पाश्चिमात्य जगात प्रमुखप्रवाही मानसशास्त्रातील विचार आणि व्यवहाराला स्त्री चळवळीने, इतर सामाजिक चळवळींनी दिलेल्या टक्करीमुळे व उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काही ठळक बदल व सुधारणा झाल्या. यांचा उल्लेख मी मागच्या चार लेखांमध्ये केलेला आहे. पण त्यातील काही उल्लेखनीय बाबींची दखल या समारोपाच्या लेखांमध्ये घेत आहे.
उदाहरणार्थ २०२० मध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर ही चळवळ जेव्हा तीव्र झाली तेव्हा त्याचे पडसाद अमेरिकन सायकॉलॉजी असोसिएशनच्या धोरणांमध्ये जाणवले. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या वेबसाईटवर लगेच उमटले. १९९५ पासून, म्हणजे आपण भारतात इंटरनेट वापरायला लागलो तेव्हापासून ही वेबसाईट आणि त्याच्या आधारेमिळणारी माहिती मी वाचत आले आहे. अचानक या वेबसाईटवर ब्लॅक सायकॉलॉजीचे समर्थन तसेच ब्लॅक सायकॉलॉजीतील अनेक संशोधन, शोधनिबंध व ब्लॅक लाईव्ह मॅटर या मोहिमेला समर्थन; हे वाचायला मिळाले. काय हा चमत्कार! याचा अर्थ स्पष्ट होता, अमेरिकन सायकॉलॉजी असोसिएशनला जर वर्णभेदी ठरायचे नसल्यास हे समर्थन करणे आवश्यक बनले होते! हे टोकनीझम असले तरी एक पाऊल पुढे गेले असेच म्हणावे लागेल.
दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे संशोधनातील लैंगिक भेदभाव दर्शवणारी भाषा वर्ज्य करण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले. मागचा इतिहास बघता ही पाश्चिमात्य जगातील स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञांनी उठवलेल्या आवाजाचा व तीव्र निषेधाचा परिपाक म्हणावा लागेल.
स्त्री विरोधी (misogynist) व समलिंगी तसेच पारलिंगी विरुद्ध (homophobic) लिखाण, संशोधन व विचार, व्यवहार या करताही निर्बंध व नियम प्रमुख राष्ट्रीय संस्थांनी घालून दिले. याच्यामागे अनेक वर्षांपासून स्त्री चळवळ तसंच समलिंगी व पारलिंगी व्यक्तींची चळवळ, संशोधक व संस्था संघटनांनी केलेला तीव्र संघर्ष होता.
प्रमुख प्रवाही मानसशास्त्रातील विचार, व्यवहार व धोरणांवर त्यामुळे आपोआपच एक अंकुश बसले. आता एकतर त्यांनीच बदल करून सर्वंकष बनवलेले हे नियम त्यांना पाळावे लागतील किंवा न पाळल्यास त्याच्याकरता जाहीर मानखंडना कबूल करून घ्यावी लागेल. स्त्री विरोधी, वंशिक गटांच्या विरोधी, समलिंगी व पारलिंगी व्यक्तीविरोधी धोरण आणि काम आता लपून राहण्यासारखे नव्हते तर ते जाहीररीत्या एक्सपोज होणार होते! असा बराच लांबचा पल्ला गाठला गेला.
IUPsyS International Union of Psychological Sciences ही मानसशास्त्राची जागतिक शिखर संस्था मानली जाते. याची स्थापना १८८९ मध्ये झाली. जगभरातील ९३ देश याचे सभासद, ज्यामध्ये १९५१ पासून भारतही आहे. अर्थातच जगातील विविध स्थित्यंतर सामाजिक व परिवर्तनवादी चळवळी यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम इथेही दिसून येतात. दर चार वर्षांनी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सायकॉलॉजी ही शिखर संस्था भरवते. पहिला शंभर वर्षातही काँग्रेस युरोप बाहेर भरवली गेलीच नाही.
मागच्या ५० वर्षातही काँग्रेस आशिया खंडातील देश, आफ्रिका खंडातील देश अशी इतरत्र भरवली गेली आहे. काही स्थित्यंतर आणि सकारात्मक बदल निश्चित दिसतात. पण आज ही ओढा गोऱ्या, पाश्चिमात्य जगातील अभ्यास, व्यक्ती, त्यांची जीवनशैली यांना केंद्रबिंदू मानतो असे दिसते. रोचक भाग असा आहे की ग्लोबल साऊथ म्हणजेच भारत, दक्षिण आफ्रिका, कॅरेबियन आयलंड इत्यादी देशांची व तिथे होणाऱ्या मानसशास्त्रावरच्या कामाची दखल आता घेतली गेली आहे; नव्हे घ्यावीच लागली आहे.
दीडशे वर्षात पहिल्यांदा २०१६ मध्ये पेममारास ही पहिली महिला अध्यक्ष बनली. ही ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ आहे. खेदाची बाब अशी आहे की हे पण टोकनीझम होते. २०२० ची काँग्रेस कोविड महामारीमुळे ऑनलाईन झाली. त्यामध्ये तिचे अध्यक्षीय भाषण तसंच चार वर्षांमधील धोरणात्मक प्रगती ही अतिशय सुमार होती. या काँग्रेसमध्ये मी ऑनलाईन सहभाग घेतला होता व त्यामुळे याची प्रचिती आली. २००८ पासून २०२४ पर्यंत भारतीय प्रतिनिधी म्हणून मी या काँग्रेसकरता निवडले गेले व दक्षिण आशियातील स्त्रीवादी मानसशास्त्रीय परीप्रेक्षातून माझ्या संशोधनाबद्दलची मांडणी मला वारंवार करता आली. तसंच आंतरराष्ट्रीय ताणेबाणेही अनुभवता आले.
त्यातलेच अजून एक महत्त्वाचे निरीक्षण: २०१६ मध्ये योकोहोमा, जपान येथील इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रो. डॉ. साथ कुपर यांना ऐकण्याची व भेटण्याची संधी मिळाली. त्यांची आई भारतीय आहे व वडील दक्षिण आफ्रिकामधले. त्यांचे मूळ नाव सथा शिवन असे आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी नेल्सन मंडेलांबरोबर वंशभेदाच्या विरोधातल्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला तसेच पाच वर्षे तुरुंगवासही भोगला होता. सामाजिक न्यायाचे मानसशास्त्र हा त्यांचा विचार- व्यवहार आणि कृतीचा विषय आहे. २०१२ मध्ये ते IUPsyS चे पहिले आफ्रिकन अध्यक्ष झाले.
२००८ ते २०२४ च्या प्रत्येक काँग्रेसमध्ये ते सातत्याने सामाजिक न्यायाचे मानसशास्त्र आणि लिंगभाव, वंश, जात, धर्म यामुळे बळावणाऱ्या पूर्वग्रह वैमानस्य आणि हिंसा यावर केवळ मांडणीच करत नव्हते तर अनेक कृती कार्यक्रमही सुचवत होते. त्यांनी व त्यांच्या गटाने केलेल्या कृती कार्यक्रमांची चर्चा करत होते. वंशभेद आणि लिंगभेद दर्शवणाऱ्या कामांवर व व्यक्तींवर कोरडे ओढत होते! याचा फटका जागतिक कीर्ती तसंच अपकीर्ती हे दोन्ही मिळवलेल्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ.फिलीप झिंबारडोर्यांना बसला.
आता वळू या भविष्यातील मार्गक्रम कसा असेल याच्याकडे:
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आणि खर्चामधील कपात जाहीर केल्यामुळे जो फटका सर्वदूर बसला आहे तो प्रमुख प्रवाही मानसशास्त्रातील संशोधन, उपयोजन कार्य यालाही बसला आहे. तेथील विद्यापीठ, प्राध्यापक व संशोधक काळजीत आहेत व एकूणच उच्च शिक्षणामध्ये आता काय होईल याच्याबद्दलच्या आगामी काळाची एक भयंकर चिंता त्यांना सतावत आहे. अशा प्रकारचे भाष्य एपीएच्या संकेत स्थळावर वाचायला मिळतंय. मानसिक आरोग्यातील संशोधन तसंच हस्तक्षेपाच्या काम करता जो निधी कोविड महामारीनंतर राखून ठेवलेला होता त्यामध्येही आता प्रचंड कपात होणार आहे.
ब्रिटिश सायकॉलॉजिकल सोसायटी तसेच कॅनेडियन सायकॉलॉजिकल असोसिएशनसुद्धा जागतिक घडामोडी, जगभरातील संघर्ष, युद्ध किंवा युद्धसदृश्य परिस्थिती याच्याबद्दल काळजी व्यक्त करत असतानाच मानसशास्त्रातील विचार, व्यवहार व उपयोजना करता पुरेशी तरतूद व संसाधनांशी जुळवता येते आणि समाजाभिमुख काम कसं चालू ठेवता येईल ज्याची आज कधी नव्हे ते सर्वाधिक आवश्यकता आहे याचा उहापोह करत आहेत.
या नंतर मी पाश्चिमात्य जगातील स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या एका उत्तम व सातत्यपूर्ण उपक्रमाची माहिती येथे देणार आहे. माझ्या पुस्तकामध्ये मी याबद्दल ठळक वैशिष्ट्यांसह विस्तृतपणे लिहिलं आहे. त्याची एक संक्षिप्त नोंद इथे घेते आहे. Building a Better Psychological Science of Gender/ Feminist Psychological Science असे त्या उपक्रमाचे नाव होते. हे काम अमेरिकेमध्ये २०११ ते २०१६ मध्ये केले गेले.
या मागची भूमिका अशी होती की साधारण १९७३ पासून स्त्रीवादी मानसशास्त्रामध्ये काम सुरू झाले व पाश्चिमात्य जगातील विविध स्त्री चळवळी, त्यातील प्रवाह इतर सामाजिक व परिवर्तनवादी चळवळी त्यांचे प्रवाह, ऐरणीवरील प्रश्न असं सर्व बरोबर घेऊन हे काम चालू होते. त्या विशिष्ट टप्प्यावर येऊन पुढच्या काळाकरता काही ठोस बांधणी करता येईल का की ज्यामुळे या विषयांमधील अध्यापन, व्यवहार आणि संशोधन याला स्त्रीवादाची एक योग्य धार मिळेल आणि अधिक उत्तम रीतीने काम होईल असा हा उपक्रम होता.
त्या करता सातत्याने स्त्रीवादी मानसशास्त्राच्या विविध उपशाखांमधून तसंच स्त्री अभ्यास व इतर जोडविषयांवर काम करणाऱ्या तरुण अभ्यासक, संशोधक व प्राध्यापकांची निवड केली गेली आणि पाच वर्ष चर्चा, मांडणी व आदान-प्रदान झाले. यामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या. एकतर अमेरिका व युरोपमधील या विषयांवर काम करणाऱ्या आणि काही थोड्या प्रमाणात ग्लोबल साऊथमधील सुद्धा एकत्र आल्या. काही प्राधान्यक्रम ठरवले गेले व आधी झालेल्या कामावर लिखाणही केले गेले. त्यावर विश्लेषणात्मक टिप्पणीही झाली आणि पुढच्या कामाकरता दिशा मिळाली.
यातून तयार झालेली पुस्तकसंच हे धोरण करते त्या त्या देशातील सरकारी यंत्रणा तसंच प्रमुख प्रवाही मानसशास्त्रातील काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं. या कामाची रचना, बांधणी आणि त्यातून परिणाम स्वरूपी तयार झालेलं दस्ताऐवजीकरण हा एक स्त्रीवादी मानसशास्त्राचा वस्तूपाठ ठरतो असे मला हे पुस्तक संच वाचल्यावर जाणवले. माझ्यापरीने अनेकांपर्यंत यातील मुद्दे मी पोहोचवले आहेत.
आता जाऊ या भारतातील आव्हानांकडे
इथे मी दोन्ही प्रकारची मांडणी करणार आहे. जे बहुतांशी निराशाजनक चित्र आहे ते ही विशद करणार आहे आणि ज्या आशावादी शक्यता दिसतायेत त्यांचीही नोंद घेणार आहे. अध्यापनाच्या पातळीवर आधीच्या लेखांमध्ये विस्तृतपणे मांडल्यानुसार आजही प्रमुख प्रवाही मानसशास्त्र आणि स्त्रीवादी मानसशास्त्र याच्यामधली दरी कायम आहे. ती भरून काढायचे प्रयत्न फार कमी प्रमाणात दिसतात. याची कारणे खूप व्यामिश्र आहेत पण आज जिथे एकूणातच उच्च शिक्षणालाच अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे त्यात इतर विषयांसारखेच मानसशास्त्र आणि स्त्रीवादी मानसशास्त्र यांनाही ही आव्हानं चुकणार नाहीत हे निश्चित.
व्यवहाराच्या पातळीवर मानसोपचाराचा विचार करता मी गेल्या पाच वर्षात सातत्याने The Good, Bad and Ugly of Mental Health मांडत आले आहे. यातले गुड अतिशय कमी आहे, बॅड वाढते आहे आणि अग्लीचा सुकाळ धक्कादायक आहे!
याची कारणे: मानसिक आरोग्यातील उपचारांचे विकृत बाजारीकरण, प्रशिक्षण व परिप्रेक्षकाचा अभाव आणि कायदे आणि नीतिनियमांचा आभाव. कोणीही उठते आणि आज 'मानसतज्ज्ञ' बनत आहे. त्या करता आवश्यक असलेले काटेकोर प्रशिक्षण, पूर्वानुभव, कल, व्यक्तिमत्त्व, लोकाभिमुख कामाचा निश्चय, हे काही काही नसले तरी चालते. त्यात भरीस भर म्हणून इंस्टाग्राम मेंटल हेल्थ इन्फ्लुअन्सर्स, एआयएमएलचा वापर करून केले जाणारे उपचार! यांच्यावर कोणतेच नियंत्रण किंवा निर्बंध नसणे! अशी अनेक आव्हानं आ वासून समोर उभी आहेत! या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याकरता सज्ज असणे क्रमप्राप्त झाले आहे!
अर्थात हा धुमाकूळ जास्त प्रमाणात मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, समुपदेशन आणि मानसोपचार इथे आढळतो. प्रशिक्षणाच्या बाबतीत काटेकोरपणा मनोचिकित्सा, जी जैववैद्यकीय शाखा आहे तिथे पाळलेला दिसतो.
भोवतालच्या घडामोडीमधील आशादायक गोष्टींची दखल घेत त्या ही इथे नोंदवत आहेत. या आशादायक गोष्टींमुळे भविष्यामध्ये यांचे प्रमाण वाढेल अशी इच्छा करायला हरकत नाही असे वाटते. आधीच्या लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रमुख प्रवाही मानसशास्त्रामध्ये एक उतरंड निश्चित दिसते आणि त्याला टक्कर देत तथाकथित तळातल्या व्यक्तींनी कौशल्य आणि दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर आज भारतामध्ये प्रमुख प्रवाही मानसशास्त्राला प्रश्नांकित करणे आणि वेगळे पर्याय, विचार, व्यवहार आणि उपयोजनांमध्ये बांधणी करून तयार करणे हे केलेले आहे.
यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अनुभूती ट्रस्टच्या दीपा पवार. त्या स्वतः डीटीएनटी कार्यकर्ती आहेत. लिंगभाव आणि मानसिक आरोग्यावरचे त्यांचे काम हे अतिशय मूलभूत आणि प्रत्ययकारी आहे. या कामाचा स्त्रोत सामाजिक समता, न्याय आणि त्याचा मानसिक आरोग्याशी असलेला निकटचा संबंध हा आहे. दीपा असं म्हणतात की असमानता हे मानसिक अनारोग्याचे प्रमुख कारण आहे. संसाधनांचा अभाव, भेदभावाचे वर्तन, दुय्यमत्व आणि वंचितता आणि सततचा सामाजिक जाच आणि अन्याय दूर करणे याची निकड आहे. चौदाव्या वर्षांपासून गेली २२ वर्ष त्या सातत्याने काम करत आहेत. त्यांचे नुकतेच आलेले पुस्तक 'पोलादी बाया' आणि त्यांच्या व्यापक कामाची आज देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते आहे. त्यांचं काम, त्याची व्यापकता, हे निश्चितच आशादायी आहे आणि प्रेरकसुद्धा!
दुसरा आशावादी पैस म्हणजे दिव्या कंडूकूरी. त्या ब्लू डॉन नावाचा मानसिक आरोग्य समूह गट चालवतात. जात आणि मानसिक आरोग्य याला अधोरेखित करणारे हे काम आहे. दीपाप्रमाणेच सामाजिक समता, न्याय आणि मानसिक आरोग्याचा अनन्य साधारण संबंध आहे असं त्याही मानतात. त्यांचं लिखाण, हस्तक्षेपाचं काम व धोरणात्मक काम हे सर्व बहुजनवाद, जात आणि मानसिक आरोग्याला अधोरेखित करणारे आहे. प्रमुख प्रवाही मानसोपचार पद्धतीने डावलून, प्रश्नांकित करून, त्या स्त्रीवादी मानसोपचार पद्धतीच्या सर्वात जवळ येणाऱ्या नॅरेटिव थेरपीचा उपयोग करतात. स्वतःच्या आंतरजातीय-अंतरधर्मीय वास्तवाचा त्या आपल्या कामांमध्ये उपयोग करून घेतात. या दोघींच्या कामामुळे भारतातील स्त्रीवादी मानसशास्त्रीय कामाला बळकटी येत आहे.
समारोपाच्या लेखाचा शेवट भविष्याकरता रोड मॅप देऊन करणार आहे
ज्याला मी ‘फॅमिनिस्ट युटोपिया फॉर सायकॉलॉजी' असे म्हणते. पुढच्या काळामध्ये मानसशास्त्रातील विचार, व्यवहार आणि उपयोजने या चार महत्त्वाच्या गोष्टींची दखल घेतील, निर्माण करण्यामध्ये भागीदार असतील अशी अपेक्षा करते: सर्वप्रथम समताधिष्ठित घर-कुटुंब, सर्वसमावेशक अध्यापन क्षेत्र, समताधिष्ठित कामाचे ठिकाण, आणि सुरक्षित भवताल! त्या करता योग्य ते समाजमानस तयार करायलाही मदत करतील!
स्त्रीवादी मानसशास्त्र आणि लोकाभिमुखह मानसशास्त्र भारतामध्ये अधिक दृढ करण्याची गरज तीव्र झालेली आहे. असे झाले तरच सर्वांकरता मानसिक आरोग्य, मूलभूत हक्क म्हणून पोहोचवणे शक्य होईल असे वाटते! त्या करता पारंपारिक व पठडीबाजपणे काम करणाऱ्या लोकांनी जागे होण्याची गरज आहे आणि नव्या उमेदीने जे थोड्याफार प्रमाणात लोकाभिमुख मानसशास्त्रात काम करत आहेत त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. मानसशास्त्रामध्ये गेल ओमवेड्त म्हणतात त्या प्रमाणे ‘सीकिंग बेगमपुरा'ची सक्त गरज आहे!
प्रा.डॉ.साधना नातू
(प्राध्यापक व विभाग प्रमुख मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञ, संशोधक, कार्यकर्ती, अभ्यासक, स्वयंसेवी संस्थांच्या सल्लागार, POSH समिती तज्ज्ञ)
(अजून संदर्भाकरता कृपया ईमेल करणे dr.sadhana.natu@gmail.com)