या पुरुषप्रधान व्यवस्थेत बाईचा जन्म जेवढा अवघड तेवढाच तिचा मृत्यूही! तिचं जगणं जेवढं अवघड, तेवढाच बाईपणाचा प्रवासही.
समाज हा स्त्री आणि पुरुष दोघांचा मिळून बनलेला आहे, ही धारणा इतकी खोलवर रुजलेली आहे की एका पुरुषाच्या शरीरात जन्म घेतलेली स्त्री किंवा एका स्त्रीच्या शरीरात जन्म घेतलेला पुरुष आपली ओळख मिळवण्यासाठी जी धडपड करते / करतो त्यात त्या व्यक्तीचं आयुष्यच पणाला लागतं. त्याची झळ तेच जाणतात ज्यांनी हा जीवघेणा प्रवास सोसला आहे.
अशाच चुकीच्या शरीरात जन्म घेतलेल्या, डिंपल नावाच्या, स्त्री बनू पाहणाऱ्या एका हळव्या मुलीची ही कथा आहे. कळत्या वयापासूनच डिंपलला ती स्त्री असल्याचं जाणवू लागलं होतं. पण शरीर मात्र पुरुषाचं होतं. स्वतःच्या कुटुंबापासून ते शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि समाजाशी तिला बालवयापासूनच संघर्ष करावा लागला. मानसिक कुचंबना, शारीरिक बदल, आर्थिक अडचणी आणि या सगळ्यातून आपल्याला हवं तसं शरीर बनवून घेण्याची धडपड या सगळ्यात किती वेळा हार मानून पुन्हा पुन्हा मनाला खंबीर बनवत तिचा हा प्रवास सुरू होता.
छोट्या गावात, आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली डिंपल. तिला आपलं शिक्षण पूर्ण करता करताच आपलं बाई बनण्याचं स्वप्नही पूर्ण करायचंय होतं. त्यासाठी घ्यावे लागणारे औषधोपचार, महागड्या शस्त्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टर्स सगळंच तिच्या आवाक्या बाहेरचं होतं.
काही वर्षांपासून ती घेत असलेले उपचार, काही शस्त्रक्रिया, अर्धवट अपुरी माहिती आणि या सगळ्यात ती एकटी करत असलेला झगडा यात डिंपल आजारी पडली, खचून गेली. बाई होण्याचं स्वप्न पाहता पाहता, बाई बनता बनता ती स्वतःच संपून गेली.
आपल्याला स्त्री-पुरुष व अन्य कुठलं शरीर मिळावं हे आपल्या हातात नाही. निसर्गाने जे बहाल केलं ते आपण स्वीकारलं, आई-वडील, समाज, नातेवाईकांनी स्वीकारलं तर अशा कित्येक 'डिंपल' आहे तशा स्वरूपात स्वतःला स्वीकारतील किंवा आपल्या मनाप्रमाणे स्वतःत बदल करून घेऊन सन्मानाने जगतील. परंतु समाजातल्या पारंपरिक धारणा, रक्ताच्या नात्यापेक्षाही महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रतिष्ठेच्या कल्पना, सामाजिक दडपण, अशी व्यक्ती आपल्या घरात आहे याबद्दलची अपमानास्पद भावना, कुटुंबाबाहेरही त्यांचा केला जाणारा धिक्कार हे सगळं सोसताना किती जीव नकोसा होत असेल त्यांना. तरीही ते जगतात, संघर्ष करतात, कधी आहे त्या व्यवस्थेशी हात मिळवणी करून समुदायात मिसळून जातात तर कधी शिक्षण, नोकरी मिळवून सन्मानाचं आयुष्य जगू पाहतात.
काही महिन्यांपूर्वी माझी डिंपलशी ओळख झाली. तेव्हा तिचा बाई बनण्याकडचा प्रवास सुरू झाला होता, पण पूर्ण झाला नव्हता. प्रवासाच्या या मधोमध तिचा अनुभव मला चित्रित करायचा होता. त्यानुसार भेट ठरली. ती पूर्ण स्त्रीवेशात येणार होती, पण तिने तो निर्णय बदलला. "मॅडम, मी जेव्हा संपूर्ण स्त्री होईन तेव्हा आपण पुन्हा एकदा मुलाखत करू." असं ती म्हणाली.
शेवटी, ठरल्याप्रमाणे मुलाखत झाली. या मुलाखतीत स्त्री बनण्याच्या प्रक्रियेत मधोमध पोहचलेल्या एका तरुण मुलाची, पुरुषाची संवेदना, अनुभव आणि संघर्ष चित्रित झालेला आहे. 'मुक्ता' या यूट्यूब चॅनलवर डिंपलची ही मुलाखत अपलोड करण्यात आली होती.
डिंपलच्या मृत्यूने कितीतरी अनुत्तरीत प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरीतच राहतात.
डिंपल आपल्या समस्यांशी, आपल्या आजाराशी एकटीच झुंजत होती. मर्यादित ज्ञान, त्यांच्या जेंडरकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, त्यामुळे वाटणारा संकोच, आर्थिक परिस्थिती अशा कितीतरी गोष्टींमुळं तिने स्वतःसुद्धा आपल्या आजाराविषयी कुणाला सांगितलं नाही. तिच्याशी चांगली ओळख, चांगली मैत्री असून सुद्धा तिच्या आजाराविषयी मला कळू शकले नाही. याची खंत मनात कायम राहील. कदाचित कळलं असतं तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसातली तिच्या मनाची घुसमट ती आम्हाला सांगू शकली असती का?
मोठ्या शहरात किंवा अत्याधुनिक वैद्यकीय सेवा तिला पुरवता आल्या असत्या का? जीवन जगण्याची आर्तक्य ओढ असणाऱ्या ह्या कोवळ्या पोरीला वाचवता आलं असतं का?
डिंपलला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या होत्या. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, साहित्यात तिला चांगलीच रुची होती, तिला स्वतःचं यूट्यूब चॅनल काढून त्यावर कवितांचं अभिवाचन करायचं होतं. विशेषतः ट्रान्सजेंडर व्यक्तींनी लिहिलेल्या कविता त्यांच्या प्रश्नांविषयीच्या कविता त्यातून जगासमोर मांडायच्या होत्या.
चांगला जीवनसाथी शोधायचा होता जो तिच्यावर मनापासून प्रेम करेल, तिला समजून घेईल.
कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून तिच्या आजारी असण्याविषयी गुप्तता बाळगण्यात आली का? तिला काहीतरी कॅन्सर सारखा दुर्धर आजार झालेला आहे आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी बतावणी करत तिच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यू विषयी सावधानता, गोपनीयता, शांतता बाळगली का? तिच्या मृत्यूनंतर फारसे सोपस्कार न करता घाई-गडबडीत तिचा अंत्यविधी उरकण्यात आला का? आपला मुलगा तृतीयपंथी होता, त्यामुळे त्याच्या दहन विधीला तृतीयपंथी लोक येऊन काही गडबड करतील का? त्याची तृतीयपंथी असण्याची गोष्ट जगाला माहीत होईल का? किंवा एकूणच त्या समुदायाविषयी असणारे गैरसमज या सगळ्या बाबींमधून तिच्या सामान्य, अशिक्षित कुटुंबियांच्या मनात एक प्रकारची भीती दडली होती का?
असे अनेक प्रश्न त्यावेळी मनात उदभवले.
एलजीबीटीक्यू व तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींविषयी कुटुंबातसुद्धा खूप जिव्हाळा किंवा आपुलकी वाटत नसल्याचे तिच्यासारख्या अनेकांबाबत जाणवतं.
एखादं अपंग किंवा मानसिकरीत्या कमजोर अपत्य, ज्याची सेवा सुश्रुषा करून कुटुंब, नातेवाईक कंटाळलेले आहेत अशा अपत्याच्या मृत्यूने सुटका झाल्याचा जो अविर्भाव त्याच्या कुटुंबीयांमध्ये दिसतो तसाच काहीसा अविर्भाव तिथे जाणवत होता.
या व्यतिरिक्तही डिंपलचा मृत्यू अनेक सामाजिक प्रश्नही उभे करतो.
१. ट्रान्स समुदायातील व्यक्तींसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनात कुठलीही स्वतंत्र सोय नाही.
२. त्यांना नोकरीत कुठलेही आरक्षण नाही,
३. लिंग परिवर्तन करण्याच्या शस्त्रक्रियेबद्ल अल्प दरात वैद्यकीय सेवा पुरवणारी कुठलीही सरकारी वैद्यकीय यंत्रणा अस्तित्वात नाही.
४. सार्वजनिक जीवनात त्यांच्या गरजा समजून घेणारी कुठलीही यंत्रणा नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'तू सुद्धा आमच्यासारखीच एक व्यक्ती आहेस, माणूस आहेस, भिऊ नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत!' हा विश्वास त्या व्यक्तीला कुटुंब (अपवादाने काही अपवाद असू शकतात.), संस्था, शाळा, महाविद्यालये वा कुठलीही सामाजिक संस्था देत नाही.
जन्माला आलेलं बाळ हे स्त्री किंवा पुरुष असेल तरच त्याला सन्मान मिळतो अन्यथा ते कुचेष्टेचा विषय बनतं. त्याला आयुष्यभर अवहेलना, अपमान सोसावा लागतो.
त्यांना आहे तसं स्वीकारायला हवं. समाजाने, कुटुंबाने. प्रत्येक व्यक्तीने त्यांना प्रेम, आपुलकी, माया आणि सन्मान द्यायला हवा.
प्रत्येक जीवाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे! त्याला तसं जगू द्या!
'डिंपल, तू म्हणाली होतीस, "मॅडम आता माझं शरीर, माझे हात-पाय हळूहळू तुमच्यासारखे होत आहेत.” किती आनंदी होतीस तू... तुला संपूर्ण स्त्री झालेलं बघायचं होतं मला... कुठे निघून गेलीस; तुझं अर्धवट स्वप्न माझ्या मनात जिवंत ठेवून...!'
तुला 'भावपूर्ण श्रद्धांजली' तरी कसं म्हणू ?
https://youtu.be/lXZTjMlf8PY?si=E-vtElZIY6dQi3Bb
- सारिका उबाळे, अमरावती
९४२३६४९२०२