पाळी

कुंदा लोखंडे साहित्य
०१ मे २०२५

कावरं-बावरं होत बायका

वाळवत ऱ्हातात कापड 

अंधाऱ्या कोपऱ्याला 

दोरीवर अडगळीला,

फडताळामागं वळचणीला

कुठंतरी आडबगलला

दृष्टीआड नजरेआड

प्रॉब्लेम मानून पाळीला

सगळ्यांनाच मिळत नाही

स्टे फ्री व्हायला

व्हीसपर चॉईसायला.

मेन्स्ट्रुल कप वापरायला

म्हातारीच्या धडप्यात,

काळपट लाल  फडक्यात 

ऋतुमती साड्या

ठिप ठिप ठिपकतात 

लहानसहान पोरीबाळी

अवकाळीन गांजतात,

बाहेर बसली' शब्दासरशी

काळीज डागण्या झेलतात, 

पवित्र्याच्या चिंध्याखाली 

कवळपण करपून जाते

लाल पांढऱ्या पाण्यामधी 

स्वतःलाच झाकून घेते.

रानीवनी, शेताभातात

गाडीघोड्या प्रवासात,

शाळा- कॉलेज, मैदानात

परिक्षा हॉल नि ऑफिसात

पुढे-मागे दचकून पाहतात

डागाला भिऊन राहतात

गाठी गाठी निसटताना

ओटीपोटी निबार दुखतात

झरल्या इरल्या पिशव्या कधी 

गोणपाटागत खराब होतात

ऊसतोडीच्या बायापरिस

ओटीपोटी गंजून जातात

गांजल्या इरल्या बाया मग

मायांग कापून घेतात

संसाराच्या खपताडीत

कामाला गाठ देतात.

थांबत नाहीत पळभर सया

आवसानं उठत राहतात

आयुष्याला धिक्कारत मग

मनोमन कळवळतात

'नको बायचा जलूम' म्हणून

बायपण झोडपतात

कंबर बांधून पुन्हा पुन्हा

आईपण वठवतात.

    

कुंदा लोखंडे, मायणी


आजी 

शेतात राब राबली

धरणात गेले घर बुडून 

आब राखून गेली 

सूत गिरणीत

म्हातारीने केले कापसासारखे पांढरे केस

मन जसे होते तसेच बरोबर

वारकर्‍यांच्या पदरी पडली जरी

खाई मटण लपून तरी

वाड्यात एक घोडा दारात 

आणि भादके हातात

घेई मुका 

मुखी तंबाखूचा वास नेनीवेत 

गिरण थकली थबकली 

लेकीच्या दारात

एक संसार केला दुसर्‍याला दिला टेकू

हाताला धरून लावले शाळेच्या वाटेवर नातवांना

केले पडेल ते काम, पडली कोपर्‍यात 

संतोषीमातेचा उपवास सर्रास 

बटव्याचा ओवावास सारी औषध-जडिबूटी

सर्व व्याधींवर ईलाज

शेवटी कॅन्सरचा हात धरून गेली

पाटलीनीच्या तोर्यात

आजी माजी

विजय वावरे, पुणे

मोबा. ९१५८४२८८९९


दिवा 

आई तू देवघरात 

गोडेतेलाचा दिवा 

लावत नको जाऊ 

दगड अंधारात काय अन 

उजेडात काय, काय फरक पडतो 

मला अजून आठवते,

बिना तेलाची चटणी अन शिळी वाळलेली भाकरी 

अन्ननलिकेतून पार 

बेंबीच्या देठापर्यंत टोचत गेलेली 

आई तू देवघरात 

गोडेतेलाचा दिवा 

लावत नको जाऊ 

भारत अंकुशराव सोळंके 

मु. पो. सादोळा, ता. माजलगाव, जि. बीड. 

मोबा. ९०४९०९९०३६