40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

स्त्रीवादी विज्ञान : एक समावेशक समज

जर कोकिळेच्या पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी एक वेगळ्या प्रजातीचा पक्षी घेऊ शकतो, तर पुरुषांना मुलांच्या संगोपनामध्ये सहभाग घेण्यामध्ये काय अडसर आहे? ¹ 
– डॉ. मंजिरी जैन, सहयोगी प्राध्यापक, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER), मोहाली.

महासाथीबद्दलची परिस्थिती आयझॅक अ‍ॅसिमोव्ह यांच्या ‘न लढलेल्या युद्धा’सारखी (Unfought War) आहे.²
– प्रा. रोहिणी गोडबोले, सैद्धांतिक पदार्थवैज्ञानिक व मानद प्राध्यापक, उच्च ऊर्जा पदार्थविज्ञान केंद्र (CHEP), भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू.

स्त्रीवादी विज्ञानाचे असे प्रतिपादन नाही की ‘स्त्रियांचा’ असा खास आगळावेगळा, वैश्विक किंवा श्रेष्ठ असा विज्ञानविचार किंवा विज्ञान करण्याची पद्धती आहे किंवा वैज्ञानिक स्त्रिया करत असलेल्या विज्ञानाचा पदार्थविज्ञानावर किंवा शरीरशास्त्रावर किंवा मनोविकारशास्त्रावर सारखाच परिणाम होईल. ते प्रतिपादन असे आहे की जे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन पूर्वापार, ऐतिहासिकरीत्या बाहेर ठेवले गेले आहेत त्यांचा जर वैज्ञानिक समुदायांनी समावेश करून घेतला तर विज्ञान आणि समाज दोघांचाही फायदा होईल.³
– कॉर्डेलिया फाइन, इतिहास व तत्त्वज्ञान अभ्यास शाला, कला शाखा, मेलबर्न विश्वविद्यालय

कोविड – १९  च्या महासाथीच्या उगमाबद्दलचे विवाद सोडले तरी जीवाणू आणि विषाणूंच्या या बदलत्या जीवन पद्धतींना समजून घेणे ही गरज या महासाथींनी विज्ञानावर टाकली आहे. विज्ञान हे समाजातील सांस्कृतिक आणि आर्थिक गरजा आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. लिंगाधारित श्रमविभागणी ही आपल्या समाजाची किंबहुना सार्‍या जगभरची परिस्थिती आहे. अशावेळी स्त्रियांनी त्यांचे, विज्ञानाच्या संशोधनात देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लादले जाणारे, दुय्यमत्व बाजूला ठेऊन विज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचा स्वतःचा विचार मांडला आहे. हे लिहीत असताना विज्ञान संशोधनात कार्यरत असणाऱ्या आणि अधिकारपदांवर असलेल्या दोन स्त्रियांचे, डॉ. मंजिरी जैन व प्रा. रोहिणी गोडबोले यांचे, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे बोल मला उद्धृत करावेसे वाटले.

तिसरा उतारा जे मांडतो त्याचाच अर्थ असा होतो की जे विविधता असलेले वास्तव आहे आणि त्यातील गुंतागुंतीची नाती आहेत त्यातून स्त्रियांसह बहिष्कृत असलेले दृष्टिकोन सामावून घेऊन विज्ञानाच्या ज्ञानाचा आवाका वाढवणे म्हणजे स्त्रीवादी विज्ञान. कशाचे अवलोकन करायचे, अनुभवजन्य ज्ञान, विज्ञान पद्धती, निसर्गाबरोबरचे सह-अस्तित्व या सर्वांचा समावेश करणारे लिंगभावाच्या पलीकडे जाणारे व समन्यायाकडे जाणारे विज्ञान4. म्हणजे प्रस्थपित विज्ञानाने आजपर्यंत नाकारलेल्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनांचा समावेश करणारे विज्ञान.

आजवर विज्ञान म्हणून जे केले गेले आणि केले जाते त्याची तपासणीदेखील या व्यापक सहभागाच्या दृष्टिकोनातून व्हायला हवी. म्हणजे साधेसे उदाहरण द्यायचे झाले तर आयुर्मर्यादा वाढली, पण आज देखील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालयाने पाच वर्षांपूर्वी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा पाहणी अभ्यास सांगतो की आदिवासींच्या आरोग्याचे सर्वंकष मूल्यमापन केल्यानंतर असे आढळले की आरोग्याच्या प्रत्येक निकषांवर देशातील आदिवासी लोक मागे पडत होते.

भारतातील आदिवासी समुदायांमध्ये ‘आरोग्य निर्देशांक खराब होते, आजारी असण्याचा दर आणि मृत्यूचे दर बरेच जास्त होते आणि आदिवासींसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांचा अत्यंत मर्यादित वापर होत होता’ असे अहवालात म्हटले आहे. उदाहरणार्थ, देशातील मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के आणि मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यू देशाच्या ९ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येच्या तुलनेत खूप जास्त आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी लोकसंख्येमध्ये क्षयरोगाचा प्रादुर्भाव एक लाखमागे ७०३ तर उर्वरित देशात २५६ प्रति लाख होता. चौथ्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार (२०१५-१६) आदिवासी लोकसंख्येमध्ये बालमृत्यूचे प्रमाण दर एक हजार जिवंत जन्मांमागे ४४.४ होते, जे ३४ या राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक होते..5

खडतर आयुष्यामुळे गरीब आणि दलित आदिवासी स्त्रिया आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या जीवनाची गुणवत्ता आणि आयुर्मर्यादा (फारशी) वाढलेली नाही. म्हणजे विज्ञानाने रोगांवर मात मिळवली असली तरी जीवनातील खडतरता आणि भेदाभेदांवर विजय मिळवलेला नाही. उच्च नीच स्तरात विभागलेले सामाजिक वास्तव आणखीनच बिघडले आहे आणि हे सारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या नावाखाली जे झाले त्यामुळे झालेले आहे. याचा विज्ञानाने काही विचार करायला हवा असा तो आग्रह आहे.

म्हणजे न्यूटनने झाडावरून पडलेले सफरचंद पाहिले आणि गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडले ते पुन्हा तपासण्याचा प्रश्न येत नाही. पण त्याला हा शोध घेण्यासाठी मिळालेल्या अनुभवांना एका युनिव्हर्सिटीच्या परिसरात सैद्धांतिक परिभाषेत मांडायला जशी जागा मिळाली तशी जागा तळागाळातल्या आदिवासींच्या अनुभवांना मिळते का?त्यांचे सिद्धांतन होते का? ज्यांना ज्ञानभांडाराची दारे उघडी नाहीत अशा सर्वच मानवांना, ज्यांच्या अनुभवांना मुळातच या ज्ञानभांडारात प्रवेशासाठीदेखील अ‍डसर आहेत अशा अनेक अनुभवांना निसर्गाच्या ज्ञानाचा भाग बनण्याचा वाव मिळायला हवा.

सरदार सरोवरचेच उदाहरण घेऊया. धरणाला झालेला विरोध आणि सुचवलेले इतर पर्याय धुडकवून लावून जे निर्माण केले गेले त्यातून नर्मदेचे ते खोरे कायमचे नाहीसे झाले. खोर्‍यातील जनजीवन नष्ट झाले. त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या विशेष देवाणघेवाणीच्या व्यवहाराला खीळ बसली. नाहीसे झाले ते वास्तव, तो निसर्ग आणि त्याची समज. हे सर्व कायमचे हरवणे आणि जे साध्य होणार आहे किंवा झाल्याचा दावा केला जातोय त्यांचा मेळ कसा बसणार? पण आणखी अशी खोरी आणि तिथला निसर्ग आणि त्याबद्दलचे ज्ञान, समज उद्ध्वस्त होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्त्रीवादी विज्ञान आहे असे मी म्हणेन. म्हणजे निदान खर्च आणि फायद्याची आकडेवारी काढताना तरी या सर्व गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. प्रश्न विस्थापनाचा तर आहेच पण काहीही केले तरी भरून न काढता येण्याजोग्या निसर्गाच्या विनाशाचाही आहे. याचे माप काय आणि ते कोण ठरवणार? सार्‍याच विकासाच्या कल्पना तपासून नव्याने रुंदावून पाहण्याची गरज निर्माण होणे याला मी स्त्रीवादी विज्ञान म्हणेन. या संदर्भात विस्थापित झालेल्या केशवभाऊ आणि केवलसिंग वसावे यांच्या शब्दात नर्मदाच्या खोर्‍याने काय घालवले याचे वर्णन जे नंदिनी ओझा यांच्या बोलत्या इतिहासाच्या दस्तऐवजात म्हणजे ‘लढा नर्मदेचा’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात फार छान नोंदले गेलेय.

नर्मेदेच्या खोर्‍यातला जीवनाबद्दल केवलसिंग म्हणतात –

तिथली आमची शेती थोडी डोंगरउताराची,थोडीक सपाटीची होती. लोखंडी नागराचा वापर आम्ही केला नाही. लाकडी नागरांनीच ती शेती नांगरली जायची. जेव्हा आम्ही ती जमीन नागरून सुपिक झाल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जवारी,मका,भादी,बंटी सगळ्याच प्रकारचं पीक घेत होतो. नदी नाल्यामधे कांदा, लसूण पिकवत होतो,टरबूज घेत होतो. फक्त ऊस आणि केळी सोडली तर बाकी सगळ्याच प्रकारचं पीक आमच्या त्या जमिनीत निघत होतं आणि तेसुध्दा बिगर खत वापरून.

गावामध्ये जमीन जरी आपल्याला हलकी वाटते तरी ती जैविक शेती आहे, नैसर्गिक शेती. जिथं कधीही रासायनिक खत वापरलं गेलं नाही. पूर्ण शेणखत, पाला पाचोळा याचाच वापर करून शेती केली गेलेली आहे. जरी आमचं उत्पन्न कमी येत होतं तरीसुद्धा आम्ही १२ महिने आरामाने जगत होतो. सगळे कुटुंब खाऊन-पिऊन उरेल इतकं धान्य तरी पिकत होतं. आम्ही ज्या डाळी पिकवत होतो त्या डाळी खाण्यापुरती ठेवायचं आणि मग बाजारामध्ये जाऊन कपडालत्ता घेत होतो. 6

नर्मदेच्या आताच्या स्वरूपाबद्दल बोलताना केवलसिंग म्हणतात –

आता जे काही समोर दिसतं ते फक्त एक तलाव एवढंच दिसतं. नर्मदा पहिली किती सुंदर खळखळ, खळखळ वहात होती! नर्मदेची रेती, नर्मदेचे इतके काळे काळे मोठे मोठे दगड, नर्मदेच्या पूर्ण पात्रांमध्ये इतकी झाडे होती, इतकी हिरवळ होती हे मीडियामधे नाही आलं! अनेक घाट, अनेक धबधबे, अनेक डोह अशा प्रकारचा जो भाग होता तो आता सापडणार नाही. नर्मदेच्या किनारी असलेली हिरवाई, जडी-बुट्टी, नर्मदेमधे असलेले मासे – जे भारतामधे कुठेही सापडत नाहीत…नर्मदा ही पूर्ण दगडादगडांनी वाहणारी नदी असल्यामुळे त्याच्या आधारे जगणारे जे मासे होते ते पूर्ण खतम झाले आहेत.7

आता तुम्ही म्हणाल की हे नर्मदेतील विस्थापित झालेले आदिवासी जे मांडत आहेत त्यात विज्ञान कुठे आले? विज्ञानाशी त्याचा काय संबंध? ‘भारत की छाप’ या पाषाण युग ते आधुनिक जगातल्या भारतातील विज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेणार्‍या मालिकेसाठी एक पूरक पुस्तक बनवताना जे काही वाचले, लिहीत असताना जे समजले, जो काही विचार केला तेव्हा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून विज्ञान म्हणजे काय याबद्दल एक वेगळेच समीकरण मनात निर्माण झाले. सर्वप्रथम केवळ आधुनिक विज्ञान तेच विज्ञान ही समज सोडण्याचा प्रश्न आहे. या समजेमुळे इतिहासातल्या पूर्वीच्या सर्व कालखंडातले विज्ञान, तसेच प्रयोगशाळा आणि विज्ञानसंस्था यांच्याबाहेरील जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील विज्ञान दिसेनासे होते किंवा खालच्या दर्जाचे ठरते.

विज्ञानाचा प्रवास हा खूप दीर्घकाळ चालत आलेला प्रवास आहे. आधुनिक विज्ञानाच्या कितीतरी आधीपासून निसर्गाबरोबरच्या संवादातून निर्माण झालेले निसर्गाबरोबरचे नाते म्हणजे विज्ञानच आहे. मानवी अस्तित्वासाठी निसर्गाच्या नैर्सिगक चक्राच्या अनुषंगाने त्याच्याशी जोडून घेणे, त्याचा अर्थ लावून प्रत्यक्षात त्याच्याअंतर्गत विकास आणि विनाश या द्वंद्वात्मक पण सातत्याने चाललेल्या चक्राचा वेध घेत केलेली कृती म्हणजे विज्ञानच. तेव्हापासूनच अवलोकन हा विज्ञानाचा अविभाज्य भाग बनले आणि आधुनिक विज्ञानाने ती पद्धत म्हणून त्याचा स्वीकार केला. पण ही अवलोकने करताना जे अनुभव आले स्वीकार केला का? आणि हे प्रकृतीशी नाते हे त्या त्या समाजातील विविध लोक, त्यांची सांस्कृतिक तत्त्वे, आणि जीवन दृष्टिकोन यावर आधारलेले होते आणि म्हणून त्यांचा योग्य तो आदर करणे हे केले का? हे सारे जनसमूह त्यांच्या विविधतेसकट जे ज्ञान-विज्ञान सांभाळत होते तसा त्यांचा सहभाग असता तर तसे झालेही असते. आधुनिक विज्ञानाच्या भरभराटीच्या सुरुवातीच्या काळात जे प्रत्यक्ष कारागीर होते त्यांचा वैज्ञानिक प्रगतीत मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि त्या कारागिरांच्या अवलोकनातून गरजेतून ते विज्ञान फुलले. ही कुतूहल, ते शमवताना जी कृती केली त्या कुतूहलातून आलेली नवी समज, आणि ती नवी समज अंगिकारताना मुख्यत: सुलभता आणि उपयोगिता या निकषावर लोकांमधले विज्ञान पुढे प्रगत होत गेले.

कॅरेन हेडॉक यांच्या ‘रानटी मोहरीने काय काय दिले – उत्क्रांतीची एक कहाणी’ या पुस्तकामध्ये एका रानटी मोहरीच्या बीपासून शेतकर्‍यांच्या अवलोकनातून, त्यांनी केलेल्या निवडीतून त्यांनी निरनिराळी पिके कशी विकसित केली याची कहाणी आहे. निरनिराळ्या तऱ्हेच्या उपयोगितेसाठी चव, मुळाचा आकार, पानांच्या झुपक्याची रचना अशा मर्यादित गोष्टींसाठी जी अवलोकने आणि कृती केली त्यापासून ते कसे साध्य झाले ते या पुस्तकात खूप छान दाखवले आहे. अनेक ठिकाणच्या शेतकर्‍यांनी हजारो वर्षांच्या निवडीतून या रानटी मोहरीच्या बियाण्यांपासून मोहरीच्या कुटुंबात मोडणारी अनेक पिके विकसित केली आहेत. त्यांचे मूळ बीज हे रानटी मोहरीचे होते. त्या बीजाच्या कृत्रिम निवडीतून निर्माण केल्या गेलेल्या पिकांमध्ये पुढील पिके आहेत : कोबी, फ्लॉवर, मुळा, लाल मुळा, ब्रोकोली, कोंभ आलेली छोटी चिनी कोबी , बोक चुई (चिनी कोबी), मोहरी, सलगम, नवलकोल, इ.8

मानवाच्या विचारी असण्यामुळे निसर्गाबरोबरच्या सहकार्यापेक्षा निसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या आणखी क्षमता दिसू लागल्या असाव्यात. निसर्गाच्या अवलोकनातून, वनस्पतींच्या जीवनचक्राच्या दर्शनातून निसर्गाच्या सहकार्याने शेतीचा शोध लावणारे ज्ञान हे मुळात स्त्रियांचे ज्ञान होते. पशूंवरील वर्चस्वातून येणारे ज्ञान व विचार याहून वेगळा असावा. आदिम समाजांमधील श्रमविभागणीमध्ये शिकार व पशूंवरील वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम प्रामुख्याने पुरुषांचे असलेले दिसते. त्यातून पुरुषप्रधानतेचा उगम असाच आणि याच सुमारास कुठेतरी झाला असला पाहीजे. निसर्गाशी असलेल्या नात्यामध्ये वर्चस्ववादी विचाराने प्रवेश केला असावा. आजार, रोगराई, संसर्ग यातून होणारे मृत्यू आणि त्या मृत्यूंवर कुरघोडी करण्याची गरज यानेदेखील त्याची पुष्टी झाली असावी. जंतूंबरोबरचे आपले नाते हे प्रामुख्याने सहकार्याचे व सहअस्तित्वाचे आहे. पण जंतू, विषाणू हे आजार देणारे आणि त्यांच्या संसर्गातून रोग होतात हे नातेच नंतर मोठे दिसू लागले. त्यातून निसर्गाबरोबरच्या सहअस्तित्वापेक्षा नियंत्रणाचा विचार स्वीकारला जाण्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. एका बाजूला आजारावर मात आणि दुसरीकडे विच-हंटिंगद्वारे (चेटकीण ठरवून स्त्रियांची हत्या) स्त्रियांवर नियंत्रण हातात हात घालून जातात. निसरनिसर्गाशी नाते असलेल्या स्त्रियांना जिवे मारण्याचा कट केला गेला. पाळीव प्राण्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा व्यवहार सुरू झाला. शेतीचा शोध लागला आणि पाळीव प्राण्यांची गरज तयार झाली; पण निसर्गाबरोबर वेगळे नाते हळूहळू निर्माण होत गेले ते या शोधांमुळे नव्हे तर नियंत्रण विचाराच्या वाढत्या प्रभुत्वामुळे हे महत्त्वाचे. काहीवेळा साथीच्या रोगांचे व पर्यावरण ऱ्हासाचे खापर शेतीच्या शोधावर आणि पाळीव प्राण्यांवर थोपवले जाते. निसर्गाचा व्यवहार समजून घेऊन त्याच्या बरोबरीने विकास कसा करायचा याबद्दलचे ठोकताळेच बदलत गेले.

निसर्गाला समजून घेण्याच्या तत्वज्ञानामध्ये, जीवनदृष्टीमध्ये देखील खूप फरक कसा असतो ते या एका वारली कथेत आपण पाहू शकतो. ‘उंदराचा वाटा’या गोष्टीतल्या, आदिवासी जोडप्याला शेतीसारखे, म्हणजे एकदाच उगवून धान्य देणारी रोपे एका ठिकाणी लावायची कल्पना सुचते पण त्यासाठी लगणारे बियाणे कुठून आणायचे हे कळत नसते, तो पुरुष त्याचा शोध घ्यायला निघतो आणि सुरुवात पुर्वजांपासून करून देवांपर्यत पोचतो, ते त्याला इतर प्राण्यांकडे पाठवतात. खार आणि इतर बियांवर जगणार्‍या प्राण्यांकडे चौकशी करतो आणि वणवण फिरत परत येतो. मधल्या काळात, एका उंदरी बरोबर आदिवासी बाई बोलते आणि उंदरी तिला तिच्या खजिन्यातले बी देते. एका अटीवर, पीक पिकल्यावर बारातला एक वाटा उंदरीला द्यायचा. आलेल्या पिकाचे अप्रूप, आनंद यामध्ये ते दोघेही उंदरीला विसरतात आणि उंदरी येते वाटा मागायला तेव्हा तिला परतवून लावले जाते. उंदरी रागावते आणि तेव्हापासून आजपर्यंत ती आपला वाटा न बोलता वसूल करत आली आहे. हा सहजीवनाच्या तत्त्वज्ञानातला खोलवरचा धडा आहे. मानव हा सर्वज्ञ नव्हता आणि नाही आणि निसर्गाच्या सहअस्तित्वाची दखल घेतली नाही त्याला धुडकावले तर निसर्ग त्याची किंमत वसूल करतो हे सांगणारी ही कथा आहे. हे तत्त्वज्ञान, हे सहअस्तित्व समजणे हेही विज्ञानच आहे.

रानटी मोहरीच्या बियांपासून जी उत्क्रांती झाली त्या प्रवासाची कहाणी सांगताना कॅरेन म्हणतात की विज्ञान म्हणजे नुसती तथ्यांची यादी नाही, विज्ञान ही एक प्रक्रिया आहे – प्रश्न विचारण्याची पद्धती आहे. प्रश्नांची उत्तरे निरीक्षण करून, गृहीतके मांडून, प्रयोग करून, मोजमाप करून, परिणामांच्या नोंदी करून, विश्लेषण करून, कारणमीमांसा करून, निष्कर्ष काढून, ते निष्कर्ष लोकांपर्यंत पोचवून, पुन्हा प्रश्न विचारून निष्कर्षांची पुर्नतपासणी करणारी अशी ही विज्ञानाची पद्धती आहे. आणि या रानटी मोहरीपासून निघालेल्या एवढ्या विविध भाज्या आपपल्या चवीसाठी या विज्ञानाच्या पद्धती वापरूनच निर्माण झाल्या. आणि ही पद्धती निसर्गाशी असलेल्या सहअस्तित्वाच्या पोटातच संथ लयीने, प्रदीर्घ काळ घडत होती.

पण निसर्गाशी असलेल्या सहअस्तित्वाच्या आधारे निसर्गाला समजून त्याचे निरनिराळ्या आवस्थेत अवलोकन करण्याच्या संथ लयीच्या पद्धतीला पुढे काट मिळाला. निसर्गाचा भागशः अभ्यास व नियंत्रण यातून जलद मिळणारे ज्ञान व फायदा यातून नियंत्रणाचा वाढता अट्टाहास आणि त्यातून मिळणारा ताबडतोबीचा नफा या गोष्टी प्रमुख बनल्या आणि विज्ञानाच्या पद्धतीत व व्यवस्तेत आमूलाग्र बदल झाला. निसर्गात काय आहे याचा शोध घेताना जे अवगत झाले ते हे की जे दिसत आहे त्यावर त्वरित नियंत्रण मिळवायचे – त्याचे दीर्घकाळानंतर होणारे तोटे हे ताबडतोबीच्या फायद्यात हरवून गेले. त्याच्यासाठी करावयाच्या प्रदीर्घ अवलोकनांना काट बसला. सर्वसामान्यांच्या जीवनातील विज्ञान खुद्द विज्ञानातूनच बहिष्कृत झाले. विविध स्तरातील समाज घटकांना आता त्या या नव्या विज्ञानात निदान औपचारिक दृष्ट्या सहभागी करून घेण्याची पद्धत कागदोपत्री उरली आणि तो सहभाग केवळ प्रतीकात्मक राहिला.

मुळात अवलोकनाच्या मूलभूत व्यवहारामध्ये गुंतलेला प्रश्न असतो की तुम्ही काय पाहणार आणि त्यातून कशावर नियंत्रण मिळवायचे आहे. विज्ञानाच्या या बाजूचा विचार आपण स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात पाहूया. विज्ञानाची पद्धत असते, अवलोकन. या ठिकाणी स्त्री चळवळीने प्रथमपासून जे अवलोकन केले आहे ते हे की विच हंटिंग या स्वरूपात स्त्रियांचे आरोग्य क्षेत्रातील स्थान कायमचे नेस्तनाबूत करायचा प्रयत्न झाला. स्त्रीशरीराचा अवमान हा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. पुनरुत्पादन ही मानव प्रजातीच्या अस्तित्वाची मूलभूत गरज आहे. स्त्रियांचे पुनरुत्पादनशील मासिक चक्र अत्यंत प्रगत चक्र आहे. महिन्याला एक अंडे परिपक्व होणारे मासिकपाळीचे चक्र रसायनांच्या अत्यंत संवेदनशील समतोलावर आधारलेले असते. हे चक्र मेंदूपासून अंडकोशापर्यंत स्त्रवणार्‍या रसायनांच्या शरीरभरच्या अनेक ग्रंथींच्या स्रावांच्या बदलत्या संतुलनाने बनलेले असते. असे असूनही स्त्रियांच्या अवहेलनेबरोबरच या चक्राच्या अवहेलनेलाही सुरुवात झाली. काही गोष्टी गेल्या काही वर्षात बदललेल्या असल्या तरी मूलभूत बदल झालेले नाहीत असेच म्हणायला हवे. औषधे आणि वैद्यकीय संशोधनाचे मुख्य केंद्र हे पुरुषच आहेत. त्यामुळे वैद्यकीय ज्ञानात पडलेली तफावत अजून देखील कायमच आहे. स्त्रियांना होणार्‍या आजारांचे पुरेसे संशोधन झालेले नाही. या संदर्भात मुख्य मुद्दा हा आहे की स्त्रियांच्या आरोग्याकडे पाहताना त्यांची पुनरुत्पादनामधील भूमिका हीच मध्यवर्ती मानली गेल्यामुळे निरनिराळ्या इतर रोगांसाठी होणार्‍या औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी स्त्रियांचा समावेशच केला जात नसे! १९९३ साली अमेरिकेमध्ये वैद्यकीय चाचण्यासठी स्त्रियांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आणि २०१७ मध्ये त्या कायद्याला पुनर्जीवित केले गेले.9 लैंगिक फरकामुळे चयापचय प्रक्रियेत पडणारे फरक आणि त्यामुळे औषधांच्या परिणामकारकतेवर होणारे फरक, गर्भनिरोधके आणि इतर पीडानाशक वगैरेचे शरीरावर होणारे इतर परिणाम यासारख्या गोष्टींबद्दल पुरेसा अभ्यास व संशोधन अजूनही झालेले नाही.

याचे महत्त्वाचे कारण संशोधनाच्या व्यवस्थापनाची धुरा आणि त्याचा व्यवहार आणि व्यवस्थापन आणि काय विचारले जाणार ते पुरुषांच्या हातातच राहिले आहेत आणि त्यांची दृष्टीही पुरुषीच राहिली आहे. याची उदाहरणे खूपच आहेत. डॉ. लीला गोखले यांनी केलेला अभ्यास याबाबत फार उद्बोधक आहे.10 मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखते आणि ही तक्रार साधरणत: अनेक स्त्रियांना कायमच सहन करावी लागते. पण पाळीच्या सुरवातीच्या काळात मुलींना पोट दुखीचा बराच त्रास होतो. याची कारणे १९३२ साली उलगडली होती की मज्जातंतुना सूज येते आणि त्या सुजेचे औषध आहे बी व्हिटॅमिन वन. मासिक पाळीच्या वेळी मज्जतंतूना येणार्‍या सुजेमुळे या वेदना होतात. आणि बी व्हिटामिन वन दिल्याने ही वेदना शमू शकते. परंतु १९३२ साली उलगडलेल्या या गोष्टीनुसार उपचार अजूनही होत नाहीत! मुळात किती डॉक्टरांना हे माहीत असेल  आणि महत्त्वाचे वाटले असेल हाच मुळात प्रश्न आहे.

स्त्रियांच्या मासिक पाळीचा प्रश्न घेऊया. आज मासिक पाळीसाठी रजेच्या प्रस्तावाची चर्चा होताना दिसते आहे. मासिक पाळी हे पाप, अशुद्ध असणे, अपवित्र असणे या समाजमान्य अंधश्रद्धेवर आधारलेल्या बाहेर बसणे या ‘सामाजिक अंतरा’च्या प्रथेला व प्रस्तावाला विरोध करण्याचे काम तज्ज्ञ वैज्ञानिकांनी कधी केले का? कारण त्त्यातील विदरकता आजच्या करोनाच्या काळात सामाजिक अंतर राखायच्या गरजेने जशी कळली तशी कधी कळून घेण्याच प्रश्नच आला नाही. आणि हेच इतरही अनेक बाबतीत आहे. गंभीर इजा करू शकणाऱ्या जास्त मात्रेच्या इपी औषधांचा वापर गर्भपात करण्यासाठी करण्याचे देण्याचे थांबले आहे का? त्यांचे अजून उत्पादन होते, विक्री होते. ते मान्यताप्रप्त आहे का? किती उत्पादन होते? त्याची आकडेवारी कुठे आहे? आणि या दोन्हीबद्दलची माहिती, त्यांची सांगड आपल्या वैद्यकीय शिक्षणाच्या पाठात येणे महत्त्वाचे नाही का? पुनरुत्पादन ही स्त्री शरीराची बाब नसून स्त्री-पुरूषांची समान जबाबदारी आहे हे आग्रहाने मांडणे हे विज्ञानाशी निगडित आहे. ते वैज्ञानिक-डॉक्टरांसह सर्वांसमोर आणले जाणे महत्त्वाचे आहे. ते होते का? आज सामाजिक माध्यमातून स्त्री आरोग्याबाबत विशिष्ट प्रश्न घेऊन सर्व्हे आणि छोटे अभ्यास करणे सहज शक्य आहे. हेही विज्ञानच आहे. पण त्यासाठी लागणारी विषयाची आस्था कधीच नव्हती.

आज स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या संदर्भात मासिक पाळीबद्दल निदान उघडपणे बोलले जात आहे आणि काही गोष्टी स्पष्ट बोलल्या जात आहेत. असेच काही वर्षांपूर्वी एचआयव्ही या रोगाच्या संबंधाने सुरक्षित सेक्सच्या निमित्ताने सेक्शुअ‍ॅलिटीचा प्रश्न राजरोस चर्चिला जाऊ लागला. पण मग त्याबद्दलची समज आणि त्यातील गुंतागुंत न उलगडता जे वरवर दिसत आहे त्यावरच लक्ष केंद्रित करणे तज्ज्ञांनी निवडले. गर्भधारणेसारख्या मानवाच्या प्रजातीचा मुख्य आधार असलेल्या पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये केंद्रीय स्थानी काय दिसते? तर स्त्री शरीर. मग पुनरुत्पादनावरील नियंत्रणासाठी साधा सोपा आणि पुरुषी जीवन दृष्टिकोनात चपखल बसणारा मार्ग म्हणजे स्त्री शरीरावर नियंत्रण वाढवणे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नावर मात करायला आधुनिक विज्ञानाला सोपे उत्तर मिळाले. मला वाटते गेल्या वीस वर्षात यामध्ये जो फरक पडला आहे तो केवळ तंत्रज्ञानाच्या पातळीवर. बाकी जैसे थेच. जे घातक ठरू शकते असे इंजेक्शन रूपात द्यायचे जे गर्भनिरोधक स्त्री चळवळीने रोखले होते तेच आज सरकारी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात राजरोस आणले गेले आहे. तंत्रज्ञान फार पुढे गेले आहे. स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली मात्र चालूच आहे. त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत फरक पडलेला नाही.

आधुनिक विज्ञानाच्या या वाटचालीची दिशा ही गोष्ट पुढे आणते की या साऱ्या प्रवासात स्त्रियांचे हक्क समजून घेऊन त्यांना अबाधित स्वरूप देण्याचा प्रश्नच कधी विचारला गेला नव्हता. तो विचारला तर गेला पाहिजे, मग तो अभ्यासात कसा घ्यायचा त्याची चर्चा होऊ शकते. उलट आज तर स्त्रियांची गर्भाधारणेवरील ‘मक्तेदारी’ दूर करण्याकडे, त्यावर वेगळ्या पद्धतीने नियंत्रण बसवण्यासाठी प्रयत्नांची घोडदौड चालू आहे. स्टेम सेल वर चाललेल्या संशोधनात हे साध्य झाल्यासारखेच आहे. आधुनिक विज्ञानाच्या निर्मिती आणि व्यवस्थापनापासून ते उपयोगापर्यंत काही शतकांची ही वाटचाल पुरूषकेन्द्री, वरिष्ठ वर्ग-जात-समुदाय केंद्री आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामधला दोहोंचं नियंत्रण करणारा दुवा हा भांडवली उत्पादनाचा आहे. या वाटचालीत फायद्याच्या, नफ्याच्या कल्पना अधिकाधिक टोकाला गेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, वाढती सामाजिक तफावत आणि तेढ हे त्याचेच परिणाम आहेत. त्याचे दीर्घकालीन परिणाम आपण भोगत आहोत. विज्ञान निसर्गापासून खूप दूर गेले आहे. एकीकडे पुनरुत्पादनावर अखेरचे नियंत्रण हे स्टेम सेलने केल्या जाणार्‍या पुनरुत्पादनाशी पोचले आहे. दुसरीकडे वृद्धांची जनसंख्या वाढत आहे आणि त्यांची काळजी घ्यायला माणसांनाच पर्याय म्हणून वाढत्या वयातली काळजी घेण्यासाठी रोबोंची निर्मिती केली जातेय.

स्त्री आणि विज्ञानाचा हा समावेशक दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा आणणार? शतकांची ओझी कशी झुगारणार? हा अनेक पातळ्यांवरचा अनेकपदरी जटिल प्रश्न आहे. पण आपण स्वत:पासून, स्वतःच्या जीवनापासून ती सुरुवात करू शकतो. म्हणजे स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे, स्त्रियांच्या अस्तित्वाविषयी स्त्रियांना कमी लेखण्याचे सर्वात जुने ठोकताळे नाकारू शकतो. मासिक पाळीच्या चक्राला पाप म्हणण्याचे, घाण म्हणण्याचे सोडून आपल्या शरीराबरोबर एक वेगळे नाते बांधण्याची सुरुवात करू शकतो. ही फक्त लहानशी सुरुवात असेल हे खरे. पण सुरुवात तर करायला हवी. काही शब्द, ज्यांचा उगम हा स्त्रियांच्याकडे बघण्याच्या ढोबळ समजातून आणि जाणिवेतून आला आहे ते बदलायची मोहीम घेऊ शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर ‘हिस्टेरिया’ या शब्दाचे घेता येईल. गर्भाशयासाठी असलेल्या ‘हुस्टेरा’ या शब्दापासून तो बनलेला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्त्रियांना होणार्‍या कोणच्याही मानसिक आजाराचे निदान हे गर्भाशयाचा स्त्रियांच्या शरीरावर होणारा परिणाम, गर्भधारणेचा अभाव किंवा सेक्सचा अभाव म्हणून ‘हिस्टेरिया’ असे केले जात होते. 11 किंवा जिथे जिथे ‘मानवी’ शरीर दाखवायचे असेल तिथे फक्त पुरुष शरीर दाखवण्याची प्रथा मोडून काढण्यासाठीही आंदोलन करता येईल.

कुणास ठाऊक, त्यामुळे विज्ञानाची नजर बदलायलाही सुरुवात होईल!

स्वातीजा मनोरमा
manoramaswatija@gmail.com

¹https://manthanmagazine.wordpress.com/2020/10/27/translations-of-the-pandemic-women-in-stem/

²उपरोक्त.

³Cordelia Fine, Feminist Science: Who needs it? Perspectives|The art of medicine| Lancet, Volume 392, ISSUE 10155, P1302-1303, October 13, 2018 https://www.thelancet.com/action/showPdf?pii=S0140-6736%2818%2932400-0

4Feminist Perspectives on Science (Stanford Encyclopedia of Philosophy)

5Health to poverty: Tribals scrape bottom of barrel

6Written by Anuradha Mascarenhas | Pune | Updated: September 15, 2018 4:58:47 am

7Health to poverty: Tribals scrape bottom of barrel | India News,The Indian Express

8 रानटी मोहरीने काय काय दिले : उत्क्रांतीची एक कहाणी – कॅरेन हेडॉक

9 NIH Revitalization Act of 1993 Public Law 103-43NIH Revitalization Act of 1993 Public Law 103-43 – Women and Health Research – NCBI Bookshelf

10 डॉ.  लीला गोखले: वेदनेतून सुटका , १७ जानेवारी चतुरंग पान नं. ४३ व ४६ http://epaper.loksatta.com/418837/indian-express/17-01-2015#page/43/1

11 hysteria – Wiktionary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *