लष्कर दलातील कहाणी

वृषाली मगदूम कायदे
०१ जून २०२५

लष्करात कार्यरत असलेल्या व न्याय न मिळालेल्या एका धाडसी सैनिक महिलेच्या लैंगिक शोषणाची ही कहाणी आहे. मायला हैदर २००२ मध्ये सैन्य दलातील गुन्हेगारी शोध या तिच्या आवडीच्या विभागात रुजू झाली होती. ती कामावर असताना पहाटे दोन वाजता तिच्या सहकारी सैनिकाकडून तिच्यावर बलात्कार झाला, हल्लेखोर अमेरिकन आर्मी लॉ एनफोर्समेंट एजंट होता. त्याने मायलाला सकाळपर्यंत बराकमध्ये कैद्यासारखे डांबून ठेवले. पण मायलाने तक्रार केली नाही. लष्कराची लैंगिक शोषणाच्या प्रश्नाकडे पाहण्याची एकंदर प्रवृत्ती मायलाला माहीत होती. अशा प्रकारची तक्रार केलेली सैन्य दलातील महिला तिच्या माहितीत नव्हती. मायला समोर तिचा भविष्यकाळ उभा होता. लष्कराच्या गुन्हेगारी तपास यंत्रणेत तिला एजंट व्हायचे होते. त्यासाठी तिने एक वळणदार मार्ग निवडण्याचा निश्चय केला. सतत चालू असलेले युद्ध तिच्या प्रशिक्षणात अडथळा आणत होते. मायला हैदर १९९४ ते १९९९ या काळात अमेरिकेतील सैन्य दलात होती. २००० ते २००५ पर्यंत ती कोरिया येथे सीआयडीमध्ये होती. सीआयडी हे मिलिटरीमध्ये गुन्हे, बलात्कार, लैंगिक हल्ले याची चौकशी करत असतात. लष्करातील तिच्यावर झालेल्या या हल्ल्याची जरी तिने तक्रार केली नसली तरी अखेरीस ती नैराश्यात गेली. आजही या लैंगिक शोषणाच्या खुणा ती वागवते आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना तिच्या मनात आहे. १०१ व्या एअर बोर्नमधील तिचे प्रमुख मार्टी हर्बर्ट यांनी तिला कमांडर बटालियनची गुप्तचर विश्लेषक म्हणून तिने इराकला जावे असे सुचवले. तिने तिच्या आवडीचा गुन्हेगारी शोध विभाग सोडून दिला, एकदा सैनिक असलेला नेहमीच सैनिक असतो असे मायलाला वाटते. मार्टी हर्बर्टना तिचा रास्त अभिमान आहे. अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची, समानतेच्या विचाराचा आग्रह असणारी अशी ती करारी स्त्री आहे, असं ते म्हणायचे. २००२ ला मायला १०१ एअर बोर्न बरोबर कंधारला गेली. त्यानंतर २००३ मध्ये इराकला गेली, युद्धभूमीवरील अनुभव अतिशय चित्तथरारक होता, ती व तिचे तीन सहकारी सैनिक एका वाहनात अनेक दिवस अडकून पडले होते, लांबपर्यंत फक्त वाळूने वेढलेला परिसर होता. दोन आठवडे मायला तिच्या केमिकल सूटमध्ये होती. रोज त्या सर्वांना फक्त चार पाण्याच्या बाटल्या मिळत असत. पण तरीही ते दिवस अतिशय सुंदर होते, असे मायलाला वाटते. तिचे तिन्ही सहकारी मित्र अतिशय चांगले होते. त्यांच्याबरोबर एकत्र राहताना तिला कधीही भीती वाटली नाही. तिच्याबरोबरचे त्यांचे वर्तन अतिशय सभ्य होते. स्त्री म्हणून त्यांनी तिला वेगळी वर्तणूक दिली नाही. एक सहकारी म्हणून त्या वाळवंटात ते एकमेकांची चेष्टा मस्करी करायचे. त्यांच्याकडे एक नेर्फ फुटबॉल होता तो एकमेकांकडे उडवत राहायचे. युद्धभूमीवर असताना ते एकमेकांच्या आयुष्यातील समस्या सुख-दुःखे परस्परांना सांगून तणाव कमी करायचा प्रयत्न करायचे. पण मायलावर झालेला घाव मात्र तिने कोणाला सांगितला नाही. अतिशय जड अंत:करणाने ती एवढी मोठी जखम घेऊन आपल्या चेहऱ्यावर हसू आणून वावरत होती. मायलाने निश्चय केला आणि तिने ही भयंकर घटना भूतकाळात गाडून टाकायची ठरवले. हळूहळू ती शांत होऊ लागली. १०१ व्या एअरबोर्न विभागातील इराक व अफगाणिस्तान युद्धभूमीवरील पुरुष सहकाऱ्यांनी दाखवलेल्या वर्तनाने तिची जखम भरायला मदत झाली. तिचे मतपरिवर्तन झाले. सगळेच सैनिक लैंगिक शिकारी नसतात या मतापर्यंत ती आली. पण भूतकाळ असा लपून राहत नाही. सैन्य दलातील गुन्हेगारी शोध विभागात ती एजंट म्हणून परत आली. एके दिवशी या विभागातून एका अधिकाऱ्याचा तिला फोन आला. तिच्यावर बलात्कार केलेल्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा तपास चालू असल्याचे तिला सांगितले. हा संभाव्य साखळी बलात्कारित असून त्याने अनेकीवर बलात्कार केला आहे, त्यामुळे सैनिक दल त्याच्या गुन्ह्याचा शोध घेत आहे, असं तिला त्या अधिकाऱ्याने सांगितले. मायलाने या शोध मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे ठरवले. २०१० मध्ये मायलासह वॉशिंग्टन डी.सी. येथील पेंटागॉनमध्ये बलात्कारी महिला सैनिकांच्या वतीने खटला भरण्यात आला. पेंटागॉन हे अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय आहे, हे वॉशिंग्टन डी.सी.च्या जवळ व्हर्जिनिया राज्यातील अर्लींग्टन येथे आहे. २६००० लष्करी अधिकारी येथे काम करतात. सुसान ब्रुके यांनी ही केस चालवायला घेतली. सुसान ब्रुके ही आर्मी कर्नलची मुलगी आहे. लष्कराच्या संरक्षण विभागाने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी लष्करात १९००० लैंगिक हल्ले होतात. अगदी अलीकडच्या आकडेवारीनुसार ११०८ तक्रारी चौकशीसाठी नोंदवल्या गेल्या. त्यातील ५७५ तक्रारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. फक्त ९६ तक्रारी कोर्टापुढे आल्या. इतक्या कमी तक्रारींमध्येही न्याय मिळतच नाही, असं सुसान सांगते. कारण कोर्ट मार्शलमध्ये खटला भरणारा अधिकारी आरोप बदलू शकतो. शिक्षा कमी करू शकतो व निकालही फिरवू शकतो.

मेजर जनरल गॅरी पॅटन हे पेंटागॉनच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध समितीचे प्रमुख आहेत. माझ्या सैन्यात लैंगिक हल्ल्याला स्थान नाही, असं ते सांगतात. लैंगिक अत्याचारावर आधारित 'द इनव्हिजिबल वॉर’ नावाचा टिकात्मक माहितीपटही लष्कराच्या अभ्यासक्रमात आहे, असं ते सांगतात. या माहितीपटात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ या विषयीची माहिती दिली आहे. मायलाने या माहितीपटात काम केले आहे. किर्बी डिक हिने सदर माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. एमी झियरिंग व टॅनर किंग बार्कलो यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. मायलाने २०११ मध्ये वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की प्रशिक्षित लष्करी सैनिक व वकील यांनी बलात्काराच्या केसची कसून चौकशी केली पाहिजे. जोपर्यंत योग्य चौकशी होत नाही तोपर्यंत पिडीतेला त्याची किंमत मोजावी लागते. मायला हैदरच्या बरोबरीने अनेक जणींनी कोर्टात केस फाईल केली होती. इली हेन्मेटला तिच्या वरिष्ठानी पबमध्ये नेऊन बेशुद्ध करून बलात्कार केला. हा दुहेरी गुन्हा होता. पण इलीलाच अशोभनीय वर्तन म्हणून दोषी ठरवले. कर्लि मारक्वेंटने वरिष्ठाकडून बलात्कार झाल्याचे सांगितले. तर तिला दंडात्मक चालण्याची शिक्षा दिली. तिने नोकरीचा राजीनामा दिला. ॲन केंडझिर ही नेव्ही ॲकेडमीत होती, तिने जेव्हा वरिष्ठाकडून झालेल्या बलात्काराची तक्रार केली. तेव्हा तिचे मानसिक स्वास्थ बरोबर नसल्याचे सांगत तिला नोकरीवरून काढण्यात आले.

कर्स्टन गिलीब्रॅड व जॅकी स्पीयर या सिनेटर व वकील आहेत. यांनी २०२१ मध्ये सैन्यामधील लैंगिक छळाची माहिती फेडरल लेझिलेशन (कायदेमंडळात) दिली. जोनी अन्सर्ट या निवृत्त लष्करी अधिकारी व सिनेटर आहेत. त्यांनी आम्ही नक्की याची दखल घेऊ, असं आश्वासन दिलं. पण जुनेच बिल पास करून काहीही पावले उचलली नाहीत. मायलाने कोर्टात तक्रार केल्यानंतर तिला सैन्य दलातून काढून टाकण्यात आले. मायलाबरोबर अनेकींनी साक्ष दिली होती. आरोपीला नाम मात्र शिक्षा ठोठावली गेली. या शिक्षेतही लैंगिक गुन्हेगार म्हणून त्याची नोंद झाली नाही. मायलाने तक्रार नोंदवल्यानंतर तिचे सर्व सहकारी तिला टाळू लागले. तिच्यावर झालेल्या बलात्कारावर शंका घेऊ लागले. गेली दहा वर्ष तिच्या कामाची प्रशंसा व्हायची त्याच कामात आता त्रुटी काढून तिला फटकारले जाऊ लागले. शेवटी तिला सैन्यातून काढून टाकण्यात आले. मायला ने २००९ मध्ये समुपदेशनात एम.ए. केले. बलात्कार पिडीतांना समुपदेशन व मदत करण्याचे काम ती करत आहे. एका नव्या करिअरची सुरुवात तिने केली. पण आवडीचे क्षेत्र सोडावे लागले ही खंत आहेच. एका तुटलेल्या व्यवस्थेची अतिशय बोलकी कहाणी आहे.

वृषाली मगदूम, नवी मुंबई 

vamagdum@gmail.com