40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

सिंड्रेला कॉम्प्लेक्स : स्त्रीच्या मनात दडलेले स्वातंत्र्याचे भय

एक मूल्य म्हणून व एक महत्त्वाचे जीवनदर्शन म्हणून विसाव्या शतकाच्या जगाने स्त्री-स्वातंत्र्याचा स्वीकार केला. परंतु स्त्री-स्वातंत्र्याची वाट स्त्रीसाठी सहज नव्हती. स्त्रीला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून पुरुषसत्ताक प्रणालीने आपली वेगळी रणनीती आखणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु १९६०-७० च्या दरम्यान असे चित्र दिसू लागले की, स्त्रीला स्वातंत्र्याची जाणीव झाली खरी, पण स्वातंत्र्य पेलण्याइतकी तिच्या मनाची तयारी झालेली नसल्याने तिची अवस्था गोंधळल्यासारखी झाली. आपल्याला स्वातंत्र्य तर हवे, पण ते दुसऱ्या कुणीतरी द्यायला हवे असे तिला वाटू लागले. शिवाय स्वतंत्र होण्याचे एक प्रकारचे भय तिला आतून अस्वस्थ करत राहिले. स्त्रीच्या या अवस्थेला कॉलेट डाऊलिंग या लेखिकेने ‘सिंड्रेला कॉम्प्लेक्स ‘ असे म्हटले आहे.

सिंड्रेलाची गोष्ट ऐकतच जगभरातील स्त्रिया मोठ्या झाल्या. या गोष्टीतील सिंड्रेला कामसू आहे, सुस्वभावी आहे, सुंदर आहे. तिला तिची सावत्र आई व तिच्या सावत्र बहिणी छळत असतात, तो सगळा छळ ती सहन करते. परंतु त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा स्वत: प्रयत्न करत नाही. तिला राजपुत्राकडच्या पार्टीला जायचे असते तेव्हाही तिचं काम आटोपायला तिला पक्षी मदत करतात आणि तिला नवे कपड देण्यासाठी ती हेझलच्या झाडाला विनंती करते तेव्हा त्या झाडावरील पक्षी तिच्यासाठी छानसा पोषाख तयार करून देतात. पार्टीत राजपुत्राला ती आवडते. तो घोड्यावरून येतो आणि तिला घेऊन जातो, तिच्याशी लग्न करतो, ती सुखी होते अशी थोडक्यात ही गोष्ट आहे. या प्रतीकातून असे सुचविले जाते की, सिंड्रेला स्वत: आपले आयुष्य बदलू शकत नाही. तिला सुखी तर व्हायचे आहे, पण यासाठी ती पक्षी, झाड, राजपुत्र या घटकांची वाट पाहत राहाते. गोष्टीतील सिंड्रेला घडविणारे लोकमानस कसे होते, त्याची या गोष्टीवरून कल्पना येतेच, परंतु या गोष्टीतील आणखी एक तपशील लक्ष वेधून घेतो व अस्वस्थ करतो; पार्टीच्या पहिल्याच दिवशी तिला मुक्त होण्याची संधी मिळात असताना ती घाबरून धावत सुटते. कोणते भय तिला मुक्त होण्यापासून अडवत होते बरे?

कॉलेट डाऊलिंग ही एक मुक्त पत्रकारिता करणारी अमेरिकन स्त्री. १९८१ मध्ये तिचे ‘The Cinderella Complex’ हे पुस्तक New York च्या Simon & Schuster ने प्रसिद्ध केले व १९८२मध्ये या पुस्तकाची पॉकेटबुक आवत्ती निघाली. या पुस्तकाचे उपशीर्षक आहे, ‘Women’s hidden fear of independence’. आपल्या व्यक्तिगत जीवनातील अनुभव, आपल्या भोवतालच्या स्त्रियांचे अनुभव यांचे अवलोकन करून व मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्राचे प्राध्यापक, समाजशास्त्रज्ञ, काही पत्रकार, काही स्त्री-संस्थाचालक यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांच्या संशोधनात्मक निष्कर्षांच्या आधारे हे लेखन केले आहे. त्याचप्रमाणे मानसोपचार घेत असलेल्या विविध क्षेत्रांतील स्त्रियांशी बोलून कॉलेट डाऊलिंग यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. स्त्रीची आजवर जी मानसिकता घडत गेली आहे याविषयी त्या जे जे निष्कर्ष मांडतात त्यांना सहजच सैद्धांतिक मोल प्राप्त झाले आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या पहिल्या पर्वातील स्त्री-मानसिकतेचा शोध घेणारे लेखन म्हणून या पुस्तकाचे स्त्री-अभ्यासकांनी चांगले स्वागत केले.

स्वत: कॉलेट डाऊलिंग एक मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली मुलगी. तीन मुलांच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात एक नवे वळण आले. तिचा नवरा मानसिकदृष्ट्या आजारी झाला. त्यानंतर नऊ वर्षानी तो अल्सरने वारला. या काळात त्याला अनेकदा हॉस्पिटलला ठेवावे लागे. संसारासाठी तिला नोकरी करावी लागली. या वेळी तिच्याचसारख्या, ज्यांना एकटीने जगावे लागत होते अशा अनेक स्त्रियांशी तिच्या ओळखी झाल्या तेव्हा तिच्या लक्षात आले की, त्या सगळ्याजणी एकतऱ्हेची असुरक्षितता अनुभवत होत्या. कॉलेटला या काळात लेखनावर पैसा मिळत होता. प्रसिद्धी मिळत होती, तरी तिला ते श्रेय आपले वाटत नव्हते. किंबहुना लिखाण म्हणजे ‘सेफ्टी व्हॉल्व’ आहे असे तिला वाटत असे. ती पस्तिशीत असताना एकदा तापाने आजारी पडली. त्या तापाच्या ग्लानीत असताना तिच्या एकाएकी मनात आले की, “प्रौढावस्थेत कुणाही माणसाला एकटेपणा हा येतच असतो, परंतु हे वास्तव स्वीकारायला स्त्रीला कुणी शिकवलेलेच नसते. जणू आयुष्यभर आपली कुणीतरी काळजी घेणार आहे असेच तिच्या मनावर बिंबवलेले असते.” या प्रसंगानंतर ती तिच्या वयातील, स्त्री-मनांचा अभ्यास करू लागली.

 “न्यूयॉर्क मॅगझिन’मध्ये तिचा ‘Beyond liberation-confession of a dependent woman’ हा लेख प्रसिद्ध झाला; त्यात तिने म्हटले आहे की, स्त्रीला स्वातंत्र्य हवे आहे, परंतु तिच्या मनातील भयच तिला मुक्त होऊ देत नाही. वैफल्य, परावलंबित्व चीड यांनी स्त्रियांची मने पोखरली जातात. आपली सतत कुणीतरी काळजी घ्यावी, कुणीतरी यावे आणि त्याने आपले आयुष्य बदलून टाकावे अशी या स्त्रिया वाट पाहात असतात. स्त्रियांच्या या वृत्तीला कॉलेट ‘सिंड्रेलागंड’ असे म्हणते. वास्तवात अनेक स्त्रिया विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या दिसतात, परंतु त्यांच्या अंतर्मनात एक पोरकं, भित्रं पोर दडलेलं असल्याची कबुली त्यापैकी अनेकजणींना दिली आहे. त्यातील एकीचे हे उद्गार प्रातिनिधिक म्हणावे लागतील. ती सांगते की, “माझ्या मनात यायचे – आपल्याला आदर्श आई व्हायचे असेल, तर नोकरी करता येईल का? नोकरीत मनस्वीपणे काम केले तर प्रेम करता येईल का? तिथे आपल्याला स्पर्धेत कसे टिकता येईल? आणि नोकरी न करता घरी राहिलो तर आपण निरुपयोगी आहोत, अशी जी अपराधीपणाची भावना येते तिच्यापासून दूर राहता येईल का?”

आधुनिक मानसशास्त्र सांगते – उदासीनता, परावलंबित्व, स्वतःच्यासामर्थ्याविषयी शंका असे गुणधर्म स्त्रियांमध्ये वारंवार आढळतात. त्यामुळे आपल्यातील सृजनशीलता, सामर्थ्य या गुणांचा त्या पुरेपूर उपयोग करू शकत नाहीत. परिणाम असा होतो की एकाच क्षमतेच्या असलेल्या स्त्री व पुरुष यांमध्ये पुरुष अधिक काही आत्मसात करू शकतात. पुरुषापेक्षा स्त्रीला जे कमी मिळते त्याला इंग्लिश मध्ये female achievement gap असे म्हटले जाते. या शब्दप्रयोगाचे मराठीत भाषांतर करायचे तर ‘आत्मसातीकरणातील स्त्रीधर्मीय खिंडार’ असे काहीसे करावे लागेल. याचा अर्थ असा की, सारखीच क्षमता असलेल्या स्त्री व पुरुष यांच्यामध्ये पुरुष जे आत्मसात करते त्यापेक्षा स्त्री कमी आत्मसात करते. दोघांच्या आत्मसातीकरणातील ही तफावत म्हणजे female achievement gap होय. यामुळे स्त्रियांची कितीतरी बुद्धिमत्ता वाया जाते.

स्त्रीला तिच्या प्रगतीच्या मार्गात सतत कसले तरी भय वाटत असते. डॉ. अलेक्झांडर सायमंड म्हणतात की, प्रगतीच्या प्रवासात एक तऱ्हेची अस्वस्थता वाटणे, काळजी वाटणे स्वाभाविक आहे; परंतु तिचा अनुभव घ्यायला स्त्रीला शिकवलेलेच नसते. किबहना आपल्या आकांक्षा दडपायच्या आणि सहचराच्या यशात आनंद मानायचा, त्याच आधाराने जगायचे याचेच तिच्यावर संस्कार झालेले असतात. यामुळे बाह्य जगापासून दूर राहण्याचा तिचा प्रयत्न असतो. रूथ मोल्टन या मानसोपचारतज्ज्ञेचे तर निरीक्षण असे आहे की, बाह्य जग आणि स्पर्धा यापासून दूर राहण्यासाठी स्त्रिया गरोदरपणही स्वीकारतात.

स्त्रीच्या अंतर्मनात दडलेला हा भयगंड प्रत्यक्ष वर्तनात वेगवेगळी रूपे धारण करतो. नवऱ्याच्या यशासाठी आपण आपली कारकीर्द मिटून टाकली, आता तो आपल्याला गृहीत धरू लागलाय या जाणिवेने एखादी स्त्री बेचैन होते, तेव्हा नवऱ्यानेच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सुचवावा, अशी ती अपेक्षा करू लागते. एखादी स्त्री मानसोपचारतज्ज्ञाकडे गेली तर त्या मानसोपचारकाने आपली आईसारखी काळजी घ्यावा असे तिला वाटू लागते. काही स्रियांमध्ये भयाची तीव्र प्रतिक्रिया म्हणून प्रतिभयगंड निर्माण होतो. ‘मला कुणाची गरज नाही, माझी मी समर्थ आहे,’ अशी वृत्ती धारण करून त्या आक्रस्ताळ्या बनतात. काहीजणी नकारात्मक वृत्तीच्या व थंड बनतात. काही भयग्रस्त स्त्रिया आपल्या चुका नवऱ्यावर आरोपित करीत राहातात आणि त्याच्याबद्दल एकसारखी तक्रार करीत राहतात. अशा वागण्यातून त्या नवऱ्याला इतके संमिश्र संदेश देतात की तिला आपला आधार हवाय की स्वातंत्र्य हवंय ते त्याच्या लक्षात येत नाही. मग एकतर तो हतबल होतो किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करू लागतो.

एक काळ असा होता की आदर्श सहजीवन म्हणजे दोघांनी मिळून मते बनवावीत, स्वप्ने रंगवावीत, कल्पना कराव्यात असे सगळे अनुभव दोघांनी वाटून घ्यावेत. जरी नंतरच्या काळात असे नाते स्त्री किंवा पुरुष यांचा स्वतंत्रपणे विकास करू शकणार नाही, अशी भूमिका अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी घेतली तरी प्रत्यक्षात स्त्रियांची या प्रकारच्या नात्याच्या कोषातून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. यामागेही ‘आपण एकटे पडू’ हे स्त्रीमनातील भय आहे असे मानसशास्रज्ञांचे म्हणणे आहे. नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेला तर बायकोला रात्री झोप लागत नाही. ती फोनवर तरी त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ‘आदर्श स्त्री’ म्हणजे नवऱ्यावर अवलंबून असलेली स्त्री, हे समीकरण स्त्रीमनात इतके बिंबलेले असते की, आपल्या इच्छांचा तोल सावरण्यासाठी त्या वेगवेगळी मिथके उभी करतात. उदा. ‘माझ्याशिवाय नवऱ्याचे अजिबात चालत नाही’, ‘माझा नवरा म्हणजे एक लहान मूल आहे’, ‘माझा नवरा श्रेष्ठ आहे’ किंवा ‘मला बाई अमक्या तमक्यातलं मुळीच कळत नाही’. नवऱ्यामध्ये भावनिकदृष्ट्या इतके गुंतून राहून स्त्री सुरक्षितता शोधत असते असे समाजशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे.

याचे एक कारण असे असते की, स्त्रीला आधार हवा हे तर तिला सतत सांगितले गेलेले असते. आई-वडिलांचा आधार तुटलेला असतो, विवाहापूर्वी काही कौशल्ये मिळवलेली असली तरी सरावाअभावी ती गंजून गेलेली असतात. मुले लहान असताना थांबलेली कारकीर्द पुन्हा सुरू करायची, तर नव्या प्रशिक्षणाची गरज असते. तुम्ही वर्तमानात कुठे आहात याचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज असते व ही सर्व जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे हे लक्षात आले तरी तशी तिची मानसिक तयारी नसते. असे एकदा परावलंबित्व येत गेले की स्त्रिया स्वत:वाच राग-राग करायला लागतात.

सिड्रेलागंडातून निर्माण झालेले सीमनातील भय तिला मानसिकदृष्ट्या पंगू करते. पुरुषांच्या जगातील स्पर्धा त्यांना मानवत नाही, म्हणून त्या तिचा निषेध करतात, पण स्वत:च्या एखाद्या प्रकल्पातही पुढाकार घ्यायला त्या बिचकतात. त्यांचे हे भय आणि त्यांची असुरक्षिततेची भावना त्यांच्या संभाषणातूनही व्यक्त होते असे रॉबिन लॅकॉफ या भाषातज्ज्ञांनी म्हटले आहे. लहानपणापासून मुलाला ताणतणावाला सामोरे जायला शिकवलेच जात नाही. त्यामुळे आधार मिळणे हा जणू आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे स्त्रीला वाटत राहाते. प्रौढपणी स्त्रीच्या ज्या अनेक मानसिक समस्या निर्माण होतात त्याच्या मुळाशी हा learned helplessness असतो. तिला सतत सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते. तो तसा मिळाला तर तिचा आत्मविश्वास वाढतो. पण शाब्दिक पाठिंबा कुणी काढून घेतला तरी ती निराश होते.

१९७० च्या दशकात मानसोपचारतज्ज्ञ, मनोविश्लेषक, समाजशास्त्रज्ञ यांनी स्त्रीमनाचे पदर उकलणारे अनेक अभ्यास सिद्ध केले आहेत. त्यातील एक अभ्यास सांगतो की, जितक्या सहजपणे स्त्री पुरुषाचे नेतृत्व स्वीकारते तितक्या सहजपणे स्त्रीचे नेतृत्व स्वीकारायला ती तयार होत नाही. दुसरा अभ्यास असे म्हणतो की, स्त्रीला एखाद्या गोष्टीत यश मिळाले तरी आपल्या यशाचे श्रेय स्वत:कडे घेण्याऐवजी ती दुसऱ्याच एखाद्या बाह्य घटकाला देते आणि अपयशासाठी मात्र स्वत:लाच जबाबदार घरते. स्त्रीचे परावलंबी व्यक्तिमत्त्व प्रौढावस्थेत तिच्यातील बौद्धिक क्षमतांना दुबळे करीत जाते. स्त्रिया जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या सहयोगाने काम करत असतात तेव्हा काय घडते याविषयी एक मजेशीर निष्कर्ष हाती आला आहे तो असा की, दुसरी व्यक्ती एखाद्या कामात जेवढ्या प्रमाणात यश संपादन करते; त्याच्या व्यस्त प्रमाणात स्त्रीच्या आत्मविश्वासाची पातळी घसरते. त्यामुळे दुसरी व्यक्ती नशीबवान आणि कमनशिबी असे सोपे विश्लेषण तिच्याकडून केले जाते.

स्त्रीवादाच्या उदयानंतर डॉ. हॉर्नर यांनी मिशिगन विद्यापीठात ‘यशाबाबत स्त्रीची मानसिकता काय आहे?’ हे जाणून घेण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला. ९० स्त्रिया व ८८ पुरुष यांची चाचणी केल्यावर त्यांच्या हाती असा निष्कर्ष आला की, पुरुषांपेक्षा स्त्रियांना यशाचे भय अधिक वाटते, यशासाठी प्रयत्न करताना त्यांची काळजी वाढत जाते, त्या नर्व्हस होतात. यशासाठी जी किंमत मोजावी लागते त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटते. यशाविषयी वाटणाऱ्या भयाचा परिणाम प्रत्यक्ष यशसंपादनावर होतो. डॉ. हॉर्नर असे म्हणतात की, एकेका स्त्रीपुरता विचार करताना यश टाळणे ही गोष्ट उघडपणे आत्मघातकी वाटतही नाही. परंतु एकंदरीत स्त्रीजातीचा विचार करताना ‘यशाचे भय ही घटना दुर्लक्षित करण्याजोगी नाही. स्वत:ला कमी लेखणे, आपल्या क्षमतेपेक्षा एक पायरी मागे राहणे हे का घडते? लिंगभावाच्या अकारण भीतीमुळे ‘स्त्रीत्व’ म्हणजे काय? ‘स्त्री-सुलभ’ कशाला म्हणायचे? याविषयी आधुनिक स्त्रीच्या मनात निर्माण झालेल्या गोंधळाचा हा परिपाक आहे. स्वत:ला नाकारण्याचा हा खेळ दुःखद आहे. परंतु आपल्याला स्त्री व्हायचे तर आपल्यातील क्षमता दडपून टाकल्या पाहिजेत असे तिला वाटत राहाते, कारण यशस्वी स्त्री ही दुसऱ्याच्या घरातील मुलगी असावी ही समाजाची इच्छा असते व या इच्छेमुळे नकळत स्त्रीवर दडपण येत असते.

स्त्रीच्या मनातील भयामुळे तिचे वागणे विचित्र दिसू लागते. आपण स्वतंत्रही असावे आणि आपली कुणीतरी काळजीही घ्यावी अशी तिची दुहेरी अपेक्षा म्हणजे गाडीच्या ब्रेक्सवर पाय ठेवून गाडी सुरू करायला बघण्यासारखे आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण एखादा निर्णय घ्यायचा तर त्यासाठी पुरुषाची परवानगी असावी किंवा मला जे महत्त्वाचे वाटतेय ते खरोखर महत्त्वाचे आहे हे कुणीतरी सांगावे अशी तिची अपेक्षा असते. नव्या काळातील नव्या भूमिका निभावताना परंपरागत स्त्रीभूमिकेला लोंबकळत राहण्याच्या प्रयत्नातून स्त्री अतिशय थकते आणि चिडखोर बनते. घराकडून कुठलाही नकारात्मक ताण आला की ती भांबावून जाते. घरकामात स्त्री स्वत:ला इतकी का बुडवून घेते? या प्रश्नाचा खोलात विचार करू लागल्यावर स्त्री-मानसिकतेचे पदर उकलत जातात. घरकामात तिला एक प्रकारची सुरक्षितता वाटत असते; असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

अशा दुभंगलेल्या मन:स्थितीत जगणाऱ्या बायकांची सगळी शक्ती मनातील संघर्ष मिटवून टाकण्यात खर्च होते व त्या सकारात्मक काही करू शकत नाहीत. एवढेच नाही तर त्या आयुष्यातील आनंद अनुभवू शकत नाहीत.

स्त्रीला मुक्त व्हायचे असेल तर आपल्या अंतर्मनातील परावलंबनातून तिने बाहेर पडले पाहिजे. जितक्या प्रमाणात आपण आपल्या अंतर्मनातील संघर्षाला सामोरे जाऊ, त्यावर स्वतःचे उपाय शोधू, तितक्या आपण आतून मुक्त होत जाऊ आणि कणखर बनत जाऊ. शेवटी आपल्याला ध्येय गाठायचे आहे ते आपल्यात भावनिक स्वाभाविकता आणण्याचे. कॅरन हॉर्ने या मनोविश्लेषक म्हणतात की, खासगी वा सामाजिक व्यवहारात ‘मीच माझ्या जगण्याचा पहिला स्रोत आहे’ ही जाणीव असायला हवी, कारण ही जाणीव आपल्याला मनःपूर्वकतेकडे घेऊन जाते; मन:पूर्वकता ही मनाची अशी क्षमता आहे की जिथे भावनांचा प्रामाणिकपणा असतो.

मन:पूर्वक जगणाऱ्या स्त्रिया बुद्धिमान असतील किंवा नसतील, सर्जनशील असतील किंवा नसतील, शहरातील असतील वा खेड्यातील असतील, परंतु त्या मनाने नक्कीच मुक्त असतील व स्वत:ला मुक्त करू न शकलेल्या स्त्रियांपेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळ्या व संपन्न असतील. त्यांची अनुभव घेण्याची पद्धत वेगळी असेल व तो व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असेल. अशा मुक्त स्त्रीला जीवन आनंदी वाटू लागते. स्वत:च्या खऱ्याखुऱ्या इच्छेनुसार एखादी गोष्ट स्वीकारायला वा नाकारायला ती स्वतंत्र होते तेव्हा अत्यंत सुंदर, तीव्र भावनिक अनुभव तिची वाट पाहत असतात. यातून ती भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होत जाते. आपल्या मर्यादा व क्षमतांचे तिला वास्तवपूर्ण भान येते. तिच्या मनातील भय गळून पडते आणि यशस्वी होण्यासाठी ती मुक्त होते.

 

–  डॉ. प्रतिभा कणेकर

(मिळून साऱ्याजणी, जून २००८)