40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

स्त्री, पुरुष आणि मेंदू

सर्व प्राण्यांमध्ये असणारा नर आणि मादी हा नैसर्गिक लिंगभेद (सेक्स डिफरन्स) मनुष्यप्राण्यातही असतो. परंतु मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष यांच्यात सामाजिक आशय असणारा फरक (जेंडर डिफरन्स) मात्र माणसांमध्येच असतो. त्यामुळे मेंदूविषयीच्या संशोधनातसुद्धा स्त्री-पुरुष असा भेदाभेद होत असल्याची तक्रार काही संशोधक करतात.

सर्व प्राण्यांमध्ये असणारा नर आणि मादी हा नैसर्गिक (सेक्स डिफरन्स) मनुष्यप्राण्यातही असतो. परंतु मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष यांच्यात सामाजिक आशय असणारा फरक (जेंडर डिफरन्स) मात्र माणसांमध्येच असतो. त्यामुळे मेंदूविषयीच्या संशोधनातसुद्धा स्त्री-पुरुष असा भेदाभेद होत असल्याची तक्रार काही संशोधक करतात.

हायपोथॅलॅम्स या विशिष्ट भागाच्या संदर्भात स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंटूंच्या रचनेत फरक असल्याचे सुरुवातीपासून संशोधकांना आढळले होते. त्यामुळे आजतागायत फक्त हायपोथॅलॅम्स बाबतीतल्या संशोधनासाठी स्त्रियांचा मेंदू अभ्यासला गेला आहे. परंतु इतर सर्व बाबतीत प्रयोगशाळेतल्या प्राण्यांमधल्या नरांचा किवा माणसाच्या बाबतीत पुरुषांचा मेंदू अभ्यासला गेला आहे असा काही संशोधकांचा आक्षेप आहे. मासिक पाळीच्या चक्रामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या संदर्भात सातत्याने होणारे चढउतार ही माद्यांचा किंवा स्त्रियांचा मेंदू अभ्यासताना येणारी प्रमुख अडचण असते. संशोधनामधले निष्कर्ष काढण्यात असे चढउतार गुंतागुंत निर्माण करतात हे त्यामागचं कारण असण्याची शक्यता मान्य करूनसुद्धा त्या संशोधकांचा असा आक्षेप आहे.

अलीकडे पाश्चात्त्य देशातल्या संशोधकांनी मेंदूच्या एकूण ४५ भागांचा अभ्यास करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया असा संमिश्र गट निवडला होता. त्यात स्त्रियांच्या मेंदूतले काही भाग पुरुषांच्या मेंदूतल्या तत्सम भागांपेक्षा मोठे असल्याचं आढळलं होतं. काही भागांच्या बाबतीत याची नेमकी उलटी परिस्थिती आढळली होती. मेंदूच्या काही भागाच्या आकारमानात असा फरक असणं म्हणजे त्या भागांच्या कार्यपद्धतीतसुद्धा फरक असला पाहिजे असा निष्कर्ष त्यावरून काढण्यात आला होता.

गेल्या काही वर्षात मेंदूविषयीच्या संशोधनात सातत्याने भर पडत आहे. संशोधकांनी मेंदूच्या कार्यपद्धतीतल्या वेगवेगळ्या पैलूंना प्राधान्य देत स्त्री-पुरुषांच्या मेंदूचा तौलनिक अभ्यास केला आहे. त्यांच्या निष्कर्षानसार वेदना शमवण्याच्या प्रयत्नात आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत स्त्री-पुरुषांमध्ये विशेषत्वाने फरक आढळतो.

मज्जारज्जूला जोडलेले मेंदूचे दोन विशिष्ट भाग म्हणजे माणूस आणि पृष्ठवंशी प्राण्यांचं वेदना-निवारणाचे मेदूतलं प्रमुख जाळं असतं. एका निरीक्षणानुसार स्त्रियांच्या मेंदूमध्ये या भागातल्या जोडण्यांचं प्रमाण अधिक असतं. तरीदेखील स्त्रियांच्या बाबतीत वेदना-निवारणासाठी या जोडण्यांचा मार्ग वापरला जात नाही. असं आढळलं आहे. याचं स्पष्टीकरण मात्र संशोधकांना अजून सापडलेलं नाही.

असाच एक विशेषत्वाने लक्षात घेण्याजोगा फरक म्हणजे मानसिक आजारात आपण ज्याला विषण्णता म्हणतो ते ‘डिप्रेशन’ पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दुप्पट संख्येने आढळतं. याचा संबंध मेंदूतल्या सिरोटोनिन या चेताप्रेषकाशी (न्यूरोट्रान्समीटर) आहे असा निष्कर्ष त्या निरीक्षणांवरून काढण्यात आला आहे. मेंदूतील इतर चेताप्रेषकांवर परिणाम साधणाऱ्या औषधांपेक्षा सिरोटोनिनवर परिणाम साधणाऱ्या प्रोझॅक या औषधाला स्त्रिया उत्तम प्रतिसाद देतात असं दिसून आलं आहे.

या आणि अशा प्रकारच्या निष्कर्षांवरून हॅना होग या मॉण्ट्रिअलमधल्या विज्ञानलेखिकेने आपल्या एका लेखात केलेलं विधान मात्र काहीसं धाडसाचं वाटतं. तिच्या मते स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूची रचना मुळातच भिन्न जनुकीय नकाशावर आधारलेली असते. त्यामुळे माणसांमध्ये फक्त एकाच प्रकारचा मेंदू नसून स्त्रीचा व पुरुषाचा असे मेंदूचे दोन प्रकार असावेत असं ती सूचित करते.

मेंदूचे असे दोन भिन्न प्रकार अस्तित्वात आहेत किंवा नाहीत याचा विचार करताना सर्वप्रथम काही शास्त्रीय मुद्दे ध्यानात ठेवावे लागतील. विसाच्या शतकापासून मेंदूविषयी झालेल्या सखोल संशोधनाचा समग्र आढावा घेऊन काढलेल्या निष्कर्षांनुसार मेंदूची रचना आणि कार्यपद्धती यासंबंधी दिसून आलेलं त्या अवयवाचं वेगळेपण ध्यानात घ्यावे लागेल.

मेंदूच्या कार्यपद्धतीचं वेगळेपण

गेल्या दोन दशकातल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे, अत्याधुनिक उपकरणांमुळे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रचंड वेगामुळे मेंदूसंबंधीच्या संशोधनक्षेत्रात माहिती, प्रायोगिक निष्कर्ष, सर्वेक्षण वगैरेंचा विविध पातळ्यांवर महापूर आला आहे. त्या सर्वांचं योग्य ते विश्लेषण करून, पद्धतशीरपणे ते एकत्र गोवून मेंदूच्या संदर्भात एखादा सुसूत्र सिद्धांत मांडणं ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे असं त्या क्षेत्रातल्या जाणकार शास्त्रज्ञांच विनम्न व प्रामाणिक मत आहे.

मेंदूबाबतीतल्या आतापर्यंतच्या संशोधनात आढळून आलेली सत्य परिस्थिती अशी आहे की मेंदू हा अनेक विरोधाभास असणारा अवयव आहे. मेंदूची एक स्थायी ढोबळ रचना असते आणि त्या अंतर्गत परस्परावलबी व स्वतंत्र अशो दोन्हो प्रकारच्या असंख्य गतिमान प्रक्रियासुद्धा अव्याहतपणे मेंदूमध्ये चालू असतात. मेंदूची कार्यपद्धती एकाच वेळी स्थानिक स्वरूपाची आणि काही बाबतीत विकेद्रित प्रकारचीसुद्धा असू शकते. गर्भधारणेपासून नऊ महिने गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या मेंदूची स्वतःची अशी खास वैशिष्ट्यं विकासित होत असतात. त्याचप्रमाणे मेंदूपेशीच्या भोवतालच्या पर्यावरणाची आणि बाह्य पर्यावरणातून येणाऱ्या संदेशांची दखल घेत निरंतरपणे स्वतःमध्ये बदल घडवत राहण्याची लवचीकतासुद्धा प्रत्येक मेंदूमध्ये असते. बदलत्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मेंदूपेशीच्या सतत नव्या जोडण्या होत असतात. त्याचप्रमाणे दीर्घकाळ वापरल्या न गेलेल्या जोडण्या कायमस्वरूपी रद्दबातल होत असतात. ‘वापरा नाहीतर गमवा’ हे मेंदूच्या कार्यपद्धतीचं मूलभूत सूत्र असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रिया प्रत्येक मेंदूगणिक प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या असतात.

अशी कार्यपद्धती असल्यामुळे वर्ण-वंश-लिंगभेदाच्या पठडीबद्ध विचारसरणीच्या पलीकडे जाऊन मेंदू या अवयवाचं सर्वंकषपणे आकलन करून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं मानलं पाहिजे, असं बऱ्याच संशोधकांचं मत आहे.

काही आधारभूत निष्कर्ष आणि गृहीतके

कोणत्याही ज्ञानशाखेत वादविवाद, मतमतांतरं आणि परस्परविरोधी मांडण्या असतात. मेंदूविषयीचं संशोधनक्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही. असं असूनदेखील गेल्या दोन-तीन शतकांपासून अनेक शास्त्रज्ञांनी इतर सस्तन प्राण्यांच्या आणि मृत माणसांच्या मेंदूवर दीर्घकाळ केलेल्या विच्छेदनांवरून, रुग्णांवर केलेल्या शस्त्रक्रिया आणि प्रयोगांवरून, निरीक्षणं आणि निष्कर्षावरून मांडलेली काही आधारभूत गृहीतकं ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे.

इतर सस्तन प्राणी आणि मनुष्यपाणी यांच्या मेंदूत अनेक बाबतीत साम्य आढळतं. मेंदूमधील जैव रासायनिक प्रक्रिया, मेंदूपेशींची रचना आणि कार्य, त्याचप्रमाणे मेंदूची मूलभूत जडणघडण यामध्ये कमालीचं साम्य असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगभरातले माणसांचे वेगवेगळे वांशिक समूह लक्षात घेतले तरी मानवी मेंदूमध्ये असणारे घटक आणि सर्वसाधारण रचना एकसारखीच असल्याचं आढळतं.

जनुकीय आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मानवी गर्भाच्या मेंदूचा आपापला विकास गर्भाशयातसुद्धा सर्वस्वी भिन्न असतो. ही बाब विशेषकरून नोंद घेण्याजागी आहे. अनेक बाबतीत सर्व माणसांच्या मेंदूमध्ये सार्वत्रिक सारखेपण असला तरी प्रत्येक मेंदूचं खास वैशिष्ट्यसुद्धा असतं हे विसरून चालणार नाही. गर्भधारणा झाल्याक्षणी माणसाच्या गर्भपेशींमधल्या XX किंवा YY अशा रंगसूत्रांच्या तेविसाव्या जोडीमुळे गर्भाचं लिंग ठरतं. लिंगानुरूप आनुवंशिकतेचा आराखडा भिन्नपणे उलगडायला तिथूनच सुरुवात होते.

स्त्रियांच्या व पुरुषांच्या मेंदूबाबतीत आजवरच्या शाखीय निष्कर्षांवरून आढळलेल्या काही गोष्टी मान्य करायला हरकत नसावी.

पुरूषांच्या मेंदूचे सरासरी वजन अदाज १४०० ग्रॅम असतं आणि स्त्रीच्या मेंदूचं सरासरी वजन त्यापेक्षा साधारपणे कमी असतं. तरीदेखील मेंदूचं वजन आणि शरीराचं वजन यांचं गुणोत्तर स्त्रियांमध्ये अधिक असतं. हायपोथॅलॅम्स हा मेंदूतला भाग आणि मेंदूच्या दोन अर्धगोलांना जोडणारा कॉर्पस कॅलोजम हा भाग यांची रचना आणि आकारमान याबाबतीत स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूत थोडा फरक असतो.

पुरुषांचा समजला जाणारा टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांचा समजला जाणारा इस्ट्रोजन हे दोन्ही संप्रेरक दोन्ही लिंगांच्या गर्भाच्या मेंदूमध्ये असतात. फक्त त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. खरं तर हे दोन्ही संप्रेरक मेंदूमध्ये तयार होत नसून मातेकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्यामधून ते गर्भात शिरतात. गर्भारपणाच्या ८ ते २४ आठवडे या काळात गर्भामध्ये अचानक कधीतरी भरपूर प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार होतं. त्या क्षणापासृन मेंदूमध्ये नरपणाची लक्षणं वाढायला सुरुवात होते.

त्यानंतरच्या काळात टेस्टोस्टेरॉन संप्रेरक आकर्षून घेणाऱ्या विशिष्ट पेशींच्या संख्येत फरक पडत गेल्यामुळे नर आणि मादी या मेंदूच्या संदर्भातला फरक वाढत जातो. टेस्टोस्टेरॉनच्या अधिक प्रमाणामुळे शरीर, मेंदू आणि वर्तणूक यांच्यावर जो विशिष्ट परिणाम होतो त्याला खास ‘नरपणा’ म्हणता येईल. खरं तर नर आणि मादी या एकाच नाण्याच्या दोन विरूद्ध बाजू मानण्याऐवजी हा फरक म्हणजे निरनिराळ्या अवस्थेत सलगपणे चालणारी एक क्रिया असते असं मानणं शास्त्रीयदृष्ट्या अधिक योग्य ठरतं. केवळ रंगसूत्र, संप्रेरक किंवा आणखी एखादा जीवशास्त्रीय घटक यांच्यावर हा फरक अवलंबून असतो असं म्हणण्याइतकं ते साधंसरळ नसतं.

गर्भामध्ये मेंदू विकसित होत असताना त्या विकासावर जनुकं आणि पर्यावरण या दोन्ही घटकांचा सारख्याच प्रमाणात प्रभाव असतो. त्याशिवाय आवर्जून लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे मेंदू आणि शरीर अशी विभागणी होऊच शकत नाही. खरं तर शरीराशिवाय मेंदूचा विचार करणं केवळ अशक्यच असतं. कारण मेंदूला भरपूर प्रमाणात शर्करेची आणि प्राणवायूची गरज असते. शरीराच्या रक्ताभिसरण संस्थेकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर मेंदू सर्वस्वी अवलंबून असतो.

थोडक्यात, शरीर आणि मेंदूचं एकमेकांवरचं अवलंबित्व, मेंदूचा विकासावर सारख्याच प्रमाणात असणारा जनुकीय आणि पर्यावरणीय प्रभाव, मेंदू या अवयवाच्या रचना आणि कार्यपद्धतीतलं वैशिष्ट्य या सर्वांच्या चौकटीत स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूमध्ये आढळणारा फरक लक्षात घेतला पाहिजे.

वेगळेपणाची आणखी काही निरीक्षणे

शिशुवयांत वर्तणूक आणि कृतीक्षमता याबाबतीत मुली वेगाने प्रगती करतात. बोलण्यामध्ये मुलांपेक्षा मुली सरस असतात. स्थळ-काळाच्या संदर्भात मुलगे अधिक वाकबगार असतात. कोणतंही काम करताना त्याचं व्यवस्थीकरण (सिस्टिमायझिंग) करण्याकडे मुलांचा अधिक कल असतो. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याच्या मार्गाचा नकाशा काढताना पुरुष नेमकेपणाने आणि अंतराच्या दृष्टीने अधिक काटेकोरपणे नकाशा काढतात याउलट स्त्रिया त्या मार्गावरच्या विशिष्ट खाणाखुणांना अधिक महत्त्व देतात. अशी आणि यासारखी आणखीही काही निरीक्षणं असू शकतील. ही सर्व निव्वळ निरीक्षणं नसून त्याचा मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंध असतो.

आपल्या मेंदूचे दोन अर्धगोल बरेचसे सारखे असल्याचं आढळत असलं तरी त्यांच्यात थोड्या प्रमाणात असमानता असतेच. पुरुषांच्या बाबतीत ही असमानता स्त्रियांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळलं आहे. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांच्या कार्यपद्धतीत काही बाबतीत एक सर्वसाधारण फरक दिसून येतो. एकाच वेळी अनेक कामं स्त्रिया करू शकतात. परंतु एकच काम अधिक एकाग्रतेने पार पाडण्याकडे पुरुषांचा कल दिसून येतो. मेंदूच्या दोन अर्धगोलांमध्ये सुसंवाद साधणारा ‘कॉर्पस कॅलोजम’ हा भाग स्त्रियांच्या मेंदूत तुलनेनं अधिक मोठा असतो. त्याचा हा परिणाम असतो असं मानलं जातं. स्त्रिया आणि पुरुष यांच्या भावनिकतेमध्ये आढळणारा फरकसुद्धा याच वास्तवतेची परिणती असल्याचा दावा केला जातो.

आपल्या पंचेद्रियांपैकी गंध (वास येणं) ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मनुष्यप्राण्यांपर्यंतच्या उत्क्रांतीमध्ये वारशाने मिळालेली सर्वात जुनी संवेदना आहे आणि थेट मेंदूला जोडलेली तीच एकमेव संवेदना आहे. इतर चार ज्ञानेद्रियांकडून येणाऱ्या संवेदना मात्र थॅलॅमसमार्गे मेंदूकडे पोचण्याचा लांबचा मार्ग पत्करतात. याच कारणामुळे माणसाला पाच संवेदनांपैकी गंध सर्वात लवकर जाणवतो. उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेतल्यास स्वत:ला धोक्यांपासून वाचवण्यासाठी सर्वात लवकर सावध होण्याचा सजीवांचा तोच एक शीघ्र मार्ग होता. आजसुद्धा स्त्रियांमध्ये गंधाच्या बाबतीत संवेदनक्षमता पुरुषांच्या तुलनेत हजारपटीने अधिक तीव्र असते.

शब्दांशिवाय इतर अनेक प्रकारांनी माणसं स्वत:ला व्यक्त करत असतात. उदाहरणार्थ, देहबोली, चेहऱ्यावर भावभावना, डोळ्यांत उमटणारे भाव वगैरे. चेहऱ्यावरचे भाव वाचण्याच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया आघाडीवर असतात. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नजरेतले भाव स्त्रिया पटकन ओळखतात. इतरांच्या भावना समजून घेण, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखणं ही कला स्त्रियांमध्ये अंगभूतपणे आढळत असल्यामुळे त्या अधिक चांगल्या प्रकारे इतरांशी संवाद साधू शकतात. स्वत:च्या भावना व्यक्त करण्यातसुद्धा स्त्रिया पुरुषांपेक्षा कुशल असतात. या सर्व कारणांमुळे स्त्रिया अधिक चांगल्या प्रकार सामाजिक संबंध ठेवू शकतात असं मानायला शास्त्रीय आधार आहे. एक प्रकारे मेंदूमुळे स्त्रियांना लाभलेलं हे वरदान म्हणता येईल.

आधी दिसून न येणारा स्त्री-पुरुषांच्या मेंदूतला एक महत्त्वाचा फरक प्रौढ वयात दिसून येतो. वाढत्या वयामुळे माणसातल्या बऱ्याचशा क्षमता घसरणीला लागतात. अवयवांची झीज वाढीला लागते. वयाच्या या टप्यात स्त्रिया थोड्या भाग्यवान ठरतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा मेंदू नैसर्गिकपणे थोडासा मोठा असला तरी वयानुसार मेंदू हळूहळू निकामी होण्याची प्रक्रिया पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात असते. पुरुषांच्या मेदूच्या पुढचा आणि कानशिलांवरचा भागात प्रामुख्याने ही झीज आढळते. त्यामुळे संस्करण आणि विचार करण्याची प्रक्रिया यांच्यावर विशेष परिणाम होत असल्याचं दिसून येतं. चांगली गोष्ट अशी की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा संप्रेरक भरपूर प्रमाणात असल्यामुळे उतारवयात पुरुषांची दृष्टी आणि शाब्दिक स्मृती समवयीन स्त्रियांच्या तुलनेत अधिक चांगली असते. स्त्रियांच्या बाबतीत उतारवयात झीज होण्याचं प्रमाण मेंदूतल्या हिप्पोकॅम्पस आणि पेरिएटल भागांमध्ये  विशेषत्वाने आढळतं. त्यामुळे विसराळूपणा वाढतो, नेहमीच्या वस्तू नेमक्या कोणत्या जागी ठेवल्या आहेत ते आठवणं कठीण जातं.

ही उठाठेव कशासाठी ?

अतिप्रगत होण्याच्या या काळात एकीकडे जगण्यामरण्याच्या संघर्षात पिचत कशीबशी तग धरून राहिलेली बहुसंख्य माणसं आहेत, तर दुसरीकडे सर्व सोयीसुविधांचा लाभ घेत अधिकाधिक प्रगत होण्याच्या स्पर्धेत मग्न असणारी काही मूठभर भाग्यवान मंडळी आहेत. एकीकडे विज्ञानाच्या प्रगतीचा आणि तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिकीकरणाचा सर्वाधिक फायदा मानवजातीला मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे त्या सर्वांचा दुरुपयोग केला जात असण्याची वास्तवता आहे. एकीकडे इंटरनेट आणि प्रसारमाध्यमांनी घरोघरी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या धबधब्यात स्वत:विषयी विचार करणं बहुसंख्य माणसं विसरत चालली आहेत, तर दुसरीकडे आजच्या वांशिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, राजकीय-सामाजिक वातावरणात कोणत्याही ‘इझम’ला कुणीही पटकन बळी पडत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर या विश्वाच्या पसाऱ्यात आपण माणसं कुठून आलो आहोत, या पृथ्वीवर आपल्या जगण्याचं खरं उद्दिष्ट काय आहे आणि जीवसृष्टीतल्या इतर घटकांशी आपलं नातं काय आहे याचा विचार करण्याची गरज वाटेनाशी होत चालली आहे.

अशी थोडीशी गरज जरी वाटली तर या विश्वाचं, त्यातल्या पृथ्वी नामक ग्रहावरच्या जीवसृष्टीचं आणि जीवसष्टीतल्या माणसांचं अस्तित्व याचा शोध घेताना आपण चकित होऊन जातो. अवघं माणूसपण ज्या अवयवामळे माणसाला लाभलंय त्या मेंदूचा करिष्मा पाहून आपण थक्क होऊन जातो. त्याविषयी जितकं जाणून घ्यावं तितकं मेंदूविषयी, तो निर्माण करणाऱ्या किमयागार निसर्गाविषयी आणि ते अवयव ज्याच्या कवटीत आजन्म असतात त्या मानवप्राण्याविषयी पराकोटीचा आदर वाटून नतमस्तक व्हावंसं वाटतं. आणि म्हणूनच मनुष्यप्राण्यातला एक घटक म्हणन, विज्ञानाची विद्यार्थीनी आणि अभ्यासक म्हणून आणि सरतेशेवटी एक स्त्री म्हणून माझ्या मेंदूला लाभलेलं वैशिष्ट्य मला निश्चितच अभिमानास्पद वाटतं.

संदर्भ :
1. Sex on the Brain. Hannah Haug, p. 28–31, New Scienti
2. The 21st Century Brain’, Seven Rose, 2006.
3. The Human Mind’, Robert Winston, 2003.
4. The Brain’, Gomathi Gopinath, 2003.
5. ‘My Stroke of Insight’, Jill Bolte Taylor, 2006.

– चित्रा बेडेकर ( मिळून साऱ्याजणी, मार्च २००९ )