९ ऑगस्ट १९८९ रोजी ‘मिळून सार्याजणी’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसं स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात, समाजात अन्याय होतो आहे, त्या अन्यायाला वाचा फोडायला हवी, या हेतूनं महाराष्ट्रातील स्त्री चळवळीत अग्रेसर असणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हे मासिक सुरू केलं. नावातून सहकार, बांधिलकी आणि मैत्रभाव ध्वनित होणारं हे मासिक सामाजिक आहे, तसंच साहित्यिकही. विविध सामाजिक प्रश्नांचं विश्लेषण करणाऱ्या लेखनाबरोबरच कथा, कविता, ललित लेख आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून जीवनाचा अर्थ शोधताना आलेल्या आणि घेतलेल्या अनुभवांची आत्मकथनं – हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवणारा एक जिवंत झरा तुम्हांला या मासिकात भेटेल.
भाषेचं संस्कृतीशी/परंपरेशी नाळेचं नातं असतं. ‘सारेजण’ म्हटलं तर त्यात ‘सार्याजणी’ आल्या हे गृहीत असतं, मात्र उलट ‘सार्याजणी’त सारेजण गृहीत नाहीत. शब्दातला हा लिंगविशिष्ट भेदाभेद पार करण्यासाठी मासिकाच्या नावात ‘मिळून सार्याजणी’ आणि प्रत्यक्षात ‘सारेजणां’ना निमंत्रण आणि स्वागतही! जो पुरुष प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीचा हात हातात घेत तिची साथ स्वीकारेल तोच खरा ‘जागा’ पुरुष म्हणायला हवा, असं ‘सार्याजणी’ मानतं. आजवर अनेकानेक विषयांवर पुरुषांची अनुभवकथनं सार्याजणीनं प्रकाशित केली आहेत. लेखक, वाचक, हितचिंतक, संपादक म्हणूनही पुरुषांचा सहभाग उल्लेखनीय आहे. स्त्री-पुरुषांनी आणि अन्य लिंगभाव असणाऱ्या व्यक्तींनी ‘मानव मुक्ती’साठी प्रसंगी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करत एकत्र वाटचाल करायची आहे अशी ‘सार्याजणी’ची भूमिका आहे. आजवर भिन्नलिंगी संबंध असणारे स्त्री आणि पुरुष म्हणजे 'माणसं' असं मानून उरलेल्यांना 'इतर' समजून वगळलं जात होतं. आता मात्र LGBTIQ चळवळ 'आमची समलैंगिकता व वेगळी लैंगिक ओळख स्वीकारली जावी आणि आम्हाला आमचे अधिकार मिळावेत', अशी रास्त मागणी करते आहे. या चळवळीला साऱ्याजणी आपलं मानते. मुखपृष्ठावरील 'तो' आणि 'ती' या पलीकडचे सर्व 'ते' यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी - ही ओळ या आपुलकीचं द्योतक आहे.
गेल्या एकतीस वर्षांच्या वाटचालीत 'मिळून साऱ्याजणी'ने मराठी वैचारिक-सांस्कृतिक विश्वात आणि सामाजिक चळवळींच्या अवकाशात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक जणांना लिहितं आणि बोलतं केलं आहे. सध्याच्या अस्वस्थ सामाजिक-राजकीय पर्यावरणात तरुण मनांना योग्य दिशा मिळावी या हेतूने 'यूथ कनेक्ट' हा उपक्रम सुरु केला आहे. या मासिकाच्या पाठीशी कुण्या एका व्यक्तीची किंवा संस्थेची एकरकमी ताकद उभी नाही. आपण सर्वांनी मिळून ती उभी करायची आहे, वाचक, लेखक, संपादक यांच्यात एक नवं नातं निर्माण व्हावं, या नात्यातून आपुलकीचं, अधिकाराचं, जबाबदारीचं भान निर्माण व्हावं आणि त्यातूनच ‘मिळून साऱ्याजणी’ हे नाव सार्थ व्हावं! पाण्यावरचा वर्तुळाकार तरंग पसरत मोठा होत होत एवढा मोठा होतो की शेवटी त्या पाण्याचाच एक भाग बनतो. तुम्ही, तुमचं वर्तुळ, त्या वर्तुळातल्यांचं वर्तुळ असं करत करत मूळ धरीत जाणारं हे मासिक. या मासिकासाठी तुम्ही विविध प्रकारे हातभार लावू शकाल. त्याबाबत तुमच्याशी बोलायला आम्ही उत्सुक आहोत!
धन्यवाद,
गीताली वि. मं.
संपादक, मिळून सार्याजणी