have’ and ‘to be.’ Do read the article.

We hope that you would appreciate other articles too. We at Miloon Saryajani and Misa Online is doing our bit in shaping a conscious reader and proactive human being. We believe that with your support our journey will continue unhindered.

Looking forward to your responses,

With love,

 

Geetali V.M.

Utpal V. B.

(Editors)