इराणी स्त्री – भाग- ०१

सुलभा पाटील समाजकारण
०१ जुलै २०२५

पर्यटन व शैक्षणिक सहल म्हणून इराणला जायचे ठरवले पण सर्वांचा सूर हा तसा नकारात्मकच होता. एकतर युद्धाची पार्श्वभूमी, कट्टर धार्मिकतेवर आधारित मुस्लिम देश, तेथील कडक कायद्यांच्या कडक गोष्टी कानावर पडून जाण्याविषयी खरेच मनात द्वंद्व सुरू झाले. ही नकारात्मकता केवढी अवाढव्य असावी? तर अगदी इराणला जाऊन यात्रा पार पडल्यावरही “अहो, इराणला कशाला गेलात?” असे ठसक्यात विचारण्यात आले. म्हटले, हे काय व्यवस्थित तर परत आलो व खूपच छान देश व लोक होते, असे मी सुद्धा तेवढ्याच ठसक्यात व गर्वाने सांगितले. इराणला जाताना जी धाकधूक होती ती जाऊन आल्यावर मात्र थोडी सुद्धा उरली नव्हती. उलट या देशाटनाने इराण, मुस्लिम लोक, तेथील संस्कृती व इतिहास याबद्दल नव्या जाणिवा निर्माण झाल्या. सांस्कृतिक जवळीक निर्माण तर झालीच पण मुस्लिम स्त्री समजून घ्यायला अधिकच मदत झाली. एरव्ही भारतात राहून मुस्लिम स्त्रीबद्द्ल किती तटस्थपणे आपण तिच्याकडे पाहतो. धर्म, मूलतत्त्ववाद व तो जोपासण्यासाठी केवळ स्त्रियांचाच त्याग, नैतिकता, शोषण का गृहीत धरले जाते याविषयी विचारप्रवृत्त होण्यास नव्याने सुरुवात झाली. जगाच्या पाठीवरील कोणतीही स्त्री या एकाच समान धाग्याने जोडलेली आहे हे प्रखरतेने जाणवले. केवळ सोशिकता नाही तर अन्यायाची जाणीव, चीड, संताप व धगधगते मन यासह जगणारी इराणी स्त्री प्रकर्षाने जाणवली. सुंदर चेहरा व शरीर या नैसर्गिक देणगीबरोबरच निष्ठुर अन्यायाचे जन्मजात लोढणेही पदरात पडलेले. बलात्कार, सती जाणे, बालविधवा, जरठ-कुमारी विवाह, चूल व मुल.... अशा प्रथा पार करत भारतीय स्त्री आजच्या या मुक्त वातावरणात जरी जगत असली तरी या अवस्थांतून मागील दोन-तीनशे वर्षांपूर्वी दिलेल्या या भारतीय स्त्रीचा लढा आपण विसरत चाललो आहोत का, किंवा आता त्याची जाणीव बोथट होत चालली आहे का, हे प्रश्न जाणवायला लागले. आत्ता आत्ता 'जय श्रीराम'चे वारे भारतात वाहू लागले आहे. आपलाही प्रवास आता उलट दिशेने सुरू होईल वा कसे हे विचार भारतीय स्त्रीला सूचतात? धर्माधिष्ठित राज्यप्रणाली बरोबर मूलतत्त्ववाद, धर्मसंवर्धन, संस्कृतीरक्षण या व तत्सम गोष्टीही हातात हात घालूनच येतात व याचे सर्व ओझे स्त्रियांच्याच माथी एकहाती मारले जाते व याचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून श्रुती-स्मृतीही रचल्या जातात याची जाणीव वेळेतच होणे महत्त्वाचे. इराण क्रांती काळात 'इस्लामवर आधारित राज्य' या मागील गुढार्थ इराणी जनतेला जाणवला नाही. तो जेव्हा एकदम अंगावरच येऊन कोसळला तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. इराण भेटीनंतर व इराणी स्त्री पाहिल्यावर डोळे खाडकन उघडले. मात्र हा डोळे उघडण्याचा प्रवास भारतातच सुरू झाला होता, तेव्हा ते विशेष जाणवले नाही. पण जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हाच बोचले की, आपल्यालाही इराणी स्त्रीच्या रांगेत उभे राहूनच इराणला भेट द्यावी लागणार आहे. स्त्री विश्वातील कोणतीही असो, ती मूळात दुय्यमच ठेवण्यात आली आहे. पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले, महात्मा गांधी अगदी जवळचे वाटले व फोटो पुढे नतमस्तक न होताही आदर व कृतज्ञतेने मन काठोकाठ भरून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्त्रियांना ‘हिंदू कोड बिलाच्या’ रुपाने स्त्री समानतेला खऱ्या अर्थाने कायद्याचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. महात्मा फुले यांनी स्वत: वैचारिकतेला कृतीची जोड देऊन समानतेचा आदर्श समाजाला दाखवून दिला तर महात्मा गांधींनी स्त्री-शक्तीचे सामर्थ्य ओळखून भातीयच नव्हे तर जागतिक पातळीवरही स्त्रियांना सामाजिक व सार्वजनिक सेवेत येण्यासाठी केवळ प्रेरितच केले नाही तर त्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

मुस्लिम स्त्री म्हटले की हिजाबच प्रथम डोळ्यांसमोर येतो. भारतातही हिजाबचे प्रस्थ मुस्लिम स्त्रियांमध्ये वाढतच चालले आहे. विशेषतः ‘बाबरी मस्जिद’ प्रकरण व ‘गोध्रा हत्याकांड’ व मूलतत्त्ववादाचे वाढते वर्चस्व यानंतर यात, मुख्यत्वे बुरख्यात वाढ होत गेली. मीना प्रभूचे ‘गाथा इराणी’ वाचताना खरेतर माहिती घेणे, करमणूक, उत्सुकता एवढेच मर्यादित हेतू असल्याने हिजाबबद्दल वाचताना त्यातील गांभीर्य फारसे कळले नव्हते. पण आता इराणला जायचे म्हटल्यावर 'घी देखा लेकीन बडगा नहीं देखा' याची प्रकर्षाने जाणीव झाली. पटकन नवऱ्याकडे पाहिले. हिजाब घेतल्यावर तो आपल्याला हसेल का? त्याला बरे यातले काही करावे लागणार नाही. आपण मारे स्त्री मुक्तीच्या गोष्टी सांगतो आणि आता? एकूणच हिजाब डोक्यावर बसणारच असला तरी तो मनी काही उतरेना! पण देशाटनाचा आनंद घ्यायचा तर तो माथी मारून घ्यावाच लागणार होता याची खूणगाठ मारून घेतली व तयारीला लागले. कमीत कमी कोपराखाली बाह्या, गुडघ्याच्या खालपर्यंत कुर्ता व डोके झाकले जाईल इतकी ओढणी या नियमांचा अभ्यास केला. गुगलवर संशोधन केले. पण नेमके कसे कपडे असले पाहिजे हे ठरवणे कठीणच झाले. कारण एकदम काळ्या कपड्यांत पायापासून ते डोक्यापर्यंत आच्छादलेली इराणी स्त्री होती तशीच सूट, लेगिन्स, जीन्स घातलेली पण डोके झाकलेली तरुणीही चित्रात होती. ते कपडे पाहून हायसेही वाटले पण गोंधळ काही कमी झाला नाही. तिकडे जाऊन समजा जीन्स, लेगिन्स नाहीच चालले तर फजिती नको हा विचार प्रबल ठरून शेवटी अगदी आज्ञाधारकपणे ठेवणीतले सलवार कुर्ते बरोबर घेतले.

अकरावीत गेल्यावर प्रथमच सलवार कुर्ता घेण्याचे ठरवले तर घरीदारी तो मुस्लिम पेहराव म्हणून केवढा विरोध झाला होता. आपण एकतर्फीच सलवार कुरता हा मुस्लिम पेहराव म्हणून घोषित केले आहे व आता तर तो अखिल भारतीय पेहराव झाला आहे. तेहरानमध्ये फिरताना कोणाही स्त्रीच्या अंगावर सलवार कुरता वा तत्सम ड्रेस दिसला नाही. उलट माझ्या पेहरावाकडे नवलाने पाहिले जायचे. हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. असो. एकदा ‘अग्नीमंदिर’ या स्थळाला भेट दिली तिथे एक मध्यमवयीन स्त्री मला भेटली. हसून मला बोलली, ‘व्हेरी गुड ड्रेस..’ आणि चक्क माझ्या गालाची एक छान पप्पी घेतली. मला इतके भारी व छान वाटले. आयुष्यात प्रथमच कोणीतरी इतकी छान दाद मला दिली होती. त्या स्त्रीचे ते पप्पी घेणे इतके अनपेक्षित व इतके सहज होते की मी भारावूनच गेले. काही न सुचल्याने मी तिच्या हातांची पप्पी घेतली. खरेतर मलाही तिच्या गालांची पप्पी घ्यायची होती पण काय नेमके आडवे आले ते कळत नाही. कदाचित इतका मोकळेपणा व अकृत्रिमता ही इराणी स्त्रीची स्वाभाविकता आहे हे नंतर अनुभवांती मला जाणवत गेले. कारण चांगल्या गोष्टींना त्वरित दाद देणे, ‘इंडियन’ म्हणून कौतुकाने विचारणे व 'हो' असे उत्तर मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद फुलायचा की नैसर्गिक आनंद व मोकळेपणा यांचा दाखलाच अनुभवायला मिळायचा. अनेक वेळा येथील स्त्रियांनी आमच्यातील अनेकांबरोबर फोटोही काढून घेतले. स्त्रीतील नैसर्गिक ऋजुता, आनंदी भावना व साहचर्य भाव प्रथमच खऱ्या अर्थाने मला इराणी स्त्री मध्येच अनुभवायला मिळाला.

स्त्री हिजाबमध्ये बद्ध केली गेली तरी तिच्या नैसर्गिक, मूलभूत प्रवृत्ती या कोणी बद्ध करू शकत नाहीत हा धडा या स्त्रियांकडून शिकावा. वरवर शांत, सोशिक दिसणारी ही स्त्री आतून अतिशय संवेदनशील आहे. वरवर ती राज्य, सत्ता, धर्म... इत्यादी बाबींपुढे झुकलेली दिसत असली तरी ती या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ नक्कीच नाही. ती परिस्थिती जोखते आहे. येथे सर्व काही फिल्टर होऊनच बाहेर पडतेय याची सावधानता तिच्यापाशी आहे. पण आतून एक खदखदही आहे. यांच्यातीलच काही पेटून उठल्या, आत्मबलिदानही केले, क्रूर छळ सहन केलाय, तुरुंगात गेल्या याची खूणगाठ यांच्या व्यक्तिमत्त्वात उभरून आलेली यांच्या बोलण्यातून, देहबोलीतून सूक्ष्मतेने जाणवते. कमी प्रमाणात व वयस्क इराणी स्त्रियांच पूर्ण काळ्या व बंद पेहरावात दिसतात. तरुण मुली, स्त्रिया यांचे कपडे रंगीत, सूट, लेगिन्स, जीन्स टाईप पँन्ट इत्यादी व डोक्यावर स्कार्फ, ओढणी अशा कपड्यांत सर्रास दिसत असल्या तरी शासकीय नोकरी, सार्वजनिक ठिकाणची नोकरी येथे मात्र काळ्या रंगाचे गळ्यापर्यंत काळ्याच स्कार्फने डोके पूर्ण झाकलेले अशाच पेहरावात असतात. व ते तसे बंधनकारक आहे. म्हणूनच विद्यापीठात प्राध्यापक पदावर असणारी प्राध्यापिका याच काळ्या पेहरावात दिसते. म्हणजे शासकीय फायदे हवे असतील तर शासकीय नियमही बंधनकारक जे मुस्लिम प्रजासत्ताक गणराज्यानुसार आहेत.

तज्ज्ञांच्या मतानुसार कुराणमध्ये कुठेही हिजाबबद्दल लिहिलेले नाही, तर केवळ डोके झाकण्यासाठी सांगितलेले आहे. अनेक धर्मांत शालीनता दर्शवण्यासाठी स्त्रिया डोक्यावर पदर, शाल, शेला, ओढणी, दुपट्टा आदी घेतात. इराणमध्ये पूर्वी पुरुष व नवरा युद्धावर जातांना त्याला निरोप देतांना डोक्यावर दुपट्टा सदृश वस्त्र घेत. इराणमधील पारंपारिक वेशभूषा अभ्यासली तर डोक्यावर केवळ दुपट्टा दिसतो. इराणमधील पुढील काही छायाचित्रे पाहिली, पारंपारिक वेशभूषा पाहिल्या तर डोक्यावर केवळ दुपट्टा दिसतो जो डोके झाकतो. कपडेही रंगबेरंगी दिसून येतात. आता प्रत्यक्षात मात्र काळे कपडे जास्त दिसतात. हिजाबसाठी सुद्धा सफेद, करडा, नेव्ही ब्लू, असेच रंग चालतात. लाल रंगासारखे चमकदार रंगांचे कपडे, रंगबेरंगी कपडे वापरले जात नाहीत. प्रेषितांचा आवडता रंग मात्र गुलाबी होता, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.

आज इराणमध्ये हिजाबकडे मुस्लिम स्त्रीची धर्मपरायणता, सन्मान याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. मुस्लिमांनी उमर राजवटीत (६३७ ई.) इराणवर विजय प्राप्त केल्यावर त्या देशातील लोकांचे धर्मांतर घडवून आणले त्याचबरोबर हिजाबसारखे रिवाजही घेतले. तरीसुद्धा सोळाव्या शतकात सफवी राजवट, कजर राजवट इत्यादी कालखंडात हिजाब हा अनिवार्य नव्हता तर तो स्वेच्छेने वा प्रचलित फॅशन म्हणून धारण केला जायचा. या काळातील हिजाब हा नेहमी रंगीत, फॅशनेबल पद्धतीचा असायचा. आधी आधी तो मोती, पिसे, फुले यांनीही सजवला जायचा. यावर युरोपीय शैलीचाही प्रभाव पुढील काळात पडत गेला. पुढे कजर राजवंशाच्या काळात देशाला अंतर्गत व बाहेरील संकटांचा सामना करावा लागला. परिणाम स्वरुप याच काळात इराणी महिलेच्या वाट्याला अनेक भूमिका आल्या जसे सामाजिक, राजकीय आंदोलनांत भाग घेणे, महिला संगठन इत्यादी. बीबी खानम अस्तराबादी, तुबा अजमुदे आणि सेदिकेह दोलताबादी यासारख्या स्त्रियांनी तर स्त्री हक्क, शिक्षण यासाठी वकिली सुद्धा केली. परंतु याच कजर राजवटीच्या काळात आर्थिक संकट काळात ज्या शहरी, धार्मिक परंतु गरीब स्त्रियां डोक्यावर घेण्यासाठी स्कार्फ खरेदी करू शकत नव्हत्या त्यामुळे त्या घरातच राहणे पसंत करू लागल्या किंवा त्या चादर वा ओढणी वापरू लागल्या. येथपर्यंत हिजाब परिधानतेमध्ये बरीच लवचिकता दिसून येते. इस्लामी क्रांतीपूर्व काळात व मधल्या काळात म्हणजे १९व्या शतकाच्या पूर्वार्धात इराणी महिला यासुद्धा वैज्ञानिक, कलाकार, लेखक म्हणून नावाजलेल्या होत्या. इराण विश्वविद्यालयात बहुसंख्येने महिला शिक्षण घेत होत्या. अजर अनदामी ही स्त्री वैज्ञानिक होती. तिने कॉलरा या रोगावर वॅक्सिन शोधून काढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९१३ मध्ये जन्मलेली शैबानी ही इराणमधील पहिली महिला सर्जन होती. इस्लामिक क्रांतीनंतरच्या काळातही निलोफर बयानी ही जैव संरक्षक जीवशास्त्रज्ञ होती. इस्लामिक सरकारने तिला जेलमध्ये टाकले होते. ही यादी बरीच मोठी आहे. इराणमध्ये फिरत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दिसून आली ती म्हणजे हॉटेल्स व रेस्टॉरंटसमध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया व मुली काम करताना दिसतात. एका हॉटेलमध्ये तर एक वेट्रेस मुलगी दर पाच मिनिटांनी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या किचनमधून डिशेस घेऊन पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सातत्याने चढउतार करत होती. सरासरी आठ तास वेळ धरला तर ती आठ तासात किती वेळा खालीवर जातयेत असेल...तिच्या कष्टांना तोड नव्हती. एअर होस्टेस म्हणूनही इराणी स्त्री कार्यरत आहे. एकूणच सेवा क्षेत्रात इराणी स्त्री असण्याची इतरही अनेक कारणे असतीलही पण नाईलाजाने का होईना स्त्रीने कष्टाच्या व सेवा क्षेत्रात काम केलेले जगात सर्वत्रच चालते मात्र इतर वेळेस मान, मर्यादा, इज्जत, धर्म या गोष्टींनी मात्र तिच्यावर सामाजिक व तत्सम निर्बंध सक्तीने लादले जातात. इराणमध्ये स्त्रियांनी चारचाकी गाडी चालवलेली चालते. मात्र दोन चाकी गाडी चालवायला मात्र तिला कायद्यानेच बंदी आहे! यावरून आठवले की महाराष्ट्रातही अनेक स्त्रिया डोक्यावर साडीचा पदर घेऊन दोन चाकी गाडी चालवताना दिसतात. कदाचित ते सक्तीचे वा ऐच्छिक असेल पण या मागील समाज व कुटुंब यांची मानसिकता किती हीन व बुरसटलेली आहे हेच स्पष्ट होते. इराणी मुस्लिम गणराज्य व भारतीय प्रजासत्ताक गणराज्य यात काय फरक राहिला? कदाचित हिजाब बंद होण्यासाठी इराणी स्त्रीला जी किंमत मोजावी लागतेय ती भारतीय स्त्रीला मोजावी लागलेली नाही, म्हणून तर त्या मागे किती पुरुषप्रधान मानसिकता दडलेली आहे हे समजत नाही?

 सुलभा पाटील, निवृत्त प्राध्यापक, संगमनेर, जि.अहिल्यानगर

मोबा.९९७५७८९१०७/ sulbhapatil63@gmail.com