या कालखंडाचा मागोवा घेताना कोविड महामारी आणि त्याच्या पश्चात जगात त्यामध्येही स्त्रीचळवळ, सामाजिक चळवळी आणि जगभरातील उलथापालथीचा काय परिणाम मानसशास्त्रातील विचार आणि व्यवहारावर झाला याचा आढावा मी घेणार आहे.
पण त्याआधी २०१९-२० मध्ये डॉ.पायल तडवी हिच्या आत्महत्येमुळे जो गंभीर मुद्दा अधोरेखित झाला त्याकडे मला लक्ष वेधायचे आहे. युवा भारत या संस्थेने त्या निमित्ताने एक सार्वजनिक कार्यक्रम आणि चर्चा आयोजित केली होती आणि त्यामध्ये स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून एक कारणमीमांसा मी मांडली. वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये सारखे सारखे हे उगाळले गेले की वैद्यकीय शिक्षणाचा अवघड अभ्यासक्रम तिला जमला नाही व त्या प्रकारच्या भोवतालमध्ये ती समायोजन करू शकली नाही व म्हणून तिला समुपदेशन आणि मानसोपचाराची गरज होती! मला अशा प्रकारचे हे निष्कर्ष मुळात खटकले आणि अमानवी वाटले! तिच्यासारखी तडवी मुस्लिम कुटुंबातील पहिल्या पिढीची शिकलेली वैद्यकीय स्नातक जेव्हा पुढील शिक्षणाकरता एका वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये जागा मिळवते त्या वेळेला तिच्याबरोबरच्या सहकारी विद्यार्थ्यांची तिला स्वीकारण्याची, समाविष्ट करण्याची, समान वागणूक देण्याची तयारी नसणे हा मुद्दा प्रकर्षाने जाणवला. खरं तर त्या सहकाऱ्यांना समावेशनाचे समुपदेशन करायची नितांत आवश्यकता होती मग हा हकनाक बळी टाळता आला असता!
जागतिक कोविड महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य संरचना किती तकलादू आहे आणि त्यातही विशेष करून विकसनशील देशांमध्ये ती किती अधिक तकलादू आहे याची एका अर्थी पोलखोल झाली. मानसिक आरोग्य या क्षेत्राकरिता या अतिशय अवघड काळात एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे समाजामध्ये मानसिक आरोग्याचे, त्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. २०१७ मध्ये भारतामध्ये मानसिक आरोग्य कायदा लागू झाला ज्याच्या आधारे एक महत्त्वाचे विधान केले गेले की मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा ‘हक्क' आहे. पण २०२० मध्ये हे कळून चुकले की जेव्हा सार्वजनिक आरोग्य संरचनेमध्ये पुरेसे प्रशिक्षित मनोचिकित्सातज्ज्ञ चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, मनोचिकित्सात्मक समाज कार्यतज्ज्ञ व इतर समुपदेशक नाहीत, असे असताना सामान्य व्यक्ती आपला मानसिक आरोग्याचा हक्क कसा मिळवू शकेल हा प्रश्न अनुत्तरीतच राहतोय.
याच काळात अजून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली आणि सिद्धही झाली ती म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता प्रशिक्षित मानसिक आरोग्यतज्ज्ञांचे काम अधिक लोकाभिमुख होण्याची गरज! ज्या वेळेला हजारो कामगार, स्थलांतरित लोकांचे जथे उपचाराकरता येत होते तेव्हा त्यांच्या पार्श्वभूमीची माहिती असणे आवश्यक होतं. त्या करता जात, वर्ग, लिंगभाव, लिंगभाव, वंचितता, अशा अनेक सामाजिक ओळखी घेऊन लोक जगत असतात. त्यामुळे प्रत्येकाचा मानसिक आरोग्याचा प्रश्न हा वेगवेगळा असतो. याचे आकलन न झाल्यामुळे एक साचेबद्ध, पठडीबाज असा औषधोपचार आणि मानसोपचार उपयुक्त ठरत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आम्ही मर्यादित संख्येतील लोकं लोकाभिमुख मानसोपचार पद्धती वापरत असल्यामुळे आम्हाला विविध स्तरावरचे कोविड महामारीतले मानसिक आरोग्याचे प्रश्न हे कसे सुटेसुटे पाहिले पाहिजेत हे आकळले होते. अर्थातच आमचा हस्तक्षेप जो ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आम्ही केला ते प्रयत्न तोकडे पडले. बहुसंख्या तज्ज्ञ सरधोपट मार्गानेच काम करत राहिले. अशा प्रकारच्या उपचाराची एरवीची विश्वसनीयता आणि प्रभावीपणासुद्धा ग्राह्य धरता येत नाही तर, कोविड काळात तर अशा सेवा या निष्प्रभ ठरल्या.
मागच्या लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे मानसिक समस्याही व्यक्तीमध्ये नसते आणि व्यक्तीही समस्या नसते. तर सामाजिक वास्तव आणि परिस्थितीशी करावा लागणारा मुकाबला हा जैविक कारणा इतकाचमनोसामाजिक कारण म्हणून समोर येतो आणि त्यावर प्रशिक्षण घेणं अशा प्रकारचे लोकाभिमुख परिप्रेक्ष तयार होणं आणि तज्ज्ञांनी काम करणे हे किती आवश्यक आहे हे प्रत्ययास आले.
विविध प्रकारच्या ऑनलाइन संवादातून ज्या ज्या गटांनी मला आमंत्रित केले तिथे मी हा संदेश पोहोचवायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ युवा भारत या संस्थेकरता घेतलेले पुढील संवाद: सामाजिक मानसशास्त्र आणि चिकित्सा मानसशास्त्राचा परस्पर संबंध, स्त्रीवादी मानसोपचार आणि मानसशास्त्र यातील विचार व व्यवहार, आधारगट व त्यांचे कार्य, लोकाभिमुख मानसशास्त्राची गरज इत्यादी. या प्रशिक्षण आणि संवादामध्ये अनेक कार्यकर्ते, अभ्यासक, विद्यार्थी आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये विविध प्रकारचे काम करणारी मंडळी सहभागी झाली होती. खरंतर या मांडणीवर स्वतंत्र लेख लिहायची गरज आहे आणि त्याच्याकडे मी पुढे लवकरच वळेन.
समा या दिल्लीमधील नावाजलेल्या संस्थेकरतासुद्धा ऑनलाइन चर्चासत्रात मी सार्वजनिक आरोग्य सेवेतील मानसिक आरोग्य सेवांमधील त्रुटी आणि त्या कोविड महामारीच्या निमित्ताने कशा अधोरेखित झाल्या व कशा भरून काढता येतील यावर मांडणी केली. बेबाक कलेक्टीव्ह या मुंबईमधील गरीब व गरजू मुस्लिम समाजामध्ये काम करणाऱ्या संस्थेकरतासुद्धा एका ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये मी साधनतज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला होता. Dismantling Islamophobia: मुस्लिम समुदायाबद्दलची भीती आणि द्वेष नष्ट करणे अशी या प्रशिक्षणाची संकल्पना होती. त्यामध्ये मी मुस्लिम समुदायाबद्दलचे पूर्वग्रह, द्वेष, स्थिरप्रतिमा आणि विचित्र संवेदन यांचा मुस्लिम समाजाच्या मानसिक आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतो यावर मांडणी केली.
अर्थातच याही काळात प्रमुख प्रवाही मानसशास्त्रामध्ये काम करणारे बहुसंख्य लोकं मग ते प्राध्यापक असोत मानसोपचारतज्ज्ञ असोत समुपदेशक असोत किंवा संशोधक असो त्यांच्या त्याच काळातील लिखाण आणि बोलण्यामध्ये या कोणत्याही घुसळणीचा काही परिणाम झालेला बिलकुलच आढळला नाही! मला मात्र ज्या ज्या ऑनलाइन व्यासपीठावर संधी मिळाली तिथेही लोकाभिमुख मांडणी मी परत परत न कंटाळता अधोरेखित करत राहिले. अनेक तालुका पातळीवरच्या, राज्यातल्या व राष्ट्रीय पातळीवरच्या ऑनलाइन थेरपी विनाशुल्क देणाऱ्या गटांमध्ये त्या वेळेला मी सहभाग नोंदवला. काही प्रमाणात का होईना हस्तक्षेपामध्ये आपला खारीचा वाटा उचलता आला आणि काही मूठभर सजग व्यक्तींबरोबर स्वतःला जोडून घेता आले.
१. मी, माझी सहकारी, पीएच.डी.ची विद्यार्थिनी व एम. ए.च्या दोन विद्यार्थिनींनी मिळून २०२०-२१ मध्ये लाईव्ह रिसर्च प्रोजेक्टही पार पाडला. कोविडच्या पहिल्या फेजमध्ये आम्ही २ मानसशास्त्रीय चाचण्या तयार केल्या ज्यांची नावं होती: COVID Distress Screening Tool, Extensive COVID Distress Tool . ऑनलाईन संशोधन करून आम्ही डेटा गोळा केला व त्याचे विश्लेषण केले. यामध्ये आम्ही अशी खबरदारी घेतली की विश्लेषणाच्या आधारे निष्कर्ष काढल्यावर ज्या व्यक्ती सौम्य ताण अनुभवत होत्या त्यांनी काय करावे यावर आम्ही उपाय सुचवले. ज्यांना अधिक ताणातून जावे लागत होते त्यांच्या ताणाचे मापन करण्याकरता आम्ही आमची दुसरी चाचणी वापरली व त्याच्या आधारे जास्त सूक्ष्म निष्कर्ष आम्हाला मिळाले. या लोकांना आम्ही मोफत मानसोपचार देणाऱ्या विविध व्यक्तींचे फोन नंबर आणि माहिती पुरवली. या अभ्यासामुळे आम्हाला अनेक गोष्टी नव्याने शिकता आल्या. एक म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यक्तींना केवळ सौम्य ताण या कोविड महामारीच्या वेळेला अनुभवायला आला आणि कोणत्या प्रकारच्या व्यक्ती या अधिक ताणाला सामोरे गेले. दुसरं असं की विविध प्रकारच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचं कोपिंग किंवा सामोरे जाण्याचे तंत्र वापरलं. या सर्व अभ्यासावर आम्ही एकत्रितपणे शोधनिबंध लिहिला आणि तो प्रकाशितही केला. (References: 1.Exploring COVID 19 related Distress: A Mixed Methods Approach’ in Journal of Psychosocial Research, New Delhi Jan- June 2021
Lockdown te Unlock: Streeyanche Manasik Arogya in punhasrtiuvach.blogspot.com, July 2020. COVID and Crisis of Care: Feminist Psychological View in miloonsrayajani.in, August 2020) कोविड आणि कोविड पश्चातच्या लागलीच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्रीवादी कार्यकर्त्या, स्त्रीवादी अभ्यासक यांनी अनेक मांडण्या केल्या ज्यातून मला तरी स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञ म्हणून खूप शिकता आले. त्याचा उपयोग मी स्वतःकरता स्वतःच्या कामाकरता आणि माझ्या विद्यार्थी आणि संशोधकांकरता पुरेपूर करून घेतला. जुडीथ बटलर या जागतिक पातळीवरीलच्या Queer Rights, Queer Studies कार्यकर्ते अभ्यासकाची मांडणी ऐकायला मिळणं हा एक अतिशय दिलासादायक आणि सुखद अनुभव होता. असे अनेक ऑनलाइन प्रशिक्षणाचे क्षण, शिकण्याचे क्षण या कोविड महामारीमुळे मिळाले हे नाकारून चालणार नाही.
कोविड महामारीच्या नंतर २०२१ मध्ये रूढ झालेली संज्ञा म्हणजे ‘न्यू नॉर्मल' मला वाटतं प्रत्यक्षात मात्र आपण ‘बॅक टू बिझनेस ऍज युजुअल' ‘द सेम ओल्ड नॉर्मल'ला परत गेलो आहोत, म्हणजे जैसे थे परिस्थिती. ज्या दया, करुणा आणि सामूहिक आधाराची गरज अतिशय तीव्रतेने कोविड महामारीने जगभर प्रस्थापित केली होती त्यातून आपण सहज बाहेर पडलो आहोत. केवळ प्रमुख प्रवाही मानसशास्त्रातील विचार आणि व्यवहारच नव्हे तर सर्वांचाच दैनंदिन आयुष्यातील विचार आणि व्यवहार पुन्हा एकदा स्वार्थी, असंवेदनशील बनलेला आहे!
आधीच्या लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा जो पुढे सुद्धा २०२० ते २०२५ या काळातही पेच निर्माण करत होता तो म्हणजे अभ्यासक्रमाचा मुद्दा. राष्ट्रीय अनुदान आयोगाने २००१ व पुढे २०१६ मध्ये मॉडेल अभ्यासक्रम आणलेला होता. त्यानंतर २०२० मध्ये एनईपी धोरण आले. मधल्या काळात यु. विंध्या, कुमार रवीया, रचना भानगावकर, किरणकुमार व मी (साधना नातू), भारतातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अशा चार विभागातील प्राथमिक विद्यापीठांच्या मानसशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सविस्तर विश्लेषण करत एक मांडणी NAOP च्या आमच्या वार्षिक राष्ट्रीय संमेलनामध्ये मांडली. विश्लेषणाचे काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे होते: या अभ्यासक्रमांची उपयुक्तता, त्यामध्ये संशोधनावर किती प्रमाणात भर असतो कोणत्या अभ्यास व संशोधन पद्धतींचा अभ्यासक्रमात अंतर्भाव केला जातो, भारतीय मानसशास्त्रज्ञांचे काम व योगदान कितपत समाविष्ट केले जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरविद्या शाखीय दृष्टिकोन आणि चिकित्सात्मक परिप्रेक्ष याला आधारून अभ्यासक्रम रचला गेला आहे किंवा नाही. यावरची मांडणी आम्ही पाचजणांनी २००८ च्या आयआयटी गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय संमेलनामध्ये केली.
आता गंमत बघा याच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे NEP २०२० निर्देश करत आहे! या सविस्तर अभ्यासातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि चिकित्सात्मक परिप्रेक्षाची कमतरता, अभ्यासक्रम अधिक रोजगाराभिमुख बनवण्याची गरज! २००८ मध्ये आम्ही जो अभ्यास केला आणि उपाययोजना मांडली ती आज २०२० पासून काही प्रमाणात कार्यान्वित केली जात आहे याकडे कसं बघायचं हा प्रश्नच पडतो! देर आय दुरुस्त आहे असं म्हणायचं का वाया गेलेल्या काळाबद्दल दुःख करायचं? या लेखमालेच्या दृष्टीने या चिकित्सात्मक परिप्रेक्ष्यामध्ये स्त्रीवादी परिप्रेक्ष परिवर्तनवादी आणि मानवतावादी परिप्रेक्ष, त्यातून समोर आलेले अनेक प्रश्न, आकलन, विविध व्यक्ती, संस्था आणि चळवळींचे काम हे अर्थातच मुख्य प्रवाही मानसशास्त्राच्या या अभ्यासक्रमामध्ये अतिशय कमी प्रमाणात आढळले. आणि तेसुद्धा परिवर्तनवादी विचार आणि चळवळीशी संबंध असलेल्या व्यक्तीने काही रणनीती वापरून खूप जोर लावल्यामुळे त्यांचा समावेश केला गेला असं म्हणावं लागेल!
आता अजून एका महत्त्वाच्या विषयाकडे वळू या.
१९७५ मधल्या स्त्रीचळवळीची खासियत ही आहे की दलित, बहुजन, आदिवासी महिलांचे प्रश्न तसंच समलिंगी व पारलिंगी व्यक्तींचे प्रश्न ऐरणीवर आले. स्त्रीवादी मानसशास्त्राने आणि वैविध्यवादी मानसशास्त्राने (Diversity Psychology) त्याची योग्य ती दखल घेतली. विचार, व्यवहार आणि उपयोजित क्षेत्रात जेंडर बायनरी जाऊन जेंडर स्पेक्ट्रमचा विचार होऊ लागला. यालाच जोडून पुण्यामध्ये काही कार्यकर्त्या, अभ्यासकांच्या पुढाकाराने लिंगभाव आणि लैंगिकतेवर काम करणाऱ्यांचा ‘सेतु संवादाचा' हा गट आणि उपक्रम २०१८ मध्ये सुरू झाला.
त्यामध्ये काही straight/cis gender व्यक्ती ज्या कार्यकर्ता, अभ्यासक आहेत तसंच समलिंगी आणि पारलिंगी व्यक्ती यांचा समावेश होता. पण गटाचा मूलभूत हेतू केवळ जेंडर आयडेंटिटीचा नसून सर्वच प्रकारच्या व्यक्तींच्या अनेक आयडेंटिटी आणि जीवनाकडे बघण्याचा जास्त व्यापक दृष्टिकोन समाजाने अंगीकारला पाहिजे असा होता. समलिंगी आणि पारलिंगी मित्रमैत्रिणी असं म्हणत होते की लैंगिकता ही आमची एकमेव ओळख नसून तो आमच्या जगण्याचा अविभाग्य भाग जरूर आहे. आम्ही लेखक, कवी/कवयित्री, कार्यकर्ता/कार्यकर्ती, शास्त्रज्ञ अशा व्यावसायिक आणि व्यक्तिगत ओळखी घेऊनही जगतो आणि त्यामुळे विविध परिवर्तनवादी चळवळी, व्यापक समाज आणि आमच्यामध्ये एक संवाद सेतू बांधण्याची गरज आहे हे या उपक्रमांमध्ये अधोरेखित झाले.
या करता वर्षभर बैठका झाल्या आणि २०१९ मध्ये Queering the World असे संमेलन आम्ही भरवले ज्या करता कार्यकर्ते, अभ्यासक, विद्यार्थी व मुव्हमेंटमध्ये कार्यकर्ते व इतर सहभागी झाले होते. Queering Mental Health वर मी बोलले ज्यामध्ये ठळकपणे चिकित्सा मानसशास्त्र आणि मानसोपचारांमध्ये समलिंगी व पारलिंगी व्यक्तींवर, निदान आणि उपचारांमध्ये झालेला अन्याय अधोरेखित केला आणि कन्वर्जन थेरपीसारखे अघोरी उपाय थांबवण्याची गरज अधोरेखित केली. उपक्रमावर शमीभाने लोकसत्तेमध्ये एक अतिशय उत्तम लेखही लिहिला होता.
हा सेतूसंवादाचा ग्रामीण आणि तालुका ठिकाणी नेण्याची नितांत गरज भासली आणि तसे प्रयत्न सुरू झाले पण पुढे २०२० मध्ये आलेल्या कोविड महामारीमुळे यामध्ये खंड पडला.
२०२१ मध्ये चीफ ईलेक्शन ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने एक विचार आणि कृतीगट तयार केला गेला. हेतू असा होता की २०२४ च्या लोकसभा निवडणुकांकरता पारलिंगी व्यक्तींना मतदानाचा हक्क मिळवून देणे. या विचार आणि कृतीगटामध्ये अनेक अभ्यासक, कार्यकर्ते स्वतः विविध प्रकारचे काम करणाऱ्या पारलिंगी व्यक्ती यांचा समावेश होता. या कामाची उपलब्धी अशी झाली की २०२२ मध्ये ३१ मार्च ट्रान्स विजीबिलिटी डेला पुण्यापासून सुरुवात होऊन पारलिंगी व्यक्तींनी पुढे महाराष्ट्रभर मतदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवले!
या कार्यक्रमांमध्ये लिंगभाव, लैंगिकता यावर काम करणाऱ्या कार्यकर्ता अभ्यासकांचा सत्कार तसंच पारलिंगी व्यक्तींनी सादर केलेला एक अतिशय उद्बोधक, नाविन्यपूर्ण आणि सर्वांची मन जिंकून घेणारा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. इथेच पुढे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या राज्य पातळीच्या संमेलनाची उद्घोषणाही झाली. संमेलनाची मुख्य कल्पना होती पारलिंगी व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. या संमेलनामध्ये मला आपल्या पाल्यांचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद साधता आला आणि त्यावर आधारित लेख हा महाराष्ट्र सरकारने काढलेल्या ‘आम्हीही भारताचे लोक' या पुस्तकात छापून आला. पारलिंगी व्यक्तींचे समुपदेशन, लैंगिकता व लिंगभावावरील अनेक वर्षांचे संशोधक, अभ्यासक आणि प्राध्यापक म्हणून काम, तसंच स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञ, असल्यामुळे मला ही संधी मिळाली आणि एका ऐतिहासिक क्षणांमध्ये सहभाग नोंदवता आला आणि पालक तसेच पारलिंगी व्यक्तींना अधिक खोलात जाऊन समजून घेणे आणि माझ्या मांडणीमध्ये समाज म्हणून आपले पारलिंगी व्यक्तींच्या परी उत्तरदायित्व अधोरेखित करता आले. या अनुभवातून मला खूप शिकता आले आणि त्याचा उपयोग मी प्रमुखप्रवाही मानसशास्त्रज्ञांशी बोलताना करून घेतला.
अर्थात अशा प्रकारचा संवाद हा प्रमुखप्रवाही मानसशास्त्रातील विचार आणि व्यवहारांमध्ये झिरपण्याची अतिशय गरज आहे. हे आजही भारतीय संदर्भात पाहिजे तेवढ झालेले नाही याची खंत वाटते.
अजून एक महत्त्वाची धोरणात्मक गोष्ट म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने २०१६मध्ये एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. ज्याचे श्रेय मिशेल फंक या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती संचालक यांना जाते. मिशेल फंक यांच्या पुढाकाराने जगभरातील विविध देशातील मानसिक आरोग्यातील नेतृत्व प्रतिनिधींनी एक मोहीम हाती घेतली. याचे प्रमुख उद्दिष्ट होते पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तयार करणे व पुढील काळात ते कार्यान्वित करणे. यामध्ये विविध देशातील आरोग्य खात्याचं सरकारी नेतृत्व बिगर शासकीय संघटना तज्ज्ञ अशा विविध व्यक्ती यामध्ये काम करत होते.
२०१६ मध्ये इंटार( INTAR) आंतरराष्ट्रीय परिषद पुण्याजवळील लवासा येथे पार पडली. बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माईंड अँड डिस्कोर्स, ही पुण्यातील संस्था व विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी मिळून याचे आयोजन केले. अकादमीक मानसशास्त्रज्ञ व मानसशास्त्र विभागापैकी आम्ही खूपच कमी लोकं व आमचे विद्यार्थी आणि संशोधक यामध्ये सहभागी झालो होतो. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, मानसिक आरोग्य चळवळीतील अभ्यासक व कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथे देश – विदेशातून जमा झाली होती, अनुभवावर खरंतर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल पण ते पुन्हा केव्हातरी!
या सर्व आदान-प्रदानामध्ये आम्ही काही स्त्रीवादी मानसशास्त्रज्ञसुद्धा होतो. इथे मला, मिशेल फंकने ज्या अनेक उपसमित्या धोरणात्मक कामाकरता तयार केल्या त्यामध्ये समाविष्ट होण्याची संधी मिळाली. आम्ही जगभरातील काही लोकं WHO Quality Rights करता लिंगभावाचे मानसशास्त्र, व स्त्रीवादी मानसशास्त्राच्या परिप्रेक्ष्यातून, भूमिकेतून, संशोधनातून, सूचनांचा समावेश करत होतो. यात जगभरातील आम्ही मोजके प्रतिनिधी होतो. या कामातून एक प्रचंड ऊर्जा मिळाली आणि जागतिक पातळीवर धोरणात्मक बदलाच्या या मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या कृती कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता आला व योगदान देता आले याचा मनस्वी आनंद वाटतो.
मिशेल फंकने ग्लोबल साऊथची योग्य नोंद घेतली व आदरही केला! याचे कारण ती मानसशास्त्रज्ञ तर आहेच पण त्याशिवाय कायदा, समाजकार्य आणि लोकाभिमुख कामाचा तिचा दांडगा अनुभव. जो केवळ युरोप-अमेरिकेतला नव्हता तर सबसहारण-आफ्रिका व आशियाई देशांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. यातून पुन्हा एकदा एक बाब निश्चितच समोर येते आणि ती म्हणजे धोरणात्मक कृती कार्यक्रम राबवणारे लोकाभिमुख अनुभव घेणे त्या प्रकारची माणसही आपल्या कामांमध्ये सहभागी करून घेणे याची किती नितांत गरज आहे तरच मानसिक आरोग्य धोरणांमध्ये परिवर्तन होऊ शकेल.
२०२१ मध्ये या धोरणाचं ऑनलाइन प्रकाशन झालं. त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना Bottom – Up अपरोच ठाईठाई भरलेला होता. स्वतः मानसिक आजारातून गेलेल्या व्यक्तींना दिलेले प्राधान्य, ग्लोबल साऊथमधील व्यक्ती, संस्था आणि अधिकाऱ्यांना दिलेले प्राधान्य, हे लक्षणीय होतं. माझ्या विभागातील अभ्यासक्रमामध्ये या डब्ल्यूएचओ कॉलेटीराईटचा अंतर्भाव मी त्याच वर्षी केला. चिंतेची गोष्ट ही आहे की डब्ल्यूएचओच्या वेबसाईटवर हे नवे पाऊल, हे नवे धोरण उपलब्ध असतानासुद्धा या धोरणाचा भारतातील विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला दिसत नाही! अभ्यासक व संशोधकांनी प्रमुखप्रवाही मानसशास्त्रातील विचार व्यवहारामध्ये या पुरोगामी धोरणाचा उपयोग केलेला आढळत नाही.
नुकतंच २०२५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने याचा पुढचा टप्पा म्हणून पॉलिसी अँड गाईडन्स ऑन मेंटल हेल्थ नावाचे अजून एक धोरण आणि कृती कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये सुद्धा जगभराकरता सारासार विचार केलेला दिसतो आणि अनेक देशातील आरोग्य खात्यातील तज्ज्ञ, अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ व मनोचिकित्सज्ञ यांचा सहभाग पुन्हा एकदा आढळतो. याचेसुद्धा ऑनलाईन प्रकाशन झाले आणि त्यामध्ये सहभागी होताना पुन्हा एकदा धोरणकर्त्यांचा लोकाभिमुख परिप्रेक्ष बघून आनंद झाला. प्रमुखप्रवाही मानसशास्त्रातले सहकारी, दिग्गज, धोरणकर्ते आता तरी या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूयात.
पुढील अंकामध्ये समारोपाचा लेख मी लिहिणार आहे आणि त्यामध्ये मानसशास्त्रातील विचार आणि व्यवहारातील या पुढची दिशा कशी असावी यावर भाष्य करेन.
डॉ. साधना नातू , पुणे
(अजून संदर्भाकरता कृपया मला ईमेल करणे dr.sadhana.natu@gmail.com)