हर(वि)लेली विराणी

प्रतिमा अग्निहोत्री साहित्य
०२ मे २०२५

अवघे चाळीशीतले तिचे वयमान. पण विश्वाचे सारे आर्त कोंदाटते तिच्या शब्दांक्षरी. 'व्हीलचेअर डान्सिंग' या तिच्या गाजलेल्या कवितेत ही नोबेल पारितोषिक विजेती सादर करते अस्तित्वाचा अथांग डोह. 'अश्रूंची आता होऊन गेलीय सवय/पण नाही गिळंकृत तरी मी/दु:स्वप्नांचीही आता झालीय आदत/जागून काढलेली रात्र/शरीरभर साऱ्या धमन्या जाळणारी/नाही करू शकत भक्षण माझे/पहा. माझे नृत्य/झगमगते व्हीलचेअर वर/माझे खांदे डोलणारे/उत्कटतेने/माझ्या कडे ना कुठली जादू/ना कसली गुप्त रीती/फक्त इतकेच की/ काहीच नाही करू शकत/मला पूर्णपणे उद्ध्वस्त.

सुदूरशा पूर्व आशियाई देशातून स्त्रीत्वाची ही अशी अभंग कहाणी सादर करणाऱ्या या लेखिकेचे नाव आहे हान कांग. ती मूळची दक्षिण कोरियातली. 'के पॉप' या तरुणाईला झपाटून टाकणाऱ्या नृत्य प्रकाराचे उगमस्थान इतपतच सर्वसामान्यत: माहीत असणारा हा देश. पण हान कांग (जन्म २७ नोव्हेंबर १९७०) तिथल्या व्यथात जगभरच्या स्त्रीपणाची गोची अशी गुंफते की नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली कोरियन आणि पहिली आशियाई लेखिका हे किताब तिच्या लेखी जमा होऊन जातात.

हान कांग तशी भारंभार लिहिणारी लेखिका नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने कविता हा साहित्य प्रकार हाताळला जरूर. पण लवकरच कथा, कादंबरी आपले बलस्थान आहेत हे तिला उमगले. मूळची ती ग्वांगजू परगण्यातली. पण तिथे झालेल्या राजकीय - सामाजिक उठावामुळे कांग कुटुंब सोल या राजधानीत स्थलांतरित झाले. तिचे वडील शिक्षक होते, आणि फारसे प्रस्थापित होऊ न शकलेले नाटककार. त्यामुळे पुस्तकांची साथ हेच तिचं सच्चे मैत्र होते. 

योनसेई विद्यापीठातून कोरियन साहित्य या विषयात तिने पदवी प्राप्त केली. लिखाण करता करता तिने सोल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्समध्ये,'क्रिएटिव राईटिंग'ची प्राध्यापिका म्हणून काम (२००७ ते २०१८) केले. ती राजकीय दृष्ट्या सजग लेखिका आहे. यून सुक येऊल या अगदी २०२५ पर्यंत राष्ट्राध्यक्ष असलेल्या नेत्याने काहीही सबळ कारण नसताना आणीबाणी सदृष्य परिस्थिती देशावर लादली. परिणामतः त्याच्या विरुद्ध अभियोग स्थापन झाला. आरोप सिद्ध झाल्याने 'मूल्याधिष्ठित अस्तित्वाचे, स्वातंत्र्याचे, अभिव्यक्तीचे कधीही तडजोड न होऊ शकणारे' वातावरण अबाधित राखण्यासाठी येऊलवर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे यासाठी आग्रही असणाऱ्या बुद्धीवादी वर्तुळात तिचा समावेश होतो.

थोडक्यात, स्थानिक व्यथांत वैश्विक गाऱ्हाण्यांची कथा कांग पेश करते. कांग सो चिऑन, हाए साँग मा यासारख्या कोरियन, अस्ट्रिड लिंडग्रेन सारख्या स्वीडिश बालसाहित्यकारानी तिला प्रभावित केले. पण तिला झपाटून टाकले दोस्तोव्स्की आणि पास्तरनाक यांच्या लिखाणाने. 

जगण्यातली अटळ अनाम उदासी तिच्या काहीश्या अस्तित्ववादी लिखाणात झाकोळून येते. २०११ साली प्रसिद्ध झालेल्या 'ग्रीक लेसन्स'मध्ये सापडावी दुःखाची असोशी आणि भाषाविष्कारावर पडणारी त्याची अटळ सावली. या लिखिताचे न+नायक आहेत हळुहळू दृष्टी गमावणारा एक पुरुष आणि हळूहळू संवादाची शक्यता हरवणारी एक बाई.

बाईपणातले भारीपण उकलते 'द व्हाईट बुक' या तिच्या काहीशा आत्मचरित्रात्मक स्मरणरंजनात. इंटरनॅशनल बुकर पारितोषिकाच्या अंतिम फेरीत पोचलेल्या या छोटेखानी कादंबरिकेत एका तरुण विद्यार्थिनीला आठवतेय तिची मोठी बहीण. जन्माला आल्यावर दोनेक तासात मृत पावलेली. या गोठलेल्या दुःखाने तिच्या कुटुंबाला वेढलेय, आईला घेरलेय. दूर पोलंड मध्ये दुसऱ्या महायुद्धाने होरपळलेल्या वॉर्सा शहरात स्वतःचे एकाकीपण उमगून घेताना ती उमजून घेतेय ते मरण आणि तिच्या आईची मातृत्वातली आस. अत्यंत तरल असलेल्या या भावविभोर कथनात अनेक पातळ्यांवरच्या अनाम पण ठसठसत राहणाऱ्या वेदना व्यक्त होतात पांढऱ्या रंगाच्या वस्तूविशेषातून. ज्यात आहेत नेहमीचे पाचवीलाच पुजलेले तांदूळ, साखर. भुरभरणारे बर्फ. आणि, हो, न आवरणारे स्तन्य. आणि छोट्याशा शवाला गुंडाळलेले शुभ्र पांढरे वस्त्र. Stream of consciousness (चेतनेचा अंत:प्रवाह) पद्धती ने उलगडत जाणारी ही कादंबरीका स्त्रीत्व फार आतून उकलत राहते. 

पण स्त्रीपणाच्या साऱ्या दुखऱ्या नसा आणि त्यांची अनादी अनंत ठसठस खरी उलगडते कांगच्या 'द व्हेजिटेरियन' या अतिशय उत्कट कादंबरीत. २०१६ साली 'मॅन बुकर' पारितोषिक प्राप्त झालेल्या ह्या कादंबरीचे बीज आहे कांगने १९९७ साली लिहिलेली 'द फ्रुट ऑफ माय वूमन' ही कथा. यी सांग या कोरियन लेखकाच्या 'मानव व्हावा वृक्षवल्ली' या संकल्पनेचे पदर कांग असे उलगडत जाते की ही कादंबरी बनते स्त्रीत्वाची हर(वि)लेली विराणी.

या अतिशय प्रतीकात्म कादंबरीकेची रचना विशेष आहे. ही कादंबरी आहे तीन प्रकरणांची. ही तीन प्रकरणे एकमेकात गुंफलेली आहेत, आणि तरीही तीन वेगवेगळ्या कहाण्या पण आहेत. २००४ ते २००५ मध्ये ही तीन प्रकरणे तीन मासिकात तीन वेगवेगळ्या गोष्टी म्हणून प्रसिद्ध झालेली होती. पण एकत्र गुंफल्यावर उकलत जाते स्त्रीपण नामे आदिम अवघडलेपण.

तशी या कादंबरीत मोजकीच पात्रे आहेत. केंद्रस्थानी आहे येओंग हाई. अत्यंत मितभाषी. तिच्या नावाचा कोरियन भाषेत अर्थ आहे येओंग म्हणजे शूर आणि हाई म्हणजे तेजःपुंज. पण हे सारे फक्त नावात. प्रत्यक्ष आयुष्यात ती अतिशय सामान्य आहे. तिच्या सर्वसाधारण नवऱ्याच्या प्रथमपुरुषी निवेदनातून हे प्रकरण वाचकाला भिडते. त्याने तिच्याशी लग्न केले आहे तेच मुळी ती अतिरेकी सामान्य असल्याने साधेसुधे सामान्य जिणे जगता येईल म्हणून. एका पहाटे तिला स्वप्न पडते. मांसाहारी आहारातला क्रूरपणा या स्वप्नामुळे उमगल्यावर ती फक्त शाकाहार करायचे ठरविते. हा तिचा निर्णय कोरियन प्रथांपरंपरांच्या विरुद्ध आहे. ती नवऱ्याच्या विरोधाला जुमानीत नाही. तिचे वडील आणि भाऊ तिच्या तोंडांत बळजबरीने मांस, पोर्कचा तुकडा, कोंबू पाहतात. उलटी झाल्यावर ती अन्नच टाकते.

दुसऱ्या प्रकरणात ती विभक्त झाली आहे. एकटी राहतेय. तिच्या बहिणीचा नवरा व्हिडिओ आर्टिस्ट आहे. तो एकदा अचानक तिच्या घरी आल्यावर ती पूर्णपणे निर्वस्त्र असते. त्याला असे कळते की तिच्या नितंबावर एक वांग आहे. त्याची अभिलाषा आहे ती तिच्या अंगभर फुलापानाची नक्षी रंगवायची. तशीच आरेखने तो त्याच्या मित्राच्या अंगभर काढतो. त्या दोघांनी संग करावा असे त्याला वाटते. मित्राला हे पटत नाही. तो सटकतो. हा स्वतःच्या अंगभर फुले रंगवतो, आणि दोघांची प्रणयक्रीडा रंगांचे आगळे मिलन म्हणून व्हिडिओ शूट करतो. त्याची थक्क झालेली बायको त्याला तुरुंगात धाडते, आणि बहिणीला येओंग हाई ला, वेड्यांच्या इस्पितळात. 

तिसऱ्या प्रकरणात ही बहीण, इन हाई, आपल्या व्यवसायाची, येओंग हाईची आणि स्वतःचा छोटुकला आणि त्याचे भवितव्य, विशेषतः बापाचे प्रताप कळल्यावर होऊ शकणारी त्याची प्रतिक्रिया या साऱ्या आवर्ताशी एकटीने झगडताना थकून गेली आहे. येओंग हाई एकदा अचानक हरवते. सापडते ती हातात जखमी पक्षी आणि ओठी 'माझे चुकले' हा अस्वस्थ प्रश्न घेऊन. हळूहळू तिची खात्री पटली आहे की ती एक झाड आहे. इस्पितळात तिला ब्युमिलिया, अनॉरेक्सिया नर्व्होसा असे आजार आहेत असे समजून सारे डॉक्टर्स/नर्सेस जबरदस्तीने खाऊ घालताना होणारी तिची दुरावस्था पाहून इन हाईचा तोल सुटतो. तिच्या एकाकी औदासिन्याच्या साक्षीने, दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणात तृतीय पुरुषी निवेदन पेश करणारी, ही कादंबरी संपते.

स्त्रीवादी समीक्षेत ह्या कादंबरीला फार मानाचे स्थान आहे. ही फक्त वैयक्तिक अडचणीची कर्मकहाणी नाही. तर स्त्रीपणाची अनेक पातळीवर होणारी गोची कांग उलगडतेय. स्त्रीला निर्णयाचे हक्कच नसतात. तिने काय खावे, काय ल्यावे (येओंगने ब्रा/अंतर्वस्त्रे का घातलीच पाहिजे, तिचा पेहराव कसा असावा हे ठरविणार तिच्या नवऱ्याचा सामाजिक दर्जा), कसे दिसावे, कसे असावे, कसा विचार का करावा वा करू नये, सारे आखणार पितृसत्ताक समाज धारणा. 

या साऱ्या लिंगभेदामुळे स्त्री वर लादले जाणारे एकांगी अन्यायी क्रौर्य, तिला पूर्णतः नाकारले जाणारे स्वत्व, निर्णयाचे स्वातंत्र्य, तिच्या साऱ्या असण्यालाच तिच्या समाजमान्य पत्नी, आई इत्यादी 'जबाब+दार' भूमिकामुळे पडणारी वेसण या कादंबरीत उत्कट तरलतेने मांडली आहे. स्त्रीकडे पाहण्याची नजर कशी पूर्णपणे पुरुषी असते हे कांग फार प्रभावीपणे दाखवते. 

पण या पल्याड ही अतिशय काव्यात्म, प्रतिमा समृद्ध कादंबरी पर्यावरणीय स्त्रीवादाची (इकोफेमिनिझम) प्रणेती आहे. माणसाची स्वतःच्या सोयीसाठी, भौतिक ऐशोआरामासाठी निसर्गाला ओरबाडण्याची आत्मकेंद्री पुरुषी वृत्ती ही कादंबरी येओंग हाईच्या शाकाहारी बनण्याच्या असोशीला पितृप्रधान समाजाच्या कुटुंब, लग्न, आरोग्य यासारख्या प्रस्थापित संस्था ज्या क्रूरतेने चुरगळत जातात या प्रतिकात्म प्रक्रियेतून दाखवत राहते. त्यामुळं एका अजून तरल सूक्ष्म पातळीवर ही कादंबरी उपयुक्ततावादी भांडवलशाही, त्यातून जन्मणारी अफाट उपभोगाची लालसा ह्यांचाही पर्दाफाश करते. आणि हे वास्तव फक्त दक्षिण कोरियाचे नाही. म्हणून या कादंबरीत कांग पाश्चिमात्य प्रतिकाचा वापर करते तो पौर्वात्य दृष्टीने. ग्रीक मिथकानुसार डाफ्नी या अप्सरेच्या पाठी लागतो अपोलो. त्याला चाभी मारतोय कामदेव क्यूपिड. घाबरलेली वैतागलेली डाफ्नी पृथ्वीमातेची प्रार्थना करते. पृथ्वीमाता तिला चटकन एका वेलीचे रूप देते. तेव्हापासून ही वेल अपोलोची आवडती लाडकी वेल मानली जाऊ लागते. कांग या प्रतिकाला बौद्ध धर्माची खोली उंची देते. 

थोडक्यात, सभोवतालच्या उपभोगवादी कोरियन समाजाच्या फटी सांदीत अडकलेल्या अश्राप कहाण्या मुखर करणारी कांगची काव्यात्म पण समीक्षात्मक लेखणी स्त्रीप्रश्नाकडे फार आगळी पाहते, आणि म्हणूनच स्त्रीप्रश्नाचे अनवट आयाम हुडकणाऱ्या आपल्या या नव्या लेखमालेच्या आरंभी सजते.

प्रतिमा अग्निहोत्री, पुणे 

मोबा. ८३८०९४६९२१