40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

संवाद 

प्रिय वाचक,

सस्नेह नमस्कार!

मिसा Online चा हा अंक एका दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सादर होतो आहे. ‘मिळून साऱ्याजणी’चे माजी विश्वस्त, ज्येष्ठ संपादक, लेखक सदा डुंबरे यांचं २५ फेब्रुवारी रोजी पुण्यात निधन झालं. कोरोनाचं निदान झाल्यावर काही दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. अतिशय शांत, साधे, सम्यक दृष्टी बाळगून विचार आणि लेखन करणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. ‘मिळून साऱ्याजणी’च्या वाटचालीत त्यांच्या मौलिक सूचनांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्मृतीस ‘मिळून साऱ्याजणी’ परिवारातर्फे विनम्र आदरांजली!

‘मिळून साऱ्याजणी’च्या मुद्रित अंकाचं ‘संवाद’ हे एक वैशिष्ट्य आहे. मिसा Online आधी विद्याताई आणि नंतर गीतालीताई यांनी प्रत्येक अंकाच्या या संपादकीयातून मासिकाची वैचारिक भूमिका स्पष्ट करत वाचकांबरोबरचं आपलं नातंही बळकट केलं. फेब्रुवारी २०२१ पासून ‘संवाद’चं नामकरण ‘शांतिसंवाद’ असं करण्यात आलं आहे. गीतालीताईंच्या कल्पनेतूनच हे झालं आणि ज्या काळात आपण जगतो आहोत त्या काळाच्या संदर्भाने हा बदल अतिशय स्वागतार्ह आहे.

समूहजीवनाच्या वाटचालीत मानवाने निर्माण केलेल्या धर्म, राज्यसंस्था, कायदे, नीतीविचार, कुटुंब या संकल्पना आणि त्यांचं संस्थाकरण यांचा विचार करताना, त्यांची चिकित्सा करताना आपल्या असं लक्षात येतं की व्यवस्थात्मक उभारणी समूहजीवनासाठी आवश्यक असली तरी समूहजीवनाचा गाभा माणसा-माणसांमधील निरोगी नातेसंबंध हाच आहे. माणसांना शासनव्यवस्थेची गरज भासते हे खरं असलं तरी केंद्रीकृत शासनव्यवस्थेवर कमीत कमी अवलंबित्व असलेला समाज हा अधिक प्रगल्भ समाज असतो. अशा प्रगल्भ समाजाची लक्षणं कोणती? तर स्वातंत्र्य-समता-बंधुता या मूल्यांचा मनःपूर्वक स्वीकार, या मूल्यांच्या नेमक्या अर्थाविषयी, उपयोजनाविषयी आणि त्यांच्या मर्यादांविषयीही विचार, या मूल्यांचं प्रत्यक्ष आचरण, मानवी गरजा, मानवी वृत्ती, मानवी विकार यांचा सतत अभ्यास आणि त्यांचं नियमन, धर्मसंस्था, प्रस्थापित नैतिकता, कायदे यांचं स्थान मान्य करून त्यांच्यावरील अवलंबित्व कमी कसं करता येईल याचा विचार. आता हे सगळं साध्य होण्याचा मार्ग म्हणजे विचारमंथन आणि एका किमान समान कार्यक्रमाची आखणी. राजकारणात ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम म्हटलं जातं तेच – फक्त सामाजिक संदर्भात. हे विचारमंथन करण्याचा, विचारांची, दृष्टीकोनाची देवाणघेवाण करण्याचा आपल्याकडील एकमेव मार्ग म्हणजे भाषा आणि भाषेच्या वापरातून होणारा आपल्यातील संवाद.

आजचं सामाजिक आणि राजकीय चर्चाविश्व कशा प्रकारे संवाद करतं आहे हे पाहिलं तर आपल्याला ‘शांतिसंवादा’चं महत्त्व पटेल. भारतासारख्या बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक देशात वेगवेगळे ‘वर्ल्ड व्ह्यूज’ अस्तित्वात आहेत ही खरं तर स्वागतार्ह गोष्ट आहे. या वैविध्यामुळेच इथल्या एखाद्या नास्तिकाचं मन तुकारामाच्या विठ्ठलभक्तीच्या अभंगाने उचंबळून येऊ शकतं आणि एखादा आस्तिक आपल्या कुटुंबातल्या नास्तिकाचं ‘ईश्वरावर श्रद्धा न ठेवण्याचं स्वातंत्र्य’ मान्य करू शकतो. असं असताना आज आपल्यातील संवाद इतक्या टोकाला का गेला असावा ही गंभीरपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

याचा संबंध आपल्या ‘मानसिक राजकियीकरणा’शी निश्चित आहे. टीव्हीसारख्या प्रभावी माध्यमातून लोकमतावर प्रभाव टाकणाऱ्या वृत्तवाहिन्या आज ज्याप्रकारे पत्रकारितेच्या मूल्यांना हरताळ फासत आहेत त्यातूनही हे होतं आहे. समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर आणि या माध्यमांचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर यातूनही हे होतं आहे. आपलं चित्त आज आपल्यापाशी किती राहिलं आहे आणि सतत येऊन आदळणाऱ्या माहितीच्या, मेसेजेसच्या, बातम्यांच्या माऱ्यामुळे दुसऱ्यांच्या हातात किती गेलं आहे याचा विचार आपण करायला हवा आहे. आपण आज सत्य शोधत नाही आहोत, समोर येईल त्याला सत्य मानत आहोत. वास्तविक सत्यशोधन ही माणसाची मूलभूत वृत्ती असायला हवी. तो खरं तर आध्यात्मिकतेचा एक पैलू आहे.असं असताना आपल्याला आपल्या स्वत्वापासून दूर नेणाऱ्या प्रभावांना आपण किती काळ थारा द्यायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे.

यासाठीच आपल्याला परस्परांमधला ‘शांतिसंवाद’ हवा आहे. यातला ‘शांति’ हा शब्द महत्त्वाचा आहे. दिसायला, समजायला सोपा आणि अनुभवायला कठीण असा हा शब्द आहे. चित्त शांत ठेवून परस्परविरोधी दृष्टिकोनांनी व्याप्त असलेल्या आपल्या समाजामध्ये आपण सगळेच एकमेकांशी, विशेषतः आपल्या विरुद्ध प्रकृतीच्या व्यक्तींशी, संवाद करू शकतो का, आपल्यासाठी अंतिमतः काय इष्ट आहे याचा शोध घेऊ शकतो का, विशिष्ट भूमिका घेण्याची आपली गरज आणि आपलं स्वातंत्र्य मान्य करूनही त्यामुळे आपल्या शांततामय सहअस्तित्वाला बाधा पोचायला नको यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी आपण ‘शांतिसंवाद’ साधणार आहोत का, हे आजचे कळीचे प्रश्न झाले आहेत.

आपला ऐतिहासिक वारसा लक्षात घेतला तर हे होणं अशक्य नाही याची आपल्याला खात्री पटेल. गरज आहे ती आपण मनातून आधी ‘शांत’ होण्याची. संवाद हा शांतीच्या पुढचा टप्पा आहे. शांतीच्या बळावर तो यशस्वी होऊ शकतो! आपल्याला हा ‘शांतिसंवाद’ साध्य करणं नक्की शक्य होईल या सदिच्छेसह,

सस्नेह,

उत्पल व. बा.

मिसा Online च्या या अंकात –

 स्त्रीवादी विज्ञान – एक समावेशक समज : स्वातीजा मनोरमा

विद्याताईंचे लेखन : प्रबोधयुगाच्या मूल्यांची बैठक : नीलिमा गुंडी

नियतकालिक पत्रकारितेचं ‘विद्याताई मॉडेल’ : उज्ज्वला बर्वे

Power & Reign of the Mughal Matriarchs – Part 1 : Sanika Devdikar

लघुकथा – अगडबंब पंखांचा म्हातारा : गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ (अनुवाद : प्राजक्ता महाजन)

पुष्पा भावे यांची नाट्यसमीक्षा : मीना गोखले

हा ‘पैसा’ नावाचा इतिहास आहे – भाग १ : आनंद मोरे

एकविसाव्या शतकात तगताना – भाग ५ : प्रियदर्शिनी कर्वे

मदर ऑफ सोशल वर्क – दुर्गाबाई देशमुख : सुनीता भागवत

Little big things – 7 : Anagha Kawley

संपादक : गीताली वि. मं.,  उत्पल व. बा.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *