40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

हमरस्ता नाकारताना : संघर्षाच्या टोकदार वाटा

‘हमरस्ता नाकारताना’ हे सरिता आवाड यांचं आत्मचरित्र वाचून बरेच दिवस झाले. मैत्रीणीला देण्यासाठी म्हणून काल ते बाहेर काढलं तेव्हा मनात आलं की ह्या पुस्तकातलं आपल्या मनात नक्की काय उतरलं आहे? बरेचसे तपशील पुसटले आहेत, पण काही गोष्टी मात्र अशा आहेत की ज्या सहजी विसरता येणार नाहीत. काय बरं आहेत त्या? आणि जे आठवतंय त्यांच्या नोंदी करण्याचं ठरवलं. हे पुस्तक परीक्षण नाही की ही समीक्षाही नाही. असेलच तर परिचय म्हणू शकतो. या निमित्ताने आत्मचरित्र-वाचनाचा एक धांडोळा घेतला गेला.

वाचनाच्या प्रवासात एकेक टप्पा येत असतो. त्या टप्प्यागणिक आपण जे वाचतोय ते का वाचतो असा प्रश्न पडतो. आपलं आपणच त्यावर उत्तर शोधायचं आणि पुढे जायचं. सुरुवातीच्या काळातला चरित्र-आत्मचरित्रं वाचण्याचा टप्पा ओलांडला गेला आणि काल्पनिक विश्वातही आपण रमू शकतो हे लक्षात आलं. जगण्याविषयीचं कुतूहल कथा-कादंबर्‍यांच्या वाचनातून अधिकच वाढीस लागलं कारण त्या तर माणसांच्या जगण्यातूनच आलेल्या असतात हे समजलं. यथावकाश सर्व प्रकारच्या साहित्याचं वाचन सुरू झालं. आणखी एक गोष्ट ध्यानात आली, व्यक्तीगणिक तपशील आणि कारणं वेगवेगळी असतील पण, आत्मचरित्रात काल्पनिकतेची आणि कथा-कादंबर्‍यांत आत्मचरित्राची सरमिसळ असू शकते.

सर्वसाधारणपणे, प्रत्येक माणसाचं आत्मचरित्र त्याच्या मनात कायमच वस्तीला असतं. स्वत:बद्दल बोलताना माणसांना किती बोलू असं होतं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तोवरच्या जगण्याचे संदर्भ वेगळे दिसू शकतात. आधीच्या अनुभवांचे वेगळे पदरही जाणवू शकतात. आणि प्रत्यक्ष लेखन करताना त्यातलं काय ठेवायचं आणि काय गाळायचं असा तरतम भावही जागा होत असावा.

एखादं आत्मचरित्र वाचणं म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात डोकावणं. असं डोकवावंसं का वाटतं? ते ठरतं, लिहिणारी व्यक्ती कोण आहे आणि ती काय सांगते आहे यावर! परंतु, सरिता आवाडांसारख्या एका ठराविक वर्तुळात परिचित असलेल्या आणि आपल्याला अनोळखी असणार्‍या व्यक्तीचं आत्मचरित्र, ‘हमरस्ता नाकारताना’, वाचण्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या शिफारसी, पुस्तकाचं शीर्षक आणि ब्लर्बदेखील उपयुक्त ठरला.

‘मी स्वतंत्र आहे’ असं वाटत असलं तरी प्रत्येक माणूस ‘घडलेला’च असतो. त्याची जडण-घडण कशी व्हावी ह्याचं त्याला बिलकुल स्वातंत्र्य नसतं. वाढत्या वयानुसार आपल्यात बदल करण्याचं वा न करण्याचंदेखील स्वातंत्र्य त्याला असलं तरी त्यालाही ‘घडलेपणाच्या’ मर्यादा असतातच. शिवाय, कुणाचंही आयुष्य एकास एक असं गणितातल्या समीकरणांसारखं कधीच नसतं. आपल्या न बघितलेल्या आणि बघितलेल्या पूर्वजांची आयुष्यं आपल्यात सामावलेली असतात. लेखिका म्हणते की ‘अनेक माणसांनी – त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशा अनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे. शोध घेता घेता मला माझ्यात दडलेली माझी आई गवसली, आजी सापडली.’

जेव्हा प्रत्यक्ष आत्मचरित्र वाचायला लागले तेव्हा आणि वाचून पूर्ण झाल्यानंतर मैत्रिणींशी गप्पा मारताना काही गोष्टी लक्षात आल्या. जसं की, त्या व्यक्तीपेक्षा इतरच काही गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं गेलं आहे. उदा. पती-पत्नीच्या वयातील अंतर, त्यांच्या शिक्षणातील फरक, जातीचा तसंच पुरूषी वर्चस्वाचा पगडा, संसारातील स्त्री-पुरुषांचं स्थान. अशा बाबतीत नक्की काय घडत असावं?

लेखिकेच्या आजीचं वयाच्या बारा-तेराव्या वर्षी लग्न झालं त्रेचाळीस वर्षांच्या बिजवराशी. आईचं लग्न झालं आजीने बघून-ठरवून पसंत केलेल्या नोकरदार तरुणाशी. लेखिकेने आंतरजातीय विवाह केला आपला आपण ठरवून, तिच्या जातीबाहेरच्या तरुणाशी! पिढीनुरूप विवाहाचं वय बदलत गेलं तरी विवाह कधी आणि कुणाशी करायचा हे ठरवायचं ते पालकांनीच हे समाजमानसात घट्ट रुतलेलं आहे. इतकं घट्ट की पाल्यांनाही त्यांच्या शब्दाबाहेर जायचं म्हणजे आपण जणू काही वावगं करतोय असा गंड निर्माण व्हावा! ह्या परिस्थितीत बदल घडत आहे. पाल्यांवर विश्वास ठेवून, त्यांनी पसंत केलेला जातीबाहेरचा, वयाने लहान-मोठा जोडीदार मान्य होणारे विवाह होताना दिसताहेत. अर्थात, हे निरीक्षण माझ्या मर्यादित परीघातलं आहे.

अंदाजे एकोणिसशे सालात जन्मलेली लेखिकेची आजी त्या काळाच्या मानाने वेगळी होती. काय होतं तिचं वेगळेपण? ’घरावर पूर्ण नियंत्रण असणं सर्वांत महत्त्वाचं’ असं ती मानत असे. त्याची काही उदाहरणं – ‘गरीब असलं तरी चालेल, पण घर स्वत:चं हवं असा आजीचा आग्रह होता व घराचं बांधकाम तिच्या देखरेखीखाली झालं. ते चालू असताना ती समोर खुर्ची टाकून बसत असे.’ ‘आजीला कमीतकमी पैशात जास्तीत जास्त शिस्तीनं संसार चालवायचा होता. या हुशार तरूण गृहिणीनं एखादी संस्था चालवावी तसं घर चालवलं. अगदी दळण टाकलं तरी ते बरोबर मोजायची काठी तिच्याकडे होती. कारण गव्हापेक्षा पीठ थोडं वरपर्यंत असतं.’

आजीने स्वत:च्या लेकीशी केलेला तीव्र संघर्ष हे आणखी एक उदाहरण. ते वाचल्यानंतर जशी खंबीर आजी दिसते तसाच त्या काळातल्या लग्नांविषयीचा एक वेगळाच पैलूही दिसतो. मुलीचं वय लहान म्हणजे बारा-तेरा आणि नवरदेव त्रेचाळीस वर्षांचे. शिवाय त्यांचं हे तिसरं लग्न. १९२८ साली आजोबा ६० वर्षांचे आणि आजी २८ वर्षांची. २ मुलगे आणि २ मुलींची आई! म्हणजे पहिलं अपत्य आणि आई ह्यांच्या वयातलं अंतरही कमी असणार. आपली आजी आणि तिचं सर्वांत पहिलं अपत्य असलेली आपली मावशी यांच्या नात्यात संघर्ष आहे हे लेखिकेला ठाऊक होतं. मात्र, त्या संघर्षातला नाजूक धागा तिला समजला तो तिच्या मावशीच्या सुनेकडून. त्याविषयी विचार करताना लेखिकेला लक्षात आलं ते असं –

त्या मावशीचं लग्न झालं तिच्यापेक्षा ८-१० वर्षांनी मोठ्या मुलाशी. म्हणजे मावशीची आई आणि नवरा यांच्यात वयाचं अंतर कमी झालं. सासू-जावई असं नातं; पण जावई सासूला जवळजवळ समवयस्क होता. शिवाय तो हुषार आणि देखणा होता. त्याची सरबराई आजी विशेष दक्षतेने करायची. ते करताना तिच्या चित्तवृत्ती स्वाभाविकपणे बहरत असतील. चाणाक्ष मावशीच्या ही गोष्ट लक्षात आली असावी व तिने ते आपल्या आईला बोलून दाखवलं असावं. ह्याला प्रतिक्रिया म्हणून मावशीचा दरवाजा आजीने आपल्यासाठी कायमचा बंद केला असावा का असा प्रश्न लेखिकेला पडला.

लहान वयातील लग्नं, मातृत्व आणि पुढे त्या मुलींचीही लहान वयात लग्नं यामुळे ’स्वाभाविक भावनांवर सामाजिक वास्तवामुळे अनैतिकतेचा शिक्का बसणे’ ह्या दडपणाखाली त्या काळातल्या कित्येक स्त्रियांची मनोवस्था कशा प्रकारची असू शकेल?

लेखिकेची आई म्हणजे ‘टॉलस्टॉय – एक माणूस’ ह्या पुस्तकाची लेखिका सुमती देवस्थळे. त्या आपल्या माता-पित्यांचं पाचवं अपत्य, दोन मुली आणि दोन मुलगे यांच्या पाठीवरचं! परंतु वडिलांच्या निवृत्तीच्या वयात आणि तीही मुलगी ह्या कारणामुळे तिच्याबाबतचा आकस तिच्या आईच्या म्हणजे लेखिकेच्या आजीच्या मनात कायम राहून बालपणात ती सतत दुर्लक्षित होती. ह्याचा परिणाम म्हणजे आपल्या आईबद्दल (लेखिकेची आजी) मनात कडवटपणा आणि माहेराविषयी कडवा अभिमान असा परस्परविरोध लेखिकेने आईच्या स्वभावात अनुभवला.

सुमतीबाईंनी सर्वसामान्य ब्राह्मण मुलींसारखं मुकाट्याने परिस्थितीला शरण जाणं नाकारलं. लग्नानंतर एकेक पायरी वर चढत शिक्षण, नोकरी ह्यात आपल्यातील गुणवत्तेला वाव करून दिला. ह्या दोन्ही बाबतीत आपल्या नवर्‍यापेक्षा त्या वरचढ ठरल्या. रेल्वेत नोकरी करणार्‍या लेखिकेच्या वडिलांना बढतीच्या परीक्षांमध्ये यश मिळालं नाही. ह्याचा परिणाम असा झाला की लेखिकेचे वडील कायम न्यूनगंडाच्या भावनेत जगत राहिले. ज्ञानप्रबोधिनी आणि मुंबई-आयआयटी यांसारख्या नामवंत संस्थांचा विद्यार्थी असणारा लेखिकेचा नवरा जात-उतरंडीचा, स्त्री-पुरूष नात्यातील वर्चस्वाच्या समजुतींचा बळी ठरला. अंगभूत हुशारी असूनही योग्य-अयोग्यतेचं भान राखण्यात कमी पडला. मनात प्रेम असूनही संशयी स्वभावाने पत्नीशी त्याची फारकत होत राहिली. आयुष्याच्या शेवटच्या २० दिवसांत त्याला ह्याची उपरती झाली आणि लेखिकेला मोकळा श्वास घेता आला.

समाजव्यवस्थेतील जाचक रूढी-परंपरा आणि जातीव्यवस्थेतील उतरंड ह्यांच्या सापळ्यात अडकल्याने होणारी माणसांची फरपट, दुराभिमानामुळे निर्माण होणारा रक्ताच्या, मायेच्या नात्यांतील दुरावा-कोरडेपणा, निव्वळ कर्तव्यभावनेने उरणारी जगण्यातील विवशता, उपजत गुणविशेष ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या ठरतात तसाच, सामाजिक जगण्यातील सकारात्मकता व नकारात्मकता यांचाही वाटा मोठा असतो.

माझ्या वाचन-काळात बर्‍याच कालावधीनंतर वाचलेल्या ह्या आत्मचरित्रामुळे आणि ते प्रकाशित झाल्यानंतर वाचलेल्या एका लेखामुळे दोन बाजू दिसल्या. पुस्तक वाचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया होती की स्वतःतील अस्वस्थता कशामुळे आहे हे नेमकेपणाने शोधण्यास हे आत्मचरित्र वाचकाला प्रवृत्त करतं. त्याचप्रमाणे, लेखात मांडलेली दुसरी बाजू लक्षात घेतली तर ते माणसाच्या ‘असलेलं लपवण्यासाठी आणि नसलेलं दाखवण्यासाठी’ असं माणसाच्या उपजत स्वभावाला अधोरेखित करतं का असाही प्रश्न मनात आला.

आत्मचरित्रं वाचावीत की वाचू नयेत? त्या व्यक्तीचं जगणं समजून घेताना त्यातली सामाजिक परिमाणं जशी दिसतात तशीच त्या आत्मचरित्राला दुसरी बाजूही असते हे लक्षात येतं. जवळच्या नात्यांतले गुंते-तिढे, ते सुटणं-वाढणं वा नातं कायमचं तुटणं असं बरंच दिसत रहातं. मात्र कोणतंही नातं चांगलं-वाईट, चूक-बरोबर असे शिक्के न मारता आत्मचरित्रं जरूर वाचावीत.

हमरस्ता नाकारताना
सरिता आवाड
राजहंस प्रकाशन – पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१९
किंमत : रू. ३५०/-
पृष्ठे : २८७

 

चित्रा राजेंद्र जोशी
chitrarjoshi@gmail.com