40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

स्मार्ट गृहिणीमित्र अथवा हजार पलायनक्रिया

१९१० मध्ये लक्ष्मीबाई धुरंधर यांनी ‘मायबोली’मध्ये गृहिणीमित्र अथवा हजार पलायन क्रिया’ नावाचा ग्रंथ लिहन आपल्या मायभगिनी गृहिणींची फार मोठी सोय केली होती. हे सुजाण वाचकांस विदीत असेलच. त्या धुरंधर बाईंपुढे विमेन्स कंपॅनियन’ या इंग्रजी ग्रंथाचा नमुना होता, असे म्हणतात. बाकी भाषा कोणतीही असली तरी गृहिणींनी जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात घालून घरच्यांना तिन्ही त्रिकाल अखंड हादडायला घालावं, हाच त्या काळाचा दंडक असावा. आणि गृहिणींना हाताशी मित्र, कंपॅनियन लागत असावेत, एवढंच यावरून दिसतं.

काळ बदलला. चष्मे, फोन, बनियनपासून ते थेट शहरांपर्यंत सगळ्या सजीव-निर्जीव गोष्टींवरही ‘स्मार्ट बनण्याची सक्ती आली. यातून गृहिणी तरी का सुटाव्यात? म्हणून मग २०१० मध्ये कडक लक्ष्मीबाई बिलंदर यांनी ‘स्मार्ट गृहिणी मित्र अथवा हजार पलायन क्रिया’ नावाचा एक ग्रंथ सिद्ध केला आहे, असं आमच्या कानी आलं. कानीच आलं, हाती पडलं नाही, कारण स्मार्ट गृहिणींसाठी लिहिणारी लेखिका स्वत: सुपर स्मार्ट होती. आमच्यासारखा पानांमागून पानं खरडून कागदाचा नाश करण्याचा ध्यास तिने घेतला नाही. डायरेक्ट नेटवरच ग्रंथ टाकला. तो सलग वाचण्याचा नेट आमच्यात कुठला? आम्ही जमेल तसा खाली-वर करत तो नेटवर चाळतोय. एवढ्यात एकदा चुकून फॉरवर्ड ऐवजी ‘डिलीट’ बटण दाबले गेले आणि धड पाखडणं-निवडणं होण्याच्या आत बापडा गाळलाच गेला. आमच्या एका क्रियेत हजार पलायनी क्रियांचं झटक्यात पलायन झालं. अशा प्रकारे कोणताही मजकूर केव्हाही हातोहात डिलीट करण्याचं आमचं कसब हे खरं ता आम्हाला डी.लिट.ची पदवी मिळण्याइतपत मौलिक आहे. मात्र, आम्ही पडलो कायम गृहीत धरलेल्या गृहिणी. आमच्या वाट्यास वाटण-घाटणच येणार, कौतुक कुठले यायला? पण यंत्रानं पुसलं ते मेंदूने थोडं-थोडं जपलं. तेच आपलं मानून भावी स्मार्ट गृहिणींना यथाशक्ती मदत करावी म्हणतो. वास्तव जीवनात आम्हाला अजिबात अवगत नाही, ते दणकावून अधिकारवाणीने दुसऱ्यांना सांगणे आम्हास उत्तम जमते. गेली ३५ वर्षे पुण्यात राहतो आहोत.

आता या कडक लक्ष्मीबाई बिलंदरांनी पुस्तकाचे शीर्षक माफक जुन्या मराठी वळणाचे घेतले असले तरी मजकुरात मराठीचा वापर माफकच आहे. चिवड्यातल्या काजूंइतकाही नसावा. शिवाय तांत्रिक संज्ञांचा मारा खूप म्हणजे चिवड्यातल्या पोह्यांइतका. स्वयंपाकाचा ओटा म्हणजे ‘वर्क स्टेशन.’ कोठीची खोली म्हणजे ‘डेपो.’ पाककृती बनवण्याचे टप्पे म्हणजे ‘फ्लो प्रोसेस चार्ट.’ त्यात बायांचा जाणारा वेळ आणि कष्ट म्हणजे ‘टाईम मोशन स्टडी.’ आणि परंपरागत वत्सला वहिन्यांचे सल्ले म्हणजे ‘एस. जी. एफ.’ आपले अश्राप भजी-वडे ही ‘प्रॉडक्ट्स’ तर ती बनवायला लागणारे झारे-चमचे ही ‘टूल्स’, ‘एस. जी. एफ.’ म्हणजे ‘स्मार्ट गृहिणी फंडाज’ हे सांगता – सांगता राहिले.

आम्ही जात्याच हुशार असल्याने आमच्या हे इतपत स्मरणात आहे; पण ज्या बाया-बापड्यांना फार तर गोरक्षण फंड किंवा हिंगण्याचा भाऊबीज फंड माहीत असेल, त्यांना डेपोतला माल वर्क स्टेशनवर आणून, पॉवर टूल्स वापरून टाईम मोशन स्टडीनुसार आय.एस. आय. प्रॉडक्ट बनवण्याचा ‘फ्लो प्रोसेस चार्ट’ काढण्याच्या स्मार्ट गृहिणी फंडा झेपणं, हे खायचं काम नसणार. अंगारकी चतुर्थीला साबुदाण्याच्याबरोबर पोटॅटो वेजेस का खाणार आहेत बिचाऱ्या? तरीही त्यांना नसला तरी, पुढच्यांना तरी उपयोग व्हावा म्हणून थोडे एस.जी.एफ.सांगून टाकतो.

एक महत्त्वाचा एस.जी.एफ. असा होता की, घरच्या बाईने घरात, त्यातही स्वयंपाकघरात, मुळात फार वेळ थांबूच नये. शेवटी वर्क स्टेशन आहे ना, स्टेशनवर कोणी फार वेळ थांबत असतं का? बाई घरी बसली की, घरादाराचं काम तिच्या डोक्यावर बसतं. शेवटी घोडा का अडला? भाकरी का करपली? या प्रश्नांचं जे उत्तर तेच ‘बाई घरकामात का अडकली?’ या प्रश्नालाही लागू असतं. न फिरवल्यामुळे! पूर्ण वेळ नोकरी-उद्योग करणाऱ्या बायकांना हा प्रश्न पडत नाही; पण समजा तशी सोय नसेल तर तासातासाला वेगवेगळी निमित्तं काढून घराबाहेर पळावं. ही सर्वात महत्त्वाची पलायन क्रिया. सारखं, लगबगीत कुठून तरी येतोय, घाईघाईने कुठेतरी जातोय, असं दिसलं पाहिजे. क्वचित कधी याने घरच्यांचं डोकं फिरेल; पण बाईची ग्रहदशा फिरणार नाही.

आता सारखं भटकायला निमित्त कुठली शोधायची? इथे पुढचा एस.जी.एफ. येतो. तसं नाना प्रकारचे सेल, खरेद्या या कामी उपयोगी पडतातच. अगोदर स्वस्तात स्वस्त माल पटकवायला जाणं, नंतर तो परत करून बदली माल आणणं, या चक्रात खूपदा बाहेर पडायला मिळतं. काही-काही हौशी महिला तर बदलून आणायची संधी मिळावी म्हणून अगोदर खरेदीला जातात. आणि अशा तीन-चार बदल्या झाल्यावर शेवटी मुळात खरेदी केलेली साडीच विजयी मुद्रेने घरी आणतात; पण हे करायचं नसेल तर सत्राशे साठ क्लब-भिशी मंडळं-ग्रुप्स-हँग आउट्स वगैरेंशी जोडून घ्यावं, असं हा एस. जी. एफ. सांगतो.

 

इथे कल्पकता महत्त्वाची… 

समजा, अधूनमधून टेकडीवर फिरायला जाण्याचा एखादीचा प्रघात असेल तर तिचा एक टेकडी भिशी ग्रुप असेलच; पण जरा कल्पकता वापरली तर टेकडीला किंचित टेकून तिला सताड नवे गट सहज बनवता येतील. जसे टेकडी पायथा ग्रुप (वरपर्यंत चढू न शकणाऱ्यांचा), टेकडी माथा ग्रुप, टेकडी बचाव ग्रुप, टेकडी हटाव ग्रुप (टेकडी रस्त्याच्या फारच मध्ये-मध्ये येऊन ट्रॅफिकला अडथळा आणते, असं वाटणाऱ्यांचा), टेकडी लढाव ग्रुप (रस्ता टेकडीच्या फारच मध्ये-मध्ये येतोय, असं मानणाऱ्यांचा), टेकडी हिरवाई ग्रुप, टेकडी पक्षीनिरीक्षण ग्रुप, टेकडी तरुणी निरीक्षण ग्रुप, १० वर्षांहून जास्त काळ टेकडी चढूनही टिकलेल्यांचा ग्रुप, न टिकलेल्या किंवा टेकडी चढाईत पडून अपंग झालेल्यांसाठी टेकडी सपोर्ट ग्रुप, अंधारात टेकडीवर गुंडांकडून लुटल्या गेलेल्यांचा लूट ग्रुप, अशी ग्रुपची लयलूट सहज करता येईल.आता या उद्योगांमुळे जे बरेचदा टुगेदर असतातच, त्यांची वेगवेगळी गेट-टुगेदर्स करणं अपरिहार्य असतं. अशा ‘घरच्या कार्यासाठी फोन मेसेजेस-व्हॉट्सअ‍ॅप यांची चक्रं फिरायला कितीसा उशीर लागणार?’

इथेच बिलंदरबाईंचा कितवा तरी एस.जी.एफ. येतो. बाईला दोन हात असले तरी त्यातला एक हात नेहमी फोन धरण्यासाठीच वापरावा. सतत फोनवर कुजबुजत-खिदळत राहावं. पूर्वीच्या अडाणी बायांच्या हातांना बोटाऐवजी झारे चमचे-उलथणी फुटल्यासारखी वाटायची. ही अनिष्ट प्रथा पहिल्यांदा उलथून टाकावी. एका हाताचा उपयोग फोन धरण्यासाठी आणि दुसऱ्याचा खाणाखुणा करण्यासाठी करावा. एकीकडे फोनवर बोलताना दुसरीकडे, दुसऱ्या हाताने, ‘दोन मिनिटं, ‘पाच मिनिटं’ अशा खुणा कराव्यात. मुलाला घाई लागलीये किंवा दूध ऊतू जायच्या घाईला आलंय, अशी हातघाईची काम काही दोन, पाच मिनिटं थांबणार नसतात. केवळ न बघवण्याने घरातल्या कोणाला तरी ती उरकावी लागतातच. जुन्या काळात दिव्याने दिवा लागायचा, तसा आधुनिक काळात फोनने फोन लागतो, म्हणजे समजा ‘अळवाचे फदफदे कसे करावे?’ हा एक फोन एका माफक तज्ज्ञ मैत्रिणीला करायला गेला तर ती खुलून-खुलून त्याची मैलभर रेसिपी सांगायला जाणारच. तो फेरफटका संपेपर्यंत मुळात अळूची भाजी धुतल्यावर चिरायची की चिरल्यावर धुवायची, या सुरुवातीतच गाडी अडकणार. ही मौलिक शंका दुसऱ्या सखीला विचारली की ती लगेच प्रश्न उभा करणार की, बै तुला ब्राह्मणी भाजी करायचीये की सारस्वती? म्हणजे एका ना एका विजातीय मैत्रिणीला विचारणं आलंच. ती लगेचच एक साईट सुचवणार; पण ती साईट मेली तुमच्याने उघडता उघडणार नाही. की मग एखाद्या नेटसॅव्ही मैत्रिणीला विचारणं आलंच. ती इतकी (म्हणजे नको इतकी) सॅव्ही निघणार की ती तत्काळ तुमची अळू जिज्ञासा व्हॉट्सअ‍ॅपवरच टाकणार, की ताबडतोब संपूर्ण व्हॉट्सअ‍ॅप अळूमय होणार. अळूचे फोटो, देशोदेशीच्या अळूच्या कृती, अळूचं आहारशास्त्रीय विश्लेषण, इतकंच काय

अळू लागले छळू

मुले लागली पळू

संतापाने आय वॉज लाईक

याला खाऊ का गिळू..?

या शीघ्र काव्यापर्यंत काहीही व्हॉट्सअ‍ॅपवर गळू लागणार. ते नुसतं ओझरतं वाचता-वाचताही स्वयंपाकाची वेळ टळू लागणार. आणि केवळ वेळेअभावी ‘आता कुठून तरी अळूची भाजी हॉटेलातून मागवावी लागणार,’ असा कठोर निर्णय घ्यावा लागणार. ‘कुठल्या हॉटेलातून मागवावी?’ असा एकच गहिरा प्रश्न फेसबुक वर टाकून बघायचाच अवकाश. गावातल्या यच्चयावत हॉटेलांचे फोन नंबर, माहितीपत्रक, मेन्यू कार्ड, कुठे कोणती सेलिब्रिटी जेवायला येते, त्याची जंत्री अशी चौफेर माहिती अंगावर आदळणार. खास जाणकार मैत्रिणी फोनबिन करून ‘खादाडीज डॉट कॉम’, ‘गो अळू’, www.ज्ञानेश.अळूमाळू.co.in वगैरे साईटची माहिती पुरवणार. आता एवढ्या माहितीच्या भाऱ्यातून अचूक निवड करून आपल्याला हवी ती भाजी घरापर्यंत आणवून घेण्यात जीव साहजिकच मेटाकुटीला येणे. तरीही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे घरी आयत्या आलेल्या अळूच्या भाजीचे तीन-चार कोनातून फोटो काढून फेसबुकवर टाकून त्यांना २k likes मिळावेत म्हणजेच एकदाची ‘अळूमिळी गुपचिळी’ घेणार!

अशा या हॉटेलातून जिन्नस मागवण्याच्या तत्त्वामध्येच अजून एक एस.जी.एफ. उर्फ स्मार्ट गृहिणी फंडा आढळला. तो म्हणजे ‘मागवा आणि भागवा.’ पूर्वीच्या बायांनी मारे कोंड्याचा मांडा केला, रांधा-वाढा-उष्टी काढा केलं, सगळी अक्कल चुलीत घातली, काय मिळालं? बहुतेक वेळा खाणाऱ्यांनी वातडही म्हटलं नाही. असल्या वांड खाणाऱ्यांना वात आणण्याचा मार्ग एकच. घरात धान्यधुन्याचे डबेबिबे भरून ठेवण्याऐवजी गावातल्या एकूण एक हॉटेलांची मेन्यूकार्ड्स गोळा करून ठेवावीत. माणसांनी एकेका पदार्थाचं नाव काढलं की, आपण एकेका हॉटेलाचं नाव काढावं. अमकीकडला डोसा म्हणजे प्रश्नच नाही, तमक्याचं चायनीज म्हणजे प्रश्नच नाही. असं वरचेवर झालं की हळूहळू कमावणाऱ्यांना खिशाचा आणि खाणाऱ्यांना पोटाचा प्रश्न जाणवू लागतो. मागवणं, वाट बघणं, ‘या ग्रेव्हीखाली दडलंय काय?’ हा गहन प्रश्न दर वेळेला नव्याने सोडवणं फार काळ झेपत नाही. नकळतपणे दिल्ली दरबारचा शाही पुलाव किंवा इराण्याची दिवाणी बिर्याणी मागे हटून घरचा फोडणीचा भातही शाही वाटायला लागू शकतो. यासाठी थोडी वर्षं आणि बराच पैसा घालवावा लागतो; पण खऱ्या ‘स्मार्टपणा’साठी तेवढी किंमत तरी मोजायलाच हवी ना?

बाकी गृहिणीपणाची मजबूत किंमत मोजायची वेळ असे ती पाहुणे येण्याची. वेळी-अवेळी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार हा अनेक गृहिण्यांवर अत्याचार ठरे. त्यांच्यासाठी आपलं वेळात्रक धाब्यावर बसवा, त्यांना डोक्यावर बसवा, गैरसोय सोसा, त्यांना खुश करण्यासाठी जिवाचा आटापिटा करा, अमाप कष्ट करा – खर्च करा आणि एवढं सगळं करून ‘चांगली गृहिणी’ असण्याचं एखादं ओझरतं प्रशस्तिपत्रक, तेही बहुधा डाव्या हाताने मिळवा. अशा प्रकारची पाहुणचारी कल्पना वेडाचारापर्यंत जायची तिला बिलंदर बाईंनी व्यवस्थित जागेवर आणल्याचं स्मरतं. ‘अतिथी देवो भव तर भवः’ पण आपण आपल्या मर्यादित त्याला सामोर जावं. वाटल्यास त्याच्यासमोर एक-दोन नव्या मर्यादा वाढवून घ्याव्यात. जसे डायटचे स्तोम.

एक एस.जी.एफ. तर स्पष्ट म्हणत होता, ‘डाएटचे तुणतुणे वाजवा । पाहुण्याला लाजवा।’ वर उल्लेखलेली अगणित मेन्यूकार्ड्स, त्यातली एकसे एक पदार्थांच्या नावांची जंत्री पाहण्यांसमोर तर टाकावीतच; पण बाजूबाजूने एक वाक्यही हलकेच टाकावं. “तुम्हांला हवं ते मागवूया; पण मला खाण्यात फारसं धरू नका. कालपासून मी डाएटवर आहे.” ताबडतोब पाहुण्यांचा चेहरा पडेल. हे तुमच्या पथ्यावर पडेल. पाहुण्याला जनाची-मनाची-शिवाय मेन्यूकार्डचीही लाज वाटेल. पत्त्यांप्रमाणेच बराच वेळ हातातली मेन्यूकार्ड पिसून शेवटी त्याला कसंबसं म्हणावं लागेल की, बुवा ‘मलाही एवढं काही नकोच आहे. घोटभर चहा खूप होईल.’

डाएटबद्दल आजवर अचाट आणि अफाट लिहिलं गेलंय; पण डाएट सुरू करायला सर्वात चांगली वेळ कोणती, हे फक्त आपल्या बिलंदरबाईंनीच सांगितलंय. पाहुणा जेवायला येणार असेल त्याचा आदला दिवस हा डाएटची सुरुवात करायला नेहमी आदर्श दिवस असतो. जेमतेम एकच दिवस झालेला असल्याने डाएट करणाऱ्याला ‘देहाचा संकोच’

दाखवावा लागत नाही आणि पाहुणा संकोचल्याशिवाय राहत नाही. एकीकडे शाब्दिक औदार्य, काल्पनिक दानत हवी तेवढी दाखवली जाते. दुसरीकडे पाहुणेपणामधली हवाच जाते. ‘पाहुणं यावं आणि दैवानं खावं’ याऐवजी ‘पाहुणं जावं आणि उपाशी राहावं,’ असं कोणालाही मनोमन वाटत नसतं. साहजिकच पाहुणा पुन्हा तुमच्या घरी येण्याचा विचार करत नाही..

पाहुण्यांना पळवण्याचा आणखी एक मार्ग ‘स्मार्ट गृहिणी मित्र’कार सांगतात, तो म्हणजे पाहण्यांसमोर आपापल्या पोरांची अफाट कौतुक लावून धरणे. एरवी खासगीत गरजेनुसार त्यांना कितीही धमकावलं, फटकारलं, बडवलं तरी पाहुण्यासमोर ‘ब्र’ म्हणू नये. पाहुण्यांसमोर आपली कार्टी काय दिवे लावतील जाणे, या काळजीने जुन्या काळातल्या ‘गृहिण्या’ काळजाला घोर लावून घ्यायच्या. स्मार्ट गृहिणींनी त्याच काळजावर दगड ठेवून लोकांसमोरचं मुलांचं उधळणं बघावं, त्यावर कौतुकाची उधळण करावी. पोरानं पाहुण्याचा मोबाईल ढापून त्याच्या वॉलपेपरसकट सगळ्या गोष्टींची उलथापालथ केली तरी हा “पहिल्यापासून फारच बाई टेक्नोसॅव्ही” म्हणून वाखाणावं. पोरानं पाहुण्यांच्या हँडबॅगची निष्कारण उचकापाचक करून पाहुण्याला उचकवलं तरी “यांच्याइतकं चौकस मूल पाहिलं नसेल ना?” असं मोठ्या तोंडाने विचारावं. पोरानं पाहुण्याच्या अंगावर पाणी, चहा असं काही सांडलं तरी “मिनिटभर स्वस्थ बसत नाही हो हा,” अशी कृतक तक्रार करावी. यानंतर पाहुणा नुसता स्वस्थच काय, बसणारच नाही, यामुळे ‘आईन चांगलं वळण लावलंय,’ हे सर्टिफिकेट त्या माउलीला मिळणार नाही कदाचित; पण नको असलेल्या पाहुण्यापासून अवेळी येऊन नाक खुपसणाऱ्या पाहुण्यापासून तिची नक्की सुटका होईल आणि पुरेशी बिचारी असेल तर फुटकळ सर्टिफिकिटांची मोहताज ती नसेलच.

‘स्मार्ट गृहिणी मित्र’ मधला हाच मुद्दा आम्हांस विशेष महत्त्वाचा वाटलेला आहे. आदर्श मुलगी, आदर्श बायको, आदर्श आई वगैरेंबाबत कोणत्या तरी काळातल्या कोणत्याही कल्पना ग्राह्य मानून बनवलेली ही सर्टिफिकेट्स बाया किती काळ भिंतींवर मिरवणार आहेत आणि त्यामुळे आपल्या प्रगतीत आपल्याच हातांनी किती भिंती उभारणार आहेत? आदर्शत्वाच्या स्वत:च्या काही कल्पना बाळगणार की नाही? आणि राबवणार तर…

प्रस्तुत ग्रंथात आणखीही बराच मौलिक ऐवज होता. मूळ हजार पलायन क्रियांमधल्या दहाही आम्ही धडपणे सांगू शकलेलो नाही याची आम्हांस जाणीव आहे. उदा. एक एस. जी. एफ. होता की ‘डीलला ढील द्या’. एक लग्न केलं की बाईला ‘पॅकेज डील’ने नाना प्रकारचे नातेवाईक आयते मिळतात. हे सगळेच मनाचं नातं जोडू शकतात असं नाही. अशा वेळी एक सामाईक आडनाव लावण्याबद्दल या पॅकेज डीलचा बोजा किती वाहायचा, हे जिनं-तिनं ठरवावं. ‘डीलला ढील’ देऊन त्यातून जरूर तिथे सुटावं. असाच आणखी एक एस.जी.एफ. होता, ‘त्यागाचा त्याग करा’. कारण उघड आहे. देवत्वाच्या हव्यासापोटी बाई एकतर्फी त्याग करत राहिली तर तिचं जीवनही एकांगी, एकारलेलंच होणार म्हणून त्यागाचा त्याग वगैरे. असे खूप महत्त्वाचे ‘फंडे’ स्मरणात ओझरते राहिले किंवा चक्क विसरलेच गेले, याची खंत वाटते; पण तपशीलापेक्षा तत्त्वास महत्त्व द्यावे, या धोरणानुसार आम्ही ती खंतही डिलीट करतो आहोत. आमची डिलीटबाजी वाचकांस विदीत आहेच.

तर मुळात ‘स्मार्ट गृहिणी मित्र’चं तत्त्व कोणतं? की बायका केवळ शारीरिक कामाने थकतात, हा सांस्कृतिक भ्रम आहे. म्हणजे शरीर कष्टांमुळे कोणीही थकतंच; पण विसावा घेतल्यावर परत टुकटुकीतही होऊ शकतं. बायका अकाली थकल्या, गळाठल्या, त्यामागे आणखी काहीतरी असणार. ती असते ‘आन्सरेबिलिटी,’ तो असतो ताण. घर सर्वांना हवं, कुटुंब-नात्यांचे पदर सर्वांना हवेत, त्यातली भावनिक बळकटी सर्वांना हवी मग सगळ्याचा ताण एकट्या बाईने का म्हणून घ्यायचा? आणि तिने सर्वकाळ सर्वाला जबाबदार राहिलंच पाहिजे, प्रत्येक कान त्या ‘अदृश्य’ सर्टिफिकेटला साजेसं केलंच पाहिजे. हा सांस्कृतिक दबाव का सोसायचा ?

* पंख्यावर जाळी धरलीये, तू वर बघतेस की नाही?

* तुळशीचं रोप मेलं अंगणातलं, तुला पाणी घालायला काय जातं?

* फाटकाची कडी करकरतेय, तुला ऐकू येत नाही का?

* मागच्या महिन्यात कार्टीला घेतलेल्या चप्पल आताच होईनाशा झाल्या आहेत. एवढा वाढूच कसा देतेस तू तिचा पाय?

असं करता-करता म्युनिसिपालटीचं पाणी लवकर जाणं, कुत्र्याने  चिखलाचे पाय गालिच्यावर उठवणं, भाज्यांचा संप, मुलांचे कमी मार्क, कावळ्याने टी.व्ही.च्या डिश अँटेनावर . नवा कपडा पहिल्या धड्यात विटणं, इथवर कशाच्याही, कोणत्याही अडचणीला बाईलाच वेठीला धरलं जातं. एकदा आमच्या एका स्नेह्यांना द्रुतगती मार्गावर खूप वेळ खोळंबावं लागलं, तर त्यांनी सवयीने बायकोला ऐकवलंच, “ट्रॅफिक जामचं निवेदन देतात. ते तू ऐकलं नाहीस. शिवाय पळत-पळत जाऊन नजर टाकून यावं तर..!” यावर तिने त्यांच्यावर अशी जळजळीत नजर टाकली की, ते वाक्य पुरंही करू शकले नाहीत. वाक्यातही जाम झाले..!

जुन्या काळात बायका फक्त घराशी, घरकामाशी जखडलेल्या होत्या, तेव्हा त्यांना निदान तेवढ्यापुरतेच जाब विचारले जायचे. उरलंसरलं पुरंल एवढंच त्यांना पुरवलं. काळाच्या ओघात बायकांचं शिक्षण, कार्यक्षेत्र, अनुभव यांच्या कक्षा विस्तारत गेल्या, तेव्हा त्यांच्या पाठीवरची उत्तरदायित्वाची गाठोडीही वाढत गेली. वास्तविक जिला घराबाहेरही वेगवेगळ्या रूपांमध्ये तलवारबाजी करावी लागते, तिला घरगुती जबाबदाऱ्यांमधून काही प्रमाणात तरी सूट, सवलत मिळायला हवी; पण तिथेही घोटाळा झाला. तिच्या बरोबरीने पुरुषांचं, कुटुंबांचं, गृहव्यवस्थेचं शिक्षण-प्रबोधन वगैरे काही झालं नाही.

म्हणूनच ‘स्मार्ट गृहिणी मित्र’ ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे हातोहात बायका बेजबाबदार होतील, बिघडतील, अशी ओरड तेवढी लगोलग होईल. बाकी काहीही बिघडलं तरी चालेल, बायका बिघडू नयेत याची समाजाला नेहमीच अत्यंत काळजी असते. आणि बायका बिघडायला टपलेल्याच असतात, असंही वाटतं. आम्हांस तसे वाटत नाही.

स्मार्ट गृहिणी मित्र बायकांना कामाधामापासून, कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून पळवत नाहीये. मात्र, सगळं ओझं एकटीच्या शिरावर येण्यापासून, गृहीत धरण्यापासून, आमरण उत्तरदायित्वापासून जरूर पळवत आहे.

आता एवढ्या पळवापळवीत एखादीचा पदर किंवा ओढणी वाऱ्यावर अंमळ जास्तच उडली किंवा क्षणभर जागची ढळली तरी तिची उठाठेव करण्याच्या घाईला लगेच कोणीही येऊ नये. पिढ्यानपिढ्या एवढं ऊरीपोटी सांभाळणाऱ्या बायका एवढंही सांभाळू शकणार नाहीत का? शिवाय ‘ढळला पदर, डोन्ट बॉदर’ असाही एक काहीतरी एस.जी.एफ. आहेच की पुस्तकात… नक्की काय बरं आहे तो… बहुतेक… कदाचित…असं कसं आठवत नाही? तो फंडा अचूक देण्यासाठी तरी ज्यांना-ज्यांना बायकांच्या संपूर्ण (घर) कामजीवनाची निरामयता हवीशी वाटते, त्यांनी कृपया ‘स्मार्ट गृहिणी मित्र’ अर्थात ‘हजार पलायन क्रिया’ अवश्य डाऊनलोड करावे. नाही तर कामाच्या लोडाखाली डाऊन होणं आहेच सनातन आणि चिरंतन!

 

–  मंगला गोडबोले

(मिळून साऱ्याजणी, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोडअंक २०१७)