40/1/B Bhonde Colony, Karve Road, Pune 411004
Off - +91 20 25433207   Res - +91 20 25652324 saryajani@gmail.com

थेरीगाथांमधील बौद्ध स्त्रीदर्शन

भारतीय संस्कृती ही एक संपन्न संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध धर्म, पंथ, तत्त्वज्ञान आणि विचारांनी या संस्कृतीला वैविध्यपूर्ण केलेले आहे. त्यामुळेच या संस्कृतीमध्ये आपल्याला जीवनाकडे तसेच बाह्य जगाकडे बघण्याचेही विविध दृष्टिकोन दिसतात. अशा या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये स्त्रियांकडे बघण्याचे दृष्टिकोनही भिन्न भित्र आहेत. हिंदू, जैन, बौद्ध आदी धर्म जरी वैदिक धर्माच्या एक मुशीतून तयार झालेले असले तरी त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. आजपर्यंत ही भिन्नता कोणी लक्षात घेतलेली आहे, असे दिसून येत नाही. द्रौपदी, सीता आदी पंचकन्यांच्या मानदंडातूनच भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान जोखले गेले. भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणूनच त्यांच्याकडे बघितले गेले. या स्त्रिया कितीही तेजस्वी, अलौकिक असल्या तरी त्यांच्याभोवती एक तर राजघराण्याचे तेजोवलय होते किंवा ऋषी-मुनींच्या साधेपणाचे बौद्धिक वलय होते. या पार्श्वभूमीवर समाजातील सामान्य स्त्रियांचे नेमके स्थान, त्यांचे व्यक्तिमत्त्व काय होते याचे उत्तर अनुत्तरितच राहाते जे आपल्याला बौद्ध धर्मग्रंथांमधील ‘थेरीगाथा’ च्या आधारे मिळते. या आधारे समाजातील सामान्य सियांच्या व्यक्तिमत्त्वावरच प्रकाश पडतो असे नाही तर एकूणच गौतम बुद्धांचा आणि बौद्ध धर्माचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे समजते.

बौद्ध ग्रंथवाङ्मयातील ‘थेरीगाथा’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. बौद्धसंघामध्ये प्रवेश केलेल्या स्त्रियांना थेरी किंवा भिक्षुणी म्हणतात. या भिक्षुणींनी आपल्या पूर्वायुष्यात आलेल्या अनुभवांचे कथन या थेरीगाथांमध्ये केलेले आहे. अशा बऱ्याच थेरीगाथा आहेत. परंत लेखाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यातील प्रातिनिधिक स्त्रियांचाच समावेश प्रस्तुत लेखात केलेला आहे.

वास्तविक बौद्धसंघामध्ये प्रवेश केलेल्या बहुतेक स्त्रिया ह्या सामान्य घरातून आलेल्या आहेत. त्या जशा वादविवादपटू किंवा पंडिता नव्हत्या तसेच त्यांना राजघराण्याचे वलयही नव्हते. तरीसुद्धा त्यांच्यामध्ये अशा काही शक्ती आणि सामर्थ्य होते की ज्याच्या बळावर त्यांनी स्वतःवरील संकटांवर मात करून स्वत.ला तर सावरलेच पण मोठमोठ्या विद्वानांनाही ज्या संसाराचा मोह पड़तो तो दूर करून निर्वाण पाप्त केले. म्हाणूनच या सामान्य वाटणाच्या स्त्रियांच्या असामान्य कामगिरीचा परिचय करून घेणे महत्त्वाचे आहे.

थेरीगाथांमधील स्त्रिया या सामान्य घरातील असल्यामुळेच त्यांचे दुःख, त्यांचे अनुभव आपल्याला जवळचे वाटतात. ‘पटाचारा’ या भिक्षुणीच्या जीवनातील अनुभव तर काळजाला हात घालणारा आहे. आपल्या प्रियकरासाठी आईवडिलांचे घर सोडून गेलेल्या पटाचाराला काही काळाने आपल्या माहेरची ओढ लागते. माहेरी येत असताना वाटेतच तिला आपल्या पतीच्या आणि दोन मुलांच्या मृत्यूला सामोरे जावे लागते. मृत्यू हीच मुळी नको वाटणारी घटना आणि त्यातही आपल्या प्रिय व्यक्तींचा मृत्यू. तिचे मन सैरभैर झाले नाही तरच नवल. ती अगदी वेडीपिशी होते. तिला देहाचे भान राहात नाही की वस्त्राचे. अशाच अवस्थेत भटकत असताना गौतमबुद्ध जेथे प्रवचन करीत असतात तेथे ती येते. भगवंताचे ‘भगिनी शांत हो!’ हे शब्द तिच्या कानी पडतात. भगवंतांच्या या शब्दांमध्ये काय जादू होती? त्यात करुणा होती, करुणा म्हणजे निव्वळ सहानुभूती नाही. सहानुभूतीमध्ये दुसऱ्याचे दुःख पाहून वाईट वाटणे एवढीच भावना असते. करुणेमध्ये दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःला वाईट वाटणे एवढेच अभिप्रेत नसते तर त्याच्या दुःखात सहभागी होऊन त्या व्यक्तीचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच करुणा ही सहानभूतीच्या वरची पायरी आहे. या करुणेचे वैशिष्ट्य म्हणजे ती उपेक्षा या भावनेबरोबर असते. उपेक्षा म्हणजे तटस्थता. तटस्थता म्हणजे भावनाशून्यता नाही तर कोणत्याही सुखद किंवा दुःखद घटनेचा अनुभव घेत असताना वाहावत न जाणे, वाहावत गेलो तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कसा सापडायचा? म्हणूनच करुणेमध्ये जरी सहदुःखाचा अनुभव असला तरी तिच्याबरोबर उपेक्षा असल्यामुळे दु:खात बुडून न जाता त्या व्यक्तीला मदत करण्याची भावना असते.

बुद्धांच्या ‘भगिनी शांत हो!’ या वाक्यात हीच भावना होती. म्हणूनच त्यांच्या या आश्वासक वाक्याने तिला धीर आला. तिचे उद्ध्वस्त होऊ पाहणारे जीवन बुद्धांनी सावरले. त्यामुळेच तिला स्वत:मधील शक्तींची जाणीव झाली आणि स्वत:वरील संकट सहज पार करूनही दुःख निवृत्त होऊ शकली.

यावरून आपल्याला काय दिसते, तर स्त्री ही संवेदनशील असते, पती, मुले हाच तिचा संसार असतो. हा संसार उद्ध्वस्त झाल्यावर ती सैरभैर होणे स्वाभाविकच असते. परंतु उद्ध्वस्त संसाराची वास्तविकता स्वीकारण्यासाठी लागणारे मनोधैर्य आणि त्याचे ज्ञान होण्यासाठी लागणारी बुद्धीची प्रगल्भताही तिच्यात असते म्हणूनच पटाचाराच्या रूपाने एकीकडे भावनाप्रधान, संवेदनशील स्त्री तर दुसरीकडे ज्ञानी आणि विचारी स्त्री असे स्त्रीच्या दोन रूपांचे दर्शन आपल्याला होते.

जी कहाणी पटाचाराची तीच कहाणी गौतमी कृशाची. आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या निधनाने ती अगदी वेडीपिशी होते. तो पुन्हा जिवंत व्हावा म्हणून वाटेल ते करण्यास ती तयार असते. बुद्धाच्या आशीर्वादाने आपला पुत्र पुन्हा जिवंत होईल या वेडया आशेने तो गौतमांकडे येते. बुद्धही तिला नाराज करीत नाहीत. तिच्या मृत मुलाला औषध द्यायला तयार होतात. फक्त अट घालतात, की ज्या घरात पूर्वी कधीही मृत्यू झाला नाही अशा घरातून मोहऱ्या आणून द्यायच्या. जितकी साधी तितकीच अवघड अट. जीवनात मन ही एक सत्य आणि अनिवार्य घटना आहे. मुलाच्या मृत्यूने सैरभैर झालेल्या कृशा गौतमीला हे सत्य समजणे तर सोडाच, पण स्वीकारणेही अवघड होते. म्हणूनच ती दारोदार फिरते; पण मृत्यू न झालेले घर तिला सापडत नाही. आणि मग तिचेच तिला उमगते की मृत्यू अनिवार्य आहे. ती पुन्हा गौतमांकडे येते आणि हसते. गौतमही हसतात. काय असते त्या ‘हसण्यात’? अशाश्वताला शाश्वत समजण्यात आपण किती वेडेपणा करीत होतो है गौतमीला समजते आणि म्हणून आपल्या वेडेपणालाच ती हसते. अनुभवातून आणि आत्मपरीक्षणातून गौतमी स्वत:मधील ज्ञानशक्ती जागृत करते. भावनेवर विचारांनी विजय मिळविते.

गौतमी कृशाच्या रूपाने आपल्याला स्त्रीच्या रूपाचा आणखीन एक पैलू दिसतो. तो म्हणजे स्त्रिया या स्वयंज्ञानी असतात. त्यांना ज्ञानाचा मार्ग दिसला की त्या आपले ज्ञान आपणच मिळवितात. त्यासाठी त्यांना कोणाशी वादविवाद, चर्चा कराव्या लागत नाहीत की ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून गुरूच्या गृही रहावे लागत नाही. अनुभव आणि आत्मपरीक्षण हेच त्यांचे गुरू असतात. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला वेदाध्ययनापासून वंचित केले होते. आपल्या ज्ञानाची भूक त्यांना केवळ पुराणांवरच भागवावी लागत असे. परंतु कृशा गौतमीने वेदाध्ययन न करताच अनुभवातून आणि स्व-विचारातून ज्ञान प्राप्त करून वेदाध्ययन हेच केवळ ज्ञान असते या विचाराला छेद दिला. कृशा गौतमीसारख्या सामान्य वाटणाऱ्या स्त्रियांमध्ये किती असामान्य गुण असतात हे या उदाहरणावरून दिसून येते.

माणसाच्या हातून चुका होतातच. तरुणपणी तर त्या अधिकच होतात, म्हणून चुका करणारा नेहमीच गुन्हेगार असतो? त्याला क्षमा करून चुका सुधारायची संधी नाही द्यायची? जरूर द्यायला पाहिजे – मग ती स्त्री असो वा पुरुष, परंतु स्त्रीला अशी क्षमा भारतीय संस्कृतीमध्ये बुद्धकाळापूर्वी कोणी केलेली आहे असे दिसून येत नाही. उलट तरुण वयात स्त्रीचा कृतहलादाखल जरी पाय घसरला तरी तिला समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत असे. वास्तविक स्त्री ही देखील एक मनुष्यप्राणी आहे. तिलाही भावभावना असू शकतात याचे भानच जणू काही समाजाला नव्हते. अशा भानरहित समाजाला सडेतोड उत्तर जर कोणी दिले असेल तर कुण्डलकेसा या तरुण भिक्षुणीने. कुण्डलकेसा ही थेरीगाथेमधील एक तेजस्वी तरुण भिक्षुणी आहे. भिक्षुणी होण्यापूर्वी एका चोरावर भाळून ती त्याला आपले सर्वस्व द्यायला तयार होते. त्याच्यासाठी घरची संपत्ती घेऊन ती आपल्या वडिलांचे घरदार सोडते, पण किती केले तरी तो चोरच! तो आपले मन तिच्याजवळ उघड करतो. आपण तिच्यावर नाही तर तिच्या संपत्तीवर प्रेम केल्याचे कबूल करतो. त्याचक्षणी तिचे डोळे उघडतात, आपण फसवले गेल्याचे अतीव दुःख तिला होते. त्याचवेळी आपला विश्वासघात करणाऱ्या चोराचा बळी घेण्याचेही ती ठरविते आणि आलिंगन देण्याचे निमित्त करून त्याला दरीत ढकलून देते. आता पुढे काय? कुण्डलकेसापुढे मोठा प्रश्न पडतो. कारण एकदा स्त्रीने मातापित्याचे घर सोडले की ते घर तिच्यासाठी कायमचे बंद असते. आपल्या प्रियकराने धोका दिल्यावर ती मात्यापित्याकडे जात नाही किंवा आत्महत्या करण्याचा भ्याडपणाही करीत नाही. या विश्वासघातामुळे तिला मानवी स्वभावाचे ज्ञान होऊन एकूणच विरक्ती आलेली असते. म्हणून ती बौद्धसंघात जाते. संघात गेल्यावर यथार्थज्ञान प्राप्त करून ती ‘अर्हत’ पद मिळविते. अशी ही कुण्डलकेसा. तिच्या रुपाने स्त्रीची विविध रूपे आपल्यासमोर येतात. प्रेमासाठी आत्मसमर्पण करणारी स्त्री, विश्वासघाताने आपला बळी जातोय हे आपला मार्ग आपणच शोधणारी स्त्री. इथे अर्थातच विश्वासघातक्याचाही ‘जीव’ घेणं हा गुन्हा आहे आणि तो निंदनीय आहे हे लक्षात घेऊनही बौद्ध काळातल्या या घटनेकडे तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करत बघितले पाहिजे. जीवनात येणाऱ्या प्रसंगांना मोठ्या धैर्याने आणि शौर्याने तोंड देत स्वत:चा विकास करणाऱ्या स्त्रीचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला कुण्डलकेसाच्या रूपाने पाहायला मिळतो.

सौंदर्य हे स्त्रीसाठी कधी कधी शापही ठरते. द्रौपदी, सीतेसारख्या असामान्य तेज असणाऱ्या स्त्रिया आपल्या अद्वितीय सौंदर्यामुळे जिथे सतत होरपळत राहिल्या, तिथे सामान्य घरातील सौंदर्यवती स्त्रियांविषयी काय बोलायचे? समाजाच्या विखारी नजरांपासून आपल्या सौंदर्यवती मुलींना कसे वाचवायचे, हा प्रश्न त्यांच्या मात्यापित्यांसमोर असणारच. अशाच मात्यापित्यांपैकी एक म्हणजे उप्पलवण्णाचे मातापिता. उप्पलवण्णा अतिशय लावण्यवती आणि विरक्त मनाची होती. वयात आल्यावर अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. विखारी नजरांपासून आपल्या मुलीचं संरक्षण कसे करायचे याची चिंता तिच्या मातापित्याला लागली. पित्याने उप्पलवण्णाला आपल्या मनाची व्यथा सांगून भिक्षुणी होण्याविषयी सुचविले. आपल्या मनासारखे झाले म्हणून उप्पलवण्णाही आनंदाने भिक्षुणी झाली. ज्या वयात भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीेने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा त्या वयात तिने संन्यासाश्रमामध्ये प्रवेश करून निर्वाण प्राप्त करून घेतले. उप्पलवण्ण्णाचे हे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्त्रिया या विषयासक्त असतात, त्यांना अध्यात्मातील काही समजत नाही; या भारतीय संस्कृतीमधील विचाराला भारतीय संस्कृतीमध्येच मिळालेले हे सडेतोड समर्पक उत्तर आहे.

आदर्श पत्नी म्हणून सीतेचा परिचय आपल्या सर्वांनाच आहे. वनवासामध्ये पतीच्या बरोबर सावलीप्रमाणे राहून तिने हालअपेष्टा सहन केल्या. सीता एका बाबतीत सुदैवी आहे की या हालअपेष्टा सहन करीत असताना काही काळ का होईना, तिला आपल्या पतीचा सहवास मिळाला. पण पतीचा सहवास मिळत नसतानाही त्याच्या कार्याला साथ देणाऱ्या स्त्रिया आपल्या संस्कृतीमध्ये काही कमी नाहीत. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे कच्चाना भिक्षुणी, कच्चाना म्हणजे गौतमाची पत्नी यशोधरा. गौतम बुद्धांनी परमसत्याचा शोध घण्यासाठी कडक तपश्चर्या केली, उपासतापास केले. आपल्या पतीवर नितांत प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा असणाऱ्या यशोधरेनेही राजवाड्यात राहूनही राजसुखाचा त्याग केला. तिचा हा संयम नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. पायाशी राजसुखे लोळण घेत असताना त्यांचा उपभोग घेणे तर सोडाच, पण त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहण्याचा संयम तिने दाखविला.

आपल्या पतीला परमसुखाचा अनुभव आल्यावर तरी तो संसार करेल ही आशा मावळल्यावर निराश न होता तिने सुद्धा बौद्ध संघात प्रवेश करून निरासक्त संन्यासी जीवन जगण्यास सुरुवात केली. म्हणूनच तिचा गौरव गौतम बुद्धांनी पुढीलप्रमाणे केलेला आहे. ‘उपकार करणारी, सुखदुःखामध्ये समानतेने वागणारी, सदर्थ दाखविणारी व अनुकंपा करणारी अशी जी, तीच खरी नारी.’ पतीने आपल्या पत्नीबद्दल असे उदगार काढणारी ही घटना इतिहासात कदाचित प्रथमच घडली असेल!

भारतीय समाजरचनेमध्ये व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व दिले गेले होते. तसेच या समाजरचनेत व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या आयुर्मानानुसार बदलत जातो हे गृहीत घरले होते. म्हणूनच व्यक्तीने जीवनाच्या कोणत्या कालखंडात काय करावे हे आश्रमव्यवस्थेच्या द्वारा ठरत होते. येथेच व्यक्तीवर अन्याय केला जात होता. आयुर्मानाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनाची विभागणी करणे हे कितीही सुसंगत वाटले तरी ते व्यक्तीच्या स्वभावाशी सुसंगत असतेच असे नाही. काही व्यक्ती या स्वभावत:च निरासक्त असतात तर काही कामयुक्त असतात. त्यामुळेच व्यक्तीच्या आयुर्मानानुसार आश्रमांमध्ये प्रवेश करावा असे सांगण्याऐवजी व्यक्तीच्या स्वभावानुसार करावा असे म्हटले पाहिजे.

‘थेरीगाथां’च्या आधारे आपण स्त्री-व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की त्यांनी संकटांवर मात करण्याचा प्रयत्न तर जरूर केलाच; पण काही प्रमाणात तत्कालीन समाजात अस्तित्वात असणाऱ्या रूढी परंपरांनाही शह देण्याचा प्रयत्न केला. पुरुषार्थ, आश्रमव्यवस्था आणि वर्णव्यवस्था यांच्यावर आधारलेली भारतीय समाजरचना अनेक दृष्टींनी आदर्श मानली गेली असली तरी स्त्री-स्वातंत्र्याच्या संदर्भात ती तशी आहे असे म्हणता येत नाही. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थपिकी ‘अर्थ’ या पुरुषार्थामध्ये तिला दिले गेलेले मर्यादित स्थान आणि तिला नाकारला गेलेला मोक्ष हा पुरुषार्थ. या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा थेरीगाथांच्या आधारे ‘बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान’ यामधील स्त्रियांच्या स्थानाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असे दिसते की गौतम बुद्ध हे असे एक विचारवंत होते की ज्यांनी स्त्रियांना आपल्या संघामध्ये प्रवेश देऊन त्यांच्यासाठी ज्ञानाचे आणि मोक्षाचे द्वार खुले केले. बौद्ध उपासिकादेखील स्वत:चे आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेत असत. त्यामुळेच बौद्धदर्शनामध्ये दिसणाऱ्या स्त्री-व्यक्तिरेखा या स्वतंत्र विचार असलेल्या धाडसी आणि तेजस्वी आहेत.

टीप : भारतीय स्त्रीकाव्याची प्राचीनतम परंपरा पाली भाषेतील ‘थेरीगाथे’पर्यंत जाऊन पोहोचते.  इ.स.पूर्व सहाव्या शतकातील काही बौद्ध भिक्षुणींच्या रचना यात समाविष्ट केल्या आहेत.

 

डॉ. लता छत्रे

(मिळून साऱ्याजणी, जानेवारी २००२)