40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

हाँ, मर्द को भी दर्द होता है!

२००९ सालचा जानेवारी महिना असेल. मी एका नाटकात काम करत होतो. ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे कणकवलीत आले होते. चार महिणे कणकवलीत राहून त्यांनी ‘मी माझ्याशी’ नावाचं नाटक बसवलं होतं. एक चांगला ग्रुप बांधला होता. सतत एकत्र येणं, वाचन, कविता, गप्पा, तालमी यात मस्त दिवस जात होते. या नाटकाच्या प्रक्रियेत मी अगदी पहिल्या दिवसापासून सामील झालो होतो. आणि त्याच दरम्यानं माझं लग्न ठरलं. मला हे नाटक सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. आतून खूप वाईट वाटत होतं. पण लग्नाच्या धावपळीत नाटकासाठी वेळही देता येणार नव्हता. माझं लग्न झालं. त्यानंतर नाटक रंगमंचावर उभं राहिलं. मी त्यात बॅकस्टेजला थोडा वेळ देऊ लागलो. नाटक पूर्ण बसल्यावर अतुल पेठेंनी परत पुणं गाठायचं ठरवलं. साहजिकच होतं. दिग्दर्शक म्हणून जी एक क्रीएटिव्ह प्रोसेस असते ती संपलेली होती. परत जाण्याच्या आदल्या दिवशी अतुल पेठे कणकवलीला ज्या ठिकाणी रहात होते त्या घरात एक पार्टीही झाली. गेल्या चार महिन्यातल्या नाटकाच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप हसलो. मग मात्र खूप भावुक व्हायला झालं. हे चार महिने आयुष्यातले किती महत्त्वाचे दिवस होते त्याची जाणीव व्हायला लागली होती. आता वैवाहिक जबाबदारी पार पाडताना परत असे मोकळे दिवस येतील की नाही अशी शंकासुद्धा मनात येत होती. मध्यरात्रीनंतर घरी परतलो. त्यावेळी माझं लग्न होऊन फार फार तर 2 महिने झाले होते. माझा बांध फुटला आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागलो. सीमा माझ्याकडे अवाक होऊन बघत बसली. लग्न झाल्यापासून असं पहिल्यांदाच झालं होतं आणि मला कसं ताळ्यावर आणायचं हे तिला समजत नव्हतं. रूढार्थानं पुरूष असलेला आपला नवरा असा रडू शकतो हे पचवणं तिला कदाचित अवघड जात होतं.

पण हा असा पहिलाच प्रसंग नव्हता. पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर आणि प्रेमभंग झाल्यावर मी असाच आईच्या मांडीवर डोकं ठेऊन खूप रडलो होतो. तेव्हा आईने म्हटलेलं एक वाक्य कायम लक्षात राहिलं. “अरे पुरूषासारखा पुरूष तू, बायकांसारखा रडतोस कसला ?” त्यावेळी यात काही वावगं वाटलं नव्ह्तं ; पण आता या दोन्ही प्रसंगांचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की ‘मर्द को दर्द नही होता’ टाईप संवाद ऐकत मोठे झालेल्या आपल्या समाजात, पुरूष असण्याच्या व्याख्या नेमक्या काय आहेत? पुरूष म्हणजे सतत कठोर, खंबीर का असला पाहिजे? त्याने रडता कामा नये? त्यानं भावनिक होता कामा नये? किंवा झालाच तरी एका मर्यादेपर्यंत ठीक. कविता वगैरे करण्यापुरता. परंतु रडून मन मोकळं करता येणं ही कुठल्याही माणसाची सहज प्रेरणा असते. मग पुरूष त्याला अपवाद का?

माझे वडील कडक शिस्तीचे होते. लहानपणापासून ‘बाप’ कसा असला पाहिजे याचे ठोकताळे  त्यांच्याकडे पाहूनच तयार झाले. वडील माझ्या जन्मापूर्वीच कराडजवळील पेरले नावाचं त्यांचं मूळ खेडेगांव सोड़ून कणकवलीला स्थायिक झाले. सगळं सोडून इथं आल्यामुळे सगळा संसार परत उभा करणं आलं. त्यासाठी ते दिवसाला तीन वेगवेगळ्या नोकऱ्या करत. त्यामुळे आम्हांला आम्हाला त्यांचं तोंड आठवड्यातून एखादाच दिवस दिसत असे. मुलांसाठी द्यायला त्यांच्याकडे फारसा वेळ नसायचा. त्यावेळी या गोष्टीचा खूप राग यायचा, परंतु आता स्वतः बापाच्या भूमिकेत शिरल्यावर मात्र वडिलांचं फार काही चूक नव्हतं याची जाणीव व्हायला लागली. सुरवातीला माझे वडील टिपिकल मध्यमवर्गीय वडिलांसारखे वागायचे. म्हणजे ते घरकामात मदत वगैरे काही करत नसत. त्यांना तेवढा वेळही नसे हीसुद्धा गोष्ट खरीच. परंतु नंतर एका टप्प्यावर आईच्या आजारपणाचं निमित्त झालं आणि वडिलांना सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणं गरजेचं होऊन बसलं. मग ते जेवणापासून, भांडी घासणे, कपडे धुणे यासारखी कामंही करू लागले ; जी नेहमी आई करायची. पण एक टिपिकल नवरा ते आईला आजारपणात संभाळून घेणारा पार्टनर हे बदल त्यांच्यात अगदी अलगद घडले.

माझं हे निरीक्षण आहे की कित्येक लोकांना त्यांची मळलेली वाट सोडून बदलायचं असतं ; पण एकाच गोष्टीमुळे स्वतःमध्ये हे बदल करायचं त्यांचं धाडस होत नाही आणि ती गोष्ट म्हणजे वारसा हक्काची सुरक्षितता. आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आणि वारसा हक्क या दोन गोष्टी अजूनही हयात आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला एक प्रकारचं सुरक्षा कवच मिळतं. पण त्या कवचासोबत रूढी आणि परंपरांचं गाठोडंही आपल्या मानगुटीवर येऊन बसतं, जे लोकांना इच्छा असूनही बदलू देत नाही. एकतर तुम्हांला स्वातंत्र्य निवडता येतं किंवा तुम्ही सुरक्षितता निवडू शकता. माझ्यासमोरही अशी निवड करण्याची परिस्थिती काही वर्षांपूर्वी येऊन ठेपली. मी त्यावेळी स्वातंत्र्य निवडायचं ठरवलं. वडिलोपार्जित सर्व गोष्टींवर पाणी सोडून जे काही असेल ते स्वतःचं असेल असं ठरवलं आणी माझं घर बांधलं. असं घर जिथे जुन्या, बुरसटलेल्या परंपरांना काही स्थान नसेल.

दोन वर्षांपुर्वी सीमा दुसऱ्यांदा आई होणार होती. गरोदरपणाच्या सुरवातीपासून गर्भाशयाटी पाणी कमी होतं. शेवटी ज्याची शंका होती तेच झालं. सातव्या महिन्यातच आणीबाणी  येऊन उभी ठाकली आणि प्री-मॅच्युअर्ड डिलिव्हरीचं संकट समोर उभं ठाकलं. डॉक्टर्सनी दोन पर्याय दिले. पहिला अर्थातच प्री-मॅच्युअर्ड डिलिव्हरीचा होता आणि दुसरा म्हणजे बाहेरून गर्भाशयात पाणी सोडण्याचा. आम्ही दुसरा पर्याय निवडला आणि रूग्णालयात दाखल झालो. पुढचे सर्व दिवस आम्हां दोघांचा पेशन्स तपासणारे होते. एक छायाचित्रकार म्हणून मी हे सर्व ३५ दिवस माझ्या कॅमेऱ्यात कैद करत राहिलो. पुढे ही सर्व छायाचित्रं छायाचित्र-जगतात चांगलीच गाजली. या सर्व कठीण प्रसंगात ‘बाप’ म्हणून मी दाखवलेल्या धैर्याचं सगळीकडे कौतुक झालं. पण खरंच असं असतं का? पुरूष खरच इतका धैर्यवान वगैरे असतो का? ते सर्व दिवस आठवताना एक प्रसंग मला चांगलाच लक्षात राहिलाय. रूग्णालयात दाखल होऊन वीसएक दिवस झाले असतील. नेहमीप्रमाणे रात्री रूग्णालयाच्या खोलीत आम्ही झोपी गेलो. आणि अचानक मध्यरात्री केव्हातरी मी ओरडत उठलो. थेट जाऊन बेडवर झोपलेल्या सीमाचे हात घट्ट पकडले. माझं किंचाळणं इतकं मोठं होतं की रात्रपाळीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि रूग्णांना ती किंचाळी ऐकू गेली. सर्व आमच्या खोलीबाहेर जमा झाले. त्यापूर्वीच्या संपूर्ण आयुष्यात मी इतका कधीच घाबरलो नव्हतो. माझं संपूर्ण अंग शहारून गेलं होतं. घाम फुटला होता. वरवर जरी मी स्थिर वाटत असलो तरी आतमध्ये कुठेतरी हलायला झालं होतं. आणि त्यामुळेच काहीतरी भयंकर स्वप्न पडलं असावं. एक फोटोग्राफर म्हणून जे स्थैर्य मी त्या ३५ दिवसांत दाखवलं ते एक पुरूष किंवा बाप किंवा नवरा म्हणून मी उसनं अवसान आणून दाखवत होतो ही वस्तुस्थिती मला उमगली.

छायाचित्रण करायला लागल्यापासून माझ्यात बरेच बदल घडले असं मला खात्रीलायकपणे वाटतंय. छायाचित्रणामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या बाबतीत घडली ती म्हणजे मी कणकवलीसारख्या ग्रामीण किंवा निमशहरी वातावरणातून थोडा मोकळ्या वातावरणात येऊन पडलो. देशभरातील छायाचित्रणासोबत इतर विविध क्षेत्रातील स्त्रिया मैत्रिणी झाल्या. त्यापूर्वीची ३० वर्षं कणकवलीत गेली होती. पौगंडावस्थेत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला प्रचंड न्यूनगंड होता. आकर्षक पुरूष म्हणजे तो तब्येतीनं सिक्स पॅक फिगर असलेलाच पाहिजे आणि पुरूषाच्या सौंदर्याचं मोजमाप करण्याची ही एकमेव पट्टी आहे असं वाटायचं.  मी तब्येतीने सडपातळ असल्यामुळे या मोजमापात कुठेच बसत नव्हतो. समोर कुणीही मुलगी आली की तिच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलायचं धाडस नसायचं. कॉलेजमध्ये बहुतांश मुलं ही खेडेगावांमधून आलेली, त्यामुळे मुलींशी बोलायचा कधी प्रसंगच यायचा नाही. पुढे व्यवसायात पडल्यावरही याच वातावरणात रहाणं आलं ; परंतु छायाचित्रणामुळे परिस्थिती बदलली. स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या व स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या अनेक स्त्रिया मैत्रिणी झाल्या. यापूर्वीच्या आयुष्यात ‘मानलेली बहीण’ किंवा ‘वहिनी’ असायची  पण ‘मैत्रीण’ कधीच नव्हती. कोणत्याही परस्त्रीशी ओळख झाली की तिला बहीण किंवा वहिनी अशा ‘राजकीय’ नात्यामध्ये अडकवून टाकायची रीत होती. पण आता तसं करावंसं वाटत नाही कारण त्यातला फोलपणा समजू लागला आहे. शरीरसंबंधांसारख्या नाजूक गोष्टीवर मैत्रिणीसोबत मोकळेपणे व्यक्त होणं किती सुंदर असू शकतं हे दिवसेंदिवस उमगत गेलं. सेक्ससारख्या गोष्टींकडे निर्मळपणे पहाण्याची सवय यामुळे लागली. परंतु कित्येक सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित स्त्री पुरूषांमध्ये हा मोकळेपणा नसतो ही वस्तुस्थिती आजूबाजूला दिसते.

पुरूष होण्याच्या या सर्व प्रक्रियेमध्ये मी आधुनिकतेच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर उभा आहे हे मला नेमकं कळत नाही. पुरूषांनी घरकामात मदत करणं हा आधुनिकतेचा एकमेव निकष असू शकत नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आज बहुतांश पुरूषांवर ही जबाबदारी पडते व ते अशी मदत करतातच. ‘मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य देतो’ हे बहुतांश आधुनिक पुरूषांच्या तोंडचं वाक्य असतं आणि हेच वाक्य त्यांच्या बेगडी आधुनिकतेची साक्षही देतं. स्वातंत्र्य ही पुरूषानं द्यायची गोष्ट नसून तो तिचा मूलभूत हक्क आहे हे अजूनही आम्हां पुरूषांच्या गळी उतरत नाही. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या पुरूषांच्या तोंडी अजून एक भंपक वाक्य असतं आणि ते म्हणजे ‘प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते’. सार्वजनिक रित्या हे वाक्य उच्चारायचं धाडस मला मात्र अजून कधीही झालं नाही. मी माझ्या यशामागे माझ्या पत्नीचं, सीमाचं, योगदान मान्य करतोच. परंतु माझ्या यशाकडे ती नेमकं कसं पहाते हे विचारायाचं धाडस मात्र मला होत नाही. कारण बरेचदा यशस्वी पुरूषाच्या मागे उभं राहता राहता त्या बाईचं कसं आणि कितपत शोषण होत जातं याचा अंदाज बांधणं कठीण असतं. आणि बरेचदा पुरूषांना याची पुर्ण कल्पना असते. त्यामुळे बरेचसे पुरूष वरचं वाक्य उच्चारून या शोषणरूपी जखमेवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करतात.

हे सर्व कुठेतरी बदलायला लागलंय हे मात्र नक्की. काही वर्षांपूर्वी पुरूषत्वाबद्दल माझ्या ज्या संकल्पना होत्या त्या आता नक्कीच नाहीत. मी पूर्णपणे २१ व्या शतकातला पुरूष झालोय असंही नाही. पण मी पूर्णपणे २० व्या शतकातला सरंमजामशाहीचा पुरस्कर्ता पुरूषही नाही. या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी मी झोके खातोय. आणि तोल जास्त आधुनिकतेच्या बाजूने आहे हेसुद्धा नक्की. वर्षानुवर्षे झिरपलेले संस्कार नाहीसे व्हायला वेळ तर लागणारच. पण पुढच्या पिढीत मात्र मूलतः ते कसे रूजतील याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र सुरू झाले आहेतत. मग घरकाम हे फक्त आईचं काम नाही हे त्यांना कृतीतून दाखवून देणं असेल किंवा गाडी चालवणं किंवा ऑफिसला जाणं हे फक्त पुरूषाचं काम नाही हे दाखवणं असेल. या गोष्टी जेवढ्या जाणीवपूर्वक मुलांच्या निदर्शनास आणून देता येतील तेवढ्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. उद्देश एवढाच की ही मोठी होणारी झाडं कोणत्याही सीमेवर कशीही वाढू नयेत. त्यांची वाढ स्त्री-पुरूष समतेच्या वाटेवर व्हावी.

 

–  इंद्रजित खांबे 

(मिळून साऱ्याजणी, मार्च २०१७)