40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

सिंधुस्ताँ हमारा!

रात्रीचे १२ वाजल्याचे ठोके पडले आणि तिरंगा हळूहळू वर जाऊ लागला. १५ ऑगस्ट १९४७ ची पहाट होण्यापूर्वी समारे १५० वर्षे फडकणारा युनियन जॅक खाली उतरू लागला. कवी रवींद्रनाथ टागोर लिखित राष्ट्रगीत वाजू लागलं आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे आकाशवाणीवरून शब्द उमटले, “At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom…”

फार प्राचीन काळापासून अनेक टोळ्यांच्या राज्यांनी बनलेलं हे भारतीय संघराज्य ब्रिटिशांच्या अमलाखाली आल्यावर प्रथमच काही हजार वर्षांनी एक ‘सार्वभौम राष्ट्र’ म्हणून उदयाला आलं हे खरंच! पण हे होताना, एका ७-८ हजार वर्षे ज्ञात असलेल्या एकसंध सिंधू संस्कृतीची भारत-पाकिस्तान अशी जीवघेणी फाळणी झाली. या दोन देशांच्या सामायिक सिंधू संस्कृतीनंतर कित्येक शतकांनी जन्म घेतलेल्या ‘धर्म’ नावाच्या प्रकाराने या मातेसमान असणाऱ्या संस्कृतीवर घाला घातला आणि हे झालेले दोन तुकडे, वेगळे देश म्हणून ‘सार्वभौम’ या कौतुकाने जन्म घेते झाले. हे कसं काय घडू शकलं?

इ.स.पूर्व ५-६ हजार वर्षांपासून (किंवा त्याही आधीपासून) मध्य आशिया कडून येणाऱ्या टोळ्या वायव्य दिशेने हिंदुकुश पर्वतरांगा ओलांडून आणि किरगिझस्तान, उझबेकिस्तान येथील टोळ्या खैबरखिंड ओलांडून सिंधू प्रदेशात सातत्याने येत राहिल्या. विविध चालीरीती, भिन्न भाषा, वेगळे विश्वास-श्रद्धा असलेल्या या टोळ्यांनी, वंशांनी किंवा घराण्यांनी सिंधू प्रदेशात वेगवेगळ्या कालखंडात आपापले शासन निर्माण केले तरी कुठल्याही भूभागाची त्यांच्या वंशाच्या किंवा घराण्याच्या नावाने फाळणी झाली नाही. सिंधू नदी ही लांबी-रुंदीने सर्वात मोठी नदी, जी हिमालयात उगम पावून काश्मीरमधून वाहत आजच्या पाकिस्तानातून पुढे जाते. जाताना रावी, चिनाब, झेलम, बियास, सतलज आणि सरस्वती या सहा नद्या काश्मीरमधून वाहत येऊन सिंधूला मिळाल्यावर तिचा विस्तार प्रचंड वाढतो आणि ती तीन वेगवेगळ्या मार्गांनी पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळते. या सात नद्यांमुळे तयार होणाऱ्या सुपीक भूभागास ‘सप्तसिंधूचा प्रदेश’ म्हटले जात होते. भोवताली वस्ती करून असलेल्या स्थानिक जमातींना परकीयांनी ‘सिंधू लोक’ म्हणणेही स्वाभाविक होते. या नदीकाठी सुमारे दहा हजार वर्षांपासून जी मनुष्य संस्कृती नांदत होती, ती ढोबळपणे ‘सिंधू संस्कृती’ म्हणून ओळखली जात होती. सिंधू नदीच्या प्रचंड विस्ताराला ते साजेसे नाव होते. सिंधू नदी- प्रदेशात प्रथम प्रवेश केलेल्यांपैकी असीरियन वंशाचे म्हटले जाणाऱ्या ‘असुर’ जमातीचा बराच प्रभाव सिंधूलोकांवर आणि त्यांच्या संस्कृतीवर पडला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात इराणमार्गे आले ते ‘आर्य’! आर्यांनंतर नाव घेण्यासारख्या टोळ्या ज्या सिंधू संस्कृतीशी मिसळून गेल्या, त्या होत्या ग्रीक, शक, कुशाण, हूण..! सप्तसिंधू प्रदेशाच्या बाहेरून आलेल्या या टोळ्यांचा कोणताही एकसमान धर्म नव्हता. त्या वेळी आजची रूढ ‘धर्म’ संकल्पना जन्मलेली नव्हती. भिन्न भाषा, भिन्न रीतीरिवाज, भिन्न विश्वास आणि श्रद्धा आपल्या समवेत घेऊन आलेल्या या टोळ्या किंवा किंवा परकीय वंश, कधी संघर्ष तर कधी ‘संकर’ अशा अशा क्रिया प्रतिक्रियांमधून सिंधू लोकांमध्ये मिसळून गेल्या. प्रत्येक संघर्षात स्थानिकांना जिंकून घेतलेल्या जेत्या टोळीचा अंमल काही काळ सिंधूलोकांवर चालत असे. अशाच एका परकीय जेत्या जमातीला, काही इतिहासकारांच्या मते, ‘स’ या अक्षराचा उच्चार करता येत नवहता. ते ‘स ‘ चा उच्चार ‘ह’ असा करीत. असुरांना ते ‘अहूर’ म्हणत होते. अर्थात, सिंधू लोकांना ‘हिंदू लोक’ म्हणण्याची सुरवात इथून झाली असावी, असा जाणकारांचा दावा आहे. तसेच भाषेच्या नंतरच्या विकासातून या विस्तीर्ण सिंधू प्रदेशाला मधल्या काळात ‘सिंधुस्तान’ म्हणण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न झाला असावा, आणि त्यातून पुढे ‘हिंदुस्तान’ हे नामकरण झाले असावे, असं म्हणता येईल. अनेक बाहेरील देशांतून सिंधू प्रदेशात येणाऱ्या या टोळीस्वरूप जमातींच्या भिन्न-भिन्न विचारधारा होत्या. त्या विचारधारा एकत्रितपणे सिंधू संस्कृतीत स्वीकारल्या गेल्या. ‘हिंदू हा धर्म नसून, ती एक विचारसरणी आहे,’ असे केले जाणारे विधान, हे या अनेक टोळ्यांच्या आचार-विचारांना सामावून घेत शतकानुशतके प्रवास करीत टिकून राहिलेल्या सिंधू संस्कृतीच्या व्यापक विचारसरणीला अनुसरून आहे, याबद्दल शंका वाटत नाही. आजचा अफगाणिस्तान, हिंदुकुश पर्वतरांगा आणि पाकिस्तान धरून काश्मीर, गुजरातपर्यंत अखंडपणे पसरलेली ही सिंधू संस्कृती होती. पंजाब, राजपुताना -माळवा, मोहेंजोदडो व हरप्पा ही शहरे त्याचे उत्खननीय पुरावे आहेत, जे आज पाकिस्तानात गेले आहेत.

इ.स. पूर्व ३००० वर्षांमागील काळ हा रामायण महाभारताचा आहे. या महाकाव्यातील स्थाने, प्रदेश आणि व्यक्तींचा उल्लेख हा जास्त करून या सिंधुस्तानामधील आढळतो. उदा. अयोध्येचा राजा दशरथ हा साम्राज्य वाढविण्यासाठी वायव्येला ‘केकय’ देशावर चाल करून गेला. आज अफगाणिस्तान-पाकिस्तान सरहद्दीवर असणाऱ्या केकय या वायव्य सरहद्द प्रदेशाची कन्या कैकयी ही राजा दशरथाची पट्टराणी होती. महाभारतातील धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही, ‘गांधार’ म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातील ‘कंदहार’ प्रदेशाची राजकन्या होती. असे काही ज्ञात उल्लेख आपल्याला सापडतात. हे सर्व उल्लेख इतिहासपूर्व काळातले आहेत. आर्य हे लढवय्ये असल्यामुळे सप्तसिंधूच्या खोऱ्यातून बाहेर येऊन काश्मीर (कांबोज), पंजाब, राजपुताना, गुजरात येथपर्यंत आपले वास्तव्य वाढवत पुढे त्यांनी काशी, कोसल (नेपाळचा पायथा) मगध (बिहार), अंग-वंग (पूर्ण बंगाल) पर्यंत आपले राज्य नेले. रामायणकाळात ते विंध्य पर्वत ओलांडून दक्षिण भागातही पोहोचले.

रामायणापूर्वी आर्यांनी वेद सांगितले आणि नंतर ते लिहिले गेले. वेदांमुळे आर्यांना ‘वैदिक आर्य’ असे संबोधन मिळाले. कालांतराने स्मृती, पुराणे, उपनिषदे अशी साहित्यनिर्मिती या आर्यांनी केली. त्यातून एक ‘वेदकालीन (वैदिक) विचार संस्कृती’ उदयास आली. याच वैदिक साहित्यातून आणि संस्कृतीतून विचारांचे जे तत्वज्ञान निर्माण झाले, त्या तत्वज्ञानास ‘वैदिक धर्म हे संबोधन पुढे मिळालं. ज्याची जशी (विचार) धारणा, तो धर्म – (धृ-धारयति सः धर्मः) असे अत्यंत सोपे धर्माचे तत्त्वज्ञान त्या काळात होते. वैचारिक पातळीवर त्याच्या चर्चा, निरूपणे, वादविवाद, टीका, उयडपणे आणि सहजपणे होत असत. या चर्चाना आजच्याप्रमाणे धार्मिक चळवळ किंवा भावना दुखावणे समजले जात नव्हते. वैदिक काळानंतरही बयाच शतकांनी बादशहा अकबराने आणि पुढे त्याचा पणतू दारा शुकोहने अन्य धर्मियांची चालू ठेवलेले धर्म-चर्चासत्र यावरूनही त्या काळात हिंदुस्तानात टिकून असलेले हे धार्मिक स्वातंत्र्य लक्षात येते. त्या पुढील काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचाही परकीय राजवटीला (मोगल, तुर्क) विरोध होता, परकीय धर्माला नव्हता. निदान शिवाजीच्या कालखंडापर्यंत हिंदू-मुस्लिम असे संशयाचे वातावरण स्थानिक लोकांमध्ये नव्हते, असे म्हणता येईल.

इ.स.पूर्व ७०० पासून इतिहासकाळ सुरू झाल्याचे मानण्यात येते. इ.स. पूर्व ३२० मध्ये जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडरने हिंदुकुश ओलांडून सिंधू खोऱ्यात प्रवेश केला. पेशावरच्या अष्टकराज नावाच्या राजाने त्याला पहिला विरोध केला तर तक्षशीला येथे राज्य करणारा राजा अंभी हा अलेक्झांडर यास फितूर झाला. मात्र, झेलम आणि रावी दरम्यानच्या प्रदेशाचा राजा पौरव याने कंबोज (काश्मीर) प्रदेशातील पूंच व नवशेरा जिल्ह्यातील राजांना एकत्र आणले आणि तो अलेक्झांडरला सामोरा गेला. सिंधुस्तानातील हे सर्व राजे विविध राज्यांतील क्षत्रिय शासक होते.

अलेक्झांडर अर्धवट मोहीम ठेवून माघारी परतल्यावर, मौर्य घराण्यातील चंद्रगुप्त मौर्याने अफगाणिस्तानातील हेरात, काबुल, गांधार इवपासूनचा प्रदेश ताब्यात घेतला आणि पुढे मगध राज्याच्या नंद घराण्याचा पराभव करून पश्चिमेकडील सिंधुस्तानापासून पंजाब, काठेवाडपासून अंग-वंग, मगध असे पूर्वेपर्यंत राज्य वाढवले. त्याचा नातू सम्राट अशोक याने हेच राज्य दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत वाढवत नेले. बौद्ध धर्माचा प्रसारही त्याने अफगाणिस्तान ते श्रीलंकेपर्यंत केला. अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्ध मूर्ती हे त्या कालखंडातील स्थापत्य आहे. स्वतः सम्राट अशोक इ.स.पूर्व २३२ मध्ये तक्षशीला येथे मरण पावला, तेव्हा त्याचा पणतू वीरसेन हा गांधार देशाची व्यवस्था पाहत होता. तक्षशीला ही गांधार देशाची राजधानी होती. रावळपिंडीपासून २० मैलांवर असलेले हे तक्षशीला शहर आज पाकिस्तानात, तर हे शहर ज्या देशाची राजधानी होती, तो गांधार देश म्हणजेच कंदाहार प्रांत’ हा अफगाणिस्तानात अशी सध्या स्थिती झालेली आहे. सम्राट अशोकानंतर ग्रीकांबरोबर शक, हूण, कुशाण या टोळ्यांचे सिंधू लोकांवरील हल्ले वाढले तेव्हा काबूलचा राजा सुभागसेन आणि शुंग घराण्याचा पुष्यमित्र या दोघांनी ग्रीकांना माघारी रेटले. शकांची एक टोळी ही इ.स.च्या पहिल्या शतकात सिंधच्या पश्चिमेकडून घुसली. त्यांनी सिंध व सौराष्ट्र हे प्रांत व्यापले. चीनजवळील कुशाण जमातीच्या कनिष्क राजाने माळवा, सिंध, कंदाहार जिंकून घेतले. पुढे इ.स. तिसऱ्या शतकात आलेल्या गुप्त घराण्यातील दुसऱ्या चंद्रगुप्ताने (राजा विक्रमादित्य) शक आणि कुशाणांचा पूर्ण पराभव करून ते सर्व राज्य आपल्या राज्याला जोडून घेतलं. हेच शक, कुशाण, ग्रीक वंशाचे लोक पुढे सिंधी, राजपूत, पंजाबी, बलुची, काश्मिरी, नेपाळी लोक यांच्याशी संकराने आणि संस्कृतीने मिसळून गेले. त्या कोणाच्याही नावाने सिंधू संस्कृतीची फाळणी झाली नाही. शिवाय शक, कुशाणांसारखे सर्व शासक परकीय असूनही त्यांनी घडवलेला इतिहास आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून जपला.त्याला कधी परक्यांचा इतिहास म्हणून झिडकारले नाही.

अरबस्तानात इस्लामचा उदय इ.स.६२२ मध्ये झाला. राजा हर्षवर्धन या वर्धन घराण्यातील राजाच्या इ.स. ६४७ मधील मृत्यूनंतर, इ.स.७१२ मध्ये मुहम्मद बिन कासिम हा अरब संस्कृतीचा तरुण सिंध-सौराष्ट्रावर चालून आला. त्याने काही लूट मिळवली आणि तो परत गेला. त्यानंतर अरबांच्या स्वाऱ्या झाल्या नाहीत आणि पुढेही ३०० वर्षे इस्लाम धर्मीयांच्या स्वाऱ्या सिंधू संस्कृतीवर झाल्या नाहीत. अरब तसे सुसंस्कृत होते. तक्षशीला येथे अरब लोक पूर्वीपासून अध्ययनास येत असत. सिंधू संस्कृतीचे गणित, विज्ञान त्यांनी युरोपपर्यंत नेले. ते संशोधक वृत्तीचे होते, इतिहास लेखक होते. खगोलशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. त्या काळात सिंधूसंस्कृतीच्या अनेक विद्वानांना अरबस्तानात निमंत्रित केले जात होते, असे इतिहासकार नोंदवतात. तसेच इस्लाम धर्माच्या उदयानंतरही अरब विद्वान हिंदुस्तानात येत राहिले. त्या वेळी या नव्या इस्लाम धर्माची माहिती ते इथल्या स्थानिक लोकांना, राज्यकर्त्यांना देत असत. त्या काळातील बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मप्रसारक जगभर आपल्या धर्माची महती सांगत प्रवास करीत होते आणि तसे होताना इस्लामसह कुठल्याही धर्माबाबत कोणतेही तंटे तेव्हा उद्भवत नव्हते, अशी नोंद आढळते. या सर्व जुन्या इतिहासाचा समग्र उल्लेख इथे अशासाठी की, इ.स. पूर्व ५०० ते इ.स.६४७, राजा हर्षाच्या मृत्यूपर्यंत सुमारे १००० वर्षांचा इतिहास हा ज्या भूभागीय स्थानांवर घडला, ती सर्व स्थळे ही सिंधुस्थानातील म्हणावी लागतात. या सर्व इतिहासाला आणि तो इतिहास घडविणाऱ्या शासकांना ‘भारत-पाकिस्तान’ या संदर्भातून पाहता येत नाही.

पुढील दीड हजार वर्षांच्या काळात, सिंधुस्तानातील काही स्थानिकांनी स्वखुशीने इस्लामी तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला, तर काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या अनेक हिंदू-बौद्ध राजांनी इस्लाम धर्म हा सत्तेच्या लालसेने, काही वेळा आमिषानेही पत्करला, त्याबाबतचे उल्लेख रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या ‘मुसलमानी रियासत’मध्ये मिळतात. दुसरीकडे मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेल्या छळाला त्रासून सिंधस्तानातील अनेक लोक मुस्लिम झाले. बरेच जण हिंदू उच्च वर्णीयांच्या जातीय छळाला कंटाळून मुस्लिम झाले. थोडक्यात, कोणत्याही कारणांनी या संपूर्ण हिंदुस्तानातील हिंदू-बौद्ध रहिवासी मुस्लिम झालेले असले, तरी त्यापैकी बहुसंख्य जनता ही इथल्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे वारस असणारे स्थानिक लोक आहेत, हे वास्तव भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील हिंदू-मुसलमान यांनी लक्षात येणे, यातच हिंटू-मुस्लिमांचे भले आहे आणि त्यातच त्यांचा बंधुभाव आहे.

वास्तवात मागील १००० वर्षांत अनेक हिंदू, मुस्लिम धर्माचे होऊनही त्यांच्यातील वातावरण कधीच बिघडलेले नव्हते, जितके ते भारत-पाकिस्तान फाळणीनंतर बिघडले. ब्रिटिशांना या अखंड देशातून हाकलून देण्यासाठी १८५७ चे बंड हिंदू-मुस्लिम मिळून लढले. १९०५ साली मुस्लिमबहुल बंगालची अखंड बंगालपासून फाळणी करण्याच्या ब्रिटिशांच्या कुटील डावाला हिंदू-मुस्लिमांनीच विरोध केला आणि १९४२ पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामातही हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लढले. मग १९४७ च्या स्वातंत्र्याच्या क्षणापासूनच ते इतके कट्टर शत्रू कसे झाले? याचा अंतर्मुख होऊन एकदा तरी विचार केला पाहिजे.

आपण पाहिलं की, रामायण-महाभारताचा काळ इ.स. पूर्व सुमारे ३००० वर्षे म्हणजे हिंदू धर्मासह कोणत्याच धर्माचा डंका वाजत नसणारा काळ होता. कृष्णाने ‘गीता’ अर्थातच फक्त हिंदूसाठी सांगितलेली नाही, हे त्यामुळे स्पष्ट आहे. रामायण, महाभारत काय किंवा भगवद्गीता काय, हे साहित्य अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत सर्वच लोकांचे होते. मग ते फक्त हिंदूंचे धर्मग्रंथ कसे, केव्हा नि का व्हावेत? त्या योगे, या गीतेच्या आणि रामायण-महाभारताच्या अन्य वारसदारांना आपण हिंदूंनी दूर लोटून काय मिळवलं? हे ग्रंथ म्हणजे भारत-पाकिस्तानची एकत्रित संस्कृती आहे, असं १९४७ च्या पूर्वीपासून आणि नंतरही हिंदुजन जर म्हणत राहिले असते, तर सध्याच्या धर्मद्वेषाने असे भयानकपणे डोके वर काढले नसते. इसवीसनापूर्वी होऊन गेलेले सर्व विद्वान, मग तो चाणक्य असेल, कामसूत्र कार वात्स्यायन असेल, गणिती आर्यभट्ट असेल, पाणिनी आणि पतंजली असतील किंवा कालिदास, भासासारखे नाटककार असतील, ते कुणी हिंदू-मुस्लिम नव्हते तर ते सिंधुसंस्कृतीचे विद्वान होते. हा संस्कृतीचा धागा जोडून ठेवण्याची काळजी विशेषतः हिंदू जर घेतली असती, तर आज पतंजली ‘योगाभ्यास’ हिंदू धर्माचा भाग, या गैरसमजुतीतून पाकिस्तानमध्ये दूर लोटला गेला असता का? ‘योगदिवस’ हा भारत-पाकिस्तान मिळून पुढे आला असता, तर अवघ्या जगापुढे ते एक प्रगल्भ उदाहरण झाले असते.

कला, विद्या, साहित्य, इतिहास, विज्ञान या संस्कृतीच्या शाखाच आहेत. त्याप्रमाणे धर्म हीसुद्धा संस्कृतीची एक शाखाच आहे. धर्म संस्कृतीपेक्षा मोठा नाही. तो तिचा एक अंश आहे; पण ज्या संस्कृतीत धर्म जन्म घेतो, त्या संस्कृतीचा तो गळा कसा घोटू शकतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘भारत- पाकिस्तान’ ही राष्ट्रे आहेत. भाषा, संगीत, पेहराव, खाद्य, आभूषणे या संस्कृतीच्या शाखांमधील साम्य भारत-पाक-बांगला देशांमध्ये अजूनही तसेच टिकून असलेले आपण पाहतो. पाकिस्तानी मालिकांतील स्त्रिया, कपाळावर बिंदिया आणि हातात चूडियाँ घालून समारंभात ढोलक वाजवून ‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’ अशी हिंदी सिनेमातील गाणी म्हणतात. पाशात्य देशांत हे दृश्य आढळेल का? बांगलादेशाने पाकिस्तान विरोधातील स्वातंत्र्याच्या चळवळीत धरलेला बंगाली भाषेचा आग्रह विसरता येईल का? दोन देशांत क्रिकेट सामना चालू असताना, हिंदुस्तानी-पाकिस्तानी ओळखूही येत नाहीत. गर्भवतीचे गोदभरण, शकुन-अपशकुनाच्या कल्पना, उसको नजर न लगे, याकरिता ‘नजर उतार ले’ यांसारखे दोन्ही देशांतील पारंपरिक ‘विश्वास’ काय सिद्ध करतात? तर ते आपण एकच असल्याचे सूचित करतात.

मात्र, ब्रिटिशांनी चाणाक्षपणे धार्मिक विद्वेषाच्या पायावर उभी केलेली ही दोन राष्ट्रे त्याच विद्वेषाचा आधार घेऊन दोन्हीकडचे राजकीय आणि धार्मिक नेते स्वतःच्या स्वार्थासाठी चतुराईने १९४७ पासून भलत्याच दिशेने चालवत आहेत. धर्माचा धंदा बनवून, त्यांची चाललेली ही लबाडी आपण कधी समजून घेणार आहोत? ब्रिटिशांना ही भूमी परकी होती. या भूमीची संस्कृती, हजारो वर्षांचा इतिहास त्यांना परका होता; पण ही संस्कृती आणि तिचा इतिहास भारत-पाक हिंदू, मुसलमानांना तर परिचयाचा आहे. मग दोघांमधील प्रश्नांना हिंदुत्ववादी आणि इस्लामवादी म्हणून सामोरे जाण्यापेक्षा ‘सिंधुत्ववादी’ म्हणून जर आपण सामोरे गेलो असतो, तर सगळे प्रश्न आपलेच दोघांचे झाले असते. काश्मिरी लोकांचा विकास आणि संरक्षण दोन्ही राष्ट्रांनी एकत्र मिळून करावा आणि काश्मिरी प्रदेश हा या दोन राष्ट्रांना जोडणारा दुवा ठरावा, असा जर प्रयत्न केला गेला असता तर दहशतवाद्यांना अराजकाची संधीही प्राप्त झाली नसती. भारत- पाकिस्तानातील विविध भाषांची साहित्य संमेलने आणि संगीत जलसेही एकत्र भरवण्याचे व्यासपीठ काश्मीर येथे करता आले असते आणि काश्मीर खरोखरचे नंदनवन झाले असते. आज कठीण वाटणारे हे वास्तव अजूनही अशक्य नाही. त्याकरता, काश्मीर राज्य (पूर्वीचे कांबोज) हे दोन्ही देशांच्या ‘सलोख्याचे, सद्भावनेचे, शांतीचे’, आणि एकाच संस्कृतीचे प्रतीक म्हणून सांभाळण्यासाठी हिंदू-मुस्लिमांना त्यांच्या-त्यांच्या धर्माच्या बाहेर यावे लागेल. धर्मद्वेषावर पोट भरणारे दोन्हीकडचे राज्यकर्ते आणि धर्मकडवे लोक हे होऊ देत नाहीत, तेव्हा दोन्हीकडील जनतेलाच आता पावले उचलावी लागतील. शांततेने व आनंदाने जगता येणे, हे कोणत्या जनतेला नको असते?

आज पाकिस्तानातील गायकांना किंवा नट-नट्यांना भारतीय व्यासपीठ मिळणे हा त्यांचा सन्मान वाटतो. ही आपल्यामधील मूळ संस्कृतीची ओढ म्हणावी लागेल. पाकिस्तानी कलाकारांची ही भावना, ही एवढीच आता आपल्या हातात उरलेली एकमेव आशा आहे. या त्यांच्या भावनांना भारतातील हिंदूंनी दुर्मिळ माणिक-मोत्यांप्रमाणे जर आज जपलं नाही, तर हा संस्कृतीचा उरलासुरला धागाही हातचा जाईल. धर्माने वेगळे असलो तरी संस्कृतीने आणि इतिहासाने एक आहोत, हे लवकरात लवकर जाणण्याचा काळ आपण गमावून बसू. भारत-पाकिस्तानच्या ‘सोशल मीडिया प्रिय’ तरुणांना हे आज करता येणं शक्य तर आहेच; पण या मीडियामुळे गेल्या ६० वर्षांपेक्षा ते जास्त सोपे आहे. भारत-पाकिस्तानातील कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी, साहित्यप्रेमी, प्रागतिक विचारांचे पत्रकार आणि उदारमतवादी हिंदू-मुस्लिम जनता, हे यासाठी पुढाकार घेऊ शकतात. दोन्ही देशांच्या सांस्कृतिक एकात्मतेचा नवा मुद्दा (खरं तर जुनाच) पुढे आणून दोन्हीकडच्या जनतेला पटवून देण्यात जर आपण यशस्वी झालो तर राज्यकर्त्यांचे आणि धार्मिक नेत्यांचे हे जीवघेणे खेळ थांबतील. दहशतीवर स्वतःचे पोट भरण्याचे दहशतवाद्यांचे धंदे थांबतील. हे जेव्हा आपण दोन्हीकडून प्रयत्नाने वास्तवात आणू शकू आणि जेव्हा ‘गर्वसे कहो, हम सिंधुस्तानी है’ ही घोषणा दोन्ही देशांत घुमेल, तेव्हा तोच खरा आपला, दोन्ही राष्ट्रांचा पहिला ब्रिटिशमुक्त ‘स्वातंत्र्यदिन’ असेल.

 

मंगला सामंत

(मिळून साऱ्याजणी, जानेवारी २०१८)