प्रिय वाचक,
सस्नेह नमस्कार!
नुकत्यात NEP-2020 हे नवं शैक्षणिक धोरण जाहीर झालं. त्यानंतर या धोरणाच्या बाजूनं आणि विरुद्ध एकच गदारोळ माजला. या धोरणासंबंधी गेले काही दिवस वृत्तपत्रं आणि डिजिटल व्यासपीठावरील विश्लेषणात्मक लेख, ऑनलाइन सेमिनार्स या माध्यमातून चर्चा घडते आहे. या सगळ्याचा आढावा घेत या धोरणाची सांगोपांग चिकित्सा करना एक लेख मिसा Online मध्ये प्रकाशित करण्याचा आमचा विचार आहे. प्रस्तुत लेखातून ‘शिक्षण’ या संकल्पनेबाबत काही मूलभूत चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या करोना महामारीच्या काळात कुठल्याही मुद्द्यावर शांतपणे साधकबाधक चर्चा हा प्रकारच संपला आहे की काय असं वाटावं अशी निराशाजनक, दु:खद परिस्थिती आहे. जोरजोरात समोरच्या माणसावर आरोप-प्रत्यारोप करत हेतुंविषयीच सतत शंका घेतली जातेय. बिनबुडाचं, खोटंनाटं समाजमाध्यमातून भडकपणे पसरवलं जातंय. विरुद्ध मतांच्या व्यक्तीला ट्रोल करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. मग त्याला प्रतिट्रोल. ट्रोलयुद्धाच्या या विकृत मानसिकतेमुळे समाजहितैषी अभ्यासकांचं, सामाजिक कार्यकर्त्यांचं अभ्यासपूर्ण केलेलं संतुलित विश्लेषण, चिकित्सा आणि उपाययोजना दूर फेकल्या जातात. त्यामुळे समाजाचं मोठं नुकसान होतंय. याची दखल संबंधितांनी घेऊन कठोर कारवाई करायला हवी. व्यक्ती आणि समाजाच्या विकासाची गुरुकिल्ली म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण. अशा या जीवनावश्यक विषयावर नवं धोरण जाहीर व्हायला चौतीस वर्षं लागावीत याचा अर्थ आपल्या लक्षात येतोय ना? समाज शिकला तर प्रश्न विचारील आणि त्यातून सत्ताधार्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल, हे राजकारणी जाणून असतात. शिक्षणाची मक्तेदारी असलेला एक वर्ग आणि दुसरा शिक्षणापासून वंचित राहिलेला वर्ग यांच्यात वर्गसंघर्ष असतो. हे लक्षात घेऊन शिक्षण धोरणामागचं राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण लक्षात घ्यायला हवं. (ब्राझिलियन शिक्षणतज्ज्ञ पावलो फ्रिअरी याला ‘एज्युकेशन पॉलिटिक्स’ असं म्हणतात.)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बजावत होते, ‘सामाजिक विषमता दूर करून सामाजिक लोकशाही आणण्यासाठी शिक्षण हा राजमार्ग आहे. शिक्षण शोषणमुक्तीची पायवाट आहे. शिक्षण हे मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा खरा पाया करण्यासाठी ज्ञान आणि चारित्र्याची एकता आवश्यक! त्यासाठी ज्ञान आणि करुणा एकत्र नांदायला हवी. कारण सुशिक्षित वर्गाकडे चारित्र्य नसेल तर त्याच्याच आत्मप्रगतीसाठी ते दीनदुबळ्या व वंचितवर्गाला अहितकारक असा ज्ञानाचा उपयोग करतील.’ आज तसं होताना दिसतंय. शिक्षणसम्राटांनी गरीब-बहुजनांच्या शिक्षणाच्या संधी धुळीला मिळवल्या आहेत. देशाच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विकासाचं काम हातात घ्यायला इथला आत्मकेंद्री सुशिक्षित वर्ग तयार नाही, ही सामाजिक शोकांतिका आहे.
लोकशाही टिकवून यशस्वी करायची असेल तर समाज नैतिक, मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारित करणं गरजेचं आहे. खरं तर शिक्षण सर्व समाजाच्या नैतिक व भौतिक उन्नतीचं आणि लोकांच्या जीवनात गुणात्मक सुधारणा करण्याचं साधन आहे. सामाजिक एकता, समता व सौहार्द वाढवणार्या मूल्यांचा प्रचार-प्रसार शिक्षणातून व्हायला हवा. राष्ट्राच्या उभारणीसाठी लागणारं तंत्रकौशल्य सर्व समाजाला शिकवण्याचं साधन शिक्षण बनायला हवं; मात्र वास्तवात आज शिक्षण हे व्यक्तिगत उत्कर्षाचं, उद्योग व्यवसायाच्या बाजारात उपयोगाला येणारं ‘भांडवल’ अशी अतिशय संकुचित संकल्पना प्रस्थापित वर्गात रुजली आहे. शिक्षणाची संधी साधण्यासाठी विषम स्पर्धा, वारेमाप पैसा, वशिलेबाजी, भ्रष्टाचार किंवा कोणताही अवैध मार्ग चोखाळण्याचं समर्थन करणारी मूल्यव्यवस्था अभिजन संस्कृतीनं स्वीकारली आहे. त्याचा परिपाक म्हणजे खाजगी शिक्षणव्यवस्था!
नवीन आर्थिक धोरणात शिक्षण ही विक्रीची वस्तू, विद्यार्थी हा ग्राहक, शाळा-महाविद्यालय म्हणजे ‘शिक्षण उद्योग क्षेत्र’ असं समीकरण झालंय. त्यामुळे बाजाराप्रमाणे मागणी तसा पुरवठा आणि किंमत तसा माल ही तत्त्वं शिक्षणालाही लागू झाली आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं शासनाचा हस्तक्षेप असणारं आर्थिक धोरण प्रभावीपणे न राबवल्यानं श्रीमंत व गरीबांसाठी दोन शिक्षण पद्धती तयार झाल्या. ‘ज्ञानकामगार’ व ‘सेवाकामगार’ असे दोन समाज विभाग या व्यवस्थेला अभिप्रेत आहेत. ज्ञानकामगार संख्येनं कमी, उच्च ज्ञान व कसब शिकणारा. त्यासाठी खर्च जास्त. मात्र पुढे त्यांचं उत्पन्न जास्त. उलट सेवाकामगार. सेवेपुरतं शिक्षण मिळणारा. भौगोलिकदृष्ट्या तिसर्या जगातले, गरीब बहुसंख्य असणार्या या सेवाकामगारांची शिक्षणातून परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी यामुळे वाढत जाणारी विषमता…करोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळातलं या विषमतेचं अक्राळविक्राळ स्वरूप तर भयचकित करणारं आहे. शिक्षण आणि रोजगार यामध्ये प्रचंड उलथापालथ होण्याचा हा काळ महाकठीण आहे. बहुसंख्य लोकांचे जगण्याचे प्रश्न अतिशय जटील होत आहेत. लाखो-करोडो माणसं बेकार होत आहेत. दुसरीकडे दारिद्र्यातून बालकामगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुलांची शिक्षणातून गळती वाढत आहे. त्यात मुलींचं प्रमाण अधिकच जास्त आहे ही चिंतेची बाब आहे. एकूणच समस्या एवढी अवाढव्य आहे की, आपण एकटे काय आणि किती करू शकणार? किम कर्तव्य मूढम्! अशा काहीशा उद्विग्न, हताश भावनेनं आपले हात-पाय गळून, आपण निष्क्रिय होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कसा टाळूया?
या कठीण काळाला शिक्षणात सुसंगत, सर्वांगीण, मूलभूत बदल करायला लागणार आहेत, जगण्यातल्या प्राथमिकता बदलायला लागणार आहेत, याचं भान ठेवूया. व्यक्ती आणि समाज यामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची ताकद शिक्षणात आहे, यावर विश्वास ठेवूया. समाज आणि शिक्षण परस्परावलंबी आहेत. म्हणून समाजाभिमुख शिक्षण हवं. शिक्षणातून मानवी मूल्यांचं एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमण होत असतं. या प्रक्रियेत शिक्षकाचं स्थान कळीचं असतं. करोनामुळे ४-५ महिने शाळा-महाविद्यालयं बंद आहेत. थोडा जास्त मोकळा वेळ पालक आणि शिक्षकांच्या हाताशी आहे. तेव्हा शिक्षण आणि शिक्षक-पालक-विद्यार्थी, यांच्या संदर्भात जास्त व्यापक, सखोल विचार करूया का?
रवींद्रनाथ टागोरांच्या मते, ‘विचारांमधून मनात प्रतिबिंबीत होणार्या समजेनुसार कृती करण्यासाठी व्यक्ती आणि समाजाला सक्षम करणे म्हणजे शिक्षण देणे.’ याचा अर्थ आपल्या अनुभवांचा आपण विचार करतो, अर्थ लावतो ह्यातून आपल्या मनात ‘समज’ प्रतिबिंबीत होते. या समजेनुसार आपण स्वत: तर कृती करायचीच; पण त्याशिवाय समाजालाही कृती करण्यासाठी सक्षम करायचं. ही सक्षमता निर्माण होण्यासाठी काय काय करावं लागेल?
शिक्षणातून आज ज्या मूल्यांची पेरणी केली जाते, त्यांची उगवण समाजात दिसून येते. त्यामुळे मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीला पर्याय नाही. गांधीजींची ‘नई तालीम’, टागोरांचं ‘शांतिनिकेतन’, टॉलस्टॉयच्या ‘शेतकर्यांच्या शाळा’ वगैरे आपण वाचलेलं आहे. आत्ताच्या काळातही महाराष्ट्रात सर्जनशील शिक्षणाचं काम करणार्या अक्षरनंदन, पालकनीतीची खेळघरं, नवनिर्मिती, सृजन आनंद विद्यालय, प्रगत शिक्षण संस्था, आनंद निकेतन शाळा, ग्राम मंगल अशा अनेक संस्था आहेत. या संस्था ही समाजातली छोटी छोटी विखुरलेली बेटं न राहता मुख्य प्रवाहात सर्जनशील शिक्षण येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी शिक्षण या मूलगामी विषयाबाबत सरकारचं धोरण काय असावं आणि मुख्य म्हणजे ते कसं राबवलं जावं, याविषयी चिकित्सकपणे विचार करत सक्रीय व्हायला हवं.
शिक्षणाद्वारे ज्ञानावर आधारित नवीन समाजरचना निर्माण करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संवेदनशीलता, मूल्यं आणि निष्ठापूर्वक प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. ज्ञान हे सारखं बदलत असतं, नवं ज्ञान निर्माण होत असतं. ज्ञानाची त्रिसूत्री- माणसाचं हृदय, डोकं आणि हात; म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समन्वय! मोकळेपणानं जेव्हा माणसं विचार करतात तेव्हा खरं ज्ञान निर्माण होतं. शिक्षणाची हातापासून, शारीरिक श्रमापासून फारकत होते तेव्हा ते अनुत्पादक बनतं. शिक्षणातून जर मनाला आनंद देणारी आणि चरितार्थाचं साधन करणारी निष्पत्ती झाली नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग नाही, असं गांधीजी म्हणतात. म्हणून विविध कौशल्यांचं ज्ञानात रूपांतरित करणारी शिक्षणपद्धती हवी. हे लक्षात घेऊया. नई तालीममध्ये उत्पादक श्रमांशी शिक्षण जोडलं होतं. सूतकताई, हातमाग, लोहारकी, सुतारकी, चर्मकारिता इ. शेती व्यवसायाशी निगडित जीवनावश्यक मूलोद्योगांना प्राधान्य देणार्या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार गांधीजींनी केला. नवीन शिक्षण धोरणात पण इयत्ता ६, ७, ८ वीसाठी गंमत म्हणून सुतारकाम, लोहारकाम, हस्तकला, कुंभारकाम आदि उपक्रमांचा समावेश आहे. हे एका अर्थानं स्वागतार्ह आहे. कारण ज्ञान मिळवण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांना आनंददायी, प्रयोगशीलतेला वाव देणार्या, बुद्धीला आव्हान देणार्या, आणि भावना प्रगल्भ करणार्या हव्यात. आज श्रमप्रतिष्ठेला शिक्षणात रुजवणं सगळ्यात गरजेचं आहे. यातून श्रम करणार्या कष्टकरी वर्गाविषयी लहानपणापासून आदराची भावना जागी होईल. परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचितांच्या मुलांसाठी एक न्याय आणि श्रीमंतांच्या शाळांमध्ये वेगळा न्याय असं होणार नाही ना, याची खबरदारी सजग नागरिक म्हणून आपल्याला घ्यावी लागेल.
प्रत्येक माणसात सर्जनशीलता, सौंदर्याची ओढ, कल्पनाशक्ती, स्व-अभिव्यक्तीची आस हे गुण जन्मजात असतात, असा तज्ज्ञांचा दावा आहे. योग्य संधी न मिळाल्यास मात्र अशी माणसं मागे पडतात. सर्जनशीलता हा आपला प्रांत नाही, असं त्यांना वाटू लागतं. सर्जनापासून ते दूर जातात. त्यामुळे त्यांचं आयुष्य शुष्क, चाकोरीबद्ध बनतं, आनंदनिर्मितीची शक्यता कमी-कमी होत जाते. त्यातून ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. जेन साही म्हणतात, “सर्जनासाठी थोडी शांतता-स्तब्धता आवश्यक असते. तरच आपला आतला आवाज ऐकू येईल. मनातल्या आतल्या-आतल्या भावनांना जाग येईल. अशा जागृत अवस्थेत आपल्या जाणिवा तरल बनतात, अनुभव आपल्या मनात अलगद झिरपतात आणि आपण त्या अनुभवांशी तादात्म्य पावतो. त्यातून जे व्यक्त होते ते सर्जन.” आजच्या विषम समाजात प्रत्यक्षात गरिबाला हातातोंडाशी गाठ पडण्यासाठी सतत राबावं लागतं म्हणून शांतता-स्तब्धता लाभत नाही, तर श्रीमंत पैशामागे जीव खाऊन धावतच राहतात. त्यामुळे त्यांना ती मिळत नाही. एकूणच स्पर्धात्मकतेच्या अशा या वातावरणात स्वत:चा मोकळा विचार करायला वेळ, संधी, इच्छाशक्ती राहत नाही. त्यामुळे मुलं-मोठी माणसं सर्जनशीलतेपासून दूर दूर जातात. आपल्या कामातून, नात्यातूनच काय; पण आपल्या अंतरात्म्यापासून सुद्धा सर्जनशीलता हद्दपार केली जात आहे. एका अर्थानं त्यामुळे वैचारिक स्वातंत्र्यच आपण गमावून बसतोय याची जाणीवही अनेकदा नसते. चाकोरीत नेमून दिलेलं काम विनातक्रार करणारी आज्ञाधारक कष्टकरी माणसं व्यवस्थेच्या फ़ायद्याची असतात. सत्ताधार्यांचे हितसंबंध यातून जोपासले जातात. अशा प्रकारच्या सामाजिक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या चाकोरीबद्ध शिक्षणव्यवस्थेतून तयार होणारी माणसं स्वतंत्र विचारांची निपजत नाहीत. ही त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणार्या कलेला अभ्यासात आणि जगण्यातही महत्त्वाचं स्थान द्यायला हवं.
कलेचा उपयोग अनेक पद्धतीनं शिक्षक करू शकतात. एक- स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी, आकलनासाठी आणि विकासासाठी. दोन – मूल समजावून घेण्यासाठी आणि वर्ग आनंददायी आणि रसपूर्ण बनवण्यासाठी. यासाठी शिक्षकांनी मुलाला केंद्रस्थानी ठेवून नवनवीन कल्पना सुचवायला हव्यात. संपूर्ण मोकळ्या अवकाशात कल्पनांची भरारी मारणं मुलांना कठीण जातं, म्हणून मुलांना सर्जनाच्या दिशेनं जायला मदत होईल, अशी एखादी कल्पना सुचवली तर तो हलकासा धक्का त्यांना कृतिशील बनवण्यासाठी उपयोगी ठरतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र मुलांना ती कल्पना आवडली नाही तर शिक्षकानं उत्स्फूर्तपणे त्यात बदल करून दुसरी कल्पना सांगायला हवी. शिक्षकांनी स्वत:चे अनुभव, भावना, विचार याविषयी मुलांशी मोकळेपणानं बोलावं. हे सर्व जमण्यासाठी शिक्षकाला स्वत:शी संवाद साधण्याकरता अवकाश मिळायला हवा. शांत, ताणरहित वातावरण मिळायला हवं. मोठी माणसं स्वत:च स्वत:चे पालक असतात. त्यांनी स्वत:च्या कार्यक्षेत्रात अशी जागा स्वत:साठी तयार करायला हवी, त्यासाठीचं धैर्य स्वत:मध्ये जोपासायला हवं. सत्यशोधन करणारी, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जोपासणारी कला हे धैर्य आणि त्यातून येणारी निर्भयता आपल्याला प्रदान करते. पालक हा मुलांचा पहिला शिक्षक त्यामुळे हे सर्व पालकांना पण लागू होतं, हे लक्षात ठेवूया.
लहानमुलांसाठी ‘कला’ हा खेळाचाच भाग असतो. त्याला ‘रचनात्मक खेळ’ असं म्हटलं जातं. चित्रकाम, मातीकाम, ठोकळ्यांच्या, खड्यांच्या, काड्यांच्या रचना करणं, घर-घर, शाळा-शाळा, गाडी-गाडी यासारखी कल्पना नाट्य या सार्या गोष्टी खेळ तर आहेतच; पण कलाही आहेत. उत्स्फूर्तता, तरलता, एकाग्रता, स्थळकाळाचं भान नसणं, आनंदानं कष्ट घेण्याची तयारी, निश्चित हेतू मनात नसणं ही सारी खेळातली वैशिष्ट्यं कलेच्या उपक्रमांनाही लागू आहेत. वाढीच्या वयातल्या मुलांसाठी ‘कला’ हा शिकण्याचा आणि संवाद साधण्याचा एक कृतिशील मार्ग आहे. खेळ-कला-संवाद या तीन माध्यमांचा शिकण्यासाठी चांगला उपयोग होतो. या माध्यमांतून काम करताना शरीर, मन, बुद्धी यांचा समन्वय साधला जातो. पण प्रत्येक वेळी त्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. उदाहरणार्थ, खेळताना शरीराचा वापर जास्त असू शकतो. कलेच्या उपक्रमात भावनेवर भर असू शकतो. तर संवादात विचार अधिक सक्रीय असू शकतात. ‘मी स्वत:कडे कसं बघतो/ते हे माझ्या विचारांवर अवलंबून असतं. आणि विचार बदलता येतात. माझ्या मनातील नकारात्मक विचार, नकारात्मक भावनेला जन्म देतात. मी तो विचार बदलला की, भावनाही बदलते.’ लुईस हे यांचा हा विचार प्रत्येकानं सतत मनात तेवत ठेवायला हवा. त्यातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा आपल्याला मिळू शकते. विचार बदलता येतात, हे महत्त्वाचं सूत्र परिवर्तनवादी चळवळींच्या गाभ्याशी असतं.
पुरोगामी विचार हा मुक्ततेचा पुरस्कार करतो. सर्वांगीण स्वातंत्र्याची व्यवस्थेला भीती वाटते. सर्वसामान्य माणसं व्यवस्थेच्या बाजूनं असतात. कारण त्यांना कुणाच्या ना कुणाच्या पंखाखाली सावलीत सुरक्षित वाटतं. भारतीय अध्यात्म व कलासृष्टीसुद्धा शुद्ध, मुक्त, स्वतंत्र विचाराचे असण्याचे आणि त्यानुसार अभ्यासात, व्यासंगात राहण्याचे समर्थन करते. जिथे सर्वांना एकमेकांशी मनापासून, न घाबरता व्यक्त होता येईल, असा समाज पुरोगामी विचाराच्या माणसांना अभिप्रेत आहे. आपल्याला जगाचा अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य हवं असेल तर त्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी पण येते हे सतत अधोरेखित करावं लागतं. पुरुषांनी निर्माण केलेल्या सर्व धर्मांच्या मते जग ईश्वरकेंद्री असतं, आधुनिकतेनं मात्र ते मानवकेंद्री केलं. यातून माणसाला अपरिमित अधिकार मिळाले. चूक-बरोबर, न्याय-अन्याय, खरं-खोटं, सुख-दु:ख, नीती-अनीती सगळी आपण ठरवतो. याची दुसरी बाजू म्हणजे, आपल्या अस्तित्वासाठी उपलब्ध असणारं जग सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे, याचं आंतरिक भान असणं गरजेचं आहे. धर्म नाकारला तरी नीती, सद्सद् विवेक, न्यायाची व समतेची मूल्यं मन:पूर्वक स्वीकारायला हवीत. विविध जीव, प्रजाती, संसाधनं जपत त्यांचं संवर्धन करणारं पर्यावरणाचं भान आपल्याला माणूसकेंद्रिततेच्या पलीकडे घेऊन जातं. तसंच बहुविधता जोपासण्याचं महत्त्व सांगतं.
निसर्गात बहुविधता आहे. तसंच मानवी जीवन प्रवाही ठेवण्यासाठी बहुविध नवनवीन विचारधारा, वाद, प्रयोग अगदी टोकाच्या कल्पना मांडून त्यावर सांगोपांग चर्चा होणं आवश्यक आहे. त्यातून समाज सदैव ताजा-टवटवीत राहील. आज समाजात नवीन, वेगळ्या विचारांना घाबरून, त्यावरून संतापून तो विचार हाणून पाडण्याचे, त्या व्यक्तीला ट्रोल करण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसतात, हे समाजाच्या आजारीपणाचं लक्षण आहे. त्यासाठी अक्सर इलाज म्हणजे धर्मनिरपेक्षता मानणारं, आधुनिक शिक्षण सर्वांना देणं. आधुनिकतेला विज्ञान, बुद्धिनिष्ठा आणि विवेक यांचं अधिष्ठान असतं. आधुनिक जगातल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रचंड सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक शक्ती आहेत. पण कोणत्याही शक्तींची आंधळेपणानं उपासना करणं घातक असतं. या शक्ती लोकाभिमुख झाल्या तर समाजाला तारू शकतील. मात्र लोकविन्मुख झाल्या तर मारक होतील याचं भान ठेवायला हवं. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान मूल्यरहित आहे. त्यांचा उपयोग मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठी होऊ शकतो. तसंच अधिक दु:खी करण्यासाठीही – असा वाईट उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे मानवी परिसराचा नाश. या नाशाचा अभ्यास करणं, हे परिसर विज्ञानाचं कर्तव्य आहे. या कर्तव्यामुळे ते एक क्रांतिकारी विज्ञान बनलं. कारण गेल्या दोन शतकांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे मानवजातीचे डोळे दिपले. वैज्ञानिक निकषांवर जे जे मान्य तेच समाजहिताला उचित आहे. विज्ञानाधिष्ठित आहे, असे आधुनिक तंत्रज्ञान हेच केवळ स्वीकारणीय आहे. बाकी पारंपरिक समजुती या वेडगळपणाच्या अंधश्रद्धा आहेत आणि पारंपरिक तंत्रं मागासलेली म्हणून टाकाऊ अशी मूल्यं मोठ्या प्रमाणावर मान्य झाली. त्याला परिसर विज्ञान आव्हान देतं.
जीवसृष्टी, मानवजाती आणि परिसर यांच्या परस्पर संबंधांविषयीचा अभ्यास करणार्या परिसर विज्ञानाच्या अभ्यासातून काही आधुनिक मूल्यं, तंत्रज्ञान ही परिसराच्या संतुलनाला घातक आहेत, असा निष्कर्ष निघाला. उलट अनेक पारंपरिक तंत्रं ही परिसराच्या दृष्टीनं समर्पक होती, असंही अभ्यासात सिद्ध झालं. मानवजातीच्या हिताच्या दृष्टीनं परिसराचं संतुलन अत्यावश्यक आहे, असं मूल्य मान्य केल्यावर विज्ञानपूर्व काळातल्या सगळ्याच समजुती, तंत्रज्ञान टाकाऊ आणि आधुनिक काळातल्या सर्वच समजुती-तंत्रज्ञान स्वीकारणीय असं सरसकट विधान करणं उचित नाही, हे लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा खूप खोलवर विचार करणं भाग आहे. असा खोलवर विचार करण्याच्या प्रक्रियेत सारा समाज सहभागी करून घेणं निकडीचं आहे. अन्यथा ज्ञानाची मक्तेदारी तयार होते आणि त्यातून समाजातल्या दुर्बल घटकांचं शोषण होतं, हे लक्षात ठेवायला हवं. विज्ञान आपल्या ज्ञानाचं आणि दृष्टीचं क्षितीज अधिक व्यापक करतं. त्यामुळे बौद्धिक उद्धटपणा न येता नम्रता अंगी बाणवायला हवी. चौकस वृत्ती, जिज्ञासा यातून सतत अनेकविध शंकांचे धुमारे फुटायला हवेत. मानवी ज्ञान हे कधीच परिपूर्ण वा अंतिम नसतं. ते सदैव परिवर्तनीय असतं, असं वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचं सर्वाधिक महत्त्वाचं कार्य म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करायला मदत करतो. या जाणीवेच्या स्वातंत्र्यामुळे माणसाचं मन वासनाविकारापासून मुक्त व्हायला मदत होते. आणि दया, क्षमा, करुणा या जाणिवांच्या परिपोषानं मन अधिक समृद्ध होतं. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल ही मानवमुक्तीची वाटचाल आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारलेल्या माणसांच्या मनी-मानसी नम्रता रुजून दया, करुणा, क्षमावृत्ती वाढली आहे का? की उलट वैज्ञानिक दृष्टिकोन नसणार्यांच्या प्रती तुच्छभाव वाढीला लागून अहंगड वाढला आहे. याची ज्याने त्याने प्रामाणिकपणे आत्मचिकित्सा करणं गरजेचं आहे.
भारतीय घटनेतल्या नागरिकांच्या कर्तव्याच्या यादीत प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि समाजसुधारणेचं तत्त्व यांचा अंगिकार करेल, असं म्हटलं आहे. स्त्री ही पुरुषासारखीच स्वतंत्र भारताची नागरिक आहे हे आज स्त्री-पुरुष दोघांच्याही मनात पक्क रुजलेलं नाही. ते शिक्षणाच्या माध्यमातून सांगण्याची नितांत गरज आहे. समाजसुधारणांचा उद्देश विवेक आणि बुद्धिनिष्ठेवर आधारलेला समाज निर्माण करणं आणि व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वहित परायणता नव्हे तर व्यापक समाजहिताचा विचार करत मानसिक-भावनिक गुलामगिरीतून स्वत: बरोबर समाजालाही मुक्त करणं.
बुद्धीनिष्ठा म्हणजे स्वत:च्या बुद्धीमत्तेचा टेंभा मिरवणं नव्हे हेही लक्षात ठेवूया. काही माणसं हुशार तर काही ढ-मठ्ठ असतात, असा सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांचा समज असतो. मात्र आता हॉवर्ड गार्डनरचा बहुविध बुद्धीमत्तेचा सिद्धान्त बर्यापैकी मान्य होताना दिसतो. या सिद्धान्तानुसार बुद्धीमत्तेचे आठ प्रकार आहेत. सांगीतिक प्रज्ञा, शारीरिक कौशल्य प्रज्ञा, तार्किक गणिती प्रज्ञा, भाषिक प्रज्ञा, अवकाशीय प्रज्ञा, मानवी नातेसंबंधातली प्रज्ञा, स्वत:ला जाणण्याची प्रज्ञा आणि निसर्गाला जाणण्याची प्रज्ञा. सर्वसामान्यपणे आठपैकी कोणत्याही दोन किंवा तीन बुद्धीमत्ता प्रत्येकात असतात. ज्या प्रकारचे अनुभव मुलांना वारंवार मिळतात त्या प्रज्ञांचा विकास होतो. स्वत:च्या भावनांशी-अनुभवांशी जोडून घेण्याची व्यक्त होण्याची संधी मुलांना सतत घरीदारी मिळायला हवी. त्यामुळे त्यांच्या आकलनाला आकार यायला मदत होईल. अर्थात, मोठ्या माणसांनी पण हे करत राहायला हवं. त्यासाठी शिक्षणही आयुष्यभराची सततची प्रक्रिया आहे हे मनात पक्कं ठसवायला हवं. यातून ‘मला सर्व कळतं’ हा अभिनिवेश गळून पडून संवादात मार्दव यायला मदत होईल.
१९९० च्या जागतिकीकरणानंतर माणसांचं मानसिक, भावनिक, भौतिक व सामाजिक-सांस्कृतिक जीवन एका मोठ्या आवर्तात सापडून घुसळून निघालं आहे. वैयक्तिक, कौटुंबिक ताणांबरोबरच समाजमानसावरही ताण वाढतोच आहे. याला अनेक कारणं आहेत. उदाहरणार्थ, असुरक्षितता, तीव्र गळेकापू स्पर्धा, वेगवान जीवन, गर्दीतलं एकटेपण, तुटत चाललेले नातेसंबंध, सुसंवादाचा- कुटुंबात आणि बाहेरही असणारा अभाव इ.इ. पालकांवर प्रदीर्घ काळ अवलंबून असल्यामुळे मुलांचा पालकांबरोबरचा विसंवाद वाढतो आहे. २४x७ अव्याहतपणे चालू असणार्या दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्यांवरच्या बटबटीत, भडक, हिंसा, द्वेष, मत्सर पसरवणार्या मालिका, तशाच पद्धतीच्या मनोरंजनात्मक बातम्या, तथाकथित वैचारिक चर्चा-परिसंवाद हे सगळं उबग आणणारं आहे. तरीही पर्याय नाही असं म्हणत आपण ते बघतच राहतो. या सर्व घटकांमुळे माणसाचा विवेक हरवत चाललाय आणि सुसंस्कृत-सभ्यता लोप पावते आहे का? असा भयावह प्रश्न माझ्याप्रमाणेच आपल्याही मनात येतोय ना? ‘हरवत चाललेला विवेक’ शोधायला आणि लोप पावत चाललेल्या सुसंस्कृत सभ्यतेला पुन्हा प्रतिष्ठापित करायला आपण सर्वांनी ‘जागल्याची’ भूमिका घ्यायला हवी. यात ‘मिसा Online’ मासिक आणि ‘मिळून सार्याजणी’ मुद्रित मासिक सदैव आपल्याला सोबत करेल. त्यासाठी ‘ती’ ‘तो’ आणि त्या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्यानं संवाद आपुलकीनं होत राहण्याची गरज आहे, खरं ना? यात शिक्षणाची भूमिका अनन्यसाधारण आहे. म्हणून नवीन शिक्षण धोरणाविषयी अतिशय चिकित्सक व सजग राहण्याची गरज आहे.
५ सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन असतो. बारा महिने वाईट वागवायचं, राबवून घ्यायचं, अवहेलना करायची आणि एक दिवस बैल पोळ्याप्रमाणे सजवून-धजवून, गोडधोड खायला घालून साजरं करायचा. हे बरोबर नाही, असा आक्षेप काही जण घेतात. जातीयवादी, वर्चस्ववादी असणारे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याला अनेकांचा तीव्र विरोध आहे. मुक्तीदायी शिक्षण शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना देण्यासाठी आयुष्य वेचलेल्या म. जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणदिनी शिक्षक दिन असावा, अशी जोरकस मागणी करणार्या सर्व परिवर्तनवादी संघटनांसोबत ‘मिळून सार्याजणी’ आणि मिसा Online मासिक आहेतच. मात्र इतके वर्ष रूढ झालेल्या ५ सप्टेंबर या दिवशीही शिक्षकांचे प्रश्न समजून घेत त्यांचा आदर करावा असं ‘सार्याजणी’चं धोरण आहे. यातून शिक्षक या समाजघडणीत अतिशय मोलाचं योगदान देणार्या घटकाची वर्षातून दोनदा दखल घेतली जाईल, अशी या मागची भूमिका आहे.
शिक्षक म्हणजे शाळा-महाविद्यालयात शिकवते ती व्यक्तीच नव्हे तर समाजात परिवर्तनासाठी ज्ञाननिर्मिती, रचना आणि संघर्ष करणार्या सर्व व्यक्ती! आपल्या देशातल्या लोकशाही आणि राज्यघटनेतल्या मूल्यांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याविरोधात आवाज उठवण्यासाठी विविध लोकशाहीवादी गटातर्फे ५ सप्टेंबरला ‘#हमअगरउठेनहींतो’, ‘#IfWeDoNotRise’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यात आपण सर्व सामील होऊन आपली ‘जागल्या’ची भूमिका सक्रीयपणे निभावूया ना?
५ सप्टेंबर हा सत्यान्वेषी आणि धाडसी पत्रकार गौरी लंकेश हिचा जन्मदिवस! यानिमित्तानं लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रबोधन, संघर्ष, रचना करत हौतात्म्य पत्करलेल्या गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!
स्नेहांकित,
गीताली वि. मं.
२६.८.२०२०