40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

सासू-सुनांची स्त्री मुक्ती : वाचक चर्चा – भाग १

जूनच्या अंकात सासू सुनांची स्त्री मुक्तीहा प्रीती पुष्पाप्रकाश या आपल्या मैत्रिणीचा लेख वाचल्याचं तुम्हांला आठवत असेल. सासू-सून, जावई-सासरा या कौटुंबिक नात्यांबाबतचे आपले अनुभव, आपली निरीक्षणं, त्यापुढे जाऊन लग्नव्यवस्थेबाबतचं आपलं काही विशिष्ट/वेगळं म्हणणं – हे सगळं मोकळेपणान मांडायचं आवाहन आम्ही वाचकांना केलं होतं. या चर्चेची सुरूवात करून देणाऱ्या प्रीतीच्या लेखानंतर या मालिकेतले हे पहिले दोन लेख: एक सुनेचा आणि एक सासूचा!  या  यापुढील लेखांमधून आपल्याला दोन पिढ्यांमधील, दोन व्यक्तिमत्त्वांमधील, दोन विचारपद्धतींमधील संघर्षाची विविध चित्रं बघायला मिळतील. ही चित्रं अनुभवात्मक असल्याने ती एका बाजूला झुकलेली असण्याची शक्यता आहेच, परंतु आपण त्याकडे निवाड्याच्या दृष्टीने न बघता वस्तुनिष्ठपणे पाहिलंवास्तवाचा एक तुकडा दर्शवणारी, मानवी स्वभाव, त्या स्वभावामुळे आणि परिस्थितीजन्य कारणांमुळे विविध संदर्भात माणसाकडून दिला जाणारा प्रतिसाद समोर आणणारी चित्रं म्हणून पाहिलं, तर आपल्याला आपल्या घराघरांतून सुरू असलेल्या विविध तीव्रतेच्या संघर्षांची जाणीव होईल आणि त्यातून मार्ग काढण्याचे उपाय शोधायलाही आपण प्रवृत्त होऊ. ही लेखमालिका या दृष्टिकोनातून वाचावी अशी विनंती.      

वाचक चर्चा  संपादन : प्रीती पुष्पाप्रकाश 

opreetee@gmail.com


 

प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा प्रश्न 

सासू या शब्दाची गंभीर फोड ‘सारख्या सूचना’ आणि सून या शब्दाची विनोदी फोड ‘सूचना नको’ अशी एके काळी मी ऐकली होती. त्या वेळी मी लहान होते, आत्ताही मी लहानच आहे. आध्यात्मिक मार्गावर एखादया धूमकेतूच्या वेगाने प्रगती करणं शक्य करून देणारी अशी एकच व्यक्ती बहुतांश स्त्रियांना लाभते, ती म्हणजे सासू.

मी बालपणापासूनच एक नव्हे, तर २-३ आईस्वरूप व्यक्तींसोबत वाढले आहे. त्यामुळे सासूदेखील आईसारखी मिळावी, अशी घरच्या प्रत्येकाची इच्छा प्रबळ होती. सुदैवाने मला जो मुलगा जोडीदार म्हणून आवडला, त्याच्या आईची प्रशंसा मी सगळ्याच नातेवाईकांकडून ऐकत आले होते. ‘तथास्तु’ झालं आणि माझ्या मनात एक आदर उत्पन्न झाला. मी स्वतःलाच सांगितलं, ‘नुसता मुलगाच नाही, मी तर सासूबाईंच्याही प्रेमात आहे. जिथे सासू चांगली असेल तिथे मुलगा कसाही असेना का, कान धरून सरळ करणाऱ्या आहेतच!’ तशी वेळ नाहीच आली, पण सासूबाईंनी प्रत्येक वेळेस समंजसपणे आधार दिला.

माझं लग्न व्हायच्या १२ दिवस आधी माझ्या दिरांचं लग्न झालं. मोठी सून गेल्या १२ वर्षांपासूनच कॅनडात राहणारी. तिचं माहेर नाशिकचं. मी माझ्या सासूची धाकटी सून. माहेर मुंबई आणि अमेरिकेला १.५ वर्षं सॉफ्टवेअर कंपनीतर्फे प्रोजेक्ट निमित्त राहून आलेली. सासूबाई अत्यंत धन्य झाल्या होत्या. आधी दोन मुलांना एका तराजूत पेलत होत्या. आता सुना आल्या.

त्या पहिल्यांदा अमेरिकेला जाऊन आल्या तेव्हा अमेरिकनच होऊन गेल्या. तिथे सून कामावर जात असे, ती मुलांना डे केअर मध्ये ठेवून. ऑफिसमधून घरी आल्यावर स्वयंपाक केला की तेच दुसऱ्या दिवशीच्या ‘लंच’च्या डब्यांमध्ये भरून ठेवत असे. पहाटे सगळ्यांसाठी एकच नाश्ता, ‘उकळत्या पाण्यात ओट्स’. त्यात फोडणी वगैरे प्रकारच नाही. संध्याकाळी ५-६ वाजेपर्यंत मुलगा, सून, दोन्ही नातवंडं घरी येईपर्यंत कधी कधी सासूबाई स्वयंपाक करत असत. एकूण छान चाललं होतं. कालांतराने त्या भारतात परतल्या. आम्ही एकत्रच राहात होतो. मला मुलगी झाल्यानंतर मी  नोकरी सोडली. मग त्यांच्या मनात युद्ध अवतरलं. तत्त्वांचं, नियमांचं, सोयीचं, लाइफस्टाइलचं!

कितीही म्हटलं तरी पदोपदी तुलना. डोक्याला छानच खाऊ! पण त्या तर्कशुद्ध विचार करणाऱ्या असल्यामुळे माझ्यासमोर काय असेल ती बाब सविस्तर मांडायच्या. मग माझ्यासोबत शांतपणे तासाभराची चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा! मात्र, त्यांच्या अमेरिका वारीनंतर या इंडो-अमेरिकन विचारांच्या मिश्रणात त्यांचा वैचारिक गोंधळ झाल्यासारखा वाटला. त्यांचे ३ हट्ट दीर्घ काळ त्यांचा पाठलाग करत आहेत.

पहिला : भारतामध्ये व्यवस्थित सुखाने संसार करत असलेल्या धाकट्या मुलाने अमेरिकेमध्ये स्थायिक व्हावं. त्यात मी, म्हणजे धाकटी सून अडथळे का निर्माण करत आहे?

अमेरीकेत स्थायिक व्हायला माझा अजिबात नकार नव्हता. पण मी विशेष उत्सुकही नव्हते. त्यामुळे ‘तुम्ही काही तरी करा आणि आपण अमेरिकत जाऊच’ असं मी माझ्या नवर्‍याच्या मागे लागत नाही, हा सासूबाईंना मुद्दाम रचलेला डाव वाटतो. गेली  ४-५ वर्षं त्या प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत जाण्यासाठी ‘GRE दे, GMAT दे, नवीन नोकरी शोध,’ असं बरंच काही त्या सातत्याने नवर्‍याला सांगत आहेत. एके दिवशी नवर्‍याला साऱ्या सांसारिक जीवनाचा कंटाळा किंवा आक्रोश फारच तीव्रतेने जाणवला आणि त्यांनी अ‍ॅक्शन घेतली. “तू ही काही करत नाहीस आणि माझंही काही होत नाहीये” असं त्यांनी मला म्हणून झालं. शिवाय ‘कधी एकदा या बायको मुलीला सांभाळण्याच्या चक्रातून सुटतो’ असंही त्यांना वाटू लागलं. कारण त्यामुळंच त्यांना नोकरी करणं भाग पडलं होतं. नाहीतर नक्कीच ते अभ्यास करून, परीक्षा देऊन अमेरिकेत कधीच गेले असते. मी सासूबाईंना समजावून सांगितलं. “तुम्ही आणि माझे मिस्टर, तुम्ही दोघे अमेरिकेला निघून जा. त्यांचं उच्च शिक्षण तिथे होऊ द्या. मी आणि आमची मुलगी पण तिथे राहिलो तर ते अभ्यास करू शकणार नाहीत. त्यांचं शिक्षण झालं, हातात नोकरी आली, की आम्ही दोघी येतोच.” त्या खुश झाल्या आणि मुलाच्या मागे लागल्या. योगायोगाने, देवानं कुठल्याही प्रकारे त्यांना परदेशी नोकरीची संधी दिली नाही. मी त्यांना पटवून दिलं की मला अमेरिकेत जाऊन मुलीला मोठं करण्यात काहीही रस नाही. तेव्हा ते शांत झाले. पण त्या शांत नाही झाल्या. जेव्हाही मी आणि हे एखादा बिझनेस करायचा विषय काढतो तेव्हा त्या म्हणतातच, “झालं, भारतात धंदा सुरू केला तर मग कसलं तुम्ही अमेरिकेत जाणार!”

दुसरा: डिशवॉशर – 

काय ते अमेरिकेत डिशवॉशर पाहिलं, आणि तसंच पुण्यात घरी आणलं. ‘सुनेला मदत होईल’, असा आवेश आणून आणलं. खरंतर, ‘मला डिशवॉशर नको’ असं मी नेहमीच  सांगत होते. एकदा सासूबाई म्हणाल्या, “तू किती आळशी आहेस! तुला दोन मिनिटांत पटकन खरकट्या भांड्यांवरून ब्रश फिरवून डिशवॉशर लावायला कंटाळा येतो? तुझी मोठी जाऊ बघ, रात्री डिशवॉशर लावून देते. ती नाही आळस करत.” मला हसावं का रडावं कळलंच नाही. “अहो काकू, मी दोन मिनिटात साबणाच्या ब्रशने भांडं घासूनच ठेवते, यात आळस कसा शोधला तुम्ही? ते अमेरिकन लोक आळशी आहेत! ते दिवसभरात तीन तीन वेळा चहा, दोनदा स्वयंपाक नाही करत. त्यांच्याकडे एवढी भांडी नाही निघत. शिवाय तुमचा मुलगा तिकडे आवर्जून मदत करतो. इकडे मी एकटीच किती वेळ त्या खेळ्ण्याशी खेळत बसू? डिशवॉशर नव्हे टाईमपास आहे तो! आधी भांडं नीट स्वच्छ करून रचून ठेवा, मग तासभर वाट बघा, मग भांडी परत जागच्या जागी लावा. परत तेच चक्र …”

तिसरा : तुलना आणि त्यांच्याच जिवाची घालमेल – 

अमेरिकन सून नोकरी करते हे उत्तम आहे, असं सुरूवातीला म्हणायच्या. मग असं झालं की, सुनेला मुलांची शाळा, नोकरी, घर सांभाळून फार दमायला व्हायचं. ती खूप काम करते. तिची इच्छा आहे की तिने नोकरी सोडावी. मुलगी आता ९ वर्षांची झालीये. वयात येणार्‍या मुलीला तिच्या आईची जास्त गरज आहे, नाहीतरी अमेरिकेत कशा कशा गोष्टी घडतात. या काळजीने त्या तिला ‘नोकरी सोड’ अशी सारखी सूचना देत असतात. पण मुलगा म्हणतो, ‘नोकरी चालू राहू दे. मी पण आहेच मदतीला’. ते खरंच आहे. ते बरेचदा घरून काम करतात. शिवाय तिकडे आपल्यासारखी गर्दी नाही, ध्वनी प्रदूषण नाही. त्यामुळे भारताच्या तुलनेत दमछाक कमी होते. ही गोष्ट सासूबाईंच्या लक्षातच आली नव्हती. इकडे मला, भारतीय इंजिनिअर सुनेला सांगतात, तू नोकरी करू शकतेस. मुलीला ‘डे केअर’ मध्ये ठेवू शकतेस. “काकू, तुम्हाला असं नाही वाटत का की २ वर्षांत माझी मुलगी पण १० वर्षांची होईल? ती पण वयात नाही का येणार? तिला नाही का आईची गरज भासणार? भारतात नाही का कशा कशा गोष्टी घडत? मग मी काय एक वर्षासाठी नोकरी करू का? तुमच्या मुलाचा जॉब बघता त्याला तुमच्या अमेरिकेतल्या मुलासारखं घरात लक्ष घालता येणार आहे का? तिकडच्या सोयी इकडे भारतात आहेत का? तुम्हाला नक्की काय हवंय? मी नोकरी करून अमेरिकेचा प्रोजेक्ट घेऊ का? मग मुलगी आणि मी आधी निघून जाणार, नंतर तुम्ही आणि तुमचा मुलगा याल का?” या अखेरच्या वाक्यावर त्यांचा चेहराच पडला.

एवढ्या मोठ्या ८ वर्षांच्या ब्रेकनंतर, पर्यायी शिक्षणपद्धतीने चालणार्‍या  एका शाळेत मला नोकरी मिळाली. यावर नाराजी कसली तर पगार फक्त २०,०००/- रू.! “त्यापेक्षा सॉफ्टवेअरची नोकरी बरी. नोकरीमध्ये इतका वेळ द्यावा लागतो, नाही परवडत गं, सोडून दे”, असं त्या म्हणायच्या.

मी म्हणालेच एकदा, “म्हणजे काय हो, जे करत आहे तिथे सुखी नका राहू. जे नाही त्याच्या मागे पळा. अमेरिकेच्या सुनेला सांगता, ‘घरी राहात जा’, घरच्या सुनेला सांगता, ‘नोकरी कर, पण जास्तीत जास्त वेळ घरी देता येणारी आणि पगार भक्कम असलेली. पण माझ्या मुलाच्या पगाराएवढा जास्त नको आणि अमेरिकन सुनेएवढा पण नको!”

खरंच मला अशा द्विधा मनःस्थिती असलेल्या सर्व सासवांची कीव येते. त्यांना कधीच सुख लाभत नाही. सदैव जे नाही त्याचा ध्यास. अपेक्षा! असं करण्यात त्या सद्यस्थितीतला निर्मलानंद गमावतात आणि ‘आपण त्यांना खुश करू शकत नाही आहोत’, असं घरच्या मंडळींना सारखा आभास निर्माण करतात.

सद्यपरिस्थिती स्वीकारली तर जग सुंदर आहे. सून स्वतः परदेशी जाण्यासाठी सक्षम असताना ती नवऱ्याला परदेशात जायला का नाकारेल? या सर्व सासवांना एकच सूचना आहे, ‘जिथे वसती मुले तिथे वर्षावी आशीर्वादांची फुले’!

– अनामिक,  वय४० वर्षे, वास्तव्य : शहरी भाग 

*****

आत्ताच्या घडीला सासू असलेली आपली एक मैत्रीण, लातूरची अरुणा दिवेगावकर, तिच्या आजीच्या सासूपासूनच्या सून-सासवांचा धांडोळा घेत आजच्या सुनांपर्यंत पोहोचते. खूप मोठा कालपट समोर मांडताना सासू-सुनेचं नातं मैत्रभावाकडे घेऊन जात ती आपल्याला आशावादी बनवते. –

मैत्र सासू-सुनेचं

सासू-सुनेचं नातं हा विषय लिहायचा म्हटल्याबरोबर मला माझ्या लहानपणातला एक प्रसंग लख्खपणे डोळ्यासमोर आला. बीड जिल्ह्यातील छोटंसं गाव, लाडेवडगाव. माझं माहेरकडचं मूळ गाव. चार-पाच वर्षांची असेन मी. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी गेलेलो होतो. साधारण १९७२-७३ साल असेल ते. गावात अजून वीज आलेली नव्हती. रात्रीची जेवणं चालू होती. घरातील पुरूष मंडळी जेवून उठलेली, खोलीत चिमणी लावलेली, कंदील बाहेर गेलेला, पुरूष मंडळींसाठी. चिमणीच्या मिणमिणत्या उजेडात माझी आई आणि तिची सासू (म्हणजे आमची आजी) बायका मुलांसाठी जेवण वाढून घेत होत्या. आजी एकदम हसायला लागली. कुणालाच कळेना, ती इतकं का हसतेय… हसून हसून तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली, “चंद्रकला, मी माझ्या सासूसारखं केलं बघ! आज तुला सासुरवास करतेय.” आईला काहीच कळेना, ती आपल्या सासूच्या चेहऱ्याकडे बघू लागली. त्या अंधारात, रिकाम्या पातेल्यात पाणी ओतण्याऐवजी आजीने रसाच्या पातेल्यात पाणी ओतलं होतं. सगळा रस पातळ झाला होता. आजीच्या सासूने तिच्या सुनांना कधीच घट्ट रस दिला नव्हता. पाणी घालून पातळ केलेला आंब्याचा पांचट रस सुनांच्या वाट्याला यायचा. सगळा स्वयंपाक सुनांनी करायचा. पण तो ताजा स्वयंपाक जेवण्याचं भाग्य त्यांचं कधीच नव्हतं. त्यांना सासू शिळं अन्न देत असे.

आजीची छोटी जाऊ गरोदर असतानाचा एक किस्सा आजी नेहमी सांगायची. एक दिवस आजीची सासू “शेजारच्या गावात भजनाला चालले आहे. दुपारपर्यंत वापस येते. तोवर तुम्ही स्वयंपाक, धुणी-भांडी उरकून घ्या. मी आल्यानंतर जेवण करू”,  असं सांगून निघून गेली. आजी स्वयंपाक करायला बसली आणि तिची जाऊ घरची कामं करू लागली. घरातील आवराआवर करू लागली. भाकरी करून झाल्यावर आजीने एका वाडग्यात भाकरी कुस्करली. त्यात गरम गरम सायीसकट दूध घातलं आणि छोट्या जावेला आवाज दिला. म्हणाली, “तुला किती दिवसांची दूध भाकर खावी वाटतेय ना, बस पटकन, खाऊन घे!” छोटी आजी हरखून गेली. “बाई, एवढं धुणं वाळत घालते  आणि खाते!”, असं म्हणून धुणं वाळत घालायला गेली. वापस येऊन पाहते तर, चुलीसमोर राखेचा ढीग! दूध भाकरीच्या काल्याचा वाडगा काही दिसेना. आजी पत्रा आणि फडा घेऊन बडबडत आत येत होती, ” या मांजराने तर उच्छाद मांडला आहे. आज तर मेलीनं चुलीसमोरच…!” म्हणत त्या पत्र्यावर राखेचा ढीग ओढवून घेऊ लागली. त्या राखेखाली दूध भाकरीचा काला होता. समोरच्या दारात त्यांची सासू कमरेवर हात ठेवून उभी होती. “अस्सा सासुरवास होता पोरींनो आम्हाला!” हे सगळं आजी हसत सांगायची. आजी त्या आठवणी सांगायची तेव्हा अंगावर सरसरून काटा यायचा. मी तिला चिडून म्हणायची, ” माय, तू हे सगळं का सहन करत होतीस?” त्यावर ती फक्त हसून, “जाऊ दे गं! झालं गेलं गंगेला मिळालं.” इतकंच म्हणायची.

आजीच्या पिढीने असला क्रूर सासुरवास भोगलेला होता. सासू या शब्दाची दहशत बसावी इतका! चुकून आजीच्या हातून रसात पाणी पडलं आणि तिला ते सारं आठवलं. तिला हसू आलं, पण त्या लहान वयात मला त्या हसण्यामागची करूणा, वेदना कळली नव्हती. ‘आपल्या सासूने आपल्याला अशी वागणूक दिली असतानासुद्धा आपणही सुनेशी असंच वागलं पाहिजे’, हे मात्र माझ्या त्या अडाणी आजीने कधीच केलं नाही. तिने तिच्या सुनेचा कुठलाही पूर्वग्रह  न ठेवता सहज स्वीकार केला होता. आजीची सासू तिला सासुरवास करताना, ‘मी हे सगळ असंच सहन केलं आहे, मग तुम्हाला सोडीन का?’ असं म्हणून त्रास द्यायची. पण माझ्या आजीने मात्र तसं केलं नव्हतं.

‘सून आली की तिला सासुरवास करायचा’, हे जणू ठरलेलंच होतं की काय असं वाटतं. आईच्या पिढीने आणि पुढे आमच्या पिढीने इतका भयंकरपणा अनुभवला नाही. पण कुठेतरी त्या नात्यात एक कडवटपणा शिल्लक राहिलाच आहे. सासू-सून या नात्यात तणाव कायम राहिलाच आहे कारण दोन वेगवेगळ्या घरातील एका पिढीचे अंतर असलेल्या दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांना एकत्र राहायचं असतं तेव्हा या नात्यातला गुंता सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही.

सासू-सून एकमेकींच्या अपेक्षेला खऱ्या उतरतील किंवा त्यांच्यामध्ये मैत्रभाव येईल, हा काही एका रात्रीतून होणारा चमत्कार नाही. हे नातं इतकं संवेदनशील आणि पूर्वग्रहदूषित झालेलं आहे की त्यात लगेच सुधारणा होईल, असं गृहीत  धरून चालणार नाही. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. कारण हे नातं जीवशास्त्रीय नाही. जनरेशन गॅप, दोन घरांतील वेगवेगळं वातावरण, आचार-विचार-खाद्य संस्कृती-राहणीमान यांतील फरक, कधी आर्थिक आणि सामाजिक स्तर यांच्यातील तफावत ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव सासू-सुनेच्या नात्यावर असतो. दोघींच्या दृष्टीने एकच व्यक्ती जवळची असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघींच्या मानसिकतेचा किंवा समजूतदारपणाच्या क्षमतेचा खूप मोठा प्रभाव पडत असतो.

माझं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं. माझ्या माहेरी मोकळं वातावरण. आई नोकरी करत नसली तरी शिकलेली होती. घरच्या जबाबदाऱ्यांसाठी तिने शिक्षिकेची नोकरी नाकारली होती. एक सुशिक्षित, अभ्यासू, खंबीर व्यक्तिमत्व म्हणून आईकडे पाहता येईल. एकंदरच घरात खेळकर आणि मोकळं वातावरण. या उलट सासरी. माझे सासरे नोकरी करत होते पण सासूबाईंना अक्षर ओळखही नव्हती. नोकरीच्या निमित्ताने शहरात राहिलेल्या असल्याने राहणीमान मात्र चांगलं होतं. मात्र घरातील वातावरण एकदम कडक शिस्तीचं. सासर्‍यांची लष्करी शिस्त साऱ्या घरादारावर चालत असे. अगदी रोज स्वयंपाकात कोणती भाजी केली जाईल इथपासून ते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवलेली असेल इथपर्यंत. त्यामुळे आमच्या सासूबाईंची अवस्था गरीब गाय अशीच होती. ज्या बाईला तिच्या स्वयंपाकघरात काय स्वयंपाक करावा याचंही स्वातंत्र्य नाही ती बाई कुणाला काय सासुरवास करणार?

आमच्या पिढीपासूनच सासूला ‘आई’ वगैरे म्हणण्याची पद्धत सुरू झाली होती. आमच्या घरात माझ्या सासूला त्यांची सगळी मुलं बाईच म्हणत असल्याने मीही त्यांना बाईच म्हणू लागले. घरातील हुकूमशाही वातावरणामुळे बाईंची होणारी कुचंबणा मला बघवत नसे. त्यांच्यावर होणारा अन्याय माझ्या बंडखोर स्वभावामुळे मी मोडून काढत असे. रागाच्या भरात बाईंना सासर्‍यांकडून मिळणारा ‘प्रसाद’ मध्ये पडून मी कायमचा बंद करून टाकला. “खबरदार! यापुढे बाईच्या अंगावर हात टाकाल तर!” याच आवेशाने एकदा मध्ये पडले तेव्हापासून ते आजतागायत तो ‘प्रसाद’ कायमचा बंद झाला. ज्यांनी आत्तापर्यंत स्वतःच्या आवडीच्या रंगाची साडी कधी वापरली नव्हती, ती हौसेने घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असायचा. हे सगळं बदलल्यामुळे त्या माझ्यावर प्रचंड खुश असायच्या. पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा सासूपणा गाजवायची संधी मात्र त्या सोडत नसत. त्यावेळी मला हसू यायचं. त्यामागचा कार्यकारण भाव मला कळत असल्याने राग मात्र यायचा नाही. कारण सत्तेच्या खेळात  वर्षानुवर्षं दबलेली व्यक्ती, तिला जेव्हा सत्ता गाजवायची संधी मिळते तेव्हा ती अधिकच आक्रमक होत असते. ‘मीही सत्ता गाजवू शकते’, हा भाव त्या व्यक्तीला सुखावणारा असतो. सासू-सुनेच्या नात्यात तसं पाहू जाता द्वेषभावना जास्त आढळत नाही. खूपदा ती असूया असते, असं मला वाटतं. ‘मला हे सगळं करता आलं नाही, (यात स्‍वातंत्र्याचा भाग जास्त महत्त्वाचा असतो) मला हे सगळं मिळालं नाही आणि ही कानामागून आली आणि वरचढ ठरतेय, हा भाग सर्वात जास्त असतो.

सासू-सून नात्याकडे आपण कुटुंबसंस्थेच्या दृष्टीकोनातून पाहतो तेव्हा पितृसत्ताक पद्धतीच्या प्रभावाने हे नातं कसं चालतं हेही मला सांगावस वाटतं. कुटुंबसंस्थेत ‘सासू होणं’ हे त्या बाईचं प्रमोशन मानलं जातं. या प्रमोशनच्या बदल्यात पितृसत्ताक कुटुंबसंस्था त्या सासूकरवी त्या सुनेवरचा कंट्रोल अबाधित ठेवते. अशा प्रकारे ती सासू जरी बाई असली तरी ती त्या पितृसत्ताक पद्धतीच्या साखळीचा एक भाग बनते. म्हणजे ही पितृसत्ताक पद्धती काहीजणांना आपल्या बाजूने करून घेते आणि त्यांच्या माध्यमातून ती व्यवस्था पुढे चालवण्यासाठी त्यांचा फायदा उठवते. आणि वरून ‘बाईच बाईची शत्रू असते’ असं म्हणून बाजूला राहते. कसं ते बघा हं! एखाद्या घरातील बाई लग्नाच्या वेळी सांगते की, आमच्या मुलाला लॉकेट घाला किंवा त्याच्यासाठी गाडी किंवा तत्सम गोष्टी मागते. तर त्या दागिन्यांचा किंवा गाडीचा वैयक्तिक तिला उपयोग होणारच नसतो. घरातील मंडळी ती गाडी तिला तर घेऊन जाऊ देणार नसतात. पण ‘हे सगळं तिनेच मागितलं होतं’, हे मात्र इतरांच्या मनावर ठसवलं जातं आणि त्या वस्तूंचा उपभोग घरातील पुरूष घेतात.

अजून एक प्रकार म्हणजे, ‘सुनेला एक तरी मुलगा झालाच पाहिजे’ हे येणाऱ्या सुनेवर बिंबवण्याचं काम या सासूकडून करवून घेतलं जातं. थोडक्यात कुटुंबव्यवस्था पुरूषांच्या मूल्यांवर चालवण्यासाठी सासू नावाच्या बाईचा माध्यम म्हणून वापर करून घेतला जातो आणि हे तिला कळतही नाही. ती आपल्या सो कॉल्ड ‘प्रमोशन’वर खुश असते.

सासू-सुनेचं नातं साहित्य, नाटक, सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमधूनसुद्धा कडवट छटेचं रंगवलेलं आहे. एकमेकींवर कुरघोडी आणि डावपेचाचं राजकारण करणाऱ्या दोन बायका असंच स्वरूप त्याला दिलेलं दिसतं. या नात्यात मैत्रभाव निर्माण न होण्याचं अजून एक कारण म्हणजे या दोघींच्या मनात पूर्वग्रह निर्माण करण्याचं काम करणारे समाजातले घटक – होणाऱ्या सुनेची आई आणि होणाऱ्या सासूच्या (लग्न झालेल्या) मुली आणि सासूच्या मैत्रिणी – करत असतात. हे सगळे घटक हे नातं मुळात आधीच संपवून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ‘सासूबाई’ ही उपाधी लागली की सत्ता, मानपान व अपेक्षा आणि तुलना सुरू होतात आणि कुटुंबात तणाव निर्माण होतो.

मात्र आजकाल ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. हळूहळू या नात्यात मोकळेपणा येऊ लागलेला आहे. सासू-सुना समंजसपणे या नात्याचा स्वीकार करताना दिसत आहेत. सासू मोकळेपणाने तिच्या अपेक्षा आणि घरातील कुळधर्माची, वातावरणाची माहिती देताना आणि तितक्याच मोकळेपणानं सून यातलं तिला काय जमणार आहे आणि काय जमणार नाही याची स्पष्ट कल्पना देताना दिसत आहेत. म्हणजेच नात्यांचा सशर्त स्वीकार संवादातून होताना दिसतोय.

माझ्या एका मैत्रिणीची सून तिला चक्क एकेरी हाक मारते. इतकं हे नातं वेगळ्या उंचीवर जाताना दिसतंय. विशेष म्हणजे त्यांचं एकत्र कुटुंब आहे. सून-सासू-आजेसासू असं तीन पिढ्यांचं. त्यांच्यातील नवीन सुनेचं म्हणणं आहे की सासू-सुनेचं नातं हे आई-मुलीसारखं असायला काय हरकत आहे?’ ‘हे नातं जैविक नाही, मग ते इतकं सहज कसं असेल?’ यावर तिचं म्हणणं असतं की ‘आपल्या आयुष्यात आई-वडिलांखेरीज अजूनही काही लोक असतात ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, त्यांचा आदर करतो. मग ती व्यक्ती सासू ही का असू शकत नाही?’ तिचं म्हणणं की, ‘आमची जनरेशन कॉम्प्रमाईज करणारी मुळीच नाही. मात्र आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. शेवटी प्रतिसाद नाही मिळाला, तर टाटा बाय बाय करू.’ ही प्रगल्भता दुर्लक्षून चालणार नाही असं वाटतं. लग्न होऊन अगदी एक वर्ष झालेली ही मुलगी.

माझी सून! लग्न होऊन पाच वर्षं झाली. सध्या दोन वर्षांपासून नोकरीच्या निमित्ताने माझ्यासोबत राहते. आजच्या जनरेशनची प्रॅक्टिकल मुलगी. या पाच वर्षांत मला मुलगी नसल्याची सगळी कसर तिने भरून काढली आहे. हक्काने भांडते, चिडवते, प्रसंगी तितकीच काळजी घेते. माझ्या प्रत्येक मूडची बित्तंबातमी तिला असते. लग्न होऊन दहा वर्षं झालेली एक तरूण मैत्रीण, तिनंही या नात्याबद्दल खूप सकारात्मक गोष्ट सांगितली. जे आयुष्य सासवांना जगायचं होतं आणि ते काही कारणांनी त्यांना जगता आलं नाही, ते आपल्या सुना जगतात याचा त्यांना आनंद आहे. त्यामुळंच त्या आम्हा सुनांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि आमचं नातं चांगल्या प्रकारे फुलत जातं!

ही सकारात्मक उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. तरीही थोडासा सावध पवित्रा घेत, एकमेकींना पारखून घेत, हे नातं हळूहळू मैत्रभावाकडे जाताना दिसत आहे. सासू म्हणजे जोडीदाराची आई आणि सून म्हणजे आपल्या मुलाची बायको, असाच केवळ दृष्टिकोन न ठेवता त्या दोघी मैत्रिणी होण्याकडे वाटचाल करताना दिसत आहेत. पितृसत्ताकपद्धतीतील हा बदल खूप परिणामकारक ठरू शकतो.

 

अरुणा दिवेगावकर, लातूर.