40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

हजार प्रश्नांच्या मुंग्या

प्रसंग एक : आज सकाळी शारदानगरला गेलेलो काही कामाने. परत निघताना दुपार झालेली. साधारण साडेबारा झाले असतील. ऊन भरात आलेलं. गोविंदबागेजवळ नारळपाणी पिऊन पुढे निघालो. सहसा मी दुचाकीवर एकटा असलो की रस्त्याने जाणाऱ्या लोकांना विचारत जातो, कोणी माझ्याच रस्त्यावर असेल तर सोडतो. तेवढ्याच गप्पाही होतात आणि बरीच माहिती मिळते. आजही गोविंदबागेच्या पुढे निघाल्यावर एक माणूस चालताना दिसला. उन्हाने रापलेला चेहरा, केस मानेपर्यंत वाढलेले, खांद्यावर एक बाचकं अडकवलेलं. अंगावर सिक्युरिटी पट्टी लावलेला मळखोर शर्ट आणि जराशी कळकट विजार. पायात जाडसर जुनाट बूट.

मी विचारलं, कुठं जाणार?
जरासा बिचकून म्हणाला, “निऱ्याला चाल्लू”.
नीरा हे बारामतीपासून चाळीस किलोमीटरवर असलेलं गाव आहे. आम्ही जिथे होतो तिथून साधारण ३५ किमी असेल.
मी म्हणालो, “चला. करंजे पुलावर सोडतो.”
तो गुमान बसला.
मी विचारलं, “हिकडं कुठं?”
“चिच पाडाय आल्तो. बारामतीच्या पुढं.”
“मंग चालत का निघालाय?”
“पैसंच न्हाईत. मालकानं पाच दिवस काम काढलं. मंग म्हनला तुजा हिसाब दुसऱ्या मालकाकडं हाय. जा बारामतीला त्याच्याकडून पैसं घी. मंग मी बारामतीत सारी सकाळ फिरलू पर मालक घावलाच न्हाई. मंग काय करता?”
“कुठं राहता तुम्ही?”
“निऱ्यात. गेले दोन साल तिथंच हाय. नदीत मासं धरतो.”
“कोणतं मासं घावत्यात?”
“चीलापी आन खेकडं. व्यापाऱ्याला इकायचं.”
“पर नीरेत तर कोळी समाज पण आहे, ते धरू देतात का मासे तुम्हाला?”
“हा. लै पिरमल लोक हायेत. कोनी काईच म्हणत न्हाई. एकाद दुसरा म्हनतो कधीमधी पर ताप न्हाई देत.”
“हे चिच पाडायचं कसं हो घेता?”
“आपन मालकाला दोन अडीच हजार द्यायचे. झाड बघून. झाड चांगलं घावलं तर सहा सात पोती चिच निघती.”
“इकायची कशी?”

“सुप्याच्या बाजारात ८-९ रुपये किलूला आनी भिगवनला २५ रुपये किलूला घावत्यात. एका पोत्यात ६० किलूच्या आसपास बसती चिच.”
मी अस्वस्थ. माझ्या भोवताली सतत निवडणुकांचं वादळ भिरभिरतंय, जणू युद्ध असल्यासारखे पडघम वाजताहेत. सकाळ संध्याकाळ सगळ्या प्रसारमाध्यमांना फक्त निवडणूक ज्वर चढलाय. रोज एक नेता एका पक्षातून दुसरीकडे उडी मारतोय. जगातले सगळे विषय जणू नष्ट झालेत आहेत. आणि हा साधारण ३५ एक वर्षांचा तरुण मार्च २०१९ मध्ये, भर दुपारी चाळीस किमी अंतर चालून घराकडे जातोय. त्याला फसवलं गेलंय पण त्या माणसाबद्दल एकही अवाक्षर ह्या बुवाने काढलेले नाही. हे काय रसायन असेल?

“नाव काय तुमचं?”
“दीपक. आमी कातकरी हाय. गाव नसरापूरजवळ मालेगाव. काम घावंल तसं फिरायचं.”
“घरी कोण असतं?”
“चार पोरी हायेत मला, आनी बायकू.”
“पोरी शिकत्यात का?” प्रश्न विचारल्याक्षणीच मला माझं मध्यमवर्गीय कार्यकर्ता असणं खणकन जाणवलेलं.
“एक जाती. मोठीचं लग्न करून दिलं आणि बाकीच्या दोन बारक्या हायत.”
सहसा शिकलेल्या माणसाने असा प्रश्न विचारला की उत्तर काय द्यायचं हे बरेचदा माहिती असतं पालकांना.
“लग्न झालं ती शिकली का शाळा?”
“न्हाई.”
“किती वय होतं?”

“अकरा वरीस. आता नाशिकला ईट भट्ट्यावर कोळश्याच काम करती तिच्या घरच्यासोबत.”
कोणत्या तोंडाने याला मी शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बालविवाह कायदा सांगू? कोणत्या देशात फिरतोय मी? हे काही अगदीच नवीन नक्कीच नाही मला, पण असं पुन्हा पुन्हा अंगावर कोसळत राहिलं की नाकातोंडात माती जाते आरपार.
“काही खाल्लंय का?”
“न्हाई.”
हा अगदीच निर्विकार माणूस आहे. की पिढीजात शोषणाने हेच असतं रोजचं जगणं असंच वाटतंय याला? की भूक कायमची मरून गेली असेल? की भूक जाणवूच नये अशी उपजत जाणीवच असेल याला? की यालाही हा नशिबाचाच भाग वाटत असेल?
मी गाडी बाजूला घेतली. त्याला म्हणालो मला भूक लागलीये आपण खाऊ काहीतरी.
“कशाला हो? जाऊ सरळ.”

त्याला मिसळ पाव सांगितला आणि मी भेळ घेतली. हा दादा वाढीव पाव घ्यायलाही तयार नाही. म्हणाला आता एवढ्यात दिस जाईल.
मी म्हणालो आता घरी गेल्यावर खायला नसेल तर म्हणून भेळ बांधूनपण घेतली.

हा म्हणतो, बायकू चार दिवस थांबून मालेगावला जानार व्हती.
“मग आता कसं?”
“काय नाय. निऱ्यात जातू, पाल हाय का बघतू. नसलं तर पुढं मालेगावला जायला लागल.”
“पण नीरेत सामान असंल ना?”
“दोन भगुली, तांदुळाचं ठीकं, दोन लेपाटी. त्याला काय हुतंय? बांधून न्ह्यायचं.”
मला मध्येच निवडणूक आठवली.
“मतदान हाय का?”
“हाय की. मालेगावात आमची २५ मतं हायेत.”
“कोनाला देता मग मत?”
“एक पंजाला आन एक बानाला.”
“कसं काय?”
“आमचं म्यानेजर सांगत्यात न्हवं? एक पंजा आन एक बान.”
“म्यानेजर?”
“सरपंच.”
“पैसं भेटत्यात का?”
“गावात मतदान आसलं की एका मताला हजार देत्यात. आता कुनास ठावं.”
आम्ही करंजे पुलावर पोहचलो. त्याला पन्नास रुपये दिले. नीरेच्या जीपमध्ये बसवलं तर म्हणतो एवडे का दिल्यात?
म्हणालो, मालेगावला जायचं काम पडलं तर?

“अवो लै सहकारी केली बघा तुमी.” एवढंच बोलला आणि हात दाखवत राहिला जीप निघेपर्यंत.
या माणसाने या सगळ्या प्रवासात, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. बदल्यात मला एकही प्रश्न विचारला नाही. जे काही घडतंय ते मुकाट्याने सोसायची ही सगळी मूक शांतता कुठून कुठवर मुरत गेली असेल? माझा भोवताल अश्या सगळ्या वंचित समूहाने भरलेला असताना मी विकास आणि देशभक्ती यावर कोणाशी भांडतोय? माझा देश तरी नेमका कोणता आहे? या दीपकचा देश कोणता आहे? याला देश तरी आहे का? आपला देश याला आणि याच्यासारख्यांना आपलं मानतो तरी का?

प्रसंग दोन : कारखान्याचा पट्टा आता या आठवड्यात पडणार म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. यावेळी ऊस खूप होता. सहसा मार्चच्या शेवटी गाळप बंद होतं. यावेळी अजून सुरुच आहे. आम्ही कारखाना तळावर फिरत होतो. मुलांच्या परीक्षा संपत आल्याने त्यांचं खेळणं सुरु होतं. त्यांना आवाज देत, जमलेल्यांशी गप्पा मारत आम्ही फिरताना एका कोपीवर दोन चार पुरुष बसलेले दिसले. आम्हीही तिथे जाऊन बसलो. जनरल गप्पा सुरु झाल्या. यावर्षी ऊन फार, पाणी नाही टाईप आम्ही बोलत होतो.
बोलताना मी म्हणालो, “यावेळी बरं झालं असेल ना? ऊस भरपूर होता.”
एक वयस्कर काका म्हणाले, “हौ, कारखान्याले बेस्ट झालं. मायंदाळ गाळप झालं असीन.”
“म्हणजे यावेळी तरी उचल फिटल का?”
“ह्या. उचल कुठली फिटायली, उलट याबारी लई अवघड.”
“असं कसं? कारखाना एवढा उशीर सुरुय म्हणजे कामपण जास्त दिवस ना?”
शेजारचे एक गृहस्थ म्हणाले, “ह्ये बघा. ह्ये डंपिंग आनलंय. एका येळेला पाच टनच ऊस घालायचं बंधन हाये. आमी सा लोकं आलो. एका टनाला दोनशे रुपये घावत्यात. आमच्या एका डंपिंगचा नंबर तीन दिसात एकबारी येतुया.”
“म्हणजे पाच टनाचे एक हजार रुपये. तीन दिवसातून एकवेळा म्हणजे फक्त पन्नास रुपये रोजच होतोय की.”
“म्या तीन लाख रुपये उचल घितली, अशानं काय फिटल घंटा?”
“मग इथून जाऊन कशी फेडणार?”
“उचल कधी फिटत नसती माउली. ती आमच्या सोबतच राहती. या सालीच्या उचलीत मागची रहायलेली जमा झाली. आता म्होरच्या साली ह्या सालची जमा व्हनार.”
“आता तिकडे काय काम करणार?”
“तिकडे? गावाला काम असतं तर हितं कशाला आलो असतो आम्ही? आता जायचं आणि बसायचं. कुठं बिगारी काम भेटलं तर करायचं. यासाली पाणी नाही तर वीटभट्ट्या बंद आणि बांधकामं बंद.”
“पण मग रोजगार?”

“कुठला रोजगार हो? माझ्या पाच पोरी आणि एक पोरगा आहे. सगळ्या पोरी ऊस तोडून शिकवल्या. उचल घे आन लगीन कर असं करुकरु चार पोरी उरकल्या. शेवटची आता कंप्युटर इंजिनेर केली. ती दोन साल पुन्यात टेम्परवारीत काम करती. तिलाच धड रोजगार न्हाई त आमच्या सारख्या मजुराचं काय सांगावं?
“मग जगायचं कसं?”
“असंच.”
“मिळंल ते काम घ्यायचं. नहीच भेटलं तर घ्याची उचल परत. कशी फिटल मग आमची उचल?”
माझ्यासमोर तीसपस्तीस वर्षाची तरणीताठी पोरंहीह बसलेली. मजबूत कष्ट करणारी, कष्टाला तयार असणारी. पण काम कुठाय? ही सगळी कष्टकरी जमात बिनकामाची कशी जगत असेल? मला तर कल्पनाही करवत नाहीत आणि हे लोक दरसाल, दर सीजन असेच जगतात.
“पोरगा काय करतो बाबा तुमचा?”

“काय करतो? ऊस तोडतो. शिकवतो म्हणलं. पुण्यात ठेवला तर आला निघून. आता ऊसात. मी तरी काय करणार? आमचा नेता जिवंत होता तर आम्हाला काही मदत तरी होती. आता नेता गेला तर कोण न्हाई इचारणारं. आम्ही असंच उचल घियाची आणि फेडत बसायची.”
हे जीव वाघमारे होते. वय वर्ष ६२. १९७२ मध्ये दहावी पास झाले. उत्तम क्लॅरिनेट वादक आहेत. एकनाथ आव्हाडांच्या मानवी हक्क अभियानात काम केलेले गृहस्थ. त्यांच्या जिल्ह्यातल्या राजकारणावरही बोलत होते. म्हणाले सगळे आले-गेले पण आम्ही ऊस तोडणी कामगार कुणाला दिसलो नाही आणि आम्ही जगलो-मेलो तरी कोणाला फरक पडत नाही. म्हणाले दरसाली आमच्यातली लोकं हिकड थांबायचं बघत्यात. यासाली आपणही जावं का थांबावं इचार करतोय. असं आपलं गाव सोडून राहणार तरी कसं वो? हे तुमी लोक येता, पोरं शिकवा म्हणता, चांगलंय सगळं. पर शिकून पुढ काय? ऊसच तोडायचा वो आम्ही.”

त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह, डोळ्यातली अस्वस्थता आणि उन्हाची काहिली सगळ्याचीच सरमिसळ झालेली आणि मला समोरचं सगळं धूसर दिसायला लागलं.

प्रसंग तीन : आमच्या भागात काही पारधी कुटुंबं राहतात. त्यातल्या रवीने फळांचं दुकान टाकलंय. त्याच्याकडे बसलेलो गप्पा मारत. आमचा इथला कार्यकर्ता मित्र संतोष त्यांच्या खूप जवळचा. कधीही काहीही लागलं तरी संतोषकडे जातात हक्कानं. त्याला ते सगळे ‘मामा’ म्हणतात मग त्याचा मित्र म्हणून मीही मामा. तर तो सांगत होता, मामा एकदम बेस्ट टाकलाय धंदा. आता पुस्तक लिवतो, ‘सातबारा जल्माला आला’. माझा जल्म सात बाराचा मग त्याच नावानं लिवतो. या रवीची भाषा फार मस्त मिसळलेली असते. अध्ये मध्ये कविता करतो. समाजात कोणाचाही काहीही झालं तरी हा पुढे असतोच. कधीही भेटला की सांगतो मामा, आज असं तसं झालं.

गप्पा मारताना विचारलं, “तुम्ही किती रे लोकं राहता इकडे?”
तो म्हणाला, “आठ नऊ कुटुंब असत्याल.”
“घर किती लोकांना असंल?”
‘असंल की पाच सहा कुटुंबाला.”
“नोकरी किती लोकं करत्यात?”
“हायत दोन लोकं.”
“जमीन?”

“कोनालाच न्हाई. काही लोकं शेतात मजुरी करत्यात. काही बिगारी काम आणि बाकीची मागून खात्यात. याच्या घरातली सगळी मुलं शाळेत शिकतात. एक मुलगी तर यावेळी बारावीला आहे.”
त्याला म्हणालो, “तू किती शिकला?”
“चौथीतून सोडली शाळा. लई वेगळं वागवायची लोकं आणि मास्तर. आई मागून आणायची खायाला. मग मीच भंगार गोळा करायला सुरुवात केली. दारूच्या बाटल्या गोळा करायला पाच सात किलोमीटर चालत जायाचं आणि मग समीरभाईच्या बेकरीतून बटर चुरा आणि पाव आणायचो. मग बेकरीतच कामाला लागलो. तिथं कामगार जेवायची आणि खरकटं मला द्यायची. लई जिवावर यायचं. मग ते काम पण सोडलं. बिगारी काम केलं. आई मागून आणायची आणि एक वेळ भागायचं.”

तो सांगत होता, “एक वेळ खूप पाऊस सुरु होता आणि आईला स्वयंपाक करता येत नव्हता. मग मी काही ओळखीच्या लोकांना भेटलो, शंभर रुपये उधार मागायला, पर कोनीच न्हाई दिले. दुकानदाराने हाकलून दिलं. मग भर पावसात पंपावर बसलेलो. मागे एक ट्रक लागलेला. गेलो दबकत, तर आत कोनीच न्हवतं. हळूच केबिन खोलली तर उघडीच. आत गेलो तर प्लास्टिकचा कागद ठिवलेला. त्यो बाहीर फेकला, तिथून पंपाच्या मागे टाकला, हळूच पलीकडे जाऊन खांद्यावर टाकून घरी गेलो. आई लई खुश झाली. म्हनली आता बेस झालं.”

“मामा, कधी तरी आपणहून चोरी कराव वाटंल का रं? मला किती भ्या वाटलं असंल? पोलीस मारत्याल का, डायवर मारील का, गावान बघितलं तर किती हानत्याल? एक का दोन… पर आमालाच हे दिवस का बरं सत्याल? काम मागायला गेलो तर धड काम मिळत नव्हतं आधी. आता बरी आहे परिस्थिती. आता लोकंही चांगलं वागवतात, पण तुमच्यासारखं कधी जगणार आम्ही? माझ्या आईला मागून खायची सवय. मी बोलून बोलून थांबवली. काम करते पन पैसे किती? एका घरात धुनभांडी करती. महिना दीडशे रुपये देत्यात. इतकी कमी असती का वो मजुरी? का आमालाच कमी देत्यात? आपला भाग चांगलाय म्हणून आमी नीट जगतूया. मागून का व्हईना लोकांना खायाला घावतंय. दुसऱ्या भागात तर लोकं जगूबी द्येत न्हाईत. आमची काही लोकही शानी न्हाईत पन ते शिकत्यात तरी कशी? आता मला तुमी लोकं सोबत वागवता, मी तुमच्यासारख्यात उठतो बसतो. तर मला बी शिकाय घावतं ना. आमची लोकं जर अशी रायली तर तेबी शिकत्यालच की. पण हे होनार कधी? आमी किती वर्ष वाट बघायची मामा?

आमचा भाग तसा राज्यात आणि देशातही विकासाचा आदर्श वस्तुपाठ म्हणून ओळखला जातो. तसा तो आहेही. इथे लोकांना जगण्याचे प्रश्न इतर भागांसारखे छळत नाहीत. सुखवस्तू म्हणावा असाच आहे हा भाग. पण या भागात ही वंचिततेची बेटं आहेत. ज्यांच्या वंचित असण्याला इथली धर्म, वर्णव्यवस्था कारणीभूत आहे. ज्यांना कायम गावकुसाबाहेर ठेवलंय आणि ज्यांना हक्काचं गावच ठेवलेलं नाही अशी ही कुटुंबं, असे हे समाज आपला वाटा मागायला कधी शिकतील? किंवा खरं तर यांना आपण कधी आपल्यात वाटेकरी म्हणून घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे.”
देशभरात निवडणुकींचा गोंधळ सुरु आहे. लोक माध्यमधुंदीत मस्त मशगूल आहेत. सगळीकडे भारत पाकिस्तान युद्ध शक्यता, मिसाईल पाडणारे नवे शोध, राफेलचा गदारोळ आणि नोटांचा पाऊस पडू घातलेला आहे. माझ्या भोवतालात जाणवणारे, माझ्या लोकांना भिडणारे साधे साधे प्रश्न जणू हवेत अदृश्य झालेत का काय अशी परिस्थिती झालीये. वाढत जाणारी बेरोजगारी, शेतात नापिकी, तीव्र दुष्काळ, वाढत जाणारी हिंसा, जात-धर्म द्वेषाचे अतिवेगाने वाढणारे वादळ या सगळ्यांवर बोलायला कोणाला वेळच दिसत नाहीये. सत्ताधारी काय किंवा विरोधक काय — सगळेच सत्ताबाजारात टक्का वाढवायच्या प्रयत्नात रममाण आहेत. आणि याच काळात मी गावात, माझ्या परिसरात जगणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारण्याच्या प्रयत्नात आहे. हे माझ्या भोवताली विखुरलेले खऱ्याखुऱ्या जगण्याचे तुकडे आहेत. त्याचा या निवडणुकांशी काही संबंध नाही. तसा तो निवडणुका खेळणाऱ्या लोकांनाही वाटत नाही आणि या माझ्या भोवतालालाही वाटत नाही.

आपण आपल्या भोवतालाकडे बघण्याची दृष्टी गमावलीय का? का आपल्या नजरेसमोर जगणारे हे समूह आपल्याला आपले वाटतच नाहीत? विकास विकास म्हणून जे काही सुरु आहे त्यात हा बहुसंख्य समाज कुठे आहे? काचेच्या इमारती, बहुमजली फ्लायोव्हर्स, मोठाली दुकानं, चोवीस तास जाहिराती यामध्ये आपणही एक पप्रॉडक्ट झालोय का? जर नसेल तर एक बाजार जसा प्रत्येक भावनेचा कचकड्याचा इव्हेंट करतो तसंच आपणही आपल्या सामाजिक भावना इव्हेंटपुरत्याच मर्यादित करतोय का काय? जर नसेल तर आपण आणखी कशाची वाट बघतोय? हे जगणं जर आपल्याला मान्य नसेल तर भिरकावून का नाही देत आपण हे सगळं?

डोक्यात हजार प्रश्नांच्या मुंग्या आहेत आणि मी येऊ घातलेला कामगार दिन कसा करायचा या प्रश्नात…

परेश जयश्री मनोहर ( मिळून साऱ्याजणी, मे २०१९ )