मेरी एलिझाबेथ पिफर स्त्रीवादी चळवळीतील एक बिनीची शिलेदार असून गेली अनेक दशके स्त्रियांच्या प्रश्नांचे मानसशास्त्रीय परिप्रेक्षेतून आकलन करून घेत मांडणी करत आली आहे. स्त्रियांच्या मानसिकतेचा अभ्यास मेरीने केला आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक जीवन अधिक विकसित कसे होईल यासाठी ती प्रयत्न करताना दिसते. स्त्री म्हणून तिने केलेला संघर्ष संघर्षाकडे संधी म्हणून पाहतत मानसशास्त्रासारख्या किचकट क्षेत्रात घेतलेली भरारी महत्त्वपूर्ण आहे. मेरीचा जन्म अमेरिकेतील ओझार्क येथे २१ ऑक्टोबर १९४७ ला झाला. एका छोट्या खेडेगावात जन्मलेल्या तिचे जीवन लेखन, वाचन, मनसोक्त पोहणे या पुरते सीमित होते. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून तिने सांस्कृतिक मानववंशशास्त्राची पदवी घेतली. नंतर नेब्रास्का विद्यापीठातून क्लीनिकल मानसशास्त्रात तिने पीएच.डी. प्राप्त केली. ती नावाजलेली अशी रॉकफेलर स्कॉलर होती. मेरीच्या कामाची दखल घेत अमेरिकेतील दोन नामांकित मानसशास्त्रीय संस्थांकडून तिला पुरस्कार प्राप्त झाले होते. पण तिने त्यातील एका संस्थेला पुरस्कार परत केला. या संस्थेने ग्वांतानामो बे तुरुंगात असलेल्या कृष्णवर्णीयांच्या चौकशीत सहभाग घेतला होता, ज्याबद्दल मेरीने आपला निषेध व्यक्त केला होता. ग्वांतानामो बे हा जगातील सर्वात वाईट तुरुंग असून इथे कैद्यांना नजरकैदेत ठेवून त्यांचा अनन्वित छळ केला जातो. हा तुरुंग बंद करावा अशी चळवळीतील कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. मेरीचे बालपण अतिशय खडतर होते. असंख्य अडचणीवर मात करत तिने जगणे आनंददायी केले. आई-वडिलांचा वियोग तिला लहानपणापासून सहन करावा लागला होता. पण एक मानसशास्त्रज्ञ म्हणून पोरक्या व अनाथ अशा मेरीने निराशेवर मात केली आहे. आशा निराशा, सुखदुःख याला जीवनात संतुलित ठेवण्याचे ज्ञान व जगणे आशादायक करण्याची दृष्टी मेरी आपल्या समुपदेशनातून देते. जीवनात आर्थिक. सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक लवचिकता असली पाहिजे असं तिला वाटते. लवचिकता म्हणजे तडजोड नाही योग्य गोष्टीसाठी योग्य कौशल्य आत्मसात करणे व त्याचा जीवन अर्थपूर्ण जगण्यासाठी उपयोग करणे आवश्यक असल्याचे मेरी सांगते. महिलांचे वय वाढणे याचा अभ्यास करत असताना मेरीने १०० हून अधिक जेष्ठ महिलांच्या मुलाखती घेतल्या. तिच्या निष्कर्षात ती सांगते आज साठीतल्या स्त्रिया स्वतःला वृद्ध समजत नाहीत. मध्यम वयातल्या समजतात, पुढे जाऊन मेरी म्हणते की ज्या स्त्रिया सदृढ आहेत. ज्यांना कोणताही आजार नाही त्या तर स्वतःला तरुणच समजतात, त्यामुळे स्त्रीद्वेष वयवाद यामुळे येणाऱ्या सांस्कृतिक विकासात्मक समस्यांचा स्त्रियांनी निषेध केला पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मलेल्या महिलांचे आयुष्यमान ८० काही जणींचे ९० पर्यंत पोहोचले आहे, मेरी याला अडल्ट हूड सेकंड असं म्हणते. मेरीच्या मतानुसार वृद्धत्व भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक विकासाला अवकाश देते, वृद्धत्वाच्या टप्प्यावर सर्व जबाबदाऱ्या संपल्याने ज्येष्ठ स्त्रिया जगणं समृद्ध करण्यासाठी उत्सुक असतात. तणावमुक्त असतात, याशिवाय वयानुसार त्यांची स्वजाणीव विकसित झालेली असते, त्यामुळे प्रतिक्रिया देणे त्यांनी बंद केलेले असते. त्याच्या आयुष्यातही दुःख, निराशा, राग, वेदना असतात पण सकारात्मक राहण्याची निवड या महिला करतात, सकारात्मकता हीच त्यांची ताकद असते, मेरीच्या मते, वय वाढीवर कोणाचेच नियंत्रण नसते पण निष्क्रिय न राहता समृद्ध आयुष्याची निवड आपणाला समाजाभिमुख बनवते, आनंदी राहणं ही वृत्ती ठरवून अंगी बाणवावी लागते, आपल्या वागण्याचं सतत अवलोकन करून आपल्या वागण्याची व कृतीची जबाबदारी आपणच घ्यावी लागते हे सांगताना तिच्या मते आपलं वागणं चुकलं तर त्या सत्याचा स्वीकार करण्याचं कौशल्य व ताकद आपल्यात असली पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना नवीन धोरणं ठरवावी लागतात. स्वतःला समृद्ध करावं लागतं. आपण समृद्ध झालो नाही तर आपण कडवट होतो. आपल्या समस्या विक्राळ होतात व आपण त्यातच गुरफटून जातो. आपल्या शारीरिक, मानसिक क्षमता चांगल्या असतील तर आपले आयुष्य गुणवत्ता पूर्ण होते. इतरांना मदतीचा हात देण्यासाठी आपण तयार होतो. मेरीची राजकीय व कायदेविषयक समज व अभ्यासही सखोल आहे, विधानसभेत ती स्वतःचे मत हिरीरीने मांडते, विधिमंडळात जी मते मांडली जातात त्यामध्ये स्पष्टता नसते तर ही मते दुटप्पी असतात असं तिला वाटते. कीस्टोन एक्सएल पाईपलाईनच्या बांधकामाला २०१४ मध्ये मान्यता देणारे विधेयक मंजूर झाले, पण चार दिवसांनी सिनेटने ते विधेयक फेटाळले. मेरीने पाईपलाईनच्या या बांधकामाला विरोध केला होता, हे बांधकाम पर्यावरण व जागतिक तापमान वाढ यासाठी हानिकारक असून कामगारांसाठी धोकादायक आहे, असे तिचे मत होते. ही पाईपलाईन तेल वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे. तेल गळतीचा धोकाही यात होता. मेरीच्या मतानुसार नेब्रास्कातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी हवामान बदल, पर्यावरण, पाईपलाईन संदर्भातील अडचणी याविषयी लोकांशी बोलून त्यांना जागृत केले पाहिजे. मेरीने आयुष्यभर मानसशात्रीय अभ्यास व समुपदेशन केले. मानसशात्रीय चिकित्सक अभ्यास करणारी व स्त्रियांच्या प्रश्नाचा मागोवा घेणारी अकरा पुस्तके लिहिली. तिच्या चार पुस्तकांचा न्यूयार्कच्या बेस्ट सेलर पुस्तकात समावेश आहे. लाईफ इनलाईट प्रकाशमय जीवन हे आत्मचरित्र लिहिले आहे. विमेन रोइंग नॉर्थ या पुस्तकाने खपाचा उच्चांक केला आहे. लिंकन जर्नल स्टार व न्यूयार्क टाइम्स मध्येही ती सतत लिहीत असताना आपले परखड मत मांडते आहे. प्रतिभावान मेरी फिपर मानसशास्त्रज्ञ, हवामान बदल कार्यकर्ती, लेखिका परखड भाष्य करणारी पत्रकार, महिला चळवळीतील महिलांचे मूलभूत जगणं व त्या जगण्यातील टप्पे सांगणारी कार्यकर्ती म्हणून मेरीचे काम महत्त्वपूर्ण आहे, आजही ७७ वर्षाची मेरी सक्षम व सजगपणे काम करत आहे.
वृषाली मगदूम, नवी मुंबई
vamagdum@gmail.com