नसलेल्या (नासलेल्या) नात्यांचे असलेले आभास

प्रतिमा अग्निहोत्री स्त्रीवादी भिंगातून
०१ जुलै २०२५

“तू माझ्या दफनविधीसाठी येशील?” समोर असलेल्या तिच्या कॉफीच्या कपाकडे ती बघत राहते. काहीच बोलत नाही. “तू माझ्या दफनविधीसाठी येशील?”, तो पुन्हा विचारतो. “मरणाविषयी कशाला बोलायचे? तू तर जिवंत आहेस,” ती म्हणते. तिसऱ्यांदा पुन्हा तेच विचारतो तो तिला. “तू माझ्या दफनविधीसाठी येशील?”. “नक्की,” ती म्हणते. “मी येईन तुझ्या दफनविधीसाठी.” “शेजारीच भोजवृक्ष असलेला जमिनीचा तुकडा मिळालाय मला.” “छान!” ती म्हणते. चार महिन्यांनी ती पिट्सबर्गमध्ये असताना तिला त्याच्या मृत्यूची बातमी कळते; तिच्या वाढदिवसाच्या दिवशी. तिच्या वाढदिवसानिमित्त युरोपहून शुभचिंतनाचे फोन येण्याआधीच त्याच्या मुलाचा लुडविगचा फोन येतो, “Dad गेले आज.” दफनविधीच्या दिवशी ती अजूनही पिट्सबर्गमध्येच आहे. पहाटेचे पाच वाजलेत. म्हणजे बर्लिनमध्ये दुपारचे दोन. ती वेळेवर उठलीये. हॉटेलमधल्या टेबलावर मेणबत्ती पेटवली आहे तिने. आणि त्याचे आवडते संगीत बाख, मोत्झार्त, शॉप्यां ती युट्युबवर लावते. अगदी अधल्या मधल्या जाहिरातींसकट.

सहा महिन्यांनी तिचा नवरा एकटाच घरी असताना एक बाई येते आणि कार्डबोर्डचे दोन मोठ्ठे खोके देऊन जाते. “ती खूप रडत होती,” तो म्हणतो. “अश्रू पुसायला हातरुमाल दिला मी तिला.” साऱ्या हिवाळाभर कार्डबोर्डचे ते मोठ्ठाले खोके कॅथरिनाच्या अभ्यासिकेत तसेच पडून असतात. खोली साफ करायला मावशी आल्या की कॅथरिना ते खोके उचलून सोफ्यावर ठेवते, आणि साफसूफ करून झाली की पुन्हा जमिनीवर. वरची पुस्तके काढण्यासाठी बैठे स्टूल किंवा शिडी वापरताना ती ते खोके बाजूला सारते. तिच्या पुस्तकांच्या कपाटात त्या दोन मोठ्ठ्या खोक्यासाठी जागाच नाहीये. तळघरात पाणी साचले होते. सरळ रद्दीतच टाकावे का? ती एक खोका उघडून पाहते. पुन्हा बंद करून टाकते.

नोव्हेंबरच्या सुरुवाती सुरुवातीला ती जमिनीवर ठाण मांडते. तिने मनाची तयारी केलीय. सारे कागद सावडण्याची. दोन खोकी भरून. पत्रे, प्रती, डायऱ्या, फोटो, पोस्टकार्ड, वगैरे, वगैरे. सर्वात जुने १९८६ सालचे, सर्वात नवे १९९२ सालचे. तिचीही स्वत:ची आहे अशीच एक सुटकेस माळ्यावर.

अशी सुरू करते जेनी एरपेनबेक कहाणी. एका नात्याची. असलेल्या आणि नसलेल्याही, व नासलेल्याही. जिवंत भासताना मरण पावलेल्या भावबंधांची. कॅथरिना आणि हान्सच्या प्रेमाची. ती अवघी एकोणीसची. तो पन्नाशीतला. जवळपास तिच्या वयाचा मुलगा आहे त्याला. बस थांब्यावर “आज अचानक गाठ पडे” पद्धतीने आरंभ झालेल्या त्यांच्या चुटपुटत्या पहिल्या भेटीची, गहिऱ्या होत जाणाऱ्या तरलपणे उमलत जाणाऱ्या क्षणांची ही गाथा आपल्याला उमगते 'काईरॉस' या एरपेनबेकच्या २०२४ साली इंटरनशनल बुकर प्राईझ मिळालेल्या कादंबरीत. ऋणानुबंधांच्या थिजून पडलेली गाठी उकलणारी ही अत्यंत तरल कादंबरी प्रेमाचे गोडगोडूले, फिल्मी प्रदर्शन अजिबात मांडत नाही.

प्रेम हे फार आगळेच रसायन आहे हे मान्य आहे एरपेनबेकला. अतिशय उत्कटपणे प्रेमात पडलेल्या कॅथरिनाची एक छोटीशी आगळीक. पण हान्सच्या लेखी चुकीला माफी नाही. प्रेमाचा पुरुषी जाच कसा काचतो आणि स्त्रीपणाची कशी गोची करतो हे एरपेनबेक अत्यंत प्रामाणिकपणे पेश करते. सहा वर्षांचे हे प्रकरण कॅथरिनाला समंजस बनवते, तिची भावनिक-बौद्धिक उंची वाढवते. पण लेखक वगैरे असणारा हान्स तिच्यावर मालकी हक्क गाजवण्याच्या नादात इतका वाहवत जातो की भावनिक पातळीवर त्याचे क्रूर हुकूमशहात होणारे परिवर्तन त्यांच्या नासलेल्या नात्याचे असलेले आभासही मिटवून टाकते.

नाते असोशीने जपताना प्रेम नावाच्या अवकाशात स्त्रीला आपोआपच कसे दुय्यम लेखले जाते हे वास्तव लेखिका अत्यंत संवेदनशीलरीतीने पेश करते. हान्सचा छळवादाकडे होत असणारा प्रवास कॅथरिनालाही बळीचा बोकड बनवतोय ही जाण ह्या कादंबरीला उच्च वैचारिकता प्रदान करते. तरीही स्त्री-पुरुषाचे प्रेमाचे नाते हे sado-masochism रीतीचे एकमेकात अवघड गुंतलेले द्वैत असते/बनत जाते, एवढीच या अनेक पारितोषिक प्राप्त कादंबरीची परिमिती नाही. नाही तर, एरपेनबेकचे अंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले लिखाण आणि संदीप रेड्डी वांगाच्या 'कबीरसिंग' (२०१९) हा 'अर्जुनरेड्डी' या त्याच्याच २०१७ सालच्या तेलगु चित्रपटाचा रि-मेक या दोन्हीत फरक तो काय? त्याही चित्रपटांत स्त्रीला प्रेमात भोगाव्या लागणाऱ्या मानसिक पातळीवरील हिंसेचे दर्शन होतेच, काही समीक्षकांच्या मते तर 'कबीरसिंग'मध्ये या अशा वरवर साजऱ्या भासणाऱ्या क्रौर्याचे समर्थनही आहे.

पण एरपेनबेकची मूळ जर्मनमधून २०२३ साली मायकेल हॉफमनने पेंग्विन प्रकाशनासाठी इंग्रजीत भाषांतरित केल्याने सर्वदूर पोचलेली ही कादंबरी प्रेमाचे सादरीकरण आणि विश्लेषण करते ते सामाजिक-राजकीय पातळीवर. या कादंबरीतील मुख्य पात्रांचा इतिहास जर्मनीच्या युद्धोत्तर इतिहासाशी आणि भूगोलाशी संलग्न आहे. कॅथरिना जन्मली आहे ती इस्ट जर्मनीत. तिला माहीत आहेत विभागलेले इस्ट बर्लिन, आणि तिथले अभाव. हान्स जाणीवपूर्वक इस्ट जर्मनीत स्थायिक झालाय. त्याच्या वडीलांच्या हिटलर प्रेमाचे परिमार्जन म्हणून. थोडक्यात, या पातळीवरही त्याला सूक्ष्म, अव्यक्त अहंकाराची बाधा आहे. असले वरचढपणाचे (superiority complex) ताणेबाणे या प्रेमाच्या सादरीकरणाला उच्च वैचारिक आणि साहित्यिक मूल्ये प्रदान करतात. कारण पूर्वाश्रमीचे जी.डी.आर (German Democratic Republic) फक्त नावापुरतेच लोकशाहीवादी आणि प्रजासत्ताकवादी आहे. या टोपीखाली दडली आहे स्टॅलिनशाही हिंसा. थोडक्यात. हे असे सामाजिक-राजकीय परिमाण प्रतीक आहे हान्सच्या पुरुषी अरेरावीचे.

हान्स आणि कॅथरिनाचा ताटातूटीकडे होणारा अटळ प्रवास जर्मनीच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचे द्योतक ठरत जातो. या ऐतिहासिक प्रक्रियेत पूर्व जर्मनीची ओळख धूसर होते आहे असे नव्वदीच्या दशकात अनेकांना वाटत राहिले. एक जीवनपद्धती, विचाररीती बलदंड बाजाराभिमुख भांडवलशाही पाश्चिमात्य प्रभावाखाली पूसट होतेय असा 'गेले ते दिन गेले' पद्धतीचा ostology (पूर्व जर्मनीसाठी वाटणारा नोस्टाल्जिया) भावूकपणा या कादंबरीतील स्त्री-पुरुष संबंधातील असमतोल अतिशय सूचकतेने तरल बनवतो. त्यामुळे युरोपिअन लिखाणात पुनःपुन्हा आढळणारा 'व्युद्रिंग हाइटस' पद्धतीचा पुरुषी अहंकाराचा सूडाचा प्रवास एखादी आजकालच्या काळातील स्त्री लेखिका किती आगळ्या व विचारगर्भ पद्धतीने मांडते हे स्त्री लिखाणाचे मूलगामी मर्म या कादंबरीतून उलगडते.

तरीही एरपेनबेकचा सूर कुठेही आवर्ती अतिरेकी नाही. नेहमीच्या जगण्यातले चढ-उतार अत्यंत संयत, शांत रीतीने तरल, प्रतीकात्म गद्यातून ती सादर करते. त्यामुळेच ऐतिहासिक बदल सोसणारे इस्ट बर्लिनही या कादंबरीत केवळ पार्श्वभूमी राहत नाही. एक सजग व्यक्तिरेखा बनत जाते हे शहर. म्हणूनच या आगळ्या कादंबरीचे शीर्षक अतिशय सुयोग्य ठरते. ग्रीक भाषेनुसार, ग्रीक पौराणिक धारणांनुसार 'काईरॉस' म्हणजे सुयोग्य निर्णयांचा अचूक क्षण. व्यक्तीच्या असो वा समष्टीच्या, या अशा निर्णायक क्षणांनी तर घडत जातात नसलेल्या (नासलेल्या) नात्यांचे असलेले आभास.

जेनी एरपेनबेकचे (जन्म १९६० सालचा, इस्ट बर्लिनमध्ये) सारेच लिखाण असे अतिशय आगळे व विचारगर्भ आहे असे टीकाकारांचे मत आहे. ती नाटककार, ऑपेरा दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिने रंगभूमीवर पडद्यामागे थिएटर प्रॉप्स डिझाईनर म्हणूनही काम केलेलं आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळवणारी पहिली जर्मन लेखिका असणारी जेनी एरपेनबेक नव्वदीच्या दशकात लिहिती झाली. अनेक बहुमान तिच्या लिखाणाला प्राप्त झालेले आहेत. तीसेक भाषांत तिचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. 'Go, went, gone' (२०१७) आणि 'Visitation' (२०१९) ला तर एकविसाव्या शतकातील शंभरेक पुस्तकातील अतिशय वरच क्रमांक दिला जातो. नजीकच्या काळात नोबेल पारितोषिकासाठी खात्रीची उमेदवार मानली जाणारी ही लेखिका 'रस्म-ए-उल्फत' अशीच संपृक्त उलगडत जाईल हे निश्चित.

प्रतिमा अग्निहोत्री, पुणे

मोबा: ८३८०९४६९२१