40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

सामाजिक संबंधांचा समतोल

आपण जेव्हा ‘स्त्रिया व तंत्रज्ञान’ या विषयाचा विचार करू लागतो तेव्हा प्रामुख्याने एकाच चौकटीत प्रश्न विचारतो, ‘विविध क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्त्री मुक्त होऊ शकली का? स्वतंत्र झाली का? सक्षम होऊन पुरूषाच्या बरोबरीने आर्थिक. सामाजिक क्षेत्रात निर्णय घेऊन स्वतःचे ‘स्वत्व’ सिद्ध करणे तिला शक्य होऊ लागले का?

याचाच अर्थ आपण तंत्रज्ञान हे ‘न्यूट्रल’ आहे आणि त्याचबरोबर निसर्गाच्या मर्यादांपासून मानवाला — स्त्रियांना — स्वातंत्र्य देणारे आहे असे गृहीततत्त्व मानत असतो.

स्त्री-मुक्ती चळवळीतील एक प्रवाह-पर्यावरणीय स्त्रीवाद उपरनिर्दिष्ट गृहीततत्त्वालाच आव्हान देतो. सध्या विकसित झालेले तंत्रज्ञान हे भांडवलशाहीच्या चौकटीत, भांडवलशाही विकासाला अनुकूल अशा पद्धतीने झाले आहे. भांडवलशाही सुरू होण्यापूर्वीही तंत्रज्ञान होतेच, पण ते वेगळ्या गृहीततत्त्वावर अवलंबून होते. तसेच भांडवलशाहीच्या पलीकडेसुद्धा तंत्रज्ञान विकसित होऊ शकते आणि त्यासाठी वेगळी गृहीतके असणार आहेत.

वेगळी गृहीतके

या गृहीतकांमध्ये दोन महत्त्वाच्या तत्त्वांचा समावेश आहे.

१. तंत्रज्ञानामुळे मानवी श्रम सुलभ होणे व आरोग्यास अपायकारक परिस्थिती नाहीशी होणे आवश्यक आहे. परंतु पुष्कळदा हा परिणाम साधण्यासाठी ज्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते त्याच्या परिणामवत पर्यावरणाचा न्हास होत जातो. याचा अर्थ काही व्यक्तींना त्याचा फायदा मिळतो पण सर्व मानवसमूहाला मिळून त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे तंत्रज्ञान चांगले कोणते व वाईट कोणते हे ठरविण्यासाठी हा एक महत्त्वाचा निकष मानणे आवश्यक आहे. पर्यावरण शब्दपरयोगही येथे व्यापक अर्थाने घेणे आवश्यक आहे. केवळ नैसर्गिक संसाधने व त्यांचे व्यवस्थापन एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नसून मानवी शरीर व त्याच्या आतील पेशीरचना- व्यवस्था-याचाही येथे समावेश आहे. शरीरशास्त्रविषयक तंत्रज्ञान — विशेषत प्रजनन तंत्रज्ञान ज्या तऱ्हेचे व ज्या दिशेने वाढत आहे त्याचे निश्चित परिणाम एकूणच समाजाच्या आरोग्य परिस्थितीवर काय होत आहेत याचे खोलवर विश्लेषण आवश्यक आहे.

२. दुसरे महत्त्वाचे गृहीतक आहे ते सामाजिक सबंध व समाजरचना यावर तंत्रज्ञानाचा काय परिणाम होतो आहे ते तपासणे आवश्यक आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे-विशेषतः प्रजननविषयक-स्त्री मुक्त होत आहे, स्वतंत्र व सक्षम होत आहे आणि पुरुषाबरोबर स्पर्धा करत समानता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात यश मिळवीत आहे असे चित्र तयार करणाऱ्या ‘तंत्रज्ञान’वाद्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. हे विकसित होणारे तंत्रज्ञान भांडवली चौकटीत सामावलेले असल्याने एका बाजूला ते व्यक्तिगत पातळीवर मुक्ती मिळविण्यासाठी स्त्रियांना उत्तेजन देते. दुसऱ्या बाजूने ते तंत्रज्ञान इतके महाग असते की केवळ काही स्त्रियांना-उच्चवर्गीय स्त्रियांची तेथपर्यंत पोच असते-हा ‘चॉईस’ किंवा ‘निवडीचे स्वातंत्र्य’ असते. सामान्य व अतिसामान्य स्त्रियांसाठी ते केवळ मृगजळच राहते. किंबहुना या दोन स्तरांतील स्त्रियांमधील दरी अधिक खोल आणि रुंद होत जाते. त्यासाठीही हे तंत्रज्ञान कारणीभूत होते. याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे की हा ‘चॉइस’, ही ‘निवड’ ही खरी असते का? भांडवली चौकटीमध्ये इतक्या गोष्टी अटळ मानल्या जातात की खरी निवड करण्यासाठी फारसा ‘अवकाश’च उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत ‘निवडीचे स्वातंत्र्य’ हे खरे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाने दिलेला निवडीचा अधिकार हे त्यामुळे स्त्रीचे झालेले सक्षमीकरण आहे.असे म्हणता येईल का?

यातूनच पुढचा प्रश्न उभा राहतो की पुरुषाबरोबर स्पर्धा करणे, पुरुषासारखे होणे म्हणजे खरे सुख, खरी समानता, खरे स्वातंत्र्य आहे का? भांडवली चौकटीतील पुरुष स्पर्धेमध्ये टिकाव धरण्यासाठी आक्रमक झालेला, स्वार्थी झालेला, निसर्गापासून दुरावलेला, व्यस्त व भ्रष्ट झालेला असेल तर त्या पुरुषासारखे होणे म्हणजे मुक्ती मिळविणे म्हणता येते का? अशा पुरुषांनी नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी जी व्यवस्था तयार केली आहे — जी मुख्यत: बाजारपेठीय तत्त्वावर, नफ्याच्या प्रेरणेवर आधारित आहे आणि जेथे भांडवलाचे व सत्तेचे केंद्रीकरण होण्याची प्रक्रिया आहे — ती व्यवस्था काही स्त्रियांना व्यक्तिगत पातळीवर ‘निवडीचे स्वातंत्र्य’ मिळाल्याचा आभास निर्माण करू शकते. परंतु सर्व स्त्रीजातीला स्वत:चे सुख व आनंद यांच्या व्याख्या तयार करण्याचे स्वातंत्र्य देऊशकेल का?

आनंद व सुख हे सामाजिक संबंधाच्या समतोलाने मिळते, केवळ ऐहिक गोष्टींच्या मालकी हक्काने नाही, हा सर्वमान्य सिद्धांत आहे. यामध्ये आध्यात्मिक परिमाणाचा समावेश केलेला नाही. पुष्कळदा ज्या गोष्टी तंत्रज्ञानाशिवाय साध्य होऊ शकतात त्यासाठी तंत्रज्ञान विकसित होते ते केवळ नफा मिळविण्याच्या प्रेरणेनेच आणि ह्या तंत्रज्ञानाचे समर्थन करण्यासाठी अर्ध्या कच्च्या शास्त्रीय तत्त्वांचा आधार घेतला जातो. एका अर्थाने दोन पावले पुढे गेलेले सामाजिक संबंध पुन्हा एक पाऊल मागे येतात. या तंत्रज्ञानामुळे आजपर्यंत निर्माण झालेली मूल्यव्यवस्थाच कोसळून पडू लागते. या मूल्यव्यवस्थेच्या अदृश्य बंधांमुळेच समाजाचा समतोल — चांगल्या व वाईट प्रवृत्तींमधील ताण-तणाव — राखला जात असतो व हळूहळू सामाजिक संबंध पातळीवर व समतेच्या पातळीवर जात असतात. परनु ही मूल्यव्यवस्थाच बदलू लागली तर संबंध भ्रष्ट होतात, माणसे भ्रष्ट होतात.

स्त्रियांच्या मुक्तीसंबंधात दोन तंत्रज्ञानांचा विचार करणे आवश्यक ठरते. ह्या तंत्रज्ञानाचा अतिरेक झाला तर त्यामुळे स्त्रीमुक्ती सफल होणार आहे की स्त्री-जातच नष्ट होणार आहे हे तपासून बघणे आवश्यक आहे. हा अतिरेक होऊ नये म्हणून स्त्रिया- ज्या या तंत्रज्ञानाच्या ग्राहक आहेत, त्यांनी विचार करून आपला दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी व तंत्रज्ञानाच्या शोधासाठी प्रयत्न करणारे शास्त्रज्ञ उभे आहेत. त्यात अर्थातच काही स्त्रियाही आहेत. परंतु या दुसऱ्या बाजूच्या मंडळींना सध्या तरी या तंत्रज्ञानाचा पैशाच्या रूपाने आणि समाजातील मानाच्या रूपाने फायदा होत असतो आणि म्हणून तंत्रज्ञानाच्या अतिरेकाकडे
किंवा नवनवीन शोधांमुळे ते झपाटलेपणाने जात असतात. तंत्रज्ञानाची दुसरी बाजू म्हणजेच तिच्या भ्रष्टतेच्या शक्यता. पण तिकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नाही.

प्रजनन तंत्रज्ञान

संततिनियमनाच्या निमित्ताने या तंत्रज्ञानाला सुरुवात झाली. त्यामुळे लैंगिक सुख व अपत्यजन्म यांची फारकत झाली असे मानले जाते. एका अर्थान हे खरे आहे आणि दुसऱ्या अर्थाने नाही. कारण पूर्वी समाजाने व विशेषतः स्त्रियानी अनेक सामाजिक नीतीनियम व संकेत निर्माण करून व काही प्रमाणात तंत्रज्ञानही वापरून संततिनियमनाचे प्रयत्न केले.

शरीरसुखाबद्दलही अगदीच अनभिज्ञता होती असे न मानण्यास पुरावे आहेत. त्या काळाशी तुलना करता आजच्या तंत्रज्ञानातील ‘केमिकल्स किंवा रासायनिक क्रांती’चा आरोग्यावर व एकूणच प्रजनन क्षमतेवर निश्चित विपरीत परिणाम होत आहे असे दिसते. स्त्रियांमधील वाढता वांझपणा हा कदाचित नवीन तंत्रज्ञानामुळे आला आहे का हे पासून पाहणे आवश्यक आहे. लैंगिक सुखाला अतीव महत्त्व, शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे, शरीर या चिन्हाचा जिथेतिथे वापर करणे अशा रीतीने सबंध जीवनशैलीवर या तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला दिसतो.

किंबहुना भांडवली चौकटीतील तंत्रज्ञानाचा हा विशेष जाणवतो, की जशा व्यक्ती सुटया सुट्या केल्या जातात, व्यक्तिवादाचे स्तोम माजविले जाते तसेच जीवनाच्या विविध पैलूंना सुट्या सुट्या पद्धतीने बघण्याच्या शक्यता निर्माण केल्या जातात. शास्त्रीय संशोधनसुद्धा अशा ‘रिडक्शनिस्ट’ पद्धतीने केले जाते. टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानामुळे एका स्त्रीचे स्त्रीबीज व एका पुरुषाचे पुंबीज/शुक्रजंतू यांचे मीलन शरीराच्या बाहेरील बशीमध्ये करून तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात त्याचे रोपण करणे व अपत्य जन्माला घालणे शक्य झाले. या तंत्रज्ञानाचे व ते कौशल्य वापरणाच्या डॉक्टर्सचे कौतुक झाले. वांझ दांपत्याला आशेचा किरण दाखवल्याबद्दल त्याची प्रशंसा झाली. परंतु याच्या दुसऱ्या बाजूचा विचार — यातील नीतीमूल्यांचा (एथिक्स) विचार — फारच थोड्या लोकांनी केला.

शरीराची इंटिग्रिटी, शरीर पक्रियांची ओळख, शरीरसुख, गर्भधारणा, गर्भाची वाढ या सर्व नैसर्गिक प्रक्रियांमध्ये निसर्गाशी सहकार्य असा सर्वागीण अनुभव घेणे या कर्त्याच्या भूमिकेतून हळूहळू डॉक्टरच्या हातातील बाहुले बनण्याच्या नव्या भूमिकेत जाताना आपण स्वातंत्र्य गमावतो आहोत, नव्या जीवनशैलाच्या अधीन होत आहोत, जेथे शरीर व मनाची फारकत होत आहे, शरीराच्या विविध अवयवांची व पेशीपेशींची फारकत केली जात आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. याच तंत्रज्ञानाचे टोक — अतिरेक — उद्या कोणी एखादा हिटलर ‘शुद्ध आर्यन’ वंशाची वृद्धी करण्यासाठी करू शकेल. कारण प्रजननाचे शास्त्र व तंत्र त्याने राज्यसत्तेच्या अंकुशाखाली आणले असेल; किंवा दुसऱ्या बाजूने केवळ ‘आदर्श’ स्त्री-पुरुषांच्या गोठविलेल्या स्त्री व पुंबीजांच्या फलीकरणातून व गर्भाशयाच्या प्रतिकृतीतून अपत्यनिर्मिती केली जावी असा कायदाही तयार करण्यात येऊ शकेल शकेल. एकदा तंत्रज्ञान निर्माण झाले की त्याच्यावर कोण, कसे नियंत्रण मिळवेल हे सध्याच्या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेत सांगणे कठीण आहे. किंबहुना आजच्या प्रजननतंत्राच्या शोधांची सुरुवात हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समधूनच झाली हे खरे सत्य आहे. आजही विकसित देशांत माणसाचा जन्म, मृत्यू व त्यामधील जीवनप्रवास हा over medicalised झाला आहे आणि इन्शुअरन्स कंपनीच्या डिक्टाट्सवर चालत आहे हा संदर्भही विसरून चालणार नाही. थोडक्यात, स्त्री मुक्त होत आहे की तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहे आणि करिअरच्या मोहात व पुरुषाशी बरोबरी करण्याच्या स्पर्धेत पुरुषाला व पुरुषसत्तेच्या प्रभावाखालील सामाजिक संबंधांना बदलण्याचे मूळ उद्देश हरवून बसत आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे.

प्रोसेस्ड फूड

स्त्रियांच्या मुक्तीच्या संदर्भाचा विचार करताना तिला बंधनात टाकणाऱ्या ‘घरगुती कामांचाही’ प्रामुख्याने विचार करावा लागतो. लांबून, विहिरीवरून पाणी न भरावे लागता घराच्या जवळ नळ येणे, त्यातून शद्ध पाणी मिळणे, लाकूडफाटा गोळा करावा न लागता गॅस सिलेंडर मिळणे, जात्यावर पीठ न दळावे लागता चक्कीवरून आटा पिसून मिळणे, लोणची, पापड बाजारात आयते मिळणे, चिरलेली, साफ केलेली भाजी मिळणे, मिक्सी, कुकर, वॉशिंग मशीन ही यंत्रे तर आज अगदी मूलभूत सोयी मानल्या जातात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, या सर्वांमुळे ऊर्जेचा वापर वाढलेला आहे. एवढेच नव्हे तर ही ऊर्जा non-renewable — पुनर्निर्माण न होणारी आहे
आणि या वाढीव ऊर्जा-वापराचा परिणाम होऊन पर्यावरणीय ऱ्हास होण्यास हातभार लागतो. आपण पुष्कळदा ग्रामीण भागातील स्त्रियांना व आदिवासींना जंगलाच्या ऱ्हासाबद्दल जबाबदार धरून दोषी ठरवतो. काही प्रमाणात ते खरेही असते. परंतु जंगलातील झाडे पुन्हा लावता येतात. त्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तो एक पुनर्निर्मित ऊर्जेचा शाश्वत स्रोत ठरू शकतो.

थोडक्यात घरगुती कामांसाठी ऊर्जेचा वापर हा समर्थनीय असला व स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व कंटाळवाण्या कामांपासून मुक्ती मिळवण्याचा आवश्यक मार्ग गृहीत धरला तरी या तंत्रज्ञानाचा जास्त कार्यक्षमतेने वापर करता येईल, ऊर्जेचा वापर कमीत कमी कसा होईल याचाही विचार स्त्रियांनी करणे योग्य होईल. याची पुढची पायरी म्हणजे प्रोसेस्ड फूड — प्रक्रिया केलेले, ब्रॅन्डेड अत्रपदार्थ जे कोल्ड स्टोरेजमधे साठवले जातात व मोठाल्या ट्रक्समधून त्यांची वाहतूक केली जाते. त्यांच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिक्सचा होणारा वापर, प्रिझर्व्हेटिव्हजची आवश्यकता वगैरे गोष्टींचा विचार केला तर या सर्वांचा पर्यावरणीय परिणाम फारच अपायकारक आहे. ऊर्जेचा अपरिमित वापर, पॅकिंग मटेरियलमुळे निर्माण होणारा प्रचंड कचरा व त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या यातून निर्माण होत आहेत. वाढत्या कॅन्सरशी याचा काही संबंध आहे का हेही शोधून काढणे आवश्यक आहे.

शिवाय या प्रचंड अन्नप्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंद्यांना अत्रधान्य, भाज्या, फळे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत म्हणून शेती-व्यवसायाचे उद्योगीकरण होण्याची आवश्यकता निर्माण होते. रासायनिक खतांचा वापर, भरपूर पाणी व ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर कंबाइन यांसारखे तंत्रज्ञान या सर्वांचाच अतिरेकी वापर-ऊर्जेचा प्रचंड वापर हे सर्व गुणविशेष आपोआप निर्माण होतात. पुन्हा एकदा केंद्रीकरणाची प्रक्रिया-भांडवलाचे, बाजारपेठेचे, मोठ्या बहुद्देशीय कंपन्यांचे केंद्रीकरण होऊन सामान्य माणसाची जीवनशैली बदलणे व छोट्या शेतकऱ्यांचा जीवनाधार काढून घेणे घडते, असे आता अनुभवाला येऊ लागले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रोसेस्ड फूडमध्ये स्त्रियांच्या मुक्तीसाठी अनुकूल वातावरण तयार होते की कुटुंबाच्या विघटनाच्या प्रक्रियेला अनुकूल वातावरण मिळून एका अर्थाने स्त्रीच्या घरगुती कामाची गरज व म्हणूनच घरात स्त्री असण्याची आवश्यकता संपून जाते; असे तर होत नाही ना हे तपासण्याची आवश्यकता आहे. घरगुती कामांमध्ये पुरुषाचा सहभाग हवा फ्लेक्झी टायमिंग, सहा तासांचा कामाचा दिवस अशा मागण्या या तंत्रज्ञानामुळे संपुष्टात येऊन मायक्रोवेव्ह संस्कृती निर्माण होते असे दिसून आले आहे. अमेरिकेतील ४० टक्के माणसे कुटुंबसंस्थेच्या बाहेर राहतात किवा एकटी राहतात. एकटेपणाची भावना, हिंसेची भावना अशा अनेक समस्या त्यामुळे उद्भवू शकतात. थोडक्यात, वरील सर्व विवेचन असे दर्शविते की, तंत्रज्ञान व सामाजिक संबंध यांचे अतूट नाते आहे आणि ते एकमेकांना ‘फीड’ करतात व स्पायरलिंग पद्धतीने वर वर नेतात. म्हणूनच तंत्रज्ञानाचा सार्वत्रिक प्रचार व उपयोग होण्यापूर्वी त्याचा सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी ‘एथिकल’ कमिटी जागतिक पातळीवर नेमणे आवश्यक आहे. WTO च्या बरोबरीने या कमिटीला स्थान देणे आवश्यक राहील. या कमिटीला काही किमान निकष ठरवावे लागतील. ते फक्त भौतिक व पर्यावरणीय ध्यासाचे मोजमाप एवढेच नसतील तर सामाजिक संबंध सुधारण्यास मदतकारक असाही निकष त्यामध्ये राहील.
स्त्रीमुक्ती म्हणजे केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि सध्याच्या पुरुषसत्ताक भांडवली चौकटीमधील पुरुषांबरोबर स्पर्धा व त्यासाठी मदतकारक तंत्रज्ञानाची भलावण नव्हे.

स्त्रीमुक्ती म्हणजे ‘जीवन संवर्धनाच्या’ हजारो वर्षांच्या अनुभवाचे महत्त्व ओळखून ‘जीवनसंवर्धन’ हा मानवी जीवनाचा कळीचा व्यवहार आहे हे आग्रहपूर्वक मांडणे व त्या व्यवहाराला केंद्रीभूत करून ‘इतर’ सर्व उत्पादन व वितरण-व्यवहार मांडण्याची आवश्यकता सातत्याने दाखवून देणे आणि ‘शाश्वत विकासाशी’ या व्यवहाराची नाळ जोडली गेली असल्याने अशा नव्या समाजरचनेचे, नव्या पॅरेडाइजचे म्हणजेच या चौकटीत सामावणाऱ्या तंत्रज्ञानाचे समर्थन करणे आहे. फ्रिटयॉफ काप्रा हा भौतिकशास्त्रज्ञ — आता पर्यावरणवादी म्हणतो आहे की, अशा नव्या तंत्रज्ञानाच्या शोधाला सुरूवात झाली आहे. निसर्गातील जाळ्यांची रचना — ज्यामुळे नवनिर्माणाचा स्रोत सतत सुरू राहतो — असे मॉडेल समोर ठेवून हे शोध सुरू आहेत.

डॉ. छाया दातार ( मिळून साऱ्याजणी, दिवाळी २००३ )